"ते लोक."

भागो's picture
भागो in जनातलं, मनातलं
27 Jan 2024 - 3:57 pm

“लोचा”
मी जेव्हा प्लांट मध्ये काम करत असे त्यावेळची ही कथा आहे.
परब माझ्या शिफ्टमध्ये काम करत असे. माझे आणि परबचे एक अतूट नाते होते. परब जो एकदा माझ्या शिफ्ट मध्ये आला त्यानंतर तो कधीही दुसऱ्या शिफ्टमध्ये गेला नाही. कसं असतना कि औपरेटर आणि शिफ्ट इंजिनिअर हे अधून मधून बदलत असतात. सर्व साधारणपणे कोण औपरेटर कामचुकार आहे, कोण शिफ्टमध्ये झोपा काढतो, कोण ड्युटी चुकवून संडासात जाऊन झोपतो आणि कुणाची अक्कल गुग्यात आहे ह्याची शिफ्ट इनचार्जला चांगली कल्पना असते. पण आमचा हा प्लांट असा डिझाईन केला होता कि प्लांटच्या कुठल्याही कोपऱ्यात माशी जरी शिंकली तरी सेन्ट्रल कंट्रोलरूम मध्ये अलार्म येणार. ही थोडी अतिशयोक्ति झाली म्हणा. सांगायचा मुद्दा हा कि जुन्या प्लांट्स मध्ये औपरेटरहा महत्वाचा दुवा असे, तसा तो ह्या प्लांटमध्ये नव्हता. म्हणून कोणी शिफ्ट इंजिनिअर औपरेटरबद्दल आग्रही नसत. कुणीही चालेल असा अटिट्युड असे.
कुणीही चालेल पण हा परब नको ह्याबद्दल, का कुणास ठाव, सगळ्यांचे एकमत होते. माझा अपवाद सोडून. परबबद्दल लोकांना एव्हढी अनामिक घृणा का वाटायची हे कोडे मला कधी सुटले नाही. नंतर हळू हळू मला समजायला लागले की लोक घृणा करत नाहीयेत तर ते परबला घाबरून आहेत. त्या अनामिक भीतीचे कारणही मला कधी समजले नाही. मला परबविषयी सॉफ्ट कॉर्नर आहे हे सगळ्या सहकाऱ्यांना माहित होते, म्हणूनच कि काय परबचा विषय निघाला कि लोक चटकन सांधा बदलत असत.
तर हा परब प्रथम माझ्या शिफ्टमध्ये आला त्याला आता जवळ जवळ दोन वर्षं झाली. त्यावेळी मला परबबद्दल काही घेणं देणं नव्हतं. मी जेव्हा राउंडवर होतो तेव्हा टर्बाईन समोर खुर्ची टाकून डोळे मिटून औपरेटर बसला होता. हे जरा नवीन होत. शिफ्ट सुरु होऊन एक तास देखील झाला नव्हता. आणि हा पठ्ठ्या झोपला पण. मी त्याच्या खांद्याला हलकासा स्पर्श केला. तो खडबडून उठला. “येस्स सर?”
“जागा झालास? छान. लोंगशीट घेऊन माझ्या केबिनमध्ये ये.”
“सर मी झोपलो नव्हतो...”
मी राउंड घेऊन परतलो तर हा माझी वाट पाहत उभा होता.
मी त्याच्या लॉगवरून नजर फिरवली. त्याचे नाव परब होते. (औपरेटरला आपले नाव लॉगशीटवर लिहावे लागते.)
“परब, माझ्या शिफ्टमध्ये प्रथमच रिपोर्ट करतोयस?”
“हो.”
“शिफ्ट आता आत्ताच सुरु झाली नि तू लगेच झोपलास पण?” मी जरा कडक आवाजात विचारले.
खर तर काय आहे ना टर्बाईन असा एक सूर पकडून गात असतं कि त्या नादब्रह्मात कुणालाही झोप लागावी. तो एकसुर तोडावा लागतो. त्याच्या संमोहनातून बाहेर पडावे लागते.
ही वाक्ये माझ्या डोक्यात कशी आली? मला नाही माहित.
परब मला काही सांगत होता पण माझे लक्ष नव्हते.
“अं, परब, तू मला काही तरी सांगत होतास? सॉरी, माझे लक्ष नव्हते. पुन्हा बोल.”
“सर, मी एव्हढेच सांगत होतो कि मी झोपलो नव्हतो.”
“ओहो, त्याला ब्रह्मानंदी टाळी लागली असं म्हणायचं झोप म्हणायचं नाही. असच ना? शिफ्टमध्ये हे चालत नाही...” मी बरच काही बोलून गेलो. तो शांतपणे ऐकत गेला. “जा. पुन्हा असं करू नकोस.”
“सर, मी झोपलो नव्हतो. मी एकाग्र चित्ताने टर्बाईनशी संवाद साधत होतो...”
हे म्हणजे फार झालं.
“अरेरे मी तुझी समाधी डिस्टर्ब केली. एनीवे काय म्हणत होते टर्बाईन?” मी कुत्सितपणे विचारले. पण माझा कुत्सितपणा त्याच्या पर्यंत पोचला नसावा. तो उत्साहाने म्हणाला, “टर्बाईन म्हणाले कि सगळे काही ठीकठाक आहे. आपल्या शिफ्टमध्ये ट्रिप होणार नाही.”
“छान! माझ्यावतीने त्याला सांग कि साहेबांनी “थँक यू” दिले आहे. जा आता तू.”
“अवश्य सांगेन सर.” लॉगशीट घेऊन तो चालता झाला.
सकाळी शिफ्ट संपवून मी घरी गेलो.
बायको छानपैकी कोबी पोहे बनवत होती. मी उगीचच टंगळ मंगळ करत किचनमध्ये फिरत होतो. डब्यांची उघडझाप करत तोंडात टाकायला काही मिळतंय का बघत होतो.
“आता एके जागी शांतपणे बस पाहू. गरमागरम पोहे झाले आहेत.”
पोह्यावर ताव मारत होतो तो बायकोने विषय काढला.
“कशी झाली शिफ्ट?”
पुष्पा कधी प्लांटचा विषय काढत नाही. प्लांटमधल्या राजकारणात तिला कवडीचाही रस नव्हता. मग आजच?
“काही नाही. अगदी मजेत गेली नाईट.”
“खरच? अगदी मजेत गेली? सांगण्यासारखं काही नाही?”
“अगदी काही नाही.” संभाषण कुठे चालले आहे? कळायला मार्ग नव्हता.
“अरे हो, एक गंमत झाली खरी. ऐकून तुला हसायला येईल. माझ्या शिफ्टमध्ये प्ररब नावाची एक वल्ली आली आहे. तो मला सांगत होता कि टर्बाईन त्याच्याशी गप्पा मारतं. आता बोल.” मी हसत हसत पुष्पाला सांगत होतो.
“त्यात हसण्यासारखं काय आहे? कुणाचं नातं कुठं जमेल त्याचा काही नेम नाही. माझे बाबा “त्यातले” होते. त्यांचा झाडांशी, गाय-गुरांशी, कुत्र्या-मांजारांशी संवाद चालायचा. गावी आमच्या घराच्या परिसरात आंब्याचे एक झाड आहे. बाबांचा त्यावर फार जीव होता. त्या झाडाचे आंबे त्यांनी कधी उतरवले नाहीत. बाबा म्हणायचे कि त्या झाडाने त्याना सांगितले होते कि “माझी फळं फक्त पक्ष्यांसाठी ठेव.” आणि पक्ष्यांनाही हे माहित होते. सकाळी उठून आम्ही बघायचो तर झाडाखाली अर्ध्या कच्च्या अर्ध्या पिकलेल्या आंब्याचा सडा पडलेला असे. रात्री बहुतेक वटवाघुळे आणि घुबडे येऊन ताव मारून जात असणार. बाबा गेल्यावर त्या आंब्याने कधी म्हणून फळ धरले नाही. आम्ही लाख उपाय केले पण...”
पुष्पीने ही स्टोरी मला आधी सांगितली होती. मी तिच्या बरोबर तिच्या माहेरी जेव्हा जात असे तेव्हा आवर्जून त्या दुःखी झाडाची भेट होत असे.
“ह्या वर्षीपण...” पुष्पा मला सांगायची.
केमिकल लोच्या! दुसरे काय. मी मनातल्या मनात म्हणालो.
“हे पहा पुष्पा, कुत्री, मांजरे, गुरे आणि झाडं ह्यांच्या गोष्टी मी ऐकल्या आहेत पण यंत्रांनाही भावना असतात? हे हे म्हणजे फार झालं. म्हणजे आमच्या किअर्टनने जर हे ऐकलं तर त्याला झीट यायची.”
हा विषय तेव्ह्ढ्यावर बंद झाला. पण परब माझ्या शिफ्टमध्ये कायमचा स्थिर झाला. मी रोज त्याला मिश्किलपणे विचारात असे, “काय परब, काय म्हणतय टर्बाईन?”
तो ही हसून उत्तर द्यायचा, “आज फुल लोडवर चालू आहे त्यामुळे मजेत आहे. तुम भी खुश हम भी खुश!”
एक दिवशी मात्र...
“सर, आज टर्बाईन ट्रिप होणार आहे.”
“का रे बाबा, आज का मूड खराब झाला?”
“टर्बाईन चंगा आहे. पण बॉईलर धोकेमे है.”
प्लांट तर अगदी नॉर्मल होता. असा कसा “बॉईलर धोकेमे है.”?
पण थोड्याच वेळात बॉईलर ऑपरेटरचा फोन आला, “सर, कोळसा ओला येतो आहे. फ्लेमचे काही खरं नाही. ऑइल बर्नर घेऊया का?”
कोळसा ओला येत होता. त्यामुळे बॉईलरची फ्लेम भगभगत होती. ओला कोळसा संपेस्तोवर लक्ष ठेवायला पाहिजे होतं. मी पण इरेस पेटलो होतो. स्वतःशी म्हणालो जर प्लांट बंद पडला तर मी पण नावाचा इंजिनिअर नाही. बघतोच कसा बंद पडतोय ते. तसं पाहिलं तर ऑइल सपोर्ट घेऊन पूर्ण आठ तास बॉईलर चालवू शकलो असतो पण ते माझ्या स्वभावात बसण्यासारखे नव्हते. ऑइल सपोर्ट देऊन बॉईलर चालवणे म्हणजे निसर्गापुढे शरणागती पत्करण्सारखं होतं. ते काय कुणीही करेल. मी नाही करणार. आज माझा मूड खतरनाक होता.
मी पण बॉईलर समोर खुर्ची टाकून बसलो. फ्लेमवर लक्ष ठेवून बसलो. जर का आत्मविश्वास डळमळला तर सपोर्ट घ्यायचा असं ठरवले.
असे तीन चार तास गेले. मधेच वाटायचे कि फ्लेम जाणार आणि ऑइल सपोर्टचे बटण दाबायला बोट शिवशिवत. पण नाही. ती एक हुलकावणी होती. मी आणि बॉईलर आमचा जणू बुद्धिबळाचा डाव चालू होता. तो एक चाल करायचा मी पण धीर न सोडता त्याला तोंड देत होतो. मी पण हा गेम एंजॉय करत होतो.
परबने सांगितले होते कि आज टर्बाईन ट्रिप होणार आहे. माझी एकच इच्छा होती कि त्याला खोटं पाडायचं.
पण एका गाफील क्षणी जिद्दीला पेटून मी सपोर्ट घेतला नाही आणि नेमकं त्याच वेळी फ्लेम फेल्युअर होऊन बॉईलर ट्रिप झाला. बरोबरीने टर्बाईन पण त्याचा काहीही दोष नसताना.
मी गेम हरलो होतो.
टर्बाईनने परबच्या माध्यमातून मला हे आधीच सांगितले होते. पण मी विश्वास ठेवायचं नाकारलं होते.
हे सगळे माझ्या समक्ष वर्तमानकाळात घडत होते आणि अविश्वसनीय- अनाकलनीय-अमानवीय होते.
म्हणावं तर “मेकॅनिकल लोच्या!”
माझ्या टीमने पंधरा मिनिटातच प्लांट नॉर्मल केला.
शिफ्ट संपवून घरी गेल्यावर मी ही घटना पुष्पाला सांगितली.
“मेकॅनिकल लोच्या!” एव्हढेच बोलून ती गूढ हसली.
कधी कधी मला संशय येतो कि माझी प्रिय पत्नी पुष्पा देखील “त्यांच्या” पैकी एक आहे. नाहीतर ती “मेकॅनिकल लोच्या!” हे अगदी माझ्या मनातले कसे बोलली?
(समाप्त)

कथा

प्रतिक्रिया

कंजूस's picture

27 Jan 2024 - 4:37 pm | कंजूस

आवडलं.

भागो's picture

27 Jan 2024 - 7:53 pm | भागो

कंजूस सर
आभार!

मुक्त विहारि's picture

27 Jan 2024 - 5:47 pm | मुक्त विहारि

मस्त

मुक्त विहारि's picture

27 Jan 2024 - 5:47 pm | मुक्त विहारि

मस्त

भागो's picture

27 Jan 2024 - 7:55 pm | भागो

मु. वि.
अनेक आभार.

तुषार काळभोर's picture

27 Jan 2024 - 6:07 pm | तुषार काळभोर

लै भारी!

कधी कधी मला वाटतं, तुम्हाला इतके विचित्र विषय सुचतात, तुम्ही 'त्यांच्यातले' आहात की काय!

विजुभाऊ's picture

28 Jan 2024 - 6:59 am | विजुभाऊ

भागो हे केप्लर बी २२ वर असताना माझे शेजारी होते.
७ अँड्रोमिडा मधून परत आलात हे ऐकून बरे वाटले.
भागो; ऐकतोय ते खरे आहे का? तुम्ही गावाबाहेर ऊर्टच्या ढगात कॉलनी वसवताय म्हणे

कॉलनी नाही.ऋषि विश्वामित्रा ह्यांच्या प्रमाणे प्रतिसृष्टी बनवण्याची इच्छा आहे. त्या विश्वात
ॐ सर्वे भवन्तु सुखिनः ।
सर्वे सन्तु निरामयाः ।
सर्वे भद्राणि पश्यन्तु ।
मा कश्चित् दुःख भाग्भवेत् ॥
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः॥ अशी प्रणाली असणार आहे.
बुकिंग सुरु आहे.
त्वरा करा.

श्वेता व्यास's picture

29 Jan 2024 - 12:35 pm | श्वेता व्यास

+१
खूप मस्त कथा!

भागो's picture

27 Jan 2024 - 8:02 pm | भागो

तुषार काळभोर
कसे सुचतात? सिम्पल!
आपण सर्व मिपाकर!,तुम्ही सर्व लोक माझ्या कथा वाचता आणि उत्तेजानार्थक प्रतिसाद देता. म्हणून मी लिहितो.

कर्नलतपस्वी's picture

27 Jan 2024 - 8:36 pm | कर्नलतपस्वी

नेहमीप्रमाणेच मस्त.

भागो's picture

27 Jan 2024 - 11:23 pm | भागो

कर्नलसाहेब
as नका बोलू.
कुठे गुरुवर्यांचा ऐरावत आणि कुठे भागोची तट्टाणी.

भागो's picture

27 Jan 2024 - 11:24 pm | भागो

बॉईलर प्रायमर.
कोळश्यावर चालणाऱ्या मोठ्या बॉईलर बद्दल आपण बोलत आहोत. ह्या वाफ संयंत्रात-बॉईलर- मध्ये प्रथम कोल मिल्समध्ये कोळशाची वस्त्रगाळ पूड केली जाते. त्यानंतर हवेच्या दाबाने ती बॉईलरच्या भट्टीमध्ये फेकली जाते. भट्टीच्या उच्च तापमानामुळे ती लगेच पेट घेते. त्यामुळे भट्टीत एक रणरणती फ्लेम तयार होते. पण ही ज्योत अखंडित राहण्यासाठी काही आवश्यक गोष्टी लागतात. जर त्या नसतील तर हेवी फ्युएल ऑईलचे बर्नर सहाय्यक म्हणून वापरावे लागतात. जर अचानक काही कारणाने भट्टीमाधली ज्वाला नाहीशी झाली तर बॉईलर स्वयंचलित प्रणालीने क्षणार्धात बंद- ट्रिप- होतो. कोळशाचा प्रवाहही खंडित केला जातो.
का? कारण ज्या भट्टीतली ज्वाला नाहीशी झाली आहे त्या भट्टीत कोळसा फेकला गेला तर भट्टीत स्फोट होण्याची शक्यता असते.
अशा परिस्थितीत इन चार्ज ची कसोटी असते. कारण बर्नर लावणे हे चिकनहार्टचे लक्षण समजले जाते.
म्हणजे इकडे आड आणि तिकडे विहीर अशी अवस्था असते.

रंगीला रतन's picture

28 Jan 2024 - 12:03 pm | रंगीला रतन

भारीए कथा :=)
आवडली

भागो's picture

28 Jan 2024 - 10:55 pm | भागो

अनेक आभार!

टरबाईन फिरते ठेवण्यासाठी उच्चदाब उच्च तापमान असलेली वाफ लागते. कमी दाब कमी तापमान असेल तर टरबाईन ची पाती गंज लागुन खराब होतात. कधी कधी भट्टी मधील नेहमीचे इंधन जर नीट जळत नसेल तर त्यामुळे वाफ योग्य तशी तयार होत नाही. त्यामुळे टरबाईन ची सुरक्षा व्यवस्था कार्यरत होऊन टरबाईन बंद पडते.
परब हे अतिशय मुरलेले व कार्यक्षम टरबाईन अटेंडंट आहेत. त्यांचे केस अनुभव घेऊन पांढरे झाले असल्यामुळे ते रोज शिफ्ट चालू करताना सहज सगळीकडे नजर मारत असावेत. शिफ्ट इंजिनीयर परबांना इतरांच्या पेक्षा चांगली वागणूक देत आहेत. इतर शिफ्ट इंजिनीयर आणि परब यांच्या मध्ये एक अव्यक्त इगोचा अडसर आहे. परब कदाचित अनुभवाच्या जोरावर कधी तरी त्यांच्यावर वरचढ ठरले असावे आणि इंजिनीयर ला स्वतः च्या डिग्री मुळे कमी शिकलेल्या कामगारांकडून शिकावं लागलं याची सल कदाचित असावी.
परबांनी अनुभव वापरून पुढे काय होईल याची शक्यता शिफ्ट इंजिनीयर ला निदर्शनास आणून दिली. या शिफ्ट इंजिनीयर चा सुद्धा इगो दुखावला पण त्याचं लक्ष परबांच्या अनुभवी ज्ञानाकडे न जाता भविष्य वाणी या अर्थाने गेले.
असे अनेक परब प्रोसेस इंडस्ट्रीमध्ये असतात, नवीन सरंजामी उतरंड त्यांना खाली दाबत राहते.

भागो's picture

28 Jan 2024 - 10:46 pm | भागो

भीमराव आभार.
तुम्ही म्हणता ते खर आहे. असे अनेक उद्योग आहेत ज्यांची वैज्ञानिक चिकित्सा करणे शक्य नसते. अगदी मोजकी उदाहरणे देतो,
१.चहाचा एक घुटका घेऊन चहाची किंमत ठरवणारे कोलकत्याचे टी टेस्टर,
२. मिश्र धातू बनवणारे कारीगर,
३. सिनेमाच्या केवळ श्रेय नामावलीवरून पैसा ओतणारे डिस्ट्रिब्युटर.
४.लग्नकार्यात, लंगरमघे शेकडो लोकांचा चविष्ट स्वयंपाक बनवणारे बल्लवाचार्य!
५.असे अजूनही आहेत.
हे लोक निराळ्या प्रकारात मोडतात. त्यांनी त्यांच्या डोक्यात प्रोसेसचे मॉडेल बनवलेले असते ते वापरून हे लोक काम करत असतात. हे ज्ञान त्यांच्या डोक्यातून काढून संगणकात आणणे ह्याला नॉलेज इन्जिनिअरिन्ग असे नाव आहे. एक्सपर्ट सिस्टिम्स, फझी लॉजिक ह्याचे हे मुलतत्व आहे.
पण मी ह्या कथेत वर्णन केलेले "परब" हा निराळा
प्रकार आहे. ह्यांची "नाती" निराळ्या पातळीवर काम करत असतात. त्यांना "ऑन द स्पॉट" असायची गरज नसते. म्हणजे समजा "परब" सुट्टीवर आपल्या गावी, टर्बाईन पासून शेकडो किलोमीटर दूर आहेत आणि टर्बाईनवर काही चुकीने स्ट्रेस आला तर त्याना गावी "संदेश" जातो आणि ते तातडीने प्लांटकडे धाव घेतात.
क्वांटम फिजिक्स मध्ये ह्याला "एंटँगल्मेंट" असे नाव आहे. हे अणुंच्या बाबतील प्रयोगांती सिद्ध झालेले आहे. सरते शेवटी माणूस काय नि यंत्र काय ही अणु रेणूनीच बनले आहेत. (ही आपली माझी कथा कल्पना.)
काही प्रकारच्या जुळ्या भावंडांत असे नाते असते. त्या जुळ्या भावंडांची दत्तक देताना ताटातूट करू नये असा प्रघात आहे.
सध्या ह्या विषयावर बरेच संशोधन चालू आहे.
असे अनेक परब प्रोसेस इंडस्ट्रीमध्ये असतात, नवीन सरंजामी उतरंड त्यांना खाली दाबत राहते.>>ह्याबद्दल बरेच लिहिण्यासारखे आहे. पण आज नको.

नठ्यारा's picture

29 Jan 2024 - 6:42 pm | नठ्यारा

भागो,

कथेबद्दल आभारयुक्त कौतुक !

क्वांटम एंटँगलमेंट अर्थात पुंजयोग मानवी डोक्यात सतत घडतो, असं माझं मत आहे. विचार येणे ही मुळातून पौंजिक घटना ( क्वांटम इव्हेंट ) आहे. - इति अस्मादिक.

आकाश म्हणजे विचार. म्हणून एकाच वेळेस एकंच विचार अनेकांच्या मनात येणं, यांस आकाशवाणी म्हणता यावं. त्यामुळे आकाशवाणी ही बहुलोकी पुंजघटना ( मल्टी लोकलाईझ्ड क्वांटम एंटँगलमेंट इव्हेंट ) असावी, असं माझं मत.

-नाठाळ नठ्या

भागो's picture

30 Jan 2024 - 8:44 am | भागो

क्राउड मेंटॅलिटी?

का हा स्वार्म अल्गो आहे?

नठ्यारा's picture

30 Jan 2024 - 8:46 pm | नठ्यारा

तुम्हांस मॉब मेंटॅलिटी म्हणायचं होतं बहुतेक. गर्दीचं मानस एकाच वेळेस कार्यरत नसतं. ते हळूहळू जमत जातं. याउलट झुंडमानस क्षणार्धात अक्राळविक्राळ रूप धारण करू शकतं. आकाशवाणीची ती काळी बाजू होऊ शकते.

-ना.न.

प्रकार आहे. ह्यांची "नाती" निराळ्या पातळीवर काम करत असतात. त्यांना "ऑन द स्पॉट" असायची गरज नसते. म्हणजे समजा "परब" सुट्टीवर आपल्या गावी, टर्बाईन पासून शेकडो किलोमीटर दूर आहेत आणि टर्बाईनवर काही चुकीने स्ट्रेस आला तर त्याना गावी "संदेश" जातो आणि ते तातडीने प्लांटकडे धाव घेतात.

श्री भागो, तुमच्या ह्या मताबरोबर असहमत आहे. तुम्ही लिहिलेले एक कथा असल्यामळे लेखकाला कल्पनाविलासाचे स्वातंत्र असायला हवे. पण तुम्ही आता कथा सोडुन अशी माणसे असतात असे सांगण्याकडे चालला आहात. ते चुकीचे आहे.
क्वांटम एन्टॅगलमेंट आणि श्री परब यांची काही संबध नाही. त्यांच्या वर्तनाला भविष्यसूचक विश्लेषण (predictive analytics) असे म्हणता येईल. टर्बाईन (मराठी शब्द ?) कश्या प्रकारे चालत आहे आणि कसे चालेल, त्यावरुन पुढील काळात त्यात काही बिघाड होऊ शकतात हे सांगता येऊ शकते.

--
बाकी श्री भिमराव याच्या प्रतिसादाबरोबर सहमत.

मला एव्हढेच सुचवायचे आहे कि काही व्यक्तींना नजदिकच्या भविष्य काळात घडणाऱ्या घटनांची चाहुन आधीच लागते. हे नेहमीच होत नाही. पण जिथे आपली नाती गोती जमली आहेत तिथे. हे सूचक स्वप्नांमार्फत किंवा वेगळ्या प्रकारची बेचैनीचा अनुभव येऊन. ह्या विषयावर जर आपण एक दोन ओळींचा सेपरेट धागा काढला तर पहा किती लोक आपले अनुभव शेअर करतात ते.
बादवे, टर्बाईनच्या बाबतीत हा माझा स्वतःचा अनुभव आहे.
जर कोणी एखाद्या समस्येतत पूर्ण इंवोल्व झाला असेल तर ती समस्या सोडवण्याचा साधा उपाय म्हणजे Sleep over it. उत्तर तुमच्या समोर हजार होईल.
ह्या विषयावर एक भन्नाट कथा गेली वीस वर्षे माझ्या डोक्यात आहे. त्या कथे वेळ केव्हा येईल?
Quantum Entanglement हा विषय महान आईनस्टाइनला ही चकमा देऊन गेला.
सवाल हा आहे की Quantum Mechanics कुठे संपते आणि Newtonचे राज्य कुठे सुरु होते. हे जेव्हा समजेल तेव्हा Quantum Entanglement हे व्यक्तींना / यंत्रांना लागू होते कि नाही हे आपल्याला समजेल.
आपल्याला कदाचित Animal communicator हा व्यवसाय माहित असेलच. त्यात कितपत सत्यता असेल?

श्री भागो, तुम्ही बरीच सरमिसळ करत आहात.

टर्मीनेटर's picture

29 Jan 2024 - 4:01 pm | टर्मीनेटर

वाह भागो वाह! मस्त आहे कथा 👍

बादवे, गेल्या आठवड्यात जॅकी चॅनचा 'अराउंड द वर्ल्ड इन ८० डेज' हा धमाल चित्रपट पुन्हा पहाण्यात आला. त्यतल्या संशोधकाचे भन्नाट प्रयोग पाहुन तुमच्या 'डॉ. ननवरेंची' आठवण आली 😀 बऱ्याच दिवसांत त्यांच्यावरची कथा आली नाहिये तेव्हा येउद्यात डॉ. ननवरे आणि प्रभुदेसाई ह्या जोडगोळीवर अजुन एखादी फर्मास कथा!

टर्मीनेटर
बघू या. कसं जमतंय.

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Jan 2024 - 5:26 pm | अमरेंद्र बाहुबली

कथा आवडली.

सर्वांसाठी, पण मुख्यतः श्री Trump ह्यांच्यासाठी.
विकी वर ह्या विषयावर चर्चा आहे.
https://en.wikipedia.org/wiki/Quantum_entanglement
हे फार dense आहे. म्हणून तो सगळा भाग सोडून शेवटच्या Entanglement of elements of living systems ह्या परिच्छेदावर नजर टाका. तिथे दिलेला हा रेफरन्स पहा,
https://www.scientificamerican.com/article/schroedingers-bacterium-could...
आजच्या मितीला एव्हढे पुरेसे आहे.

नगरी's picture

3 Feb 2024 - 2:31 pm | नगरी

लई भारी