आवडती, आवश्यक आणि आरोग्यदायी

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
14 Jan 2024 - 9:10 pm

नमस्कार !
सन 2020मध्ये ‘सुखी झोपेचा साथी’ हा लेख इथे लिहिला होता. त्यामध्ये फक्त मेलाटोनिन या झोपेशी संबंधित एकाच हॉर्मोनचा विचार केलेला होता. त्या धाग्यावरील चर्चेदरम्यान वाचकांनी सूचना केली की, झोपेची एकंदरीत प्रक्रिया या विषयावर सविस्तर लेखन करावे. या चांगल्या सूचनेचा विचार करून हा लेख लिहीतोय. यामध्ये आपण झोपेची आवश्यकता, तिच्या दरम्यान होणारे शारीरिक बदल, तिचे शास्त्रीय प्रकार, तिचा वयाशी संबंध आणि झोप-जाग चक्र या मूलभूत गोष्टींचा विचार करणार आहोत.

झोप कशासाठी ?
रोजची झोप हा माणसाच्या जीवनातील अत्यावश्यक भाग आहे. दमलेल्या शरीराला दैनंदिन विश्रांती देणे हा त्याचा मुख्य हेतू. आपल्या जागृत अवस्थेतून झोपेत गेल्यानंतर आपली इच्छाशक्ती काही काळासाठी स्थगित होते. जीवनातल्या छोट्या मोठ्या त्रासदायक गोष्टींपासून काही काळ तरी आपली सुटका होते. झोपेत आपण स्वप्नांच्या राज्यात अगदी मनमुराद विहार करतो. तसं पाहायला गेलं तर आपल्या झोपेवर आपले निस्सीम प्रेम असते. उगाच नाही आपण आपले एक तृतीयांश आयुष्य झोपेसाठी राखून ठेवत ! झोप ही जरी विश्रांतीची अवस्था असली तरी त्या त्या काळात मेंदू जागृतावस्थेइतकीच ऊर्जा वापरत असतो हा मुद्दा महत्त्वाचा.

झोपेला प्रवृत्त करणारे घटक

मेंदूला सतत पोचणाऱ्या संवेदना कमी होणे हे झोप येण्यासाठी आवश्यक असते. त्या दृष्टीने खोलीतील अंधार, शांतता आणि सुखकर बिछाना या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. या उलट जेव्हा मन चिंताग्रस्त असते किंवा काही कारणांनी मनात भावनांचा अतिरेक झालेला असतो तेव्हा शरीरात एपिनेफ्रीन या हार्मोनचा प्रभाव राहतो आणि त्यामुळे मेंदू जागृत ठेवला जातो. हा अर्थातच झोप येण्यातील मोठा अडथळा ठरतो. इथे एक मुद्दा रोचक आहे. जेव्हा अतिशय श्रमाने माणूस खूप दमलेला असतो तेव्हा झोपेला पोषक असणारे आजूबाजूचे वातावरण नसले तरी देखील तो शांत झोपू शकतो.

ok
शरीरक्रियेतील महत्त्वाचे बदल
1. हृदयगती रक्तदाब आणि श्वसनगती कमी होतात
2. स्नायू शिथिल पडतात
3. शरीरातील विविध स्राव कमी होतात पण काहींच्या बाबतीत जठरस्राव वाढू शकतो.

झोपेचा कालावधी
दैनंदिन जीवनात जाग-झोप असे एक जैविक चक्र कार्यरत असते. प्रौढ व्यक्तीत साधारणपणे १६ तास जागृतावस्था आणि ८ तास झोप असे ते चक्र आहे. झोपेच्या एकूण कालावधीत आपण दोन प्रकारची झोप घेतो :
. 80 टक्के झोप : शांत किंवा मंदतरंग स्वरूपाची असते
. 20 टक्के झोप : ही काहीशी ‘खळबळजनक’ असते तिला विरोधाभासी झोप असेही म्हणतात. आता हे दोन प्रकार विस्ताराने पाहू.

१. मंदतरंग झोप : या झोपेचे साधारण तीन टप्पे असतात : हलकी , मध्यम आणि गाढ.

पहिल्या टप्प्यात शरीराचे स्नायू शिथिल पडू लागतात. डोळ्यांच्या गोल गोल फिरल्यासारख्या सौम्य हालचाली होत राहतात. या टप्प्यात बाह्य आवाज किंवा हालचाल यामुळे संबंधित व्यक्ती झोपेतून सहज उठण्याची शक्यता राहते. हा टप्पा पार पडल्यानंतर खरी झोप सुरू होते आणि हळूहळू ती गाढ स्वरूपाची होते. त्या टप्प्यात मात्र झोपलेल्या व्यक्तीला उठवायचे असल्यास मोठे आवाज किंवा गदागदा हलवणे या गोष्टींची गरज भासते.

या प्रकारच्या झोपेत डोळे बऱ्यापैकी स्थिर आणि शांत राहतात. म्हणूनच तिला ‘नॉन रॅपिड आय मुव्हमेंट (NREM)’ या प्रकारची झोप म्हणतात. या झोपेत मेंदूतील पिच्युटरी ग्रंथीतून ग्रोथ हॉर्मोन आणि gonadotropins ही हॉर्मोन्स टप्प्याटप्प्याने स्रवतात. तसेच शरीराला खऱ्या अर्थाने विश्रांती मिळून त्याचा चयापचय पुनर्स्थापित होतो (restoration). तान्ह्या मुलांच्या बाबतीत या झोपेचा त्यांच्या शारीरिक वाढीशी बऱ्यापैकी संबंध आहे.

ˌही झोप साधारण एक तास पूर्ण झाल्यानंतर तिच्यातून बाहेर येण्याची उलटी प्रक्रिया चालू होते. म्हणजेच,
गाढ >> मध्यम >> हलकी
अशी प्रक्रिया पूर्ण झाली की आता झोपेचा पुढे वर्णन केलेला दुसरा प्रकार चालू होतो.

२. ‘खळबळजनक’ झोप : या प्रकारात डोळ्यांच्या हिसके मारल्यागत वेगवान हालचाली ही महत्त्वाची घटना असते. आपले डोळे अक्षरशः एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे झपाझप हलत राहतात. त्यांच्या हालचालींनी ते जणू काही एखादे संपूर्ण दृश्य त्यांच्या पूर्ण आवाक्यात आणू पाहतात. या वैशिष्ट्यपूर्ण घटनेमुळेच या प्रकारच्या झोपेला ‘रॅपिड आय मुव्हमेंट (REM) प्रकारची झोप असे म्हणतात.
डोळ्यांचा अपवाद वगळता शरीराचे इतर स्नायू मात्र आता कमालीचे शिथिल होतात. जेव्हा जीभ शिथिल पडते तेव्हा ती श्वसनमार्गात अंशतः अडथळा आणते. त्यातूनच घोरण्याचा उगम होतो ! जेव्हा एखादी व्यक्ती पाठ टेकून (supine) झोपलेली असते तेव्हा या प्रकारचा अडथळा सर्वाधिक असतो.

झोपेच्या या स्थितीतून एखाद्याला उठवायला खूपच कष्ट पडतात; त्यातून जर काहीजण कुंभकर्ण असतील तर मग काय विचारायलाच नको ! अर्थातच झोपमोड झाल्याची त्रस्तता त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर दिसून येते. अशा झोपेतून उठल्या किंवा उठवल्यानंतर सुमारे 90% लोक त्यांना स्वप्न पडल्याचे सांगतात. स्वप्नरंजन हा या प्रकारातील अर्थातच विशेष भाग. स्वप्नांच्या संदर्भात विज्ञानात जे अभ्यास झाले आहेत त्यातले बरेचसे ‘गृहीतक’ या स्वरूपाचे आहेत.

एखादी व्यक्ती या झोपेत असताना दर जर तिच्या मेंदूचा विद्युत आलेख (EEG) काढला तर तो जागे असतानाच्या अवस्थेसारखाच असतो. या वैशिष्ट्यपूर्ण विरोधाभासामुळेच झोपेच्या या प्रकाराला विरोधाभासी (paradoxical) झोप असेही म्हटले जाते.

या झोपेची अन्य वैशिष्ट्येही महत्त्वाची आहेत. तिच्यात आपल्या नाडीचे ठोके, श्वसनगती आणि रक्तदाब अनियमित होतात. लिंग (किंवा शिश्निकेची ताठरता) आणि स्नायूंचे बारीक झटके येऊ शकतात. मुलांमध्ये दात खाणे बऱ्यापैकी दिसते. या झोपेदरम्यान मेंदूत काही महत्त्वाचे दीर्घकालीन रचनात्मक आणि रासायनिक बदल होतात. त्यातून आपल्याला मानसिक स्वास्थ्य लाभते. तान्ह्या मुलांच्या बाबतीत तर ही झोप आकलन व स्मरणशक्ती जोपासण्यासाठी पूरक ठरते.

साधारण 20 ते 25 मिनिटे या स्वरूपाची झोप झाल्यानंतर आपण त्यातून बाहेर येऊन पुन्हा एकदा पहिल्या प्रकारच्या, म्हणजे मंदतरंग झोपेत प्रवेश करतो. या प्रमाणे प्रकार १ व प्रकार २ चे एकआडएक चक्र आपण उठेपर्यंत चालू राहते. जर रात्रभराची झोप शांत लागली असेल तर सकाळ होण्याच्या सुमारास विरोधाभासी झोपेचा कालावधी काहीसा वाढतो.

ok

वरील चित्रानुसार आतापर्यंत आपण प्रौढांचे झोपचक्र पाहिले. एक वर्षाखालील मुलांमध्ये यात एक महत्त्वाचा फरक असतो. तो म्हणजे, त्यांच्या बाबतीत झोपेचे वरील दोन प्रकार (१ व २) प्रत्येकी ५०% असतात. या बालकांच्या बाबतीत अजून एक उल्लेखनीय मुद्दा. त्यांना झोप लागण्यासाठी आपण त्यांना मांडीवर घेऊन डोक्यावर आणि अंगाच्या काही भागावर सातत्याने थोपटत राहतो. आपल्या या क्रियेमुळे त्यांच्या त्वचेतील विशिष्ट भाग (mechanoreceptors) उत्तेजित होतात आणि त्यांच्यापासून निघालेल्या संवेदना मेंदूत पोचून झोप लागणे सुलभ होते.

मेंदूचे नियंत्रण व रासायनिक घडामोडी
मेंदूमध्ये झोपेचे विविध विभाग असतात. त्यांना शरीराकडून येणारे विविध चेतातंतू योग्य ते संदेश पुरवतात. त्याचबरोबर मेंदूतील दृष्टी विभागाचे सहकार्य देखील महत्त्वाचे असते. या सर्वांच्या समन्वयातून झोपेचे नित्य चक्र कार्यरत राहते. या संदर्भात ज्या रासायनिक घडामोडी घडतात त्यामध्ये अनेक रसायनांचा वेगवेगळ्या पद्धतीने सहभाग असतो. त्यापैकी काही प्रमुख रसायने अशी :
Serotonin, prostaglandin, norepinephrine & acetylcholine

आपले दैनंदिन झोपजागचक्र नियमित राहण्यासाठी मेंदूच्या hypothalamus या विभागात एक जैविक घड्याळ असते. या संदर्भात असलेल्या मेलाटोनिनच्या कार्याचा परिचय उपरोल्लेखित स्वतंत्र लेखात यापूर्वीच करून दिलेला आहे.

वय आणि झोप
वाढत्या वयानुसार झोपेचे तास कमी होत जातात हे आपण जाणतोच. सर्वसाधारणपणे वयानुसार ते तास असे असतात :
• 0 ते 1 वर्ष :16 तास
• बालपण : 10 तास
• प्रौढावस्था : 6-8 तास
अर्थात व्यक्ती तितक्या प्रकृती या उक्तीनुसार प्रौढपणी झोपेच्या कालावधीत फरक राहतो.

ok
जन्मापासून जसे वय वाढत जाते तसे मेंदूतील झोपेच्या जैविक घड्याळात बदल होत जातात. जन्मानंतर पहिल्या तीन महिन्यात असे जैविक घड्याळ तयार झालेले नसते. त्यामुळे ही बालके त्यांची झोप संपूर्ण 24 तासात निरनिराळ्या वेळी हवी तशी विभागून घेतात. तसेही ते राजेच असतात ना ! यानंतर जसे वय पुढे सरकते तसतसे मेंदूत जैविक घड्याळ तयार होऊ लागते आणि रात्रीच्या वेळी अधिकाधिक झोपण्याकडे आपला कल होतो.

शालेय मुलांच्या बाबतीत शाळेच्या वेळा हा घटक झोपेच्या वेळा आणि कालावधी ठरवण्याच्या बाबतीत खूप महत्त्वाचा ठरतो. या विषयावर अलीकडेच आपण जोरदार राज्यस्तरीय चर्चा अनुभवली ! प्रौढ व्यक्तींच्या बाबतीत दैनंदिन जीवनातले अनेक घटक झोपेच्या कालावधीवर परिणाम करतात. त्यामध्ये डोळ्यांवर सातत्याने पडणारा कृत्रिम प्रकाश (e-screens), बैठी जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव, चहा, कॉफी आणि कृत्रिम शीतपेयांचा अतिरेक, कौटुंबिक समस्या आणि विविध औषधांचा परिणाम यांचा समावेश आहे. व्यावसायिक कसरतपटूना सामान्य प्रौढापेक्षा जास्त झोपेची (सुमारे 9 तास दैनंदिन) गरज असते.

ज्येष्ठ नागरिकांची झोप
मध्यमवयाशी तुलना करता ज्येष्ठ वयात एकंदरीत झोप कमी होते हे साधारण निरीक्षण आहे. या वयात झोपेसंदर्भात खालील महत्त्वाचे बदल बऱ्याच जणांमध्ये जाणवतात :
1. ‘लवकर निजे आणि लवकर उठे’ ही सवय वाढीस लागते.
2. रात्री प्रत्यक्ष झोप लागण्यास बराच वेळ घेतला जातो

3. झोपेचा एकूण कालावधी कमी होतो
4. मंदतरंग झोपेतील गाढपणा कमी होतो - हे विशेषतः पुरुषांमध्ये अधिक दिसून येते. मात्र खळबळजनक झोप कमी होण्याचा परिणाम स्त्री व पुरुष दोघांमध्ये सारखाच होतो.

5. झोपेत वारंवार व्यत्यय येतात आणि थोडंसं कुठे खुट्ट वाजलं की जाग येते
6. काहींच्या बाबतीत दिवसा डुलक्या घेण्याचे प्रमाण वाढते- विशेषता जर अनेक दीर्घकालीन आजार मागे लागलेले असतील तर. पण काहींच्या बाबतीत दुपारची झोप अजिबातच येत नाही.

वर लिहिलेली निरीक्षणे सर्वसाधारण आहेत. त्यातील प्रत्येकाला अपवाद देखील दिसून येतात.

वाढत्या वयानुसार वरीलप्रमाणे झोपेतील बदल होण्यास मेंदूच्या विविध भागांमधले चेतारासायनिक बदल कारणीभूत असतात. त्याचबरोबर या वयोगटात असणाऱ्या इतर व्याधी आणि समस्यांचा देखील झोपेवर परिणाम होतो. यामध्ये रात्रीची लघवीची वारंवारिता, औषधांचे परिणाम आणि मद्यपानाचा समावेश आहे. पुरुषांमध्ये मंद-झोपेचे प्रमाण कमी होण्यामागे पुरुष हॉर्मोनची पातळी कमी होण्याचा संबंध असू शकतो. वृद्धांच्या बाबतीत त्यांच्या अवतीभवती असणारे वातावरण- म्हणजे घर की वृद्धाश्रम- याचाही झोपेच्या कालावधीवर बराच प्रभाव पडतो.

या वयात झोप कमी झाल्यामुळे स्मरणशक्ती देखील कमी होते, की दोन्ही स्वतंत्रपणे कमी होतात, या विषयावर सातत्याने संशोधन चालू आहे.
सरतेशेवटी एक लाखमोलाचा प्रश्न उपस्थित होतो :

“म्हातारपणी शरीराची झोपेची गरजच कमी होते, का गरज (पूर्वीइतकीच) असूनही अथक प्रयत्नांती झोप येत नाही?”

हा प्रश्न वादग्रस्त असून त्यावर अद्याप समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. मात्र बऱ्याच संशोधकांचे मत, “म्हातारपणी झोप निर्माण करण्याची क्षमता कमी होत असावी’, या गृहीतकाकडे झुकलेले आहे.

झोपेचा आदर्श कालावधी ?
स्पष्ट सांगायचे झाल्यास, “रोज किती तास झोपावे” या प्रश्नाचे एकचएक असे शास्त्रीय उत्तर नाही ! निरनिराळ्या देशांमध्ये संबंधित वैद्यकीय संघटनांनी वेगवेगळ्या शिफारसी केलेल्या आहेत. परंतु झोपेचा ठराविक कालावधी हा शेवटी व्यक्तीसापेक्ष आहे. झोप झाल्यानंतर ताजेतवाने वाटले पाहिजे आणि दिवसभरातील कामे उत्साहाने करता आली पाहिजेत, हाच निकष महत्त्वाचा. तसेच, ‘ प्रौढपणी दिवसा झोपावे की नाही”, याचे उत्तरही पुन्हा व्यक्तीसापेक्ष आहे. आपापल्या नोकरी-व्यवसायाच्या स्वरूपानुसार आणि गरजेनुसार आपली झोप दिवस आणि रात्र या वेगवेगळ्या सत्रात विभागली जाऊ शकते.

समारोप
दैनंदिन झोपेची मूलभूत प्रक्रिया, त्या संदर्भातील मेंदूतील घडामोडी आणि वयानुसार झोपेत होणारे बदल यांचा आढावा या लेखात घेतला. उत्तम आरोग्यासाठी शरीराच्या भरणपोषण आणि व्यायामाबरोबरच यथायोग्य झोपेची नितांत आवश्यकता असते. निद्राराज्यातील स्वप्नसृष्टी हा कुतुहलजनक विषय असला तरी तो स्वतंत्र अभ्यासाचा आणि लेखनाचा विषय आहे. झोपेसंबंधीच्या विविध समस्या आणि आजार हा विशेष तज्ञांचा प्रांत असून तो या लेखाच्या कक्षेबाहेर आहे.

सुमारे पन्नास वर्षांपूर्वी प्रसिद्ध साहित्यिक अनंत काणेकर यांनी लिहिलेला ‘यथेच्छ झोपा’ हा लघुनिबंध गाजला होता आणि तो शालेय अभ्यासक्रमातही होता. त्याची स्मृती कायम राहिलेली आहे. आपल्या रोजच्या झोपेचा कालावधी हा व्यक्तीसापेक्ष असल्याचे आपण वर पाहिलेच. तेव्हा आपापल्या दिनक्रम आणि गरजेनुसार प्रत्येकाने आपापल्या झोपेचे वेळापत्रक ठरवलेले उत्तम !
****************************************************************
संदर्भ :
१. विविध वैद्यकीय पाठ्यपुस्तके
२.
३.

जीवनमानआरोग्य

प्रतिक्रिया

टर्मीनेटर's picture

14 Jan 2024 - 9:26 pm | टर्मीनेटर

दैनंदिन झोपेची मूलभूत प्रक्रिया, त्या संदर्भातील मेंदूतील घडामोडी आणि वयानुसार झोपेत होणारे बदल यांचा आढावा या लेखात घेतला.

पौगंडावस्थेत 'कुंभकर्णाची' झोप म्हणुन ओळखली जाणारी माझी झोप आता अविश्वसनीयरित्या सावध झाली आहे 😀
नेहमीप्रमाणेच माहितीपुर्ण लेख!

कुमार१'s picture

15 Jan 2024 - 8:58 am | कुमार१

झोप आता अविश्वसनीयरित्या सावध झाली आहे

स्वाभाविक आहे. हे स्थित्यंतर प्रत्येकाला जाणवते.
मला तर आता रात्रीच्या प्रवासात अजिबात झोप येत नाही. म्हणून शक्यतो टाळतोच.

चावटमेला's picture

17 Jan 2024 - 3:18 pm | चावटमेला
चावटमेला's picture

17 Jan 2024 - 3:32 pm | चावटमेला
चावटमेला's picture

17 Jan 2024 - 3:32 pm | चावटमेला

नेहमीप्रमाणेच ज्ञानवर्धक आणि उत्तम लेख.

या निमित्ताने ऐच्छिक आणि अनैच्छिक क्रिया या संदर्भात एक माहिती आठवली. मनुष्य आणि इतर बहुतांश प्राणी यांना झोप लागली तरी श्वासोच्छ्वास आणि त्या अनुषंगाने हृदय चालू राहते. (अनैच्छिक श्वसन)

व्हेल हा सस्तन समुद्री जीव मात्र असे करू शकत नाही. पाण्याखाली असताना श्वास घेतला तर फुफ्फुसांत पाणी जाईल. त्यामुळे व्हेल (ज्याला व्हेल मासा असेही म्हणतात) हा ऐच्छिक श्वसन करतो. त्याला सतत ठरवूनच श्वास घ्यावा लागतो. आता यामुळे होते असे की व्हेल कधीच झोपू शकत नाही. कारण मेंदू सतत जागृत हवा. आपण स्वतःहून श्वास घेत राहणे हे झोप लागली तर अशक्य.

त्यामुळे झोप घ्यायची झाली तर व्हेलचा अर्धा मेंदू काहीशा सुप्तावस्थेत जातो आणि अर्धा मेंदू श्वास घेण्यासाठी जागा राहतो. अर्थातच व्हेल हा पूर्ण झोपेत कधीच नसतो.

कुमार१'s picture

15 Jan 2024 - 9:00 am | कुमार१

व्हेल कधीच झोपू शकत नाही

रोचक माहिती मिळाली. हा प्राणी कुतुहलजनक आहे खरा !

कर्नलतपस्वी's picture

15 Jan 2024 - 11:16 am | कर्नलतपस्वी

सेवानिवृत्त झाल्यानंतर माझे झोपेचे प्रमाण वाढले आहे. दिवसा
नाष्ट्यासाठी सोफ्यावर, खुर्चीवर रिकामे बसलो तर झोप येते. दुपारनंतर जेवण झाले की तास दिसतात झोप अनावर होते. रात्री दहा वाजेपर्यंत डोळे बंद होतात. रात्री सात तास झोप झाल्यानंतर पाच साडेपाच नंतर बिछान्यावर लोळत येत नाही. साधारण तीस टक्के गाढ ,तीन ते पाच टक्के जाग व बाकी हल्की झोप लागते.

नोकरीत असताना मात्र फक्त चार ते पाच तासचं झोप येत असे.

हे ठीक आहे का?

कुमार१'s picture

15 Jan 2024 - 11:41 am | कुमार१

झोपेचे प्रमाण वाढले आहे. दिवसा

साठीच्या दशकातील सुमारे दहा ते पंधरा टक्के लोकांना दिवसा डुलक्या येतात. याची बरीच कारणे असू शकतात :
1. त्यांची रात्रीची झोप तुटक स्वरूपात होते. या मागे वारंवार लघवीला उठायला लागणे हे कारण असू शकते.
2. झोपेच्या दोन प्रकारांपैकी मंदतरंग झोप कमी होते
3. विविध सहव्याधी असल्यास ( वेदना, नैराश्य, इत्यादी).

कुठेही कधीही झोप घेऊ शकतो.
विवंचना ( जे प्रश्न सुटणार नाहीत त्यांची चिंता) माणसास झोपू देत नाही.

मुक्त विहारि's picture

15 Jan 2024 - 2:15 pm | मुक्त विहारि

वाखूसा ...

श्वेता व्यास's picture

15 Jan 2024 - 2:47 pm | श्वेता व्यास

नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण लेख!
बाकी वयपरत्वे झोप कमी होत असावी हे विधान घरातील ज्येष्ठांकडे पाहून खरे वाटत नाही :)

झोपेसंबंधीचे स्वतःचे आणि कुटुंबीयांचे अनुभव समजले.
यात व्यक्तिसापेक्षता आहेच.

अमेरिकन त्रिशंकू's picture

16 Jan 2024 - 4:49 pm | अमेरिकन त्रिशंकू

मेलेटोनिन आणि झोप यांच्या संबंधाबद्दल सांगू शकाल का? छान झोप येते, जेटलॅगसाठी उपयोग होतो पासून प्लसिबो इफेक्ट आहे अशी मते वाचली/ऐकली आहेत.

कुमार१'s picture

16 Jan 2024 - 4:58 pm | कुमार१

या विषयावर इथे चार वर्षांपूर्वी स्वतंत्र लेख लिहिलेला आहे. त्या धाग्यावर उत्तम चर्चाही झाली आहे. ती पाहता येईल.

कुमार१'s picture

16 Jan 2024 - 4:58 pm | कुमार१

या विषयावर इथे चार वर्षांपूर्वी स्वतंत्र लेख लिहिलेला आहे. त्या धाग्यावर उत्तम चर्चाही झाली आहे. ती पाहता येईल.

अमेरिकन त्रिशंकू's picture

17 Jan 2024 - 1:26 am | अमेरिकन त्रिशंकू

धन्यवाद.

अमरेंद्र बाहुबली's picture

16 Jan 2024 - 7:00 pm | अमरेंद्र बाहुबली

रात्री आजिबात झोप येत नाही लवकर, नी सकाळी लवकर आजिबात जाग येत नाहीं, कितीतरी वेळा अलार्म पुढे ढकलावी लागते. दिवसभर डोळेयांवर झोपच असते.
मला आठवतंय साधारणण साताठ वर्षाआधी एका दिवशी माझी पुर्ण झोप झाल्याने दिवस चांगला गेला होता. पण नंतर तसा दिवस कधी आलाच नाही. दिवसा पेंगलेलोच असतो. बरं मोबाईल बाजूला ठेवून लवकर झोपा असा सल्ला अनेकांनी दिलाय. पण नूसतं पडूनही झोप येत नाही मग मोबाईल पकडून टाईमपास करावा लागतो. सकाळी ऊठणं महाकठीण काम असतं, अगदी गाढ झोपेतून स्वतला बळजबरी बेडवरून ऊठवावं लागतं. सूटीच्या दिवशी हमखास सकाळी १० ते ११ पर्यंत झोपतो. साधारण सकाळी ९ नंतर चित्रविचीत्र स्वप्न पडू लागतात तो सीग्नल असतो की आता ऊठायची वेळ झालीय.
ह्यावर ऊपाय काय?? रात्री लवकर झोप यावी म्हणून काही टाॅनीक वगैरे घ्यावे का?? (दारू वगैरे नको.)

कुमार१'s picture

16 Jan 2024 - 8:08 pm | कुमार१

रात्रीच्या वेळेस छापील मजकुराचे टेबल लॅम्पच्या पिवळ्या प्रकाशाच्या दिव्यातले (incandescent bulb) वाचन हे नैसर्गिक असते. ते पुरेसे वाचन थकवा आणून झोप येण्यास पूरक ठरते. या उलट कुठल्याही इ-स्क्रीनवरचे वाचन किंवा खोलीतील आधुनिक एलईडी बल्बच्या प्रकाशातल्या वाचनातून डोळ्यांवर विशिष्ट तरंगलांबीचा नीलप्रकाश पडत राहतो, जो मेंदूतील मेलाटोनिन आणि झोपेच्या अन्य यंत्रणांवर विपरीत परिणाम घडवतो.
तसेच स्क्रीनवरील माध्यमे, ज्यात आपण सतत स्क्रोल करत राहतो ती व्यसन लावणारी असतातच.

म्हणून मी असे करतो :
रात्री सव्वा नऊच्या दरम्यान मोबाईल लॅपटॉप वाय-फाय हे सगळं बंद करून टाकतो. त्यानंतर छापील माध्यमातले क्लिष्ट वाचन करायला घेतो आणि त्याच्या जोडीला मंद आवाजात विविध भारती रेडिओ लावून ठेवतो. त्या वेळेतले संगीत साधारण ‘जुनं ते सोनं’ या प्रकारातले असते. त्यातली एखादी छान सुरावट सोबतीला घेऊन पलंगावर जातो. याने मला उत्तम झोप लागते.

अमरेंद्र बाहुबली's picture

16 Jan 2024 - 8:33 pm | अमरेंद्र बाहुबली

अरे वा. हा प्रयत्न करतो. मला झोप यायला सुरूवात १२.१५ ते १२.३० च्या दरम्यान होते. तशी नैसर्गीकपणे झोप येणे साधारण ११ च्या आधी व्हायला हवे.

चौथा कोनाडा's picture

17 Jan 2024 - 6:16 pm | चौथा कोनाडा

नींद नावाचे यू ट्युब चॅनल / नींद अ‍ॅप वर झोप येऊ देणा-या श्राव्य गोष्टी असतात.
सावकाश गतीने गोष्ट सुरु झाली १ दीड मि. नंतर शरीर शिथीलीकरणाच्या सुचना देतात... झोप लागुन जाते. हा उपाय करून बघा.

वामन देशमुख's picture

17 Jan 2024 - 6:57 am | वामन देशमुख

अहो अबा, निद्राराणीचा प्रियकर होणं इतकंही सोपं नाही हं ;-)

---

ईश्वरकृपेने मला झोपण्याची-उठण्याची काही तक्रार नाही तरीही काही गोष्टी मी कटाक्षाने पाळतो -
झोपण्यासाठी - रात्री ९:५५ चा अलार्म* (हो, विश्वास ठेवा!)
उठण्यासाठी - सकाळी ५:५५ चा अलार्म (शक्यतो अलार्म वाजण्याआधीच साडेपाच-पावणेसहा पर्यंत उठतो.)

*साडेनऊ-पावणेदहानंतर कटाक्षाने फोन लॅपटॉप वापरत नाही.

क्वचित एखादेवेळी दहानंतरही झोप येत नसेल तर युट्युब वर एखाद्या अर्ध्या तासाचा कंटाळावाणा ज्व्हिडिओ लावून बाजूला ठेवून देतो, दहा पंधरा मिनिटात हमखास झोप लागून जाते.

ह्यावर ऊपाय काय?? रात्री लवकर झोप यावी म्हणून काही टाॅनीक वगैरे घ्यावे का?? (दारू वगैरे नको.)

मद्यप्राश == निद्रानाश

भरपूर खोबऱ्याच्या तेलाने तळपाय, पावले, पेंढऱ्या यांना चांगली मालिश करा, अतीगाढ झोप लागेल.

---

माझ्या मते आदर्श झोप म्हणजे, अंथरुणावर पडल्यावर पाच-दहा मिनिटांत झोप लागावी, सकाळी उठल्यावर लगेच अंथरून सोडावे. अगदी ताजेतवाणे वाटावे आणि "अरे, आत्ताच तर झोपलो होतो, लगेच उठलो?" असे वाटावे.

रामचंद्र's picture

13 Feb 2024 - 10:58 pm | रामचंद्र

अगदी असाच अनुभव. पहाटेनंतर अगदी चित्रपट पाहिल्यासारखे स्वप्न पडते. ते पडले नाही तर झोप नीट झाल्यासारखे वाटत नाही. पूर्वी परीक्षा जवळ आली की भरपूर झोप येत असे. पहाटे उठून कुठे जायचे असल्यास हटकून पहाटे तीन-चारपर्यंत झोप येत नाही. आणि चांगली झोप झाली नाही तर दिवसभर उत्साहही रहात नाही. अर्थात मधल्या काळात पूर्णवेळ रात्रपाळीत (१० ते ७) काम करताना फारसा त्रास झाला नाही.

रामचंद्र's picture

13 Feb 2024 - 11:02 pm | रामचंद्र

झोपण्यापूर्वी दुधातून जायफळ योग्य मात्रेत घ्या, झोप नक्की येईल.

कुमार१'s picture

14 Feb 2024 - 1:58 pm | कुमार१

जायफळामधील myristin या रसायनामुळे बहुधा झोप येते. त्याचे अन्य काही गुणधर्मही आहेत. त्यावरील काही संशोधन संदर्भ पाहिले.
पण त्या रसायनामुळे झोप नक्की कशी येते याचे स्पष्टीकरण सापडले नाही.

जायफळ टॉक्झीक? असते असे वाचून आहे

कुमार१'s picture

14 Feb 2024 - 4:12 pm | कुमार१

म्हणूनच त्याची योग्य मात्रा अतिशय महत्त्वाची आहे.

पाच ग्रॅम जायफळ पावडर एकदम खाल्ल्यास खूप उलट्या आणि अन्य काही दुष्परिणाम दिसू शकतात

खाली बूच बसते जास्ती खाल्ले तर. पूर्वीचा लोकप्रिय उपाय म्हणजे अफूची गोळी खाणे.

वामन देशमुख's picture

17 Jan 2024 - 6:32 am | वामन देशमुख

'
झोपेबद्दलच्या आधीच्या लेखाप्रमाणेच हा लेख ही आवडला. शरीरातील रासायनिक प्रक्रियांचे विवेचन आवडले.

---

माझा सर्वात आवडता टाईमपास म्हणजे झोप!
माझे सर्वात आवडतं पेय म्हणजे पाणी!

---
बाकी, एकेकाळी मिपावर व्यायाम करण्याचं फ्याड आलं होतं त्याहीवेळीही मी झोपेचाच पुरस्कार केला होता याची या प्रसंगी, या निमित्ताने व या माध्यमातून झैरात करून घेतो.

कुमार१'s picture

17 Jan 2024 - 8:01 am | कुमार१

माझा सर्वात आवडता टाईमपास म्हणजे झोप!
माझे सर्वात आवडतं पेय म्हणजे पाणी!

शत प्रतिशत सहमत.
यात एक भर घालतो :
माझा सर्वात आवडता चित्रपट म्हणजे मला झोपेत पडणारी स्वप्ने !
..
जाहिरात पाहतो सवडीने.. :)

शरीर आणि/मेंदू थकलेला हवा. माझं दिवसभरात ८०००-१०००० पावलं चालणं होतं. मेंदूदेखील दिवसभर काम करून थकतो.
घरी जायला साडे सहा होतात. साडे सातला सगळ्यांची जेवणं.

नऊ साडे नऊला आपोआप झोप यायला लागते.

दुपारी बारानंतर कॉफी घेतली, तर मला झोप लागते, पण मेंदू सुरू राहतो. उठल्यावर कळते, की रात्रभर स्वप्ने किंवा विचार चालू होते. आधी सुट्टी असल्यावर मी दुपारच्या जेवणानंतर हमखास दोन अडीच तास झोपायचो, आता दुपारची झोप लागत नाही.
रात्री झोपायच्या आधी मोबाईल, टिव्ही वगैरे पाहण्याने झोप लागण्यावर परिणाम होतो, असे जाणवत नाही.

कदाचित जास्त सुखवस्तू जीवनशैली, मेंदू आणि शरीराला पुरेसे कष्ट नसणे, अशा गोष्टी शांत झोपेच्या आड येत असतील!

कुमार१'s picture

17 Jan 2024 - 4:50 pm | कुमार१

घरी जायला साडे सहा होतात. साडे सातला सगळ्यांची जेवणं..... नऊ साडे नऊला आपोआप झोप यायला लागते.

अतिशय उत्तम जीवनशैली. ज्याना असे जमू शकते ते खरेच भाग्यवान !
हे नैसर्गिक जैविक चक्राला पूरक राहते.
.. ..
ज्यांना पुरेशी आणि वेळेत झोप लागत नाही त्यांच्यासाठी तज्ञ डॉनी सुचवलेला " झोपेच्या आधी ३:२:१ हा नियम " उपयुक्त आहे. तो जीवनशैलीशी निगडित आहे.
जरूर वाचा .

नठ्यारा's picture

17 Jan 2024 - 8:03 pm | नठ्यारा

झोपेच्या बाबतीत मी परमभाग्यवान आहे. ठार मेल्यागत झोपतो. बसल्या जागी मुंडी लटकती ठेवूनही झोपू शकतो. फक्त उभ्याने झोपता येत नाही.

जगास लागो आग,
तरी नाय यायची जाग !
-इति माझं ब्रीद.

झोप ही माझ्या आईने मला दिलेली सर्वोत्तम ( आनुवंशिक ) भेट आहे. ;-)

-नाठाळ नठ्या

कुमार१'s picture

24 Jan 2024 - 4:11 pm | कुमार१

शरीराच्या मूलभूत जैविक चक्राला circadian rhythm (circa = day) असे शास्त्रीय नाव आहे. त्यानुसार ते 24 तासासाठी “सेट” झालेले असते. परंतु काही जणांच्या बाबतीत त्यांच्या रोजच्या कार्यालयीन वेळा (रात्रपाळी, अर्धरात्रपाळी इत्यादी), इतर उद्योग आणि काही वैयक्तिक सवयी यांच्यामुळे त्या दैनिक चक्रात काहीसा बदल (किंवा बिघाड) होतो.

जर हा बदल जर नित्याचाच राहू लागला तर मग सुट्टीच्या दिवशी मनात एक निवांतपणाची भावना येते. त्यानुसार थोडेफार चेतारासायनिक बदल मेंदूच्या पातळीवर होतात. परिणामी, सुट्टीच्या दिवशी फक्त झोपच नव्हे तर अन्य काही शरीरधर्मांमध्ये सुद्धा बदल दिसू शकतात. असे काही लोक सुट्टीच्या दिवशी बऱ्याच काळ झोपू शकतात.
याला "झोपेचे कर्ज " असे म्हणतात.

पुढे चालू .....

कुमार१'s picture

24 Jan 2024 - 4:14 pm | कुमार१

झोपेचे कर्ज हा जो विषय आहे त्यावरील शास्त्रीय संकल्पना गेल्या एक-दोन दशकांमध्ये बदलत गेलेल्या दिसतात.

“झोपेचे कर्ज : सत्य की मिथक?” या स्वरूपाचे स्फुट लेखन जालावर वाचायला मिळते. यावर सखोल विश्वासार्ह माहिती मिळावी म्हणून काही विज्ञान-निबंधांचा शोध घेतला. त्यातून असे मुद्दे मिळाले :
१. झोपेचे कर्ज “वसूल” करण्याबाबत व्यक्तीभिन्नता आहे. काही लोक ते आठवड्याच्या अखेरीस वसूल करतात आणि काही जण करू शकत नाहीत. अशा दोघांचाही शास्त्रीय अभ्यास झालाय.

२. जर आठवड्यातली अपुरी झोप भरून काढली गेली नाही तर शरीरावर जे दुष्परिणाम होतात ते आठवड्या-अखेरीस “वसूल” करण्याने देखील होतात(च) असं दिसलं आहे.
म्हणजेच, रोज नियमित स्वरूपात पुरेशी झोप मिळालेली चांगली.

३. झोपेचे कर्ज “वसूल” झालेच नाही तर आकलनावर आणि मेंदूच्या तत्सम कार्यांवर खरंच परिणाम होतो का ? याबाबतीत एक महत्त्वाची माहिती अशी मिळाली :

These experiments also reveal that individuals differ markedly in their cognitive vulnerabilities to sleep restriction, which suggests a trait-like (possibly genetic) basis for the response.

म्हणजेच, प्रत्येकाच्या शरीरधर्मानुसार (? जनुकीय घटनेनुसार), कमी झोप मिळण्याचे दुष्परिणाम हे सुद्धा व्यक्तीसापेक्ष आहेत.

कुमार१'s picture

7 Feb 2024 - 7:34 am | कुमार१

2010 च्या दशकात चीनमध्ये बहुतेक खाजगी उद्योगांमध्ये आठवड्याला 72 तास काम करणे हा नियम झाला होता. त्यातून कर्मचाऱ्यांचे ताणतणाव वाढले. दिवसभर शिणल्यामुळे स्वतःसाठी विरंगुळ्याचा असा वेळच काढता येईना. बरं, प्रत्येकाला आंतरजालावरील करमणुकीची ओढ तर लागलेलीच !

याचा परिणाम म्हणून लोक रात्री जाणीवपूर्वक उशिरापर्यंत जागू लागले. अंथरुणावर पडले तरी हातातल्या मोबाईलवर सतत स्क्रोल चालू. या प्रकारातून त्यांच्या झोपेवर परिणाम झाला. हा प्रकार त्यांनी जाणीवपूर्वक अवलंबिला असल्यामुळे त्याला
revenge bedtime procrastination
असे एक विचित्र नाव दिले गेले.

अलीकडे या विषयावर संशोधन आणि विचारमंथन होत आहे :

अहिरावण's picture

7 Feb 2024 - 10:14 am | अहिरावण

अलिकडेच एक अमेरीकन शेंदूर फासलेला दगड भारतीयांनी ७० तास काम करायला हवे असले सल्ले देत होता त्याची आठवण झाली.

नठ्यारा's picture

7 Feb 2024 - 5:56 pm | नठ्यारा

ते विधान वाचल्यावर मनांत म्हंटलं की मुंबईला या, आणि सकाळी कर्जत लोकल पकडून अंबरनाथहून घाटकोपरपर्यंत येऊन दाखवा. मग बघूया किती तास काम करता ते.

-नाठाळ नठ्या

जाताजाता : प्रवासाचा वेळ सत्तर तासांच्या हिशोबात धरावा का?

कुमार१'s picture

7 Feb 2024 - 7:21 pm | कुमार१

बंगळूरमध्ये जर कंपनीच्या बसने जात असाल तर त्यात बसल्या बसल्या लोक लॅपटॉप उघडून काम चालू करतात अशी बातमी पाच वर्षांपूर्वी वाचली होती. (प्रवास साधारण दीड तास).

म्हणजे बसमध्ये बसल्यापासूनचा वेळ कामाचा धरत असावेत का ? जाणकारांनी सांगावे

झोपेचं प्रत्येकाचं वेगळं चक्र असतं. ते बदलता येत नाही. परंतू तशी झोप आणि जागे होण्याला जे व्यवसाय साजेसे आहेत ते पत्करणे हा एक उपाय आहे. हॉटेलिंग, मनोरंजन हे काही रात्री तीन ते सकाळी नऊ झोपेसाठी बरे. रेल्वेचे मोटारमेन कधी तक्रार करत नाही असं ऐकून आहे. रात्रीच्याच गाड्या बऱ्याच असतात.
झोप बदलण्यापेक्षा व्यवसाय बदलणे सोपे नाही का?

कुमार१'s picture

7 Feb 2024 - 9:04 am | कुमार१

रेल्वेचे मोटारमेन कधी तक्रार करत नाही असं ऐकून आहे.

गणेश कुलकर्णी या ट्रेन लोकोपायलटनी त्यांच्या व्यवसायिक अनुभवावर हे पुस्तक लिहिलेले आहे. पूर्वी मी त्यांचे दोन लेख अंतर्नाद मासिकात वाचले होते. त्यातला एक मुद्दा सांगतो.

त्यांच्या झोपेच्या वेळा कामानुसार कुठल्याही आणि बदलत्या असायच्या आणि आजूबाजूला प्रचंड कोलाहल असलेल्या वातावरणातच त्यांना झोपावे लागे. त्याचा परिणाम ते सुट्टीवर घरी असतानाही झाल्याचा जाणवला.

कधी कधी त्यांची बायको त्यांना प्रेमाने हलकेच जागे करायला जायची तेव्हा ते एकदम दचकून ओरडल्यासारखे करायचे. त्यावर बायको म्हणायची की, अरे मीच आहे, घाबरलास कशाला?
हे पाहता, झोपेच्या वेळा कायमच अनियमित राहिल्यास वागण्यात असे काही बदल होऊ शकत असावेत.
..

एखाद्या व्यवसायात पडल्यानंतर दहा-पंधरा वर्षांनी व्यवसाय बदलणे किती जणांना शक्य होईल ? सांगता येत नाही..

कितीही संशोधन झाले तरी त्या आकडेवारीचा उपयोग काय असतो? डिग्री मिळवणाऱ्यांनाच. आपण आपला व्यवसाय निवडायचा.

राज्यातील सर्व माध्यमांतील चौथी पर्यंतच्या शाळा सकाळी 9 वाजल्यापासून
शासनाचा आदेश

याविषयी खुप मतमतांतरे वाचत आहे.
एका गटाचे म्हणणे आहे की हे बरोबर आहे याने मुलांची झोप व्यवस्थित होईल.
तर दुसऱ्या गटाचे म्हणणे आहे की असं कसं 'सकळी लवकर उठण्याची योग्य सवयींपासून मुलांना दूर करतं आहोत.'
मी पहिल्या गटात जाईन, वयानुसार लहान मुलांना झोप १० तास हवीच.
शरीर तापमान ही झोप चांगली यावी यासाठी कमी पाहिजे असं आत्ताच वाचलं , तेव्हा यासाठी काय करता येईल.गैजट झोपेच्या १ तास आधी वापरणं खरोखरच फायदेशीर आहे.
अतिशय बहुमूल्य कसा लेख आहे _/\_

कुमार१'s picture

15 Feb 2024 - 6:17 pm | कुमार१

धन्यवाद.
अजून एक मुद्दा
७.३० च्या शाळेसाठी स्कूल बसने जाणारी मुले जवळजवळ ६.३०-६.४५ ला घरून निघतात.
त्याआधी "शी" चा कार्यक्रम उरकणे सुद्धा लहान मुलांसाठी तापदायक असते.
९ अगदी योग्य.

सुधीर कांदळकर's picture

18 Feb 2024 - 8:15 pm | सुधीर कांदळकर

या झोपेदरम्यान मेंदूत काही महत्त्वाचे दीर्घकालीन रचनात्मक आणि रासायनिक बदल होतात. त्यातून आपल्याला मानसिक स्वास्थ्य लाभते. तान्ह्या मुलांच्या बाबतीत तर ही झोप आकलन व स्मरणशक्ती जोपासण्यासाठी पूरक ठरते.

१.
दिवसभरात मिळविलेली माहिती झोपल्यावर मेंदूच्य्या रॅमवरून व्यवस्थित मांडणी करून मेंदूच्या एचडी ड्राईव्हमध्ये नोंदली जाते असे कुठेसे मी वाचले होते ते खरे काय?

२.
सायकल चालवणे, चित्रकला, खेळातली कसबे इ. दिवसभरात शिकलेल्या गोष्टीदेखील झोपल्यावरच कायम होतात हे खरे काय?

३.
डायाझीपाम, लॉरेझीपाम, बार्बीच्युरेट्स, क्लोरप्रोमिझीन्स इ. औषधांनी झोप येते त्यात शांतनिद्रा वाढते की खळबळनिद्रा वाढते.? अ‍ॅन्टीअ‍ॅन्गझायटी औषधांनी पण झोप येत असावी. या विविध झोपेत गुणात्मक फरक काय आतो?


अनंत काणेकरांवरून आठवले. एका लघुनिबंधात 'निद्रा ही प्रीति आणि किर्ती यांची सख्खी बहीण आहे. जों जों तिची आराधना करावी तों तों ती दूर पळते.' अशा अर्थाची वाक्ये आहेत. नीट आठवत नाही पण बहुधा वि. स. खांडेकरांच्या पारिजातकाचीं फुलें या लघुनिबंधात.

असो. छान लेखाबद्दल धन्यवाद.

कुमार१'s picture

18 Feb 2024 - 9:04 pm | कुमार१

सर्वप्रथम उत्तम मुद्देसूद प्रतिसादाबद्दल धन्यवाद !


'निद्रा ही प्रीति आणि किर्ती यांची सख्खी बहीण आहे.


हे केवळ अप्रतिम ! आवडले म्हणजे आवडलेच.
बाकी पहिल्या तीन प्रश्नांची उत्तरे शांतपणे वाचून सवडीने देतो.

कुमार१'s picture

19 Feb 2024 - 7:49 am | कुमार१

१. दिवसभरात मिळविलेली माहिती झोपल्यावर मेंदूच्य्या रॅमवरून व्यवस्थित मांडणी करून मेंदूच्या एचडी ड्राईव्हमध्ये नोंदली जाते

होय, ते याच तत्वावर आहे. हे पाहा :

ok

कुमार१'s picture

19 Feb 2024 - 8:34 am | कुमार१

२. सायकल चालवणे, चित्रकला, खेळातली कसबे इ. दिवसभरात शिकलेल्या गोष्टीदेखील झोपल्यावरच कायम होतात हे खरे काय?

होय, यांच्यात पण झोपेचा वाटा आहे.

आपण ज्या निरनिराळ्या कला आणि कसबे आत्मसात करतो त्यांच्याबाबत असे म्हणता येईल :
१. सायकल चालवणे हे ‘motor’ या प्रकारचे कसब आहे. त्याची कायमस्वरूपी स्मृती मंदतरंग झोपेच्या तिसऱ्या टप्प्यात - म्हणजेच गाढ झोपेत- होते .

२. भाषाविकास, गणिते सोडवणे आणि विविध समस्यांची उकल ही कसबे कायमस्वरूपी होण्यात खळबळजनक झोपेचा वाटा महत्त्वाचा.

कुमार१'s picture

19 Feb 2024 - 10:07 am | कुमार१

३. डायाझीपाम, लॉरेझीपाम, बार्बीच्युरेट्स, क्लोरप्रोमिझीन्स इ. औषधांनी झोप येते त्यात शांतनिद्रा वाढते की खळबळनिद्रा वाढते.?..... या विविध झोपेत गुणात्मक फरक काय?

वरील औषधांचे दोन गटात वर्गीकरण होते :
१. मन शांत करणारी औषधे (sedatives , उदा. डायझीपाम) : यांच्यामुळे गुंगी आल्यासारखे वाटते पण मूलतः ती झोप आणणारी औषधे नव्हेत.

२. झोप आणणारी
औषधे (hypnotics, उदा. बार्बीच्युरेट्स) : ही झोपेच्या बहुतेक सर्व प्रक्रियांवर परिणाम करतात आणि झोपेच्या नैसर्गिक संरचनेत बदल घडवतात. या विविध औषधांच्या गुणधर्मांमध्ये काही ना काही फरक आहे. काही औषधे खळबळजनक झोपेच्या तर अन्य काही मंद झोपेतील गाढनिद्रेच्या कालावधीवर परिणाम करतात.

या औषधांचे परिणाम व्यक्तीसापेक्ष असू शकतात. या औषधांमुळे येणारी झोप बऱ्याचदा तुटक स्वरूपात असू शकते. परिणामी रुग्ण मध्येच वारंवार जागा होऊ शकतो.

समाधान देणारे मुद्देसूद शंकासमाधान. तेही अधिकारी, विश्वासार्ह व्यक्तीकडून. अनेक अनेक धन्यवाद.

२. भाषाविकास, गणिते सोडवणे आणि विविध समस्यांची उकल ही कसबे कायमस्वरूपी होण्यात खळबळजनक झोपेचा वाटा महत्त्वाचा.

हे अनपेक्षित आहे. सत्य हे कल्पिताहून अद्भुत असते ते असे.

छान लेखाबद्दल आणि उत्कृष्ट शंकासमाधानाबद्दल अनेक, अनेक धन्यवाद.

हिप्नॉसिस या विषयावर वाचायला आवडेल. आमच्या कॉलेजच्या कंपूतील मादक पदार्थांचे सेवन करणार्‍या एकाने एकदा एल एस डी घेतले. दोन महिने तो बेफाम व्हायचा आणि इस्पितळातच होता. नंतर कित्येक वर्षे त्याला चित्रविचित्र स्वप्ने पडत. शिक्षण अर्धवट सोडल्यावर तिशीपर्यंत तो काही कामधंदा करू शकला नव्हता. पुढे त्याच्याशी संपर्क आला नाही.

'पे एनी प्राईस' या कादंबरीत हिप्नॉसिस या विषयावरील सत्याचा आभास निर्माण करणारे काल्पनिक कथानक आहे. ते आठवले.