२०२४ : आपणा सर्वांना नववर्षाच्या हार्दिक आरोग्यपूर्ण शुभेच्छा !.
*********************************
गेल्या पंधरवड्यात अमेरिकेतील 32 वर्षीय Kelsey Hatcher यांनी एका विशेष प्रकारच्या ‘जुळ्या’ मुलींना जन्म दिल्यामुळे त्या प्रकाशझोतात आल्या. या बाईंना चक्क दोन गर्भाशये असून त्या प्रत्येक गर्भाशयात एक मुलगी अशा प्रकारचे त्यांचे हे गरोदरपण होते.
अशी घटना दुर्मिळ असून ती कित्येक दशलक्ष स्त्रियांमध्ये १, या प्रमाणात आढळते. या प्रकारे जन्मलेल्या बालकांना ‘जुळी’ म्हणायचे का आणि म्हटल्यास कोणत्या प्रकारची जुळी, इत्यादी खल प्रसूतीतज्ञांमध्ये चालू आहेत. या निमित्ताने ‘जुळी बालके’ या विषयावरील काही मूलभूत रंजक माहिती वाचकांसमोर ठेवतो.
जेव्हा एका गरोदरपणात स्त्रीच्या गर्भाशयात एकाहून अधिक गर्भ निर्माण होतात त्या प्रकाराला बहुगर्भीय (Multifetal) गरोदरपण असे म्हटले जाते. त्यामध्ये एका वेळेस दोन, तीन किंवा त्याहूनही अधिक गर्भ असू शकतात. तूर्त आपण फक्त दोन गर्भाचा म्हणजेच जुळ्यांचा विचार करू.
जुळ्यांचे वर्गीकरण
यांचे दोन मूलभूत प्रकार आहेत :
1. एकसमान जुळे (monozygotic) : यामध्ये फक्त एकाच स्त्रीबीजाचे एका शुक्राणूमुळे फलन होते. पुढे त्याचा गर्भ झाल्यानंतर त्याचे दोन गर्भांमध्ये विभाजन होते.
2. विभिन्न जुळे : (dizygotic) : यामध्ये दोन स्वतंत्र स्त्रीबीजांचे दोन स्वतंत्र शुक्राणूमुळे फलन होऊन मूलतः दोन वेगळे गर्भ तयार होतात.
वरील प्रकारांपैकी सुमारे एक तृतीयांश जुळी पहिल्या (MZ) प्रकारची, तर दोन तृतीयांश दुसऱ्या प्रकारची (DZ) असतात.
चित्र पहा :
कारणमीमांसा
१. एकसमान जुळे : याची कारणे विज्ञानाला अद्याप ज्ञात नाहीत.
२. विभिन्न जुळे : याचे मूलभूत कारण म्हणजे स्त्रीबीजांडातील एकाहून अधिक बीजांचे ovulation होते. असे होण्यास मेंदूतील पिच्युटरी ग्रंथीतील gonadotropins या हार्मोन्सची वाढलेली पातळी जबाबदार असते. अशी परिस्थिती स्त्रीच्या गरोदरपणाच्या वेळेसच्या वाढलेल्या वयामध्ये कॉमन असते. गेल्या 20- 25 वर्षात वंध्यत्वासाठी कृत्रिम गर्भधारणेच्या(assisted reproductive technology)उपायांचा वाढता वापर होत आहे. या प्रकारच्या उपचारांमुळे एका वेळेस एकाहून अधिक स्त्री-बीजांचे ovulation होण्यास उत्तेजन मिळते आणि त्यातून बहुगर्भीय गरोदरपणे वाढतात.
३. विशेषतः जुळ्याच्या विभिन्न या प्रकाराबाबत काही अंशी कौटुंबिक आनुवंशिकता दिसून येते.
जुळ्यांचे जागतिक प्रमाण
सर्वसाधारणपणे अचानक उत्पन्न होणाऱ्या (spontaneous) जुळ्यांचे प्रमाण ८० गरोदरपणांमध्ये १ असे आहे. एकसमान जुळ्यांचे प्रमाण जागतिक पातळीवर साधारण सारखे आहे. परंतु विभिन्न जुळ्यांच्या बाबतीत देश आणि वंशानुसार मोठे फरक आढळतात. उदाहरणार्थ,
नायजेरियात त्यांचे प्रमाण दर १००० जन्मामागे ४९ एवढे, तर
जपानमध्ये ते दर हजारी फक्त १.३ एवढे आहे.
जुळ्यांची जैविक वैशिष्ट्ये
१. एकसमान जुळे : या दोघांचेही लिंग (दुर्मिळ अपवाद वगळता) एकच असते. तसेच त्या दोघांचाही जनुकीय संच (genome) जवळजवळ (९९.९९...%) एकसमान असतो.
२. विभिन्न जुळे : यांचे लिंग एक अथवा भिन्न असू शकते. तसेच प्रत्येकाचा जनुकीय संच (अन्य सामान्य भावंडांप्रमाणे) फक्त पन्नास टक्केच समान असतो. त्या दोघांच्या बाह्यरूपामध्ये काही फरक असू शकतो.
समान जुळी : गर्भाशय वास्तव्य
ती गर्भाशयात असताना त्यांचे चार विविध प्रकार संभवतात. एका गर्भाचे दोनमध्ये विभाजन फलनाच्या कितव्या दिवशी होते यावर तो प्रकार अवलंबून असतो (चित्र पहा) :
वरीलपैकी,
क्र. 2 सर्वाधिक(70%) आढळतो.
क्र. 4 ( जोडलेली जुळी) अर्थातच घातक आहे. त्यातली बऱ्याचदा जन्मताच मरण पावलेली असतात. काही जिवंत जोड्यांच्या बाबतीत प्रगत शस्त्रक्रियांच्या मदतीने त्यांना सुटी करण्यात यश येते.
.. ..
आता वर उल्लेखलेल्या Kelsey Hatcher या बाईंच्या विशेष प्रसूतीबाबत :
१. आतापर्यंत त्यांची एकूण तीन गरोदरपणे झालीत. त्यापैकी पहिली दोन ही सामान्य स्वरूपाची असून त्यामध्ये प्रत्येक वेळेस एकच बालक जन्माला आलेले आहे.
२. या तिसऱ्या वैशिष्ट्यपूर्ण गरोदरपणाला dicavitary pregnancy असे शास्त्रीय नाव आहे.
३. या गरोदरपणाचे 39 आठवडे झाले असताना त्यांना औषध देऊन प्रसूतीस उत्तेजित करण्यात आले (induced).
४. पहिली मुलगी योनीमार्गे जन्मली तर दुसरीच्या जन्माच्या वेळेस सिझेरियन करावे लागले.
५. या बाळंतपणाची झुंज एकूण वीस तास चालली होती. दोन्ही मुलींच्या जन्मवेळेत सुमारे दहा तासांचे अंतर पडले. पण त्या दरम्यान दिवस बदलल्याने दोघींचा जन्मदिन (आणि वाढदिवस) वेगळ्या दिवशी लागू झाला !
अशी ही आवळ्याजावळ्यांची कथा सुफल संपूर्ण !
****************************************************************************
लेखातील चित्रे जालावरून साभार !
प्रतिक्रिया
1 Jan 2024 - 12:33 pm | कुमार१
वाचकांपैकी कोणी जुळे भावंड असल्यास किंवा जुळ्यांचे पालक असल्यास त्यांचे अनुभव जाणून घेण्यास उत्सुक !
1 Jan 2024 - 2:07 pm | गवि
अतिशय रोचक आणि माहितीपूर्ण.
जुळ्यांच्या बाबत एक ऐकलं होतं की लहानपणी आणि काही केसेस मध्ये मोठे झाल्यावर देखील काही जुळ्या भावंडांत केवळ त्या दोघांची अशी एक भाषा तयार होते. ही भाषा म्हणजे मातृभाषेतील शब्दांचे सांकेतिक रूप किंवा दोघांतील प्लॅन केलेले गुपित अशा स्वरूपाची नसून अगदी वेगळीच असते. ते उच्चार तिसऱ्या व्यक्तीला पूर्ण निरर्थक वाटतात पण त्या जुळ्या भावंडांना एकमेकांत ते सर्व कळत असते.
यात कितपत तथ्य आहे हे माहीत नाही. आंजावर अगदी लहान जुळी मुले असे आवाज काढून एकमेकांत बोलताना बघितले होते.
1 Jan 2024 - 2:13 pm | कुमार१
भलतेच रोचक आहे !
1 Jan 2024 - 2:21 pm | गवि
एका केस विषयी एका डॉक्टरांकडूनच ऐकले होते की, दोन जुळ्यांपैकी एका मुलाच्या मेंदूत काही दोष राहिल्याने त्याला तीव्र गतिमंदत्व आले. दुसरा मुलगा नॉर्मल वाढला. नंतर इतर कोणीही त्या गतिमंद मुलाशी संवाद साधू शकत नसताना केवळ तो जुळा भाऊ त्याच्याशी व्यवस्थित "बोलू" शकत असे. पण आश्चर्य असे की ती बोली इतर कोणाला कळत नसे. त्याहून आश्चर्य असे की नॉर्मल असलेल्या भावाला जर तुम्ही काय बोलता आहात त्याचा अर्थ उलगडून सांगा असे म्हटले तर त्यालाही तो सांगता येत नसे. कारण तो संवाद वेगळ्याच कोणत्या तरी पातळीवर होत असावा. म्हणजे आपले व्यावहारिक हवापाण्याचे बोलणे नव्हेच. केवळ काही साद प्रतिसाद (abstract for others). यात कितपत तथ्य आहे ते शोधावे लागेल.
1 Jan 2024 - 2:35 pm | कुमार१
त्यासाठीचा शास्त्रीय संदर्भ- सारांश सापडला.
१. सुमारे 40% जुळ्यांमध्ये तशी भाषा असू शकते. फक्त जुळीच नव्हे तर सख्ख्या भावंडांमध्ये देखील ती असू शकते असं दिसतंय.
२. या भाषेला त्यांनी autonomous (स्वायत्त), cryptophasia or idioglossiaअशी शास्त्रीय नावे दिलेली आहेत.
३. ही भाषा काही दिवस टिकते पण नंतर राहत नाही असेही त्या निबंधात म्हटले आहे.
1 Jan 2024 - 2:25 pm | Bhakti
फोटोंसह उत्तम लेख.
एक स्त्रीमध्ये दोन गर्भाशय हे पहिल्यांदा कळले.आंतारजालावर याचे फोटो पाहून आले.
आयव्हीएफ मध्ये एका पेक्षा अधिक बीज फलित केले जातात गर्भाशयात स्थापित करतात त्यामुळे जुळे तिळे होण्याचे प्रमाण अधिक आहे,याचे कारण समजले.म्हणजे यात MZ जुळे नसतील होत का?
1 Jan 2024 - 2:51 pm | कुमार१
या तंत्राने देखील समान जुळी तयार होऊ शकतील.
हा संदर्भ असे म्हणतो आहे की :
1. नैसर्गिक गरोदरपणात समान जुळे होण्याची शक्यता 0.4% असते तर तीच शक्यता कृत्रिम गर्भधारणा केली असता 5 टक्क्यांवर जाते.
2. अर्थात कृत्रिम गर्भधारणा केल्यानंतर जी समान जुळी तयार होतात त्यात त्या तंत्राचा नक्की संबंध आहे का, याबाबत एकमत दिसत नाही. ( ती अकस्मातच होत असावीत ? )
1 Jan 2024 - 5:21 pm | टर्मीनेटर
माहितीपुर्ण लेख आवडला!
जुळ्यांवरुन दोन गोष्टी प्रकर्षाने आठवल्या:
Vanishing Twin Syndrome वर आधारीत एक सव्यसाची नावाचा तेलगु चित्रपट आहे, पाहिला नसेल तर जरुर पहा!
आणि दुसरे 'एंजल ऑफ डेथ' म्हणुन ओळखले जाणारे नाझी डॉक्टर 'जोसेफ मेंगेले'.
1 Jan 2024 - 6:40 pm | कुमार१
धन्यवाद !
नक्की पाहण्यात येईल आणि
त्यात माधवन आहे म्हटल्यावर तर अगदी नक्कीच ! 🙂
1 Jan 2024 - 7:31 pm | राजेंद्र मेहेंदळे
पहीले शीर्षकावरुन "आवळ्याविषयी" असावा असे वातले(ह. घ्या.)
बरेच मुद्दे नवीन समजले. अनेक धन्यवाद!!
6 Jan 2024 - 2:35 pm | मुक्त विहारि
धन्यवाद....
6 Jan 2024 - 5:33 pm | कुमार१
2016 मधली अमेरिकेतली अजून एक गंमत बघा.
एका स्त्रीने अर्ध्या तासाच्या अंतराने दोन जुळ्या मुलग्यांना जन्म दिला. त्यांच्या वेळा अशा होत्या :
सॅम्युएल मध्यरात्रीनंतर : 1.39 a.m.
आणि त्यानंतर 31 मिनिटांनी रोनान जन्मला.
परंतु, अमेरिकेच्या तिथल्या भागातली घड्याळे 2a.m. ला अधिकृतपणे (Daylight Savings प्रकार) एक तासाने मागे करण्यात आली. त्यामुळे रोनानची अधिकृत जन्म वेळ ठरली 1.10 a. m.
म्हणजेच, रोनानचा जन्म वास्तवात सॅम्युएलपेक्षा उशिरा होऊनही कागदोपत्री तो (अर्ध्या तासाने) ‘ज्येष्ठ’ ठरला आहे !!!
7 Jan 2024 - 11:08 am | कानडाऊ योगेशु
आवळी-जावळी वरुन महाराजांच्या जावळी खोर्याबद्दलच्या पराक्रमाबद्दल काही लेख असावा असे वाटते. संदर्भ. येता आवली जाता जावली.
पण आपले लेख नेहेमीच वाचनीय असतात.
7 Jan 2024 - 11:43 am | कुमार१
शब्दकोशानुसार हा जुळ्या भावंडांसाठीचा शब्दप्रयोग आहे
(बाकी अन्य अर्थ तुम्ही सांगितल्याप्रमाणे निघू शकतील).
7 Jan 2024 - 3:15 pm | तुषार काळभोर
येता जावली जाता गोवली
7 Jan 2024 - 4:50 pm | कुमार१
म्हणजे गोवा ? की अन्य क्रियापद ?
7 Jan 2024 - 6:05 pm | तुषार काळभोर
जावळीत येताल, तर (आमच्या तावडीत) अडकताल/सापडताल..
संदर्भ :
गोव-वा, वी
स्त्रीपु. १ गुंता; अटकाव; अडथळा; गुंताड. (ल.) २ संकट; घोटाळा; बंधन. 'उदंड गोवा केला लोकीं' 'होती मृगजळें गोवी केली' -तुगा ७१५. ३ कायम जडविणें (एखाद्यास एखाद्या कामीं, हुद्यावर). [सं. गोपय्; प्रा. गोव?]
दाते शब्दकोश
7 Jan 2024 - 8:59 pm | कुमार१
उत्तम !
नव्याने समजले.
..
11 Jan 2024 - 11:56 pm | सौन्दर्य
तुमचे सगळेच लेख माहितीपूर्ण व ते देखील खरे व उत्तम प्रकारे मांडलेले असतात. ह्या तिन्ही कारणांमुळे ते वाचावेसे वाटतात तसेच इतरांशी शेअर पण केले जातात.
माझे दोन प्रश्न -
१) मला दोन जुळ्या बहिणी आहेत. त्यातील जी काही मिनिटे आधी जन्मली तिला आमच्या आजीने 'मोठी' असे नाव दिले व काही मिनिटे नंतर जन्मलेल्या बहिणीला 'बारकी' असे नाव दिले. त्यांची खरी नावे स्मृती व स्वाती अशी आहेत. कोठेतरी वाचल्याचे आठवते की जे बाळ आधी जन्मते ते खरं म्हणजे दोघातील धाकटे बाळ असते व नंतर जन्मलेले बाळ मोठे. आपण लहान-मोठे हे त्या बाळांच्या जगात येण्याच्या क्रमावरून ठरवतो हे मला माहीत आहे, तरी देखील जुळ्यातील एखादं बाळ गर्भ धारणेच्या वेळेपासून मोजून 'लहान-मोठे' ठरवता येते का ?
२) 'जुळ्यांचे दुखणे' म्हणजे जुळ्यांपैकी एखादं आजारी पडलं की दुसरे आजारी पडते हे खरं आहे का ? कि तो निव्वळ एक वाक्प्रचार आहे ?
12 Jan 2024 - 7:42 am | कुमार१
दोन्ही प्रश्न उत्तम. स्वतंत्र घेतो.
..
१.
या प्रश्नाला व्यावहारिक अर्थ काही नाही हे आपण जाणतोच. आता राहिली फक्त जीवशास्त्रीय उत्सुकता. समान जुळ्यांच्या बाबतीत हा प्रश्नच उद्भवत नाही, कारण एकाच गर्भाचे विभाजन होऊन दोन तयार झालेले असतात.
a. भिन्न जुळ्यांच्या बाबतीत एक रोचक मुद्दा आहे. जी जुळी मुळात जन्माला घातली गेली ती एकाच संभोगातून निर्माण झाली की दोन वेगळ्या दिवसांच्या स्वतंत्र संभोगांमधून निर्माण झाली हा खरा प्रश्न !
b. जर संबंधित स्त्रीचे फक्त एकाच पुरुषाशी संबंध असतील तर ही गोष्ट जीवशास्त्रीयदृष्ट्या सिद्ध करणे जवळजवळ अशक्य असतं. अशा वेळेस एक गृहीतक असे आहे की, जुळ्यांपैकी जे अधिक वजनाचे असते ते साधारणपणे अधिक वयाचे मानले जाते. परंतु हाही मुद्दा निर्विवाद नाही.
C . मात्र जेव्हा त्या स्त्रीचे दोन पुरुषांशी वेगळ्या दिवशी संबंध येऊन अशी जुळी निर्माण झालेली आहेत त्याबाबतीत पुढे जैविक चाचण्या करून हा मुद्दा सिद्ध करता येऊ शकतो.
परंतु या सगळ्या उपदव्यापाला व्यावहारिक किंवा कायदेशीर अर्थ काही नाही.
12 Jan 2024 - 7:59 am | कुमार१
त्या दोन मुलांच्या वयाच्या दृष्टिकोनातून.
दोघांचा बाप भिन्न आहे का, हा वेगळा कायदेशीर मुद्दा आहे. त्याचा आपल्या विवेचनात संबंध नाही.
12 Jan 2024 - 10:07 am | गवि
यावरून एक आणखी शंका. लहान आणि मोठे भावंड यांमध्ये कायद्याच्या दृष्टीने कोणत्याही विभागात काही फरक असतो का?
उदा. वडिलोपार्जित हक्क, इतर भावंडांमध्ये प्रथम हक्क , पालकांची वृद्धापकाळी जबाबदारी घेणे इत्यादि.?
12 Jan 2024 - 10:19 am | कुमार१
माझ्याही मनात मागच्या आठवड्यात आली होती.
सध्याच्या भारतीय कायद्यांमध्ये तरी असे काही 'ऐकले' नाही. परंतु जगभरातील कायदे वेगवेगळे असू शकतात. संबंधित अभ्यासकांनी जरूर काही सांगावे.
( जिथे धार्मिक रुढींना महत्त्व आहे तिथे त्या संदर्भात ते महत्त्वाचे असावे).
13 Jan 2024 - 12:55 am | सौन्दर्य
खूपच चांगल्या प्रकारे ह्याचे विश्लेषण केलेत.
पुन्हा एकदा आभार.
12 Jan 2024 - 7:57 am | कुमार१
हे अर्थातच खरे नाही. इथे आपल्याला फक्त समान जुळ्यांच्या बाबतीतच विचार करायचा आहे.
आजार निर्माण होण्यास तीन घटक कारणीभूत ठरतात : एखाद्याची जनुके + पर्यावरणीय घटक + जीवनशैली.
समान जुळ्यांच्या बाबतीत लेखात दिल्यानुसार त्यांची जनुकीय घटना 99.99% समान आहे- म्हणजेच पुन्हा शंभर टक्के नाही. तसेच अन्य दोन घटकांचा दोन स्वतंत्र जीवांमध्ये वेगवेगळा परिणाम होऊ शकतो.
मात्र काही रोगांच्या शास्त्रीय अभ्यासात समान जुळ्यांवर विशेष अभ्यास केले जातात. काही आजारांच्या कारणमीमांसेत जनुकीय घटकांचा वाटा खूप मोठा आहे. अशांच्या बाबतीत दोन्ही जुळ्यांचे आयुष्यभर निरीक्षण करता येते. इथे आपल्याला दोन्ही प्रकारच्या घटना अनुभवता येतात :
१. असे काही आजार दोन्ही समान जुळ्यांना होऊ शकतात (concordance), आणि
२. फक्त एकालाच तो आजार होतो (discordance) .
सारांश : जुळ्यांचे दुखणं हे सरसकट वैज्ञानिक सत्य नसून तो एक वाक्प्रचार आहे .
13 Jan 2024 - 12:57 am | सौन्दर्य
स्पष्टीकरण आवडले व पटलेही
9 Feb 2024 - 8:50 pm | लई भारी
(एवढ्या उशिरा वाचून प्रतिसाद देत असल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो :-) )
नेहमीप्रमाणे छान माहिती डॉ नी दिल्याबद्दल धन्यवाद!
आम्हाला DZ जुळ्या मुली आहेत, आता ८ वर्षाच्या होतील. बहुधा गरोदरपणातल्या एका सोनोग्राफी वेळीच कळले होते की DZ आहेत. (त्यामुळे एक मुलगा, एक मुलगी असेल अशी शक्यता वाटत होती :-) )
आमचे अनुभव मिपावर इकडे लिहिले होते एकदा.
दोघींच्या स्वभाव, आवडीनिवडी, कल, स्किल्स अशा प्रत्येक गोष्टीत प्रचंड फरक आहे.
10 Feb 2024 - 7:45 am | कुमार१
छानच अनुभव !
तुमचा तिकडचा लेख सवडीने पाहतो.
हे भारी ! म्हणजे दोघींचे तंत्र सांभाळता सांभाळता तुमच्या नाकी नऊ येत असणार :)