एक वाट पहाणे.

भागो's picture
भागो in जनातलं, मनातलं
13 Dec 2023 - 10:39 am

एक वाट पहाणे.

आज हॉस्पिटलचा दिवस. थोडी तयारी केली. एक जुनी फाईल शोधून जवळ घेतली. त्यात कुणा डॉक्टरच्या गिचमिडी हाताने लिहिलेले प्रिस्क्रिप्शन होते.
कसलीतरी टेस्ट करायची होती. का? डॉक्टरला काहीतरी संशय आला होता म्हणून.
हॉस्पिटल मध्ये पोचल्यावर त्याला कुणा स्वागतिकेला विचारायची गरज नव्हती त्याला सगळे प्रोसिजर माहित होते. लिफ्ट पकडून तो ज्या मजल्यावर जायचे होते तेथे गेला. काऊंटरवर जाऊन पैसे भरले. फी दणदणीत होती. रोग होताच तसा. काऊंटरवालीने सांगितले, “ह्या रूममध्ये जाऊन थांबा.”
एकूण चार तास वाट पहावी लागेल म्हणाली.
पाण्याची बाटली आणली आहे?”
“हो ही काय.”
“छान. वाट पहा. नर्स बाई येईल आणि सांगेल. तवर थांबा.
तिथे ज्या रूम मध्ये तो वाट पहात बसला होता तेथे एसी जाम रोरावत होता. त्याने स्वेटरवगैरे काही बरोबर घेतले नव्हते. मग काय त्याला वाजायला लागली थंडी. कुड कुड कुड...

नर्सबाई सगळ्यांना शिरेत औषध देण्यासाठी सुई लावत होती. त्याची वेळ आली तर तिला बिचारीला त्याची शीरच मिळेना. वैतागली. म्हणाली, "असे कसे हो तुम्ही? हात नीट ढीला सोडा, थरथरू नका. घाबरलेत कि काय? काय वय आहे?"

त्याने वय सांगितले.

"बरोबर कुणी आहे?"

"नाही."

"कुणीतरी पाहिजे ना?"

"बरोबरचे लोक पुढे गेले आहेत."

"मग काय एकटेच? खायला कोण घालतं?"

मी बोट वर करून दाखवलं. माझ्या शेजारी एक सुंदरी बसली होती. खुदु खुदु हसत होती. त्यामुळे मला उत्साह आला.

"नर्सबाई, मला एक सांगा. हे तुमचे मशीन अजून किती वर्ष आयुष्य उरलं आहे ते सांगते काय हो? नाही म्हणजे मला सेन्चुरी मारायची आहे."
सगळे हसायला लागले. बाबा जोक करणारा आहे. त्या नंतर नर्सने सगळ्यांच्या पाण्याच्या बाटलीत औषध टाकून दिले.
“हळू हळू एक तासात पिऊन टाकायचे.”
सगळ्याना शिरेतून काहीतरी औधध टोचले.
वातावरणातील तंगी सैल झाली. माझे काम झालं. मग सगळे बोलायला लागले. उत्साहाने एकदुसर्याची विचारपूस करायला लागले.

प्रत्येकाची अलग अलग स्टोरी. थरारक अनुभव. पण प्रत्येकाला विकेटवर जेव्हाढावेळ टिकता येईल तेव्हढा वेळ टिकून खेळायचं होतं.
“तुम्ही कसे इकडे?” त्याने शेजारी बसलेल्या भिडूला विचारले.
“काय विचारू नकोस बाबा, सोळा पासून इकडे येतो आहे. ही टेस्ट पाचव्यांदा करतो आहे...” त्याला सगळे रोग होते. कुठला नाही असे नाही.
“माझे पाच डॉक्टर आहेत. ह्यासाठी हा, हार्टसाठी हा. स्टेंट बशिवला आहे. शुगर साठी वेगळा. हिप मधून गोळा काढला. ती सर्जरी ह्याने केली. मग लंघ्जमध्ये काहीतरी दिसलं. ती सर्जरी आपल्या ह्या त्याने केली. काय ग त्याचे नाव?” त्याने मुलीला विचारले.
मुलीने नाव सांगितले.
“हा तोच तो. एकदम भारी. छोकरा आहे. पण हुशार! बर का.”
तो सगळी माहिती टिपकागदासारखी टिपून घेत होता.
“काळजी करू नकाहो. होईल सारं व्यवस्थित.”
“तर काय. हिप मधला गोळा काढला तर डॉक्टर काय म्हणाला माहित आहे?”
“काय म्हणाला?”
“हाडा पासून एक सूतच दूर होता. नाहीतर कमरेपासून सगळा पाय काढावा लागला असता.”
“अरे बापरे!”
“देवानेच वाचवले. त्यानेच गोळा दिला, त्यानेच काढायची बुद्धी दिली. देव अशी लपाछप्पी खेळतो. तवा मी देवाला विसरलो होतो. त्याने इंगा दावला. म्हणाला बच्चमजी... आता नेमाने पारायणे करतो.”
“पण पाच पाच डॉक्टर म्हणजे...”
“हो हो. एक म्हणतो रोज किमान पाच किलो मीटर तरी चालायला पाहिजे तर दुसरा म्हणतो. हार्टवर ताण द्यायचा नाही, जिन्याने जायचे नाही. लिफ्ट वापरायची, मग मी काय करतो, रोज पाच किलो मीटर चालतो आणि सोसायटीमध्ये घरी जायला लिफ्ट वापरतो. ताई तुम्ही कुठून आलात?”
मग ती ताई आपली कर्म कहाणी ऐकवते. सगळे लक्ष देऊन ऐकतात, मध्ये मध्ये प्रश्न करतात.
“त्याचा त्रास होतो काय?”
“तर. भूक कमी होते. केस झडतात. इम्यूनिटी खलास, सारखे टेन्शन. दर महीन्याला चाळीस पन्नास हजारांचा फटका. फायदा काही नाही. म गोळ्या बंद केल्या. पण नवरा आणि मुलाने इमोशनल ब्लाक्मेल केल. मग वाटलं नाही अशी हार मानायची नाही. पुन्हा आले टेस्ट करायला. पण इथे आले तुम्हा सर्वांना भेटलं कि उत्साह येतो. वाटत रोज येऊन गप्पा माराव्यात. बॅटरी चार्ज करून घरी जायचं.”
टेस्टिंग सुरु व्हायला वेळ होता. तो पर्यंत औषधी पाण्याची बाटली संपवायची होती.
माझ्या डाव्या बाजूला बसलेल्या सुंदरीला, “पोरी तुला काय झालं?” असं विचारायची हिम्मत झाली नाही.
तेव्हढ्यात त्या मल्टीपल रोग्याच्या मुलीने खाली जाऊन सगळ्यांसाठी वडा पाव आणले.
सगळ्यांनी सगळ्या कॉशन फाट्यावर मारून वडापाव वर ताव मारला.
आता सगळे वाट पहात राहिले.
नंबर केव्हा येणार ह्याची.
नंबर आला कि जायचं.
तर च्यायला म्हणा आणि खेळ पुढे चालू ठेवा..

कथा

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

13 Dec 2023 - 7:38 pm | कर्नलतपस्वी

आयुष्य हाॅस्पीटल मधे गेले. बरेचदा वेगवेगळ्या बाह्यरुग्ण विभागाच्या प्रतीक्षा खोलीत वेळ घालवायचो रोगी म्हणून नव्हे तर एक आरोग्य कर्मचारी म्हणून. अशाच गोष्टी तिथे ऐकायला मिळतात.

एक जबरदस्त कादंबरी,कथासंग्रह बनू शकतो. प्रतीक्षा खोली हे सर्वार्थाने योग्य नाव आहे.

एक वाट पाहणे...
कधी जीवघेणे
कधी कंटाळवाणे
वाट पाहता पाहता
जड झाले ओझे म्हणत....
कधी विरून जाणे
एक वाट पहाणे
कंटाळवाणे....

लेख आवडला.

भागो's picture

14 Dec 2023 - 11:15 am | भागो

प्रतिक्षा खोली! हे नाव छानआहे.
आभार.

सौंदाळा's picture

13 Dec 2023 - 8:37 pm | सौंदाळा

लेख छान आहे.
कोणालाच आजारपणासाठी हॉस्पिटलला जायला लागू नये.

भागो's picture

14 Dec 2023 - 11:22 am | भागो

कोणालाच आजारपणासाठी हॉस्पिटलला जायला लागू नये.>>
सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया,
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद् दुख भागभवेत।
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः

Nitin Palkar's picture

14 Dec 2023 - 12:11 pm | Nitin Palkar

एका जवळच्या व्यक्तीच्या आजारपणात मुंबईतील टाटा कर्करोग रुग्णालयात काहीवेळा गेलो होतो. नंतर काही प्रसंगी मुंबईतीलच के ई एम, कुपर या महापालिकेच्या रुग्णालयात जायचा योग आला. योग हा शब्द मुद्दामच वापरत आहे. या ठिकाणी नजरेस पडत असलेल्या रुग्णांचे, रुग्णांच्या नातेवाईकांचे चेहरे बघितले की आपण किती सुखी आहोत, नशीबवान आहोत हे जाणवते.
सर्वांसी सुख लाभावे, तशी आरोग्य संपदा; कल्याण व्हावे सर्वांचे, कोणीही दू:खी असू नये! ही प्रार्थना रोज झोपण्यापूर्वी आपसूकच म्हटली जाते.