तो मुशाफर मध्यरात्री चांदण्यांशी बोलतो
नश्वराच्या तागडीने शाश्वताला तोलतो
दीर्घिकांच्या अंतरंगी अग्नि जो कल्लोळतो
आणुनी त्या भूवरी तो मृगजळाने शिंपतो
स्थूलसूक्ष्मातील सीमा जेथ होते धूसर
त्या तिथे थबकून थोडा, द्वैत सगळे मिटवितो
चेतनेची स्पंदणारी नाळ जिथुनी उगवते
त्या जडाच्या जटिल प्रांती प्राणफुंकर घालतो
शोधिले मी त्यास जळिस्थळी, काष्ठी आणि पत्थरी
शोध माझा दर्पणी प्रतिबिंब बघुनी संपतो
प्रतिक्रिया
17 Dec 2023 - 8:43 pm | राघव
चांगलंय!
आत्मशोधात आत्मा?? ;-)
25 Dec 2023 - 12:24 pm | कर्नलतपस्वी
आत्मपरीक्षण.
5 Jan 2024 - 1:58 pm | धष्टपुष्ट
स्थूलसूक्ष्मातील सीमा जेथ होते पुसटशी..
..शोधिले त्या जळिस्थळी मी, काष्ठि आणि पत्थरी