क्रॉसओव्हर आणि परत माघारी-२

भागो's picture
भागो in जनातलं, मनातलं
12 Nov 2023 - 10:48 pm

त्या चपट्या बाटलीतले रंगीबेरंगी रसायन प्याल्यावर चिंटूच्या मेंदूत अभूतपूर्व बदल झाले. त्याला कथा लिहिण्याची सुरसुरी स्फुर्ति आली. चिंटूने धाडकन एक विज्ञान कथा लिहून टाकली.

विज्ञान कथा लिहून लिहून चिंटू तडकला होता. आतापर्यंत जवळ जवळ वीसेक कथा लिहून झाल्या असतील. कुठल्याही प्रस्थापित प्रतिष्ठित मासिकांत त्याची कथा प्रसिद्ध झाली नव्हती. त्याच्या कथावाचनाशिवाय विश्वाचा गाडा अडला नव्हता कि ठोका चुकला नव्हता. कुणालाही चुकल्या सारखे वाटत नव्हते. चिंटूला ह्या गोष्टीचे राहून राहून आश्चर्य वाटत होते. एवढा महान लेखक कुठल्यातरी चाळीत दहा बाय पंधराच्या खोलीत सपाट जीवनाच्या अफाट पाट्या टाकत होता ह्याची कुणाही मराठी माणसाला ना खंत ना खेद! इये मराठीचीये नगरी आपला जन्म झाला ह्याचे वैषम्य वाटायचे दिवस होते. इंग्रजीवर प्रभुत्व नसणे ह्या क्षुद्र कारणामुळे चिंटूचे तेज झाकाळले गेले होते, नाहीतर आज? जाऊ दे झालं.

पण हे असं किती दिवस चालणार? हिरा कोळशाच्या खाणीत सापडतो म्हणे. पृथ्वीच्या पोटांत दडलेले रत्न कधीतरी पारख्याच्या हाती पडणारच! महान तत्वज्ञ सर भवभूती ह्यांनी म्हटले आहेच की --------
ये नाम केचिदिह नः प्रथयन्त्यवज्ञां
जानन्ति ते किमपि तान्प्रति नैष यत्नः।
उत्पत्स्यते तु मम कोऽपि समानधर्मा
कालो ह्ययं निरवधिर्विपुला च पृथ्वी॥

आणि आज अगदी तसेच होणार होते.

कुणीतरी चिंटूच्या खोलीचा दरवाजा ठोठावत होतं. चिंटूच्या अंगावर काटा आला. हा देणेकरी नाहीतर घरमालक असणार. ह्याला कसा टोलवायचा? सतराशे साठ सबबी सांगून झाल्या होत्या. रोज रोज नवीन कुठून शोधून काढायच्या? विज्ञानकथा लेखक असला तरी काय झालं.

पुन्हा दरवाजा ठोठावला गेला. नाईलाजाने चिंटूने दरवाजा उघडला. काळा सूट आणि काळा चश्मा समोर उभा होता. शेजारच्या खोलीतली चकणी बाई मजा पहायला दारांत उभी होती. उंची सूट परिधान करणारा कोणी चाळीत पहिल्यांदाच अवतीर्ण झाला होता. चकणी टकामका बघत होती. चिंटूला प्रथम स्वतःची, मग त्या चकण्या शेजारणीची, नंतर चाळीची, मुंबईची आणि सरते शेवटी सगळ्या जगाची लाज वाटली. काळा चश्मा बरोबरच्या धिप्पाड माणसाबरोबर हलक्या आवाजांत काहीतरी बोलला. तो गोरीला लवून म्हणाला, “येस् स्सर.” मग दमदार पावले टाकत तो झपाझप गायब झाला. (त्याच्या त्या दमदार चालीने सगळी चाळ हादरत होती.)

काळा चश्म्याने काळा चष्मा राजीनिकांंतच्या स्टाईलने दूर केला आणि राजकुमारच्या स्टाईलने संवादफेकी चालू केली.

“तुम्ही मला ओळखत नसाल. कदाचित असाल देखील. पण मी मात्र तुम्हाला ओळखतो. तुम्ही चिंतामणी आत्माराम बारटक्के. मराठीतील सुप्रसिध्द विज्ञानकथा लेखक. बरोबर आहे न. असणारच. कारण की मी खात्री केल्याशिवाय बोलत नाही. माझी...

चिंटूसाहेब, मी आत येऊ शकतो काय?” नाईलाजास्तव तो मराठीत बोलला.

चिंटूने स्वतःला सावरले, “अर्थात! गरीबाच्या झोपडीत आपले स्वागत आहे.” हाडाचा लेखक असल्यामुळे चिंटू असल्या वाक्यांची फेक करणे त्याच्या डाव्या हातचा मळ होता.

त्या इसमाला संकोच वाटत असावा. चतुर चिंटूला त्याचे कारण समजले. त्या दलिद्दर खोलीत केवळ एकच खुर्ची होती. चिंटूने तीच झटकून त्याच्या समोर झटकन पुढे केली, “बसा ना. उभे कशाला?”

त्या सद्गृहस्थाने आवंढा गिळला, “आपण असे करू या का? “हॉटेल सन्नाटा इंटरनॅशनल” मध्ये जाऊ या. तिथे आपल्याला निवांतपणे बोलता येईल.”

काय उत्तर द्यावे ते चिंटूला समजेना. सन्नाटा मध्ये जाण्यासारखा पोशाख त्याच्याकडे नव्हता. त्या अनोळखी माणसाने स्वतःहून त्याचा प्रश्न सोडवला. “ठीक आहे, तुम्हाला इथेच जर कम्फर्टेबल वाटत असेल तर इथेच बोलूया.”

“प्रथम माझी ओळख करून द्यायला पाहिजे. नाही का?” त्याने बोलायला सुरुवात केली, “मी फारसे वाचत नाही. मराठी तर जवळ जवळ नाहीच. तुमची ती “पुणेरी माणसे” ह्या मासिकांत आलेली “अदृश्य होणारा माणूस” गोष्ट माझ्या असिस्टंटने त्यांच्या सर्क्युलेटिंग लायब्ररीत वाचली. त्यांत माझे नाव, आमच्या कंपनीचे नाव, आमच्या रिसेप्शनिस्टचे नाव वाचून त्याला धक्का बसला. तुमच्या गोष्टीत आमच्या रिसेप्शनिस्टचे आणि आमच्या ऑफिसचे केलेले वर्णन अगदी जुळते. माझ्या केबिनमध्ये सय्यद हैदर रझा यांचे ‘कॉम्पोझिशन जिओमॅट्रिक’ हे पेंटिंग आहे हे पण तुम्ही लिहिले आहे. माझ्या असिस्टंटचा आधी असा समज झाला की आमच्या ऑफिसमधल्या कुणीतरी ही माहिती तुम्हाला पुरवली असणार. त्याला काय वाटले कुणास ठाऊक पण हा आश्चर्यजनक योगायोग बघून त्याने मला गोष्ट वाचायची विनंती केली. ते मासिक माझ्याकडे बरेच दिवस पडले होते. मला वाचायला वेळ मिळायला पाहिजे ना! शेवटी दोन दिवसापूर्वी मी ती गोष्ट वाचली."

आता त्या अनाहूत मानवाचा मोबाईल वाजत होता.

“खरेदी करा. तर मी काय म्हणत होतो, माझी. हा प्रथम माझी ओळख करून देतो. मी ईश्वरीलाल रुणझुणरुणझुणवाला. आधी आम्ही म्हणजे आमचे वाडवडील लडिवाला या नावाने प्रसिद्ध होते. तेव्हा आम्ही लडी विकत असू, नंतर आम्ही रुणझुण रुणझुण विकायचा धंदा सुरु केला. झालो रुणझुणरुणझुणवाला! माझी खात्री आहे हे तुम्हाला नवीन असणार. मी खात्री केल्याशिवाय बोलत नाही. माझी बायको..” पुन्हा त्याचा फोन वाजला.

“विकून टाका.

"रुणझुणरुणझुण इज नॉट अ थिंग. इट्स ए कन्सेप्ट! मी कन्सेप्ट विकतो. पूर्वी काय होतंं कि आपण बहुश्रुत आहोत हे दाखवण्यासाठी इंग्रजी मराठी पुस्तक विकत घेऊन बुककेस मध्ये लाइनिनी ठेवावी लागत असत. दर आठवड्याला ती आपल्या कामवाल्या बाईकडून साफ सुफ करून घ्यावी लागत. आता तुम्ही काय करायचं की आमच रुणझुणरुणझुण अॅप डाऊन लोड करायचं, आपल्याला पाहिजे त्याला ‘रुणझुण’ करायचं, आमच्या साईटवर जाऊन रजिस्टर करायचं. तुम्ही कुणालाही तुमच रुणझुण करू शकता, तुमचा कुत्रा, मांजर, तुमची बेबी, काही लोकांनी प्रेयसीलाच रुणझुण केल. दोन प्रतिष्ठित भेटले कि पूर्वी हवा पाण्याबद्दल गोड तक्रारी एकमेकांना ऐकवत. आता हवा पाण्याची जागा रुणझुणने घेतली आहे. तुमच्या रुणझुणचे फोटो मग तुम्ही ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम वर टाका आणि लाईक्स वसूल करत बसा. एक मिनिट.... हा भिंतीवर टांगलेला फोटो कुणाचा आहे? हा काय अंडरवर्ल्डचा दादा आहे का? नाही म्ह्णजे बाजूला गन ठेवली आहे म्हणून विचारलं. हा हा विकून टाक.”

“तो होय? ते गनधारी बाबा आहेत. माझे बाबा त्यांचे भक्त आहेत.” चिंटूने माहिती पुरवली.

“कुठल्या सेक्टरमध्ये काम करतात? इन्कमटॅक्स, शेअर मार्केट, राजकारण? का आपल नुसतेच अध्यात्म? मला एका पॉवरफुल बाबाची गरज आहे. स्पोर्ट सेक्टर मध्ये. ते राहू दे. मी काय बोलत होतो बर? हा तुमची ती गोष्ट. त्या गोष्टीतला तो अदृश्य होणारा माणूस!"

लगेच संध्याकाळी मला तो माणूस भेटला.”

चिंटू ही कथा कशी विसरणार? त्या कंजूस संपादकाने कथेसाठी पन्नास रुपये द्यायाचे कबूल केले होते. आजवर पै सुद्धा पाठवली नव्हती. आणि आता एक दमडीपण मिळायची आशा नव्हती.

“काल संध्याकाळी तो मला भेटायला आला होता. त्याने म्हणे अदृश्य होण्याचे टेकनिक शोधून काढले होते. मी त्या शोधाचे हक्क विकत घ्यावेत किंवा त्या प्रोजेक्टमध्ये पैसे गुंतवावेत अशी त्याची इच्छा होती. मी त्याला ठाम नकार दिला आणि ठणकाऊन सांगितले की असल्या भाकड कथांवर विश्वास ठेवायला मी काही भोळा सांब नाही. जाताना दरवाजाने बाहेर जायच्या ऐवजी कानाची पाळीच्या मागची नस दाबून तो अदृश्य झाला. हे सगळे तुम्ही तुमच्या कथेत वर्णन केले आहे तसेच झाले. तो नाहीसा झाल्यावर, माझ्या नजरेसमोर हवेत विरून गेल्यावर मला ४४० वोल्ट विजेचा धक्का बसला. त्याच वेळीच तुमची भेट घ्यायचा माझा निर्णय पक्का झाला. मग मी आज इथे आलो. एवढे वर्णन केल्यावर माझी ओळख करून द्यायची गरज आहे असं मला वाटत नाही.”

आता शॉक बसायची पाळी चिंटूची होती. “म्हणजे तुम्ही रुणझुणरुणझुणवाला, रुणझुणरुणझुणवाला, रुणझुणरुणझुणवाला आणि रुणझुणरुणझुणवाला प्रायवेट लिमिटेडचे एम् डी ईश्वरीलाल रुणझुणरुणझुणवाला असणार, बरोबर?” चिंटूने लिहिलेल्या कथेत हेच नाव होते. चिंटूने नाव सांगितले खरे पण आता त्याला संशय येऊ लागला.

एक शास्त्रज्ञ अदृश्य व्हायची ट्रिक शोधून काढतो. हे गॅजेट त्याला विकायचे असते म्हणून तो ईश्वरीलाल रुणझुणरुणझुणवाला नावाच्या इन्व्हेस्टरकडे जातो. ईश्वरी त्याला फ्रॉड समजून ऑफिसमधून हाकलायला बघतो. तर हा त्याच्या डोळ्यासमोरच अदृश्य होतो! काय, आहे की नाही क्लासिक कथा

“बरोबर.” असा प्रतिसाद देण्याऐवजी भगत म्हणाले, “एक रुणझुणरुणझुणवाला तुम्ही जास्त लावले! काही हरकत नाही. तुमच्या तोंडात साखर पडो. तो एक्स्ट्रा रुणझुणरुणझुणवाला यायच्या मार्गावर आहे. मी ज्या कामासाठी आलो आहे त्याबाबत बोलतो. तुम्ही मला सांगा भविष्यांत घडणाऱ्या गोष्टी तुम्हाला आधीच कशा समजतात? का उलट तुम्ही लिहिता तसे भविष्यांत होते? ही विद्या तुम्ही कशी हस्तगत केलीत? कुणी तुम्हाला ही शक्ती प्रदान केली? का तुम्हाला कर्णपिशाच्च वश झाले आहे?”

प्रश्नांच्या भडीमाराने चिंटू भांबावून गेला होता. “हे पहा साहेब, मला ह्या प्रकाराची काडीमात्र कल्पना नाही. आता आपण म्हणता आहात म्हणजे असे काहीतरी झाले असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. माझा स्वतःचा असल्या भाकड कथांवर अजिबात विश्व्सास नाही. आणि हो जर तुम्ही त्या माणसाला शोधायला म्हणून इथे आला असाल तर तुमची घोर निराशा होणार आहे. ह्याही पलीकडे जाऊन तुम्हाला अजून जास्त चवकशी करायची असेल तर इथून दोन चाळी सोडून तिसऱ्या चाळीत एक आमच्या गावचा पंचाक्षरी देवॠषी आहे. त्याची गाठ घ्या. तो असा सरळ बधणार नाही. फार आतल्या गाठीचा माणूस आहे तो. बरोबर आहे म्हणा. हल्ली गवरमेंटचे बारीक लक्ष असते म्हणे. पण माझे नाव सांगितलेत तर घेईल कदाचित तुमची केस. पहा ट्राय करून. काम झाले तर पैशे द्यायचे.”

चिंटूला वाटले, आपण जरा जास्त बोललो तर नाही. पण रुणझुणरुणझुणवाला साहेबांनी शांतपणे ऐकून घेतले. चिंटूचे बोलणे संपल्यावर ते बोलायला लागले, “हे पहा, आपण समजता तितका मी मूर्ख नाही. तुम्ही गोष्ट लिहिलीत ती पूर्ण झाली. त्या कथेत जेव्हढे कथानक होते ते प्रत्यक्षांत झाले. कथा संपली, प्रत्यक्षांत उतरली आणि विरून गेली. रात गयी बात गयी! मी तुम्हाला भेटायला आलो त्याचे कारण वेगळे आहे. तुम्ही बेस्केट बघता की नाही?”

संभाषण चिंटूच्या गोष्टीवरून बेस्केटवर गेले. एके काळी बेस्केट ऊर्फ ‘ला घोरी’ हा देशातला अत्यंत लोकप्रिय खेळ होता हे काय सांगायला पाहिजे? “हो, त्याचा इथे काय संबंध?”

“त्या खेळाचे देशांतील जी नियंत्रण करणारी संस्था आहे तिचा मी सीइओ आहे.” त्याने आपल्या कार्ड केस मधून एक कार्ड काढून माझ्या समोर ठेवले.

कथा