प्रारब्ध भाग ३

साहना's picture
साहना in जनातलं, मनातलं
24 Oct 2023 - 5:34 am

गोविंदाने हळूहळू खटारा ओढत पूल सुद्धा पार केला. तो जुनाट लाकडी पूल इतका आवाज करत होता कि दोन्ही मुलांना भीती वाटली आणि त्यांनी आपल्या वडिलांना घट्ट पकडले. तो वाटसरू सुद्धा थोडा घाबरून चालत होता. पण एकदाचा पूल पार झाला. दोन्ही मुलांनी पहिल्यांदाच पूल पहिला होता त्यामुळे त्यांना थोडी मजा सुद्धा वाटली. पुलाच्या दुसर्या बाजूचा रस्ता विस्तीर्ण होता. त्याला राजमार्ग असे संबोधायचे ह्या रस्त्यावर वर्दळ थोडी जास्त असे. आता उतरंड असल्याने सगळीच मंडळी खटार्यावर बसली होती आणि गोंविदाच्या पायांत थोडी गती आली होती.

मार्गक्रमण करता करता दूरवरून थोडी धूळ दिसू लागली. हयग्रीव सावध झाला. सैनिकी घोडे अशीच धूळ उडवत येतात. "तुझे ते दागिने कुठे आहेत?" त्याने वाटसरूला विचारले.

"काय?" तो गोंधळला.

"ताबडतोब दागिने काढ आणि इथे ठेव." त्याने खटाऱ्याच्या बाजूला एक लहानसा कप्पा होता तो उघडला. आपल्या बावळट वाटसरूनेसुद्धा दोन हार काढून त्यांत फेकलेच.

धुळीचा तो डोंगर जवळ आला तेंव्हा त्या सैनिकाच्या अंगावरील लाल रंगाचे चामडी चिलखत स्पष्ट दिसू लागले. साधारण १०-१५ घोडेस्वारांची तुकडी होती. असली तुकडी बहुतेक करून चोर डाकू मंडळींना मुख्य रस्त्यापासून दूर ठेवण्यासाठी गस्त घालत असते.

"थांबा" एक स्वार ओरडला आणि हयग्रीव ने घोडा थांबवला.

"ओळख सांगा" तो स्वार ओरडला,

"मी साधारण शेतकरी आहे साहेब, अलकापुरीत चाललो काही सामान विकत घेण्यासाठी. ही माझी दोन मुले आणि हा एक वाटसरू जो वाटेत गरजेत होता म्हणून त्याला आम्ही सोबत घेतला." हयग्रीवने उत्तर दिले.

जो स्वार ओरडला होता तो कदाचित दुय्यम हुद्द्याचा सैनिक होता. त्याने मागे पहिले, त्याच्या मागे एक दुसरा स्वार होता त्याच्या गणवेशावरून तो अधिकारी वाटत होता. त्याने डोळ्यांनीच काही तरी इशारा केला आणि स्वार पुढे आला. अश्वावरून उतरला आणि त्याने चौकसपणे संपूर्ण गाडीकडे अतिशय बारकाईने पहिले.

"हा घोडा गाडीचा वाटत नाही. चोरीचा आहे का?" त्याने दमटावून विचारले.

"चोरीचा नाही. मागे युद्ध झाले तेंव्हा जखमी अवस्थेंत मिळाला मी त्याची शुश्रूषा केलीय. खूपच दुर्बल आहे त्यामुळे जास्त वर्षे टिकणार नाही. पायांत जोर नाही. नाल बदलायच्या आधीच मरेल. "

त्या सैनिकाला पाहून आपला वाटसरू मात्र घाबरला होता.

आता अधिकाऱ्याने सुद्धा घोडा पुढे घेतला.

"काय ह्या भिकारी शेतकऱ्यांना अडवून ठेवलेय ? काय रे? काय आहे गाडीत? चोरीचा माल?" त्याने दमटावून विचारले.

"साहेब, चोरीचा काय, कसलाच माल नाही. थोड्या भाज्या आहेत. पोरांसाठी खाणे आणि येताना काही घेऊन येईन त्यांच्यासाठी".

आपला वाटसरू आपल्या पोत्याला घट्ट धरून बसला होता. त्या अधिकाऱ्याने तलवार काढली आणि त्याच्या पोत्याला टोचून पोते वर काढले. "ह्यांत काय आहे?" त्याने विचारले.

"त...प..." त्याच्या तोंडून शब्द सुटला नाही.

अधिकाऱ्याने तालवारीनेच ते पोते सैनिकाकडे फेकले. त्याने त्यातून काही वस्तू बाहेर काढल्या. एक कंगवा, काही नाणी, एक दोन फळे. एक तबकडी कदाचित चांदीची असावी त्यावर कमलापूर नगराचे चिन्ह होते, चिखलांतील कमळ. हयग्रीवच्या चेहेऱ्यावर खिन्नता आली.

"हे काय आहे रे? हे कुठून चोरलेस?" त्याने दमटावून विचारले आणि हात पकडून त्याला खाली ओढले. हयग्रीवची दोन्ही मुले घाबरून सर्व पाहत होती. ती एकदम आपल्या बापाला बिलगली.

" चोरले नाही, माझे आहे. मला माझ्या आईने मारताना दिले. " त्याने ह्यावेळी भय बाजूला ठेवून स्पष्ट शब्दांत म्हटले.

"तुझी आई काय कमलापूरची नगरवधू होती काय? कि ती सुद्धा चोर होती ? चल, चालायला लाग इथून"  त्या अधिकाऱ्याने म्हटले.

"ते माझे आहे आणि माझ्या आईची शेवटची आठवण आहे. कृपा करून मला द्या. मी पाहिजे तर तुम्हाला हे पैसे देतो. त्याने खिशांतून काही नाणी काढली." त्यावर ते सर्व सैनिक खदाखदा हसले.

घोड्यावरूनच त्या अधिकाऱ्याने वाटसरूच्या कंबरड्यांत लाथ घातली.

"अरे वेडा आहेस का? साहेबांना राग नको आणूस. ओळखत नाहीस तू ह्यांना. विंध्याचलाचा दैत्य म्हणून ज्याला ओळखतात ना त्या हयग्रीव नावाच्या राक्षसाने कमलापूर चा संपूर्ण नगरवाडा उध्वस्त केला होता. त्या हयग्रीवाला ह्या साहेबानी आपल्या एकाच झुंजीत ठार मारले. ठाऊक आहे? कमलापूर तुझे गाव का? मग ह्यावर खरे तर त्यांचा अधिकार जास्त आहे. कारण विंध्याचलाचा दैत्य आणि कमलापूरचा काळ हयग्रीवला ह्यांनी ठार मारले. चल आता गुपचूप चालू लाग. इथे मुलेबाळे आहेत, त्यांच्या पुढे मार नको खावूस." एका सैनिकाने त्याला दटावले.

पण तो वाटसरू अत्यंत भावुक झाला होता. त्याच्या आईची आठवण त्याच्यासाठी महत्वाची होती. तो पळत पळत खटार्याकडे गेला आणि त्याने तेथील आधी हयग्रीवने लपवून ठेवलेले दागिने काढले नि तो पळत त्या अधिकाऱ्याकडे गेला. "साहेब हे मौल्यवान आहेत, हे ठेवा. पण माझ्या आईची आठवण परत द्या". हयग्रीव हताशपणे सर्व काही पाहत होता.

त्या अधिकाऱ्याचे डोळे ते दागिने पाहून चमकले. "हरामखोर ? हे कुठे लपवून ठेवले होतेस ? तू साधा चोर नाही अट्टल चोर वाटतोय" त्या अधिकाऱ्याने ते दागिने सुद्धा हिसकावून घेतले. "चल, पळ काढ इथून चोरा. नाहीतर चोर म्हणून इथेच फाशी देऊ"

त्या वाटसरूला आता मात्र राग आला. त्याने तिथेच पडलेला एक दगड उचलला आणि त्या अधिकाऱ्याकडे फेकून मारला. जो त्याने अत्यंत सहज पणे चुकवला आणि इतर सैनिक भराभर घोड्यावरून उतरले आणि त्यांनी त्या वाटसरूवर जबरदस्त हल्ला केला. त्याला अक्षरशः जनावरां प्रमाणे बदडले. तो ओरडत राहिला आणि हयग्रीवची मुले भयाने किंचाळत राहिली. काही अति उत्साही सैनिकांनी मग हयग्रीव कडे मोर्चा वळवला. लहान मुलांनी पर्वा न करता त्यांनी हयग्रीवला खाली खेचले. त्याच्या मुलाने चातुर्य दाखवत बहिणीला घट्ट पकडले आणि ते दोघे भयग्रस्त होऊन खटार्यावरच राहिले.

"तू सुद्धा ह्या चोरीत सामील आहे ना म्हातार्या ?" एका सैनिकाने म्हटले.

"आम्ही कुठलीही चोरी केली नाही. ते दागिने त्या मुलांचेच आहेत. मला वयाचा अनुभव आहे. इथे चोर कोण आहे हे मला ठाऊक आहे." हयग्रीव ने त्यांच्या अधिकाऱ्याकडे पाहत म्हटले. त्याचे शब्द तीराप्रमाणे त्या अधिकाऱ्याला बोचले.

काहीवर्षांमागे हेच सैनिक हयग्रीवच्या फक्त नजरेने भीतीने मुतले असते. आता हीच मंडळी लांडग्याप्रमाणे त्याच्या अवती भोवती लचके तोडायला पाहत होती. हयग्रीव सुद्धा सहजा सहजी मार खाणार नव्हता त्याने सुद्धा मूठ आवळून तयारी केली. एका पोरसट मुलाने पहिला मुक्का फेकला. हयग्रीव तो चुकवण्यासाठी बाजूला झाला पण तो मुलगा जास्त चपळ होता. मुक्का थेट त्याच्या नाकावर आदळला. आपण इतके संथ असू अशी कल्पना सुद्धा हयग्रीव ने केली नव्हती. आपला ठोसा त्याने फेकला पण त्या मुलाने तो सहज चुकवला आणि हयग्रीव चा तोल जाऊन तो खाली पडला. त्यानंतर इतरांनी त्याच्यावर लाथा घालण्यास सुरवात केली. काहीच क्षणात डोळ्यापुढे अंधारी आली आणि वेदनेच्या कळा गायब झाल्या.

क्रमशः

 
 

कथा

प्रतिक्रिया

नगरी's picture

24 Oct 2023 - 11:32 am | नगरी

वाचतो आहे

टर्मीनेटर's picture

24 Oct 2023 - 1:08 pm | टर्मीनेटर

वाचतो आहे. Taken 3 मधल्या म्हाताऱ्या ब्रायन मिल प्रमाणे हयग्रिव पण आपल्या पुर्वेतिहासाला जागुन, त्याची जुनी कट्यार उपसुन अधिकाऱ्यासहित त्या गस्ती पथकातील घोडेस्वारांचा आता खातमा करतो कि काय असे वाटुन गेले 😀

तुषार काळभोर's picture

24 Oct 2023 - 1:09 pm | तुषार काळभोर

उत्कंठावर्धक कथा चालू आहे.

मुक्त विहारि's picture

24 Oct 2023 - 6:43 pm | मुक्त विहारि

रंगत येत आहे..

कर्नलतपस्वी's picture

24 Oct 2023 - 8:26 pm | कर्नलतपस्वी

अरे वेडा आहेस का ? साहेबाना राग नको आणूस. ओळखत नाहीस तो ह्यांना. विंध्याचलाचा दैत्य म्हणून ज्याला ओळखतात

काॅपी पेस्ट लोचा झालाय.

स्नेहा.K.'s picture

24 Oct 2023 - 10:00 pm | स्नेहा.K.

गोष्ट मस्त चालू आहे...

राघव's picture

25 Oct 2023 - 12:09 pm | राघव

वाचतोय!

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Oct 2023 - 12:47 pm | अमरेंद्र बाहुबली

हयग्रीव ने त्यांना मारायला काहीही हयगय करू नये.
- अहिंसाप्रेमी बाहुबली.

चांगले चालू आहे. पण यापूर्वी तृष्णा या अत्यंत उत्कंठावर्धक कथेला मधेच क्लिफहँगरावस्थेत सोडण्याची आठवण असल्याने कथा पूर्ण झाली की मग सलग वाचून आनंद मानण्यात येईल.

"वाटसरू आपल्या पोत्याला घट्ट धरून बसला होता" का "वाटसरू त्याचे पोते घट्ट धरून बसला होता"?
"वह अपनी बोरीको पकड के बैठा था" या प्रकारच्या हिन्दी वाक्यरचनेचा प्रभाव वाटतो.

चहा प्या, चहाला पिऊ नका...