संसर्गजन्य आजारांमध्ये विषाणूमुळे होणाऱ्या आजारांचा वाटा मोठा आहे. यापैकी काही आजार विविध प्राण्यांकडून माणसात संक्रमित होतात. अशा आजारांपैकी एक प्राणघातक आजार म्हणजे ‘निपा’(Nipah) विषाणूचा आजार. विसावे शतक संपण्याच्या सुमारास हा आजार मलेशियातील Sungai Nipah या खेड्यात प्रथम आढळल्याने त्या गावाचे नाव त्याला देण्यात आले आहे.
रोगाचा जागतिक इतिहास
या आजाराचा पहिला रुग्ण १९९८ मध्ये मलेशियात आढळला. तेव्हा तो तिथे डुकरांची संबंधित असलेल्या लोकांमध्ये सापडला होता. भारतातील पहिला रुग्ण 2001 मध्ये पश्चिम बंगालमधील सिलिगुडी येथे सापडला होता. पुढे मे 2018 मध्ये केरळमध्ये हा आजार बऱ्यापैकी आढळला - तेव्हा 23 जणांना आजार झाला होता आणि त्यातील मृत्यू दर 91 टक्के होता. 2023मध्ये तो केरळमध्ये पुन्हा आढळला आहे. यंदा तिथली परिस्थिती नियंत्रणात राहिली हे बरे झाले (वृत्तपत्रीय बातम्यानुसार ६ बाधित, त्यातील २ मृत्युमुखी).
आतापर्यंत हा आजार प्रामुख्याने आशिया व आफ्रिका खंड आणि दक्षिण पॅसिफिक समुद्रपट्ट्यात आढळलेला दिसतो.
निपा विषाणूची वैशिष्ट्ये :
1. तो RNA प्रकारचा आहे. असे विषाणू निसर्गानुसाच चिवट, चमत्कारीक व नियंत्रणात आणायला कठीण असतात.
2. आंबा किंवा अन्य फळांमध्ये तीन दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतो.
3. साबण, डिटर्जंट पावडर किंवा सोडियम हायपोक्लोराईटच्या द्रावणाने त्याचा नाश होतो.
विषाणूचा प्रसार
Fruit bats या जातीच्या वटवाघळांमध्ये त्याचा निसर्गतः मोठा साठा असतो. ज्या ठिकाणी फळांची झाडे, वटवाघळे, डुकरे आणि माणूस यांचा निकट संपर्क येतो तिथे या विषाणूचा सजीवांमध्ये प्रसार होतो. 'डेट पाम' या प्रकारची झाडे ठराविक वटवाघळांना विशेष प्रिय असतात. हे प्राणी त्या झाडांचा रस पितात. या प्रक्रियेदरम्यान त्यांच्या शरीरात असलेले विषाणू बाहेर पडून संबंधित फळे आणि शेतातील मातीत पसरतात. अशी दूषित फळे डुक्कर किंवा अन्य प्राणी खातात. डुकरांच्या शरीरात या विषाणूचे अजून वर्धन होते. अशा डुकरांना मारून त्यांच्या मांसाची ठिकठिकाणी विक्री होते. त्या दूषित मांसातून विषाणू मानवी शरीरात प्रवेश करतो. काही जमातींत अशा झाडांचा ताजा रस पिण्याची देखील पद्धत असते. त्यातूनही हा जंतूसंसर्ग होऊ शकतो.
एकदा का माणसाला हा आजार झाला की त्याच्या अतिनिकट संपर्क असलेल्या व्यक्तींमध्ये हा आजार पसरू शकतो. रुग्णाच्या श्वासातून बाहेर पडणारे सूक्ष्म थेंब (droplets), त्याची लघवी किंवा रक्त यांच्या संपर्कातून हा आजार दुसऱ्या व्यक्तींना होऊ शकतो.
खालील चित्रात हे सर्व व्यवस्थित समजून येईल :
आजाराचे स्वरूप
जंतुसंसर्ग झाल्यानंतर थोड्याच दिवसात (3-14) संबंधित रुग्णाला लक्षणे दिसू लागतात. हा विषाणू मुख्यतः श्वसनमार्ग आणि मेंदूवर हल्ला करतो. काही महत्त्वाची लक्षणे अशी :
1. डोकेदुखी, गरगरणे व मानसिक गोंधळ
2. तीव्र ताप व उलट्या
3. खोकला व दम लागणे
4. स्नायू शिथील पडणे
5. नाडीचे ठोके आणि रक्तदाब वाढणे
6. स्नायूंची संबंधित निरनिराळ्या प्रतिक्षिप्त क्रियांमध्ये अडथळे येणे
फुफ्फुसांना इजा झाल्यामुळे न्यूमोनिया होतो. आजार गंभीर झाल्यास रुग्ण बेशुद्ध होतो. तसेच त्याला फेफरे येऊ शकतात. एकदा का शरीरात हा विषाणू फोफावला की तो बहुतेक सर्व महत्त्वाच्या इंद्रियांना इजा पोचवतो. त्या स्थितीत आजार प्राणघातक ठरतो. ज्या रुग्णांना श्वसनमार्गाचा मोठा त्रास होतो ते इतरांसाठी अधिक संसर्गजन्य ठरतात.
तपासण्या आणि रोगनिदान
1. गरजेनुसार रुग्णाच्या नाकातील स्त्राव, रक्त, लघवी आणि पाठीच्या कण्यातील द्रव (CSF) यांची तपासणी केली जाते. यापैकी योग्य तो नमुना विशेष विषाणू संशोधन केंद्राकडे पाठवला जातो. तिथे RT-PCR या चाचणीचा वापर करून विषाणू शोधला जातो.
2. रक्ततपासणी मधून या विषाणू-विरोधी antibodies सापडू शकतात.
उपचार
सध्या तरी या आजारावरील विशिष्ट विषाणूविरोधी रामबाण औषध उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णावर लक्षणानुसार ठराविक उपचार केले जातात आणि शरीरातील जलस्थितीची काळजी घेतली जाते.
Ribavirin या औषधाचा पूर्वी वापर केलेला आहे परंतु अद्याप त्याची उपयुक्तता प्रस्थापित झालेली नाही. ठराविक प्रकारच्या monoclonal antibodyचे उपचार देखील प्रयोगाधीन आहेत.
रोगप्रतिबंध
रोगाचे गंभीर स्वरूप बघता प्रतिबंध खूप महत्त्वाचा ठरतो. यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे :
1. बाधित वटवाघळे किंवा डुकरांची संपर्क टाळणे
2. ज्या झाडांवर वटवाघळे विश्रांती घेत थांबतात त्या भागात वावर टाळणे
3. वटवाघळानी दूषित केलेली फळे किंवा झाडाचा रस, कच्ची फळे आणि जमिनीवर पडलेली फळे खाऊ नयेत
4. या आजाराने बाधित असलेल्या रुग्णाशी संपर्क टाळावा
5. ज्या भागात आजाराचा उद्रेक झाला आहे तेथील नागरिकांनी संसर्गजन्य रोगांच्या संदर्भातली नेहमीची त्रिसूत्री पाळणे महत्त्वाचे ठरते.
* रोगप्रतिबंधक लस अद्याप दृष्टिक्षेपात नाही.
….
वटवाघुळ हा उडू शकणारा एकमेव सस्तन प्राणी आहे. त्याच्या विविध जाती असून त्यांना सुमारे ६० प्रकारच्या विषाणूंचा संसर्ग होतो. त्यापैकी अनेक विषाणू मानवी संसर्गजन्य आजार घडवताना दिसतात. प्रस्तुत लेखातील विषाणू बरोबरच करोना आणि रेबीज ही त्यातली काही ठळक उदाहरणे. या दृष्टिकोनातून वटवाघळांचा सखोल जैविक अभ्यास आंतरराष्ट्रीय पातळीवर चालू आहे यथावकाश या संशोधनातून मानवी संसर्गजन्य आजारांच्या अभ्यासाला योग्य ती दिशा मिळावी अशी अपेक्षा आहे.
***********************************************************************************************************************************
संदर्भ :
१
२
३
प्रतिक्रिया
4 Oct 2023 - 10:30 am | मुक्त विहारि
विषाणू, RNA प्रकारचा असल्याने , Acid मध्ये विरघळून जातो की Alkali मध्ये विरघळून जातो?
4 Oct 2023 - 10:51 am | कुमार१
साबण, डिटर्जंट पावडर किंवा सोडियम हायपोक्लोराईटच्या द्रावणाने नाश होतो. = Alkali
4 Oct 2023 - 11:25 am | गवि
आता ही काय नसती पीडा..!! हे राम.
नीरा पिणे देखील अवघड झाले की.
विषाणू इतका घातक आहे पण तुलनेत पसरत मात्र नाहीये ते बरे आहे. असे का होत असावे. म्हणजे नकोच पसरायला.. पण पुन्हा ते लॉक डाऊन वगैरे स्थिती येण्याची कितपत शक्यता या निपामुळे?
4 Oct 2023 - 11:38 am | कुमार१
काळजीचे कारण नाही.
काही दिवसांपूर्वीच तो केरळमध्ये मर्यादित स्वरूपात आला आणि परिस्थिती चांगल्यापैकी नियंत्रणात आहे. गणेशोत्सवा दरम्यान दक्षिणेकडील वृत्तमाध्यमांमध्ये त्या बातम्या सतत झळकत होत्या. हा आजार केरळमध्येच अधूनमधून का येतो यावर पत्रकारांचा थोडाफार काथ्याकूटही झाला होता. तिथल्या एका जिल्ह्यातील शाळा आठवडाभर बंद ठेवल्या होत्या.
आपल्याकडे उत्सवी वातावरण असल्याने त्या काळात मी संयम ठेवून या विषयावर लिहिणे टाळले.
आताचे लेखन फक्त एका संसर्गजन्य रोगाची नोंद / माहिती देणे इतक्याच हेतूने केलेले आहे.
4 Oct 2023 - 11:59 am | गवि
धन्यवाद..
4 Oct 2023 - 12:09 pm | Bhakti
२०१८ मध्ये निपा विषयी बातम्या यायच्या ते आठवलं.तुम्ही लिहिलेल्या रेबीज लेखाचा दुवा (लिंक)द्याल का?
4 Oct 2023 - 12:24 pm | कुमार१
नाही. अद्याप या आजारावर मी लेखन केलेले नाही. अन्य आरोग्य लेखांमध्ये ओझरता उल्लेख आलेला असावा.
4 Oct 2023 - 12:59 pm | राजेंद्र मेहेंदळे
आज किवा कालच्या पेपरमध्ये या विषाणु ची तुलना, कोविड्,सार्स्,ईबोला वगैरे शी केलेली आढळली. ती गुण साधर्म्यामुळे की संहारकतेमुळे?
बाकी लेख नेहमीसारखाच माहितीपुर्ण आहे. शेवटचा फोटो आवडला :)
4 Oct 2023 - 1:23 pm | कुमार१
हे तिघेही आरएनए या जमातीचे आहेत तसेच ते फ्रुट बॅट या वटवाघळापासून मानवात येतात
4 Oct 2023 - 2:38 pm | अमरेंद्र बाहुबली
छान माहीतीपुर्ण लेख. आणखी असेच नवनवीन लेख येऊद्यात डाॅक्टर साहेब.
4 Oct 2023 - 6:31 pm | कर्नलतपस्वी
तसेच धीर देणाराही.
5 Oct 2023 - 11:56 am | तुषार काळभोर
निपा आणि झिका यांच्याबाबतीत असं वाचलं होतं, की हे विषाणूजन्य आजार जास्त संहारक असल्याने त्यांचा प्रसार मर्यादित राहतो.
म्हणजे बाधित व्यक्ती जर लवकर मृत्यूमुखी पडली तर विषाणूला प्रसार व्हायला कमी संधी मिळते.
जर विषाणू जास्त संहारक नसेल (समजा बाधितांमधील मृत्यूदर १०% हून कमी - उदा कोविड१९) तर विषाणूसंसर्ग झालेले जास्त लोक प्रसार करण्यासाठी उपलब्ध असतील आणि विषाणू जास्त पसरेल. म्हणजे संसर्ग जास्त लोकांना
म्हणजे विषाणूची संहारकता (Mortality Rate) आणि प्रसारक्षमता हे परस्परांशी व्यस्त प्रमाणात असतात, असं काहीसं असतं का?
5 Oct 2023 - 12:50 pm | कुमार१
प्रश्न अतिशय चांगला आहे.
वरवर पाहता त्या दोन गोष्टींचे प्रमाण व्यस्त असेल असे वाटते, पण हा मुद्दा इतका सोपा नसून गुंतागुंतीचा आहे ! एखाद्या आजाराची संसर्गक्षमता अनेक घटकांवर अवलंबून असते. त्यापैकी काही प्रमुख पाहू :
१. प्रसारगती : इथे त्या आजाराचा बेसिक रिप्रोडक्शन नंबर (RO) पाहावा लागतो. म्हणजे, एक बाधित व्यक्ती तो आजार किती निरोगी लोकांना पसरवू शकते?
२. संसर्गची तीव्रता (contagiousness) : म्हणजे, बाधिताच्या निव्वळ जवळ उभे राहिले असता प्रसार होऊ शकतो, की बाधित वारंवार जोरात शिंकल्यास/ खोकल्यास मगच प्रसार होऊ शकतो?.. इत्यादी
३. लक्षणविरहित किंवा लक्षणपूर्व बाधित लोक त्या रोगाचा प्रसार करू शकतात किंवा नाही? जो आजार पुरेसा गंभीर झाल्यावरच लक्षात येतो ( किंवा पसरू शकतो) त्याच्या बाबतीत रोग्याचे विलगीकरण करणेही सोपे जाते.
४. एखाद्या रोगाची अस्तित्वात असलेली समाज-प्रतिकारशक्ती : म्हणजे, पूर्वी त्याचे मोठ्या प्रमाणावर लसीकरण झालेले आहे किंवा नाही... इत्यादी इत्यादी
सारांश : Not all serious infectious diseases spread less.
5 Oct 2023 - 7:28 pm | नठ्यारा
निपा हा एक क्षुल्लक विषाणू आहे. खरोखर भयानक घातक मिपा नावाचा विषाणू आहे. त्याने एकदा दंश केला की माणूस मरेपर्यंत त्याच्या आधीन राहतो. औषध वगैरे विसरावे लागते.
- नाठाळ नठ्या
12 Oct 2023 - 10:19 pm | टर्मीनेटर
छान माहितीपुर्ण लेख 👍
थोडा उशीराने वाचनात आला!
13 Oct 2023 - 7:54 am | कुमार१
अभिप्राय व पूरक माहितीबद्दल सर्वांना धन्यवाद !