गो केकू गो!
“रावडी केशव कुलकर्णी(केकू)”
Fully Configured.
Level 3 entered. Scene 1. ready to go. Start New Session.
ID No. ID zx 120 2792023 T=00
“Go Keku. Go.”
बत्तीसगडचा राजवाडा. राजकुंवर केशव कोचावर पहुडले आहेत. पायाशी एक क्लास वन दासी केशवच्या पायाच्या नखांना पॉलिश करून “सर” आणत आहे. केशव विचार करतोय. काल रात्री तर हीच होती ना. हीचं नाव काय बरं असावं? काही का असेना. दिसायला काही वाईट नव्हती. गोरा पान रंग. चाफेकळी अपरं नाक. कुरळे कुरळे काळे भोर लांबसडक केस.
पण केशव अफाट बोअर्ड. सुंदर सुंदर ललना ही नेहमीची गोष्ट झाली होती. त्याच्या मेंदूत मागच्या जन्मीच्या आठवणींची गर्दी झाली आहे.
“महाराजकुमार, आता पहा नखं कशी चमकत आहेत.” ती जी कोण होती तिनं केशवकुमारच्या पायाचं चुंबन घेतलं.
काय सफेद झूट बोलतेय. त्याच चुंबित पायाने एक... मग कसं?
खूप झालं आता इथून फुटायला पाहिजे. हा जो कोण युवराज आहे तो “मी” नाहीये.
“मला जायला पाहिजे. माझं जॅकेट कुठाय?”
“ओ नो. महाराज प्लीज नका जाऊ ना. तुम्ही गेलात की आम्ही पण जाणार. यू लाईक अस म्हणून वुई आर! तुम्हाला कंटाळा आला असेल तर मी गाणं गाते. नाच करते. “न जाओ सैय्या चुराके...” नाही आवडलं? मग हे “अभी ना जाओ छोडकर.””
“चूप बे. गाणं गातेस का भजन कुटतेयस. माझं जॅकेट?”
उशाशी बसलेल्या दासीने द्राक्षाचा घड सोन्याच्या पात्रात ठेवला आणि ती लगबगीने कोट आणण्यासाठी म्हणून गेली. आता ही कोण?
“तीलू आपले कपडे आणायला गेली आहे. आधी शर्ट, पँट आणि चिलखत तर चढवायला पाहिजे. मग जिरेटोप...”
ओ नो. मला फक्त टीशर्ट आणि जीन्स पाहिजे. आणि वर जॅकेट.
अरे कोई है?
देवा, उचील रे बाबा.
Level 3. Emergency.
Session Scrammed!
Level 3 session not saved.
T= 0035.
Start level 2.
Entering Level 2.
Keshav Edited.
Ready to act.
Go? Yes/No.
Go Keshav go.
Start New session ID zx 121 2792023 T=00 दिव्याच्या खांबाखाली केशव वाट पहात उभा आहे. गळ्यात लाल रंगाच्या रुमालाची गाठ, अंगात टोमॅटो कलरचा शर्ट. डोक्यावर काऊबॉय हॅट चेहऱ्यावर थोडी ओढलेली. रस्त्यावर सगळीकडे सुनशान. चिटपाखरू पण नाही. लहान मुलं रडायची थांबली आहेत. वाऱ्याची झुळूक येता येता थबकली आहे. पिंपळाची सळसळ थांबली आहे. रातराणीची फुले उमलता उमलता... चंद्र तारे ढग स्तब्ध! ओढ्याचे पाणी, समुद्राच्या लाटा. लाटांवरचा फेस जिथल्या तिथे गोठला आहे.
का? कारण केकू कोथरूड फारा दिसांनी आज इकडे चक्कर टाकत आहे. आता विराट राडा होणार या अपेक्षेने वातावरण तंग.
बाजूला बाबू छप्पन टिकली टपरीवर धंदा करतोय. बाबू केकूला घाबरत नाही.
“बाबू. बिडी.” केकुचं लक्ष रस्त्यावर दोनी बाजूला. बाबूकडे न बघता केकू फक्त हात मागे करतो.
बाबू एक लाल धागा हातावर ठेवतो.
“अरे एकच. बिडी बोले तो बंडल देनेका होता ना. अवर माचीस?”
“गलती हो गयी सरकार. एक डाव बोले तो माफ करणा.” बाबूने फुल बंडल आणि माचीस हातात ठेवलं. केकूने एक बिडी काढून मूमे पकडी, बिडी ह्या बाजूने त्या बाजूला फिरवत बुटाच्या नालावर फर्र करून काडी शिलगावली. एक दमदार झुरका मारून आख्खा कट्टा वापस केला. वर शंभराची कोरी करकरीत नोट!
“ले मजा कर.”
“सरदार. छुट्टा देओ ना. नाही तो मेरेको पूरा गल्ला खाली करणा पडेगा.”
“तो मत करणा, मैने मांगा है क्या? अवर छुट्टा लेके मै क्या करू? देखो, मै सौ के नीचे खुर्दा रखताच नाही. तू भी क्या याद करेगा. रख ले.”
“केकू, गंगी तेरेकू याद कर रही थी. एक बार मिलके आणा.”
भेटायला खरं तर पाहिजे होतं. पण...
“बाबू, अभी नाही. आज नाही. भोत बिझी हूना.”
घड्याळात साडे आठ वाजले होते.
“बाबू, लगता नही वो आज आयेगा करके.”
“डर गया स्साला. यहा उसके भी खबरी है ना.”
“प्यास लगी है. मै क्या करता. मै कल्लू के दर बारमे जा रहया हू. कोई पुछेगा तो बोलणा वहा इंतझार कर रहा हूं.”
कल्लूच्या बारमध्ये पब्लिक खचाखच भरली होती. नुसता हे कचकचकचाट. गावठी आणि आयएमएफएलच्या बाटल्या हातात मिरवत लोक इतस्ततः फिरत होते. कल्लूचे पहिलवान गर्दीवर लक्ष ठेवून होते. एकेकाचे दंड म्हणजे रंडू किलो ईच. मटनाची खानावळ! टेबला टेबलावर तीन पत्ती. रमी खेळणं म्हणजे बायल्याचं लक्षण! जूक बॉक्सवर कोणत्या तरी हिंदी पिच्चरचे गाणे उच्च रवात.
केकू आत आला आणि त्याने काला चष्मा राजिनीच्या इस्टाईमंदी खटक्यात उतरवला. आणि सगळ्या माहौलवर नजर फिरवली. त्याच्या बुभुळे विरहित पांढऱ्या फटक नजरेने सगळ्यांच्या हृदयाची धडकन धाडकन बंद पडली. गाणे जिथे होते तिथेच अडकलं. प्रत्येक जण जिथे होता तिथेच दगडी झाला. केकू दमदार पावलं टाकत बार जवळ गेला. त्याने एका स्टुलाला खुणावले. आज्ञाधारक स्टूडंट सारखे ते स्टूल त्याच्याकडे चालत आले. तुम्हाला मी सांगतो, घनीभूत झालेल्या हवेतून चालत जाणे सोपं काम नाही. खरं तर तुम्हाला हातात कुऱ्हाड घेऊन हवा फोडत मार्ग काढावा लागेल. पण केकूची गोष्टच निराळी!
स्टुलावर बसून केकुने खिशातून सिगारेटचे पाकीट काढले. एक सिगारेट काढून त्याने हवेत स्पिन करून फेकली. वरच्या खिशातून रत्नजडीत लायटर काढला. शिलगावला आणि पेटलेला लायटर सिगारेटच्या मागावर पाठवला.
“जाओ मेरेलाल, त्या द्वाड सिगारेटला पेटव. जा.” एखाद्या क्रूझ मिसाईल प्रमाणे लायटर सिगारेटच्या मागावर निघाला. थोड्या वेळाने जळती सिगारेट केकूच्या ओठात आणि विझलेला लायटर केकूच्या शर्टाच्या खिशात! अश्शी गंमत!
केकूने हात वर करून पब्लिकला जीवन जगण्याची परवानगी दिली. सगळ्यांनी सुटकेचे निश्वास सोडले. आणि आवाज न करता सगळे चुपचाप गुत्त्याबाहेर पडले. कल्लूने पक्याला जवळ बोलावले आणि त्याला हलकेच काही सांगितले.
“शिवराम कसब्याला सांग म्हणावं इकडं फिरकू नक्को म्हणून.”
“कल्लू, ग्लास भर.”
“रॉयल स्टॅग कि बलेंडर्स प्राईड?”
“असा कसा रे यडा तू? भर मुसंबी. आणि दोन तीन कांदे इकडे कर.”
केकून पोटाशी दडवलेला बटन चाकू खट्याक करून उघडला. आणि कांद्याच्या पाSSSत्तळ चकत्या कापल्या. “जा, ह्या पाण्यात धू आणि नमक मारके लाव.”
कल्लूनं मुसंबी, बिसलेरी आणि कांदा आणून ठेवला.
“रे कल्लू. पाणी कायकू? या तो दारू पिओ नही तो पानी. मिक्स किया तो हो गया सत्यानाश. दोनोका मझा किरकिरा! आवर एक...”
केकू वाक्य पूर्ण करायच्या आधीच इन्स्पेक्टर राणे आणि बरोबर हंप्टी डंप्टीला घेऊन प्रवेश करतात. इन्स्पेक्टर राणे ह्या बीट वरचे नवीन इन्स्पेक्टर. आधीचे कांबळे. त्यांची बदली झाली गडचिरोलीला. पनिशमेंट पोस्टिंग.
राणे आडदांडपणे खुर्ची ओढून उलट्या बाजूने बसतात. हंप्टी डंप्टी मागे उभे.
“तूच नारे? क्विक गन मुरुगन? मी राणे.” हंप्टी डंप्टीने माना डोलवल्या. “वर्ल्ड फेमस इन्स्पेक्टर. राणे.”
केकू सावरून बसला. साक्षात कायदा समोर बसलेला. इसका पंगा नही लेनेका.
“सर, मी केकू, केशव कुलकर्णी. इकडे प्राथमिक शाळेत मास्तर आहे. पोरांना जबाबदार नागरिक बनवण्याचे काम करतो. त्यांच्यावर दया, क्षमा, शांती तेथे देवांची वसती. असे संस्कार...”
“चूप, संस्कार! आताच मी ठाण्यातून तुझी फाईल वाचून आलो आहे. मला शानपत्ती शिकवतोयस?”
“ह्याला कुनी शानपत्ती शिकवू नका.” मागे हंप्टी डंप्टीने री ओढली.
“बघ मुरुगन. आपुनके इलाकेमे खून खराबा नही मंगता क्या.”
“खून खराबा नही चलेगा.” मागे हंप्टी डंप्टी.
राणे हंप्टी डंप्टींला, “तुम्ही पुढे व्हारे पोरांनो. मी ह्याला फायनल करून येतो.”
हंप्टी डंप्टींला पुढे पिटाळून राणे कुकूच्या कानाशी लागले. “केकू, आता मोssssठ्या साहेबाचा फोन येईल, जरा माझ्या प्रमोशनचं तेव्हढं बोलून घ्या प्लीज. मुलीचं लग्न...”
“समजलं समजलं. होऊन जाईल. मी आहे ना. तुम्ही बिंदास ऱ्हाव्हा.” केकू सगळ्याना मदत करतो.
“देख कल्लू, फोन बोल रहा है. पूछ. कौन मुझे ललकार रहा है”
कल्लूने फोन उचलला. एकदम निखारा हातात आल्यासारखा हात झटकला.
“अरे बापरे. मुरुगन तूच देखरे बाबा.”
केकुने फोन घेतला. “कौन पप्पू बोलऱ्या? अरे बापरे, माफ करा साहेबानु. म्या पैचाननेमे गलती की. बोला ना. काय काम काढलय गरीबाकडे.”
लाईनवर दिल्लीतून ग्रेमॅन होता.
भाग १ समाप्त.
प्रतिक्रिया
29 Sep 2023 - 11:33 am | राजेंद्र मेहेंदळे
वेब सीरीज मटेरियल वाटत आहे. किवा गेलाबाजार अक्षय कुमार/रणवीर सिंग चा एखादा चित्रपट होऊ शकेल. येउद्या पटापट भाग २
29 Sep 2023 - 4:48 pm | भागो
तयार आहे. आता टाकतोच. वाचा. आवडली तर लाईक करा.
29 Sep 2023 - 5:22 pm | रंगीला रतन
शेट टोटल लागली नाय ब्वॉ
29 Sep 2023 - 5:29 pm | भागो
दुसरा भाग वाचाच.