यंदाच्या जून महिन्यापासून एल-निनो या वातावरणीय बदलाचे अनेक परिणाम दिसून येत आहेत. त्यामध्ये जगाच्या काही भागांमध्ये अतिवृष्टी, दुष्काळ किंवा तापमानवाढ होताना दिसते. अद्यापही एल-निनोचा हा प्रभाव टिकून आहे. वातावरणातील या महत्त्वाच्या बदलाचे आपल्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहेत आणि अजूनही होऊ शकतील. याची दखल जागतिक आरोग्य संघटनेने घेतली असून त्यांनी या संदर्भात एक विस्तृत अहवाल प्रकाशित केलेला आहे.
त्यातील काही ठळक मुद्द्यांची नोंद या लेखात घेतो.
वातावरणातील या अनिष्ट परिणामामुळे आरोग्यावर परिणाम का होतात हे प्रथम समजून घेऊ. एल निनोच्या प्रभावामुळे मूलतः आरोग्य-संबंधित खालील गोष्टी घडतात :
1. अन्न तुटवडा
2. मोठ्या लोकसंख्येचे स्थलांतर. यातून अनेक साथींच्या रोगांना आमंत्रण मिळते.
3. खूप वाढलेल्या तापमानामुळे डासांसारखे रोगवाहक वाढतात आणि ते जगभरात सर्वदूर पसरतात
4. हवेचा आरोग्य दर्जाही ढासळतो; आगी लागण्याचे प्रमाण वाढते.
वरील सर्व घटकांमुळे एकंदरीत समाजाचे आरोग्यमान ढासळते आणि आरोग्यसेवाही अपुऱ्या पडू लागतात. यातून खालील आजारांचा सामाजिक प्रादुर्भाव बऱ्यापैकी वाढू शकतो :
1. कुपोषण
2. कॉलरा आणि इतर हगवणीचे आजार
3. टायफॉड, शिगेलोसिस, हिपटायटिस-A& E
4. मलेरिया : या आजाराचे प्रत्यक्ष जंतू आणि वाहक डास या दोघांमध्येही बेसुमार वाढ होऊ शकते. जगात जिथे हा आजार पाचवीलाच पुजलेला असतो तिथे तर त्यात वाढ होतेच, परंतु त्याचबरोबर जगाच्या ज्या भागांमध्ये एरवी हा आजार नसतो, तिथेही तो उद्भवतो.
5. Arboviral आजार : यामध्ये डेंग्यू आणि चिकनगुनियाचा प्रामुख्याने समावेश आहे. सध्याच्या घडीला डेंग्यू 129 देशांमध्ये फोफावलेला आहे; समुद्रसपाटीपासून खूप उंचीवर असलेल्या प्रदेशांमध्ये त्याचा धोका अधिक राहतो.
6. Hantaviral आजार : हे आजार उंदरांच्या मार्फत पसरतात. उंदरांच्या थेट चावण्यातून किंवा त्यांच्या लघवी किंवा विष्ठेशी मानवी संपर्क आल्यास हे आजार होतात. अतिवृष्टीच्या प्रदेशांमध्ये हा धोका वाढतो.
7. गोवर आणि मेनिंजायटीस. संबंधित लसीकरणात येणाऱ्या अडथळ्यांमुळे देखील या आजारांची वाढ होते.
8. विविध प्रकारच्या अन्नातून होणाऱ्या विषबाधा देखील वाढतात. यामध्ये समुद्री अन्नाचाही समावेश आहे.
9. श्वसनाचे आजार : हे विशेषतः तान्ही मुले आणि वृद्धांमध्ये वाढण्याची शक्यता राहते.
10. ढासळत्या राहणीमानामुळे मानसिक आजार आणि लैंगिक अत्याचारांमध्ये पण वाढ होऊ शकते.
वरील संभाव्य धोके लक्षात घेता जगातील सर्वच देशांनी आपापल्या आरोग्य सेवा आणि यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज आहे.
एल-निनो ही निसर्गात नित्यनेमाने घडणारी घटना आहे. त्याचा बाऊ करायची गरज नाही आणि तो लेखाचा उद्देशही नाही. परंतु या संदर्भात नागरिकांची आरोग्य जागरूकता आणि दक्षता असावी या उद्देशाने जागतिक आरोग्य संघटनेने विस्तृत अहवाल प्रकाशित केलेला आहे. त्याची दखल घेणे हा या लेखाचा उद्देश आहे.
**************************************************************************************
चित्र जालावरून साभार !
प्रतिक्रिया
26 Sep 2023 - 7:20 pm | अहिरावण
चांगली माहिती.
धन्यवाद
28 Sep 2023 - 8:31 pm | सुधीर कांदळकर
छान आणि माहितीपूर्ण लेख आवडला. धन्यवाद.
28 Sep 2023 - 9:21 pm | कुमार१
धन्यवाद !
29 Sep 2023 - 12:30 pm | राजेंद्र मेहेंदळे
पण कुमार सरांचा व्यासंग लक्षात घेता लेखाची लांबी कमी वाटली. सुरुवातीचा वरण भात झाला आणि एक्दम जेवणच संपले :)
एल निनोशी संबंधित अजुन काही पैलु वाचायला मिळतील अशी अपेक्षा.
29 Sep 2023 - 12:37 pm | टर्मीनेटर
+१
ह्याविषयी सविस्तर माहिती वाचायला आवडेल...
29 Sep 2023 - 1:12 pm | कुमार१
लेखाच्या लांबीविषयीचा मुद्दा मान्य आहे. तो मूळ अहवाल तब्बल 39 पानी आहे.
फार सविस्तर लिहिले तर ते रुक्ष आणि कंटाळवाणे वाटेल असा माझा समज होता...
:)
16 Nov 2023 - 2:42 pm | कुमार१
केरळ व कर्नाटक पाठोपाठ आता Zika विषाणू पुण्यात दाखल.
आरोग्य परिस्थिती नियंत्रणात आहे.
डास -नियंत्रण महत्त्वाचे.
गरोदर स्त्रियांची विशेष काळजी घेण्याची गरज.