दुर्योधनादिंना युद्धापूर्वीच श्रीकृष्णाने का संपवले नाही ? आणि अन्य काही प्रश्न

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in काथ्याकूट
28 Aug 2023 - 4:40 am
गाभा: 

महाभारत युद्धात अठरा अक्षौहिणी (म्हणजे नेमके किती लोक?) मरण पावले, हजारो जखमी झाले, त्या योद्ध्यांची लाखो बालके अनाथ झाली, लाखो स्त्रियांना वैधव्य प्राप्त झाले, लाखो वृद्ध आश्रयहीन झाले, अगणित घोडे, हत्ती वगैरे नष्ट झाले.... युद्धानंतर रणभूमिवरील एवढ्या शवांमुळे दीर्घकाळ पर्यंत रोगराई पसरून त्याची बाधा अनेकांना झाली असेल. सरतेशेवटी पांडव जिंकले खरे पण त्यांची पुढली पिढी पण नष्ट झाली.
-- हे सगळे विचारात घेता काही प्रश्न पडतातः

१. एवढे सगळे झाले त्यातून पांडवांना नेमके काय मिळाले ?
२. समजा, 'सत्याचा' किंवा 'धर्माचा' विजय झाला असे म्हटले तर तो विजय किती काळ टिकला ? त्यामुळे पुढील पिढ्यान-पिढ्या 'सद्गुणी' निपजल्या का ?
३. हा असा महाविनाश होणार याचा श्रीकृष्णासारख्या दैवी विभूतीला अंदाज आला नव्हता का ? तसेच त्याकाळी भारतात अत्यंत प्रगत अशी अस्त्रविद्या वगैरे होती असे सांगितले जाते, ते सगळे ज्ञान आणि ते ठाऊक असणारे ज्ञानी युद्धामुळे समूळ नष्ट होण्याचा धोका श्रीकृष्णाला ओळखता आला नव्हता का ?
४. कुरुवंशाच्या दोन शाखांमधील दुर्योधन आणि युधिष्ठीर या दोघांपैकी हस्तिनापुराच्या लहानशा राज्याचे स्वामित्व कुणाला मिळाले पाहिजे असा कौटुंबिक तिढा सोडवण्यापायी अखिल भारतातील लाखो-करोडो लोकांना - ज्यांना खरेतर त्या तिढ्याशी काहीच घेणे-देणे नसणार- युद्धात का सहभागी व्हावे लागले ? त्यांचा असा कोणता 'नाईलाज' होता?
५. युद्धाच्या अगदी शेवटी भीम-दुर्योधनाचे द्वंद्व - गदायुद्ध झाले तसे ते युद्धापूर्वीच करून प्रकरणाचा सोक्षमोक्ष नसता का लावता आला ?
६. 'कृष्ण-शिष्टाई' च्या प्रसंगी दुर्योधनाने श्रीकृष्णाला जेंव्हा बंदी बनवण्याचा घाट घातला, त्यावेळी दुर्योधन - दुश:सनादि जे काही पाच-सात मुख्य 'खलनायक' तिथे असतील, त्यांचा श्रीकृष्णाने सुदर्शनचक्राने तात्काळ शिरच्छेद केला असता, तर पुढला सगळाच अनर्थ टळला असता, परंतु त्याने तसे का केले नाही ?
७. महाभारत युद्धानंतच्या काळात विविध राज्ये, प्रदेश, आणि तिथले लोक यांचे जीवन कसे होते, जनजीवनावर या युद्धाचे काय काय परिणाम झाले, याविषयी महाभारतात काही उल्लेख आहेत का ?

---- याबद्दल जाणकार, काथ्याकूटप्रवीण मिपाकरांचे काय मत आहे ?

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

30 Aug 2023 - 6:02 pm | प्रचेतस

हा काळ मी वर लिहिलेल्या संशोधकांनी काढलेल्या काळाशी मिळताजुळता आहे म्हणजे इसपू ३२५०. शेदीडशे वर्षांचा फरक राहणे साहजिक आहे. शिवाय काळाचा अजून स्पष्टपणे उल्लेख ऐहोळे प्रशस्तीत येतो जो शिलालेख आजही ऐहोळेतील मेगुती जैन मंदिरावर पाहता येतो.

त्रिशंत्सु त्रिसहस्रेषु भारतादाहवादितः।
सप्ताब्दशतयुक्तेषु गतेष्वब्देषु पञ्चसु॥

पञ्चाशत्सु कलौ काले षट्सु पञ्चशतासु च।
समासु समतीतासु शकानामपि भूभुजाम॥

तस्याम्बुधित्रयनिवारितशासनस्य सत्याश्रयस्य परमाप्तवता प्रसादम् शैलं जिनेन्द्र भवनं।
भवनम्महिम्नां निर्मापितं मतिमता रविकीर्त्तिनेदम्॥

भारतीय युद्धाला ३७५० वर्षे पूर्ण झाल्यानंतर, कलियुगातील शकांच्या राजवटीला ५५६ वर्षे झाल्यानंतर तीन समुद्रांवर ज्याचे वर्चस्व आहे त्या सत्याश्रयाच्या (चालुक्य पुलकेशी दुसरा) कृपेने हे जिनांचे शैलमंदिर उभारले गेले, ह्या प्रशस्तीचा कर्ता स्वतः रविकिर्ती होता.

उपरोक्त शिलालेखातला भारतीय युद्धाचा काळही इसवीपू ३२५० ह्या काळाशी मिळताजुळता आहे.

अर्थात ह्यावरून भारतीय युद्ध निर्विवादपणे इसवीपू ३२५० मधेच झाले हे सिद्ध करता येत नाही पण ह्या तसेच इतरही अनेक तर्काधिष्ठित पुराव्यांवरून युद्धाचा काळ साधारणपणे तो असावा असे मानण्यास पुरेसा वाव आहे.

राघव's picture

30 Aug 2023 - 6:15 pm | राघव

_/\_ अभ्यासाला नमन.

अहिरावण's picture

30 Aug 2023 - 7:28 pm | अहिरावण

सहमत आहे.
अतिशय अभ्यासु व्यक्तिमत्व

इसवीपू ३२५० हा युद्धाचा काळ नसावा असे archaeologist मानतात कारण हा काळ 'धातू'युग होतं,जर महाभारतात एवढं प्रगत शस्त्रे वापरायचे तर archeology बरोबर हा मेळ बसत नाही.(पूर्णपणे ऐकीव ,जालीय माहिती आहे सत्यता माहिती नाही.)

ऋग्वेदात तांबे, कांस्य, सोने, चांदी ह्या धातूंचे उल्लेख आहेत मात्र लोखंडाचा नाही कारण लोहयुग इसवी पूर्व १५०० च्या आसपास सुरू झालं असावं असं मानतात मात्र महाभारतात उपरोल्लेखित धातूंसोबतच लोहमय शस्त्रांचे विपुल उल्लेख आहेत मात्र यामुळे वरकरणी पाहता भारतीय युद्धाचा काळ अलीकडे सरकवल्यासारखा प्रत्यक्षात वाटतो, पण इतर पुरावे जसे की काही अत्यंत प्राचीन ग्रंथातले महाभारताचे उल्लेख, ऋग्वेदातलं देवापीचं सूक्त, कृत्तिका नक्षत्राचे स्थान ह्या गोष्टीला छेद देतात. भारतातील लोखंडाचे सर्वात प्राचीन अवशेष इसपू ११०० मधले आहेत, चुभुदेघे. तसेच गुप्तकालीन लोहस्तंभ जो दीड हजार वर्षे न झिजता राहिलेला आजही दिसतो तो प्रगत लोहसंस्कृतीकडेच निर्देश करतो.
अन्वयार्थ इतकाच की ११०० ख्रिस्तपूर्वच्या आधी लोखंड नव्हतंच असं निर्विवादपणे सांगता येत नाही किंवा भारतीय युध्दातली जी लोहमय शस्त्रांची उदाहरणे आहेत ती सौतीचीही असू शकतील असेही म्हणता येते. बाकी अस्त्रांबद्दल म्हणाल तर ती उघडपणे अतिशयोक्ती आहे असे म्हणता येईल.

Bhakti's picture

30 Aug 2023 - 10:07 pm | Bhakti

+१११

ताम्रयुग, लोहयुग वगैरे पाश्चात्त्य विद्वानांनी मांडलेले सिद्धांत सर्वोपरी बरोबरच असतील, असे कश्यावरून ? कदाचित खुद्द महाभातावरील संशोधनातून त्यात बदल करणे गरजेचे ठरू शकते.
दुसरा एक रोचक मुद्दा आहे. बायबलात अमूक एका काळी सर्वशक्तिमान गॉडने 'आदम' ला निर्मिले असे लिहिलेले असल्याने जगात कुठेही त्यापूर्वीचे काही साहित्य, उत्खननातील वस्तु वगैरे सापडले, तर त्यांचा काळ 'आदम' च्या निर्मितीनंतरचाच असल्याचे सिद्ध करण्यासाठी वाटेल त्या लांड्यालबाड्या, सिद्धांत प्रस्थापित करणे वगैरे पाश्चात्य विद्वान करत असतात, असेही मत प्रचलित आहे. तात्पर्य, पाश्चात्यांच्या सर्वच सिद्धांतांवर डोळे झाकून विश्वास ठेवण्याची गरज नाही. आपण आपले डोके चालवून स्वतंत्र संशोधन करत रहावे.
बाकी पुरातत्वीय उत्खनने आणि त्यांचे निष्कर्ष हा एक वेगळाच मामला आहे. त्यातही खर्‍या-खोट्याची भेसळ असते. उत्खनाच्याही अनंत मर्यादा आहेत.

१९२०च्या आसपास मध्ये सिंधू संस्कृतीचा शोध लागण्यापूर्वी इजिप्त संस्कृती प्राचीन मानली जायची,नंतर भारत उपखंडातील अभ्यास भरभराटीला आला. पुरातत्वीय खातं fact and evidence यावर आहे ज्यात प्रश्नांची उत्तरे पटतात.

कंजूस's picture

31 Aug 2023 - 10:04 am | कंजूस

उत्तरे पटतात.

पण सापडत काही नाही.

कंजूस's picture

31 Aug 2023 - 5:25 am | कंजूस

जीवसृष्टी कशी झाली ..

याची उत्तरे प्रत्येक संस्कृतीत स्थानिक पुढारी, गुरू, medicine man इत्यादींना द्यावीच लागली. त्याची उकल न जमल्याने काही पौराणिक कथा निर्माण करण्यात आल्या. आपल्याकडे विष्णूने ब्रह्मा निर्माण केला, त्याने सप्तर्षी (बेंबी नसलेले) निर्माण केले. मग ते एकटे पडू लागले म्हणून आणि मानव प्रजा (स्तुती करणारे कुणी हवेत ना?) स्त्रिया आणल्या. मग त्यातून राजे महाराजे,पासून गरीब किंवा अती गरीब (BPL) झाले वगैरे.

अमूक एका काळी सर्वशक्तिमान गॉडने 'आदम' ला निर्मिले ....... होय. एवढंच काय 'create' शब्दाला त्यांचा विरोध असतो. अगदी 'created robot ' असं म्हणायचं नाही. अंहं.

'आदम' ख्रिस्तजन्माच्या ३,९७४ वर्षे, ६ महिने, १० दिवस आधी जन्मला

.

( King James version of the Bible printed by Philadelphia printer Matthew Carey in 1801. The Chronology given largely follows that of Rev. James Ussher’s Annals of the World, first published in 1658).
बायबलातील 'क्रोनॉलॉजी' प्रमाणे 'आदम' १५० वर्षांचा असताना त्याचा तिसरा मुलगा Seth जन्मला, तो १०५ वर्षाचा असताना त्याचा मुलगा Enos जन्मला, असे करत करत 'येशू ख्रिस्ता'च्या जन्मापर्यंत ३,९७४ वर्षे, ६ महिने, १० दिवस लोटले असे लिहीले आहे.
-- म्हणजेच अखिल विश्वात ज्या ज्या काही मानवी घटना घडल्या, वस्तु, वास्तू, शहरे, ग्रंथ वगैरे निर्माण केले गेले, त्यातले काहीही 'आदम' च्या जन्मापूर्वीचे असणे शक्यच नाही.
आता बोला. म्हणे महाभारत पाच हजार वर्षांपूर्वी घडले. झूठे कहींके.

अहिरावण's picture

31 Aug 2023 - 1:49 pm | अहिरावण

सहमत आहे.

आदमच्या आधी काही होते आणि ते सुद्धा भारतीय उपखंडात होते असे सांगणे हा ब्राह्मणी कावा आहे.

नरकात, नाही नाही दोजखमधे जावोत सगळे कावेबाज !

गेल्या काही शतकातील इतिहास बघता लक्षात येते, की सगळीकडल्याच लहानमोठ्या 'राजे' लोकांचा किंवा सरदार, जमीनदार, चौधरी वगैरे सामर्थ्यवान लोकांचा संपत्ती मिळवण्याचा मुख्य मार्ग म्हणजे सैन्य घेऊन कुणावरतरी चालून जाणे आणि मारहाण, लुटालूट, कत्तल, जाळपोळ करत हाती लागलेली संपत्ती लुटणे (आणि बरेचदा स्त्री-पुरुषांना पण बंदी बनवून आणून गुलाम वा दास-दासी बनवणे). खुद्द महाराजांना स्वराज्यासाठी सुरतेच्या लुटीची मोहीम राबवावी लागली होती, तर इतरांची काय कथा. अफगाणीस्तान वगैरेतून येणारे शांतीदूत, टोपीकर, वलांदेज, फरासीस यांनी तरी आणखी काय वेगळे केले ?
-- काही वर्षांपूर्वी माळव्यातील एका जमीनदारच्या हवेलीत जाऊन रहाण्याचा योग आला होता. आम्ही चार-पाच चित्रकार त्यांचे पाहुणे म्हणून गेलो होतो. तेंव्हा मी अमूक तमूक कुंवर सिंह नावाच्या पिळदार मिशावाल्या मालकाला विचारले की ही हवेली तुमच्या पूर्वजांनी केंव्हा बांधली, आणि तुम्ही राजपूत, मग इकडे माळव्यातले जहागीरदार कसे झालात ? तर त्याने सांगितले - " कुछ नही, हमारे पुरखे राजस्थान से फौज लेकर आये, यहां के जमीनदारको मारकाट करके सबको भगा दिया, और हवेली पर कब्जा कर लिया"
-- इंदौरच्या जमीनदार 'मांडलिक' घराण्याच्या पूर्वजांना सुद्धा मेजवानीच्या मिषाने आमंत्रित करून, बायका मुलांसहित त्या सगळ्यांची कत्तल करून आताचे 'हत्यारा खो' म्हणून नाव असलेल्या दरीत फेकून देण्यात आले होते. त्यातली एक गर्भवती स्त्री जिवंत राहिली होती, तिला भिल्ल लोकांनी वाचवून राजस्थानातील नातेवाईकांकडे पोचवण्याची सोय केली. जन्माला आलेले मूल मोठे झाल्यावर त्याने ससैन्य येऊन पुन्हा इंदौरचा ताबा मिळवला वगैरे सगळे त्यांनी पुस्तकात प्रसिद्ध केलेले आहे.
-- ब्रिटिश, पोर्तुगीज, अरब आणि अन्य गौरवर्ण लोकांनी आफ्रिकेतून हजारो लाखो 'हबशी' ( म्हणजे 'हबसाण' Abyssinia मधले लोक) पकडून आणून अमेरिका, ब्राझील वगैरेंमधे कापूस, तांदूळ वगैरेंच्या हजारो एकरांच्या 'प्लांटेशन' इस्टेटींवर कामासाठी गुलाम म्हणून विकले होते (अलिकडेच अमेरिकेतील पन्नास हजार एकरांच्या अश्या एका इस्टेटीवर उभारलेले संग्रहालय बघण्याचा योग आला, त्यातून बरीच माहिती कळली, उदाहरणार्थ कोणकोणत्या साली एकूण किती, कोणते गुलाम किती किंमतीत खरेदी केले गेले, त्यांना कोणकोणत्या इस्टेटींवर पाठवले गेले वगैरे). बंदी बनवून आणलेल्या गुलामांचे वर्गिकरण करून विकायचे. म्हणजे लहान मुले, अशक्त, वृद्ध यांची अगदी कमी किंमत, धडधाकट पुरुषांची जास्त, 'कसबी' लोकांची आणखी जास्त, आणि तरूण, सुदृढ, संतती निर्माण करू शकणार्या स्त्रियांची पण पुष्कळ जास्त किंमत ठेवली जायची. अर्थात त्या किंमतीतले त्या त्या व्यक्तीला काहीच मिळायचे नाही. 'रेड इंडियन' लोकांना पण गुलाम बनवण्याचा यत्न केला गेला, पण तो फसला.
-- इस्टेटींवर शेतीच्या कामाखेरीज गुलामांची भरपूर 'पैदास' होईल, याची पण काळजी घेतली जायची, कारण नवीन जन्मणारी प्रजा पुन्हा गुलाम म्हणुन विकली जायची. इंग्रजी बोलू शकणार्या हबशांची जास्त किंमत मिळायची म्हणून त्या मुलांना इंग्रजी शिकवायला इस्टेटीत लहानसे लाकडी चर्च उभारून तिथले 'फादर' वाट चुकलेल्या मेंढरांना 'खरा मार्ग' दाखवण्याच्या कामखेरीज इंग्रजी शिकवण्याचे पण काम करायचे.
-- अमेरिकेत 'चातुर्वर्ण' ऐवजी काळे आणि गोरे असा 'द्विवर्ण' अनेक शतके अस्तित्वात होता. औद्योगिक क्रांतीपूर्वीच्या काळात 'मनुष्यबळ' मिळवणे हे मुख्य असल्याने येनकेनप्रकारे 'माणसं' मिळवल्यावर त्यांचा एक वेगळा 'वर्ण' निर्माण होणे हे त्या काळी एका अर्थी अटळच असावे.
-- तर महाभारतकाळी 'दास' 'दासी' 'दासिपुत्र' असे अनेक उल्लेख येतात. ते लोक कुठून यायचे? कसे मिळवले जायचे ? ते विकले जात असत का ? जंगलातून पकडून आणून विकायचे किंवा गावांमधून पकडून आणायचे/विकायचे असे उल्लेख महाभारतात आहेत का ?

उन्मेष दिक्षीत's picture

3 Sep 2023 - 4:38 am | उन्मेष दिक्षीत

एक जोक आठवला

रंगीला मधे एक सीन आहे, हिरॉईन ( शेफाली छाया ) ला सिताफल मिल्क शेक पाहीजे असतो आणि ती सिन ऐकून घ्यायच्या ऐवजी प्रोडयुसर ला तसं सांगते. प्रोडयुसर असिस्टंट ला सांगतो,
असिस्टंट म्हणतो अभी सिजन नही है, नोवेंबर मे मिलेगा !
तर वैतागलेला प्रोड्युसर म्हणतो, तो नोवेंबर मे जा के लेके आ

असाच प्रश्न विचारलात.

चित्रगुप्त's picture

3 Sep 2023 - 5:39 am | चित्रगुप्त

तुम्ही लिहीलेला सीताफल मिल्क शेकचा जोक, आणि मी विचारलेला प्रश्न यात काय साम्य आहे, हे विचार करकरूनही अज्याबात समजलेले नाही, आमचा तेवढा वकूबच नाही असे समजून कृपया खुलासा करावा.

उन्मेष दिक्षीत's picture

3 Sep 2023 - 12:31 pm | उन्मेष दिक्षीत

त्याकाळी दास दासी कुठुन आणायचे हा प्रश्न खुप ईररेलेवंट वाटला, म्हणजे आता त्या जमान्यात जाउन बघायला पाहीजे असं म्हणावसं वाटलं. माफ करा काँटेक्स्ट सम़जला नसेल तर, इग्नोर करा.

पाच हजार वर्षांपूर्वी लोक घोड्यावरून फिरायचे की म्हशीवरून, कपडे कसे घालायचे, कश्या घरांमधे रहायचे, काय खायचे, अमूक तमूक त्यांना कुठून मिळायचे असे शेकडो प्रश्न विचारता येतील आणि हे सगळे हल्लीच्या मनुष्याने मुळात कशासाठी जाणून घ्यायचे, हा मुद्दा एका अर्थी बरोबरही आहे. आपल्या पणजोबांचे नाव सुद्धा माहीत नसते, तर मग येवढ्या जुन्या गोष्टी का उकरून काढून त्यावर काथ्याकूट करत बसायचा, असे ज्यांना वाटत असेल ते वाचक या धाग्याकडे फिरकले पण नसतील. पण असते बुवा एकेकाला खाज.
-- मग असे लोक जुन्या ग्रंथांचा धांडोळा घेतात, कुठेतरी खोदत बसून उत्खननातून मिळालेल्या वस्तूंची संग्रहालयं उभारतात, प्राचीन दुर्मिळ वस्तू हौसेने मोठ्या किंमतीत विकत घेऊन त्यांचे जतन करतात, जुन्या बंदिशी, सिंफन्या शोधून त्या गातात-वाजवतात, 'प्राचीन भारतातील धातूची नाणी आणि सिथियन, रोमन, ग्रीक आणि इजिप्शियन नाण्यांचा तौलनिक अभ्यास' किंवा 'भाऊसाहेबांच्या बखरीमधील उद्गारवाचक चिन्हे - एक अन्वयार्थ' असले संशोधनपर प्रबंध लिहून पीएचड्या मिळवून प्राध्यापक बनतात, आणि काय काय उद्योग असे लोक करत असतात, त्यापैकीच एक समजा, आणि काही खोदकाम करून त्याचे उत्तर मिळत असेल तर जरूर लिहा.

बाकी तुमचा मिल्कशेकवाला जोक आणि माझा दास-दासींबद्दलचा प्रश्न यांचा संबंध अजून नाही कळला, तेही लिहा.

उन्मेष दिक्षीत's picture

3 Sep 2023 - 1:32 pm | उन्मेष दिक्षीत

चा शेवटचा पार्ट महत्वाचा आहे. निरर्थकपणा दर्शवतो. जसं मी म्हटलं तसं, आता त्या जमान्यात जाऊनच बघायला हवे.
माझी चुक झाली ते लिहून, विषय सोडून द्या तुम्हाल रिलेट झालं नसेल तर.

उन्मेष दिक्षीत's picture

3 Sep 2023 - 1:39 pm | उन्मेष दिक्षीत

गोष्टी ( हा जोक ) या विचार करण्यासाठी नसतात, विचारातून बाहेर काढण्यासाठी असतात.

डन.

इस्टेटींवर शेतीच्या कामाखेरीज गुलामांची भरपूर 'पैदास' होईल, याची पण काळजी घेतली जायची, कारण नवीन जन्मणारी प्रजा पुन्हा गुलाम म्हणुन विकली जायची.

-- कणखर हबशी गुलामांची अशी 'पैदास' करण्यासाठी Pata Seca (१८२८-१९५८) नामक एका गुलामाची नियुक्ती केली गेली होती. तो सात फुटाहून जास्त उंचीचा, दणगट पुरुष असून अज्ञाधारक आणि बुद्धीमान होता. त्याला दररोज शंभराहून जास्त हबशी स्त्रियांशी शरीरसंबंध करावा लागायचा. परिणामी दोनशेहून जास्त मुले त्याच्यापासून जन्माला आली होती. तो १३० वर्षे जगला.
-- धृतराष्ट्राच्या शंभर कौरव मुलांबद्दल आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. तसेच म्हाभारतात भीष्म आणि इतर खूप जणांचे वय शंभराहून जास्त होते, तेही शक्य आहे.

Trump's picture

8 Sep 2023 - 11:46 am | Trump

त्याला दररोज शंभराहून जास्त हबशी स्त्रियांशी शरीरसंबंध करावा लागायचा.

ते शक्य आहे का?

मला पण अशीच शंका वाटली होती. याविषयीजे जे विडियो मी बघितले, त्यात असेच सांगितले आहे. त्याची उंची, शक्ती, एकशेतीस वर्षे जगणे हे सगळेच आपल्याला अतर्क्य वाटते पण सत्य आहे, तसे कदाचित तेही असेल. त्याचे गोरे मालक काही औषधे वगैरे पण देत असतील, कुणास ठाऊक.
जालावर शोध घेता खालील मोठा लेख मिळाला: (मी अद्याप वाचला नाही)
https://blackbraziltoday.com/purchased-by-a-slave-master-in-sao-carlos/

अभिजीत's picture

3 Sep 2023 - 1:41 am | अभिजीत

१. एवढे सगळे झाले त्यातून पांडवांना नेमके काय मिळाले ?
अधर्माचा नाश होवून धर्माचे राज्य स्थापित झाले.

२. समजा, 'सत्याचा' किंवा 'धर्माचा' विजय झाला असे म्हटले तर तो विजय किती काळ टिकला ? त्यामुळे पुढील पिढ्यान-पिढ्या 'सद्गुणी' निपजल्या का ?
धर्माचा विजय झाला आणि सत्याची कास धरली असता धर्माचा विजय होतोच, हेही सिद्ध झाले. बाकी लौकिक अर्थाने महाभारतात काय झाले हे बऱ्याच जणांनी लिहिलंय म्हणून ते परत लिहीत नाही.

विजय किती काळ टिकला किंवा पुढील पिढ्यान-पिढ्या 'सद्गुणी' निपजल्या का या प्रश्नांचा रोख ‘and they lived happily ever after’ प्रकारचा आहे. आधुनिक काळात आपण इतिहासाचा विचार करताना मानवी प्रवास एकरेषीय (linear) म्हणजे प्रगतीकडे (progress) किंवा अधोगतीकडे वा सर्वनाशाकडे (apocalyptic) होणारा असा केला जातो. ‘आपण सगळे समाज म्हणून प्रगतीच्या दिशेने किंवा अधोगतीच्या दिशेने जातो आहोत’, असा इतिहासाकडे पाहण्याची पद्धत आता रूढ होवून बसली आहे. यांत प्रगती अथवा अधोगती ही सामुदायिक असते, शेवट किंवा अंत अपेक्षित असतो म्हणून काळाचा विचार एकरेषीय होतो. परंतु हिंदू विचारानुसार काळ एकरेषीय नाही. जन्माला आलेला प्रत्येक जीव (मनुष्यासहित) आपापल्या स्वतंत्र गतीत आहे आणि ही गती त्या त्या जीवाच्या संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण या कर्मावर अवलंबून असते. (‘दोन ओंडक्यांची होते, सागरात भेट’...). पुढे वैयक्तिक गतीमुळे जन्म-वृद्धी-मृत्यू हे चक्र सुरू राहते. म्हणजे काळ एकरेषीय नसून चक्रिय (circular) असतो. या पार्श्वभूमीवर ‘पुढील पिढ्यान-पिढ्या 'सद्गुणी' निपजल्या का?’ या प्रश्नाचा विचार केला तर असं लक्षात येतं की हा प्रश्नच गैरलागू आहे. पुढील पिढ्या कशा निपाजणार तर त्यांच्या कर्मानुसार हे उत्तर येते. त्यातही कर्मानुसार म्हणजे धर्म-अर्थ-काम-मोक्ष या पुरुषार्थाचा प्रत्येकजण कसा अंगीकार करेल त्यावर हे अवलंबून असेल.

३. हा असा महाविनाश होणार याचा श्रीकृष्णासारख्या दैवी विभूतीला अंदाज आला नव्हता का ? तसेच त्याकाळी भारतात अत्यंत प्रगत अशी अस्त्रविद्या वगैरे होती असे सांगितले जाते, ते सगळे ज्ञान आणि ते ठाऊक असणारे ज्ञानी युद्धामुळे समूळ नष्ट होण्याचा धोका श्रीकृष्णाला ओळखता आला नव्हता का ?
‘महाविनाश होणार याचा श्रीकृष्णासारख्या दैवी विभूतीला अंदाज आला नव्हता का’ – श्रीकृष्ण तर साक्षात सगुण ईश्वर! त्याचे राहूद्या, पण महात्मा विदुर, गांधारी अगदीच गेला बाजार धृतराष्ट्र आणि कुरूदरबारातले विविध रथी-महारथी यांना सुद्धा महाविनाश होणार याचा अंदाज होताच. प्रत्येकाने वेळोवेळी दुर्योधनाला याबद्दल सांगितले होते आणि त्याने त्याच्या अधर्मी वृत्तीत बदल करावा यासाठी दुर्योधनाची प्रसंगी कानउघाडणी, प्रसंगी समज दिली होती.

‘युद्धामुळे समूळ नष्ट होण्याचा धोका’ – युद्ध सुरू होण्यापूर्वी कृष्णाने कौरव पक्षाशी चर्चा करुन हे युद्ध टाळण्यासाठी प्रयत्न केले. सर्व चर्चा, शांतिपूर्ण प्रस्ताव आणि कृष्णशिष्टाई अयशस्वी झाल्यावर युद्ध होणे अपरिहार्य होते. कृष्णाने, विदुराने आणि शेवटी धृतराष्ट्रानेही दुर्योधनाला समजवायचा प्रयत्न केला पण सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले. पांडवांनी शेवटी फक्त पांव गावं मागितली होती. एकेकाळी रानावनात असलेल्या इंद्रप्रस्थचं पांडवांनी जे नंदनवन केलं होतं ते दुर्योधन विसरला नव्हता. त्याला पांडवांच्या कर्तूत्वाचा पूर्ण अंदाज होता म्हणूनच पाच गावं द्यायला दुर्योधन तयार नव्हता. पांडव त्यांच्या अस्तित्वासाठी आणि न्याय्य मागणीसाठी लढायला तयार झाले होते. हा मोठा कथाभाग बराचसा माहीत असूनही ‘महाविनाश होणार’, ‘समूळ नष्ट होणार’ हा धोका ओळखता आला नव्हता का हा प्रश्न अप्रस्तुत आहे.

महाभारताच्या आदिपर्वात अंशांवतरण उपपर्वात पृथ्वीमातेची कथा आहे. त्यात महाभारत युद्ध होवून संपूर्ण संहार होणार व कमानवी जीवन चक्र पुन्हा सुरू होणार याचं वर्णन आहे. भगवान परशुरामांनी एकवीस वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय केल्यानंतरच्या काळात अनेक क्षत्रिय स्त्रिया पुण्यशील ब्राहमणांशी वंशसंरक्षणासाठी ऋतुकाली संग झाल्या. यथावकाश त्यांच्या संततीने धर्माचरण करून पराक्रमी क्षत्रियवर्ण वृद्धिंगत केला. धर्मांचारणाने वागणाऱ्या क्षत्रिय वर्णाने इतर वर्णांना सुयोग्य संरक्षण दिल्याने पृथ्वीवर संपन्नतेचे आणि समृदधी चे दिवस आले. या भरभराटीमुळे एकंदर प्राणी आणि मनुष्य यांची संख्या वाढून पृथ्वीला तो भार सहन होईना. हळूहळू संततीसंपत्तीचा उन्माद होवून पराक्रमी क्षत्रिय वर्णात दानव राजे जन्माला आले. त्यांनी अन्याय आणि अधर्माने वागून सर्वांना भंडावून सोडले. अशा प्रकारे अधर्माचा शिरकाव झाला. आता हा सहन न होणारा भार कसा कमी होणार या विवंचनेत पृथ्वी माता ब्रह्मदेवांकडे गेली. त्यांनी तिला अभय दिले आणि त्यांनी सर्व देवांना ‘भूमीचा बहार हरण करण्यासाठी आणि भारमूलक राक्षसांचा संहार करण्यासाठी तुम्ही पृथक अंश घेवून पृथ्वीवर अवतीर्ण व्हा’, असा आदेश दिला. भगवान विष्णूंनी याला ‘तथास्तु’ म्हणत आशीर्वाद दिला. यातून भारती युद्धाची पार्श्वभूमी समजते. ‘धर्माच्या आचारणामुळे मानवी जीवन भरभराटीला येते. परंतु मोहाधारीत कर्म धर्माच्या सूक्ष्मतेची समज कमी करते आणि अधर्माचा प्रसार होतो, त्यातून अन्याय वाढतो व अशा अधर्माचा नाश करण्यासाठी भगवान पुन:पुन्हा अवतार घेतात व समूळ नाश हा मार्ग अपरिहार्य बनतो. अशा महाविनाशातून पुन्हा धर्माची स्थापना होते व हे चक्र सुरू राहते’, हे सूत्र महाभारताची एक शिकवण आहे. युद्ध कसं अपरिहार्य होतं याचं उत्तर या चक्रिय काळगणनेत मिळते.

४. कुरुवंशाच्या दोन शाखांमधील दुर्योधन आणि युधिष्ठीर या दोघांपैकी हस्तिनापुराच्या लहानशा राज्याचे स्वामित्व कुणाला मिळाले पाहिजे असा कौटुंबिक तिढा सोडवण्यापायी अखिल भारतातील लाखो-करोडो लोकांना - ज्यांना खरेतर त्या तिढ्याशी काहीच घेणे-देणे नसणार- युद्धात का सहभागी व्हावे लागले ? त्यांचा असा कोणता 'नाईलाज' होता?
आपण ‘लहानशा राज्याचे स्वामित्व’ आणि ‘कौटुंबिक तिढा’ म्हणत भारती युद्धाचे क्षुल्लकीकरण (trivialization) केलंय. तसेच ‘अखिल भारतातील लाखो-करोडो लोकांना’ म्हणून महाभारतातील विविध राजे व त्यांची राज्ये वगैरे सारा पट नाहीसा केलाय. याप्रकारचा विचार म्हणजे भारती युद्धाला ‘ग्लोबल सिटीजन्स’, ‘ओपन बोर्डर्स’ टाईप आधुनिक परिमाण लावून विचार करणे. तुम्हाला कदाचित हा ‘बाकी सगळं ठीक आहे पण संहार कशाला केला?’ हाच परिणाम साधायचा आहे असं दिसतंय. मूळ महाभारत वाचलं तर लक्षात येतं की पांडवांच्या बाजूने उभे असलेले योद्धे हे अन्यायाविरुद्ध लढायला सिद्ध झाले होते आणि दुर्योधनाच्या बाजूने जे उभे होते ते, एकतर पांडव द्वेष्टे होते किंवा कृष्णद्वेष्टे. बलराम आणि रुकमी तटस्थ राहिले. आज आपण जसे multi-polar जग बघतो तसंच काहीसं महाभारताचं तत्कालीन चित्र होतं.

४. युद्धाच्या अगदी शेवटी भीम-दुर्योधनाचे द्वंद्व - गदायुद्ध झाले तसे ते युद्धापूर्वीच करून प्रकरणाचा सोक्षमोक्ष नसता का लावता आला ?
‘भीम-दुर्योधनाचे द्वंद्व’ करून युद्ध निर्णय म्हणजे पुन्हा युद्धाचे क्षुल्लकीकरण करण्याचा प्रकार किंवा हॉलीवूड वेस्टर्न चित्रपटात काऊ-बॉइज कसे अमोरासमोर गन-फाईट करून निर्णय लावतात. त्यात कुणीतरी एक मरतो, पण बाकीचे सुरक्षित अंतरावरून मजा बघतात असा काहीसा सुर दिसतोय. मजेशीर विचार आहे खरा...

५. 'कृष्ण-शिष्टाई' च्या प्रसंगी दुर्योधनाने श्रीकृष्णाला जेंव्हा बंदी बनवण्याचा घाट घातला, त्यावेळी दुर्योधन - दुश:सनादि जे काही पाच-सात मुख्य 'खलनायक' तिथे असतील, त्यांचा श्रीकृष्णाने सुदर्शनचक्राने तात्काळ शिरच्छेद केला असता, तर पुढला सगळाच अनर्थ टळला असता, परंतु त्याने तसे का केले नाही ?
श्रीकृष्ण 'कृष्ण-शिष्टाई' च्या वेळी एक प्रकारे राजदूत अथवा वकील या नात्याने गेला होता. व्यावहारिक पातळीवर त्याने तिथे राजदूतांचा धर्म पाळला. आणि युद्ध टाळण्याची जवाबदारी सतत पांडव आणि कृष्णावर असा अट्टाहास करण्यापेक्षा पुढचा अनर्थ समजूनही युद्धाची खुमखुमी असलेला दुर्योधन, जमेल तेंव्हा आपल्या दुरवर्तनी मुलाची बाजू घेणारा धृतराष्ट्र आणि राज सत्तेपुढे मिंधे असलेले भीष्म, द्रोण वगैरे यांचा असा काय ‘नाईलाज’ होता हे समजणे महत्त्वाचे आहे. महाभारताची एक महत्त्वाची शिकवण ‘लौकिक सुखात असताना अधर्म कसा माजतो’ ही आहे.

७. महाभारत युद्धानंतच्या काळात विविध राज्ये, प्रदेश, आणि तिथले लोक यांचे जीवन कसे होते, जनजीवनावर या युद्धाचे काय काय परिणाम झाले, याविषयी महाभारतात काही उल्लेख आहेत का ?
भारती युद्धानंतर पांडवांनी छत्तीस वर्षे राज्य केले आणि परीक्षिताचा राज्याभिषेक केला. पुढे स्वर्गारोहण पर्व होवून महाभारताची कथा संपते. विविध राज्ये, प्रदेश, आणि तिथले लोक यांचा फारसा उल्लेख इथे येत नाही पण यादव कुल संहार हा एकप्रकारे मिनी-महाभारत म्हणावे असा कथाभाग आहे. भारती युद्धाचे फलित म्हणजे ‘यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥ परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥‘ याची प्रचिती आणि भारतीय संस्कृतीत ‘धारयति इति धर्म’ ही शिकवण पुन:पुन्हा उजळून निघाली. हिंदू समाजातली सेल्फ-करेक्शन करून धर्म पुनरस्थापित करत राहण्याची प्रेरणा हा महाभारत युद्धाचा सर्वात मोठा परिणाम आहे असे मला वाटते.

उन्मेष दिक्षीत's picture

3 Sep 2023 - 5:19 am | उन्मेष दिक्षीत

जमान्यात धर्म अधर्म रिलेवंट आहे का कॉमन सेन्स आणि ईडियोक्रसी ? त्यामुळे अधर्माचा विनाश करायला आता कोण जन्म घेणार जर त्यावेळी घेतलाच असेल तर.

धर्म सनातन आहे त्यामुळे काल-आज-उद्या आणि कालापलिकडेही रिलेवंट आहे.
कॉमन सेन्स चा धर्माशी रिलेवन्स नसेल तर तो कॉमन सेन्स ईडियोक्रसी होतो.
'अधर्माचा विनाश करायला आता कोण जन्म घेणार' - भगवान विष्णु
'जर त्यावेळी घेतलाच असेल तर' - तुम्हाला शंका असेल तर साधना करा आणि समजून घ्या.

उन्मेष दिक्षीत's picture

5 Sep 2023 - 2:17 am | उन्मेष दिक्षीत

सनातन धर्म म्हणतात म्हणुन धर्माला कालाचे लेबल देऊ नका

>> अधर्माचा विनाश करायला आता कोण जन्म घेणार' - भगवान विष्णु

म्हणजे आपण कसेही वागायचे , आणि रिस्पॉन्सिबिलीटी मात्र भगवान विष्णुं ची !

आता एवढे लिहिलेच आहे, तर ते कधी येणार ते ही सांगा

साधना करायची तर आधी कॉमन सेन्स लागतो

धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे - याची प्रचिती महाभारत काळापासूनच्या नंतरच्या सुमारे पाच हजार वर्षांत नेमक्या कोणकोणत्या काळात/युगात कोणत्या स्वरूपात आलेली आहे ?

धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे - याची प्रचिती
भारतीय विचार आणि हिंदु धर्म जो सलग पणे जुन्यातल्या चांगल्या तत्वांचा नव्या परिस्थितीशी समन्वय करत व जुन्यातल्या असंबद्ध बनलेल्या तत्वांचा त्याग करत वृद्धिंगत होत राहिला आहे आणि या वृत्तीमुळे पुढेही वृद्धिंगत होत राहिल, यातच 'धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे' ची प्रचिती आहे. असे किती महात्मे आपण मोजणार? संत ज्ञानेश्वरांपासुन ते शिवाजी महाराजांपासुन ते आधुनिक काळात असलेले संत व विविध क्षेत्रातल्या विभुती आपापल्या प्रिने याची प्रचिती घेत धर्मसंस्थापनेचं कार्य करत आहेत. तशी दृष्टी विकसीत केली की याची प्रचिती सर्वांना येईल.

अधर्माचा नाश होवून धर्माचे राज्य स्थापित झाले.

म्हणजे नेमके काय झाले ?
मुळात त्याकाळी 'धर्म' आणि 'अधर्म' या दोन्हीत कोणकोणत्या गोष्टी (परंपरा, वर्तन, आचार-विचार, सिद्धांत, कर्म वगैरे वगैरे) अंतर्भूत होत्या, हे स्पष्ट केल्यास चर्चेला दिशा मिळू शकते.

एक उदाहरण म्हणून असे समजा की कुण्या एके गावात वृद्ध माता-पिता/कुटुंबियांची काळजी घेणे, त्यांची सेवा करणे वगैरे गोष्टी 'योग्य' किंवा 'धर्म' असल्याची मान्यता आहे. याउलट तसे न करणे हा 'अधर्म' अशी मान्यता आहे.
गावात 'धर्मपालन' करणारी पाच कुटुंबे रहात आहेत (त्यांना आपण 'धार्मिक' असे म्हणू) तसेच त्या गावात 'धर्मपालन' न करणारी ('अधार्मिक') शंभर कुटुंबे आहेत. याशिवाय एक एकटा माणूस रहात असून तो खूप हुशार, ज्ञानी, धोरणी वगैरे असल्याची मान्यता आहे. त्याला आपण 'सूज्ञ' म्हणू.
आता यापैकी शंभर 'अधार्मिक' कुटुंबांनी पाच 'धार्मिक' कुटुंबाचा छळ करून त्यांना गावातून हाकलून लावलेले आहे. 'सूज्ञ' ला हे अयोग्य वाटत असल्याने त्याने धार्मिकांचा पक्ष घेऊन अधार्मिकांची समजूत घालणाचा बराच प्रयत्न करूनही त्यात त्याला यश आले नाही. पुढे त्या पाच धार्मिकांच्या बाजूने आसपासच्या गावातली ७०० कुटुंबे उभी राहिली, तर अधार्मिकांच्या बाजूने ११०० कुटुंबे. 'सूज्ञ' ने पुन्हा एकदा अधार्मिकांची भेट घेऊन मांडवली ऊर्फ 'शिष्टाई' करण्याचा प्रयत्न केला, तोही विफळ झाला.
शेवटी काही उपाय नसल्याने ७००+५ एका बाजूला आणि ११००+१०० दुसर्या बाजूला, अशी जंगी मारामारी झाली. 'धार्मिक' बाजूला 'सूज्ञ' चे सहाय्य लाभलेले होते.
ही जंगी हाणामारी अठरा दिवस चालली, आणि शेवटी 'अधार्मिक' पक्षाचा सर्वनाश होऊन ते सगळे मृत्युमुखी पडले. 'धार्मिक' पक्षाचेही खूप नुकसान झाले तरी ती कुटुंबे जिवंत राहिली, आणि त्या ओसाड झालेल्या गावात पुन्हा राहू लागली.

त्यानंतर काही काळाने त्या 'सूज्ञ' मनुष्याच्या कुळातले सगळे लोक सुद्धा आपापसात मारामारी करून मरण पावले, आणि हताश होऊन सूज्ञ बसलेला असता त्यालाही कुणीतरी ठार केले. यातून (पूर्वीच्या अनुभवातून शहाणपण शिकून) इतर लोक 'धार्मिक' झालेले नव्हते हेही स्पष्ट झाले.
आता याला 'धर्माचा' विजय आणि 'अधर्माचा' नाश/पराज्य झाला असे म्हणता येईल का ? नाश तर फक्त माणसांचा झालेला आहे.
धर्म-अधर्म म्हणजे काहीएक विचार/समजुती/नियम वगैरेंचा समुच्चय असल्याने त्या काळानुसार बदलत रहातात. त्यानुसार वागणारे/ न वागणारे लोक विविध वैयक्तिक/सांघिक कारणांमुळे आपसात लढून मरण पावतात, एवढेच तात्पर्य यातून निघते, असे दिसते.

काका ,धर्म आणि अधर्म
वरच्या एका प्रतिसादात मी उल्लेख केल्यानुसार सत,त्रेता, द्वापार,कलि युग या काळात धर्म -अधर्म वेगवेगळे आहेत.त्याचा इथे उल्लेख करतांही संकोच वाटतो.तरी अनेकांच्या प्रतिसादातून इथे त्या
त्या काळातील अधर्माचा उल्लेख केले आहेत.स्पिरीचल spiritual (धार्मिक हा अर्थ नाही )असणारी व्यक्ती,घर चिरकाल शांत मोक्षाच्या (सर्व रहस्य जाणण्याची क्षमता) मार्गावर असते त्याप्रमाणे 'अधर्म'मुळे स्पिरीचल hormany डिस्टर्ब होते.भगवानाला धर्म स्पिरीचल ऊर्जा स्थापन करायला अधर्माचा नाश करावा लागला.
आजच्या युगात एवढेच म्हणेन की स्पिरीचल ऊर्जा मिळवण्याचा अधिकार सर्वांनाच आहे,पण तरीही सगळ्यांना मोक्ष नाही तर भोगवाद (सर्व प्रकारचा) पाहिजे आहे यामुळे अधर्म या युगात अधिक आहे.प्लस पोइंट असा की सगळे कर्म स्पिरीचल लेव्हलवर सारखे हक्कदार मानले जातात.

अभिजीत's picture

5 Sep 2023 - 12:24 am | अभिजीत

धर्म आणि अधर्म या माण्साच्या वृत्तीतून निर्माण झालेली मुल्ये आहेत. महाभारतात धर्म या शब्दाच्या विविध व्याख्या, विवेचने आणि त्यातले सुक्ष्म अर्थ जागोजागी येतात. गीतेची सुरुवात 'धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे' पासुन होते. भीष्म शरपंजरीवर पडल्यावर कृष्णाच्या सल्ल्यानुसार युधिष्ठीर 'धर्माचे ज्ञान घेण्यासाठी येतो. यात साडेतीनशे च्या वर अध्याय आणि तेरा हजार श्लोक 'राजधर्म-आपद्धर्म-मोक्षधर्म' या धर्म विषयावर आहेत. त्याचा गोषवारा लिहिणं माझ्या आवाक्याबाहेर आहे.

तरीहि, धर्माची सोपी आणि मूलगामी व्याख्या काय यावर चर्चा करता येईल.
युधिष्ठीर यक्षाच्या प्रश्नांना उत्तर देताना 'अहिंसा परमो धर्म' अशी धर्माची व्याख्या करतो. 'अहिंसा' म्हणजे 'non violence' असा धर्माचा आधुनिक अर्थ चुकीचा असून धर्म म्हणजे finding path of least violence - कमीतकमी हिंसेचा मार्ग असा केला पाहिजे. धर्माची ही व्याख्या सनातन मूल्य म्हणून वापरता येते. यातून बाकीच्या व्याख्या आणि विवेचने करता येतात. कोणत्याही कसोटीच्या क्षणी ही व्याख्या 'धर्माचा' मार्ग दाखवते. भारती युद्धात कृष्णाने युद्धाचा सल्ला का दिला, तर याचे उत्तर या 'finding path of least violence' ने देता येते. जर युद्ध झाले नसते तर दुर्योधनाच्या अधर्मी वागण्याने अधिक हिंसा झाली असती त्यापेक्षा युद्धात झालेली कमीच असती. दुर्योधनाचे राज्य पुढे सुरु राहिले असते तर धर्माचा पराभव झाला असता आणि त्यातली हिंसा पुढच्या सर्व पिढ्यांना भोगावी लागली असती.

तुमच्या उदाहरणात 'धर्म' ची व्याख्या कोणा तरी 'सुज्ञाला' वाटते तो, म्हणजे 'हम करेसो कायदा' टाईप आहे. नाश फक्त माणसांचा झालेला आहे हे खरेच पण माणसे अशा कुठल्या व्हॅक्युम मधे राहत नाहीत. वैचारिक भूमिका असतातच...

'धर्म-अधर्म म्हणजे काहीएक विचार/समजुती/नियम वगैरेंचा समुच्चय असल्याने त्या काळानुसार बदलत रहातात.'
काही समजुती/नियम देश-स्थल-कालानुसार बदलतात पण धर्म सनातन आहे.

चांदणे संदीप's picture

5 Sep 2023 - 3:03 pm | चांदणे संदीप

'अहिंसा' म्हणजे 'non violence' असा धर्माचा आधुनिक अर्थ चुकीचा असून धर्म म्हणजे finding path of least violence - कमीतकमी हिंसेचा मार्ग असा केला पाहिजे.

हे कस्काय म्हणे? मग ते जैन आणि बौद्ध सांगतात ती अहिंसा कशी असते?

सं - दी - प

@bhakti तुमचा वरील प्रतिसाद आणखी अनेक प्रश्नांना जन्म घालणारा आहे. ते प्रश्न मी इथे मांडण्यापेक्षा तुम्हीच सवडीनुसार जरा जास्त विस्ताराने लिहू शकाल अशी आशा करतो.

... धर्म - अधर्म वेगवेगळे आहेत.त्याचा इथे उल्लेख करतांही संकोच वाटतो...

प्राचीन काळचे धर्माबद्दल आता लिहीताना संकोच का बरे वाटावा ? हे समजले नाही. संकोच न करता लिहीवे अशी विनंती करतो.

धर्म म्हणजे काय इथपासून सुरुवात करायची म्हणता.

धर्माची व्युत्पत्ती माहित नाही मला.
पण धर्म माणसाला त्याचं अंतिम ध्येय सांगतो. धर्म म्हणजे जीवनपद्धती नव्हे. चांगलं जगावं हे सांगते ती जीवनपद्धती. चांगलं का जगावं हे सांगतो तो धर्म.

धर्माचं मुख्य काम हे माणसाला सन्मार्गावर ठेवणं हे आहे. त्यासाठीच यम, नियम सांगितलेले आहेत. ह्या यम, नियमांच्या पालनानं चित्तवृत्ती शुद्ध होत शाश्वत ध्येयाकडे वाटचाल करणे अपेक्षीत आहे. यालाच आत्मोन्नती (स्व उन्नती) म्हणतात. ही भौतिक उन्नती नाही, तर मूळ स्वभावातील बदल/उन्नती आहे.

ही उन्नती साध्य होण्यासाठी आपापल्या स्वभावानुसार, शारिरीक क्षमतेनुसार वेगवेगळे मार्ग सांगीतलेले आहेत. तेच म्हणजे ज्ञानमार्ग, योगमार्ग, कर्ममार्ग, भक्तीमार्ग. यातील प्रत्येक मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी अनेक मार्गदर्शनपर दर्शने आहेत. अगदी सोप्या भाषेतलं बघायचं असेल तर स्वामी विवेकानंदांनी या चारही मार्गांविषयी लिहिलेलं वाचणं पुरेसं आहे. शिवाय त्यांचं राजयोगावरचं पुस्तकही अत्यंत उपयुक्त आहे. त्यांच्या सांगण्यातून त्यांचा अनुभवसिद्ध अधिकार जाणवतो.

आपल्या धर्माला हिंदू धर्म का म्हणतात, त्याचं कारण काय हा एक वेगळा चर्चाविषय आहे. त्यामुळे ते असो.

पण प्रथम, धर्माचा विचार हा माणसाला मुळातून आला पाहिजे. त्यासाठी -
उदा. धर्म ही संकल्पनाच बाजूला ठेवावी. स्व उन्नतीसाठी प्रत्येकानं काय करणं योग्य असायला हवं, याचा आपणच सखोल विचार करावा. जे आपल्याला सुचेल ते वरील यम, नियमांशी ताडून पहावे. त्यामागचा अतिगहन विचार आपल्याला आपोआपच समजून येईल.

यातलं काय अनुसरावं, काय नाही किंवा आणिक काही वेगळं करायची ईच्छा असल्यास तसं वागणं; हा प्रत्येक मनुष्याचा स्वभावाधिकार आहे. केवळ या गोष्टी वाचून, शिकून पुरेसं नाही. आपल्या मूळ स्वभावात अपेक्षीत बदल होणं महत्त्वाचं, ते जर होत नसेल तर महानतम साधक होऊनही पुरेसं नाही.

इत्यलम्

स्व-उन्नतीसाठी प्रत्येकानं काय करणं योग्य असायला हवं...

या जाणिवेतूनच की काय जगभर तथाकथित सेल्फ हेल्प बुकांचे वारेमाप पीक आलेले दिसते.
येके म्हणती सेव्हन हॅबिटे.. येके म्हणती 'बिग' थिंकिणे ... येके म्हणती पॉवरॉफ 'नाऊ' जाणणे.... सर्वोत्तम

समर्थांनी नाना मतांचा गल्बला विशद केलेला आहे:
येक म्हणती कर्ता भैरव । येक म्हणती खंडेराव । येक म्हणती बीरेदेव । येक म्हणती भगवती ॥ ६ ॥
येक म्हणती नरहरी । येक म्हणती बनशंकरी । येक म्हणती सर्व करी । नारायेणु ॥ ७ ॥
येक म्हणती श्रीराम कर्ता । येक म्हणती श्रीकृष्ण कर्ता । येक म्हणती भगवंत कर्ता । केशवराज ॥ ८ ॥
येक म्हणती पांडुरंग । येक म्हणती श्रीरंग । येक म्हणती झोटींग । सर्व करी ॥ ९ ॥
येक म्हणती मुंज्या कर्ता । येक म्हणती सूर्य कर्ता । येक म्हणती अग्न कर्ता । सकळ कांहीं ॥ १० ॥
येक म्हणती लक्ष्मी करी । येक म्हणती मारुती करी । येक म्हणती धरत्री करी । सर्व कांही ॥ ११ ॥
येक म्हणती तुकाई । येक म्हणती येमाई । येक म्हणती सटवाई । सर्वकरी । १२ ॥
येक म्हणती भार्गव कर्ता । येक म्हणती वामन कर्ता । येक म्हणती परमात्मा कर्ता । येकचि आहे ॥ १३ ॥
येक म्हणती विरणा कर्ता । येक म्हणती बस्वंणा कर्ता । येक म्हणती रेवंणा कर्ता । सर्व कांहीं ॥ १४ ॥
येक म्हणती रवळया कर्ता । येक म्हणती स्वामी कार्तिक कर्ता । येक म्हणती वेंकटेश कर्ता । सर्व कांहीं ॥ १५ ॥
येक म्हणती गुरु कर्ता । येक म्हणती दत्त कर्ता । येक म्हणती मुख्य कर्ता । वोढ्या जगन्नथ ॥ १६ ॥
येक म्हणती ब्रह्मा कर्ता । येक म्हणती विष्णु कर्ता । येक म्हणती महेश कर्ता । निश्चयेंसीं ॥ १७ ॥
येक म्हणती प्रजन्य कर्ता । येक म्हणती वायो कर्ता । येक म्हणती करून अकर्ता । निर्गुण देव ॥ १८ ॥
येक म्हणती माया करी । येक म्हणती जीव करी । येक म्हणती सर्व करी । प्रारब्धयोग ॥ १९ ॥
येक म्हणती प्रेत्‌न करी । येक म्हणती स्वभाव करी । येक म्हणती कोण करी । कोण जाणे ॥ २० ॥
ऐसा कर्त्याचा विचार । पुसतां भरला बजार । आतां कोणाचें उत्तर । खरें मानावें ॥ २१ ॥
जेहिं जो देव मानिला । कर्ता म्हणती तयाला । ऐसा लोकांचा गल्बला । वोसरेना ॥ २२ ॥

-- परंतु या सगळ्या घोळात पडण्यापेक्षा "पहावे आपणासि आपण त्या नाव ज्ञान" असेही त्यांनी सांगितले आहे.
'आपणासि पहावे/जाणावे आपण' यासाठी:

यम -नियम - आसन - प्राणायम - प्रत्याहार - धारणा - ध्यान - समाधी या क्रमाने हळूहळू 'योग' अर्थात 'चित्तवृत्ती निरोध' साध्य करण्याचे शास्त्र पतंजलींनी अतिशय पद्धतशीरपणे सांगितलेले आहे. एका अर्थी जगात फक्त एकच 'पतंजली योगसूत्रे' हाच ग्रंथ जरी असता (किंवा उरला) आणि सगळ्यांनी तो जीवनात अवलंबिला तरी मनुष्यजातीचे परम कल्याण होण्याजोगे आहे, एवढे त्या लहानश्या ग्रंथाचे महत्व आहे.
असो. तुमचे विवेचन मननीय वाटले.

खरंय.. कोणीही आत्मोन्नतीसाठी विचार करेल तरी या पलिकडे अजून काही करण्याची खरंच गरज पडणार नाही.

उन्मेष दिक्षीत's picture

6 Sep 2023 - 7:57 pm | उन्मेष दिक्षीत

द पॉवर ऑफ नाऊ खरे सेल्फ हेल्प बुक आहे ! उपयोग करून घेतला तर अर्थात.

मुक्त विहारि's picture

4 Sep 2023 - 9:57 pm | मुक्त विहारि

आणि

रोचक संशोधन .....

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

5 Sep 2023 - 10:13 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

एस एल भैरप्पा यांच पर्व नावाची कादंबरी आहे. ती वाचा. महाभारत आणि त्या काळाबद्दल वेगळा विचार सापडतो त्यात.

नठ्यारा's picture

3 Oct 2023 - 7:11 pm | नठ्यारा

नमस्कार वाचकहो,

या विषयाबाबत मला काय वाटतं ते यथाशक्ती व यथाबुद्धी सांगतो. पहिल्यांदा लेखकाचे प्रश्नं घेतो.

१. एवढे सगळे झाले त्यातून पांडवांना नेमके काय मिळाले ?

राज्य मिळालं खरं, पण ते उपफळ होतं. प्रमुख फळ म्हणजे द्रौपदीच्या अपमानाचा बदला.

२. समजा, 'सत्याचा' किंवा 'धर्माचा' विजय झाला असे म्हटले तर तो विजय किती काळ टिकला ? त्यामुळे पुढील पिढ्यान-पिढ्या 'सद्गुणी' निपजल्या का ?

हा धर्म वा सत्याचा विजय नसून जे विजयी झालेत ते धर्माच्या बाजूने आहेत असं म्हणायला हवं.

३. हा असा महाविनाश होणार याचा श्रीकृष्णासारख्या दैवी विभूतीला अंदाज आला नव्हता का ? तसेच त्याकाळी भारतात अत्यंत प्रगत अशी अस्त्रविद्या वगैरे होती असे सांगितले जाते, ते सगळे ज्ञान आणि ते ठाऊक असणारे ज्ञानी युद्धामुळे समूळ नष्ट होण्याचा धोका श्रीकृष्णाला ओळखता आला नव्हता का ?

तत्कालीन क्षत्रियांना ब्रह्मदेवाचा ( की इंद्र वा इतर कोणाचा ) शाप की वर होता की एकमेकांचा नाश करून तुम्ही स्वर्गास प्राप्त व्हाल.

बाकी कुलीन क्षत्रिय नष्ट पावल्याने धर्माचा ऱ्हास होणार हा अंदाज भीष्मास आला होता. गीतेच्या प्रारंभी अर्जुनानेही वर्णसंकराची भीती व्यक्त केली होती. हा अंदाज सर्वांनाच होता. मात्र त्या काळी क्षत्रियांनी दुर्बलांना लुटण्याचं प्रमाण वाढलं होतं. उदाहरणार्थ विराटाचं गोधन पळवणं.

विराटासारख्या राजाची ही स्थिती होती, तर य:कश्चित ब्राह्मणास कोण विचारतो. त्या बिचाऱ्यास मग थेट अर्जुनाचं दार ठोठवावं लागलं. त्यापायी युधिष्ठीर व द्रौपदी यांचा एकांतभंग झाला आणि अर्जुनास १२ वर्षं वनवासात जावं लागलं. अर्थात, ही घटना विराटाच्या गोधनहरणापूर्वी घडलेली आहे. पण मुद्दा स्पष्ट व्हावा. ब्राह्मणास दिलासा द्यावयास इतर कोणी सरकारी अधिकारी नव्हते का? की राज्यात सर्वत्र मरगळ आली होती ....?

४. कुरुवंशाच्या दोन शाखांमधील दुर्योधन आणि युधिष्ठीर या दोघांपैकी हस्तिनापुराच्या लहानशा राज्याचे स्वामित्व कुणाला मिळाले पाहिजे असा कौटुंबिक तिढा सोडवण्यापायी अखिल भारतातील लाखो-करोडो लोकांना - ज्यांना खरेतर त्या तिढ्याशी काहीच घेणे-देणे नसणार- युद्धात का सहभागी व्हावे लागले ? त्यांचा असा कोणता 'नाईलाज' होता?

युद्धाची पर्वणी आली आहे तर हात धुवून घ्या, असा साधा विचार अनेकांनी होता. कुरुवेतर राजांची तत्कालीन राजनीती यासंबंधी कुण्या हिंदी भाषिक विद्वानाने एक पुस्तक प्रकाशित केलं आहे. नावं आठवंत नाहीत.

५. युद्धाच्या अगदी शेवटी भीम-दुर्योधनाचे द्वंद्व - गदायुद्ध झाले तसे ते युद्धापूर्वीच करून प्रकरणाचा सोक्षमोक्ष नसता का लावता आला ?

असं केलं असतं तर मृत व्यक्तीच्या आप्तांनी काहीतरी कारण काढून परत लढायला आव्हान दिलं असतंच.

६. 'कृष्ण-शिष्टाई' च्या प्रसंगी दुर्योधनाने श्रीकृष्णाला जेंव्हा बंदी बनवण्याचा घाट घातला, त्यावेळी दुर्योधन - दुश:सनादि जे काही पाच-सात मुख्य 'खलनायक' तिथे असतील, त्यांचा श्रीकृष्णाने सुदर्शनचक्राने तात्काळ शिरच्छेद केला असता, तर पुढला सगळाच अनर्थ टळला असता, परंतु त्याने तसे का केले नाही ?

श्रीकृष्णाने ज्यांना ठार मारलंय त्यांना कुठल्या तरी प्रकारची मुक्ती मिळाली आहे. दुर्योधानादि कौरवांचं मुक्ती मिळवण्याइतपत कर्तृत्व नव्हतं.

७. महाभारत युद्धानंतच्या काळात विविध राज्ये, प्रदेश, आणि तिथले लोक यांचे जीवन कसे होते, जनजीवनावर या युद्धाचे काय काय परिणाम झाले, याविषयी महाभारतात काही उल्लेख आहेत का ?

यावर आपला पास.

----x----x----

काही स्पष्टीकरणे :

१. युधिष्ठिर द्यूतात सर्वस्व हरलेला नाही : याचं कारण म्हणजे द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या पश्चात धृतराष्ट्राची चांगलीच टरकली. द्रौपदी शापवचन बोलेल की काय या भीतीने त्याने तिला ३ वर देऊ केले. तिने पहिल्या वराने युधिष्ठिरास दास्यत्वातनं मोकळं केलं. दुसऱ्या वराने उर्वरित चार पांडवांना मोकळं केलं. आणि तिसरा वर घेतलाच नाही. कारण की क्षत्रिय केवळ दोनंच वर मागू शकतात. यावर धृतराष्ट्राने आपणहून जिंकलेली सगळी संपत्ती परत दिली. पांडव जेव्हा तिथनं निघाले तेव्हा परिणामत: त्यांची संपत्ती पूर्वीइतकीच राहिली होती.

हे दुर्योधनास कळलं तेव्हा त्याने बापाला गळ घालून आजून एक द्यूताचा डाव खेळायची परवानगी मागितली. त्यानुसार हरलेल्या पक्षाने १२ वर्षं वनवास व १ वर्ष अज्ञातवास पत्करायचा. या डावास अनुद्यूत म्हणतात. हा डावही युधिष्ठिर हरला. परिणामी पांडवांना १३ वर्षं अनागर वनवास स्वीकारावा लागला. तांत्रिक दृष्ट्या वनवासास अनुद्यूत कारणीभूत ठरलं, द्यूत नव्हे.

२. महाभारतीय युद्धाचं निमित्त : हे युद्ध राज्यासाठी झालं असं मानतात. मात्र हे राज्य हस्तिनापुराचं नसून इंद्रप्रस्थाचं आहे. पांडवांना हस्तिनापुरात काहीही रस नव्हता. त्यांना फक्त इंद्रप्रस्थ परत हवं होतं. ही मागणीही नंतर त्यांनी सोडली आणि फक्त ५ ग्रामांवर तडजोडीस सिद्ध झाले. त्यामुळे महाभारतीय युद्धाचं तात्कालिक निमित्त पंचग्रामे होत.

३. युधिष्ठिर निर्दोष आहे : जरी त्याने द्यूतात द्रौपदीस पणास लावलं असलं तरीही त्यास पांडव व द्रौपदीने निर्दोष मानलं आहे. त्यानं तिला पणास लावलं ते शकुनीच्या सूचनेवरून. यावरनं युधिष्ठिर अतिथीधर्माचं पालन करीत होता असं म्हणता येतं. पाहुण्यांवर दबाव टाकून स्वत: मात्र कपटद्यूत खेळणारे कौरव द्रौपदीच्या मते खरे अपराधी होय.

----x----x----

असो. जमलं तितकं लिहिलं आहे.

- नाठाळ नठ्या

अमरेंद्र बाहुबली's picture

3 Oct 2023 - 7:28 pm | अमरेंद्र बाहुबली

अरे वा! बर्याच दिवसांनी मिपावर बौध्दीक हाणामार्या झाल्या.

अहिरावण's picture

3 Oct 2023 - 7:38 pm | अहिरावण

जेव्हा होत होत्या तेव्हा तुम्ही झोपले होते. घोरत होते म्हणून उठवले नाही.

अमरेंद्र बाहुबली's picture

3 Oct 2023 - 7:49 pm | अमरेंद्र बाहुबली

हो ना. आगा होतायत तर आस्वाद घेतो.

शशिकांत ओक's picture

15 Oct 2023 - 8:38 pm | शशिकांत ओक

मान्यता आहे की एकदा फटका बसला तर पुन्हा तीच गोष्ट एक तर करू नये किंवा करायलाच लागली तर नुकसान होणार नाही काळजी घ्यावी.
सध्याच्या काळात इस्रायलने पॅलेस्टाईन लोकांना आत्ता पर्यंत ५ वेळा हे लोक सुधारतील म्हणून सोडून दिले. आता पुन्हा इस्रायलला चपराक बसली. पाहू आता तरी जागे होऊन साक्षमोक्ष लावतात का ते..

अमरेंद्र बाहुबली's picture

15 Oct 2023 - 11:03 pm | अमरेंद्र बाहुबली

+१