रुग्णालय व्यवस्थापन: १ - समुद्र
रुग्णालय व्यवस्थापन: २ - महामेरु
रुग्णालय व्यवस्थापन: ३ - अग्निकुंड
इतकं सांगितलं पण रुग्णालय व्यवस्थापन म्हणजे काय? तर रुग्णालायचं व्यवस्थापन इतर संथातील व्यवस्थपणापेक्षा किंचित वेगळे असते. यात रुग्ण केंद्री ठेऊन सारा विचार करावा लागतो. आपत्कालीन स्थितीत रुग्ण आल्यानंतर एकाच वेळी मेडिको व नॉन-मेडिको दोन्ही भाग कामं करायला लागतात. रुग्णाला योग्य उपचार वेळीच सुरु करण्यासाठी कैक गोष्टी, उपकरणं लागतात. त्यावेळी त्या सर्व गोष्टी सुस्थित उपलब्ध करून देण्याचं काम रुग्णालयाचे अर्थात व्यवस्थापनाचे असते.
बरेचदा रुग्णालयाच्या इमारती जुन्या असल्याने तिथे काही मूलभूत सेवांचा अभाव असू शकतो. जसे कि सांडपाणी व्यवस्थापनाची सोय, अग्निशमन यंत्रणा, ई. अशा वेळी पर्यायी व्यवस्था कमी खर्चात उभी करणे, राबवणे हि कामं व्यवस्थापनाची. एखादा व्यक्ती रुग्णालयात आल्यापासून ते बाहेरपडेपर्यंत त्याला या सर्व व्यवस्थेचा भाग बनवणे, ग्राहक बनवणे यावर व्यवस्थापनाचा भर असायला हवा.
'आला बकरा कि कापा' अशा धोरणावर चालणाऱ्या रुग्णालयांना आयुष्य नसते. असली रुग्णालये, चालवणाऱ्याकडे भरपूर पैसा असेल तर नावापुरती 'सुरु' असतात. ती वाढत नाहीत. रुग्णालयात गरजेपेक्षा जास्त पैसे ओतणे म्हणजे व्यवस्थापन न्हवे.
एका राजेशाही घराण्याची मोठी जमीन शहराच्या मोक्याच्या ठिकाणी आहे. त्या राजघराण्यात सध्या कोणीतरी डॉक्टर असल्याने प्रचंड मोठे रुग्णालय बांधायचे ठरले. इमारत बांधली देखील. परवाने मिळेपर्यंत त्यांनी बरेच कर्मचारी रुजू देखील करून घेतले. अगदी CEO पर्यंत ची पद भरून झाली. शासकीय गुंतागुंतीत जमिनीची मालकी अडकल्याने परवाने लांबले. दरम्यान घेतलेले कर्मचारी पोसावे लागले. व्यवस्थापन इथे कितीतरी ठिकाणी चुकलं व चुका करतच राहिलं.
एका सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञाने रुग्णालय काढायचे ठरवले. त्यांचं पहिलं प्रेम त्यांची प्रॅक्टिस असल्याने त्यांनी रुग्णालयाच्या जडणघडणीत कमी लक्ष दिले. दरम्यान दिवसरात्र शस्त्रक्रिया करून कमावलेले पैसे रुग्णालयात ओतत राहिले. कर्जबाजारी झाले. यात सरांनी रुग्णालयाच्या जडणघडणीत व्यवस्थापनाचे असणारे महत्व लक्षात घेतले नाही व निव्वळ पैसा ओतत राहिले.
तिसरे आणि शेवटचे उदाहरण कधीकाळी चांगलं चालणाऱ्या पण सध्या तरी ओस पडलेल्या रुग्णालयाचे घेऊ. डॉक्टरांनी त्यांच्या उमेदीच्या काळात सुरु केलेले छोटेखानी (पण जागा भरपूर) असलेले रुग्णालय सुरु केले. सरांच्या ओळखी व नातेसंबंध मोठे असल्याने त्यांना त्याची मदत झाली. रुग्णसंख्या वाढू लागली तसे रुग्णालयाची इमारत व त्यातील सोयी सुविधा देखील वाढू लागल्या. कर्मचाऱ्यांना सर्व लाभ दिले जाऊ लागले. रुग्णालयाच्या शाखा सुरु झाल्या. सरांच्या मुलाने देखील डॉक्टर म्हणून नाव कमावले. जुन्या मुख्य रुग्णालयाऐवजी दुसऱ्या शाखेत मुलाने स्वतःच बस्तान बसवलं. हळूहळू सिनियर डॉक्टर येणे कमी झाले. मुलाने स्वतः बसत असलेल्या शाखेत स्वतःची प्रॅक्टिस वाढवली मूळ रुग्णालयात व्यवस्थापन राम भरोसे चालायला लागलं. खूप सिनियर CEO, VP ई लोकं घेऊन देखील मूळ रुग्णालय आज घडीला तोट्यातच आहे. कर्मचाऱ्यांचे पगार ४-६ महिने लांबायला लागले.
वर दिलेल्या तीनही उदाहरणांत व्यवस्थापकीय अडाणीपण किंवा व्यवस्थापन क्षेत्रातील अनुभव कमी असल्याने रुग्णालयाची घडी मोडली.
व्यवस्थापकीय कौशल्य प्रत्येक क्षेत्रात आवश्यक आहे. भरपूर शिक्षण संस्था तुम्हाला रुग्णालयीन व्यवस्थापन शिकण्याची संधी देतात. येनकेन प्रकारे या क्षेत्रात आलाच तर घडा भरून घ्यायला सज्ज व्हा.
अनुभवातून आलेलं आगाऊपण तुमच्या समोर मांडलेलं आहे. मी ‘बरोबर’ किंवा ‘मीच बरोबर’ असं माझं म्हणणं नाही. याविषयी कधी काही बोलावेसे वाटलेच तर
माझं नाव महेश सिताराम कांबळे, मो - ७७३८३८३०७९ ई-मेल editormaheshk@gmail.com
प्रतिक्रिया
21 Jul 2023 - 2:49 pm | राजेंद्र मेहेंदळे
लेखमालिका चांगली झाली, पण जरा त्रोटक वाटली. या क्षेत्रातील तुमच वीसेक वर्षांचा अनुभव असल्यास अजुन सविस्तर यायला हवे होते असे वाटते.
विशेषतः शेवटी केलेला या क्षेत्रातील संधींची माहीतीचा उल्लेख ओझरता आहे. कोणती शाखा, कोणते कॉलेज चांगले,परदेश गमनाच्या काही संधी( कॅनडा/ऑस्ट्रेलिया) असे बरेच लिहिता आले असते.
शिवाय या लाइनमध्ये तुम्हाला आलेले बरेवाईट अनुभव, भेटलेले पेशंट असे बरेच लिहिता येईल.
21 Jul 2023 - 3:07 pm | म्हया बिलंदर
वाचकांना असे वाटण्याची शक्यता आहेच. भविष्यात कधीतरी या विषयावर पुन्हा लिहिलंच तर या सर्व सूचनांचा उपयोगच होईल. प्रतिसादाकरिता धन्यवाद.
माझ्या या विषयातील लिखाणाचा पोत व प्रतिसादांची संख्या बघता तुम्हीच पयले आणि एकमेव असण्याची शक्यता जास्त आहे. :) : )
21 Jul 2023 - 6:06 pm | विवेकपटाईत
लेख आवडला हॉस्पिटल चालविणे अत्यंत कठीण कार्य आहे, हे कळाले.
21 Jul 2023 - 6:06 pm | विवेकपटाईत
लेख आवडला हॉस्पिटल चालविणे अत्यंत कठीण कार्य आहे, हे कळाले.
21 Jul 2023 - 6:55 pm | सौंदाळा
सर्व लेख वाचले आणि आवडले. हॉस्पिटल काढणे आणि चालवणे अवघड आहे.
माझ्याच शहरात तीन मोठी आणि जुनी खाजगी आणि एक सरकारी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहेत. हे सोडून बरीच छोटी आणि नविन हॉस्पिटल चालू आहेत पण तुम्ही म्हटल्याप्रमाणे ती चालवणे कदाचित परवडत नसावे कारण त्याची मॅनेजमेंट सारखी बद्लत आहे.
हॉस्पिटल मॅनेजमेंटचे काही वेगळे कोर्सेस निघाले आहेत का? नसेल तर पाहिजेत.
तुमच्याकडे या क्षेत्रातले बरेच भले-बुरे अनुभव देखील असतील त्याबद्दल पण जरुर लिहा.
23 Jul 2023 - 12:21 pm | धर्मराजमुटके
लेखमाला वाचली. फारच त्रोटक वाटली. एक क्षेत्राबाहेरील माणूस विरुद्ध एक इनसायडर या दूष्टीने तुलना केल्यास लेखमालेमधून काही नवीन माहिती हाती लागेल असे वाटले होते पण तसे काही घडले नाही. असो. लिहित रहा.
24 Jul 2023 - 6:59 am | परिंदा
खुपच त्रोटक लिहित आहात.
जमल्यास मिसळपाव लिहीलेले डॉ. सुबोध खरे यांचे लेख पाहा. ते देखील वैद्यकीय क्षेत्राविषयी लिहीतात आणि त्यांच्या लेखातुन विस्तॄत माहिती मिळते.