रुग्णालय व्यवस्थापन: २ - महामेरु

म्हया बिलंदर's picture
म्हया बिलंदर in काथ्याकूट
12 Jul 2023 - 11:48 am
गाभा: 

रुग्णालय व्यवस्थापन: १ - समुद्र

खाजगी रुग्णालयांची जी आकडेवारी आधी दिलेली आहे ती नोंदणीकृत रुग्णालयांची आहे. नोंदणीकृत म्हणजे मुंबई /महाराष्ट्र शुश्रूषा-गृह अधिनियम १९४९ क्र १५ अन्वये रुग्णालयाची रीतसर नोंद स्थानिक प्रशासनाद्वारे केली असेल, असे रुग्णालय. अशी नोंदणी करण्याकरिता काही मूलभूत कागदपत्रांची/अटींची पूर्तता करावी लागते. पुरेशी इमारत, मनुष्यबळ सोबतच कागदपत्र पुरवल्यास सर्टिफिकेट मिळवणे जास्त कठीण राहत नाही. सदर सर्टिफिकेट ठराविक कालावधीनंतर नुतणीकृत करून घ्यायचे असते. हे देखील बऱ्याच रुग्णालयांना व त्यांच्या व्यवस्थापनाला जमत नाही. म्हणजेच, काही किंवा बरीच रुग्णालये विना परवाना सुरु असतील यात शंका नाही. जर कधी कोणी अभ्यास करून त्यांची संख्या मोजली तर ती देखील नोंदणीकृत रुग्णालयांच्या संख्येच्या एक चतुर्थांश तरी नक्कीच असेल असं मला तरी वाटतं.
NSS २०१७ - १८ सर्वेक्षणानुसार ग्रामीण भागातील ३३% तर शहरी भागातील निव्वळ २१% लोकसंख्या सरकारी आरोग्य सेवांचा लाभ घेते. तर मग खाजगीचा आवाका लक्षात आला असेलच! खाजगी रुग्णालये हल्ली केवळ उपचार करत नाहीत तर उपचाराला जोडून बऱ्याच वेगवेगळ्या शाखांमध्ये सेवा पुरवते. या वेगवेगळ्या शाखांमध्ये आरोग्याइतकीच आर्थिक उलाढाल होते आणि त्याला तेवढेच मनुष्यबळ देखील लागते. खाजगी आरोग्य सेवांची आर्थिक उलाढाल अंदाजे ५ लक्ष कोटींची आहे. इथे संधीचा डोंगर आहे.
रुग्णालयांत जितके मेडिको अर्थात वैद्यकीय मनुष्यबळ गरजेचे असते तितकेच नॉन-मेडिको देखील लागतात. मेडिको किंवा वैद्यकीय मनुष्यबळात डॉक्टर्स, नर्सेस, पॅरा मेडिकल स्टाफ, ई. तर नॉन-मेडिको मध्ये अगदी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांपासून ते रुग्णालयातील सर्वात वरच्या पदांपर्यंत इतर सर्व कर्मचारी मोडतात.
तुम्ही कोणत्याही लहान मोठ्या रुग्णालयात गेलात तर गेट वर तुम्हाला (१) सेक्युरिटी (२) रिसेप्शन (३) बिलिंग विभाग तर दिसतीलच. यांच्या सोबतच त्यावेळी तिथे काम करणारे व रुग्णांना न दिसणारे (४) एच आर (५) ऍडमिन (६) ऑपरेशन (७) मार्केटिंग, हे विभाग/शाखा देखील असतातच. ढोबळ मानाने नमूद ७ विभागांत कोणताही विभाग थेट वैद्यकीय उपचाराशी संबंधित नाही. तर रुग्णाशी थेट संपर्कात येणारे (८) डॉक्टर्स (९) नर्सिंग (१०) लॅब (सर्व प्रकारच्या) (११) फार्मसी (औषधविभाग) हे विभाग देखील एका रुग्णालयाला लागतात. यांशिवाय सेवांमध्ये (१२) रुग्णवाहिका (१३) रक्त पेढी (Blood Bank) ई. विभाग असतात. या विभागांत किंवा शाखांमध्ये उपशाखा देखील असतात. हे असेच असते असे नाही काही रुग्णालये विभाग वगैरेंच्या भानगडीत न पडता एकाच माणसाकडे बऱ्याच जबाबदाऱ्या देतात आणि सगळं काही कमी स्टाफ मध्ये गुंडाळतात. अम्रिता हॉस्पिटल-फरिदाबाद हे सर्वात जास्त म्हणजे तब्ब्ल २,६०० खाटा असणारे खाजगी रुग्णालय तर ४,५०० खाटा असणारे किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी-लखनौ हे सर्वात मोठे वैद्यकीय महाविद्यालय. या खाटांच्या संख्येवरून तिकडे किती मोठ्या प्रमाणात व्यवस्थापन करावे लागत असेल याचा अंदाज येईल.
इतके किंवा या पेक्षा जास्त विभाग असल्याने होतं काय तर त्या त्या विभागांनाच लागणाऱ्या कैक गोष्टी, वस्तू, सेवा असतात ज्या पुरवणाऱ्या खूप साऱ्या इतर खाजगी संस्था आणि लोकं असतात. जसे कि हाऊस किपींग, हाऊस किपींग च्या वस्तू व उपकरणं, कम्प्युटर व त्यासंबंधीच्या गोष्टी, ई ई, यादी खूप मोठी आहे. तसेच हे सगळे व्यवस्थित समन्वय साधणारे मनुष्यबळ. यांतील काही विभागांमध्ये नवोदित कर्मचारी नेमले जातात तर काही ठिकाणी अनुभवीच असावेत.

क्रमशः

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

12 Jul 2023 - 3:16 pm | मुक्त विहारि

छान लिहीत आहात....

वाचत आहे.

---

प्रत्येक भाग थोडे-थोडे मोठे लिहावेत अशी सूचना करण्याचे स्वातंत्र्य घेतो.

म्हया बिलंदर's picture

15 Jul 2023 - 7:07 am | म्हया बिलंदर

सुचनेचे स्वागत. विषय 'वाचकांना रटाळ वाटेल की काय' या भीतीपोटी आपसूक लेखांची लांबी रुंदी खुंटली असेल. खरंतर लिहिताना मला हे लिखाण देखील मोठं वाटत होतं.

चित्रगुप्त's picture

12 Jul 2023 - 6:43 pm | चित्रगुप्त

माहितीपूर्ण लेखमाला उत्तम चालली आहे. फरिदाबादमधे १९९१ ते २०२२ एवढी वर्षे राहूनही या अमृता हॉस्पिटलचे नावही ऐकलेले नाही, हे एक भाग्यच म्हणावे लागेल, कारण या काळात एकदाही कोणत्याच इस्पितळात दाखल व्हावे लागलेले नाही, आणि डेंटिस्ट सोडून फारसे कुणा डॉक्टरकडेही जावे लागले नाही.

विवेकपटाईत's picture

18 Jul 2023 - 6:29 am | विवेकपटाईत

वाचकांना हॉस्पिटल्स चे खर्च ही कळले. उत्तम माहिती.

म्हया बिलंदर's picture

18 Jul 2023 - 9:30 am | म्हया बिलंदर

प्रतिसादाकरिता सर्वांचे आभार.