जुलाबावरील जीवरक्षक प्रथमोपचाराचा मौलिक शोध

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
19 Jul 2023 - 4:34 pm

"हगवणीवर बहुगुणी
मीठ साखर पाणी"

या शासकीय जाहिरातीने आपल्या सामाजिक आरोग्य क्षेत्रात दीर्घकाळ अधिराज्य गाजवलेले आहे. अतिशय सोपा असलेला हा घरगुती प्रथमोपचार म्हणजे जुलाबाच्या रुग्णांसाठी वरदान असते. जुलाब ही पचनसंस्थेशी संबंधित असलेली समस्या जगभरात मोठ्या प्रमाणात आढळते. मुळात जुलाब हा ‘आजार’ नाही, परंतु ते काही आजारांचे एक लक्षण आहे. विविध प्रकारचे सूक्ष्मजीव संसर्ग आणि अन्नातून झालेली विषबाधा ही त्याची प्रमुख कारणे. जुलाबाद्वारे शरीरातून मोठ्या प्रमाणात पाणी आणि क्षार बाहेर टाकले जातात. त्यामुळे चयापचय आणि रक्ताभिसरणावर विपरीत परिणाम होतो. परिणामी असा रुग्ण मलूल होतो. त्यातून जर वेळीच योग्य उपचार मिळाले नाहीत तर तो दगावण्याचाही धोका असतो. लहान मुलांचे जुलाब मोठ्या माणसांच्या तुलनेत अधिक काळजी उत्पन्न करतात. मूलतः जुलाबांमध्ये शरीरात जलक्षारन्यूनता होते. म्हणून औषधोपचारांच्या साहाय्याने ती भरून काढणे हा या आजाराचा प्रथमोपचार ठरतो.

या वरवर सोप्या वाटणाऱ्या प्रथमोपचाराच्या शोधाचा इतिहास मोठा रंजक आहे. त्याचा आढावा घेण्यासाठी हा लेख.
ok

विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात जुलाबाच्या समस्येवर वैद्यकीय विश्वात संशोधन जोमाने चालू होते. याबाबतीत वैज्ञानिकांचे मूलतः दोन गट होते :
१. एका गटाने गटाचे मत असे होते, की जुलाबाचे प्रमुख कारण हा जंतुसंसर्ग असल्याने त्याच्या उपचारांसाठी प्रतिजैविकांचा शोध महत्त्वाचा आहे.
२. तर दुसऱ्या गटाचा रोख मुख्यत्वे शरीरातून बाहेर पडलेले पाणी आणि क्षार बाहेरून भरून काढण्याकडे होता.

सन 1920 च्या सुमारास या संदर्भात एक प्रमाणित उपचार उपलब्ध झाला. त्यामध्ये पाणी आणि क्षारांचे शरीरायोग्य मिश्रण रक्तवाहिनीतून देण्याचे ठरले (इन्फ्युजन). अर्थात यासाठी रुग्णाना रुग्णालयात दाखल करून घ्यावे लागले. हा उपचार अर्थातच प्रभावी होता. परंतु त्या काळात कॉलरा आणि अन्य काही आजारांच्या वारंवार साथी येत. त्यामध्ये गरीब देशांतले असंख्य लोक जुलाबाने त्रस्त होत आणि त्यातून कित्येकांचे मृत्यू होत. इतक्या मोठ्या प्रमाणावरील बाधित रुग्णांसाठी रुग्णालयाच्या पातळीवरील हा उपचार व्यवहार्य नव्हता; किंबहुना तो अशक्यप्राय होता. यातून बोध घेऊन काही वैज्ञानिकांनी तोंडातून सहज देता येईल अशा मिश्रणाचा (Oral Rehydration Therapy; ORT) शोध सुरू केला.

या संशोधनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात विविध नैसर्गिक वनस्पती आणि फळांचा वापर करण्यात आला. त्यामध्ये शुष्क केळे, गाजराचे सूप आणि carob या झाडापासून केलेले पीठ यांचा समावेश होता. अर्थात हे उपचार crude स्वरूपाचे होते; मात्र पुढील संशोधनासाठी ते काहीसे मार्गदर्शक ठरले.

दरम्यान प्रगत देशांमध्ये इन्फ्युजनद्वारा देण्याच्या पाणी व क्षार यांच्या शास्त्रशुद्ध मिश्रणाचा वापर रुळला होता. या संदर्भात प्रामुख्याने Darrow या वैज्ञानिकांचे संशोधन पथदर्शक ठरले. एव्हाना वैज्ञानिकांची भिस्त जरी इन्फ्युजनद्वारा द्यायच्या द्रावणावरच होती तरीसुद्धा तोंडाने देता येईल अशा द्रावणाच्या शोधाची गरज त्यांना प्रकर्षाने जाणवत होती. Darrow यांनी सुरुवातीस यासाठी पोटॅशियम, lactate आणि ग्लुकोज यांच्या मिश्रणाचा वापर सुचवला होता.

सन 1950 च्या दरम्यान तोंडातून घेण्याच्या साखर व क्षारयुक्त पावडरी औषध बाजारात मिळू लागल्या. त्या शास्त्रशुद्ध नव्हत्या आणि त्यांना औषध प्रशासनाची मान्यता नव्हती. त्या दुकानांमध्ये सहज (OTC) मिळत असल्याने समाजात त्यांचा वापर वाढू लागला. परंतु लवकरच त्या पावडरीचा एक दुष्परिणाम दिसून आला. त्यांच्यात असलेले साखर व क्षाराचे प्रमाण शरीराला गरज असलेल्या प्रमाणापेक्षा बरेच जास्त असायचे. अशा प्रकारच्या अप्रमाणित उपचारातून रोग्याचे जुलाब बरे होण्याऐवजी प्रसंगी ते वाढत असल्याचे दिसले.

या निरीक्षणामुळे वैद्यक विश्वातले बहुसंख्य डॉक्टर्स इन्फ्युजनद्वारा द्यायच्या द्रावणाचाच पुरस्कार करीत होते. किंबहुना शरीरातील जलन्यूनता भरून काढताना प्रथम इंजेक्शनचाच वापर आणि त्यातून रुग्ण सुधारल्यानंतर पुढच्या टप्प्यात तोंडातून द्यायच्या द्रावणाची शिफारस केली गेली. मात्र काही वैज्ञानिकांच्या मनात हे पक्के होते, की अधिकाधिक संशोधन करून प्रथमोपचार म्हणून तोंडातून द्यायच्या शास्त्रशुद्ध द्रावणाची गरज निर्विवाद आहे.

1953 ते 1958 च्या दरम्यान वैज्ञानिकांनी गिनीपिगच्या लहान आतड्यांवर बरेच संशोधन केले. त्यांचा मुख्य उद्देश हा होता, की या आतड्यातून ग्लुकोज आणि सोडियमचे शोषण कशा प्रकारे होते, हे अभ्यासणे. या संशोधनाचा निष्कर्ष असा निघाला की आतड्यातून ग्लुकोजचे शोषण होण्यासाठी सोडियमची आवश्यकता असते. पुढील काही प्रयोगांमध्ये हेही दिसून आले की ग्लुकोज आणि सोडियम एकत्र दिल्याने सोडियमच्या शोषणाचे प्रमाण देखील वाढते. यातूनच सोडियम, ग्लुकोज आणि पाणी यांचे योग्य प्रमाणात मिश्रण करावे हा मुद्दा पटलावर आला.

1961 मध्ये फिलिपिन्समध्ये कॉलराची खूप मोठी साथ आली. तिचा मुकाबला करण्यासाठी डॉक्टर रॉबर्ट फिलिप्स यांनी तिथे नौदलातील चमू पाठवला. साथ मोठी असल्याने त्यांनी इन्फ्युजनद्वारा उपचारांवर भर दिला आणि मृत्युदर आटोक्यात ठेवला. परंतु पुन्हा 1962 मध्ये तिथेच कॉलराची जोरदार साथ परतली. यावेळेस डॉ. फिलिप्स यांनी सोडियम, ग्लुकोज व पाणी यांचे मिश्रण तोंडाने देण्याचे प्रयोग सुरू केले. त्यात त्यांना थोडेफार यश आले. पुढे त्यांनी या मिश्रणाच्या संदर्भात शास्त्रशुद्ध प्रयोग चालू केले. परंतु त्या प्रयोगांदरम्यान पाच जणांचा मृत्यू उद्भवला. या घटनेमुळे हे संशोधन काही काळ रोडावले गेले. या पुढील संशोधनात तोंडाने द्यायच्या द्रावणात तीन घटकांचे सुयोग्य प्रमाण ठरवणे हा कळीचा मुद्दा होता. तसेच हाही मुद्दा समजला होता, की वरील तीन घटकांचे प्रमाण अयोग्य राहिल्यास त्याच्या सेवनातून रुग्ण बरा होण्याऐवजी दगावण्याचा धोका असतो.

आतापर्यंत वर्णन केलेले संशोधन प्रगत देशांतील वैज्ञानिकांच्या अधिपत्याखाली चालू होते. वास्तविक त्या काळात कॉलरा आणि अन्य काही साथी आशियाई देशांमध्ये जोरात होत्या. त्या दृष्टीने या संदर्भातील संशोधन केंद्र आशियात असण्याची नितांत गरज होती. 1960 मध्ये तत्कालीन पूर्व पाकिस्तानातील ढाका येथे असे केंद्र स्थापन झाले. इथल्या वैज्ञानिकांची डॉ.फिलिप्स यांच्या संशोधनावर नजर होती. या वैज्ञानिकांना मार्गदर्शन करण्यासाठी पाश्चात्य देशातील काही वैज्ञानिक इथे दाखल झाले. इथली महाभयंकर साथ बघून त्यांचे असे ठाम मत झाले, की या साथी आटोक्यात आणण्यासाठी इंजेक्शनद्वारा उपचारांचीच गरज आहे. निव्वळ तोंडातून देण्याच्या द्रावणांनी अशा साथी आटोक्यात येण्याबद्दल त्यांना साशंकता होती. त्यानुसार रुग्णालयात पारंपरिक इंजेक्शनद्वारा उपचार चालू झाले. परिणामी रुग्णालयातील या आजाराचा मृत्यूदर 40% वरुन अवघ्या 1% पर्यंत कमी झाला.

सन 1966 पर्यंत झालेल्या संशोधनातून वैज्ञानिक इतपत मानायला तयार होते की तोंडाने द्यायचे द्रावण हे प्रौढांसाठी एकवेळ ठीक आहे, परंतु मुलांच्या जुलाबांमध्ये ते उपयुक्त ठरणार नाही. दरम्यान ढाक्याच्या जोडीने कलकत्त्यातही असेच एक संशोधन केंद्र चालू झालेले होते. या दोन केंद्रांची एकमेकांशी बऱ्यापैकी वैज्ञानिक स्पर्धा असायची. 1967 च्या कॉलरा साथीत बऱ्याच रुग्णांना त्यांच्या तोंडातून जठरात नळी घालून त्याद्वारे द्रावणाचे उपचार दिले गेले. त्यानंतर चित्तगांगमध्ये पुढची कॉलराची साथ आली यावेळेस रुग्णाच्या तोंडातून नळीद्वारा लिटरभर द्रावण देण्याचे उपचार बऱ्याच जणांवर झाले. परंतु द्रावण नक्की किती द्यायचे हे अद्याप ठरत नव्हते. परिणामी या उपायांना अपयश आले.

परंतु Nalin Cash या दोन वैज्ञानिकांनी अजून आशा सोडलेली नव्हती. त्यांनी झटून अभ्यास करून या उपचारांचे नवे सुधारित प्रमाण ठरवले आणि काहीही करून हा उपाय जंगलात राहणाऱ्या बाधितांसाठी वापरायचे ठरवले. ढाक्यातील पुढच्या साथीत त्यांनी त्या सुधारित द्रावणाचा पुरेपूर वापर केला. आनंदाची गोष्ट म्हणजे या खेपेस तोंडातील द्रावणाच्या वापरामुळे इंजेक्शनद्वारा द्यायच्या उपायांची गरज 80% नी कमी झाली. दरम्यान कलकत्ता इथले वैज्ञानिक देखील यावर झटून अधिक संशोधन करीत होते. या दोन्ही आरोग्य केंद्रांमध्ये या संदर्भात मोठी चुरस होती. तसेच इथल्या वैज्ञानिकांचे प्रमुख असलेल्या पाश्चिमात्य देशातील वरिष्ठांकडून त्यांना तोंडातील द्रावणाचे मोठ्या प्रमाणावर प्रयोग करण्यास पुरेशी परवानगी देखील मिळत नव्हती. परंतु या सर्व अडचणींवर मात करून Nalin व Cash या दोघांनी आपले प्रयत्न नेटाने चालू ठेवले आणि लवकरच त्यांनी दोन महत्त्वाच्या गोष्टींमध्ये यश मिळवले :

१. कॉलराखेरीज अन्य आजारांमुळे झालेल्या जुलाबांमध्येही या द्रावणाचा उपयोग यशस्वी झाला.
२. मोठ्या माणसांच्या जोडीने लहान मुलांच्या जुलाबांमध्येही ते द्रावण चांगल्यापैकी उपयुक्त ठरले.

ok
या संशोधनातील यापुढील महत्त्वाचा टप्पा भारतीयांच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे. कलकत्त्यातील संशोधन केंद्रातील बालरोगतज्ञ डॉ. दिलीप महालनबीस यांनी या उपचाराचा प्रभावी वापर 1971 च्या बांगलादेशच्या स्वातंत्र्य युद्धात केला. या युद्धात तत्कालीन पूर्व पाकिस्तानातील असंख्य निर्वासित भारतात येऊन धडकले होते. त्यांच्या छावण्यांमध्ये कॉलराची प्रचंड साथ पसरली. त्यांच्या उपचारांसाठी तिथे अवघ्या 16 खाटा उपलब्ध होत्या तर निर्वासितांची संख्या जवळपास साडेतीन लाख !

या परिस्थितीत रुग्णांना दाखल करून इन्फ्युजनद्वारा उपचार देणे अशक्यप्राय होते. या परिस्थितीत डॉ. महालनबीस यांनी तिथल्या असंख्य रुग्णांवर तोंडी द्रावणाचा उपचार केला. आतापर्यंतच्या संशोधनानुसार त्यांनी या द्रावणातील घटकांचे प्रमाण असे ठेवले होते :

22g glucose, 3.5g sodium chloride, 2.5g sodium hydrogencarbonate (+ १ लिटर पाणी)

या पावडरच्या पुड्या मोठ्या प्रमाणावर तयार करुन त्या छावण्यांमध्ये वाटल्या गेल्या. एका पुडीची किंमत फक्त अकरा पैसे होती. आजारी लहान मुलांना वरील द्रावणाव्यतिरिक्त पोटॅशियम देखील तोंडातून देण्यात आले. या प्रभावी मोहिमेमुळे निर्वासितांमधील कॉलरा चांगल्यापैकी आटोक्यात आला. या आणीबाणीच्या आणि अत्यंत खडतर परिस्थितीत डॉक्टरांच्या चमूने केलेले कार्य प्रशंसनीय होते. त्याची दखल युनिसेफ आणि डब्ल्यूएचओने घेतली.

ok

( गतवर्षी म्हणजे 16 ऑक्टोबर 2022 रोजी डॉ. महालनबीस यांचे वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाले. त्यांनी केलेल्या अतुलनीय सामाजिक आरोग्य सेवेबद्दल त्यांना २६/१/२०२३ रोजी भारत सरकारतर्फे मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला).

या प्रभावी कार्यामुळे वैज्ञानिकांच्या चमूत उत्साहाचे वातावरण होते. यापुढील संशोधनातून हे देखील सिद्ध झाले, की अगदी एक महिन्याच्या बालकांवर देखील या तोंडी द्रावणाचा उपचार प्रभावी ठरतो. तसेच Hirschhorn या पाश्चिमात्य वैज्ञानिकांनी असे मत व्यक्त केले की, तोंडाने देण्याचा हा उपचार इंजेक्शनच्या उपायापेक्षा अधिक चांगला आणि व्यवहार्य आहे. इंजेक्शनद्वारा द्रावण देताना ते किती प्रमाणात दिले आणि लघवीचे प्रमाण किती होते, इत्यादी गोष्टींवर काटेकोर लक्ष ठेवावे लागते.
आता Hirschhorn यांनी या उपचारांचा प्रसार अमेरिकेत करण्याचे ठरवले. तिकडे कॉलरा हा जरी आरोग्य प्रश्न नसला तरी मुलांमध्ये जुलाबाचे इतर अनेक प्रकार होते. Hirschhorn यांनी तिथल्या अनेक बालरोगतज्ञांना या उपचाराचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. परंतु तिथल्या डॉक्टरांचा या ‘सोप्या’ उपचाराकडे बघण्याचा दृष्टिकोन साशंक होता. कित्येकजण इंजेक्शन-उपचार हेच शास्त्रीय आहेत या मुद्द्याला घट्ट चिकटून होते. इन्फ्युजनच्या जोडीने जेव्हा तोंडाने काही द्यायचे असते तेव्हा फळांचे रस, कोला आणि इतर काही पेयांचाच ते डॉ पुरस्कार करीत. तर कित्येकांनी ORT या उपायाची टिंगलही केली.

या उलट जगातील इतर काही देशांनी मात्र या उपायाकडे जातीने लक्ष दिले. सहा वर्षांच्या कालावधीत जागतिक पातळीवर जुलाबांच्या या उपचारासंदर्भात ध्येयधोरणे निश्चित करण्यात आली. 1979 मध्ये ढाक्यातील मूळ केंद्राचे नाव बदलून त्याला आंतरराष्ट्रीय केंद्र म्हटले गेले. या उपचारांचा स्वीकार जगभरातून होऊ लागल्यानंतर कित्येक वर्षांनी म्हणजे 1992 मध्ये अमेरिकेत वैज्ञानिकांच्या एका गटाने राष्ट्रीय पातळीवर या उपचारांचा पुरस्कार केला.

कॉलरामध्ये शरीरातून खूप मोठ्या प्रमाणावर पाणी व क्षार बाहेर पडतात. त्या दृष्टिकोनातून तोंडाने देण्याच्या मिश्रणातील क्षारांचे प्रमाण ठरवले गेले होते. कालांतराने जगभरात या आजाराच्या साथी ओसरल्या. अन्य आजारांमुळे होणाऱ्या सौम्य ते मध्यम जुलाबांसाठी मूळ मिश्रणातील क्षारांचे प्रमाण कमी करण्यात आले(13.5 g glucose, 2.6 g sodium chloride & 1.5 g KCl) .

1969 हे ORT उपचार प्रस्थापित झाल्याचे वर्ष समजले जाते. मात्र या सोप्या पण प्रभावी उपचारांचा जनक कोण, हा प्रश्न अनुत्तरीत आणि वादग्रस्त आहे. कित्येक डॉक्टर्स आणि वैज्ञानिकांनी व्यक्तिगत पातळीवर यासम उपचार पूर्वीच केलेले होते परंतु त्यांना पुरेशी प्रसिद्धी मिळाली नाही. 1953 मध्ये हेमेंद्रनाथ चटर्जी या भारतीय डॉक्टरांनी या संदर्भात महत्त्वपूर्ण काम केलेले होते तसेच इराकमधील Al-Awqati यांचेही योगदान महत्त्वाचे आहे. परंतु वैज्ञानिक जगतात या दोघांनाही कधी श्रेय दिले गेले नाही.

आज जगभरात कॉलऱ्याच्या जीवघेण्या साथी फारशा येत नाहीत. परंतु लहान मुले आणि वृद्धांमधील विविध कारणांमुळे होणारे चिंताजनक जुलाब हा महत्त्वाचा आरोग्य प्रश्न आहेच. विकसनशील देशांमध्ये जुलाबाचा प्रथमोपचार म्हणून ORT मोठ्या प्रमाणावर देतात. अर्थात तोंडी द्रावणाचा वापर हा काही जुलाब या मूलभूत समस्येवरचा अंतिम उपाय नव्हे. जुलाबांचे आजार कमीत कमी राहण्यासाठी सर्वांना पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा अणि सुयोग्य मलनिःसारण या प्रतिबंधात्मक उपायांवर लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
*****************************************
संदर्भ :
1. MAGIC BULLET: THE HISTORY OF ORAL REHYDRATION THERAPY

2. Oral rehydration salts

जीवनमानआरोग्य

प्रतिक्रिया

टर्मीनेटर's picture

19 Jul 2023 - 5:02 pm | टर्मीनेटर

रोचक माहिती!
पद्मविभूषण डॉ. दिलीप महालनबीस ह्यांची सामाजिक आरोग्य सेवा अतुलनीय आहे, त्यांना भावपुर्ण आदरांजली 🙏

शानबा५१२'s picture

19 Jul 2023 - 5:35 pm | शानबा५१२

२ चमचे तुप, २ चमचे खसखस आणि १ चमचा साखर. गरम करा एकत्र. बस्स.......बंद. फक्त एकदा घेउनच.

उग्रसेन's picture

25 Jul 2023 - 10:56 am | उग्रसेन

उपाय भारी दिसतो. परिस्थिती नियंत्रणात येते काय ?
सायक्लोफाम आणि ओटू लक्षणे वाटायला लागली घेतो.

राजेंद्र मेहेंदळे's picture

19 Jul 2023 - 7:18 pm | राजेंद्र मेहेंदळे

कुमार सरांच्या सिद्धहस्त लेखणीतुन उतरलेला अजुन एक माहीतीपूर्ण लेख. सोप्या भाषेत असे विषय समजवुन सांगण्याची हातोटी फार कमी जणांकडे असते.

"महालनोबिस" असेही म्हणतात काहीजण. त्यांच्या कार्याला सलाम!!

सुखी's picture

19 Jul 2023 - 8:10 pm | सुखी

ऊत्तम माहिती

कुमार१'s picture

19 Jul 2023 - 8:43 pm | कुमार१

अभिप्राय व पूरक माहितीबद्दल सर्वांना धन्यवाद.

"महालनोबिस" असेही म्हणतात काहीजण.

>>>
बरोबर. बंगाली उच्चारांची ती खासियत आहे.
आपल्याकडे महाराष्ट्रात " ****नवीस /नीस" असे बरेच असतात.

Nitin Palkar's picture

24 Jul 2023 - 11:27 am | Nitin Palkar

ऊत्तम माहिती.. नेहमी प्रमाणेच.

विअर्ड विक्स's picture

25 Jul 2023 - 9:49 am | विअर्ड विक्स

नॉर्मल फ्लोरा वर काही लिहायला जमेल का ?

नॉर्मल फ्लोरा वर काही लिहायला

हा विषय या आधी अन्य एका सभासदांनी पण सुचवलेला आहे आणि मी तो प्रतीक्षा यादीत ठेवला आहे.
बघूया, पुढच्या वर्षी प्रयत्न करतो.

चामुंडराय's picture

29 Jul 2023 - 8:13 am | चामुंडराय

आजकाल "गट बॅक्टेरिया" चा खूप बोलबाला आहे.
काही मंडळींचा human microbiome हा शरीराचा एक अवयवच समजावा असा आग्रह आहे.
नक्की लिहा. वाचायला आवडेल.

सुधीर कांदळकर's picture

29 Jul 2023 - 7:56 am | सुधीर कांदळकर

या संदर्भात दोन आठवणी आल्या ....

१. १ लिटर स्वच्छ पिण्याच्या पाण्यात एक खडा गूळ आणि चमचाभर मीठ विरघळवून बालकांस द्यावे असे दूरचित्रवाणीवर त्या काळात वारंवार सांगितले जात असे.

२. क्लोरोडाईन बीपीसी (ब्रिटीश फार्मास्युटीकल कोडेक्स) यात टिंक्चर ओपियमचा वापर केलेला आहे. त्यासोबत क्लोरोफॉर्म आणि अ‍ॅनास्थेटीक ईथर अणि ज्येष्टीमध संपृक्तअर्क यांचा विशिष्ट प्रमाणात भाग होता आणि केवळ १० थेंब पाण्यात मिसळून घेण्याचे प्रमाण होते असे अंधुकसे आठवते आहे. १० मिलीच्या काचेच्या छोट्या बाटल्यात हे भरले जाई. हे (बहुधा यातील ओपियममधील मॉर्फीनमुळे) गुणकारी असल्यामुळे फार विकले जात असे. नंतर याचा वापर नशेसाठी सुरू झाल्यामुळे बहुतेक देशात या उत्पादनावर पूर्ण बंदी आली. बीपीसी १९७३ हे प्रमाण पुस्तक त्यासाठी मी वापरलेले आहे. त्यात हे बनविण्याची पूर्ण कृती दिलेली होती.

असो. एका इतिहासजमा उत्पादनाची आठवण झाली. धन्यवाद.

कुमार१'s picture

29 Jul 2023 - 9:16 pm | कुमार१

अभिप्राय व पूरक माहितीबद्दल सर्वांना धन्यवाद.

क्लोरोडाईन बीपीसी

चांगली आठवण.

कुमार१'s picture

29 Jul 2023 - 9:16 pm | कुमार१

अभिप्राय व पूरक माहितीबद्दल सर्वांना धन्यवाद.

क्लोरोडाईन बीपीसी

चांगली आठवण.

अत्यंत रोचक आणि तपशीलवार लेख.

सामान्य मनुष्याला असा प्रश्न मात्र पडू शकतो की मीठ साखर पाणी हा फॉर्म्युला (फक्त वजनाचे प्रमाण योग्य ठरवणे) इतक्या साध्या सोल्युषनसाठी इतकी दशके मोठेमोठे संशोधन आणि अथक परिश्रम करावे लागले? असे असेल तर उगीच क्लिष्ट किचकट उपाय आगोदर ट्राय करून साधे सोपे सरळ उपाय मात्र नंतर आजमावले गेले असं म्हणता येईल का?

सिंपल थिंकिंग इज रेअर, असं नेहमी वाटत आलं आहे त्याचं एक आणखी उदाहरण?

कुमार१'s picture

30 Jul 2023 - 10:44 am | कुमार१

गवि,
अतिशय चांगला मुद्दा तुम्ही उपस्थित केला आहे. गतवर्षी जेव्हा डॉ. महालनबीस यांचे निधन झाले तेव्हा मी दोघातिघा परिचिताना या विषयाबद्दल बोललो. त्यांच्याकडूनही हाच प्रश्न आला,

“ साध्याशा तीन गोष्टींच्या मिश्रणासाठी इतकी वर्ष संशोधनासाठी लागतात ?”

या लेखासाठी जो मुख्य संदर्भ ( 1) वापरलेला आहे त्यात या सगळ्या संशोधनामागच्या मानवी प्रवृत्तींचा इतिहास दिलेला आहे. तो मुळातून वाचण्यासारखा आहे. त्यातली काही निवडक वाक्ये खाली उद्धृत करतो आहे.

( मुळात ही संकल्पना सन 1830 पासूनच अस्तित्वात होती. परंतु इतका सोपा घरगुती उपचार हा काय ‘उपचार’ असतो का, ह्या प्रवृत्तीमुळे हे प्रकरण खूप लांबले गेलेले दिसते).

JOSHUA NALIBOW RUXIN
असे म्हणतात :

The simplicity of ORT contrasts starkly with the story of its discovery which overflows with abrasive personalities, professional jealousies, and scientific breakthroughs, as well as with an unusual degree of scientific co-operation…...

Furthermore, it demonstrates how the prejudices of the medical establishment and its reverence for advanced technology can postpone life-saving discoveries...

…. The formidable and persistent ignorance of the Western medical establishment, which continues over twenty-five years after the discovery of ORT, is phenomenal. While its refusal to advocate ORT may be due in part to the notion that ORT is only necessary for people in the developing world, its actions appear to be driven also by financial considerations.