कथा सिनेमाच्या भाग ५

साहना's picture
साहना in जनातलं, मनातलं
20 Jun 2023 - 1:04 am

आजच्या लेखमालेत एक विशेष चित्रपटाची कथा आम्ही पाहणार आहोत. भारतीय चित्रपटांत अनेक वेळा चित्रपटाची नावे हि जुन्या गाण्यावरून ठेवली जातात. उदाहरणार्थ "प्रेम रतन धन पायो", "एक में और एक तू", "मेरी प्यारी बिंदू" इत्यादी. हॉलिवूड मध्ये सुद्धा हि प्रथा पाहायला मिळते. कधी कधी चित्रपट जुन्या गाण्याला लोकप्रिय करतो तर कधी उलटपक्षी होते. आजचा चित्रपट अश्याच एका गीताच्या नावावरून आहे. "स्टॅन्ड बाय मी". (चित्रपट मुद्दामहून पाहण्यासारखा आहे)

चित्रपटांच्या श्रेणी असंख्य आहेत. स्त्री प्रधान, पुरुष प्रधान इत्यादी आणि त्यांत सुद्धा लहान मुले असली तर "coming of age" हि एक वेगळीच श्रेणी आहे. ह्या चित्रपटांत एक चित्रपटांत एक उब दडलेली असते ज्याचा अनुभव आम्ही सर्वानीच कधी न कधी घेतलेला असतो. काही साधे सोपे अनुभव पण बालमानांच्या दृष्टिकोनातून ते वेगळेच वाटतात. आपण मोठे होत असताना आपल्यांत काय काय बदल झाले ते ह्याच अनुभवांवर अवलंबून असतात. ज्या गोष्टी आम्ही एके काळी महत्वाच्या समजल्या होत्या, ज्या मैत्री आम्हाला अतूट वाटल्या होत्या ते सर्व काही झूट होते हे प्रौढ होताना लक्षांत येते. एक दुःख तर वाटतेच पण ती जुन्या अनुभवाची शिदोरी वारंवार उघडून बघावीशी सुद्धा वाटते.

सई परांजपे ह्यांचा "हालो" हा असाच एक विलक्षण चित्रपट होता ज्याने माझ्या मनावर लहानपणी खूप मोठा परिणाम केला. तो चित्रपट सुद्धा ह्याच श्रेणीमधला. निवडुंग चित्रपटातील एक गीत आहे आणि त्यातील एक बोल आहेत "अंगणात गमले मजला ... संपले बालपण माझे". आपली आई मेली त्या दिवसाबद्दल सांगणारे हे गीत आहे आणि कवी सांगतो कि आई गेली आणि त्या क्षणी माझे बालपण संपले ह्याची जाणीव मला झाली ! अश्याच घटनांना केंद्र बिंदू ठेवून coming of age श्रेणीतील चित्रपट बनवले जातात.

इथे लिंगभेद महत्वाचा आहे. Now and Then हा चित्रपट स्त्री प्रधान आहे. कारण त्या वयातील मुली आणि मुले वेगळ्या पद्धतीने विचार करतात. पण stand by me हा माझ्या मते पुरुषप्रधान चित्रपट आहे.

कथा लिहिली आहे सुप्रसिद्ध भयकथा लेखक स्टीफन किंग ह्यांनी. IT, पेट सिमेट्री आणि असंख्य चित्रपट त्यांच्या कथावर आधारित आहेत. भुते, मृत्यू, इत्यादी गोष्टी त्यांच्या कथांत विपुल असतात पण स्टीफन किंग ह्यांची खरी जमेची बाजू म्हणजे मानवी मनाचा थांग घेणे त्यांना खूप छान प्रकारे जमते. अनेक वेळा चित्रपटांत त्यांचे डायलॉग्स सुद्धा असतात ते कायमचे आठवणीत राहतात.

स्टॅन्ड बाय मी ची कथा अशीच आहे. चित्रपट अगदी आवर्जून पाहावा असे मी इथे सांगत असल्याने स्पॉईलर्स देत नाही. चित्रपट खिळवून ठेवणारा आहे त्यामुळे तुम्हाला अजिबात कंटाळा येणार नाही. बहुतेक पुरुषांना चित्रपट १००% आवडतो पण स्त्रियांना विशेष आवडत नाही, अपवाद फक्त रसिक स्त्रीमंडळीचा.

अमेरिकेतील एका छोट्या शहरांतील एक लहान मुलगा जंगलांत फळे शोधायला जातो आणि परत येत नाही. ह्या मुलाची हि बातमी सर्वत्र चर्चिली जात आहे. ४ १२-१३ वर्षांच्या मुलांची एक टोळी आहे त्यातील एकाला आपल्या मोठ्या भावाकडून ऐकायला येते कि ह्या मुलाचे मृत शरीर खोल जंगलांत रेल्वे ट्रेक च्या बाजूला पडलेले आहे. हा मोठा भाऊ गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने पोलिसाना वगैरे सांगण्याच्या भानगडीत पडत नाही.

आता हे आपले ४ वीर चालत जंगलांत जायचे ठरवतात. कुणीही मृत शरीर पहिले नाही म्हणून त्यांच्यासाठी हे एक ऍडव्हेंचर आहे. पण रस्ता कठीण आणि धोक्यानी भरलेला आहे त्यामुळे त्यांच्या मैत्रीची परीक्षा घेणारा ठरू शकतो. ह्या चित्रपटांत छोटे छोटे सीन्स जे आहेत तेच अतिशय काळजाला हात घालणारे आहेत. दुर्दैवाने मी त्याबद्दल लिहिले तर त्यातील मजाच जाईल.

चित्रपटाची सुरुवात होते आपला निवेदक गाडीत बसून एक वर्तमान पत्र वाचत आहे आणि त्यांत सुद्धा एक खुनाची बातमी आहे (चित्रपट पाहाल असाल तर लक्षपूर्वक बातमी पहा). निवेदक कथा सांगतो आणि स्पष्ट होते कि त्या ४ मुलांतील एक आपला लेखक आहे. कथा पुढे सरकत जाते तशी निवेदक सुद्धा आम्हाला त्याबद्दल सांगत राहतो. निवेदक आता खूप प्रौढ आहे त्यामुळे चित्रपटांतील घटनांना तो आपल्या दृष्टिकोनातून सांगतो.

उदाहरणार्थ एके ठिकाणी तो सांगतो :

> We talked into the night. The kind of talk that seemed important until you discover girls.

(त्या रात्री आम्ही खूप विषयांवर बोलत बसलो, असे विषय जे तो पर्यंत खूप महत्वाचे वाटत जो पर्यंत तुम्हाला मुलींचे आकर्षण वाटू लागलेले नसते)

> Writer: (voice over) None of us could breathe. Somewhere under those bushes was the rest of Ray Brower. The train had knocked Ray Brower out of his Keds just like it had knocked the life out of his body.

> Writer: (voice over) The kid wasn’t sick. The kid wasn’t sleeping. The kid was dead.

मृत्यू म्हणजे काय हे ज्यांना अजिबात ठाऊक नाही त्या व्यक्ती जेंव्हा एक मृत शरीर पाहतात तेंव्हा त्यांचा मनात काय विचार येईल ? स्टीफन किंग खरोखर ती भावना टिपतात.

शेवटी जेंव्हा आपले ४ वीर शहरांत परत येतात तेंव्हा पुन्हा निवेदक सांगतो :

"We headed home. And although many thoughts raced through our minds we barely spoke. We walked through the night and made it back to Castle Rock a little past five o’clock on Sunday morning, the day before Labor Day. We’d only been gone two days. But somehow the town seemed different. Smaller.”

जी भावना किती कालातीत आहे ? आपला गांव तुम्हाला सर्वस्व वाटतो पण जगाचे काहीच अनुभव घेतले कि तोच गांव एक दुसऱ्या दिवसांत खूप छोटा वाटू लागतो.

स्टॅन्ड बाय मी हि मैत्रीची कथा आहे. पुरुषी मैत्री आणि स्त्री मैत्री ह्यांत बरीच तफावत असली तरी काही गोष्टी दोन्ही लिंग समजू शकतात.

कथेच्या शेवटी आम्ही ऐकतो:

"As time went on we saw less and less of Teddy and Vern until eventually they became just two more faces in the halls. That happens sometimes. Friends come in and out of your life like busboys in a restaurant."

क्रिस, गोर्डि, व्हेर्न आणि टेड्डी ह्या चार लोकांचे संपूर्ण ऍडव्हेंचर आम्ही सुद्धा पाहतो त्यामुळे जेंव्हा कथेच्या शेवटी हे शब्द कानावर पडतात तेंव्हा थोडे दुःख झाल्याशिवाय राहत नाही.

पण चित्रपटाची शेवटची ओळ कदाचित स्टीफन किंग ह्यांची सर्वांत चांगली ओळ आहे :

"I never had any friends later on like the ones I had when I was twelve.
Jesus, does anybody?” -the Writer"

चित्रपट संपतो तेंव्हा स्टॅन्ड बाय मी हे सुप्रसिद्ध गाणे लागते. माझ्या माहितीप्रमाणे ह्या चित्रपटामुळे हे गाणे सुप्रसिद्ध झाले.

तुम्हाला चित्रपट पाहायचा नसेल तर फक्त हि शेवटची ४ मिनिटे पहा :

https://www.youtube.com/watch?v=oBvRV_-FJwg

चित्रपट

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

20 Jun 2023 - 9:44 am | मुक्त विहारि

चित्रपट परिक्षण आवडले

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

20 Jun 2023 - 2:31 pm | हणमंतअण्णा शंकर...

नेट्फ्लिक्सवर मागच्या आठवड्यातच हा चित्रपट पाहिला.

कमाल चित्रपट आहे. कथा स्टीफन किंगची आहे हे सुरुवातीला ठाऊक नव्हते. शेवटी शेवटी कथा त्याचीच असावी असे जाणवू लागले.

बहुतेक पुरुषांना चित्रपट १००% आवडतो पण स्त्रियांना विशेष आवडत नाही, अपवाद फक्त रसिक स्त्रीमंडळीचा.

तुमचे हे निरिक्षण आवडले. मुलांची(पुरुषांची) सोशलाईज व्हायची पद्धत वेगळी असते. मित्र मित्र मैत्रीमध्ये खूप इंटर्नल पॉलिटिक्स खेळत नाहीत. पटले तर पटले नाहीतर तुटले असे असते. त्यात समेट सुद्धा त्वरित होते. त्यात टीनेजर मुलांचे लॉजिक, त्यांचे इश्युज भलतीकडेच चालत असते. फॉरबिडन गोष्टी करण्यात कोण थ्रील! त्यामुळे माझ्या भारतीय मैत्रिणींत लेस्बियन मैत्रिणींनाच हा चित्रपट आवडला.

परंतु, पाश्चात्य देशांत टीनेजर ग्रुप्समध्ये आज मुली सर्रास मुलांच्या कोअर ग्रुपचा भाग असतात आणि त्याही तितक्याच धाडसी असतात. मुलांचाही अ‍ॅटिट्यूड बर्‍यापैकी समावेशक झालेला आहे. मी बर्‍याचदा ग्राफिट्या रंगवताना मुलांना पाहतो त्या ग्रुप मध्ये एखादी मुलगी असतेच. तरीही आवर्जून एखाद्या जंगलात मुलांबरोबर त्या किती भटकत असतील माहित नाही.

तुषार काळभोर's picture

20 Jun 2023 - 9:22 pm | तुषार काळभोर

हा चित्रपट नक्कीच पाहण्यासारखा वाटतोय. मध्ये मध्ये पेरलेली वाक्ये सुद्धा मस्त.

मुलांतील मैत्री आणि मुलींतील मैत्री यात खूप फरक असतो. दोन मुलगे असोत किंवा ग्रुप असो, एखाद्याचं काही पटलं नाही तर बिनधास्त शिव्या देतील आणि थोड्या वेळाने एकमेकांचा डबा शेअर करतील. (मोठे झाल्यावर बियर शेअर करतील). एकजण म्हणाला की लालवाली मेरी की दुसरा मुद्दाम म्हणेल, निलीवली मेरी. :D

पण मुली! दोघी असोत की ग्रुप असो, हिने तिला सांगितलं पण मला नाही सांगितलं, हिने तिला माझ्याविषयी सांगितलं, ती त्या मुलाशी बोलली, मला न सांगता त्या तिघी शॉपिंगला गेल्या, माझा फोन उचलला नाही, अशा कसल्याही कारणाने आयुष्यभर एकमेकींचं तोंड बघणार नाहीत!