चहा पिऊन ताजा तवाना होतोय तेव्हढ्यात फोन आला.
“हॅलो अमुक. मी तुझ्यावर भयंकर रागावले आहे. का आला नाहीस? किती वाट पाहायला लावायची?” आवाजावरून तरी कोमल-१ वाटत होती.
“कोमल एक तर तू फ्रॉड आहेस किंवा मी म्याड आहे.” मी माझ्या आवाजावर नियंत्रण ठेवत बोललो.
“अर्थात तू म्याड आहेस. ते राहू दे. आज तुला हा साक्षात्कार व्हायचे काही खास कारण?” ती खोडकरपणाने बोलली.
“प्लीज, तुझा हा फाजीलपणा बंद कर.” मी जवळजवळ ओरडलो, “माझ्या कोमल भावनांशी निर्दयपणे खेळणाऱ्या स्त्रिये, कान खोलके सुनो. मी तुला भेटण्यासाठी पळत पळत पाचव्या मजल्यावर गेलो होतो. तुझ्या ऑफिसात तू -येस लाल टॉप परिधान केलेली तू- नखाला रक्त होय लाल भडक रक्त-फासत होतीस. चूप मध्ये बोलू नकोस. मला बोलू दे. मग काय सफाई द्यायची असेल ती दे. मी तुला आवाज दिला. तू माझ्याकडे लक्ष सुद्धा दिले नाहीस. केव्हढा माझा अपमान! जणू सगळ्या पुरुषजातीचा सूड माझ्यावर काढत होतीस. वर काय तर “तुम्ही डिस्टर्ब झाला आहात. तुम्ही श्रीमती प्रेमाबाई दह्याभाई मेमोरिअल हॉस्पिटलमध्ये जावे हे बरं. सर तुम्हाला तिथच भेटतील. मी त्यांना फोन करून ठेवते. तुमच्या बरोबर कोणी आहे? कोणीही नाही? मी असं करते; तुमच्यासाठी अंब्युलंस बोलावते. त्यांच्या बरोबर पॅरामेडीक असेल तो तुम्हाला ट्रॅन्क़्विलाईझर देईल.” ट्रॅन्क़्विलाईझर माय फूट! ऐक कोमल, माझ्या आईने पोळ्या लाटून, लाडू वळून. भाजणी दळून, पुरण पोळ्या विकून माझे शिक्षण केले. वुई आर सेल्फ मेड. स्वर्गातून अप्सरा आली तरी मला झुलवू शकणार नाही माझी इच्छा नसेल तर. तू तर किस झाडकी पत्ती.” मी काय वाटेल ते बडबडत होतो. तोंडात भयानक शिव्या आल्या होत्या. पण स्वतःला वेळेवर सावरले.
“झालं? खूप बोललास. आता माझी बाजू ऐक. मी तुझी किती वाट पाहत होते. आपल्या साठी कोल्ड कॉफी मागवली होती. निशानला फोन करून विचार पाहिजे तर. त्याच्या बॉयने आणलेली कोल्ड कॉफी इथे माझ्या टेबलावर माझ्या समोर गरम झाली आहे. काय करू त्याचं? बेसिन मध्ये ओतून देउ?”
“जरा शांत हो. आणि थंड डोक्याने विचार कर. तूही खोटा नाहीस आणि मीही खरं बोलते आहे.”
“मी ह्या ह्याच्या मुळाशी जाणार आहेच. त्या आधी मला एक सांग तू मला जो फोटो पाठवला होतास, त्यात तुझ्या हनुवटीवर जो तीळ आहे तो मला दिसत का नाही. तुम्ही मुली फोटोशॉप करता काय? आत्ता आहे आत्ता नाही. कशी करता ही जादू?”
फोन कट झाला होता. अशी पकडली गेल्यावर फोन कट करणारच यात नवल ते काय.
कोमल-१ आणि कोमल-२ मिळून माझा भेजा पोखरताहेत असे दृश्य माझ्या समोर दिसायला लागले.
फोन वाजला. मी माझ्या तंद्रीतच फोन घेतला.
“केशव कुलकर्णी बोलत आहात काय?”
हा रॉंग नंबर नवीन प्रकरणाला सुरवात करणार? रॉंग नंबरचा मी धसका घेतला होता. नो मोर कोमल-३.
“कोमल-३, रॉंग नंबर!” मी ताडकन फोन बंद केला.
दोन मिनिटात माझी चूक माझ्या लक्षात आली. मी आताच पाचव्या मजल्यावर हे नाव नोंदवून आलो होतो. म्हणजे ही कोमल-२ असणार.
अर्थात माझ्या थेरीप्रमाणे ती पुन्हा फोन करणार होती.
फोन वाजला.
“केशव कुलकर्णी?’
“हो. केशव कुलकर्णी बोलतोय.”
“थॅक गॉड! मी अश्या साठी फोन केला होता कि तुमची अपॉंटमेंट कन्फर्म झाली आहे. एव्हढंच सांगायचं होतं.”
zzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzz
२८ डिसेंबर २०१६
आज डॉक्टर कुडतरकरांना भेटायचं होतं. दुपारी चारची अपॉंटमेंट होती. मी पाचव्या मजल्यावरच्या डॉक्टर कुडतरकरांच्या कन्सल्टिंग रूम मध्ये पोचलो. कोमल-२ बसली होती.
ती गोड हसली. “मिस्टर कुलकर्णी ना? कशी आहे तब्येत? आज बरे दिसताहात. थोडा वेळ थांबावे लागेल. डॉक्टर एका पेशंट बरोबर बिझी आहेत.”
माझे तिच्या बोलण्याकडे ल्क्ष नव्हते. सगळे लक्ष त्या हनुवटीवरच्या तिळाकडे होते. ती बोलत होती तेव्हा त्याची मोहक हालचाल होत होती. माझ्या नजरेने ती अस्वस्थ झाली होती. स्त्रियांना पुरुषांची नजर लागलीच समजते असं म्हणतात.
“मिस, हा हनुवटीवरचा तीळ खरा आहे कि रंगवलेला आहे? तुम्ही चिडलात मिस. आय वाज ए जोकिंग.”
“मिस्टर कुलकर्णी, तुम्ही लिमिट क्रॉस करत आहात. माइंड युअर...”
डॉक्टरांच्या केबिनचा दरवाजा उघडला. आतून डॉक्टर पेशंटला बाहेर सोडायला आले होते.
“महाजन, तुम्ही अजिबात काळजी करायची नाही. आणि गोळ्या नियमित घ्यायच्या. काळजी न करणं हाच यावर उत्तम उपाय आहे. जीवनशैली बदलायला पाहिजे तुम्हाला. या आता. कोमल कोणी पेशंट आहे? ओह तुम्ही आला आहात काय. या.”
मी डॉक्टरांच्या समोर स्थानापन्न झालो.
“तुम्हाला माझ्याशी बोलणे आवडेल का चॅटजीपीटीशी? तुम्हाला जसं सोयीस्कर वाटेल तसं आपण करुया. माझ्याशी बोलणार? छान. हे पहा. तुम्ही जेव्हढं मन मोकळं कराल तेव्हढं चांगलं. आता तुम्ही माझ्याशी बोलणार असाल तर मला माझ्या सेक्रेटरीला नोट्स घेण्यासाठी बोलवावे लागेल. पहा. तुम्ही चॅटजीपीटीशी बोललात तर सर्व चर्चा आपोआप रेकोर्ड होत जाते. अजून विचार करा.”
मी विचार केल्याचे नाटक केले. “चालेल. तुम्ही को... तुमच्या सेक्रेटरीला बोलवा. आय वोन्ट माइंड.”
कोमल शोर्टहँडचं नोट बुक घेऊन आत आली.
आधी माझी माहिती विचारण्यात आली. नाव गाव, वय, शिक्षण, व्यवसाय, इत्यादी.
“लग्न झालं आहे?”
“केलं नाही म्हणून झालं नाही.” माझ्या उत्तरातला खुबीदार विनोद डॉक्टरांच्या लक्षात आला नसावा.
डायबेटीस, बीपी, सिगारेट, गुटका, दारू, ड्रग्स? काही नाही.
घरात कोण कोण?
प्रेमप्रकरण?
आता गाडी रुळावर आली.
“हा आता तुमचा काय प्रॉब्लेम झाला आहे तो सांगा. सांगा अगदी मन मोकळेपणाने सांगा.” डॉक्टर.
“डॉक्टर साधारण एक महिन्यापूर्वी मला एक फोन आला. तेव्हा मला तो रॉंग कॉल असावा अस वाटलं. पण आता माझी खात्री झाली आहे कि कोणीतरी अनोळखी व्यक्ति मला सिस्टिमॅटिकली टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहे. उद्देश? मला वाटतय कि ब्लॅकमेल...” डॉक्टरांनी मला मधेच अडवले.
“नाव काय सांगितले?”
“ती एक तरुणी आहे एव्हढे पुरेसे नाही का. नावात काय आहे?”
“हम्म, म्हटलं तर आहे म्हटलं तर नाही. बरं, पण पुढे काय झालं?”
“हळू हळू मी तिच्या प्रेमात वहात गेलो. हे कसे झाले मला माहित नाही. डॉक्टर, मला एक सांगा, फोनवरून कुणी कुणाला हिप्नटाईज करू शकतं का?”
“हो शक्य आहे. अशा केसेस झाल्या आहेत.”
“तर मग, डॉक्टर, माझी केस अशीच आहे.”
“नाही मला सकृतदर्शनी तसं वाटत नाही. पण आपण त्यावर नंतर बोलू. पुढं काय झालं?”
“ओके, येस. मग आम्ही भेटायचं ठरवलं. “नाझ३डी” सिनेमा हॉल समोरच्या वडाच्या झाडाखाली. संध्याकाळी सहा वाजता. ठरल्या वेळी ठरल्या जागी तीन तास मी तिची वाट पाहत होतो. पण ती आली नाही.”
“खरच?” कोमल टिप्पणं काढता काढता मधेच थांबली, “पण माझा विश्वास बसत नाही.” तिनं लगेच स्वतःला सावरलं. “मी मधेच बोलले. चूक झाली. सर, सॉरी सर.”
“ठीक आहे कोमल. कुलकर्णी, असं होऊ शकतं कि तुम्ही तारीख चुकवली असेल. ती आदल्या दिवशी येऊन गेली असेल... आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी गेला असाल.”
मला शेंगदाणेवाल्याची आठवण झाली. तोही असच काहीतरी बडबडला होता.
“नाही डॉक्टर, कारण दुसऱ्या दिवशी त्यावरून आमचे दोघांचे वाजले. तिन मला ठासून सांगितले कि ती त्याच झाडाखाली त्याच वेळी तीन तास माझी वाट पाहत होती. सगळ्यात विस्मयकारक गोष्ट पुढे आहे. एकदा बोलता बोलता तिनं मला सांगितलं कि ती याच बिल्डिंगमध्ये पाचव्या मजल्यावर डॉक्टर कुडतरकरांची -म्हणजे आपलीच- कंसल्टिंग रूम आहे. ५०५. ती त्यांची सेक्रेटरी –कम-रीसेप्शनिस्ट म्हणून तिथं काम करते. आता मी तिचं नाव सांगतो. तिचं नाव आहे कोमल. हा पहा डॉक्टर तिचा फोटो. तिनं मला मेल केलेला.”
“ही तर कोमल. पण हिच्या हनुवटीवर तीळ नाहीये.” डॉक्टर कोमलकडे दृष्टीक्षेप टाकून म्हणाले, “कोमल, कुड यू थ्रो सम लाईट?”
“सर, हा इसम कोण आहे मला माहित नाही. मी याच्याशी कधी बोललेली नाही. मी ह्याला फोटो पाठवलेला नाही. हा मलाच त्याची कोमल समजतोय. हा जेव्हा प्रथम इथे आला तेव्हा हा खूप उत्तेजित झाला होता. डिस्टर्ब होता. असंबद्ध बडबडत होता. म्हणून मी ह्याने तुम्हाला भेटावं अशी सूचना केली.” कोमल-२ वैतागली होती. “सर, मला थोडी विश्रांतीची गरज आहे. प्लीज.”
“डॉक्टर मी कुणालाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केलेले नाही. ज्या अनुभवातून मी जात आहे त्याचे “जसं आहे तसं” वर्णन मी केले आहे. मला, डॉक्टर, तुमच्याकडून एव्हढेच पाहिजे आहे कि मी कल्पनेच्या भराऱ्या तर मारत नाहीये? मला भास तर होत नाहीयेत? रिअॅलिटीशी माझे नाते तुटत चालले आहे का? कठोरपणे बोलायचे झाले तर मला वेड लागले आहे का? ह्या प्रश्नांची उत्तरे आहेत काय?”
“कोमल, मला समजतंय. तू थोडा वेळ बाहेर मोकळ्या हवेत फिरून ये.” कोमल पडत्या फळाची आज्ञा मानून तत्क्षणी निघून गेली.
डॉक्टर माझ्याकडे वळून बोलू लागले. “कुलकर्णी, तुम्ही खचितच वेडे नाहीत, तसेच तुम्हाला भासही होत नाही आहेत. गेल्या महिन्यापासून आम्हा मनोचिकित्सकांच्या वर्तुळात अशा केसेस वारंवार यायला लागल्या आहेत. मागच्याच आठवड्यात माझ्याकडे आलेली ही केस पहा. एका स्त्रीचा पती आर्मीमध्ये मेजर होता. शत्रूबरोबर झालेल्या चकमकीत तो मारला गेला. त्या धक्क्यातून ती सावरते नाही तोच तिला “मृत” पतीचे फोन यायला सुरवात झाली. तुम्ही कल्पना करू शकता कि तिची काय मनःस्थिती झाली असावी. तिने आर्मी एचक़्यू मधे तक्रार केली. त्यांनी सर्व दूर शोध केला. अगदी शत्रूकडे विचारणा केली कि कोणी मेजर युद्धबंदी आहे का. नो ट्रेस.
तिचे ब्रेन मॅपिंग करून झालं. आम्ही एक स्क्रीझोफेनियाची टेस्ट करतो ती झाली. ब्रेन केमिकल्स तपासून झाले. सर्व काही नॉर्मल! आता तिची अशी अवस्था आहे कि ती केवळ फोनकॉलसाठी जिवंत आहे. तो सहा महिन्यांनी सुट्टी घेऊन घरी येणार म्हणतोय. तेव्हा काय होईल? तर कुलकर्णी, मी तुम्हाला काहीही चाचण्या करायला सांगणार नाहीये. तुम्ही भावनांना फाटा देऊन ऐकणार असाल तर मी तुम्हाला ह्या प्रकाराचे माझे निदान सांगतो.”
“सांगा. ऐकतोय.”
“कुलकर्णी, हे तुमच्या अंतर्मनाचे खेळ आहेत. कुणातरी तरुणीने आपल्यावर प्रेम करावे, आपल्यासाठी झुरावे, आपली काळजी करावी. ह्या तुमच्या सुप्त इच्छा हे खेळ करून दाखवत आहेत. तुम्ही सांगत आहात कि तुम्ही एकमेकांना भेटायचे ठरवले पण ती आली नाही. कशी येणार? जी व्यक्ति अस्तित्वात नाही ती कशी भेटणार? मेजरच्या पत्नीची केस अशीच आहे. पती मृत झाला आहे हे तिच्या अंतर्मनाने नाकारले. मग फोनचे खेळ सुरु झाले. मी आता काय करतो तुम्हाला काही गोळ्या लिहून देतो. एक मनःशांती साठी आहे नि एक मल्टीविटामिन आहे. ह्या गोळ्या नियमित घ्यायच्या. दहा दिवसांनी पुन्हा भेटा. बघुया काही फरक पडतोय का.”
डॉक्टरांचे आभार मानून मी बाहेर पडलो.
बाहेर कोमल-२ शून्यात नजर लावून बसली होती. मला डॉक्टरांची फी द्यायची होती. तिचा सामाधीभंग करावा लागणार होता. इलाज नव्हता.
“किती फी द्यायची?” मी विचारले.
ती जागी होऊन म्हणाली. “हजार रुपये.”
अर्ध्या तासाचे हजार हं. मी पुढच्या जन्मी डॉक्टर व्हायचे निश्चित केले. ते हजार रुपयाचं सोडा. मला तिला केवळ एकच विचारायचं होत, की त्या दिवशी तू ज्या कुणासाठी कोल्डकॉफी मागवली होतीस, तो आला होता का?
पण नाही विचारला.
zzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzz
१ जानेवारी २०१७
नंतर आजतागायत मला कोमलचा फोन आला नाहीये. इतकेच नव्हेतर मी तिला शेकडो वेळा फोन करायचा प्रयत्न केला. पण तिचा संपर्क होऊ शकला नाही. असं नाही कि ती फोन उचलत नव्हती. मुळात रिंग होत नव्हती.
४ जानेवारी २०१७
News about a pair of Black Holes.
...Instead, the invisible violence of the pair’s final moments and ultimate merging was so great that it shook the fabric of reality itself, sending gravitational waves—ripples in spacetime—propagating outward at the speed of light. In the early morning hours of January 4, 2017, those waves washed over our modern Earth and into the most precise scientific instrument ever built, the Advanced Laser Interferometer Gravitational-Wave Observatory (LIGO)...
प्रत्येक कृष्ण विवरात एक विश्व सामावलेल्रं असते.
zzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzz
अखेर ४ तारखेला मी फोन कंपनीकडे तक्रार केली.
“कोणता नंबर मिळत नाहीये?” सुपरवायझरने विचारले. मी कोमलचा नंबर दिला.
“ऐ. सर, हा तर पंधरा आकडी नंबर आहे. आपण जरा पुन्हा बघून खात्री करा,”
“नंबर बरोबर आहे. मी पेशाने अकौंटंट आहे. रोज आकड्यांशी दंगामस्ती करत असतो. प्लीज मला हा नंबर मिळवून द्या. माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे.” मी अजीजीने त्याला रिक़्वेस्ट केली.
जेव्हा तो पुन्हा लाईनवर आला तेव्हा युगानुयुगे लोटली होती.
“सॉरी सर, पण पंधरा आकडी नंबर सिस्टीम विश्वात कुठेही वापरात नाहीये. मला खेद आहे की आम्ही आपल्याला मदत करू शकलो नाही. भविष्यात आम्ही...” मी फोन बंद केला.
८ जानेवारी २०१७
आज मला डॉक्टर कुडतरकरांची भेट घ्यायची होती. मी पाचव्या मजल्यावर ५०५ मध्ये गेलो. तिथे कोमल होतीच. तिचे डोळे डबडबले होते. रात्रभर झोपली नसावी. ती स्वतःहूनच माझ्याशी बोलली.
“मी तुमचीच वाट बघत होते. आज तुम्ही येणार मला माहित होतं. आज तुमची अपॉंटमेंट आहे. मला तुमच्याशी बोलायचे आहे. पण इथे नको. मी आज सुट्टी घेतली आहे. ब्युरोकडून बदली सेक्रेटरी येईल. आपण त्या वडाच्या झाडाखाली जाऊन गारव्यात बसू.”
मी आणि ती आम्ही दोघं वडाच्या खाली बेंच होतं तीथे जाऊन बसलो.
मी गप्पा ती गप्प. प्रथम कोण बोलणार? अखेर तिनं सुरुवात केली.
“आपण दहा दिवसापूर्वी सरांच्या केबिनमध्ये बसलो होतो. आठवतय? तुम्ही सांगत होता कि तुम्हाला कोमलचे फोन कॉल येतात.”
आता ही काय सांगणार आहे?
“अजून येतात?”
“नाही. आता येत नाहीत.”
“मला पण एका कडून फोन यायचा. तुमच्या प्रमाणे राँग कॉल पासून सुरवात झाली. आधी आम्ही मित्र होतो नंतर आमची दोस्ती गहरी होत गेली. माझ्या नजरेतून तो आदर्श पुरुष होता. स्वप्नातील परीकथेतील राजकुमार.”
पण ही भूतकाळात का बोलतेय? होता इत्यादी. तिची स्टोरी मला का ऐकवते आहे? मी तरी का म्हणून ऐकायची?
“आता मला त्याचे कॉल यायचं बंद झाले आहे. मी ही त्याला कॉल करू शकत नाहीये.” तिचे टपोरे डोळे पाण्याने डबडबले. अरे बापरे आता ही रडणार.
“मिस, कधी कधी मोबाईल करप्ट होतो. मला नंबर द्या. मी माझ्या मोबाईल वरून प्रयत्न करून बघतो. सांगा नंबर.” ती सांगत गेली मी एंटर करत गेलो. ओह माय! हा पंधरा आकडी नंबर होता.
“मिस, असे पंधरा आकडी नंबर आपल्या विश्वात वापरत नाहीयेत. काय नाव होत तुमच्या मित्राचे? कुठून फोन करत होता तो.”
“कुठून म्हणजे इथूनच. इथच कुठेतरी त्याचं ऑफिस होतं. त्याचं नाव होतं अमुक अमुक.”
मी ताडकन उडालोच. माझ्या मेंदूत प्रकाशाचा लखलखाट झाला.
पाकिटातून माझं पॅन कार्ड तिच्यासमोर धरलं.
“कोमल, माझ्या डोळ्यात पहा. तुझा अमुक तुला दिसेल. मीच तुझा अमुक आणि तू माझी कोमल.”
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
मी माझ्या मित्राला जेव्हा हि गोष्ट खुलवून खुलवून सांगितली तेव्हा तो अजिबात इम्प्रेस झाला नाही. सहज म्हणाला, “अमुक, तू क्वांटम फिजिक्स शिकलेला नाहीयेस न. नाहीतर मी तुला समजाऊन सांगितले असते.”
मला एव्हढेच समजले कि... माझी कोमल मला मिळाली.
(समाप्त)
प्रतिक्रिया
6 Jun 2023 - 6:32 pm | राजेंद्र मेहेंदळे
दोन्ही भाग वाचले--पण कुठेतरी गडबड आहे असे वाटले. म्हणजे हिरोला प्रॉब्लेम आहे, की हिरॉईनला की काहितरी क्वांटम थियरी आहे स्पेस/ टाईम वगैरे तेच समजले नाही.
कदाचित माझी वेव्हलेन्ग्थ जुळली नसेल लेखातील कल्पनेशी...
6 Jun 2023 - 8:15 pm | भागो
ही "समांतर विश्व" कल्पनेवर आधारित कथा आहे. जेव्हा जेव्हा निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा विश्वाला फाटे फुटतात आणि समांतर विश्वाचा उदय होतो. त्या त्या विश्वात एक एक भागो असतो. म्हणजे मी आर्ट्स जावे का सायन्स ला जावे ह्यात मी सायन्स हा पर्याय निवडला. त्याच वेळी एका समांतर विश्वाची निर्मिती झाली ज्यात भागो आर्ट्सचा विद्यार्थी होतो.
असे झाले तर मग अमर्याद विश्वे होतील. होय. शास्त्रज्ञांच्या हिशोबानुसार there could be as many as 10^10^10^7 universes.
ह्या माझ्या थापा नाहीत. ह्या शास्त्रीय संकल्पना आहेत.
ह्या कथेत दोन विश्वात दोन दोन कथानायक आणि दोन दोन कोमल आहेत. त्यांच्या फोनची क्रॉस कनेक्शन होतात आणि सगळा गोंधळ उडतो. दोनी विश्वात ७५ मजली बिल्डींग आहे, naz3d थिएटर आहे. वडाचे झाड आहे. इत्यादि...
दुर्दैवाने आपण समांतर विश्वाशी संपर्क करू शकत नाही. सध्यातरी, त्यांच्या फोनची क्रॉस कनेक्शन ही माझी फँँटसी.
6 Jun 2023 - 8:45 pm | Bhakti
वाह,जरा विस्कटून सांगितले छान झालं.मला वाटलं क्वांटममध्ये दोन्ही पैकी एक जाऊन आला असेल.कथा छान रंगविली, रचक्याने समांतर विश्वावर आधारित सिनेमाला यावेळी ओस्कर मिळाला,त्या सिनेमाचा मिपावरचा परिचय-
6 Jun 2023 - 8:45 pm | Bhakti
https://www.misalpav.com/node/51304
7 Jun 2023 - 12:00 pm | Bhakti
शास्त्रज्ञांच्या हिशोबानुसार there could be as many as 10^10^10^7 universes.
ह्या माझ्या थापा नाहीत. ह्या शास्त्रीय संकल्पना आहेत.
माझाही समांतर विश्वावर विश्वास आहे.याला कारण 'मृत्यू'... एवढ्या प्रगत विज्ञानात मृत्यूनंतर काय याचं उत्तर मिळू नये, आश्चर्य आहे.आत्मा अमर आहे तर तो नक्कीच दुसऱ्या समांतर विश्वात असेल.कदाचित एखादं समांतर विश्व खरोबो वर्षे जुनं असेल.यात टाईम मशीन धागा धरून एक सायफाय कथा लिहायची आहे.काम विस्तारातून वेळ मिळाला की लिहिणार आहे.
6 Jun 2023 - 10:45 pm | भागो
राजेंद्र मेहेंदळे
Bhakti
अनेक आभार!
Bhakti मी हा रिव्यू तेव्हाच वाचला होता. पण ये दिल मांगे मोर अस वाटलं.
7 Jun 2023 - 12:26 pm | टर्मीनेटर
कथा आवडली! दोन्ही भाग एकाचवेळी प्रकाशित केलेत ते बरे झाले, सलग वाचता आली 👍
8 Jun 2023 - 7:43 am | तुषार काळभोर
कदाचित स्किझोफ्रेनिया निदान झालेले काही रुग्ण समांतर विश्वाशी संबंध आलेले असतील.
8 Jun 2023 - 10:34 am | भागो
पूर्वी स्वतःशी बडबडणारा माणूस पाहिला कि वाटायचं , बिच्चारा. नंतर लक्षात आले कि हा तर मोबाईल वर कुणाशी तरी बोलत आहे. नंतर स्वतःशी बडबडणारा आणि तावातावाने चर्चा करणारा माणूस बघितला तेव्हा म्हटलं पहा लोक मोबाईलवर बोलताना आजूबाजूला कोण आहे ह्यावर थोड सुद्धा लक्ष देत नाहीत. पण तो खरा खुरा मनो रुग्ण होता. काय माहित ह्या लोकांचा समांतर विश्वाशी संपर्क झालाही असेल.
8 Jun 2023 - 4:06 pm | आनन्दा
समांतर विश्व आहे हे पहिल्या भागात समजले होते.. पण शेवट काय करणार याची उत्सुकता होती.
आवडली.
अवांतर -
पहिल्या भागात सस्पेन्स समजला म्हणजे तुम्ही predictable तर होत नाही आहात ना?
8 Jun 2023 - 4:06 pm | आनन्दा
समांतर विश्व आहे हे पहिल्या भागात समजले होते.. पण शेवट काय करणार याची उत्सुकता होती.
आवडली.
अवांतर -
पहिल्या भागात सस्पेन्स समजला म्हणजे तुम्ही predictable तर होत नाही आहात ना?
8 Jun 2023 - 4:53 pm | भागो
तुम्ही predictable तर होत नाही आहात ना?>> अरे देवा. मग काळजी घेतली पाहिजे. किंवा अस पण असेल कि आप बहुत समझदार है. Ofcourse take it lightly.
9 Jun 2023 - 10:20 am | सौंदाळा
नेहमीप्रमाणे मस्तच
10 Jun 2023 - 8:21 am | भागो
मी बघत होतो. भाग --२ ची "वाचने" भाग --1 पेक्षा बरीच मोठी आहेत. असंं कसंं होतंं? वाचक काय सरळ भाग -२ वर जाताहेत?
माझ्या कथांची लांबी मोठी असल्याने दोन तीन भाग करावे लागताहेत. म्हणजे लोक जरा दम खातील आणि मग पुढच्या भागाकडे वळतील अशी कल्पना. आता मी काय करतो एक कथा आहे त्याचा सरळ दुसरा भागच आधी टाकतो. मग सवडीने पहिला भाग टाकेन.
10 Jun 2023 - 1:01 pm | तुषार काळभोर
मी वाचलाय तो दुसरा भाग. त्यावर प्रतिसाद पण देऊन आलोय.
'अरेच्या! या विश्वात तर पहिला भाग आलेलाच नाही. कदाचित या समांतर विश्वात उलट क्रमाने भाग टाकत असतील. नोलान याच विश्वातून येऊन आपल्या विश्वात पिक्चर बनवत असेल का? च्यायला, टाईमलाईनची पार वाट लावून टाकतो!'