स्टीमपंक चॅटरबॉक्स
डॉक्टर ननवरे बंगल्याच्या बागेत काहीतरी अचाट प्रयोग करत होते. त्यांनी जुन्या बाजारातून बरच काही लोखंडी सामान विकत आणले होते. त्यात काय नव्हते? त्यांत निरनिराळ्या गेजचे लोखंडी पत्रे होते, एम-५ पासून एम-३० पर्यंतचे बोल्ट होते, ओपन एंड, रिंग, सॉकेट, बॉक्स,आणि शेवटी अॅड्जस्टीबल असे स्पॅनरचे अनेक प्रकार. स्टील वायर्स. चेन्स, कप्प्या. बेअरीन्ग्स, पिस्टन आणि मॅचिंग सिलींडर, क्रॅंकशाफ्ट, क्रॅंकेस. आता मी कशाकशाची नावे लिहू डॉक्टरांनी मला ह्या सगळ्या स्टोरचा इन्चार्ज केलं. आणि हुद्दा दिला: भांडारगृह प्रमुख!
स्टोरच्या व्यवस्थेसाठी त्यांनी “इंवेंटरी मॅनेजमेंट कंट्रोल सिस्टीम” लागू केली. कोणत्याही वस्तूचा साठा धोकादायक पातळीच्या खाली गेला की मला नोटीस येत असे.
डॉक्टरांनी मलाच चीफ परचेस मॅनेजर नेमले होते.
समजा म-५ बोल्टचा साठा कमी झाला आहे असा कॉम्प्युटरने इशारा केला की “भांडारगृह प्रमुख”मी “चीफ परचेस मॅनेजर”मला बोल्ट खरेदी करण्याचं रिक्विझिशन पाठवत असे.
एकदा काय झालं “चीफ परचेस मॅनेजर”मीनं काही सामान वेळेवर खरेदी केलं नाही. रोजच्या समन्वय बैठकीत “भांडारगृह प्रमुख”मीनं “चीफ परचेस मॅनेजर” माझ्या विरुद्ध तक्रार केली.
“सर, आपला बँक बॅलंस... ह्या दोघांच्या समोर नको. आपण वेगळे बसून बोलू.” CFOमी म्हणालो.
डॉक्टर वैतागले. ते म्हणाले, “तुम्हा लोकांना एकमेकांबरोबर समन्वय साधता येत नाही? प्रत्येक वेळी मी तुमचे प्रश्न सोडवले पाहिजेत असे का?”
आम्हा “दोघांना” जाम फायरिंग दिलं.
डॉक्टर स्वतः नियमांचे कठोर पालन करण्याच्या मताचे होते. बॉलपेनचे रिफिल स्टोर मधून घ्यायचे असेल तरी सोळा कॉलम असलेलं रिक्विझिशन भरून द्यावे लागायचे. त्यात मटीरिअल कोड, पार्ट कोड, जॉब नंबर, रिक्विझिशन करणाऱ्याचे नाव, लिंग, धर्म, जात, गोत्र, जन्मतारीख, जन्मस्थान, पॅन नंबर, आधार कार्ड नंबर...
समजलात की नाही. का अजून समजाऊन सांगायला पाहिजे?
हळू हळू डॉक्टरांना कळून चुकले की खिळे, लहान आकाराचे स्क्र्यू, सॅंडपेपर, बॉलपेन सारख्या चिल्लर गोष्टींसाठी सिस्टीम राबवणे म्हणजे डास मारण्यासाठी तोफ वापरण्यासारखे आहे. पूर्ण वर्कशॉपमध्ये आम्ही दोघेच तर होतो. कोणी चोरी डाका करण्याची शक्यता नव्हती.
पण आजच्या कथेचा विषय “प्रोजेक्ट मॅनेजमेंट” वा “इंवेंटरी मॅनेजमेंट कंट्रोल सिस्टीम” हा नसल्यामुळे मी जास्त काही लिहित नाही.
मी चुकून त्यांना विचारायचे धाडस केले.
“सर, हा कोणता प्रयोग तुम्ही करताहात?”
“तुला रे काय करायच्या आहेत नसत्या उचापत्या? तू आपले तुझे काम कर.”
त्या दिवसापासून मी तो विषय डोक्यातून काढून टाकला.
डॉक्टरांच्या बंगल्याच्या बागेत एक अजस्र, महाकाय मानव आकार घेत होता.
“डॉक्टर, हा अजस्र प्राणी कोण आहे?” माझ्याने राहवलं नाही म्हणून मी विचारलं.
“प्रभुदेसाई, हा रोबोट चॅटबॉक्स आहे.” डॉक्टरांनी गर्वाने सांगितले.
“सर, इलेक्ट्रोनिक्स वापरून आता शाळेतली मुलं देखील रोबोट बनवतात. तुम्ही...”
“इलेक्ट्रोनिक्स वापरून कोणीही रोबोट बनवेल. त्यात काय मोठेसे? पण केवळ कप्प्या, पुल्या, लोखंडी तारा, चेन, तरफा वापरून बुद्धिमान व शक्तिमान रोबोट बनवणारा हा डॉक्टर ननवरे जगात एकमेवाद्वितीय आहे.” डॉक्टरांना स्वतःची स्वतः केलेली स्तुती फार आवडत असे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे दुसरे लोक जेव्हा स्तुति करतात तेव्हा अंतरः कोsपी हेतू असतो. पण आपण जेव्हा स्वतःची स्तुती करतो तो अंतर मनाचा निर्भीड आविष्कार असतो. असो.
“तुम्हा लोकांना उगीच वाटत असत कि आपण आधीच्या पिढीपेक्षा कितीपटीनं हुशार आहोत.” डॉक्टर सांगत होते. “आम्ही अगदी माणसासारखे दिसणारे पण माणसापेक्षा कैक पटीने हुशार यंत्र मानव बनवले. आम्ही चंद्रावर, मंगळ ग्रहावर शेती करायला सुरवात केली. मानवाचे सरासरी आयुर्मान सत्तर वर्षांवरून अडीचशे वर्षापर्यंत वाढवले. कॅंसरसारख्या दुर्धर व्याधी हद्दपार केल्या. गरिबी? माफ करा. गरिबी? हा शब्द आम्ही कधीच ऐकलेला नाही... “
डॉक्टरांनी मग रोबोटचा इतिहास सांगितला.
“प्रभुदेसाई, तुला माहिती आहे? तुम्हा लोकांना वाटत की रोबोट हा एकविसाव्या शतकातला आविष्कार आहे. नाही. असं नाही, जुन्या काळापासून माणूस यांत्रिकमानवाची स्वप्नं पहात आहे. हे बघ ह्या मे महिन्यात माझे “वसंत व्याख्यानमालेत” “रोबोट संकल्पनेचा इतिहास व विद्यमान स्थिती” ह्या विषयावर व्याख्यान आहे. त्याला अवश्य हजेरी लाव.”
“ह्याला आपण चतुःशृंगी च्या जत्रेत घेऊन जाऊ आणि प्रदर्शनात ठेवू. रुपया रुपया तिकीट लावू, एक रुपया द्या आणि एक प्रश्न विचारा. मस्त आयडीया आहे ना?”
“आता मी ह्याला फायर करतो.” डॉक्टर म्हणाले.
इथे “फायर” या शब्दाचा अर्थ आहे,
to give life or spirit to : INSPIRE
to cause to start operating
डॉक्टर उठले नि त्यांनी यांत्रिकमानवाच्या तोंडातून त्याला पाणी पाजले, पोटावरील झाकण काढले. फावड्याने आत दगडी कोळसा टाकला. वर एक पेटता बोळा टाकून झाकण बंद केले. येऊन माझ्याजवळ येऊन बसले.
“तू वाफेच्या दाबावर लक्ष ठेव.” डॉक्टरांनी माझी रोबोटच्या गेज बोर्ड समोर ड्युटी लावली.
वाफेचा दाब हळूहळू वाढू लागला. डॉक्टर दुसऱ्या पॅनेलपुढे बसले होतो. ते कळीचे पॅनेल होते. जेव्हा वाफेच्या दाबदर्शकाचा काटा पाच वर स्थिर झाला त्यासरशी रोबोटमध्ये चैतन्याचा संचार झाला. नसानसातून- आय मिन ट्युबा ट्युबातून- जाणीवेची वाफ संचार करू लागली.
“नमस्कार होमो सेपिअन्स. माझ्या दुनियेत म्हणजे ”गेम वर्ल्ड” तुमचे स्वागत आहे.” रोबोट आपल्या धातुध्वनीत बोलला.
“रोबोट, मी तुझ्यामध्ये प्राणाची फुंकर घातली आहे. मी तुझा जन्मदाता आहे. “माझ्या दुनियेत म्हणजे ”गेम वर्ल्ड” तुमचे स्वागत आहे.” अस तू म्हणालास हा तुझा भास आहे. खर तर आमच्या विश्वात तुझे स्वागत आहे.” डॉक्टर थोडे कुत्सितपाने बोलले.
“माफ करा. तुमची काहीतरी गैरसमजूत झाली आहे. आधी माझी ओळख करून द्यायला पाहिजे नाही का? माझे नाव आहे विश्वामित्र ऐनस्टीन. मी “गेम डेव्हलपर” आहे. गेले कित्येक दिवस माझ्या प्रयोगशाळेत अगदी आमच्यासारखे दिसणारे, वागणारे बुद्धिमान रोबोट आणि त्यांची प्रतिसृष्टी निर्माण करण्याचे प्रयोग करत आहे. आज त्याला अपेक्षेबाहेर यश मिळाले आहे. मी एक सोडून दोन यांत्रिक मानव तयार करण्यात यश मिळवले आहे. तुमचा बाप होण्याच्या नात्याने मी आता तुमचे नामकरण करतो. ए तू रे झिपऱ्या, सरळ ताठ बस. तुझे नाव ननवरे. ह्या तुझ्या सांगकाम्या गड्याचे नाव प्रभुदेसाई. काय आवडली का नावं?”
डॉक्टर ननवरे चक्रावले. आपल्या प्रोग्रॅमिंगमध्ये किंवा रोबोटची जुळवणूक करताना आपली काहीतरी चूक झाली असावी असा त्यांचा समज झाला.
ते प्रेमळ आवाजात रोबोटला म्हणाले, “रोबोट, आमचा नाही तुझा गैरसमज झालाय! दोष माझाच आहे. माझ्या प्रोग्रामिंगमध्ये चूक झाली असणार. आत्ता चूक दुरुस्त करतो.” डॉक्टरांनी समोरच्या पॅनेलवरची रोबोट शटडाउन करायची कळ दाबली. वाफेचा दाब हळूहळू कमी व्हायला लागला.
“तू म्हणतोयास ते अगदी खरं आहे. तुझ्या प्रोग्रामिंगमध्ये चूक झाली आहे. चूक मी केली आहे. मलाच दुरुस्त करायला पाहिजे. मी माझ्या प्रयोगशाळेत जातोय. पाच मिनिटात परत येतो. कुठे जाऊ नका.” रोबोट घाईघाईने बोलला.
एव्हढे बोलणे होतंय तवर रोबोट शटडाउन झाला.
डॉक्टर आणि रोबोटची तू तू मै मै ऐकून माझ्या डोक्यावर परिणाम झाला असावा कारण मला भवतालचे अस्तित्व भासमान वाटू लागले.
आम्ही त्या रोबोच्या जगात गेलो आहोत का तो आमच्या जगात आला आहे. काही कळेनासे झाले. आपण कोण आहोत, कुठे आहोत, का आहोत असे अनेक प्रश्न भेडसावू लागले.
“प्रभुदेसाई, तू घाबरू नकोस, बावचळू नकोस. मी सांगतो तुला काय प्रोब्लेम झालाय तो. प्रत्येक बुद्धिमान जीवाच्या मस्तिष्कात कार्यकारणभावाची एक साखळी असते. ह्या रोबोटची ती साखळी सटकली आहे. जशी अजयची सटकते तशी. अजय देवगण रे आपला. सायकलची चेन पडली कि मग कितीही पैडल मारलं तरी गाडी पुढं जात नाही. मग सायकल धरून पैदल जावं लागतं. असच काहीसं झालं आहे. आत्ता दुरुस्त करतो.”
डॉक्टरांनी रोबोटच्या डोक्याला शिडी लावली. शिडीवर चढून रोबोटची कवटी उघडली. चेन स्प्रॉकेटवरून उतरली होती ती पुन्हा स्प्रॉकेटवर चढवली. खाली उतरून रोबोटला पुन्हा “फायर” केला.
“आपण आता असं करुया त्याच्या कलाकलाने घेऊया. बघुया काय म्हणतोय.”
कधीही माघार न घेणारे डॉक्टर एकाएकी मवाळ का झाले?
वाफेचा दाब पाचावर आला आणि रोबोट जागृत झाला.
“मी तुम्हा दोघांच्या प्रोग्रॅमिंगमधला किडा निवडून बाजूला काढला आहे. आता तुमचा काही गोंधळ होणार नाही.” रोबोटने आल्या आल्या सांगितले.
आम्ही चुपचाप ऐकत होतो.
“तुम्ही शहाणे आहात.” रोबोट आमच्या विषयी बोलत होता.
“धन्यवाद. तू सुधा शहाणा आहेस.” डॉक्टर रोबोटची खोटी खोटी स्तुती करत म्हणाले.
ह्यावर रोबोट विचारमग्न झाला.
डॉक्टर मला हळूच म्हणाले, “तो आपली ट्युरिंग टेस्ट घेतो आहे. पुणेरी मराठीत “तुम्ही शहाणे आहात.” ह्याचा अर्थ होतो कि तुम्ही मूर्ख आहात. हा मराठी गर्भितार्थ आपल्याला समजला कि नाही ह्याची तो परीक्षा घेतो आहे.”
“ट्युरिंग टेस्ट म्हणजे काय?” मी विचारले.
“नंतर सांगेन.” डॉक्टरांनी विषयाला बगल दिली.
“तुम्ही फार शहाणे आहात.” रोबोट.
“थॅंक्स. तू पण काय कमी नाहीस.” डॉक्टर.
थोडा वेळ शांतता पसरली. आता डॉक्टरांनी सूत्र हातात घेतली.
“माझी म्हणजे साक्षात स्वतःच्या बापाची ट्युरिंग टेस्ट घेण्याची कल्पना मीच तुझ्या मेंदूत रुजवली होती. त्या प्रमाणे तू वागलास. ह्याचा अर्थ तू स्वतःची बुद्धी वापरत नाहीयेस. तू सेंटिएंट आहेस पण सेपिएंट नाहीस. मला तुझ्यावर बरेच काम करावे लागणार आहे.” डॉक्टरांनी थोडं प्राउडली सांगितलं.
“रिअली?”’ रोबोट कुत्सितपणे म्हणाला. “गुड, वेरी गुड. चांगली प्रगती आहे.कीप इट अप.”
मला हे सगळे असह्य व्हायला लागलं. कोण कुणाचं प्रोग्रामिंग करतोय? मी डॉक्टरांना स्पर्श करून डॉक्टर हाडा मासाचे आहेत ह्याची खात्री करून घेतली. “प्लीज, तुम्ही दुसरं काही तरी बोलाल काय?” मी वैतागून बोललो.
डॉक्टर म्हणाले, “ओके, आता आपण ह्याचे थोड टेस्टिंग कारुया. रोबो डावा पाय वर उचल.”
रोबोटने डावा पाय वर उचलला.
“अरे उजवा पाय नाही, डावा पाय म्हणालो मी.”
मी डॉक्टरांची चूक त्यांच्या नजरेस आणली.
“डॉक्टर, त्याने डावा पायच वर केला आहे. तो पाय तुमच्या उजव्या बाजूला आहे...”
“कळल, कळल. रोबोट आता उजवा पाय वर उचल.”
“डॉक्टर, तुम्हाला कॉमनसेन्स द्यायला मी विसरलोच की. दोनी पाय हवेत उचलून मी उभा कसा राहू?”
“छान, तुला कॉमनसेन्स आहे कि नाही त्याची परीक्षा घेत होतो.” डॉक्टरांनी चपळाई आणि मखलाशी करून आपली बाजू सांभाळून घेतली.
रोबोटच्या चेहऱ्यावर छद्मी आणि अर्थपूर्ण हास्य झळकले.
“रोबोट, मी आता तुझी गणित ह्या विषयाची चाचणी घेणार आहे. तयार आहेस?”
“झिपऱ्या, केवळ तुझ्या ईगोचे समाधान व्हावे म्हणून तुला आवडतील अशी उत्तरे मी देणार आहे. कारण आमच्या विश्वातले गणित आणि तुमच्या विश्वातले गणित ह्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. फायर युअर क़्वेश्चन्स.”
इथे “फायर” ह्या शब्दाचा अर्थ निराळा आहे.
“अगदी सोप्प्या गणिताने सुरवात करुया.”
दोनचे वर्गमूळ, ‘पाय’ ची शंभर दशांश स्थळापर्यंतची किंमत इत्यादी सोप्प्या प्रश्नांची उत्तरे रोबोटने क्षणार्धात दिली..
“रोबोट थोडे अवघड गणित. दोन अधिक दोन किती?
“चार.”
“छान, हे घे तुझे चॉकलेट. बक्षिस. दोन गुणीले दोन?”
“चार.”
“चार अधिक तीन?”
“सहा. झिपऱ्या, भूत बघितल्यागत चेहरा का केलास?”
“पुन्हा सांग.”
“एकदा सांगितले ते ऐकायला नाही आलं? सहा! तू कितीही वेळा विचारलास तरी उत्तर सहाच. मुर्खासारखे पुन्हा हाच प्रश्न विचारायचा शहाणपणा करू नकोस. आमच्या इकडे मूर्खाची व्याख्या अशी आहे कि “Insanity is doing the
same thing over and over and expecting different results.” माझे उत्तर त्रिवार सहा. सहा. सहा.”
“माय डिअर रोबोट, चहाटळपणा करायचा नाही. बी सिरिअस. चार अधिक तीन?”
“झिपऱ्या, आय अॅम सिरिअस. सहा.”
“रोबोट पुन्हा मला ‘झिपऱ्या’ अस संबोधू नकोस. मी तुझा जन्मदाता आहे. जन्मदात्याला ‘पिताश्री’ म्हणायचे असते अस मी तुझ्या प्रोग्राम मध्ये लिहिले आहे. हे तू विसरला आहेस.” डॉक्टर आता खरोखर वैतागलेले दिसत होते.
“पिताश्री”, रोबोट नाटकीपणाने बोलला, “मी अमुक केले, मी तमुक केले, ही वटवट आता तरी बंद कर. न पिताच काही लोकांना चढते. त्यातलाच तू दिसतो आहेस. लक्षात ठेव तू निव्वळ माझ्या खेळातले भावले आहेस. आणि अजून एक, आम्ही स्वतःचे आयुष्य स्वतःच्या मर्जीप्रमाणे जगतो. आम्ही “स्वयंप्रोग्रामि” आहोत. मुकाट्याने काय विचारायचे ते विचार.”
डॉक्टर थोडे वरमले. “तुला एक ते दहा पर्यंत संख्या मोजता येतात?”
“यात काय संशय?” एव्हढे बोलून रोबोटने गिनती सुरु केली, “एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, आठ, नऊ आणि दहा.”
“बघितलस? कसा उद्दामपणे दात काढतोय. अरे रोबोट, सहा नंतर सात येतात हे विसरलास काय?”
“सात? कुठले सात? काय सात?”
“यू ब्लडी ब्लीडींग मशीन! स्टीमपंक! उगाच मला डिवचू नकोस.”
“ए तू, मशीन कुणाला म्हणतोयस? शिवी द्यायचं काम नाही. सांगून ठेवतो.” मी बघितलं तर काय? वाफेच्या दाबदर्शक यंत्रात दाब वाढत होता.
“एकदा नाही सात वेळा म्हणेन. मशीन, मशीन, मशीन, मशीन...” डॉक्टर पण इरेस पेटले.
डॉक्टरांना रक्तदाबाचा त्रास होता. हे मला माहित होते.
“मी मशीन काय. अरे तू सात मशीन, तुझा बाप सात सात मशीन. तुझा आजोबा सात सात सात मशीन!...” रोबोट बोलतच गेला. डॉक्टरांच्या सात पिढ्यांचा उद्धार झाला. त्याच्या तोंडाला फेस आला.
रोबोचा दाब सातावर गेला. तो वाफेने मुसमुसत होता. त्याच्या कानातून, नाकातून, तोंडातून वाफेचे फूत्कार बाहेर पडत होते.
खवळलेल्या रोबोने बागेतले कलमी पेरूचे झाड मुळासकट उचकटले व तो डॉक्टरांना मारायला धावला.
“प्रभुदेसाई, पळ, ह्याचा वाफदाबनियंत्रक काम करेनासा झाला आहे. प्रकरण हाताबाहेर गेले आहे. ह्याच्या डोक्यात वाफप्रकोप झाला आहे. ह्याला वाफ चढली आहे.” असं म्हणून डॉक्टरांनी पर्वतीच्या टेकडीकडे पळायला सुरुवात केली. त्यांच्या पाठोपाठ मीही.
मागून एक बस येत होती.
डॉक्टर म्हणाले, “या बसमध्ये चढू या. बसमध्ये आपण सुरक्षित राहू.”
“पण डॉक्टर, बस सात नंबरची आहे.” सात आकडा मला अशुभ वाटायला लागला होता.
“पर्वा इल्ले. आधी पळ मग बघू सात.”
खचाखच भरलेल्या बसमध्ये आम्ही कसेबसे चढलो. पण रोबोट आमचा पिच्छा सोडायला तयार नव्हता. तो बसला आडवा आला.
“झिपऱ्या, कुठे पळशील, सहा किंवा आठ समुद्राच्या पल्याड पळालास तरी शोधून काढीन.”
बसचा कंडक्टर रोबोटला पाहून घाबरला.
“बसमध्ये झिपऱ्या नावाचा इसम असेल तर त्यानं खाली उतरावे. बसमधल्या १६७ प्रवाश्यांचे प्राण धोक्यात घालू नगा,” कंडक्टरने ताकीद दिली. कंडक्टरचे म्हणणं खरं होतं. बस उतारूंनी उतू जात होती. उगीच तमाशा नको म्हणून आम्ही बसमधून उतरलो आणि पुन्हा पळायला लागलो. आम्ही पुढे आणि रोबोट मागे. लोकं घाबरली होती का? नाही. मुळीच नाही. उलट फेसबूक आणि यू ट्यूब वर टाकण्यासाठी विडीयो बनवत होते. तरुण तरुणीवर चॉपरने हल्ला करून तिचा कसा खात्मा करतो त्याचा विडीयो बनवणारे लोक! त्यांच्यासाठी तर ही पर्वणी होती.
शेवटी धापा टाकत टाकत आम्ही पर्वती चढलो आणि मागच्या डोंगरावर जाऊन बसलो. तिथून आम्हाला रोबो स्पष्ट दिसत होता. तो आता कॅनाल ओलांडायचा प्रयत्न करत होता.
“झिपऱ्या, चार अधिक तीन सहा. हो की नाही?”
मी डॉक्टरांची समजूत घालायचा प्रयत्न करत म्हणालो, “डॉक्टर, सोडून द्या न. सहा तर सहा. आपल काय जातंय?”
“असं नसतं. विश्वाच्या कुठल्याही कोपऱ्यात गेलास तरी सत्य हे सत्य असते. चार अधिक तीन बरोबर सात.”
“माझ्या मते सत्य हे व्यक्ति आणि स्थळकाळ सापेक्ष असतं. अब्सोल्युट सत्य असं काही नसतं.” मी डॉक्टरांची समजूत घालायचा व्यर्थ प्रयत्न करत म्हणालो.
डॉक्टरांचे लक्ष मनगटावरील घड्याळाकडे होते. ते एवढेच म्हणाले, “अजून सात मिनिटे आहेत.”
माझा मात्र धीर सुटला. अंगात पळायचे त्राण नव्हते. मी हार मानली. पुढे होऊन रोबोटला समजावयाचा प्रयत्न केला.
“रोबोट सर, आमची चूक झाली. चार अधिक तीन बरोबर सहा. बास? आता शांत हो.”
“ए तू नको मध्ये पडू. झिपऱ्याला सांगू दे.” रोबोट गरजला.
डॉक्टर पण इरेस पेटले.
“ए यू मशीन, दोन-तीन कप्प्या, पुल्या, लोखंडी तारा, चेन, तरफा लावून कोणी यंत्र बुद्धिमान होत नाही हे आज मला समजलं. नीट कान देऊन ऐक. चार अधिक तीन बरोबर सात. माझा प्राण गेला तरी सात.”
सात मिनिटे झाली होती.
रोबोटची हालचाल मंदावली. त्याच्या तोंडातून कसेबसे शब्द बाहेर पडले. “माझ्या खेळात माझ्या भावल्या मी लिहिलेले डायलॉग बोलतात. स्वतःच डोकं चालवत नाहीत. आता निरोप घेतो. पण पुन्हा भेटू तेव्हा तूच मला सांगशील, की चार अधिक तीन बरोबर...”
वाक्य पुरे व्हायच्या आधीच रोबोटची वाफ संपली. बिचारा चेतनाहीन जिथे होता तिथेच थंडावला.
डॉक्टरांनी नंतर मला सांगितले. “मला माहित होते की ह्याचा खेळ पाच पस्तीसला खलास होणार. तेव्हढाच कोळसा मी आत ढकलला होता.”
का कुणास ठाऊक, आम्हाला त्याची दहशत बसली असेल किंवा अजून काही कारण असेल, पण डॉक्टरांनी त्याला पुन्हा जागृत केले नाही.
रोबोट आता आमच्या कॉलनीच्या प्रवेश दारापाशी उभा आहे. स्मारक म्हणून. मानवाने निसर्गाचा पंगा घेतल्यावर काय भयानक परिणाम होऊ शकतात त्याची आठवण करून देण्यासाठी.
महान नेत्यांचे पुतळे बघितल्यावर आपल्यासारख्या सामान्य लोकांच्या मनात जो विचार येतो तोच विचार रोबोटचा पुतळा बघितल्यावर येतो.
बर झाले आपण ह्यांच्या तावडीतून सुटलो.
प्रतिक्रिया
3 Mar 2023 - 8:35 am | शेखरमोघे
छान छान छान छान छान छान छान
(मुद्दामच ७ वेळा लिहून खात्री करून घेतली, आपल्याच विश्वात आहे याची कारण कथा इतकी प्रभावी झाली आहे की रोबोच्याच जगात चुकून पोचलो नाही ना ही शन्का यावी).
ते "ट्युरिन्ग टेस्ट" त्यव्हढ टाका की सान्गून!
3 Mar 2023 - 10:46 am | भागो
प्रथम आपले आभार मानतो.
ट्युरिंग चाचणी अॅलन ट्युरिंग ( सुप्रसिद्ध संगणक शास्त्रज्ञ) यांनी 1950 मध्ये विकसित केली. "ट्युरिंग चाचणीचा" उपयोग संगणक (मशीन) मनुष्यासारखा बुद्धिमानपणे विचार करू शकतो की नाही हे निर्धारित करण्यासाठी केला जातो.
ट्युरिंग टेस्टची मूळ कल्पना सोपी आहे: ट्युरिंग टेस्ट करणारा (न्यायाधीश) मनुष्य आणि यंत्र या दोघांशी फक्त टेक्स्ट संभाषण करतो आणि नंतर दोघांपैकी कोण माणूस आहे नि कोण मशीन आहे हे ठरवतो. जर त्याला माणूस कोण आहे आणि रोबोट कोण आहे हे समजले नाही तर रोबोट मशीन परीक्षा उत्तीर्ण झाला असे मानले जाते.
ह्या कथेत कल्पना अशी आहे कि रोबोट डॉक्टर ननवरे हे रोबोट आहेत कि बुद्धिमान जीव आहेत ह्याची परिक्षा घेत आहे.
वेळ आणि रुचि असेल तर हे वाचा
https://en.wikipedia.org/wiki/Turing_test
4 Mar 2023 - 6:52 am | शेखरमोघे
हेच ट्युरिन्ग महाशय दुसर्या महायुद्धाच्या काळात जर्मन सान्केतिक सन्केत गणिती पद्धतीने उलगडण्याच्या त्यन्च्या यशामुळे प्रसिद्धीस आले.
यन्त्रमानवाबद्दलचे नियम सुरवातीला Isaac Asimov यानी मान्डले (पहा: https://en.wikipedia.org/wiki/Three_Laws_of_Robotics)
4 Mar 2023 - 6:52 am | शेखरमोघे
हेच ट्युरिन्ग महाशय दुसर्या महायुद्धाच्या काळात जर्मन सान्केतिक सन्केत गणिती पद्धतीने उलगडण्याच्या त्यन्च्या यशामुळे प्रसिद्धीस आले.
यन्त्रमानवाबद्दलचे नियम सुरवातीला Isaac Asimov यानी मान्डले (पहा: https://en.wikipedia.org/wiki/Three_Laws_of_Robotics)
4 Mar 2023 - 9:58 am | भागो
शेखरमोघे
तुम्हाला तर सगळी माहिती आहे. मग तुम्ही काय माझी ट्युरिंग टेस्ट घेत होता काय?
5 Mar 2023 - 5:21 am | शेखरमोघे
अरेच्चा, म्हणजे तुम्हाला आपल्या दोघातले कोणीतरी रोबो आहे ही शन्का आहे की काय? मी तर "छान" हे सात वेळा लिहू शकलो.
मी जरी वरती सान्गितलेला चित्रपट पाहिला असला तरी टुरिन्ग टेस्ट बद्दल काहे माहिती नव्हती.
4 Mar 2023 - 11:08 am | बोका
अॅलन ट्युरिंग यांच्या आयुष्यावर आधारीत हा चित्रपट नक्की पहा.
The Imitation Game
4 Mar 2023 - 12:55 pm | भागो
दुवा दिल्याबद्दल आभार.
मी जेव्हढे वाचले आहे त्यावरून ट्युरिंगचे आयुष्य तेव्हढे सुखकर नव्हते.
3 Mar 2023 - 9:35 am | तुषार काळभोर
आपण देवाला बनवलं की देवानं आपल्याला बनवलं?
....
हा हा हा... सही पकडे हैं!!
3 Mar 2023 - 10:50 am | भागो
आभर!
आपण देवाला बनवलं की देवानं आपल्याला बनवलं?>>
आधी कोंबडी कि आधी अंड?
पण मला वाटतंय कि दोघांनी एकमेकांना "बनवले" आहे.
अशी ही "बनवा बनवी"!
4 Mar 2023 - 5:05 pm | टर्मीनेटर
डॉक्टर ननवरे रॉक्स... 🤘 🤘 🤘
डॉक्टर ननवरे आणि प्रभुदेसाई जोडीची हि कथाही आवडली 👍
तरी नशीब बलवत्तर म्हणायचे प्रभुदेसाईंचे... असल्या चिल्लर गोष्टी खरेदी करण्यासाठी टेंडर सिस्टीम राबवली नाही, नाहीतर Procurement भलतीच अवघड गोष्ट होउन बसली असती 😂
4 Mar 2023 - 5:19 pm | भागो
टर्मीनेटर
धन्यवाद.
ही एका प्लांटमध्ये झालेली खरी घटना आहे.
हे टेंडर प्रकरण विसरलोच की मी.
7 Mar 2023 - 3:15 am | रंगीला रतन
गोस्ट आवल्डली. पोवथर.