मी जेव्हा कॉलनीत रहायला आलो तेव्हा कॉलनीला पन्नास वर्षे पूर्ण झाली होती. कॉलनीत बहुतांशी हौसिंग सोसायट्या होत्या. मध्येच एखाद दुसरे बंगले होते. बहुतेक सोसायट्याची पुनर्बांधणी होऊन पाच सहा वर्षे झाली होती. त्यामुळे कॉलनी चकाचक दिसत होती. गावांत असा गैरसमज होता की ह्या कॉलनीत फक्त उच्चभ्रू लोकं रहातात. मी आधी गावांत रहात होतो. रिटायर झाल्यावर फंड, ग्रॅच्युइटी इत्यादींची थोडी रक्कम हातांत आली होती. ती पकडून मी कॉलनीत एक सेकंडहॅंड फ्लॅट विकत घेतला. फ्लॅट तसा लहान आटोपशीर होता. माझे अनेक वर्षांचे कॉलनीत राहायचे स्वप्न होते ते आयुष्याच्या शेवटी का होईना पण अश्या रीतीने साकार झाले. उगीचच स्टेटस वाढल्याची भावना झाली.
काही दिवसांत माझा भ्रमनिरास झाला. आणि गावातल्या लोकांत तसा काही खास फरक नव्हता. इकडे तिकडल्यासारखे लंब्या लंब्या बाता झोंकणारे पण वेळप्रसंगी लहानमोठे समाजकार्य करणारे जन्याभाउ होते ( तसे ते सगळीकडे असतातच म्हणा). राजकारणावर अधिकारवाणीने बोलणारे रावराणे होते. गावातल्या-- आम्ही जिथे रहात होतो त्या—वाड्यांत, तिथेही अशी मंडळी होती. पण रावराणेंचा पल्ला खूप मोठा होता. म्हणजे आमच्या तिथे सेना-भवनांत काय खलबतेचालली आहेत ह्याची बित्तंबातमी बसल्या जागेवर मिळत असे. पण रावराणे चक्क व्हाईटहाउस आणि क्रेमलीन मधल्या गुप्त बातम्या आम्हाला ऐकवत असतात! सगळीकडे असतात तसे इथेही उसासे टाकणारे कवी होते. आयुष्यांत कधीतरी गुपचूप दारूकाम करणारे आव असा आणणार की रोज रात्री दोन पेग मारल्याशिवाय आपल्याला बाबा झोप येत नाही. असे तरुण इथेही होते जसे ते तिथेही होते. थोडक्यांत सांगण्याचा मतितार्थ काय तर कॉलनीत असे काही खास नव्हते. फ्लॅटमध्ये रहाणे आणि वाड्यांत रहाणे ह्यांत महत्वाचा फरक म्हणजे ------ जाऊ द्यात. तृम्हाला सर्व काही माहीत आहे.
हा, कॉलनीत अन् गावांत एक फरक होता कॉलनीत डॉक्टर ननवरे होते. गावांत खूप डॉक्टर होते. पण ननवरेंसारखा कोणी नव्हता. महत्वाची गोष्ट अशी की डॉक्टर ननवरे हे तसले डॉक्टर नव्हते. कॉलेजमध्ये गेल्यावर मला कळले की डॉक्टर डॉक्टर मध्ये फरक असतो. आमच्या कॉलेजमध्ये खूप डॉक्टर होते. आम्हाला मराठी नवकाव्य शिकवणारे किणीकर हे डॉक्टर होते. काही प्रोफेसर विज्ञानाचे तर काहीजण रसायनशास्त्राचे डॉक्टर होते. आमच्या कॉलनीच्या यायच्या रस्त्यावर एक डॉक्टर रहातात. ते गुरांचे डॉक्टर आहेत. संध्याकाळी तेथे कुत्री, मांजरं घेऊन बरेच लोक गर्दी करतात. माझी आपली कल्पना होती की कुत्रे , मांजरे हे कधी आजारी पडत नाहीत. मी आजारी कुत्रा अजून बघितला नाही. ऐकून होतो की एखाददुसऱ्या कुत्र्याला वेड लागते. मग म्युनसिपाल्टीचे कर्मचारी येऊन त्यांना पकडून घेऊन जातात. त्याचे पुढे काय करतात काय माहीत. कुत्र्यांचे मेंटल इस्पितळ असते काय? कुत्र्यांनाच माहीत.
माफ करा. गाडी भलत्याच रुळावर गेली. मी थोडा भरकटलो. माझ्या साहेबाची सवय मला लागली. माझा साहेब असाच भरकटत जायचा.
“आम्ही शेवटी चेन्नई स्टेशनला पोचलो कसेबसे,” साहेब त्यांच्या तामिळनाडू टूर बद्दल सांगत होता, “आता आम्हाला मुंबईची ट्रेन पकडायची होती. गाडी कुठल्या फलाटाला लागणार ते माहित नाही. विचारायची सोय नाही. ते तमिळ बोलणार, आपण हिंग्लिश! अशीच गंमत झाली जेव्हा मी स्वीडनला गेलो होतो तेव्हा -----”
आम्हाला चेन्नईच्या प्लॅटफॉर्मवर सोडून चालले आमचे साहेब स्वीडनचे विमान पकडायला! आम्हाला पक्के ठाऊक होते की आता अराउंड द वर्ल्ड इन एट डॉलर्स! जाऊद्या ते. आता रिटायर झाल्यावर कशाला उगीच साहेबाचे कथाकथन.
तर मी कुठे होतो? कॉलनीत डॉक्टर ननवरे होते.
आमच्या कॉलनीतल्या बागेशेजारी एक कट्टा आहे. खास आमच्यासारख्या लोकांसाठी. त्याचे काय आहे आमच्या कॉलनीत दोन प्रकारचे लोक रहातात. एक म्हणजे आमच्यासारखे रिटायर्ड पेन्शनर्स. बहुतेकांची मुलें अमेरिकेत नोकरदार किंवा शिकायला गेलेले. घरी काही व्यवधान नाही. वेळ कसा घालवायचा माहीत नाही. कट्ट्यावर बसलं की बरा वेळ जातो, दुसरे सॉफ्टवेअर मध्ये काम करणारी तरणी मुलं. ती रेंटलवर रहातात. त्यांचे लक्ष दुसरीकडे. ते कशाला संध्याकाळी कट्ट्यावर येणार?ह्या कट्ट्यावरच मी अजब डॉक्टर ननवरेंच्या गज़ब गोष्टी ऐकल्या.
ननवरे ज्यावेळी कॉलनीत रहायला आले तेव्हा कॉलनीकरांना जरा बरं वाटलं. कॉलनीच्या जवळपास गुरांचे डॉक्टर रहात होते. माणसांचा डॉक्टर कॉलनीत रहायला आल्यामुळे अडीअडचणीला आपला हक्काचा डॉक्टर हाताशी राहील ही कल्पना. सुरवातीला डॉक्टरांनी त्यांना निराश केले नाही. असेच एकदा नवऱ्याला घेऊन एक बाई डॉक्टरांकडे धावत पळत आली. रात्रीचे दोन अडीच वाजले असावेत. डॉक्टर पोळीपासून पासून गहू बनवण्याच्या प्रयोगांत मग्न होते. त्यावरून नजर न हलवता त्यांनी विचारले, “देशपांडेकाकू, काय प्रॉब्लेम झाला आहे?”
देशपांडेकाकूंना आश्चर्याचा धक्का बसला. ओळख नाही पाळख नाही. मागे वळून बघितले पण नाही कोण आले आहे ते. एकदम देशपांडेकाकू? कमाल झाली. डॉक्टर उत्तराची वाट न बघता बोलले, “प्रभाकरकाकांचे ब्लड प्रेशर वाढले आहे ना?”
डॉक्टरांना मागे वळून बघण्याची सवय नसावी.
“छातीत दुखतेय म्हणून तक्रार करताहेत. हार्ट अॅटकच्या भीतीने घाबरले आहेत.” काकांच्या पेक्षा काकूच जास्त घाबरलेल्या दिसत होत्या.
“तुम्ही असं करा शेजारच्या खोलीत जाऊन झोपा. मला पुन्हा त्रास देउ नका.”
काकूंना वाटले आपण चूक केली. दुसऱ्या डॉक्टरकडे घेऊन जायला पाहिजे होते. ह्याने ना तपासले ना औषध दिले. कसे होणार? शेजारच्या खोलीत गेल्यावर दोघांनाही क्षणार्धात झोप आली. सकाळी उठल्यावर काका भांबावले. कुठे आहोत आपण? काही कळेना. पलीकडच्या कॉटवर बायको घोरत होती. त्यांनी बायकोला हलवून हलवून जागे केले.
जाताना डॉक्टरांचे आभार मानायला त्यांच्या लॅब मध्ये डोकावले.
डॉक्टर त्यांच्या प्रयोगांत मग्न होते.
“थॅंक्यू डॉक्टर.”
“हा, जा आता घरीं.” आता देखील डॉक्टरांनी मागे वळून बघितले नाही.
हा पण किस्सा कट्ट्यावर भरपूर चर्वित झाला. दस्तूरखुद्द देशपांडे तिथे होतेच. ते सांगू लागले,
“आता तुमचा विश्वास बसेल की नाही मला माहीत नाही. मी जेव्हा बेडवर आडवा पडलो तेव्हा माझी आई बाजूला येऊन बसली. माझ्या केसातून हात फिरवत अंगाई गीत गाऊ लागली.”
“निंबोणीच्या झाडामागे
चन्द्र झोपला ग बाई
आज माझ्या पाडसाला
झोप का ग येत नाही.
ऐकता ऐकता केव्हा झोपलो, कळलेच नाही.”
कट्ट्यावरच्या मेंबरांची डॉक्टरांच्या विषयी निरानिराळी मते होती. काही लोकांच्या मते डॉक्टर अमानवीय होते, ऐक, अवगत, अलवंत, आसरा, कालकायक, गानगूड, गिर्हा, बायांगी, चिंद, जखीण, झोटिंग, तलखांब, दाव, देवाचार, ब्रह्मसमंध, ब्रह्मग्रह, मुंजा, राणगा, लावसट, शाखिणी, सैतान, खविस, पिशाच्च आणि वीर भूत, समंध, ब्रह्मराक्षस, मुंज्या, झोटिंग, वेताळ, चेडा, जिंद, जवरा, कुष्मांड, खवीस ह्यापैकी काही होते का अजून काही ह्याबद्दल त्यांचे एकमत नव्हते. मग कोणी एक गोवा कोकणाकडचे होते. त्यांनी कोकणच्या भुतांचे आख्यान लावले. बरेच जण भुताखेतांवर विश्वास न ठेवणारे होते. ते म्हणायाचे छ्या, भूत वगैरे थोतांड आहे. डॉक्टर परग्रहावरून किंवा भविष्यकाळातून आलेले असणार. अजून त्या प्रश्नाचा तिढा सुटलेला नाही.
मग ते नवल घडले.
आमच्या कॉलनीच्या मध्यवर्ती जागी एक सर्कल आहे. चांगले मोठे आहे. त्या सर्कलमध्ये बाग आहे. काही मोठी झाडे आहेत काही फुलझाडे आहेत. अगदी मध्याला ग्रॅनाईटचा मोठा दगड आहे. त्याला शिळा म्हणतात! एका बाजूला लहान मुलांसाठी खेळायची साधने आहेत. म्हणजे झोका, घसरगुंडी, सि-सॉ. सुरवातीला ही बाग ‘ कुलीन स्त्रिया व सहा वर्षांच्या आतील मुला-मुलींसाठी संध्याकाळी पाच ते सात ‘ खुली होती. हा प्रश्न एक दिवशी ऐरणीवर आला. कॉलनी कमिटीच्या सभांमध्ये खूप चर्चिला गेला. सरते शेवटी ती बाग कॉलनीतील आबाल वृद्धांसाठी खुली झाली. मग मात्र तेथे कोणी चिटपाखरू देखील फिरेनासे झाले. टॅक्सीच्या पाठीमागे धावणाऱ्या कुत्र्याप्रमाणे गत झाली. टॅक्सीला ओवरटेक केल्यावर कुत्र्याला काय करावे ते सुचत नाही. अगदी तसेच. गंमत तर पुढे आहे.
एके दिवशी नवल घडले. तर त्या शिळेला एक तोटी लावलेली दिसली. बाजूला “ प्लास्टिक” चे कप ठेवले होते. जनुभाऊना आश्चर्य वाटले. काल परवापर्यंत अशी तोटी नव्हती आज कुठून आली? त्यांनी तडक थेट सावंतांना फोन लावला.
“सावंत, ह्या पुरातन शिळेला तुम्ही तोटी लावलीत आणि शीळेच्या सौंदर्याचा, पावित्र्याचा भंग केलात, ह्याचा अर्थ काय?”
सावंतांना आधी प्रकरण काय आहे ते समजले नाही, समजल्यावर ते म्हणाले, “जन्याभाउ, तो नळ मी लावलेला नाही.”
“नसेल तुम्ही लावलेला, पण कुणी लावला ते तर तुम्हाला माहीत असायला पाहिजे ना!”
“अहो, मी अध्यक्ष जरूर आहे. याचा अर्थ असा नाही की कॉलनीत कोण कुठे तोट्या लावतो ते शोधत बसू. पुढच्या मिटिंग मध्ये तुम्ही हा विषय जरूर आणा. आपण विस्ताराने चर्चा करू.” इतके बोलून सावंतांनी फोन बंद केला.
मी बागेच्या बाहेर बाकड्यावर बसून मोबाइलवर भक्तिगीते ऐकत बसलो होतो. आतून जन्याभाउंनी आवाज दिला. “अहो प्रभुदेसाई, जरा आंत येऊन बघा.”
जन्याभाउने नळ दाखवला. ज्यानेकुणी लावला त्याची कमाल होती. दगडांत नळ कसा घुसवला असेल? आणि कशासाठी? निखळ गंमत म्हणून?
“जन्याभाउ हा नळ वरून दगडाला डकवला आहे. फेविकाल वापरून. गंमत करण्यासाठी. जरा जोर लावला की उखडून येईल.”
“आणि हे प्लास्टिकचे कप कशासाठी?”
मी पुढे होऊन नळाला जोर लावून बघीतलं. नळ जाम हलायला तयार नाही. म्हटले बघू पाण्याचे कनेक्शन दिले आहे का आतून. म्हणून नळ उघडला तर काय नळातून गढूळ गरम पाण्याची धार लागली होती.
“जन्याभाउ, हे पहा उकळत्या पाण्याची धार.”
जन्याभाउना काहीतरी संशय आला असावा. त्यांनी बाजूचा एक कप उचलुन कपांत धार पकडली. नळ बंद केला आणि पाण्याचा घोट घेतला.
“अरे प्रभुदेसाई, हा चहा आहे,चहा, अमृततुल्य! अहाहा देवाची करणी आणि दगडांत चहापाणी. प्या तुम्ही पण एक कप.” मी घाबरत घाबरत एक कप चहा घेतला. काय छान चव होती. पुण्याच्या भाषेत बोलायचे तर ‘अप्रतिम!’ फुकट एक स्पेशल!
फुकट स्पेशल चहाची वार्ता सगळीकडे वणव्यासारखी पसरली. राजापूरला गंगा आली त्याप्रमाणे. बाया बापड्या येऊन शिळेची पूजा करू लागले. प्रसाद म्हणून जाताना किटलीभर चहा घेऊन जाऊ लागले. बघता बघता शिळेची शीलादेवी झाली. कॉलानीतल्या एका नवोदित कवीने शीलादेवीची आरती रचली. कुणी स्तोत्रं रचली. एक सीडी भरून मटेरीअल जमा झाले. देवीचे पुराणातले दाखले शोधून काढण्यांत आले. पांडव वनवासात असताना कॉलनीत आले होते आणि त्यांनी देवीची पूजा करून महायुद्धात विजय मिळावा म्हणून देवीची प्रार्थना केली होती.
हे सगळे ठीक होते पण बागेची आणि कॉलनीची पार रया गेली. स्वच्छ कॉलनी म्हणून आमच्या कॉलनीची पुण्यात प्रसिद्धी होती ती लयास गेली.
एका रात्री देवीचे दर्शन आणि “प्रसाद” घेऊन मी घरी आलो. थोडा टीवी बघितला आणि जेवायला बसणार इतक्यात डॉक्टरांचा फोन आला.
“अरे प्रभुदेसाई, हे मी काय ऐकतो आहे. बागेत म्हणे शीला देवी अवतीर्ण झाली आहे?”
“कमाल आहे, एवढे रामायण झाले पण तुम्हाला त्याची अजिबात कुणकुण नाही?” मीच डॉक्टरांना उलट प्रश्न केला.
“मी तुमच्या कॉलनीच्या भानगडीत पडत नाही. तसे म्हणजे मी माझ्या मठीतून क्वचितच बाहेर पडतो. आमच्या इथून कॉलनीच्या बाहेर पडायला रस्ता आहे. मग तुमच्या सर्कलकडे जायची गरज काय?”
मी डॉक्टरांना काय झाले नि काय होत आहे ह्याची कल्पना दिली, “सगळेजण चहा पिऊन कप तिथेच कुठेतरी फेकून देतात. बागेत सगळीकडे उंदीर झाले आहेत.”
“अरेरे काय मूर्ख आहेत लोक. तू असे कर उद्या सकाळी इकडे चहा प्यायला ये माझ्याकडे.” आमंत्रण देऊन डॉक्टरांनी फोन बंद केला.
दुसऱ्या दिवशी बघतो तर काय बागेत प्रचंड उलथापालथ झालेली! चहाची तोटी गायब! तोटी बरोबर चहाही गेला आणि देवीही गेली. बाजार गेला. दुकाने गेली. हार-तुरे कोमेजून गेले. लाईनी गेल्या. लोक निराश होऊन परतू लागले. जाणते लोक सांगू लागले की देवीचा कोप झाला. कुणीतरी अक्रीत केले. आता कॉलनीवर संकट कोसळणार. संध्याकाळ झाल्यावर मी तडक डॉक्टरांच्या बंगलीकडे गेलो. झालेला प्रकार त्यांना निवेदन केला, “अश्याप्रकारे देवी स्वगृही परत गेली.”
“मी तुम्हा लोकांसाठी म्हणून नळ ठेवला. विचार केला होता. तुम्हा कट्टेकर मंडळींना बसल्या जागी चहा मिळेल. तुमच्यासाठी खास एटीटी –एनी टाईम टी- तर पहा काय करायला गेलो नि काय झाले.” डॉक्टरांच्या चेहऱ्यावर निराशा पसरली. म्हणजे एकूण हे कर्तृत्व डॉक्टरचे होते. आता मात्र मला डॉक्टरांची भीती वाटू लागली.
“त्याचे काय आहे. सर्व हॉटेलवाल्यांचे एक अंडरग्राउंड जाळे आहे. सगळ्यांचा चहा एका मोठ्या टाकीत बनवला जातो. प्रत्येक हॉटेलवाला त्याचा मेंबर आहे. मेंबर झाला की त्याला ह्या “चहा नेटवर्क” मध्ये टॅप मारून देतात. उडपी चहाचा वेगळा हौद आहे तसा इराणी चहाचा पण वेगळा हौद आहे. ते जाळे हॅक करून मी एक कनेक्शन आपल्यासाठी काढले. काल तू सांगितल्यावर बंद करून टाकले.” डॉक्टरांनी मला सफाई दिली.
“डॉक्टर एवढे प्लंबिंगचे काम तुम्ही चुपचाप कसे उरकले?”
“मी कोण करणार?” डॉक्टरांनी वर बोट दाखवले, “तो महान प्लंबर आहे.त्यानेच हे घडवून आणले. आपण निमित्त मात्र!”
“बर ते जाउदे. तू चहा घेणार ना?” डॉक्टरांनी मला विचारले.
“तोच चहा का? टॅप मारलेला. मग नको.” काल परवापर्यंत जो चहा मी आवडीने पीत होतो त्याची आता घृणा आली.
“नाही. नाही. हा माझ्या घरच्या मशीन मध्ये बनवलेला चहा आहे. त्याचे काय आहे—कोणाला सांगू नकोस बर का --- मी सध्या ए टी एफ मशीन म्हणजे एनी टाईम मशीन फूड बनवण्याच्या प्रयोगांत व्यस्त आहे, आता पर्यंत चहाचे मशीन बनवण्यांत मला यश मिळाले आहे. त्या मशीनमध्ये पॉप कॉर्न बनवण्याचे माझे स्वप्न आहे. ते साकार झाले की पहिले पॉप कॉर्न खायला तुलाच बोलावीन.” एवढे बोलून डॉक्टरानी मला चहा देउ केला.
चहाची चव अप्रतिम होती. चहा पिताना डॉक्टर म्हणाले. “आता हा कप पहा. लोक चहा प्याल्यावर तिथेच कुठेतरी कप फेकून देतात. त्याना कसे समजाऊ? प्रभुदेसाई, हा कप असा चहाबरोबर खायचा असतो. निरनिराळ्या चवीचे बनवले आहेत. तुझा आणि माझा कप आहे ना हा, ह्याला संभाजी बागेतल्या भेळेची चव आहे. खाऊन तरी बघा. सध्या तीन चवीचे कप बनवले आहेत. दुसऱी पाणीपुरीची चव आहे. तिसरी आपली नेहमीची डिफॉल्ट मसाला! खा खा.” डॉक्टरांनी स्वतःचा कप बाजूबाजूने खायला सुरवात केली. मी पण भीत भीत खायला लागलो. वा भेळेबरोबर चहा! किंवा चहाबरोबर भेळ!
डॉक्टर पुढे सांगू लागले, “प्रभुदेसाई, प्लास्टिकने आपल्या आयुष्यांत केव्हढा धुमाकूळ घातला आहे? १८६२ अलेक्सझॅन्डर पार्क्सने सर्वपथम कृत्रिम प्लास्टिक बनवले. नंतर १९०७ साली प्लास्टिक-बाळ बेकेलाईटचा जन्म झाला. लहान बाळाचे जसे सगळेजण कौतुक करतात तसे प्लास्टिकचे पण कौतुक सुरु झाले. ह्याच गोजिरवाण्या बाळाचे रुपांतर राक्षसांत झाले. त्याने पृथ्वीवर आक्रमण करायला सुरुवात केली. समुद्रातील असंख्य जीवांचा तो कर्दनकाळ बनला. एवरेस्ट ते पॅसिफिक महासागर! जगाच्या कानाकोपऱ्यांत प्लास्टिकने हात पाय पसरले. भस्मासुर मानवाच्या नियंत्रणाबाहेर गेला. जिथे पहावे तिथे प्लास्टिक! पॅसिफिक महासागरांत हेन्डरसन नावाचे निर्जन बेट आहे. ह्या बेटावर जगांत कुठेही नसेल इतके प्लास्टिक आहे. समुद्रांतून वहात आलेले! ”
“पण हा डॉक्टर ननवरे असा हार मानणार नव्हता. मी काय केले? खाता येईल असे वेष्टन शोधून काढले. बिस्कीटांचा पुडा बिस्किटाबरोबर खा. चहाचा कप चहा पिताना बरोबर खा. अरे, आपण कोन आईस्क्रीम कोनसह खातो तसे. तुमच्या त्या मूर्ख लोकांना हे समजेल तर ना. चहा पिऊन झाला की दिला तो कप फेकून तिथेच कुठेतरी,”
डॉक्टर सांगत असताना अचंब्याने मी तोंडात बोटे घालायच्या ऐवजी सगळा कपच घातला आणि केव्हा स्वाहा केला ते माझे मलाच समजले नाही.
“तू हे कुणाला सांगू नकोस हं. उगीच लोकांचा गैरसमज व्हायचा. आधीच लोकांना वाटते की मी “अमानवीय” आहे. त्यांत भर पडायला नको.”
तर सांगायचा मुद्दा हा की असे आमचे डॉक्टर “अमानवीय” आहेत.
थोड्याच दिवसानंतर सगळ्या पुण्याची मति गुंग करणारी
अभूतपूर्व घटना घडली. त्या अघटित घटनेचा मी एकमेव साक्षीदार आहे. म्हणजे डॉक्टरांच्या शिवाय बरका.
( भाग -१ समाप्त)
प्रतिक्रिया
20 Feb 2023 - 10:50 am | भागो
मित्र हो, ही कथा कदाचित आपण वाचली असेल/ नसेल.
वाचली असेल तर पुन्हा वाचा, नसेल तर काय प्रश्नच नाय.
20 Feb 2023 - 11:13 am | राजेंद्र मेहेंदळे
आता तुम्ही म्हणाल की पहीला कसा? तर लेखकानेच पहीली प्रतिक्रिया दिलेली असल्याने तांत्रिक दृष्ट्या मीच पहीला वाचक/प्रतिसादक!!
आजवर भागो यांच्या जेव्हढ्या कथा मी वाचल्या त्या सर्व (चांगल्या अर्थाने) डोक्याला शॉट लावणार्या होत्या. सायन्स्/फिक्शन्/टेक्नोलॉजी/विनोद्/ललित लेखन अशी सरमिसळ असते. पण कथा विचार करायला लावते. कधी कधी तर लेखक काहीतरी रुपके वापरुन वेगळेच काही सुचवत नाहिये ना? हे ठरवायला अजुन एकदा वाचावी लागते. पण एकुण त्याना लेखनाची नस सापडली आहे असे वाटते.
@भागो--असेच छान छान लिहित रहा, आणि आम्हाला विचार करायला भाग पाडा.
अवांतर-- ही कथा चॅट गपट वापरुन लिहिली नसावी अशी आशा करतो, नाहीतर वरचे सगळे शब्द मागे घेतो.
20 Feb 2023 - 1:32 pm | भागो
वरचे सगळे शब्द मागे घेतो.>>
आधी आभार मानतो.
ही कथा जवळपास अडीच वर्षांपूर्वी लिहिली आहे. दुसरा भागही तयार आहे, तेव्हा मला वाटतंं, चाटगपट ड्राइंग बोर्ड वर असणार. मुद्दामहून दोन भागात टाकणार आहे. कारण काही वाचकांनी तक्रार केली कि कथा वाचता वाचता कंटाळा आला नि मग अर्धवट सोडून दिली. ह्या कार्हेबाबर तस होऊ नये म्हणून.
20 Feb 2023 - 3:04 pm | टर्मीनेटर
क्या बात कर रहेले हो सेठ...
क्रिकेट मध्ये जसे T20, वन डे आणि टेस्ट असे प्रकार असतात तसेच हल्ली लेखनाच्या/वाचनाच्या बाबतीतही झाले आहे.
ज्यांना चारोळी लेखन लिहायचे/वाचायचं असेल ते ट्विटर वर जातील, ज्यांना तीनेकशे शब्दांतला निबंध टाईप लेखन लिहायचे/वाचायचे असेल ते फेसबुक वर जातील; पण ज्यांना खरोखर काहीतरी लिहायचे/वाचायचे असते तेच मिपा चे खरे लेखक/वाचक असतात असे माझे वैयक्तिक मत! तेव्हा असल्या दबावाला बळी न पडता बिनधास्त दिर्घलेखन करावे अशी नम्र विनंती.
कथेचा पहिला भाग आवडला आहे हे वेगळे सांगणे न लगे 👍
(नाईलाजाने 😀) पुढील भागाच्या प्रतीक्षेत...
20 Feb 2023 - 1:40 pm | यश राज
फर्मास झालीय कथा, वाचायला मजा येतेय .
23 Feb 2023 - 12:33 pm | भागो
धन्यवाद!
20 Feb 2023 - 2:16 pm | चित्रगुप्त
भागोपंत, जबरदस्त कल्पक, रोमांचक, मनोरंजक कथा एकदम आवडली. विनोदी असूनही या कथेत विविध प्रकारची माहिती, निरिक्षणे, मनुष्यस्वभावाचे नमुने वगैरेंचा जो एक विस्तृत पट मांडला आहे, त्याने कथेचे मूल्य खूपच वाढलेले आहे. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
ही येवढी मोठ्ठी यादी कुठे मिळाली असावी बुवा ? असा प्रश्न पडला आहे. दासबोधात तर नव्हे ?
गूगल्बाबास साद घालता खालील मिळाले (कोकणातील भुते)
https://mr.wikipedia.org/wiki/भूत
20 Feb 2023 - 2:51 pm | Bhakti
ही येवढी मोठ्ठी यादी कुठे मिळाली असावी बुवा ?
खरंच की!ट्रु अभ्यासू रायकर :)
20 Feb 2023 - 4:41 pm | भागो
अहो मी कोकणी माणूस आहे.
तुम्हाला जर भटाला वश करायचे असेल तर हा मंत्र सिध्द करा.
"बावन वीर, छत्तीस जंजीर, आग्यावेताळ मसण्या वीर
बावन वीर, छत्तीस जंजीर, आग्यावेताळ मसण्या वीर
खाताखोल त्याचा जीव बांधू ,बांध बांधू, नऊ नाडी बांधू, बहात्तर कोटी बांधू. बांधू न बांधू,
कालभैरवकी आन. गुरुकी शपथ, मेरी भगत.
स्फुरो मंत्र ईश्वरी वाचा !"
20 Feb 2023 - 2:49 pm | Bhakti
जबरदस्त!
माझ्या एवढे साय फाय ,फिक्शन सिनेमा ओळखीतल्या, जवळच्या लोकांना क्वचितच आवडतं.पूर्वी अख्खा दिवस असे एकामागोमाग एक पाहायचे (गेले ते दिवस :)) तरी हल्ली फार फार कमी पाहतेय असे सिनेमे.मराठी वातावरणातले तुमच्या साय फाय गोष्टी कमाल आहेत.मजा येते वाचायला.वाचतेय!
-भक्ती
20 Feb 2023 - 3:01 pm | सौंदाळा
कपाची आयडीया भारी आहे. टपरीवाल्यांकडे असे ईटेबल कप पाहिजेत खुप कचरा कमी होईल. ईटेबल सिगारेट, तंबाखू पण पाहिजेत. रस्त्यावर लाल पिचकारी टाकली की त्यातून लगेच घातक संसर्ग व्हायला पाहिजे. प्रचंड प्रमाणात कचरा, गलिच्छपणा कमी होईल.
कथा नेहमीप्रमाणेच छान.
होम्स, वॉटसन किंवा धारपांचे 'समर्थ' यासारखेच डॉ. ननावरे यांचे पात्र पण तुमच्या कथांमधून मनात ठसत आहे.
20 Feb 2023 - 3:07 pm | राजेंद्र मेहेंदळे
https://www.amazon.in/s?k=edible+cups&adgrpid=1322714095658249&hvadid=82...
20 Feb 2023 - 4:25 pm | भागो
हो हो. मी ही कथा लिहिल्यावर स्वतःची पाठ ठोकून शाबासकी घेतली. विचार केला अरे मी मानव जातीचा केव्हढा प्रश्न सोडवला.
नंतर शार्क टॅॅक (अमेरिकन) प्रोग्राम बघितला तर काय. दोन तरुण तिथे येऊन ह्याच साठी भांडवल मागत होते!
सगळा भ्रमनिरास झाला.
तदनंतर मी त्यांच्या कंपनीचा पाठपुरावा केला. अस दिसतंय की लोकांना त्याची चव काही आवडली नाही.
20 Feb 2023 - 3:12 pm | कंजूस
मजा आली.
20 Feb 2023 - 4:52 pm | सस्नेह
मजेदार कथा!
23 Feb 2023 - 12:36 pm | भागो
सगळ्या प्रतिसादकांना धन्यवाद!
10 Mar 2023 - 7:43 pm | diggi12
पुढचा भाग ?