धाडसी धोंडू

बिपीन सुरेश सांगळे's picture
बिपीन सुरेश सांगळे in जनातलं, मनातलं
25 Jan 2023 - 9:41 pm

धाडसी धोंडू

---------------------------------------------------------------------------------------------------------------------

एखाद्या लहान मुलाचा कोणी पोवाडा म्हणतं का ? पण गोष्टच तशी घडली असेल तर ? त्याचं झालं होतं असं ...
ही गोष्ट आहे स्वातंत्र्यपूर्व काळातली .
श्रावणाचे दिवस . दुपार संपायला आलेली . सोनेरी ऊन पसरलेलं. हिरव्या गवतावर नुकत्याच पडलेल्या सरीचे थेंब . सारा माळ हिरवागार झालेला . आकाशात मधूनच जाणारा एखादा पोपटांचा थवा. त्या माळावर छोटा धोंडू उभा होता . सावळासा , काटकुळा . तो धनगर होता . वेषही तसाच . गुढघ्यापर्यंत पांढरं धोतर , तसाच सदरा , डोकीवर लाल मुंडासं . अन खांदयावर रुबाबात धरलेली एक काठी . नाजूक वाजणारी घुंगरं लावलेली . जिच्यावर दोन्ही हात ठेवून तो शीळ घालत उभा होता . त्याच्या मेंढरांकडे बघत . हेS मेंढरं . तपकिरी , करडी , राखाडी , पांढरी सगळीच . आणि दोन तीन कुत्रे .
मेंढरंही खुशीत होती . खायलाच मुबलक एवढं . पाऊसपाणी भरपूर झालेलं . धोंडूही खुशीत होता .मध्येच त्याने एका बदामी रंगाच्या छोट्या पिल्लाला उचललं. त्याचे पाय त्याने धरले आणि केलं त्याला उलटं . खाली डोकं अन वर पाय ! ते म्याs म्या करून ओरडायला लागलं बिचारं .
त्याचे वडील त्याच्यासारख्याच वेषात होते .उंच अन बळकट . ते त्याला ओरडले , “ ए , सोड त्याला , सोड . उगा त्रास देतो . तुला खाजकुयलीच लावीन , नाहीतर पत्री सरकारकडेच देईन . “
धोंडूने डोळे मोठे केले. पिल्लाला खाली सोडलं . खाजकुयली त्याला माहिती होती . ती एक वनस्पती असते . ती अंगाला लावली की खाज सुटते . पण आता हे पत्री सरकार काय असतं ? हे त्याच्यासाठी नवीनच होतं .
त्याने विचारलं , “ अप्पा , हे पत्री सरकार काय असतं ? “
त्यावर अप्पा म्हणाले , “ ते सरकार असतं .इंग्रजांच्या विरुद्ध लढतं .वाईटांना सरळ करतं , कळलं ? “
बिचारा धोंडू. एकतर तो शाळेत न जाणारा . त्यात ही खूप जुन्या काळातली गोष्ट. त्याला हे सगळं कसं कळावं . त्याने विचारलं , “ मग याला आपण घाबरून रहावं का ? “
त्यावर अप्पा म्हणाले , “अरे , ते सरकार आपलं असतं , आपल्यासाठी असतं .”
त्यावर तो विचार करत राहिला . त्याला फार माहिती नसली तरी इंग्रज सरकारचा राग मात्र होता .
पत्री सरकार म्हणजे प्रति सरकार . क्रांतिसिंह नाना पाटील यांनी स्थापन केलेलं. ते इंग्रजांना शह देण्यासाठी , त्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी होतं. सातारा - सांगली भागात , खूपशा गावांमध्ये त्यांचा कारभार चालत असे . लोकांसाठी एक समांतर सरकार. लोकांना जागृत करणारं . दरोडेखोरांना , जुलमी सावकारांना वठवणीवर आणणारं .
त्यांचा प्रचार गावोगाव चालत असे . तो कसा ? तर त्यांचं एक पथक होतं. शाहीर निकम यांचं . ते आणि त्यांचं पथक गावोगाव जाऊन पोवाड्यांतून , गाण्यांतून जनजागृती करत.
आता धोंडू ज्या माळरानावर उभा होता , त्याच्या शेजारी नदी होती . पलीकडे चिंचवली गाव होतं . आज रात्री तिथे पथकाचा कार्यक्रम होता .
त्याला खूप भूक लागली होती . त्याची आई पालावर होती . चुलीवर स्वैपाक करत . त्याला वाटत होतं , पोटभर जेवायचं , मग कार्यक्रम बघायचा . याआधी त्याने असा कार्यक्रम पाहिला नव्हता . त्यामुळे त्याच्यासाठी ती एक नवीन अन आश्चर्याचीच गोष्ट होती .
लांब डांबरी सडक दिसत होती . लांबपर्यंत नजरेला सारं मोकळं दिसत होतं . आणि त्या सडकेवर एक ठिपका उमटला . तो मोठा झाला आणि त्याचा आवाज येऊ लागला . जीप !... ती पोलिसांची जीप होती .
अप्पांनी आवाज ऐकला आणि ते सावध झाले .
“ धोंड्या , पोलीस ! ... “
धोंडूला कळेना , आपल्याला पोलिसांची काय भिती ? अप्पांना त्याला पडलेला प्रश्न कळला . “ अरे , पोलीस येताहेत म्हणजे नक्कीच ते गावात जाणार आणि शाहीर पथकाला धरणार .”
आता धोंडूला उलगडा झाला आणि त्याला अप्पांना पडलेला प्रश्न कळला . त्याचं डोकं मेंढराच्या पिल्लासारखं टणाटण पळायला लागलं ... आणि मग ?
त्याने अप्पांना त्याची युगत सांगितली . काय असावी ती ? ...
दोघांनी सगळी मेंढरं रस्त्यावर नेली . हाकत , इशारे करत . मुद्दाम !
पोलिसांची जीप त्यांच्या जवळ आली आणि थांबली . कारण - मेंढरांनी सगळा रस्ताच अडवला होता. आता ? ड्रायव्हर सोडता चार शिपाई खाली उतरले. उग्र अन मिशाळ . त्यांच्या हातात लांब नळीच्या बंदुका होत्या . धोंडू त्या पहिल्यांदाच पाहत होता . तो आधी घाबरला .
एक शिपाई अप्पांना ओरडला , “ ए , मेंढरं बाजूला घे. का दाखवू इंगा ? “
त्यावर अप्पांनी मेंढरं बाजूला घ्यायची सुरुवात केली . पण कुठली ? तर जीपच्या जवळची सोडून बाकीची . त्यावर सगळे शिपाई गाडीपुढच्या मेंढरांना हाकलायला लागले. त्यांच्या हातातल्या बंदुकीच्या दस्त्याने त्यांना मारू लागले. धोंडू खोड्या काढत असला तरी त्याचं मेंढरांवर प्रेम होतं . त्यांना बसणारा मार पाहून त्याचा जीव कळवळू लागला . अन - एकाने तर अप्पांनाच तडाखा ठेवून दिला.
वर विचारलं , “ गावात काय चाललंय ? “
अप्पा म्हणाले , “ काही नाही साहेब . “
ते पाहणाऱ्या धोंडूच्या डोळ्यांत पाणी आलं . त्याला राग आला . काहीतरी करायला हवं होतं . पण तो तर छोटासा . तो काय करू शकणार होता ?
तोही मेंढरं हाकलत होता अन तो जीपच्या मागच्या बाजूला गेला . लपत छपत .
त्याच्या हातात दोन काठ्या होत्या . त्यावर खाजकुयली . त्याने त्या काठ्या त्या शिपुरड्यांच्या सिटांना चोळल्या . वर खाली आणि भरपूर . मग तो पसार झाला . त्याच्या मनात आलं - पाठीत काठी मारता ? आता कळेल तुम्हाला काठीपेक्षा खाजकुयली कसली भयंकर आहे ते !
मेंढरं हलली तशी जीपही हलली .
अप्पांचं आणि धोंडूचं काम झालं होतं . पुढे जाऊन जीप थांबली . ती थांबणारच होती ना. शिपुरडे उतरले खाली आणि लागले पाठी खाजवायला . कराकरा अन खराखरा !
मेंढरांमुळे थोडा वेळ मिळणार होता . पण खाजकुयलीने तर बहारच आणली होती. तेवढाच जास्तीचा वेळ मिळाला होता . अप्पा मेंढरं घेऊन लांब गेले.
आता खरं धोंडूचं काम होतं . पोलिसांना संशय नको म्हणून अप्पांनी स्वतःचं काम धोंडूवर सोपवलं होतं . ते मेंढरांचा कळप सांभाळणार होते . आणि ...
तो पळत पळत उताराला लागला . दगड धोंडे चुकवत नदीच्या दिशेने. नदीला पाणी काही कमी नव्हतं .नुकत्याच झालेल्या पावसाने ती तर दुथडी भरून वाहत होती . गढूळ पाण्याने. त्या पाण्यात काय काय ? वाहून येणाऱ्या वेली,साप अन भोवरेही . पट्टीचा पोहणाराही त्या पाण्यात उडी मारायला बिचकला असता. पण धोंडूला काय त्याचं ? तो तर धाडसी पोरगा होता . ही विचार करायची वेळ नव्हती . त्याने धप्पदिशी पाण्यात उडी घेतलीसुद्धा . अन हातपाय मारायची सुरवात केली.
अर्धी नदी पार केल्यावर ते पाणी कापणं त्याला अवघड वाटू लागलं . पाणी त्याला पुढे खेचत होतं आणि त्याचं मन त्याला गावाकडे खेचत होतं . त्याचा दम संपत चालला होता . आता ? ... सोबतीला कोणी नाही न बघायला कोणी नाही . पण त्याला ते दैत्यासारखे शिपाई आठवले आणि त्याच्या अंगात वेगळीच शक्ती संचारली , देवाचं नाव घेऊन तो झपाट्याने निघाला. .. नदीची ती धार कापत .
नदीत डुंबणं वेगळं आणि पुरात पोहणं वेगळं ! तो पुरातही पोहणारा पोरगा खरं तर . पण पाण्याला ओढ जास्त होती. ते पाणी जुलमी वाटत होतं - इंग्रज सरकारसारखं ! तो त्वेषाने हात पाय मारत राहिला . त्याला पैलतीर गाठायचाच होता .
एव्हाना शिपायांची खाज कमी झाली होती. पण जीपला खूप पुढे जावं लागणार होत. पूल पुढे होता. पुलावरून वळसा घालून चिंचवलीसाठी पुन्हा उलटं यावं लागणार होतं. रस्ता लांबचा होता.
धोंडू मात्र नदी ओलांडली की गावात पोचणार होता. जीप पुलावर पोचायच्या आधी धोंडू पाण्यातून निथळत बाहेर निघाला. तेव्हा त्याला भयंकर दम लागला होता . पण आता थांबायलासुद्धा वेळ नव्हता .
तो गावात पोचला . धापा टाकतच , पोलिसपार्टी येतीये, हा निरोप त्याने गावकऱ्यांना दिला. त्यांनी ताबडतोब शाहीर निकम आणि त्यांचं पथक हलवलं. शेजारच्या जंगलातून ते एका छोट्याशा पाड्यावर पोचले. तिथे पोलीस येण्याची शक्यता नव्हती.
पोलीस गावात आले, शाहीरपथकाला धरायला . पण कसचं काय ? हात हलवत, पाठी अन बूड खाजवत त्यांना परतावं लागलं.
नंतर - त्याच्या आईने त्याला जवळ घेतलं . त्याला तिने उराशी घट्ट धरूनच ठेवलं . तिच्या डोळ्यांत पाणी होतं , भीती होती , माया होती . त्याला खूप भारी वाटलं . अप्पांनी त्याला जवळ घेतलं . पुराच्या पाण्यात पोराला पाठवायचं , म्हणजे किती अवघड गोष्ट ! पण त्यांनी मन खंबीर केलं होतं. देशासाठी ! ... अन त्यांचा धोंडूवर विश्वास होता .
धोंडू अन अप्पांचं गावानं कौतुक केलं .
पुढे त्याच गावात काही दिवसांनी ते पथक आलं आणि शाहिरी जलसा झालाच. तेव्हा शाहीर निकम यांनी धोंडूचं कौतुक करून पोवाडा गायला.

धोंडू होता वाटेला
पोलीस आलं फाट्याला
थोडी खाजकुयली
अन मेंढरं अडवायला
काम झालं जंगी
पोलीस लागले खाजवायला
संकट टळलं आमचं
मग घ्या कि वाजवायला
ओ जिजी रं जिजी रं जिजी

धोंडूचा धोंडूबा झाला होता. तो बिचारा स्वतःचं नाव ऐकून लाजला. त्याच्या आईला जाऊन चिकटला. तिने त्याच्या डोक्यावरून हात फिरवून कडाकडा बोटं मोडली . गावकऱ्यांनी खूप टाळ्या वाजवल्या .
शाहीर म्हणाले , “ अशी धाडसी पोरं आपल्या देशात आहेत . मग आपल्याला स्वातंत्र्य मिळणं काय अवघड आहे ? आणि अशा देशात आपण राहतो याचा पुढच्या पिढीला अभिमानच वाटेल .“
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

हे ठिकाण

प्रतिक्रिया

बिपीन सुरेश सांगळे's picture

25 Jan 2023 - 9:42 pm | बिपीन सुरेश सांगळे

उद्याच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त .

खेडूत's picture

26 Jan 2023 - 11:49 am | खेडूत

मस्त गोष्ट.
कुंडल आणि कडेगावं परिसरात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याबरोबर काम केलेले अनेक लोक लहानपणी प्रत्यक्ष भेटले होते आणि अश्या गोष्टी ऐकल्या होत्या. वसंतदादा सुद्धा त्यांचे सहकारी होते असं ऐकलं होतं.

कर्नलतपस्वी's picture

26 Jan 2023 - 10:03 pm | कर्नलतपस्वी

अनसंग हिरो.

जेपी's picture

26 Jan 2023 - 10:52 pm | जेपी

आवडली कथा

बिपीन सुरेश सांगळे's picture

26 Jan 2023 - 10:56 pm | बिपीन सुरेश सांगळे

वाचक मंडळी
खूप आभारी आहे

नठ्यारा's picture

14 Feb 2024 - 6:08 pm | नठ्यारा

क्या शॉल्लेट मारा बे!
-ना.न.

बिपीन सुरेश सांगळे's picture

16 Feb 2024 - 8:07 am | बिपीन सुरेश सांगळे

ना. न.
कथा आवडली यासाठी आनंद आहे
आभार

रामचंद्र's picture

24 Feb 2024 - 11:36 pm | रामचंद्र

या साध्यासरळ गोष्टीचा गोडवा मोठा लोभसवाणा आहे.

चौथा कोनाडा's picture

29 Feb 2024 - 5:22 pm | चौथा कोनाडा

छान कथा ... आवडली !
धोंडूची समयसुचकता & धाडस खरंच वाखाणण्या जोगं !
गावोगावचे कित्येक अनामिक माणसं, बायका, पोरं, पोरी यांच्या धाडसामुळं स्वातंत्र्यलढ्याला धार चढली !

श्वेता व्यास's picture

1 Mar 2024 - 10:55 am | श्वेता व्यास

धाडसी धोंडूची गोष्ट आवडली.

मस्त कथा. अशीच एक आम्हाला 1लि किंवा 2रिला। छोटा शिरीषची नांदुरबारचा स्वात्त्र्यासाथि बलिदान केल्याची सुंदर कथा होती ,आईने सांगितले ती खरी घडलेली गोष्ट होती ब्रिटिशांनी छोट्या शिरीषला मारून टाकले ते. त्या वयात कोणी मेले असे वाचले तरी खूप वाईट वाटे व रडू येई पटकन मग आईलाही रडू येई, पण ती माझी समजूत काढत स्वतःचीही समजूत काढत असे.

Nitin Palkar's picture

5 Mar 2024 - 7:21 pm | Nitin Palkar

छान कथा. कथनाची/लेखनाची हातोटीही सुंदर.