ताप येणे हे बऱ्याच आजारांचे प्राथमिक व महत्त्वाचे लक्षण असते. शरीराचे तापमान नियंत्रण आणि ताप येण्याची मूलभूत प्रक्रिया आपण यापूर्वी “गरम आणि ‘ताप’दायक” या लेखात समजावून घेतली आहे.
त्या लेखात संसर्गजन्य आणि अन्य शारीरिक आजारांमध्ये येणाऱ्या तापाचे विवेचन आहे. परंतु त्या व्यतिरिक्त, मानसिक बिघाड हे सुद्धा ताप येण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे. या प्रकारचा ताप वैशिष्ट्यपूर्ण असतो. त्यासंबंधी स्वतंत्रपणे काही लिहावे अशी सूचना एका वाचकांनी नुकतीच केली. त्यानुसार हा लघुलेख लिहीत आहे.
मनस्थितीजन्य ताप म्हणजे काय ?
काही व्यक्ती जेव्हा मानसिक ताणतणाव, भीती किंवा भावनिक आंदोलनांना सामोऱ्या जातात तेव्हा त्यांना अचानक ताप येतो. या तापाची काही अंगभूत वैशिष्ट्ये अशी:
• व्यक्तीच्या शरीरात कुठलाही जंतुसंसर्ग नसतो. तसेच शारीरिक तपासणी केली असता कोणताही ‘शारीरिक’ बिघाड सापडत नाही.
• काहींना उच्च पातळीचा ताप येतो (105-106 F) व तो लवकर ओसरतो.
• तर काहींच्या बाबतीत ताप सौम्य ते मध्यम असतो (100- 101 F). परंतु तो दीर्घकाळ (काही महिने सुद्धा) टिकतो.
• या प्रकारच्या ताप-उपचारात नेहमीच्या तापविरोधी औषधांचा (क्रोसिन वगैरे) उपयोग होत नाही.
• पौगंडावस्थेतील मुलांत या तापाचे प्रमाण बऱ्यापैकी आहे.
ताप येण्याची जैविक प्रक्रिया
जंतुसंसर्गाने येणारा ताप आणि मानसिक अस्वास्थ्यातून येणारा ताप यांच्या मूलभूत प्रक्रिया भिन्न आहेत.
जंतुसंसर्गामध्ये खालील घटना घडतात:
संसर्ग >>> दाहप्रक्रिया >>> Prostaglandins आणि अन्य रसायनांमधली वाढ >>> मेंदूच्या हायपोथालामस भागातील विशिष्ट केंद्रावर परिणाम >>> ताप.
मात्र मनस्थितीजन्य तापाची प्रक्रिया यापेक्षा भिन्न आहे. ती समजून घेण्यासाठी आधी शरीरातील मेदसाठ्यांबाबत काही माहिती देतो.
आपल्या शरीरात दोन प्रकारचे मेदसाठे असतात:
१. खूप मोठ्या प्रमाणावरील मेदाला आपण ‘पिवळा’ मेद असे म्हणतो. हा त्वचेखाली सर्वत्र आणि उदर पोकळीत असतो.
२. तपकिरी मेद (ब्राऊन fat) : या प्रकारचा मेद मात्र अत्यंत मर्यादित ठिकाणी आहे. तान्ह्या बालकांमध्ये त्याचे प्रमाण तुलनेने जास्त असते. परंतु प्रौढपणी हा मेद शरीरातील काही मोजक्या भागांमध्ये राहतो. जसे की, मान, गळा व छातीचा मोजका भाग.
या मेदाचे एक वैशिष्ट्य असते. तिथे घडणाऱ्या विशिष्ट रासायनिक प्रक्रियांमधून बऱ्यापैकी उष्णतानिर्मिती होते.
मानसिक अस्वास्थ्यामुळे शरीरात अशा क्रिया होतात :
१. Sympathetic चेतासंस्थेचे उद्दीपन होते व त्यातून noradrenaline हे रसायन स्त्रवते.
त्यामुळे २ घटना घडतात:
A. तपकिरी मेदाच्या पेशींचे आकारमान वाढते आणि पेशींमध्ये मेदाचे मोठ्या प्रमाणात विघटन होते. तसेच तिथे UCP नावाच्या प्रथिनाचे प्रमाणही वाढते. त्याच्या गुणधर्माने उष्णतानिर्मिती वाढते.
B. त्वचेच्या रक्तवाहिन्या आकुंचित होतात. >>> उष्णतेचे उत्सर्जन कमी होते.
२. वरील दोन्हींच्या एकत्रित परिणामातून ताप येतो.
अर्थात ही सर्वसाधारण उपपत्ती आहे. सर्व वैज्ञानिकांचे याबाबतीत अद्याप एकमत नाही. या विषयावरील संशोधन अद्याप पुरेसे झालेले नाही.
मानसिक अस्वास्थ्याची कारणे:
मनस्थितीजन्य ताप येणाऱ्या लोकांचे निरीक्षण केले असता अनेक प्रकारची कारणे आढळून आलेली आहेत. त्यांचा थोडक्यात आढावा घेऊ. तो घेताना मुले आणि प्रौढ अशा दोन गटांचा स्वतंत्र विचार करता येईल.
मुले
• एका अथवा दोन्ही पालकांची भीती, दडपण, आई वडिलांतील भांडणे, इ.
• शाळेतील त्रासदायक वातावरण, शिक्षकांची भीती, अन्य मुलांनी वारंवार चिडवणे, टिंगल करणे किंवा धमकावणे, परीक्षा/स्पर्धापूर्व वातावरण.
• कुटुंबातील दुःखद घटना
• भीतीदायक दृश्ये/चित्रपट/ चित्रफितींचा परिणाम
प्रौढ व्यक्ती
• कामाच्या ठिकाणचे ताणतणाव, वरिष्ठांची भीती, नोकरी जाण्याची भीती
• काही लोक कामाच्या ठिकाणी कायमच मरगळलेले दिसतात. अशांवरही काही अभ्यास झालेले आहेत. त्यांचा कामाचा दिवस आणि विश्रांती/सुट्टीचा दिवस यांमध्ये देखील त्यांच्या शरीर तापमानात फरक पडलेला आढळला आहे.
• मोठ्या क्रीडा स्पर्धांच्या आधीचा दिवस
• कुटुंब व जिवलग मित्र परिवारातील दुःखद घटना आणि त्यांचे काही काळाने केलेले स्मरण, इत्यादी.
• मोठ्या शस्त्रक्रिया/ भूल यांना सामोरे जाताना.
जंगली/हिंसक प्राण्यांशी संपर्क
उपचार
वरील विवेचनावरून हे लक्षात येईल की अशा प्रकारच्या तापामध्ये नेहमीच्या तापविरोधी औषधांचा उपयोग होत नाही. किंबहुना अशा औषधांचा उपयोग न झाल्यानेच डॉक्टर त्या व्यक्तीचा वेगळ्या प्रकारे विचार करतात. संबंधिताची खोलात जाऊन चौकशी केल्यानंतर मानसिक मुद्दे समोर येतात. उपचारांच्या
पहिल्या पातळीवर मानसिक आधार आणि समुपदेशन हे उपाय राहतात. मनशांतीच्या नैसर्गिक उपायांनी पण फायदा होतो. जिथे ताप अशा उपचारांनी आटोक्यात येत नाही तिथेच औषधांचा विचार करता येतो. संबंधित औषधे मानसोपचार तज्ञांच्या अखत्यारीतील आहेत. त्यांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार करता येतात.
................................................................................................................................................................................................................
प्रतिक्रिया
22 Nov 2022 - 2:22 pm | Bhakti
वेगळीच माहिती,वेगळाच ताप.
22 Nov 2022 - 2:28 pm | कुमार१
पण डोक्याला ताप करून घेऊ नका !
🙂
22 Nov 2022 - 4:15 pm | श्वेता२४
सामान्य माणसाला हा ताप संसर्गातून आलाय की मानसिक आहे? हे आळखता येणं अवघड आहे.
22 Nov 2022 - 4:26 pm | कुमार१
संसर्गातून ताप येतो तेव्हा त्याच्या जोडीला सर्दी, खोकला/ पोट बिघडणे इत्यादी स्वरूपाची लक्षणे असू शकतात.
मानसिक तापाच्या याबाबतीत अशी अन्य लक्षणे दिसणार नाहीत. पण लेखात वर्णन केलेली एखादी परिस्थिती असू शकेल
22 Nov 2022 - 4:26 pm | कुमार१
संसर्गातून ताप येतो तेव्हा त्याच्या जोडीला सर्दी, खोकला/ पोट बिघडणे इत्यादी स्वरूपाची लक्षणे असू शकतात.
मानसिक तापाच्या याबाबतीत अशी अन्य लक्षणे दिसणार नाहीत. पण लेखात वर्णन केलेली एखादी परिस्थिती असू शकेल
22 Nov 2022 - 5:21 pm | श्वेता व्यास
नवीन माहिती समजली. धन्यवाद.
सिनेमांमध्ये वगैरे पाहिलेलं, की एखाद्या व्यक्तीच्या विरहाने शक्यतो लहान मूल तापाने फणफणलेले दाखवायचे, त्याला शास्त्रीय आधार आहे तर.
22 Nov 2022 - 7:45 pm | नचिकेत जवखेडकर
चांगली माहिती दिलीत. मुलांमधल्या तापामध्ये हेही घटक पडताळून बघता येतील. धन्यवाद!
22 Nov 2022 - 8:38 pm | स्मिताके
शाळेत एका मुलीला काहीवेळा असा ताप आलेला पाहिला होता. एक शिक्षिका खूप कडक होत्या. गृहपाठ झाला नाही, वही घरी राहिली वगैरे कारणांनी ही मुलगी थरथर कापायची आणि ताप चढायचा.
22 Nov 2022 - 8:47 pm | कुमार१
सर्वांना धन्यवाद !
खरंय, शालेय मुलांच्या बाबतीत शिक्षकांची भिती, परीक्षेची भीती इत्यादी कारणांमुळे असे ताप येतात. अशा वेळी त्यांना गोंजारून आणि त्यांची विचारपूस करून धीर द्यावा लागतो.
23 Nov 2022 - 6:59 am | सुखी
नवीन माहिती... टेन्शन ने ताप येतो तशी सर्दी होऊ शकते का?
23 Nov 2022 - 7:47 am | कुमार१
ताण तणाव हे सर्दी होण्याचे प्रस्थापित 'कारण' नाही.
परंतु काही जणांना सततची सर्दी असू शकते. त्यांच्याबाबतीत अशा प्रसंगी तिची तीव्रता थोडीफार वाढू शकते.
23 Nov 2022 - 8:57 pm | सुखी
धन्यवाद डॉक्टर __/\__
24 Nov 2022 - 11:50 am | चौथा कोनाडा
माहितीपूर्ण धागा. या तापाची सविस्तर माहिती समजली.
शाळेतली काही " तापदायक मुले" असलेली उदाहरणे आठवली.
धन्यवाद कु१ सर!
27 Nov 2022 - 4:37 pm | मुक्त विहारि
माहिती बद्दल धन्यवाद
27 Nov 2022 - 6:58 pm | राजेंद्र मेहेंदळे
चांगली माहीती दिलीत कुमार सर!!
मानसिक आघात, तीव्र मतभेद, भांडणे, भिती वगैरे कारणांनी तात्पुरता ताप येउ शकतो असे ध्यानात आले होते, पण त्याचे शास्त्रीय विवेचन आता समजले.
27 Nov 2022 - 7:12 pm | कुमार१
गेल्या 2 वर्षांत कोविड होण्याच्या अतिरिक्त भीतीने सुद्धा काही जणांना असे ताप आलेले होते. असे लोक सतत अस्वस्थ असायचे.
27 Nov 2022 - 9:30 pm | तुषार काळभोर
असा मानसिक ताप काही वेळा अनुभवला आहे. तीव्र भीती, काळजी यामुळे असा तात्पुरता ताप दोन तीन वेळा आला आहे. पण एक शांत झोप झाली की भीती, काळजी कमी होऊन मन शांत झाले आणि तापही गायब झाला.
त्यामागे एवढं सगळं असतं हे आज कळलं.
धन्यवाद, डॉक्टरसाहेब!