ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेली टी-२० विश्वचषक स्पर्धा मध्यावर आलेली आहे.. या स्पर्धेत पहिल्या चार सामन्यांपैकी तीन सामने जिंकत भारत ग्रुप २ मध्ये पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे.. या लेखाच्या माध्यमातून आपण भारतीय संघाच्या एकंदर कामगिरी बद्दल बोलणार आहोत.
पहिल्या सामन्यात अटीतटीच्या लढतीत भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला आणि विश्वचषकाला धडाक्यात सुरूवात केली. या सामन्यानंतर भारतीय संघाची आणि धुवांधार अर्धशतक झळकावनाऱ्या विराटची खूप वाहवा झाली. विराट कोहलीने या सामन्यात ५३ चेंडूत ८२ धावा बनवल्या आणि सामनावीर होण्याचा मान पटकावला.
त्यानंतर नेदरलँड विरुद्धच्या सामन्यात भारताने ५६ धावांनी सहज विजय मिळवला. याही सामन्यात विराटने नाबाद अर्धशतक झळकावले तर सूर्यकुमार यादवने २५ चेंडूत ५१ धावांची तुफानी खेळी केली.
सलग दोन विजयानंतर दक्षिण आफ्रिकेने भारतावर ५ गडी राखून विजय मिळवत भारताची घौडदौड रोखली. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी अत्यंत खराब प्रदर्शन केले, एकट्या सूर्यकुमार यादवने ४० चेंडूत ६८ धावांची आक्रमक खेळी करत संघाला बऱ्या धावसंख्येपर्यंत पोहचवले. दक्षिण आफ्रिकेपुढे १३३ धावांचे आव्हान असताना सुध्दा भारतीय गोलंदाजांनी हा सामना शेवटच्या षटकापर्यंत नेला हे विशेष.
त्यानंतरचा भारताचा सामना बांगलादेश विरुध्द होता जो काल झाला. या सामन्यात चांगली फलंदाजी करून सुद्धा भारताची अवस्था बिकट झाली होती. १८४ धावांचा पाठलाग करताना बांगलादेशने ७ षटकांत बिनबाद ६६ अशी सुरुवात केली. त्यावेळी आपण सामना हरतो की काय असं वाटत असताना पाऊस पडायला लागला. (पावसामुळे जर सामना रद्द झाला असता तर डकवर्थ लुईस नियानुसार बांगलादेशला विजयी घोषित केले असते.) पावसानंतर सामना पुन्हा सुरू झाल्यावर बांगलादेशला सुधारित लक्ष्य दिलं गेलं, पण तोपर्यंत बांगलादेशची लय बिघडली होती. भारताने विराट, के एल राहुलची फलंदाजी, उत्तम गोलंदाजी व क्षेत्ररक्षण यांच्या बळावर हा सामना खिशात घातला. या सामन्याचा हीरो ठरला ४४ चेंडूत नाबाद ६४ धावा करणारा विराट कोहली.
४ सामन्यांतून ६ गुणांसह ग्रुप २ मध्ये भारत पहिल्या स्थानावर असून सेमीफायनलसाठी भारताचे स्थान जवळजवळ पक्के आहे. भारताचा पुढील सामना ६ नोव्हेंबर ला झिम्बाब्वे विरुध्द आहे. हा सामना जिंका आणि बाद फेरीचे तिकीट मिळवा इतका सोपा scenario आहे भारतासाठी..
भारताची कमजोरी: भारताने ४ पैकी ३ सामने जरी जिंकले असले तरीही भारताचा संघ पूर्ण भरात आहे असं वाटत नाहीये. लडखडणारी फलंदाजी व मोक्याच्या क्षणी दगा देणारी गोलंदाजी ही भारतासाठी चिंतेची बाब ठरू शकते. आतापर्यंत झालेल्या ४ सामन्यांपैकी ३ सामन्यांत अर्धशतक करणारा विराट कोहली, ताबडतोड फलंदाजी करणारा सूर्यकुमार यादव व कालच्या सामन्यात अर्धशतक करणारा के एल राहुल यांच्याशिवाय कोणीही फलंदाजी मध्ये फारशी चमक दाखवू शकलेले नाही. पंड्या, रोहित आणि कार्तिक हे तिघेजण या विश्वचषक स्पर्धेत त्यांच्या नावाला साजेसा खेळ करण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत. जडेजाच्या जागी संघात आलेल्या अक्षर पटेलला पण या स्पर्धेत काहीच चमक दाखवता आलेली नाही. भारताची फलंदाजी पूर्णपणे विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांच्यावर विसंबून आहे.
गोलंदाजीमध्ये युवा गोलंदाज अर्षदिप सोडता मोक्याच्या क्षणी विकेट घेणारा गोलंदाज भारताकडे नाहीये. फिरकी गोलंदाज रवी अश्विन आणि अक्षर पटेल पण फारशी चमक दाखवू शकलेले नाहीत, मिडल ओवरमध्ये (७-१५) विकेट मिळण्याचे प्रमाण कमी आहे. तसेच बांगलादेश विरुद्धचा अपवाद वगळता भारताने क्षेत्ररक्षणात सुद्धा भरपूर चुका केल्या आहेत.
या पुढील सामन्यांत भारताला फलंदाजी आणि गोलंदाजी सुधारतानाच उत्तम क्षेत्ररक्षण पण करावे लागेल अन्यथा पुढील फेरीत न्यूझीलंड, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया सारख्या मोठ्या संघाविरुद्ध खेळताना या गोष्टींचा फटका भारताला बसू शकतो.
जमेची बाजू: गोलंदाजीमध्ये वेगवान गोलंदाजांनी केलेला टीच्चुन मारा ही भारतासाठी जमेची बाजू म्हणता येईल. आशिया कप स्पर्धेत कॅच सोडल्यामुळे चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागलेला युवा गोलंदाज अर्शदिप सिंह याने त्याच्या कामगिरीने सर्वानाच आश्चर्यचकित केले आहे. भुवनेश्वर आणि मोहमद शमी यांनी त्याला चांगली साथ देताना चांगली गोलंदाजी केली आहे.
याशिवाय फलंदाजी मध्ये सूर्या आणि विराट यांचा तुफानी फॉर्म भारतासाठी खूपच सकारात्मक बाब आहे.
या दोघांचा फॉर्म आणि वेगवान गोलंदाजांचे प्रदर्शन यांना इतर खेळाडूंनी योग्य साथ दिली तर भारताला यंदाचा विश्वचषक जिंकायची चांगली संधी आहे.
धन्यवाद..!
प्रतिक्रिया
3 Nov 2022 - 9:39 pm | मुक्त विहारि
पक्षपात विरहीत, लेख आवडला .....
4 Nov 2022 - 6:37 am | कर्नलतपस्वी
बरेच दिवसांनी मन लावून क्रिकेट सामने बघून मजा येत आहे.
4 Nov 2022 - 7:49 am | सुजित जाधव
Same here.
4 Nov 2022 - 10:33 am | श्वेता व्यास
सर्वोत्तम संघ चषक जिंको हीच इच्छा !