भाषा घडतांना

मनो's picture
मनो in जनातलं, मनातलं
2 Nov 2022 - 8:26 am

लेखक श्री. अविनाश बिनीवाले, त्यांच्या परवानगीने पुस्तकाचे प्रास्तविक आणि त्यातील दोन किस्से इथे मराठी वाचकांसाठी टाकतो आहे.

मूळ पुस्तक: भाषा घडतांना
संकल्पना-संशोधन-लेखन: श्री. अविनाश बिनीवाले
गौतमी प्रकाशन
किंमत: १३० रुपये

प्रास्तविक

भाषा म्हणजे बोली, लोकांकडून बोलली जाणारी भाषा ह्या अर्थानं भाषेचा विचार केला तर जगातल्या कोणत्याही भाषेत हळू हळू पण सातत्यानं बदल होत असतात. अशा प्रकारचे बदल जेव्हा घडत असतात तेव्हा, त्या काळात तरी त्या भाषेतल्या प्रस्थापित व्यवस्थेच्या दृष्टीनं ते बदल म्हणजे एक प्रकारचा बिघाडच असतो, कारण ते बदल प्रस्थापित व्यवस्थेच्या, तत्कालीन प्रमाणीकरणाच्या नियमांच्या विरुद्ध असतात. पण असे काही बिघाड कधी कधी इतक्या जणांकडून नि इतक्या वेळा घडतात की शेवटी त्यातले काही 'बिघाड' सर्वसामान्य बिघाड न राहता एक (अटळ?) वास्तवता म्हणून त्या भाषेत स्वीकारले जातात. अशा बिघडण्याच्या प्रक्रियेतूनच भाषा घडण्याची क्रिया होत असते. अर्थात् प्रत्येक समाजाची ह्याबाबतची म्हणजे बिघाड खपवून घेण्याची 'क्षमता' वेगवेगळी असते, फ्रेंच समाजात ती जवळ जवळ नसते, तर २१ व्या शतकाच्या सुरुवातीच्या आजच्या मराठी समाजात त्यांच्या भाषेचं कोणीही, काहीही केलं तरी चालतं अशी आजची स्थिति आहे. मराठीतल्या अशा काही बिघडण्या-घडण्याच्या दृष्टीनं झालेल्या जडण-घडणीचा वेध घेण्याचा हा एक मर्यादित प्रयत्न आहे.

भाषेतलं हे बिघडणं घडणं अनेक प्रकारे होत असतं. ते शब्दांच्या अर्थामध्ये नि वापरण्यातच होतं असं नाही तर भाषेतल्या अगदी मुळातल्या ध्वनींमध्येच बदल होण्यापासून शब्द सिद्ध करण्यापर्यन्तच्या अनेक क्रिया-प्रक्रियांमध्ये ते घडत असतं. हे होण्याची अर्थातच अनेक कारणं असतात, अन्तर्गत आणि बाह्य, भारतासारख्या बहुभाषिक देशात आसपासच्या भाषांचेही एकमेकींवर परिणाम होत असतात. मराठी भाषिक समाज तसा भाषेबाबत बंगाली किंवा फ्रेंच भाषिकांप्रमाणे आग्रही नाही, त्यामुळे मराठी भाषेवर आणि लेखनावर झालेले इतर भाषांचे-भाषिकांचे परिणाम पाहणंही रोचक आहे. नेमक्या ह्याच परिप्रेक्ष्यात इथे मुख्यतः मराठीतल्या काही घडण्या-बिघडण्याचा परामर्श ह्या लेखसंग्रहात घेतलेला आहे.

पण हे सगळं होत असलं, त्या घडण्या-बिघडण्याचा अन्तर्भाव भाषेत नकळत होत असला आणि भाषा अनित्य असली तरी व्यावहारिक जगासाठी प्रगत समाजांमध्ये भाषेला प्रमाणित करण्याचे प्रयत्नही तितक्याच गाम्भीर्यानं होत असतात आणि तसे प्रयत्न ज्या भाषांचे समाज यशस्वीपणे करू शकले त्यांची प्रगति जोमानं झाली हे एक निरपवाद ऐतिहासिक सत्यही आपल्याला स्पष्टपणे दिसून येतं. ह्या बाबतीत फ्रेंच भाषिक समाजाची आणि इंग्लिश भाषिक समाजाची उदाहरणं निश्चितच अभ्यासण्याजोगी आहेत, त्यांच्यापासून खूप काही शिकावं अशीच आहेत. आपल्या अनित्य भाषेतले बिघडणं-घडणं त्यांनी समर्थपणे पचवून आपल्या भाषेचं प्रमाणीकरण करून केवळ पावित्र्यासाठी पावित्र्य म्हणून ते राखलं नाही तर त्या प्रमाणीकरणाचे असंख्य व्यावहारिक फायदे आपल्या समाजाला सातत्यानं मिळवून दिले! भाषेच्या ह्या घडण्या-बिघडण्यात माध्यमांचा वाटा फार मोठा असतो. जुन्या काळी माध्यम तशी थोडीच होती, ती आजच्याइतकी प्रभावीही नव्हती. आजची माध्यमं संख्येनंच खूप आहेत असं नाही तर जबरदस्त प्रभावी आहेत, म्हणून सर्वच माध्यमांनी आणि मध्यस्थांनीही

ह्या प्रश्नाचा विचार अधिक गाम्भीर्यानं करण्याची गरज आहे!

खरं म्हणजे हा कधी न सम्पणारा अभ्यास आहे. मूक-बधिरांनीही रस घ्यावा असा हा रोचक आणि महत्त्वाचा विषय आहे.

मराठीच्या वाचकांना, अभ्यासकांना ही निरीक्षणं वाचायला आवडतीलच, पण मराठीचे वाचक त्यानन्तर ह्या घडण्या-बिघडण्याबाबत पुरेशा गाम्भीर्यानं विचार करून भाषेबाबतची आपली उदासीनता सोडून देतील असा विश्वास आहे!

बाहरगाँव

माझा एक मित्र आहे. शत्रुघ्न सिन्हा (म्हणजे आपला तो माजी-सांसद कम् नट बिहारीबाबू नव्हे हं!). शत्रुघ्न पटन्याहून नुकताच मुम्बईत येऊन एका (अर्थातच हिन्दी) वर्तमानपत्रात सहसम्पादक म्हणून रुजू झाला होता. त्याला वाङ्मयाची आवड नि जाण असल्यामुळे सम्पादकमहाशयांनी त्याच्याकडे कलाविभाग सोपवला होता.

एक दिवस सम्पादकांनी शत्रुघ्नला मुम्बई-पुण्यातल्या काही कलाकारांचे, मुख्यतः गायक वादकांचे ‘साक्षात्कार' (म्हणजे मराठीत मुलाखत) घेण्याचं काम सोपवलं होतं.

कलाकारांची यादी हातात पडताच शत्रुघ्ननं डिरेक्टरीची आणि काही ओळखीच्यांची मदत घेऊन यादीतल्या सर्व कलाकारांच्या घरचे दूरध्वनिक्रमांक मिळवले नि पहिलाच फोन केला तो किशोरी आमोणकरांच्या घरी.

किशोरीताईंच्या घरचा फोन खणखणला नि तिकडे फोन घेणाऱ्या व्यक्तीन शत्रुघ्नला सांगितलं की 'किशोरीजी बाहरगाँव गई हैं.' मग शत्रुघ्ननं पण्डित जसराजजींना फोन लावला, पण योगायोग असा की जसराजजीही घरात नव्हते. फोन घेणाऱ्या घरच्या नोकरान सांगितल की 'पण्डितजी आज सबेरे ही बाहरगाँव गए हैं, दो दिन बाद आएँगे'. त्या दिवशी काय योग होता कोण जाणे, पण शत्रुघ्ननं तिसरा फोन पुण्याला पण्डित भीमसेन जोशींच्या घरी लावला नि तिथेही भीमसेन जोशी घरात नव्हते. भीमसेनजींच्या घरी फोन घेणाऱ्यानं हेच सांगितलं की 'पण्डितजी आज सबेरे ही बाहरगाँव गए हैं!'

तिन्हीच्या तिन्ही ठिकाणी कोणीच न भेटल्यानं शत्रुघ्न जाम वैतागला. पण तमाम कलाकारांच्या घरच्या नोकरांकडून त्यानं जे काय ऐकलं होतं ते आठवून त्याच्या डोक्यात एक कल्पना अचानक चमकून गेली - ज्या अर्थी हे सारे मोठमोठे कलाकार नेमके आजच 'बाहरगाँव'ला गेले आहेत, त्याअर्थी तिथे नक्कीच एखादा खास कार्यक्रम असला पाहिजे! कदाचित् एखादा मोठा संगीत महोत्सव वगैरे असला पाहिजे! मग आपणही त्या खास कार्यक्रमाला "बाहरगाँव 'ला गेलो तर? सगळे कलाकार आपल्याला एकाच ठिकाणी भेटतील नि कदाचित् सगळ्यांच्या मुलाखती एकाच ठिकाणी उरकून टाकता येतील! डोक्यात कल्पना चमकताच शत्रुघ्न त्या दृष्टीनं तयारीला लागला. प्रथम त्यानं आपल्या सहकाऱ्यांकडे चौकशी केली की 'भाई, यह बाहरगाँव है कहाँ है? उधर कैसे जाना?' वगैरे. पण शत्रुघ्नचे सारेच्या सारे सहकारी उत्तर-प्रदेश, बिहार वगैरे भागातले असल्यामुळे त्या सर्वांनीच आपले अज्ञान मालूम नहीं, पता नाही वगैरे निःसंकोचपणान कबूल करून टाकले (म्हणजे पुढची माहिती वगैरे सांगण्याची जबाबदारी सम्पली!). त्यांच्या दृष्टीनं माहीत नाही म्हणून सांगणं ठीक होतं, पण शत्रुघ्नला आपलं काम पूर्ण करायचं होत. माहीत नाही, सापडलं नाही वगैरे सबबी सांगून त्याचं काम टळणार नव्हते (नि नोकरी टिकणार नव्हती!).

शत्रुघ्ननं स्थानापत्र होऊन तातडीनं महाराष्ट्राचा नकाशा मागवला आणि तो मोर नकाशा आपल्या समोरच्या टेबलावर उलगडून तो 'बाहरगाँव' शोधू लागला, बिच्चारा नेमका त्याच वेळी मी सहज म्हणून शत्रुघ्नला भेटायला त्याच्या कार्यालयात गेलो तर ह आपला नकाशात डोकं खुपसून काहीतरी शोधण्यात गर्क होता.

मला पाहताच त्याला इतका आनन्द झाला नि त्यानं काहीही औपचारिक गोष्टी न करताच 'बाहरगाँव कहाँ है?' म्हणून विचारलं.

'बाहरगाँव ?' त्याच्या प्रश्नानं मीही विचारात पडलो होतो.

माझ्या चेहऱ्यावर त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिसेना म्हणताच त्यानं मला एक क्लू देण्याचा प्रयत्न केला, 'उधर शायद आज या कल कोई बड़ा संगीत समारोह या ऐसा ही कुछ हो रहा है

आता संगीत महोत्सवासाठीच नव्हे तर कोणत्याच सन्दर्भात 'बाहरगाँव' नावाचं गाव मी कधी ऐकलेलंही नव्हतं. शेवटी मी त्याला कोणत्या सन्दर्भात बाहरगांव हवं आहे वगैरे चौकशी केली तेव्हा त्यानं दुपारपासून केलेले फोन नि मिळालेली उत्तर मला सांगितली तेव्हा माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला नि मी प्रथम मनसोक्त हसून घेतलं.

शत्रुघ्न हिन्दीत बोलत असल्यामुळे त्यानं जिथे-जिथे फोन केला होता तिथल्या कलाकारांच्या घरच्यांनी शत्रुघ्नला ‘बाहेरगावी गेलेत' हे उत्तर हिन्दीत करून 'बाहरगाँव गए हैं' असं सांगितल होत! शत्रुघ्ननं पटन्याहून येताना-जाताना जळगाव, चाळीसगाव, वरणगाव अशी अनेक 'गावं' पाहिलेली होती, त्यामुळे तोही नकाशावर 'बाहरगांव शोधत होता! 'बाहरगाँव' म्हणजे गावी गेलेत, बाहेर गावी गेले आहेत, आउट ऑफ स्टेशन आहेत असा त्याचा अर्थ आहे हे मी शत्रुघ्नला समजावून सांगितलं तेव्हा त्यानं हसत-हसत कपाळाला अक्षरशः हात लावला नि मग दिलखुलासपणे टेबलावर पसरलेला महाराष्ट्राचा नकाशा गुण्डाळून ठेवला!

'महा' चा अनर्थ

सकाळच्या वेळी अनेक वाहिन्या ब्रेकफास्ट, न्याहारी किंवा गुड मॉर्निंग महाराष्ट्र वगैरे धेडगुजरी नावान बऱ्याच काय काय अश्रवणीय आणि अप्रेक्षणीय अशा टाकाऊ गोष्टी आपल्या माथी मारीत असतात किंवा गळी उतरवत असतात! (कारण तो ब्रेकफास्ट वगैरे काही तरी असतो ना!) असल्या कार्यक्रमांमध्ये बऱ्याचदा काही विशेष कामगिरी करणाऱ्यांना पाचारण केलेल असतं.

असाच एकदा सुमार न्याहारीचा (बेकार) कार्यक्रम चालू होता. आजचा पाहुणा नुकताच फटफटीवरून जम्मू-कश्मीर राज्याच्या लद्दाख भागात जाऊन आलेला होता, त्यामुळे त्याच्या ताज्या प्रवासाबद्दल गप्पा चालू होत्या. अशा कार्यक्रमांचे निवेदक सामान्यतः दोन असतात, एक पुरुष आणि एक महिला.

कार्यक्रमाची सुरुवात करताना उद्घोषक कम् प्रस्तुतकर्ता होता त्यानं बाळबोध पद्धतीनं पाहुण्यांचं नाव गाव सांगितलं. ह्या उपचारानन्तर त्याच्या सहकारी महिलेने पुढची चौकशी (चौकश्या?) करायला सुरुवात केली. कार्यक्रम दोघांनी मिळून प्रस्तुत करायचा असल्यामुळे प्रत्येकानं मधे-मधे तोण्ड खुपसलंच पाहिजे/बोललं (च) पाहिजे असा त्यांचा एक चमत्कारिक संकेत असतो, त्यानुसार कार्यक्रम पुढे सरकत होता (आणि दर्शकांच्या म्हणजे प्रेक्षकांच्या सुदैवानं घड्याळाचे काटेही!).

'आपने जो यह यात्रा की है-' ती महिला निवेदक पाहुण्यांकडे सस्मितमुद्रेन पाहत म्हणाली

नि तिचं वाक्य पूर्ण होण्याच्या आधीच तिचा सहकारी पाहुण्यांना म्हणाला. 'हाँ, तो आपने यह जो यात्रा की है' आपल्या सहकाऱ्यानं म्हटलेलं वाक्य आपण पोपटासारखं म्हटलं हे त्याला बहुतेक जाणवलं असावं म्हणून सावरून घेण्यासाठी तो पुढे म्हणाला, 'आपने यह जो यात्रा, मेरा मतलब महायात्रा की है, तो अगर आप हमें हमारे दर्शको को अपनी महायात्रा के बारे में कुछ बताएँ तो ' बोलण्याच्या नादात आपण काय भयंकर बोलत आहोत हे त्या बिचाऱ्या निवेदकाला 'कळलंच नाही, त्याच्या (बिच्चाऱ्या) सहकारी महिलेलाही आपण काय भयकर बोलत आहोत हे कळल नाही आणि (सुदेवानं) त्या दिवशीच्या पाहुण्याच्याही ते डोक्यावरून गेल! (हे बरं झाल!)

एखाद्या गोष्टीचा गौरव करताना त्याला महा, महान वरेरे शब्द लावण्याची पद्धत आहे. लक्ष्मी - महालक्ष्मी, देव - महादेव, कुम्भ - महाकुम्भ, सभा - महासभा, विद्यालय-महाविद्यालय वगैरे. बोलतानाही आपण 'तुमचं हे कार्य, महान् कार्य...' किंवा 'तुमच्या ह्या महाप्रचण्ड उत्साहामुळे...' असं काहीतरी म्हणतो.

मोठेपण, महानता दाखवण्यासाठी 'महा' शब्दाचा उपसर्गासारखा उपयोग केला जातो हे खरं आहे, पण त्याला काही थोडेच, पण ठळक असे अपवाद आहेत. असे अपवाद आपल्याला माहीत असणं अर्थातच अपेक्षित आहे. निदान बोलणं हाच ज्यांच्या पोटापाण्याचा (?) व्यवसाय आहे त्यांच्याकडून तरी ते निश्चितच अपेक्षित आहे. ब्राह्मण शब्दांच्या मागे हा शब्द लावून 'महाब्राह्मण' शब्द झाला की तो एकदम अपशब्द ठरतो, चक्क शिवी होते! महाब्राह्मण म्हणजे नीच ब्राह्मण, नीच माणूस, संस्कृत भाषेतली ही एक वाईट, अत्यन्त अपमानकारक शिवी आहे.

संस्कृतमध्ये (आणि इतर भारतीय भाषांमध्येसुद्धा) यात्रा म्हणजे प्रवास असाच अर्थ आहे.

प्रवास जर धार्मिक कारणांसाठी असेल म्हणजे काही खास प्रकारचा असेल तर आपण त्याला 'तीर्थयात्रा' असं म्हणतो. अगदी ह्याच चालीवर संस्कृतमध्ये माणूस एकदाच करतो. आणि प्रत्येकाला जी यात्रा एकदा करावीच लागते तिच्यासाठीच फक्त 'महायात्रा' असा शब्द आहे! पण 'महायात्रा'

म्हणजे काय? महायात्रा म्हणजे 'अन्त्ययात्रा', 'प्रेतयात्रा'!

दूरचित्रवाणी वाहिनीचा निवेदक आपल्या खास आमन्त्रित पाहुण्याला पुनः पुनः त्याच्या महायात्रेचं, त्याच्याच अन्यत्ययात्रेचं वर्णन करून सांगायची विनन्ति करीत होता आणि आलेला पाहुणाही मोठ्या उत्साहानं आपल्या 'महायात्रेचं' म्हणजे अन्त्ययात्रेचं वर्णन ऐकवीत होता! सगळाच आनन्दी आनन्द होता!

आकारिकदृष्ट्या एकमेकांच्या जवळ असलेले शब्द विनोदनिर्मितीसाठी वापरण्याची पद्धत प्राचीन आहे, सार्वकालिक नि सार्वदेशिक आहे, संस्कृत नाटककारांनीच नव्हे तर अलीकडच्या शेक्सपिअरनंसुद्धा ह्या कल्पनेचा उपयोग केलेला आहे. दूरदर्शनवर जसपाल भट्टीनं ह्या तन्त्राचा उपयोग अगदी श्रेयनामावलीपासूनय फार सुन्दर प्रकारे केलेला आहे.

पण कार्यक्रम जेव्हा विनोदी नसतो, एखाद्या पाहुण्याला मुलाखतीसाठी मुद्दामहून पाचारण केलेलं असतं तेव्हा मठ्ठपणानं असे भयंकर विनोद चुकूनही होऊ देऊ नयेत बोलता-बोलता पाहुण्यांचीच अन्त्ययात्रा काढू नये, नाही का?

भाषाशिफारस

प्रतिक्रिया

कानडाऊ योगेशु's picture

2 Nov 2022 - 10:12 am | कानडाऊ योगेशु

ईंटरेस्टींग किस्से आहेत. पहिल्या किश्श्यातील शत्रुघ्नला शेवटी ते नक्की कोणते बाहेरगाव होते ते कळले का?

छान मनोरंजक वाटतंय पुस्तक.
मराठी भाषेच्या अशाच गमतीदार किश्श्यांचे पुस्तक वाचले होते.अनेकदा इथे विंदा दिलाय.आज परत देते

बेलभाषा
येथून डाऊनलोड करता येईल.

छान मनोरंजक वाटतंय पुस्तक.
मराठी भाषेच्या अशाच गमतीदार किश्श्यांचे पुस्तक वाचले होते.अनेकदा इथे विंदा दिलाय.आज परत देते

बेलभाषा
येथून डाऊनलोड करता येईल.

कर्नलतपस्वी's picture

3 Nov 2022 - 9:55 am | कर्नलतपस्वी

भक्ती धन्यवाद, पुस्तक उतरवून घेतले,पहिली दोन प्रकरणे वाचली. छान लिहीलय असे वाटते. पुर्ण वाचल्यावर कळेल.

श्रीगुरुजी's picture

2 Nov 2022 - 11:37 am | श्रीगुरुजी

वाचून मजा आली.

महाब्राह्मण म्हणजे नीच ब्राह्मण हा अर्थ कधीच ऐकला नाही.

महायात्रा हा शब्द सुद्धा फक्त अंत्ययात्रा यासाठी वापरला जात नाही.

वामन देशमुख's picture

2 Nov 2022 - 11:42 am | वामन देशमुख

महाब्राह्मण म्हणजे नीच ब्राह्मण हा अर्थ कधीच ऐकला नाही.

महायात्रा हा शब्द सुद्धा फक्त अंत्ययात्रा यासाठी वापरला जात नाही.

#MeToo

वामन देशमुख's picture

2 Nov 2022 - 11:40 am | वामन देशमुख

मजेदार मजेशीर किस्से आहेत!

वाचुन मौज वाटली!

श्वेता व्यास's picture

2 Nov 2022 - 12:10 pm | श्वेता व्यास

पुस्तकाची ओळख आवडली, छान किस्से आहेत.
महायात्रा माहिती होतं, महाब्राह्मण पहिल्यांदाच समजलं.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Nov 2022 - 1:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भाषेतलं हे बिघडणं घडणंच असतं.

-दिलीप बिरुटे

अनिंद्य's picture

2 Nov 2022 - 3:15 pm | अनिंद्य

'बाहेरगांव' आणि 'महायात्रा' यावर खूप हसलो.

....फ्रेंच आणि इंग्लिश भाषिक समाजानी अनित्य भाषेतले बिघडणं-घडणं समर्थपणे पचवून भाषेचं प्रमाणीकरण करून त्या प्रमाणीकरणाचे असंख्य व्यावहारिक फायदे आपल्या समाजाला सातत्यानं मिळवून दिले.....

अगदी पटले +१

मराठीचे पराकोटीचे धेडगुजरीकरण करून असे कोणते फायदे मराठी समाजाला मिळाले /मिळत आहेत ह्याचे मला अपार कुतूहल आहे.

तुषार काळभोर's picture

3 Nov 2022 - 7:51 am | तुषार काळभोर

मराठीचे पराकोटीचे धेडगुजरीकरण = गरज नसतना न्यूनगंडास्तव ओढवून घेतलेले हिंदी भाषेचे अतिक्रमण

कंजूस's picture

3 Nov 2022 - 10:36 am | कंजूस

पावती आहे.
आवडला लेख.

महापात्र - मयताचे विविध करणारे (उप्र.)
महापात्रा - देवळाचे मुख्य ब्राह्मण (ओडिशा)

प्रचेतस's picture

3 Nov 2022 - 10:59 am | प्रचेतस

लेख आवडला.
मात्र महाब्राह्मण ह्या शब्दाविषयी साशंक आहे. उदा. महाभारतातील आरण्यक पर्वातील युधिष्ठिर लोमश संवादातील पुढील श्लोक पाहा.

मान्धाता राजशार्दूलस्त्रिषु लोकेषु विश्रुतः |
कथं जातो महाब्रह्मन्यौवनाश्वो नृपोत्तमः ||

हे महाब्राह्मणा, राजश्रेष्ठ मान्धाता सर्व लोकांत विख्यात आहे. त्या नृपश्रेष्ठ यौवनाश्वाची कथा मला सांग.

आदिपर्वातीलच जनमेजय, वैशंपायन संवादात देखील असेच उदाहरण दिसेल.

कृपस्यापि महाब्रह्मन्सम्भवं वक्तुमर्हसि |
शरस्तम्भात्कथं जज्ञे कथं चास्त्राण्यवाप्तवान् ||

कृपाचार्यांसारख्या महाब्राह्मणांची उत्त्पती कशी झाले हे मला सांगावे. शरस्तंभापासून त्यांचा जन्म कसा झाला आणि त्यांना अस्त्रांची प्राप्ती कशी झाली तेही मला सांगावे.

बहुधा महाब्राह्मण ह्या शब्दाला निंदाव्यंजक स्वरुप नंतर प्राप्त झाले असे दिसते. अजून एक वेगळे गंमतीदार उदाहरण म्हणजे उत्तर भारतात प्रमुख स्वयंपाक्याला महाराज म्हणतात.

अनिंद्य's picture

3 Nov 2022 - 1:22 pm | अनिंद्य

बरोबर, 'महाराज' ही पदवी तिघांनाच,
१. राज्यप्रमुख
२. साधू
आणि
३. प्रमुख बल्लव

:-)

चौकस२१२'s picture

4 Nov 2022 - 9:22 am | चौकस२१२

अनवधाने चुकीचे शब्द किंवा त्याचे चुकीचे रूपांतर/ भाषांतर करून काय गोंधळ आणि अनर्थ होतो याचे एक ऐकलेले उदाहरण

मराठी लग्नपत्रिकेत चि . सौ . कां . अमुक अमुक असे लिहिलेले असते . त्याचे इंग्रजीत "रूपांतर " करताना चक्क SAU असे लिहितात असे पहिले आहे
SAU चा इंग्रजीतील अर्थ वयात आलेली डुकरीण असा होतो !

( हि माहिती चुकीची असले तर कृपया खोडावी )

तुषार काळभोर's picture

4 Nov 2022 - 10:40 am | तुषार काळभोर

Definition of sow (Entry 1 of 2)
1: an adult female swine

म्हणजे SAU एकवेळ ठीकाय. पण SOW व्ह्यायला नको!!
ज्यांना मराठी कळत नाही, पण इंग्रजी बर्‍यापैकी/चांगलं कळतं, त्यांच्या भुवया वरती जातील हे नक्की!!