आज ही दिवाळी तशीच आहे...
चार का होईना पण डबे आजही
फराळाचे भरतात
नऊ वाजता उठणारे एक दिवस का होईना पण चार वाजता उठतात
आज ही दिवाळी तशीच आहे...
डिओ,शाम्पू,बदामाच्या तेलानी जरी
कपाटे भरली असली
तरी मोती साबण आवर्जून घरी येतो
अनारसे, करंजीचा नैवेद्य पूजेच्या थाळीत आजही सजतो
आज ही दिवाळी तशीच आहे...
थोडे फटाके सुद्धा वाजतात
धुर सुद्धा होतो
मातीच्या पणत्यांनी कानाकोपरा उजळतो
फक्त आजच्याच दिवस हं!
म्हणून गोडबोल्यानां सुट मिळते
शुगर जर वाढली तरच दिवाळी वाटते
आज ही दिवाळी तशीच आहे...
चांदीच्या ताम्हणात आजही निरांजन फुलते
भरल्या घरात सारे काही आहे
तरी ओवाळणी काय मिळणार?
म्हणून मनात काहूर माजते
आज ही दिवाळी तशीच आहे...
झाली जरी कांचन संध्या अजून टिकून आहे गोडवा
दिवाळीच्या पाडव्याला आजही फुलतो मारवा
आज ही दिवाळी तशीच आहे...
प्रेम करायला दोनच पुरतात
आजही चार रेघा रांगोळी
अन् पाच बोट तेलाची जमीनीत
जीरतात.
आज ही दिवाळी तशीच आहे...
पंख फुटले, उडून गेली तरीही
चिवचिवाट आज ही कानी पडतो
कालाय तस्मै नमः
घाई गडबड,गोंधळ नसलेल्या घरात
आज ही दिवाळीचा बाज तसाच असतो...