तमिळनाडूचा इतिहास भाग - ७

अमरेंद्र बाहुबली's picture
अमरेंद्र बाहुबली in जनातलं, मनातलं
11 Sep 2022 - 10:40 pm

काँग्रेस बनवून तर झाली होती, अधिवेशनही होत होते. पण करायचं काय हे स्पष्ट नव्हतं. भारतीयांसाठी निवडणूक प्रक्रिया त्या वेळी नव्हती. दुसरी गोष्ट हि कि ते ब्रिटिशांसोबत सोबत काम करायचं म्हणत होते. पारसी आणि ब्राम्हण नेता, दोघांचा कम्फर्ट झोन हाच होता, कारण हे लोकं तळागाळातील आंदोलक नव्हते. हे तर त्यांचं एक पार्ट टाइम काम होतं कि वकिली वैगरे सोबत थोडी राजकारणाची चर्चा हि करता येईल. त्यांचे काही नेते इंग्रजांकडून पगारही मिळवत होते किंवा त्यांच्याशी संबंध बनवून होते त्यामुळे विरोध करायचा प्रश्नच नव्हता.
पण बंकिमचंद्र चॅटर्जी ह्यांच्या आनंदमठ(१८८२) नंतर राष्ट्रवादी वातावरण तयार होऊ लागले. "भारतमाता" कंसेप्ट उभी राहत होती, ज्यात विवेकानंद आणि दयानंद सरस्वती ह्यांच्या सारख्या विचारवंतांचा हि प्रभाव होता. १८९३ ला बाळ गंगाधर टिळक ह्यांनी पुण्यात गणपती उत्सव आयोजित केला, ज्यात गणपती बाप्पा मोरया सोबत ब्रिटिश विरोधी घोषणा हि दिल्या जाऊ लागल्या. त्याच वर्षी अरविंद घोष सुद्धा आपला आवाज वाढवू लागले. काँग्रेसच्या उदारमतवादी नेत्यांना इंग्रजांकडून भीक मागणारे नेते म्हटले जाऊ लागले. पंजाब च्या लाला लजपत राय ह्यांनी काँग्रेसच्या अधिवेशनात सहभागी व्हायला नकार दिला.
तमिळ ब्राम्हण सुद्धा तीन विभागात वाटले गेले. मायलापूर चे ब्राम्हण इंग्रज समर्थक होते, एमगोर चे ब्राम्हण काहीतरी संवाद प्रस्थापित होईल हे पाहत होते. त्यांचे नेतृत्व "द हिंदू" वृत्तपत्राचे संपादक कस्तुरी रंगा अयंगार करत होते, तेव्हाच सेलम चे ब्राम्हण कट्टर राष्ट्रवादी बनत होते, व ते " वंदे मातरम" च गायन करत होते. त्यांचं नेतृत्व सी. राजगोपालाचारी ( राजाजी) करत होते.
१९०५ च्या बंगाल विभाजना बरोबरच १९०७ ला काँग्रेस सुद्धा विभाजित झाली. लाला लजपत राय, बाळ गंगाधर टिळक, बिपीनचंद्र पाल ( लाल-बाल-पाल) ह्यांचा "जहाल" गट. तर दादाभाई नौरोजी, गोपाळकृष्ण गोखले,रासबिहारी बोस ह्यांचा झाला "मवाळ" गट.
ह्यामध्येच १९०६ ला मार्ले-मिंटो सुधारणे अंतर्गत ब्रिटिश साम्राज्यात पहिल्यांदा भारतीय प्रतिनिधीं साठी निवडणुका झाल्या. ह्या निवडणूका सामान्य निवडणुका नव्हत्या, ह्यात पालिकांमधील प्रतिष्ठीत समूहांद्वाराच प्रतिनीधी निवडले जायचे. नेमकं तिथेही ब्राह्मणांचाच दबदबा होता, नि मद्रास प्रेसिडेन्सीतून ब्राह्मणच निवडले जात होते.
१९१६ साली तामिळनाडूचे गैरब्राम्हण समुदायाचे ताकदवान नेते टी. एम. नायर आणि त्यागराज चेट्टी मद्रास च्या गव्हर्नर ना भेटायला गेले.
ते म्हणाले, " सर! कौन्सिल मध्ये आमच्या समुदायांना प्रतिनिधित्व आजिबात नाहीये. त्यावर ब्राम्हणांनी कब्जा मिळवलाय, जनता आमच्या सोबत आहे."
" कारण तुम्ही निवडणूक जिंकत नाही आहात"
"निवडणुक पध्दत तर तुम्हाला माहीतच आहे, जास्तीतजास्त मॅजिस्ट्रेट ब्राह्मणच आहेत तर निवडलं कोण जाणार?"
" मग तुमच्या समुदायांना वरच्या पदावर आधी पोहोचावे लागेल"
" तुम्ही मुसलमानांना १९०९ पासून वेगळं प्रतिनिधीत्व द्यायला सुरु केलय, तर आम्हाला हि जातीप्रमाणे प्रतिनिधित्व द्या."
" ह्या प्रकारे शक्य नाही, हिंदू नेताच मान्य करणार नाहीत. काँग्रेस हवं तर इतर जातीचे नेते जोडू शकते."
" काँग्रेस काहीही करणार नाही, काय ते आम्हालाच करावं लागेल, आम्ही पक्ष सुद्धा बनवलाय साऊथ इंडियन लिबरेशन फेडेरेशन. आम्ही "जस्टीस" नावाने वृत्तपत्रही काढत आहोत."
" हे तर अजून चांगलंय, मी तुम्हाला एक आतली बातमी सांगतो, निवडणूक प्रक्रियेत बदल होण्याची शक्यता आहे. लवकरच सामान्य निवडणुका लागू शकतात."
"असं असेल तर आम्हाला ब्राम्हण हरवू शकणार नाहीत"
जेव्हा काँग्रेस ला हे कळलं कि त्यांना ब्राम्हणवादी पक्ष म्हणून शिक्का बसलाय, त्यांनी अब्राह्मण चेहरा शोधनं सुरु केलं.
त्यांचे नेते केशव पिल्लई बोलले कि "एक व्यक्ती आहे इरोड पालिकेत, थोडा सनकी आहे. ब्राह्मणांना विरोध करतो, अश्या वातावरणात आपल्याला त्याचा उपयोग होईल."
" काय नाव आहे त्याचं?"
" रामास्वामी नायकर, वय जवळपास ३५ वर्षे, आतापासूनच पेरियार (श्रेष्ठ) म्हटला जातोय"
…….

एका खोडकर बालकाच्या दुसर्‍या खोडीनंतर त्याच्या वडिलांनी त्याला गोडाऊनमधील जाड लाकडाला साखळीने बांधले. थोड्या वेळाने वडील परत आले तेव्हा त्यांना दिसले की, पाठीवरील दोरीने बांधलेले जड लाकूड घेऊन तो खेळाच्या मैदानात पोहोचला होता. पेरियार यांच्या जीवनाची ही दंतकथा त्यांच्या जीवनाचा सारांश आहे.
पेरियार आणि आंबेडकर हे समान ध्येय असूनही दोन विरुद्ध व्यक्तिमत्त्वे होती. आंबेडकर हे भारतीय इतिहासातील सर्वात महान विद्यार्थी राहिले असताना पेरियार यांनी त्यांचे शालेय शिक्षणही पूर्ण केलेले नव्हते. आंबेडकरांचे युक्तिवाद संदर्भासह, पडताळून पुढे करण्यात आले. पेरियार यांचे युक्तिवाद उत्स्फूर्त असायचे, त्यात अनेक तर्कविरहीत गोष्टीही होत्या. आंबेडकरांची ऊठ-बस उच्चभ्रू आणि युरोपियन लोकांसोबत होती तर पेरियार हे मुख्यत्वे तळागाळातील नेते होते. या दोघांच्या वेशभूषेतही हे दिसून येते. एक सूट-बूट, दुसरा धोतर-कुर्ता. आंबेडकरांचे लेखन भारतभर न कापता वाचले आणि शिकवले जाते, कारण त्यात मीमांसा आहे. पेरियार यांची अनेक तमिळ भाषणे हिंदी किंवा इंग्रजीत कधीही अनुवादित झाली नाहीत, कारण ती खूप कडवट आणि द्वेषपूर्ण अपशब्दांनी भरलेली होती.

पण, राजकीय निष्कर्षावर नजर टाकली तर पेरियार यांचा वारसा तामिळनाडूच्या राजकारणात ठाण मांडून बसला आहे. आंबेडकरांचा वैचारिक प्रवाह समृद्ध असूनही, राजकीय वारसा महाराष्ट्रात किंवा इतर कोणत्याही राज्यात फारसा टिकला नाही. उलटपक्षी असेही म्हटले की, आंबेडकरांना कमी जास्त प्रमाणात प्रत्येक राज्यात प्रत्येक पक्षाने वापरले, तर पेरियार तामिळनाडूपुरते मर्यादित राहिले.
मी यासह इशारा देतो की पुढे जे लिहिले जाईल ते हिंदी भाषिक, पारंपारिक समाज आणि उत्तर भारतीय या तिन्ही लोकांना पचवणे कठीण आहे. मी तिघांशी जोडलेला असल्यामुळे पेरियार वाचण्यासाठी मी अनेक माइंड स्विच बंद केले, तरीही एक-दोन फ्यूज उडलेच.
पेरियार लहानपणापासूनच एक खोडकर मुलगा होता. प्रत्येक गोष्टीत वडीलांना प्रश्न विचारायचा. वडिलांनी नकार देऊनही दलित विहिरीचे पाणी प्यायचा. हा साखळीला-बांधून ठेवायचा किस्साही तेव्हाच झाला जेव्हा ते मुद्दाम खालच्या चेट्टियार जातीच्या घरात जेवायला गेले होते. समकालीन कथाकार नीलोत्पल मृणाल यांच्या 'औघड' या पुस्तकातील बिरांची व्यक्तिरेखेवर पेरियार यांची छाप दिसते.
त्यांच्या चरित्रात अनेकदा उल्लेख केलेला एक किस्सा म्हणजे ते घरातून पळून जाऊन काशीला गेले. त्यांचे दोन ब्राह्मण मित्र गणपती आणि वेंकटरामन यांच्यासोबतच पुर्ण रस्त्यात होते आणि त्यांच्याशी धर्मग्रंथावरून वाद घालत होते. हे वाद इतके लोकप्रिय झाले की या तिघांच्या मंडळाला लग्नसमारंभात ते वाद सादर करण्यासाठी आमंत्रित केले जायचे. जर गणपतीने रामायणाची कथा सांगितली की पेरियार त्याला खोडकर प्रश्न विचारायचे, प्रेक्षक त्या दोघांना म्हणजे गणपती नी वेंकटरामण ह्यांना ऊत्तर विचारायचे. उत्तर मिळोनमिळो पण हे मनोरंजनाचे माध्यम बनले.
काशीत हा प्रवास संपला तेव्हा पेरियार यांच्या ह्या कुरबुरीचं रूपांतर गांभीर्यामध्ये झालं. ते ब्राह्मण वेशात एका आश्रमात राहू लागले. आश्रमाच्या नियमानुसार सकाळी गंगेत स्नान करणे, मंदिराची स्वच्छता करणे इ. ते करू लागले. मंदिरात, घाटावर, स्मशानभूमीत, सण-उत्सवात ब्राह्मणांच्या पैशांच्या व्यवहाराचा त्यांना हळूहळू राग येऊ लागला. ते ब्राह्मण नसल्याचे समजल्यानंतर त्यांना आश्रमातून हाकलून देण्यात आले. जेव्हा ते मंदिराबाहेर भिकाऱ्यांच्या रांगेत सामील झाले तेव्हा त्यांना प्रश्न पडला की हे ब्राह्मण ह्यांच्यासाठी काय करतात? मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी इतक्या मागण्या का केल्या जातात? लोकांमध्ये भीती निर्माण करून सोडवण्याच्या नावाखाली का लूटतात?
तेथून परतल्यावर पेरियार वडिलांचा व्यवसाय सांभाळून इरोड महापालिकेत रुजू झाले. गंमत म्हणजे, त्यांना इरोडच्या देवस्थानचे (मंदिर) अध्यक्ष करण्यात आले. त्यावेळी पेरियार यांनी नास्तिक असूनही हे काम तन्मयतेने केले आणि त्यांनी मंदिरात दानधर्मासाठी हुंडीची व्यवस्था केली. ते पैसे ब्राह्मणाच्या हातात न देता दानपेटीत जमा करावेत आणि एकूण दानातून पुरोहित वगैरेंना पगार मिळावा, अशी त्यांची धारणा होती. इरोडच्या त्या मंदिराला पंचेचाळीस हजार रुपयांचा नफा झाला. फक्त हुंडीत दान देण्याची प्रथा आजही दक्षिण भारतातील मंदिरांमध्ये कमी-अधिक प्रमाणात पाहायला मिळते. या कामांच्या जोरावर पेरियार यांची नंतर महापालिकेच्या अध्यक्षपदी निवड झाली.
पेरियार इरोडमध्ये हळूहळू पायऱ्या चढत असताना, 1916 मध्ये, परदेशातून परतलेले बॅरिस्टर आणि त्यांची पत्नी मद्रासला येत होते. काँग्रेसचे काही नेते आणि स्थानिक विद्यार्थी प्रथम श्रेणीच्या बोगीसमोर त्यांची वाट पाहत होते. पण, ते दारात दिसले नाहीत. लोकांनी आत तपासले असता ते तेथेही सापडले नाहीत.
तेव्हा त्यांनी पाहिले की काठियावाडी कुर्ता आणि धोतर घातलेला एक माणूस डोक्यावर फेटा बांधून थर्ड क्लास बोगीतून ऊतरत होता.
(क्रमशः)

मूळ लेखक - प्रवीण झा

इतिहास

प्रतिक्रिया

योगेश कोलेश्वर's picture

14 Sep 2022 - 3:47 am | योगेश कोलेश्वर

माहिती पूर्ण लेख... खूप छान...

चौथा कोनाडा's picture

29 Sep 2022 - 9:56 pm | चौथा कोनाडा

पेरियार यांचा रोचक इतिहास !

पेरियार वडिलांचा व्यवसाय सांभाळून इरोड महापालिकेत रुजू झाले. गंमत म्हणजे, त्यांना इरोडच्या देवस्थानचे (मंदिर) अध्यक्ष करण्यात आले. त्यावेळी पेरियार यांनी नास्तिक असूनही हे काम तन्मयतेने केले आणि त्यांनी मंदिरात दानधर्मासाठी हुंडीची व्यवस्था केली. ते पैसे ब्राह्मणाच्या हातात न देता दानपेटीत जमा करावेत आणि एकूण दानातून पुरोहित वगैरेंना पगार मिळावा, अशी त्यांची धारणा होती. इरोडच्या त्या मंदिराला पंचेचाळीस हजार रुपयांचा नफा झाला. फक्त हुंडीत दान देण्याची प्रथा आजही दक्षिण भारतातील मंदिरांमध्ये कमी-अधिक प्रमाणात पाहायला मिळते.

अतिशय उल्लेखनीय !

छान झाला आहे हा भाग !