व्यायामशाळेचं रहस्य

बिपीन सुरेश सांगळे's picture
बिपीन सुरेश सांगळे in जनातलं, मनातलं
12 Aug 2022 - 10:15 pm

व्यायामशाळेचं रहस्य
-------------------------

( ही कथा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला समर्पित आहे . स्वातंत्र्य चळवळीचे काही संदर्भ सोडता कथा काल्पनिक आहे . )

बालकथा - मोठा गट

-------------------------------------------------------------------------------------------
ही गोष्ट आहे स्वातंत्र्यपूर्व काळातली . एका बालचित्रकाराची . आणि एका मोठ्या प्रसंगाची ...
-----
“ ए मामा , दाखव की तुमची व्यायामशाळा , “ शिरीष म्हणाला .
शिरीष आठवीतला मुलगा . उन्हाळ्याच्या सुट्टीत तो आजोळी आला होता. गोपाळमामाशी त्याचं चांगलं जमायचं . पण व्यायामशाळेनं काहीतरी घोडं मारलं होतं बहुतेक . ती दाखवायला तो काही तयारच होत नव्हता . तिला काय सोनं लागलं होतं , कोणास ठाऊक ?
शेवटी आजीचा वशिला लावला तेव्हा मामा नाईलाजाने तयार झाला . अर्थात रागानेच !
मामाचं गाव छोटं होतं . पण रेल्वेमार्गावर वसलेलं . निळ्याशार पाण्याचं एक तळं आणि हिरवीगार शेती असलेलं .
मामाच्या मित्रांनी एक व्यायामशाळा बांधली होती . स्वतः श्रमदान करून . पण गावाबाहेर . तीच शिरीषला बघायची होती . जी दाखवण्यासाठी मामा टाळाटाळ करत होता . काय कारण असावं ? मामा जाणे .
ते चालत निघाले . एका टेकाडावर ती व्यायामशाळा होती . बऱ्यापैकी मोठी . लाल विटांची .जशी ती जवळ येऊ लागली , मामा म्हणाला , “ बघ एकदाची आमची व्यायामशाळा . पण गप्प बसायचं हं. कोणाशी काही बोलायचं नाही , कळलं ? “
त्याला वाटलं , हा मामा वेगळाच आहे आणि ही व्यायामशाळाही . रहस्यमयच दिसतीये .
ते आत गेले. एक मोठी खोली होती . त्याला लागून आणखी एक मोठी खोली होती . चुना मारलेल्या पांढऱ्या भिंती. पहिल्या खोलीत जमिनीवर ठेवलेली वजनं , शीगा . डंबेल्स , मुदगल . काही बाकडी . तिथे आता एकच माणूस होता . तोदेखील नुसताच उभा . तो मामाकडे पाहून हसला .
ती एक जुन्या काळातली साधीशी जिम होती . शिरीष ते पहात होता .
दोनच मिनिटांत मामा म्हणाला , “ निघू या ? “
कसली घाई लागलीये ह्याला ? शिरीषला कळेना . आतली खोली तर बघूच दिली नाही .
तेवढ्यात आतून एक तरुण बाहेर आला . रुबाबदार . मोठ्या दाढीमिशा वाढलेला . धट्टाकट्टा . डोक्याला पांढरा रुमाल बांधलेला . त्यातून त्याचे बाहेर डोकावणारे लांब , दबलेले केस .
“ काय रे ? कोणाला आणलंय इथे ? “ त्याने विचारलं .
“ क्ष - क्षमा असावी , माझा भाचा . “ मामा म्हणाला .
“ असू दे ,असू दे . काय रे , नाव काय तुझं ? “ त्याने विचारलं .
मामाने सांगितलं होतं , बोलायचं नाही ; पण आता ? ...
“ शिरीष , “ त्याने नाव सांगितलं . मग तो धाडस करून पुढे म्हणाला ,” मी इथे आलं तर चालेल का - व्यायामाला ? “
मामाने आवंढा गिळला .
“तो कशासाठी ? आम्ही व्यायाम करतो तो देशसेवेसाठी . तू करणार का ती ? “
“ हो. करीन की . “
त्यावर तो तरुण गडगडाटी हसला . त्याने शिरीषच्या पाठीत एक थाप मारली . बाप रे ! काय ताकद होती त्या हातात !
मग तो म्हणाला , “ चालेल बरं . पण आता नाही . आधी शिक मोठा हो . मग मला भेट . “
त्यावेळी शिरिषला तिथे आणखी काही तरुण दिसले . त्यांच्या हालचाली चोरट्या होत्या . त्यांचं बोलणं कुजबुजत्या स्वरूपाचं होतं . संशयास्पद !
असं का ? ही कसली देशसेवा ? तो विचारात पडला .
कोण असावीत ती मंडळी ?
-----
ती व्यायामशाळा नावालाच होती . खरं तर तो एक गुप्त अड्डा होता - क्रांतिकारकांचा . आणि तो अड्डा म्हणजे त्यांच्या लपण्याची जागा , त्यांचा शस्त्रसाठा , त्यांचा खलबतखाना , सारंच होतं.
आणि सध्या तिथे शांततेत ‘ गडबड ‘ चालू होती . एक मोठा कट तिथे आकारास येत होता . काय असावा तो ? सध्यातरी ते एक गुपितच होतं .
-----
शिरीष अंगणात बसून चित्र काढत होता . आजीचं . दोघे कडुनिंबाच्या झाडाखाली बसले होते . छान सावली होती . तो लहान असला तरी चित्र छान काढायचा . विशेषतः चेहरे तर अगदी हुबेहूब !
तेवढ्यात मामा आला , म्हणाला , “ ए , चल माझ्याबरोबर . स्टेशनवर जायचंय . “
शिरीष निघाला . चित्र अर्धंच राहिलं . पण त्याने ती छोटी वही आणि पेन्सिल खिशात टाकली . मामाच्या शेतासाठी खत लागत होतं . ते घेऊन एक माणूस रेल्वेने येणार होता . ते ताब्यात घ्यायचं होतं . ते दोघे सायकलवर डबलसीट गेले . रस्त्याच्या कडेला पिवळ्या गवताची सोबत होती . गरम होत होतं .
स्टेशनवर खूप नाही , पण गर्दी होती . मामा कोणाकोणाशी बोलत होता . शिरीषने त्याचं चित्र पूर्ण केलं . तरी ट्रेन काही येईना अन वेळ काही जाईना .
तो इकडेतिकडे पाहू लागला . त्याला एक माणूस दिसला . एक धनगर . धडधाकट, काळसर . पांढरं धोतर , पांढरा सदरा . लाल मुंडासं . जाडजूड मिशा अन भेदक डोळे . व्यक्तिचित्र काढण्यासाठी भारी व्यक्तिमत्व होतं .
तो त्यांच्या पलीकडे बसला होता . शिरीषने त्याचं नीट निरीक्षण केलं . तो माणूस उठून दुसरीकडे गेला . तेव्हा त्याने त्या माणसाचं चित्र काढायची सुरुवात केली .
चित्र पूर्ण झालं . अन गाडी आली . शिट्टी वाजवत . धुरांच्या रेषा काढत .
-----
ते घरी आले जेव्हा तेव्हा मामाचा एक मित्र आला होता . त्याने शिरीषने काढलेलं आजीचं चित्र पाहिलं .
“अरे वा ! भारी आलीये की आमची काकू , “ तो म्हणाला .
त्यावर शिरीषला भाव चढला . त्याने वहीचं पान उलटलं आणि आणखी एक चित्र दाखवलं . त्या धनगराचं .
त्याबरोबर तो मित्र एकदमच चमकला . म्हणाला , “ हे चित्र तू नीट काढलं आहेस का ? चेहरा हुबेहूब आहे का ? “
“अगदी ! “ शिरीष आत्मविश्वासाने म्हणाला .
त्यावर त्या मित्राने मामाला डोळ्याने खुणावलं आणि ते दोघे तिथून निघालेच .
काहीतरी गडबड होती खरी . पण काय ? ...
-----
तो धनगर - धनगर नव्हता . तो एक वेष बदललेला पोलीस होता . तो तिथे फिरत होता ही काही चांगली गोष्ट नव्हती .
लगेच क्रांतीकारकांना निरोप गेला. सगळे क्रांतिकारक तिथून पसार झाले . सगळं घेऊन , गाव सोडून पळाले . एक ती व्यायामाची साधनं सोडता . आणि त्यांच्याबरोबर गोपाळमामाही . ते सगळे क्रांतिकारक पुढे भूमिगत झाले .
तो लांब केसवाला त्या गटाचा मुख्य होता - बळवंत . त्या गावावरून जाणाऱ्या ट्रेनमध्ये इंग्रजांचा मोठाच खजिना पाठवला जाणार होता . तो लुटण्याची त्याची योजना होती . अर्थात क्रांतिकार्यासाठी . त्यासाठी त्यांची सगळी लगबग चालू होती ; पण हे असं विघ्न आडवं आलं होतं .
पोलिसांनी व्यायामशाळेवर धाड घातली . तेव्हा त्यांना तिथे काहीच हाताला लागलं नाही . तिथे गावातले बालगोपाळ मस्ती करत होते . आणि त्यांच्यामध्ये शिरीषही होता . ती पोरंटोरं जड वजनं उचलण्याचा फुका प्रयत्न करत होती . नुसती गंमत.
खजिना लुटण्याचा कट फसला होता ; पण - क्रांतीकारकांना पकडण्याची इंग्रज सरकारची मोहीमही फसली होती . आणि हे सारं घडलं होतं , शिरीषच्या त्या एका चित्राने . अप्रत्यक्ष का होईना पण क्रांतीकारकांना वाचवण्याचं श्रेय त्याचं होतं .
पुढे शिरीष त्याच्या घरी गेला . एके दिवशी मामा त्याला भेटायला आला . चोरीछिपे . त्याने एक भारी रंगपेटी व चित्रकलेची वही आणली होती . तो म्हणाला , “ ही तुला भेट . खास बळवंतजींकडून ! ते तुझं खूप कौतुक करत होते . “
शिरीषची छाती फुगली . त्याने बळवंतजींचं चित्र काढायचं ठरवलं . पण तो एकदम सावध झाला . त्यात त्यांना धोका होता .
ती गोष्ट त्याने राखून ठेवली . त्याने ते चित्र काढलं - पण भारत स्वतंत्र झाल्यावर !
------------------------------------------------------------------------------------------------

बालकथा

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

16 Aug 2022 - 10:15 pm | चौथा कोनाडा

व्वा, क्या बात हैं !
सुंदर कथा. शेवट तर खासच ! स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर क्रांतिकारकाची आणि देशभक्तीची समज असलेल्या चित्रकार विद्यार्थ्याची ही वेगळी कथा खुप भावली.

वाह, बिपिन जी !

खूप दिवसांनी लिहीलंत पण एकदम सुंदर कथा

विवेकपटाईत's picture

17 Aug 2022 - 12:23 pm | विवेकपटाईत

कथा आवडली.

ज्ञानोबाचे पैजार's picture

17 Aug 2022 - 1:34 pm | ज्ञानोबाचे पैजार

आवडली,
पैजारबुवा,

शलभ's picture

17 Aug 2022 - 3:45 pm | शलभ

मस्त कथा. आवडली.

बिपीन सुरेश सांगळे's picture

21 Aug 2022 - 10:16 pm | बिपीन सुरेश सांगळे

चौको
सौंदाळा
पटाईत
पैजार बुवा
शलभ
खूप आभारी आहे

आणि सर्व वाचकांचाही खूप खूप आभारी आहे

लॉगिन चा काही प्रश्न होता . त्यामुळे उशीर झाला . क्षमस्व

बिपीन सुरेश सांगळे's picture

21 Aug 2022 - 10:18 pm | बिपीन सुरेश सांगळे

चौको
अहो ग्रेट आहात आपण .
चित्रकार आहात . हे नवीनच .
प्रदर्शनाबद्दल खूप अभिनंदन !

अन कथाही एका बालचित्रकाराचीच . हा योगायोग . छान वाटलं

असंका's picture

22 Aug 2022 - 3:22 pm | असंका

सुरेख!!

धन्यवाद!!

टर्मीनेटर's picture

22 Aug 2022 - 6:44 pm | टर्मीनेटर

मस्त कथा! आवडली 👍

Nitin Palkar's picture

22 Aug 2022 - 8:05 pm | Nitin Palkar

चांगली कथा. खूप आवडली.

सुंदर कथा, नेहमीप्रमाणे युद्धस्य कथा रम्रयाः!! भूमीगत युद्धाची कथा व योद्ध्यांची. सुंदर कथा.

सुंदर कथा, नेहमीप्रमाणे युद्धस्य कथा रम्रयाः!! भूमीगत युद्धाची कथा व योद्ध्यांची. सुंदर कथा.

अथांग आकाश's picture

29 Aug 2022 - 9:06 am | अथांग आकाश

कथा आवडली आहे!!!
.

बिपीन सुरेश सांगळे's picture

7 Sep 2022 - 10:42 pm | बिपीन सुरेश सांगळे

असंका
टर्मिनेटर
नितीन
नूतन
आकाश
धन्यवाद