जिलचे देवदूत - २

पर्णिका's picture
पर्णिका in जनातलं, मनातलं
29 Jul 2022 - 3:24 am

या आधीचा भाग इथे वाचता येईल.

सकाळी नोंदणी डेस्कवर जेव्हा आम्हांला फेन्स पेंटिंगचे काम दिले गेले, तेव्हा जेनिफरने आमच्या पाचजणींपैकी कुणालाच या कामाचा अनुभव नसल्याचे सांगितले होते. साध्या ब्रशने आणि रोलरने मात्र यापूर्वी आम्ही रंगकाम केले होते. " तुम्ही अजिबात काळजी करू नका. लंचनंतर, काही स्वयंसेवक तुमच्या मदतीसाठी येतील. " असे ग्रेगने, संस्थेच्या मुख्य संचालकाने आम्हांला त्यावेळी सांगितले होते. आम्ही जिलच्या घरी परतलो, तेव्हा मार्क आणि रॉबर्ट यांनी कुंपण रंगवायचे काम सुरु केले होते देखील! आम्हांला बघताच, " Here you are ladies, we’ve already applied a layer of primer. Let it dry for a few more minutes.“ असे म्हणत रॉबर्टने आम्हांला पुढील कामाच्या सूचना दिल्या. नोझल्स कसे बसवायचे, स्वच्छ करायचे अशी थोडीफार प्राथमिक माहिती देत पेंट स्प्रेयर्स कसे वापरायचे याचे प्रात्यक्षिक त्यांनी दाखवले. " रंगकाम करण्यासाठी आज एकदम योग्य दिवस आहे. वाऱ्याचा वेग, आर्द्रता, तापमान सर्वच गोष्टी अनुकूल आहेत." मार्क आम्हांला सांगत होता. कुंपणाची एक बाजू रंगवून होईपर्यंत ते दोघेही तिथेच थांबून आम्हांला आवश्यक ती मदत करत होते. त्यानंतर, काही मदत लागली तर कळवा, असे सांगून ते इतर घरांच्या दुरुस्तीसाठी निघून गेले.

आम्हीही दोन ग्रुप तयार करून कुंपण रंगवायला सुरुवात केली. स्टीव्हही आम्हाला अधून मधून मार्गदर्शन करत होता. मध्येच एकदा, छोटा पेंट ब्रश आणि इतर काही वस्तू आणण्यासाठी मी अन क्रिस्टी जिलकडे गेलो. तिने अतिशय स्वच्छ आणि नीटनेटक्या अशा तिच्या गराजमधून अगदी काही क्षणांत त्या वस्तू काढून दिल्या. क्रिस्टीलाही हे लक्षात आले, अन ती मला म्हणाली, " पर्ण, आमच्या घरी चार पाच कप्पे उचकटल्याशिवाय कुठलीही वस्तू मिळत नाही.". " माझ्या घरीही काही वेगळी परिस्थिती नाही." मीही हसत हसत तिला उत्तर दिले. थोडीफार मार्क-रॉबर्टची मदत घेत, पुढील दोन-तीन तासांत आमचे काम संपले. “Now, this backyard looks just as lively as it’s owners.“ मी म्हणाले आणि सर्वांनीच हसत मान डोलावली. त्या प्रसन्न दिसणाऱ्या आवाराकडे बघून आम्हांलाही विलक्षण समाधान वाटले.

आमचे आजचे काम तर पूर्ण झालेच होते. दिवसभराच्या सर्व कामांचा संध्याकाळी ग्रेग आणि इतर कार्यकर्ते येऊन आढावा घेणार होते. आम्ही पाठीमागची आवराआवरी करून जिलचा निरोप घ्यायला गेलो. तर तिने " सकाळपासून बराच वेळ उन्हांत काम केले आहे. या, आत या. थोडा वेळ बसा अन आराम करा." असे म्हणत आम्हांला घरात बोलावले. आमच्यासाठी काही पदार्थही तिने बनवले होते. खरे तर, आम्ही पाचही जणी प्रचंड थकलो होतो. पण तिच्या त्या प्रेमळ आग्रहाला आम्ही नकार देऊ शकलो नाही. अपेक्षेप्रमाणेच, तिचे घर साधेसेच पण सुंदररित्या सजवले होते. जुन्या पद्धतीचे फर्निचर, आरामशीर बैठक, भिंतीवर लावलेली सुरेख पेंटिंग्ज, समोरच्या कॉफी टेबलावर असलेली नाजूक फुलदाणी आणि कोपऱ्यात असलेला मोठा पियानो अशी ती खोली कलात्मकरीत्या सजवली होती. त्या खोलीला लागूनच ठेवलेल्या डायनिंग टेबलवर काही पदार्थ ठेवले होते. बाजूलाच प्लेट्स, चमचे, नॅपकिन, पाण्याचे ग्लास ठेवले होते. क्लब सॅंडविचेस, चीज बोर्ड आणि फिक्कट गुलाबी रंगाचा स्ट्रॉबेरी आईसबॉक्स केक सर्वच इतके मोहक दिसत होते की भरल्यापोटीही आम्ही त्यांची चव घेऊन पाहण्याचा मोह टाळू शकलो नसतो.

" मुलींनो, हवं ते अन हवं तितकं खा. हे सँडविचेस आणि चीज बोर्ड स्टीव्हने खास तुमच्यासाठी बनवलंय. फ्रिजमध्ये ज्यूस, सोडा आहे." जिल फायर प्लेसजवळील खुर्चीवर बसत आम्हांला म्हणाली.
" कित्ती छान! आहे कुठे पण स्टीव्ह?" एव्हाना सौम्या आणि स्टीव्हची चांगलीच गट्टी जमली होती.
" अग तो दर शनिवारी गांवातील वाचनालयात थोडा वेळ स्वयंसेवक म्हणून जातो."
आई-आजीप्रमाणेच मायेने रांधलेले ते अतिशय स्वादिष्ट पदार्थ खात खात आमच्या गप्पा सुरु होत्या. तोंडात ठेवताच अक्षरश: विरघळणारा तो केक फारच अप्रतिम होता.
" जिल, हा केक माझी आईही नेहमी करते. पण हा केक, काहीतरी वेगळं आहे यांत. मला या केकची रेसिपी हवीय." दुसऱ्यांदा केक घेत रचेल म्हणाली.
" अग रचेल, पाउंड केकचाही एक थर आहे यांत. ही रेसिपी तर देईनच, पण उरलेला केकही तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता." जिल हसत उत्तरली.
" ओह.. तर हा आहे तुझा सिक्रेट इन्ग्रेडिएंट... कुणाची आहे ही पाककृती? तुझ्या आईची?" जेनिफरने विचारले.

क्षणभरच थोडीशी खिन्नता जिलच्या चेहऱ्यावर दिसली. पण लगेचच आमच्याकडे बघत जिल म्हणाली, " साठ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी माझ्या आईला, माझ्या बाबांना मी शेवटचे बघितले. त्यानंतर आमची भेट झालीच नाही." तिचा कंठ किंचिंत दाटून आल्यासारखा वाटला. हा धक्का आमच्यासाठीही अनपेक्षित होता. काही क्षणांपूर्वीचे हसरे वातावरण एकदम शांत झाले. काय बोलावे? हे कुणालाच सुचेना. अखेर, क्रिस्टीच उठून तिच्याजवळ गेली अन तिचे हात हातात घेत म्हणाली, " जिल, तुला त्रास होणार नसेल तर सांगशील का तुझी, तुझ्या कुटुंबाची गोष्ट? आवडेल आम्हांला ऐकायला."
" हो ग, सांग ना तुझे आई-वडील कुठे होते? आम्हांलाही उत्सुकता आहे." मी तिला पुन्हा आग्रह करीत म्हणाले.
जिलच्या डोळ्यांत पाणी तरारल्यासारखे वाटले. पण निग्रहाने ते मागे सारून जिल तिची गोष्ट सांगू लागली.

मी मूळची क्युबाची... क्युबामध्येच जन्मलेले आणि वाढलेले. मी, माझी मोठी बहीण आणि आई-बाबा असे आमचे सुखी कुटुंब होते. त्यावेळी क्युबामध्ये बऱ्याच राजकीय घडामोडी घडत होत्या. हुकूमशाहीचे वारे वाहू लागले होते. लोकशाही वाचवण्यासाठी मोठी चळवळ सुरु झाली होती. सामान्य जनता यांत अक्षरशः भरडली जात होती. जॉन केनेडी त्यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. या क्रांतीच्या नेतृत्वाकडून केल्या जाणाऱ्या वारंवार मागणीचा विचार करून प्रेसिडेंट केनेडींनी १९६१ साली क्युबन जनतेसाठी रेफ्युजी कार्यक्रम घोषित केला. या 'ऑपरेशन पेड्रो पॅन' योजनेअंतर्गत हवाना ते अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील मायामी विमानतळ या मार्गावर अनेक विमानांनी उड्डाण केले. त्यांतून सुमारे अडीच लाख क्युबन नागरिक अमेरिकेत स्थलांतरित झाले. त्यांपैकी, जवळजवळ १४,००० मुले आपल्या कुटुंबाशिवाय येथे आली होती. ठराविक दिवशी काही ठराविक नागरिकांनाच अमेरिकेत येण्याची परवानगी मिळत असे. अशी परवानगी मिळवण्यासाठी, मोठ्या मोठ्या रांगा लावून, आवश्यक कागदपत्रे घेऊन लोक कित्येक दिवस रांगेत थांबत होते. माझे आई-बाबाही कित्येक आठवडे प्रयत्न करीत होते. अखेर त्यांना अमेरिकन प्रवेशाची परवानगी मिळाली, मात्र कुटुंबातील केवळ दोघाजणांसाठीच! तेव्हा, त्यांनी मला आणि माझ्या बहिणीला अमेरिकेत पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी मी केवळ १२वर्षांची होते तर माझी बहीण १४ वर्षांची होती.

" जेसिका, आम्ही पुढच्या विमानाने काही दिवसांतच तिथे येऊ. काही दिवसांचा तर प्रश्न आहे. तोपर्यंत तू आपल्या छोट्या जिलची नीट काळजी घे." विमानतळावर आम्हांला सोडायला आलेले बाबा माझ्या मोठ्या बहिणीला सांगत होते. त्यांचा तो कातर स्वर अजूनही मला आठवतो.
" आई, मी नाही जाणार एकटी. मीही तुमच्याबरोबर पुढच्याच विमानाने येते ना!" मी अक्षरश: रडत होते. आईच्या डोळ्यांतून तर सतत अश्रूधारा वाहतच होत्या. आम्हांला दोघींना जवळ घेत तिने घट्ट मिठी मारली. तिने माझ्या डोळ्यांतील पाणी पुसले आणि थोडेसं हसून म्हणाली, " Don’t you worry for a bit, my little Jill. God’s angels will be always watching over you." आई आपल्याबरोबर कधीही खोटे बोलणार नाही, हा तेव्हा विश्वास होता. त्यामुळे, आईच्या त्या आश्वासक बोलण्याने मला धीर आला. हीच आमची शेवटची भेट आणि हेच आमचे शेवटचे संभाषण!
" शेवटची भेट म्हणजे? त्यांनतर, तुझे आई-वडील अमेरिकेत आलेच नाहीत?" जिलचे बोलणं मध्येच तोडत क्रिस्टीने विचारले.
खुर्चीवरून उठून जिल पियानोजवळ गेली आणि त्या पियानोवर सराईतपणे आपली बोटे फिरवत म्हणाली, " अग, पुढे काही महिन्यांतच ही रेफ्युजी योजना बंद झाली. १९६२च्या ऑक्टोबर महिन्यांत हवाना ते मायामी असे शेवटचे विमान उडाले. अखेरपर्यंत, माझे आई-वडील अमेरिकेत येऊ शकले नाही. ना माझा किंवा माझ्या बहिणीचा त्यांच्याशी काही संपर्क होऊ शकला."

जिलची ही कहाणी ऐकून आम्ही सर्वजणीं दिग्मूढ झालो होतो. काय बोलावे? हे काही सुचत नव्हते. काही क्षण अगदी शांततेत गेले.
" तुम्ही दोघी बहिणी इथे आल्यावर कुठे राहिल्या? तुझी बहीण जेसिका... ती कुठे असते सध्या? " न राहवून रचेलने विचारले.
जिल आता थोडीफार सावरली होती. आमचे उदास चेहरे बघून तिला वाईट वाटले असावे. थोडेसे स्मित करून ती पुढची गोष्ट सांगू लागली.

इथे आल्यावर आम्ही दोघी बहिणी काही महिने रेफ्युजी कॅम्पमध्ये राहिलो. आमच्यासारखी बरीच मुले तिथे होती. सरकारी यंत्रणेवर बराच ताण आला होता. अमेरिकन सरकारने आम्हां मुलांसाठी, वेगवेगळ्या राज्यांतील अनाथालयांत पाठवणे, इच्छूक कुटुंबाना दत्तक देणे असे बरेच उपक्रम राबवले होते. तर काहीजण अशा मुलांना तात्पुरता आसरा देत होते, त्याबद्दल सरकार त्यांना दर महिन्याला ठराविक रक्कम देत असे. काही आठवड्यांनी जॉर्ज-सेरा या प्रेमळ पती-पत्नींनी मला असाच तात्पुरता आसरा दिला अन आम्हां दोघी बहिणींची ताटातूट झाली. जॉर्ज अमेरिकन सैन्यांत होता. त्यांना तीन मुले होती. त्यांच्या घरी एक मोठा पियानो होता. माझी आई उत्तम पियानो वाजवायची. ती क्युबामध्ये पियानोचे क्लासेसदेखील घेत असे. तिने मला व माझ्या बहिणीलाही लहानपणापासूनच पियानोचे धडे दिले होते. त्यांमुळे मीही बऱ्यापैकी पियानो वाजवत असे. तो पियानो बघताच मला ते घर आपले वाटू लागले. हळूहळू त्या कुटुंबात मी रमले. राज्य सरकारचा प्रतिनिधी दर महिन्याला येऊन माझी चौकशी करत असे. त्याच्याकडून मला जेसिकालाही घर मिळाल्याचे कळले, पण ती दुसऱ्या राज्यांत गेली होती. पुढे, जॉर्ज-सेराने मला कायदेशीररित्या दत्तक घेण्याची प्रक्रिया सुरु केली. पण काही महिन्यांतच जॉर्जचे पोस्टींग जर्मनीला झाले, आणि तोपर्यंत दत्तकपत्र न मिळाल्याने त्यांना मला देशाबाहेर नेण्याची परवानगी मिळाली नाही. त्यादिवशी सेरा मला कुशीत घेऊन खूप रडली. जॉर्जला तर एव्हढे हताश मी कधीच बघितले नव्हते. पुन्हा एकदा मी रेफ्युजी कॅम्पमध्ये परतले.

काही दिवसांनी मला पुन्हा एका कुटुंबात आसरा मिळाला. त्या घरांतील, माझा अनुभव तितकासा सुखद नव्हता. सरकारकडून मिळणाऱ्या पैशांसाठी त्या पती-पत्नींनी माझ्यासारख्या अनेक मुलांना आसरा दिला होता. परंतु, आमची योग्य देखभाल ते करत नव्हते. राज्य सरकारच्या प्रतिनिधींच्याही ही गोष्ट लक्षांत आली, आणि आमची तिथून सुटका झाली. मात्र, माझ्या देवदूतांचे माझ्याकडे लक्ष होते. लवकरच, पीटर आणि मेरीने मला दत्तक घेतले. त्यांना मुलबाळ नव्हते, त्यांची आर्थिक परिस्थितीही बेताचीच होती. पण मला माझे आई-बाबा जणू परत मिळाले, माझे हक्काचे घर मला मिळाले.

सकाळपासून दिसलेल्या उत्साही, प्रसन्न, बोलक्या आणि प्रेमळ जिलचा हा विलक्षण प्रवास थक्क करणारा होता. मात्र, हे सर्व सांगतांना तिच्या बोलण्यात ना कुठे खंत होती, किंवा 'मी किती आणि काय सोसले आहे?' असा बढाईचा सूर अजिबात नव्हता. सुरुवातीला ती थोडा वेळ आई-वडिलांच्या आठवणीने किंचित हळवी झाली होती इतकेच. पण नंतर अगदी अलिप्तपणे ती आम्हांला तिची गोष्ट सांगत गेली. थोडा वेळ, आम्ही पाच जणी नुसतेच एकमेकांकडे बघत होतो.

" जेसिका आणि तुझी परत कधी भेट झाली का ?" अखेर जेनिफरने विचारले.
" मी आणि स्टीव्हने लग्न करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा मी थोडी धडपड करून जेसिकाचा संपर्क क्रमांक शोधला आणि तिच्याशी बोलले. पण ती येऊ शकली नाही. त्यानंतर, १५-२० वर्षांनी तिच्या मुलाच्या लग्नांत आम्ही पहिल्यांदा भेटलो. त्यावेळी, आईच्या ममतेने तिने मला जवळ घेतले होते." जिलने अगदी शांतपणे उत्तर दिले.
आम्ही पाचहीजणी, वेगवेगळ्या देशांत जन्मलो असलो तरी मध्यमवर्गीय, सुरक्षित वातावरणांत लहानाच्या मोठ्या झालेलो...आतापर्यंतच्या आयुष्यांत ज्या काही थोड्याफार अडचणी आल्या तरी, आई-वडील, भावंडं, आजी-आजोबांचा अजूनही भक्कम आधार आहे आम्हाला, तरीही कधी निराश होतो. कधी क्वचित काही सामाजिक उपक्रमांत भाग घेतला, थोडीफार कुणाला आर्थिक मदत केली तर किती मोठे काम केले असे आम्हांला वाटते. पण कठीण परिस्थितीत इतक्या लहान वयांत आपल्या आईवडिलांना सोडून परक्या देशांत आलेली, त्या देशाची भाषासुद्धा न येणारी, आणि अनेक बरेवाईट प्रसंग अनुभवूनदेखील कुठल्या ना कुठल्या रूपांत देवदूत सतत तिच्याबरोबर आहेत, हा अजूनही दृढ विश्वास असणारी जिल पाहून आम्ही थक्क झालो होतो.

आणि मग न राहवून अखेर सौम्याने विचारलेच, " मग स्टीव्ह तुला कुठे आणि कधी भेटला? तुम्ही लग्न करायचे कधी ठरवले?" तिला खरे तर हा प्रश्न सकाळपासूनच जिलला विचारायाचा होता.
आता मात्र जिल विलक्षण गोड हसली आणि सौम्याकडे पाहत, थोड्याशा मिश्किलपणे म्हणाली, " मला माहित होते, हा प्रश्न तूच विचारणार? पण खरं सांगू, माझे देवदूत होतेच ना सतत माझ्याबरोबर?"

क्रमश:

कथा

प्रतिक्रिया

चित्रगुप्त's picture

29 Jul 2022 - 5:24 am | चित्रगुप्त

हा भाग अतिशय आवडला. जिलचे बालपण किती कष्टाचे असेल याची कल्पना आली. या मुली पुढे अमेरिकन नागरिक झाल्यावरही आई-वडिलांना भेटू. शकल्या नाहीत, त्यांना आणू शकल्या नाहीत, याचे आश्चर्य वाटले.
या संदर्भात क्यूबाबद्दल थोडी आणखी माहिती प्रतिसादात द्यावी, असे सुचवतो.
एक प्रश्नः 'सेरा' म्हणजे 'Sarah' का? ज्यू लोकांमधे हे नाव फार असते ना ?
आपल्या मदतीला देवदूत वा अन्य कोणी सतत बरोबर असतो, ही भावना फार दिलासा देणारी असते, आणि कठीण समयी कामाची असते. "भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे" यामागे हाच विचार असावा. मला स्वतःला ४५ वर्षांपूर्वी दिवंगत झालेले वडील सतत आपल्या पाठीशी असतात असे अजूनही वाटते. फार पूर्वी मराठी पुस्तकांमधे "कर्णपिशाच्च्य" म्हणून काहीतरी प्रकार बराच वाचायला मिळायचा. "हे मला कर्णपिशाच्च्याने सांगितले" अशी कोर्टात दिलेली साक्षही ग्राह्य मानली जायची म्हणे. ख.खो. दे. जा. असो.

पुढील भागाविषयी उत्सुकता आहे. या भागाप्रमाणेच विविध लोक, घटना, इतिहास, परिसर वगैरेंचे विस्तृत विवेचन द्यावे. त्यातून उलगडत जाणारा विस्तृत पट हे लेखाचा मुख्य गाभा असावा. आणि हो, फोटो अवश्य द्यावेत.
स्प्रे करताना मास्क, हातमोजे, गॉगल वगैरे लावले असेल ना?

मला स्वतःला ४५ वर्षांपूर्वी दिवंगत झालेले वडील सतत आपल्या पाठीशी असतात असे अजूनही वाटते.

काय लिहू? मन भरून आलं ... तुमचे तुमच्या वडिलांवर असलेले प्रेम, विश्वास आणि ४५ वर्षांनंतरही असलेले अतूट नाते हे शब्दांत मांडणे, मला शक्य नाही.

सुखी's picture

29 Jul 2022 - 6:53 am | सुखी

हा भाग पण छान झालाय

कपिलमुनी's picture

29 Jul 2022 - 9:22 am | कपिलमुनी

हा भाग आवडला ..
लेखनशैली उत्तम आहे..

ज्ञानोबाचे पैजार's picture

29 Jul 2022 - 12:20 pm | ज्ञानोबाचे पैजार

छान झाला आहे हा भाग,
स्वतःच्या लेकरांना असे अनाथासारखे दुसर्‍या देशात पाठवुन द्यायला आईबाप धजावतात म्हणजे ते स्वतः किती कठीण परिस्थितीत असतील याची कल्पनाच करवत नाही.
संपूर्ण कुटूंबाला स्थलांतराची परवानगी न देता फक्त दोन लहान लेकरांना विस्थापित करण्याच्या निर्णया मागे काय मर्यादा असतिल?
पैजारबुवा,

चित्रगुप्त's picture

29 Jul 2022 - 9:03 pm | चित्रगुप्त

संपूर्ण कुटूंबाला स्थलांतराची परवानगी न देता फक्त दोन लहान लेकरांना विस्थापित करण्याच्या निर्णया मागे काय मर्यादा असतिल?

सरकारी काम वो ते. दर अर्जामागे दोन माणसे पाठवायची. कोणी किती वर्षाचे का असेना. आता अशी कल्पना करून बघा, की अशी वेळ आपल्यावर आलेली आहे. तर एक मुलगी आणि आई-बापापैकी एकजण अमेरिकेला जातील, ही एक शक्यता. दुसरी म्हणजे आई-बापाने अमेरिकेला जायचे, मुलींनी क्यूबात रहायचे. आणि तिसरी शक्यता दोन्ही मुलींनी जायचे. काळजावर दगड ठेऊन त्यांनी मुलींच्या भवितव्याचा विचार करून पाठवले असेल.
पण निदान एवढे तरी बरे. १९९१ साली काश्मिरातून हिंदूंना रातोरात पळावे लागले, तेंव्हाची परिस्थिती काय असेल ?
कुणीतरी क्युबाचा एकंदरित इतिहास वगैरेवर इथे लिहीले, तर यावर आणखी प्रकाश पडेल.

विजुभाऊ's picture

29 Jul 2022 - 2:04 pm | विजुभाऊ

खूप छान लिहिले आहे हो.
पोटच्या लेकरांना परक्या देशात पाठवताना त्या आईवडिलांनाही खूप यातना झाल्या असतील

मुक्त विहारि's picture

29 Jul 2022 - 2:13 pm | मुक्त विहारि

छान लिहिले आहे ...

वाह, मस्तच उलगडा होत आहे.सुंदर लिहिताय.

पर्णिका's picture

30 Jul 2022 - 3:16 am | पर्णिका

प्रतिक्रियेबद्दल आभारी, Bhakti! 'तू' प्लिज. :)

Nitin Palkar's picture

29 Jul 2022 - 7:25 pm | Nitin Palkar

सुरेख, ओघवत्या भाषेतील लेखन. दोन्ही भाग आवडले. पु भा प्र.

पर्णिका's picture

30 Jul 2022 - 3:14 am | पर्णिका

चित्रगुप्त, सुखी, कपिलमुनी, ज्ञानोबाचे पैजार, विजुभाऊ, मुक्त विहारि, Nitin Palkar लेख आवडल्याची पोच दिल्याबद्दल धन्यवाद !

मुळात हा रेफ्युजी प्रोग्रॅम अमेरिकेने केवळ मानवतेच्या दृष्टिकोनातून सुरु केला होता. स्थलांतरित नागरिकांच्या अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांबरोबरच रोजगार, शिक्षण, आरोग्य या सुविधाही त्यांना उपलब्ध करून द्याव्या लागत होत्या. त्यामुळे अर्थातच किती क्युबन नागरिकांना प्रवेश द्यायचा, याला मर्यादा असणार.
याशिवाय, या योजनेचा लाभ जास्तीत जास्त कुटुंबाना मिळावा असाही विचार केला जात असावा. तसेच, बऱ्याच जनतेला आपल्या देशातील परिस्थिती सुधारेल अशी आशा असेलच, त्यांनी कदाचित या योजनेचा उशिरा विचार केला असेल. असेच आणखीही काही घटक असू शकतात.

एकाच देशात, परंतु वेगवेगळ्या राज्यांत राहणाऱ्या या बहिणीसुद्धा जवळजवळ तीस वर्षांनी एकमेकींना भेटल्या. त्यांच्याही काही अडचणी असतीलच.
त्यांमुळे जिल तिच्या आईवडिलांना का भेटू शकली नाही, यांवर आम्हांला काही प्रश्न विचारावेसे वाटले नाही.

युद्धास्य कथा रम्यः असे शाळेत शिकलो ते अगदी खरे याची प्रचिती या कथा वाचून येते नेहमीच! पण ज्यांनी भोगले त्यांच्या दुःखाची कथा ऐकवत नाही तर सहन करणारे विशेषतः स्रियांच्या दुःखांची कल्पना करवत नाही. सुदैवाने आपल्यृा देशाला मध्युगीन काळा नंतर चीन रशिया, युरोपियन देश यांच्या सारख्या अंतर्गत लढाया व 2 ही महायुद्धांना तोंड द्यावे लागले नाही थेट असे म्हणतात ( रशिया व चीनला, युरोपला अंतर्गत यादवी, पूर्व सत्ता उलथवणे 2 महायुद्धे) असे तोंड द्यावे लागले नाही ,फक्त ब्रिटिश शााहीचे शांतता पूर्वक उच्चाटन झाले . त्यामुळे सामान्याना ब्रिटिश काळ सोडून. फारसे वााईट गोष्टी अत्याचारांना तोंड द्यावे लागले नाही असे म्हणतात ,ब्रिटिश सत्ता ही शांततापूर्वक उलथविली गेली असे म्हणतात व आमच्या पिढीच्या हाती (1950 नंतर जन्मलेले) विनासायास स्वातंत्र्य, सत्ता आल्याने त्याची किंमत मधल्या पिढीतील बर्याच भ्रष्टाचार्यांनी ठेवली नाही ना स्वातंत्र्य सैनिकांचा त्याग, त्यांच्या घर संसाराची राखरांगोळी( काही भ्रष्टाचारी सोडून). खरे स्वातंत्रसैनिक निवॄत्तीवेतन, घरांचे लाभ इ० फायद्या पांसून दूरच राहिले बरेचसे व नाही त्यांनी खूप फायदा घेतला हे मी स्वतः अनुभवले आहे.

पर्णिका's picture

2 Aug 2022 - 3:15 am | पर्णिका

Hmm... a thought-provoking comment, नूतन!

छान वर्णन,भाषाही आपण लेखांना खिळून राहू अशी व वेगवान

पर्णिका's picture

2 Aug 2022 - 3:16 am | पर्णिका

धन्यवाद.

लवकर ,लवकर पुढचे भाग येण्याची उत्सुकता !!

सिरुसेरि's picture

3 Aug 2022 - 4:13 pm | सिरुसेरि

छान लेखन . भाग १ आणी २ दोन्ही आवडले .

पर्णिका's picture

10 Aug 2022 - 1:06 am | पर्णिका

धन्यवाद. :-p