जुन्या हिंदी चित्रपटात एक सिन असायचा बघा..एक गुंडांची टोळी हिरॉईनच अपहरण करते.. एका सूनसान जागी तिला बांधून ठेवल जातं.. आणि तिचा छळ केला जायचा...तिच्या अंगाला त्या टोळीच्या म्होरक्याचा हात लागतो न लागतो तोच आपला हिरो अचानक एन्ट्री मारायचा...आधी तो थोडा मार खायचा पण मग पुढे त्याचा पवित्रा अचानक बदलायचा आणि तो गुंडांना बदडून काढायचा...क्रिकेटच्या मैदानावर पण असाच एक हिरो होता. जेव्हा जेव्हा भारतीय संघ अडचणीत सापडायचा तेव्हा तेव्हा तो अगदी शांतपणे मैदानात एन्ट्री करायचा आणि आपल्या स्टाईल मध्ये सामना जिंकवूनच परतायचा.. तो हिरो म्हणजे भारताला तीन वेळा आयसीसी ट्रॉफी जिंकवून देणारा, क्रिकेट जगतातील बेस्ट फिनीशर महेंद्रसिंह धोनी...
त्याच्या पराक्रमाचे जास्त दाखले देत बसत नाही. फक्त त्याच्या एका अविस्मरणीय खेळीची आठवण करून देतो. २०१२ साली चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियम वर भारत विरूध्द पाकिस्तान एकदिवसीय सामना होता. त्या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकली आणि भारताला फलंदाजी साठी आमंत्रित केले. सामन्याच्या ४ थ्या षटकात भारताच्या १७ धावा झाल्या असताना जूनैद खानने सेहवाग ला त्रिफळाचित केले. त्यानंतरच्या सलग तीन षटकात भारताचा एक-एक खेळाडू तंबूत परतला. गंभीर, विराट, युवराज, रोहित अशी रांगच लागली. पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे भारताचा डाव कोसळत होता. ९.४ षटकांत भारताची आवस्था झाली ५ बाद २९. या परस्तिथीत महेंद्रसिंह धोनी मैदानावर आला. भारताचा डाव पाकिस्तानच्या भेदक गोलंदाजी पुढे १००-१५० मध्येच गुंडळतो की काय अस वाटत होत. अश्या वेळेस धोनीने सगळी सूत्रे आपल्या हाती घेतली. आधी त्याने सुरेश रैना सोबत ७३ धावांची भागदारी रचली आणि नंतर अश्विनला सोबत घेत १२५ धावा जोडल्या. सुरवातीला तो अगदी हळू खेळत होता, पहिल्या ७० चेंडूत त्याने फक्त २७ धावा काढल्या. पण त्यानंतर त्याने रौद्ररूप धारण केले आणि २९/५ अश्या दयनीय अवस्थेतून भारताला ५० षटकांत २२७ धावांचा टप्पा गाठून दिला. या खेळीत त्याने ७ चौकार व ३ षटकारांसह १२५ चेंडूत नाबाद ११३ धावा काढल्या. तो सामना आपण ६ विकेट नी हरलो पण त्या दिवशी धोनीने आधी ढाल व नंतर तलवार बनून भारतीय संघाच्या अब्रूचे रक्षण केले. भारताने सामना हारून पण धोनीला सामनावीराचा पुरस्कार भेटला. १५-१६ वर्षाच्या कारकिर्दीत धोनीने अनेकवेळा बिकट परिस्थितीतून भारताला बाहेर काढले आणि विजयी केले.
धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने २००७ चा टी-२० विश्र्वचषक, २०११ चा एकदिवसीय विश्वचषक आणि २०१३ ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. धोनीच्या नेतत्वाखालीच २००९ ला कसोटी क्रिकेट मध्ये भारत पहिल्यांदा नंबर एक वर विराजमान झाला.
धोनीचा मैदानावरील कूल attitude, हजरजबाबी पणा, खेळाडूंची पारख, स्टंपच्या पाठीमागची चपळाई इत्यादी गोष्टी प्रशंसनीय आहेतच त्याचबरोबर धोनीचा मैदानाबाहेरचा साधेपणा, देशप्रेम या गोष्टी मनाला भावतात. या सर्व गुणांमुळे तो सर्व भारतीयांच्या गळ्यातला ताईत बनला आहे..
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....!!
प्रतिक्रिया
7 Jul 2022 - 11:12 pm | श्रीगुरुजी
छान लिहिलंय. धोनी हा भारताचा सर्वकालीन सर्वोत्तम यष्टीरक्षक व कर्णधार आहे.
8 Jul 2022 - 12:14 pm | भागो
भारताचाच नव्हे तर जगतिल सर्वकालीन सर्वोत्तम यष्टीरक्षक!