पावसाकडे बघून आलेले हे विचार.. शेवटी आपण सर्व अनुभव मनानेच जगतो.
हा मनातला पाऊस कितीतरी वेगवेगळ्या रुपांत जाणवतो. रुपं अनेक आहेत, त्यातली काही मांडण्याचा एक प्रयत्न. :-)
रखरखत्या रेताड धरेचा येतो वर्षाकाळ..
मुरमाड मनाच्या मशागतीला मायेचा फाळ..
तो रुततो, खुपतो, नांगरट धरतो, आनंदे वर्षतो..
तो पाऊस निराळा असतो..
मनामनांतील भाव-धारणा जेणे अंगारती..
स्वराज्य विचारे उभ्या ठाकती, लक्ष-लक्ष ज्योती..
राष्ट्रभावना जागृत धरतो, मनगटांत वळतो..
तो पाऊस निराळा असतो..
राष्ट्र उभारावया प्रकटते पुरुषार्थाला साद..
कोटी-कोटी आहुती, गर्जती, प्रणवाचा नाद..
तो त्याग वर्षतो, सिंचतो, घडवतो.. राष्ट्र उद्धारतो..
तो पाऊस निराळा असतो..
----
उरातले ते शर काटेरी.. मुरवते जे पाणी,
त्या पाण्याची कावड निर्मळ, प्रेमार्द्राची वाणी..
मायेच्या अभ्रातून झरतो, रुजतो, ओथंबतो!
तो पाऊस निराळा असतो..
राघव
प्रतिक्रिया
2 Jul 2022 - 11:56 pm | गणेशा
तो पाऊस निराळा असतो..
छान..
------
3 Jul 2022 - 6:37 am | Bhakti
_/\_
6 Jul 2022 - 2:46 pm | राघव
धन्यवाद गणेशा आणि भक्तीतै. :-)
6 Jul 2022 - 3:32 pm | ज्ञानोबाचे पैजार
छान कविता आवडली,
पाउस म्हटले की आठवे एक माणूस,
भिजत भिजत पाडला ज्याने वक्तृत्वाचा पाउस
ज्यास उभा महाराष्ट आठवतो
तो पाउस निराळा असतो
पाउस म्हटले की एक पुतणे आठवती
कोरडी धरणे टाहो फोडूनी रडती
ती भरण्याची जो एक युक्ती सांगतो
तो पाउस निराळा असतो
पैजारबुवा,
6 Jul 2022 - 4:56 pm | विवेकपटाईत
या वर्षीचा पाऊस काही निराळाच होता
आसामच्या डोंगर दर्यातून
मुंबईत कोसळला होता.
मर्सडीज पाण्यात बुडाली
रिक्शा तरंगत होता.
6 Jul 2022 - 8:19 pm | राघव
भारीये पैजारबुवा, विवेकशेठ! :-)
7 Jul 2022 - 7:17 am | अत्रुप्त आत्मा
वाह व्वा !
7 Jul 2022 - 5:38 pm | कर्नलतपस्वी
आवडली कवीता.
गुदस्ता कमी पडला
तवा टिपं गळली
औंदा जास्त पडला
तवा पिकं जळली
तुला कळत कसं नाही
किती पाऊस पाडावा
खळं भरून जाऊन
बळीराजा घडावा
प्रत्येकाचा पाऊस निराळा