विज्ञान, तंत्रज्ञान आणि उद्योजकता यात अग्रेसर असलेले राष्ट्र म्हणून जपानला आपण ओळखतो. प्रचंड मेहनत, वक्तशीरपणा आणि काटेकोर शिस्त हे तिथल्या नागरिकांचे गुण कौतुकास्पद आहेत. दुसऱ्या बाजूस तिथल्या औद्योगिक क्षेत्रात कमालीची स्पर्धा आणि त्यातून निर्माण झालेले ताणतणाव हेही प्रचंड आहेत. त्यातूनच निरनिराळ्या मानसिक समस्यांचे प्रमाण तिथे खूप आहे. या लेखात अशाच एका मानसिक समस्येचा आढावा घेत आहे.
1970 ते 80 च्या दशकात जपानमधील पौगंडावस्थेतील मुले आणि तरुण यांच्यात एका मनोवृत्तीची लागण होऊ लागली. ही मुले शाळा-कॉलेजला विनाकारण वारंवार दांड्या मारू लागली आणि स्वतःला घरातच कोंडून घेऊ लागली. हळूहळू याचे प्रमाण वाढू लागले. 1990 च्या दशकापर्यंत या प्रकारच्या मनोवृत्तीची खूप माणसे दिसू लागली. समाजापासून स्वतःला तोडून घेऊन एकाकीपणे जगण्याचे प्रकार देशभर जाणवू लागले. अशा तरुणांना एकाकीपणात सुरुवातीस टेलिव्हिजन आणि नंतर आंतरजालाची सोबत मिळाली. आंतरजालावरील विविध मनोरंजक खेळ तासन्तास खेळत घरात बसणे हा या तरुणांचा उद्योग झाला. असे हे एकाकीपण काही महिन्यांपर्यंत देखील टिकू लागले. जेव्हा या प्रश्नाचा बराच बोलबाला झाला तेव्हा जागतिक आरोग्य संघटना यात उतरली. 2002-06 च्या दरम्यान या संघटनेने जपानमध्ये १५-४९ या वयोगटाचे एक मोठे सर्वेक्षण केले. त्यातून असा निष्कर्ष निघाला, की या गटाच्या लोकसंख्येपैकी सुमारे 1.2% लोकांना या मानसिक समस्येने ग्रासलेले आहे. मग या समस्येला Hikikomori असे जपानी नाव दिले गेले. त्याचा अर्थ, जनसंपर्क तोडून टाकून स्वतःला घरात कोंडून घेणे असा आहे.
आतापर्यंत असे वाटत होते की जपानच्या एकंदरीत सांस्कृतिक व सामाजिक परिस्थितीतून निर्माण झालेली ही समस्या आहे. परंतु त्या पुढील काळात ही समस्या जगातील अन्य देशांतही आढळू लागली. या संदर्भात बरीच चर्चा झाल्यानंतर 2010 मध्ये ऑक्सफर्ड इंग्लिश शब्दकोशाने hikikomori या शब्दाचा नव्याने समावेश केला आणि त्याची रीतसर व्याख्या दिली. ती देताना सुरवातीच्या कंसात ‘जपान संदर्भात’ असा उल्लेख केलाय.
आता वैद्यकीय दृष्टिकोनातून Hikikomori कडे पाहू. या विवेचनात तिचे हिमो असे लघुरूप वापरतो. या अवस्थेची व्याख्या करण्यासाठी खालील निकष असतात :
१. एखाद्या व्यक्तीने जनसंपर्क तोडून स्वतःला किमान सहा महिने घरात कोंडून घेणे. काही वेळेस हे लोक अत्यावश्यक कामापुरते थोड्या वेळासाठी बाहेर पडतात परंतु फारसा जनसंपर्क होणार नाही याची काळजी घेतात (उदा. रात्री दुकान बंद व्हायच्या वेळेस तिथे पटकन जाऊन येणे).
२. या अवस्थेची सुरुवात साधारणतः वयाच्या २५-३० दरम्यान होते.
३. या एकलकोंडेपणामुळे संबंधित व्यक्ती त्रासलेली दिसते आणि तिच्या दैनंदिन कार्यक्षमतेवर परिणाम झालेला असतो.
४. या अवस्थेचे स्पष्टीकरण प्रस्थापित मनोविकारांच्याद्वारे देता येत नाही.
(अलीकडे काही अभ्यासकांनी संबंधिताच्या ३ महिन्यांच्या एकटेपणाकडेही गांभीर्याने बघावे असे सुचवले आहे. या स्थितीला हिमो-पूर्व अवस्था असे म्हणता येईल).
हिमोला मनोविकार म्हणायचे की नाही यावर संशोधकांमध्ये बराच खल झालेला आहे. या संदर्भात जपानमध्ये मोठे सर्वेक्षण केले गेले. त्यातून असे आढळले की हिमो अवस्थेतील काहीजणांना मानसिक सहव्याधी असू शकतात. अशा व्याधींमध्ये छिन्नमनस्कता, अतिलहरीपणा, चिंताग्रस्तता आणि व्यक्तिमत्त्वाच्या आजारांचा समावेश आहे.
आता या अवस्थेची जपानमधील व्याप्ती कालानुक्रमे पाहू.
१. वर उल्लेख केल्याप्रमाणे 2002 ते 06 दरम्यान 15 ते 49 या वयोगटाचे जे सर्वेक्षण झाले त्यात 1.2 टक्के लोक हिमोग्रस्त होते.
२. 2016 मध्ये वरील वयोगट 15 ते 39 असा मर्यादित करून सर्वेक्षण झाले. त्यानुसार हिमोंची संख्या 5.4 लाख होती. त्यामध्ये पुरुष व स्त्री यांचे प्रमाण ३:१ असे होते.
३. पुढे असे लक्षात आले की ग्रासलेल्या लोकांत ही अवस्था अनेक वर्षांपर्यंत टिकत आहे. त्यामुळे हळूहळू देशात वाढत्या वयाची हिमो मंडळी अधिक प्रमाणात दिसू लागली.
४. 2019 मध्ये 40 ते 65 या वयोगटांमध्ये 6.1 लाख लोक हिमोग्रस्त होते.
५. आजच्या घडीला सर्व वयोगट मिळून अंदाजे 10 लाख लोक या समस्येने ग्रासलेले आहेत. त्यापैकी काहीजण तर तब्बल २० वर्षे एकाकीपणे जगलेले आहेत.
जागतिक व्याप्ती
जपानमध्ये हिमोचा बराच अभ्यास झाल्यानंतर इतर देशांमध्ये या संबंधात निरीक्षण व अभ्यास चालू झाले. सन 2000 मध्ये व ओमान व स्पेनमध्ये अशा प्रकारची माणसे बऱ्यापैकी दिसू लागली. 2010 मध्ये भारत व अमेरिकेसह ९ देशांमध्ये यासंदर्भात एक सर्वेक्षण केले गेले. अर्थात ही सर्वेक्षणे लहान स्वरूपाची होती. हिमो किंवा हिमोसारखी अवस्था असणाऱ्या व्यक्ती आता अनेक देशांमध्ये आढळून आलेल्या आहेत. त्यामुळे हिमो, मानसिक स्वास्थ्य आणि मनोविकार या सगळ्यांची सांगड घालण्याचा प्रयत्न चालू आहे.
कारणमीमांसा
या संदर्भात हिमो आणि जपानी समाजजीवन यांचा बराच अभ्यास झालेला आहे. त्या संस्कृतीतील काही वैशिष्ट्ये आणि त्यांचा हिमोशी संबंध असा असावा:
१. जन-लाज : जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या प्रसंगाने लज्जित किंवा ओशाळी होते तेव्हा त्यावरील प्रतिक्रिया म्हणून ती स्वतःला काही काळ लोकांपासून दूर ठेवते. हा जपानी परंपरेतील एक सद्गुण मानला जातो. याची पाळेमुळे एका देवतेने स्वतःला अज्ञातवासात बंदिस्त केले होते, या पौराणिक घटनेशी जाऊन पोचतात. या धारणेतून हिमो प्रकार आला असावा असे दिसते. तसेच अशा एकलकोंडेपणामुळे आत्महत्यांचे प्रमाणही वाढते आहे असे काही अभ्यासकांना वाटते.
२. अति परावलंबित्व : जपानी संस्कृतीत शालेय वयातील मुले पालकांवर जरा जास्तच अवलंबून असल्याचे दिसते. आपण काहीही चुकीचे केले तरी शेवटी आपले पालक आपल्याला क्षमा करतील अशी धारणा त्यामागे आहे. पुढे प्रौढ झाल्यानंतर सुद्धा हे अवलंबित्व बरेच टिकून राहते. जेव्हा एखाद्या मुलाच्या आयुष्यात ताणतणावाचा प्रसंग येतो त्यातून त्याची ही मूळ प्रवृत्ती जागृत होते. आपण बराच काळ घरीच बसून राहिलो तरीही आपले आई-वडील आपल्याला गोंजारतील अशी भावना त्यामागे असते. किंबहुना पालकांकडूनही मुलांच्या या प्रवृत्तीला खतपाणी घातले जाते. पालकांच्या या ‘सुरक्षा कवचासाठी’ मुलांची हिमोकडे झुकण्याची प्रवृत्ती होते. तसेच औद्योगीकरणानंतर आलेल्या उच्च मध्यमवर्गीयांच्या सुबत्तेने या प्रकाराला खतपाणी घातले गेले.
जेव्हा हिमोग्रस्त तरुण पन्नाशीत पोचतात तेव्हा त्यांचे पालक ऐंशीच्या घरात असतात. या अवस्थेतही मुलांचे पालकांवरील अवलंबित्व संपलेले नसते. या विचित्र अवस्थेला “जपानची ८०-५० ची समस्या” असे म्हटले गेले आहे.
३. सामाजिक परिस्थिती : हिमोला एक प्रकारचे ‘आधुनिक काळातील नैराश्य’ मानले जाते. या प्रकारात एखादा माणूस जेव्हा एखाद्या प्रसंगाने खूप दुखावला जातो, तेव्हा तो त्याचा मुकाबला करण्याऐवजी स्वतःला बंद करून घेणे अधिक पसंत करतो. तसे केल्याने त्याची मानसिक अवस्था तात्पुरती सुधारते असे दिसते. परंतु हीच अवस्था जर दीर्घकालीन होत राहिली तर त्याचे हिमोत रूपांतर होते. 1990 नंतर एकंदरीत तरुणाईचे निरीक्षण करता काही मुद्दे स्पष्ट दिसतात. या तरुणांमध्ये आत्मकेंद्रितता, आत्मरती आणि हळवेपणा हे गुण प्रकर्षाने वाढताना दिसतात. प्रतिकूल परिस्थितीशी टक्कर देण्याची क्षमता कमी पडताना दिसते.
४. जागतिकीकरण व मानसिक पर्यावरण : “खाउजा” या आंतरराष्ट्रीय धोरणाचा मानसिकतेवर दीर्घकालीन परिणाम झालेला दिसतो. आंतरजालाचा वाढता वापर, प्रत्यक्ष भेटीपेक्षा सतत अप्रत्यक्ष संवादावर भर यातून तरुणांच्या व्यक्तिमत्त्वात काही मूलभूत बदल होत गेले. पौगंडावस्थेतील मुले मैदानावर खेळण्यापेक्षा आंतरजालावरचे खेळ अधिक खेळू लागली. त्यातून एकलकोंडेपणा वाढीस लागला. विविध आंतरजालीय माध्यमातून होणाऱ्या संवादातून क्षणिक करमणूक जरी होत असली, तरी त्यातून भक्कम मानसिक आधार वाटावा अशी नाती काही निर्माण होऊ शकली नाहीत.
५. कमालीचे स्पर्धात्मक वातावरण : या प्रकाराला अगदी प्राथमिक शालेय जीवनापासूनच सुरुवात होते. उत्तम शाळेत प्रवेश मिळणे आणि सतत गुणवत्ता यादीत राहण्यासाठी पालकांचा कायम दबाव असतो. पुढे मोठेपणी औद्योगिक क्षेत्रातील जीवघेण्या स्पर्धेमुळे मनावर सतत एक प्रकारचा ताण असतो. काही अभ्यासकांनी या प्रकारच्या शैक्षणिक वातावरणाला प्रेशर कुकरची उपमा दिलेली आहे ! मनाजोगते यश न मिळाल्यास त्याचा परिणाम प्रेशर कुकरच्या शिट्टी प्रमाणे होतो आणि मग मनात कोंडलेली वाफ भसकन बाहेर पडते. त्यातून हिमो सारख्या समस्या उद्भवतात. हिमो बाधितांमध्ये मध्यम व उच्च मध्यम वर्गातील पुरुषांचे प्रमाण जास्त असून बर्याचदा भावंडांपैकी सर्वात मोठा मुलगा या समस्येने ग्रासलेला असतो.
६. जैवरासायनिक बदल : वरील सर्व कारणांचा परिणाम म्हणून मेंदूपेशींमध्ये काही रासायनिक बदल होत असावेत असे एक गृहीतक आहे. पेशींमधील एंटीऑक्सीडेंट घटकांचे (उदा. यूरिक ॲसिड) प्रमाण कमी होते. त्यातून त्यांचा दाह होतो. परिणामी विशिष्ट पेशींचे उद्दीपन होते. तसेच पेशींतील काही अमिनो आम्ले, मेदाम्ले आणि एन्झाइम्सच्या पातळीचा हिमोशी संबंध असण्याची शक्यता आहे. अर्थात हा विषय गहन असून त्यावर दीर्घकालीन संशोधनाची गरज आहे.
७. हिमोसदृश अवस्था : काही शारीरिक आजारांमध्ये संबंधिताची घरीच राहण्याची प्रवृत्ती निर्माण होते. उदाहरणार्थ:
a. हालता किंवा चालता न येणारा आजार
b. चेहरा किंवा शरीराच्या दर्शनी भागावर मोठ्या प्रमाणात पुरळ येणे किंवा नकोसा त्वचाविकार असणे
c. वारंवार शौचास जावे लागणारे पचनसंस्थेचे आजार.
वरील प्रकारचे आजार जर दीर्घकालीन होत राहिले तर त्यातून संबंधिताच्या मनोवस्थेवरही परिणाम होतो. त्यातून जनसंपर्क नकोसा वाटतो.
(कोविड महासाथीच्या पहिल्या वर्षी कित्येक सहव्याधीग्रस्त ज्येष्ठांची, आजाराच्या भीतीने अजिबात घराबाहेर न पडण्याची प्रवृत्ती झाली होती. टाळेबंदी उठवल्यानंतर सुद्धा ती टिकून होती. त्याला ‘हिमो-सदृश’ अवस्था म्हणता येईल).
अवस्थेची लक्षणे आणि टप्पे
समजा, एखादी हिमो अवस्थेतील व्यक्ती कुटुंबात राहत आहे. या हिमोच्या तीव्रतेनुसार तिचे तीन टप्पे असतात :
१. यामध्ये ती व्यक्ती आठवड्यातून २-३ दिवस घराबाहेर पडून बाहेरच्यांची किरकोळ संवाद साधते.
२. घरातून जवळजवळ बाहेर पडणे नसते किंवा फारतर आठवड्यातून एखादा दिवस. पण घरातल्या व्यक्तींशी किरकोळ संवाद होत राहतो ( हो/नाही स्वरूपाचा)
३. घरात असून देखील स्वतःच्या खोलीतच जवळजवळ कोंडून घेतल्यासारखे राहणे. हळूहळू कुटुंबियांशीही संवाद होत नाही.
एकटे राहणाऱ्यांच्या बाबतीत त्यांच्या घराबाहेर पडण्यावरूनच हिमो-तीव्रता ओळखावी लागते.
उपचार
हिमो-बाधित लोकांवर उपचार करणे आव्हानात्मक असते. किंबहुना त्या अवस्थेत काही वर्षे गेलेल्या अशा लोकांशी संवाद साधणे हेही सोपे नसते. या संदर्भात जपानमध्ये स्वतंत्र हिमो उपचार आणि मार्गदर्शन केंद्रे स्थापन केली आहेत. त्यांच्यामार्फत केल्या जाणाऱ्या उपक्रमांचे स्वरूप साधारणपणे असे असते :
1. कौटुंबिक आधार
2. व्यक्तिगत उपचार
3. सामूहिक उपचार आणि
4. बाधिताला समाजात सामावून घेणे.
कौटुंबिक आधार
बाधित व्यक्ती स्वतःहून उपचारांचे नाव काढत नाही. तसेच स्वतःच्या पालकांशी देखील तिचा विसंवाद होतो. समुपदेशन करण्यासाठी हा सर्वात मोठा अडथळा असतो. पालकांच्याही मनात अनेक पूर्वग्रह असतात. “आपण आपल्या पाल्यावर उपचार चालू केले असता शेजारपाजारचे काय म्हणतील?” असे विचार त्यांना उपचारकांपासून परावृत्त करतात.
ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन मानसिक कल्याण केंद्रांनी पालकांसाठी अभ्यासवर्गांची योजना केलेली आहे. यामध्ये पालकांना आपल्या पाल्यावर मानसिक प्रथमोपचार देण्यास सक्षम केले जाते. पालकांच्या या प्रशिक्षणात त्यांना खालील मुद्द्यांबाबत तयार केले जाते:
· पाल्याचे समंजसपणे ऐकून घेणे
· त्यावर कुठलेही मत व्यक्त न करता मदतीचा हात देणे
· या समस्येबाबत शास्त्रीय माहिती समजावून सांगणे आणि समुपदेशकांचा सल्ला घेण्याबाबत बाधिताचे परिवर्तन करणे
याच्या जोडीला त्यांच्यासाठी काही प्रात्यक्षिक वर्गही घेतले जातात. त्यामध्ये हिमोच्या भूमिकेतील एखादी निरोगी व्यक्ती आणि समुपदेशक यांचा प्रत्यक्ष संवाद ऐकवला जातो. अशा सक्रीय सहभागातून पालकांचा आत्मविश्वास वाढतो.
व्यक्तिगत उपचार
हिमो बाधित व्यक्ती बऱ्याचदा स्वतःहून उपचारांसाठी घराबाहेर जायला तयार नसते. अशा वेळेस मनोसमुपदेशक, नर्स, डॉक्टर किंवा सामाजिक कार्यकर्त्यांपैकी कोणी ना कोणी अशा व्यक्तीच्या घरी जाऊन भेटणे उपयुक्त ठरते. या निमित्ताने बाधिताशी संवाद वाढल्यानंतर गरजेनुसार त्याला समुपदेशकाकडे बोलावले जाते. त्यांच्या तपासणीदरम्यान बाधिताला कुठला प्रस्थापित मनोविकार आहे की नाही याची खात्री केली जाते. उपचारांचा प्राथमिक भाग म्हणून काही शारीरिक व्यायामप्रकार करण्यास सांगितले जाते.
उपचारांच्या आधुनिक पद्धतीमध्ये पाळीव प्राणी किंवा या प्राण्यांसारखे दिसणारे रोबो यांचाही वापर केला जातो. सुरुवातीस बाधित व्यक्ती दुसऱ्या माणसाशी संवाद साधण्यास फारशी उत्सुक नसते. अशा वेळेस या कृत्रिम साधनांच्या मदतीने तिचा एकटेपणा कमी करता येतो. तसेच एकटे राहणाऱ्या बाधितासाठीही हे उपचार फायदेशीर ठरतात. अलीकडे काही ऑनलाइन खेळांचे उपचार-प्रयोग झालेले आहेत. अशा विविध पद्धती वापरून संबंधिताचे मानसिक समुपदेशन केले जाते. गरजेनुसार मानसोपचार तज्ञांचा सल्ला घेऊन योग्य ते औषधोपचार करता येतात.
मानसिक अस्वस्थता आणि मनोविकार यांच्या सीमारेषेवर असलेली हिमो ही एक मोठी समस्या. जपानमधील त्याच्या व्यापकतेमुळे ती जगासमोर आली. एकंदरीत जगभरातील बदलत्या कौटुंबिक-सामाजिक परिस्थितीतून एकटेपणाच्या विविध समस्या सर्वत्र उद्भवताना दिसतात. समुपदेशन आणि अन्य पूरक साधनांच्या मदतीने त्यांचा प्रतिबंध आणि उपचार करणे महत्वाचे आहे.
………………………………………………………………………………………………………………
प्रतिक्रिया
21 Jun 2022 - 9:19 am | गवि
जगात कुठे कुठे काय काय समस्या असतील त्याचा थांग लागणे कठीण.
एक सहज निरिक्षण, जे चुकीचंही असू शकेल,.. की एखाद्या देशात अधिकाधिक संपन्नता, समृद्धी आली (saturation point) की यासदृश मानसिक समस्या जास्त आढळताना दिसतात. संशयग्रस्तता, अंदाधुंद फ़ायरिंग, एकलकोंडेपणा, अघोरी पंथ वगैरे. अर्थात यासाठी वस्तुनिष्ठ विदा नाही.
अर्थात आर्थिक विपन्नावस्था आणि मागासपणा याने इतर काही वेगळ्या समस्या (अभावग्रस्ततेतून उद्भवणार्या) येतातच म्हणा.
21 Jun 2022 - 9:40 am | कुमार१
अगदी बरोबर.
संपन्नावस्था आणि विपन्नावस्था या दोन्ही स्थिती वेगवेगळ्या शारीरिक आणि मानसिक समस्यांना जन्म देतात.
किंबहुना हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे.
21 Jun 2022 - 1:47 pm | तुषार काळभोर
संपन्नावस्था आणि विपन्नावस्था या दोन्ही स्थिती वेगवेगळ्या शारीरिक आणि मानसिक समस्यांना जन्म देतात.
>> सहमत!
21 Jun 2022 - 2:17 pm | कुमार१
११^११
या चिन्हाचा अर्थ अकरा गुणिले अकरा वेळा असा असतो का ? बरेच दिवस कुतूहल आहे मनात.
21 Jun 2022 - 6:15 pm | तुषार काळभोर
अकराचा अकरावा घात
21 Jun 2022 - 10:06 am | जेम्स वांड
एक दंडवत तुमच्या चिकित्सक वृत्तीला, नीट अभ्यास करून एखाद्या विषयाला हात घालण्याचा तुमचा गुण वाखाणण्याजोगा आहेच, त्याशिवाय विषय वैविध्य पण भरपूर, माझ्या बघण्यात तरी अजून हिमो केस आलेली नाही आप्त मित्रांत माझ्या पण ह्यापुढे नक्की लक्षात ठेवेन ही बाब अन विषय.
21 Jun 2022 - 12:24 pm | नचिकेत जवखेडकर
छान विश्लेषण!
आमच्या अभ्यासक्रमात जपानमधल्या काही प्रसिद्ध व्यक्तींची मुलाखत घ्यायची संधी मिळाली.आमच्या गटाला ज्यांची मुलाखत घ्यायची संधी मिळाली ते स्वतः या समस्येमधून गेले आहेत. त्यांनी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या अगदी हिकीकोमोरीबद्दल पण. साधारणपणे असे लोक बरेच अहंकारी होतात की मी कशाला कोणाची मदत घेऊ(बऱ्याच संस्था आहेत की ज्या अशा लोकांना मदत करतात. अगदी ८०-५० च्या समस्येबद्दल पण बस मध्ये वगैरे जाहिराती दिसतात) पण यांच्या वडिलांनी व्यवस्थित समजून घेतली त्यांची अवस्था आणि त्यांना हिमोमधून बाहेर पडण्यास मदत केली. आज ते अत्यंत यशस्वी उद्योजक आहेत.
21 Jun 2022 - 12:26 pm | राजेंद्र मेहेंदळे
नेहमी विविध वैद्यकीय विषयांना हात घालुन त्यांचा सर्वांगाने परामर्श घेण्यात तुमचा एक नंबर आहे मिपावर. आज एका नवीनच समस्येची ओळख झाली. हे काहीतरी जपान्,अमेरिकेतील फॅड आहे असे मात्र म्हणता येत नाही. भारतातही , किंबहुना जगभरच करोनामुळे आणि ऑनलाईन शाळा/कॉलेज/ऑफिस मुळे सर्वसामान्य माणसे सुद्धा हिमोग्रस्त होउ लागली आहेत की काय असा संशय येण्यासारखी परिस्थिती आहे. आणि ती समजुन घेणे इतके सोपे नाही,मग उपचार तर दुरच राहिले. सम्पन्नावस्था किवा विपन्नावस्थेशी याचा थेट संबंधही नसावा. तुम्ही जी ईतर कारणे दिली आहेत ती सुद्धा विचार करण्यासारखी आहेत.
सुदैवाने आता जनजीवन पुर्वपदावर येउ लागले आहे त्यामुळे अशा केसेसचे प्रमाण कमी होईल अशी आशा करतो. एका नवीन विषयाशी तोंड ओळख करुन दिल्याबद्दल आभार.
21 Jun 2022 - 12:44 pm | कुमार१
आपुलकीने प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार !
…
१.
>>>
माझ्याही नाही. परंतु कोवीड काळात माझ्या संकुलातील एक स्त्री तब्बल पाच महिने घरात बंदिस्त होती. त्यांना मधुमेह आणि हृदयविकार या सहव्याधी असल्याने त्यांनी खूप धसका घेतला होता.
…
२.
>>>>
अगदी बरोबर. त्यामुळे त्यांना गर्तेतून बाहेर काढणे हे खरोखरच आव्हान असते.
21 Jun 2022 - 12:49 pm | कुमार१
>>>
सहमत आहे. एकटेपणाच्या समस्या बऱ्यापैकी जागतिक झालेल्या आहेत. हळूहळू जशी या संबंधातील सर्वेक्षणे वाढतील तसा अधिक प्रकाश पडेल.
म्हणूनच मला लेखनासाठी हा वेगळा विषय लिखाणासाठी निवडावा वाटला.
21 Jun 2022 - 3:44 pm | साहना
अश्या विषयांना गांभीर्याने घेण्याच्या आधी एकदा ह्या मानस-शास्त्रज्ञाचे विचार वाचावेत. https://en.wikipedia.org/wiki/Thomas_Szasz#%22Myth_of_mental_illness%22
हिकीकोमोरी ह्याला मानसिक रोग मानणे कदाचित पूर्णता चुकीचे आणि जपानचे पाश्चात्यी करण असू शकते (आहेच असे मी म्हणत नाही फक्त दुसरी बाजू पाहावी). पाश्चात्य देशांत हल्ली प्रत्येक गोष्टीला मानसिक रोग म्हणण्याची सवय जडली आहे. प्रत्येक गोष्टीला काही तरी फोबिया, ADHD आणि इतर असंख्य नावे देण्याची पद्धत आली आहे. हिकीकोमोरी सुद्धा त्याचाच एक प्रकार असू शकतो.
थॉमस जॅझ ह्यांच्या मते मानसिक रोग आणि त्यांच्या व्याख्या ह्या विविध सरकारांनी लोकांना ठराविक पद्धतीने वागायला भाग पाडण्यासाठी निर्माण केल्या. ज्या पद्धतीने सावळ्या रंगाचे लोक विनाकारण फेर अँड लवली वर पैसे खर्च करतात त्याच प्रमाणे काही लोकांना आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने वाजवण्यासाठी काही शक्तिशाली संघटनांनी विविध गोष्टींना मानसिक रोगाचे नाव दिले. विविध देशांत सध्या "climate change denier" मंडळींना वेडे ठरविण्याची मोहीम सुरु आहे.
काही दशके आधी अमेरिकेत टीन्स खूप सेक्स आणि दारूबाजी करतात म्हणून तथाकथित तज्ञ् मंडळी चिंता व्यक्त करायची. सध्या अमेरिकेत ह्या दोन्ही गोष्टींचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे आणि टिन आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे आता कदाचित मागचा गोंधळ बरा होता असे लोक म्हणून लागले आहेत.
21 Jun 2022 - 3:49 pm | कुमार१
अद्याप हिमोला मानसिक रोग असे म्हटलेले नाही.
लेखात म्हटल्याप्रमाणे तो सीमारेषेवरील प्रश्न आहे.
अशा व्यक्तीमध्ये दबलेला मानसिक रोग किंवा त्याची पूर्वावस्था आहे का हे तज्ञ मंडळी पाहतात.
या विषयावर भरपूर मतांतरे असणे स्वाभाविक आहे.
21 Jun 2022 - 8:10 pm | तर्कवादी
बरोबर आहे. सामान्य नियमाला अपवाद बनणे (व्हेरिएशन वा देव्हिएशन) हा नेहमीच रोग नसतो.
माणूस हा समाजशील प्राणी आहे - हा झाला नियम. पण या नियमाला कुणी अपवाद होत असेल (काही काळ / दीर्घकाळ) तरी त्याला रोग म्हणायचे की डेव्हिएशन वा व्हेरिएशन हा प्रश्नच आहे.
फक्त एक समजले नाही हिमो अवस्थेत हे लोक पोटापाण्याचा उद्द्योग कसा करतात ? बाकी इतर शारिरिक परिणाम काय असतात का ? जसे भूक कमी लागणे, न जेवणे, लैंगिक आयुष्य ई.
21 Jun 2022 - 8:20 pm | कर्नलतपस्वी
मला वाटते,
समाजातील संवाद कमी होणे या परीस्थीतीला कारणीभूत आहे का!
कदाचित परस्पर संवादांमुळे मन मोकळे झाल्याने मानसिक स्वास्थ्य निट रहाण्यास मदत मिळेल व आशा लोकांची संख्या कमी होईल. नाहीतरी समुपदेशन एक महत्वाची उपचार पद्धती आहेच ना.
आपले लेख काहीतरी नविन शिकवून जातात.
21 Jun 2022 - 8:28 pm | कुमार१
१. हे लोक पोटापाण्याचा उद्द्योग कसा करतात
>>> लेखातील हे पाहा:
"अति परावलंबित्व....जपानची ८०-५० ची समस्या” असे म्हटले गेले आहे".
म्हणूनच असे प्रकार उच्चमध्यम वर्गामध्ये दिसतात. गरिबीत असल्या अवस्था परवडत नाहीत !
...
२. समाजातील संवाद कमी होणे या
>>>
हा मुद्दा महत्वाचा आहेच.
22 Jun 2022 - 12:58 pm | श्वेता व्यास
नवीन माहिती समजली, अर्थात आपल्याकडेही पाल्याचा एकलकोंडेपणा वाढलेला पालकांच्या लक्षात येतो आणि ते चिंताग्रस्तही होतात.
पण जपानमधील परिस्थिती नव्याने समजली, धन्यवाद.
18 Dec 2022 - 9:45 am | कुमार१
जपान संस्कृती आणि त्यांची घटत जाणारी लोकसंख्या यावर प्रकाश टाकणारा एक चांगला लेख :
जपान खरंच संपून जाईल?
27 Mar 2023 - 3:28 pm | कुमार१
Hikikomori ने ग्रस्त असलेल्या विद्यार्थ्यांना शाळेकडे वळवण्याचा एक अभिनव मार्ग जपानमध्ये काढला आहे. त्यांनी esports या प्रकारच्या नव्या शाळांची निर्मिती केली आहे.
या शाळांमध्ये नेहमीच्या शिक्षणाच्या जोडीने व्हिडिओ गेम्सचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाते. यातून पुढे व्यावसायिक व्हिडिओ गेम्स निर्माते व्हावेत अशी संकल्पना आहे.
पूर्वी Hikikomori मुळे पारंपरिक शाळा बंद केलेले विद्यार्थी गेम्सच्या आकर्षणामुळे या नव्या शाळांकडे येत आहेत.
27 Mar 2023 - 3:28 pm | कुमार१
Hikikomori ने ग्रस्त असलेल्या विद्यार्थ्यांना शाळेकडे वळवण्याचा एक अभिनव मार्ग जपानमध्ये काढला आहे. त्यांनी esports या प्रकारच्या नव्या शाळांची निर्मिती केली आहे.
या शाळांमध्ये नेहमीच्या शिक्षणाच्या जोडीने व्हिडिओ गेम्सचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाते. यातून पुढे व्यावसायिक व्हिडिओ गेम्स निर्माते व्हावेत अशी संकल्पना आहे.
पूर्वी Hikikomori मुळे पारंपरिक शाळा बंद केलेले विद्यार्थी गेम्सच्या आकर्षणामुळे या नव्या शाळांकडे येत आहेत.