आदिमाय

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जनातलं, मनातलं
20 Feb 2022 - 9:46 pm

माझ्या पुस्तकांच्या कपाटात
मूळाक्षरांशी ओळख झाल्यापासून कुणीकुणी घेऊन दिलेली,
मग असोशीने विकत घेतलेली,
देहभान विसरून वाचलेली,
पुन्हापुन्हा पारायणं केलेली,
बहुतांश मुखोद्गत झालेली,
वाचून मिटल्याला युगं उलटून गेलेली
हारीने मांडलेली
जिवापाड जपलेली
पुस्तकं

आजकाल बघतोय एकेक गायब होतंय
अन् कपाटात त्यांच्याजागी...
दुसरंच काहीतरी प्रगटतंय
कथा-कविता-कादंबर्‍यांच्या जागी
भयाण पोकळी
चरित्रग्रंथांजागी मुखवटे
वैचारिक ग्रंथराजांच्या खणात गुंतवळी
विज्ञानग्रंथांच्या जागी बूमरँगची धारदार पाती
इतिहासाच्या जागी काटेरी कुंपणतारांची भेंडोळी

आज तरीही नेटानं कपाटापाशी गेलो
थबकलो
भांबावलो
ऐकून पानांची फडफड
नव्या पुस्तकपानांचा भारून टाकणारा गंध श्वासात भरून घेतानाच दिसली
कपाटात शाबूत
फक्त...
...अमरतेचा शाप मिरवणारी,
जड-चेतन-सूक्ष्म-विराट सगळ्याला
आपल्या कवेत घेऊन
निर्लेप नि:संग निरागस उरणारी,
सार्‍या सार्‍या अ-क्षर अभिव्यक्तीची आदिमाय..
...अंकलिपी

मुक्तक

प्रतिक्रिया

श्रीगणेशा's picture

21 Feb 2022 - 1:18 am | श्रीगणेशा

कथा-कविता-कादंबर्‍यांच्या जागी
भयाण पोकळी
चरित्रग्रंथांजागी मुखवटे
वैचारिक ग्रंथराजांच्या खणात गुंतवळी
विज्ञानग्रंथांच्या जागी बूमरँगची धारदार पाती
इतिहासाच्या जागी काटेरी कुंपणतारांची भेंडोळी

अर्थपूर्ण!
खंत अगदी अचूक शब्दात टिपली आहे _/\_

ज्ञानोबाचे पैजार's picture

21 Feb 2022 - 8:54 am | ज्ञानोबाचे पैजार

मस्त...आवडली

पैजारबुवा,

कर्नलतपस्वी's picture

21 Feb 2022 - 9:11 am | कर्नलतपस्वी

अजूनतरी पुस्तके बेघर नाही झाली पण नजर जरूर लागतेय.

कुमार१'s picture

21 Feb 2022 - 9:12 am | कुमार१

आवडली!

मुक्त विहारि's picture

21 Feb 2022 - 9:47 am | मुक्त विहारि

पण आता हळूहळू मराठी अंकलिपी जाऊन, इंग्रजी अंकलिपीच दिसायला लागली आहे ....

अनन्त्_यात्री's picture

27 Feb 2022 - 10:31 am | अनन्त्_यात्री

सर्वांना धन्यवाद.