ब्रेकअप

बिपीन सुरेश सांगळे's picture
बिपीन सुरेश सांगळे in जनातलं, मनातलं
14 Feb 2022 - 12:12 am

ब्रेकअप
----------------------------------------------------------------------------------------------------
वॅलेंटाईन डेला समर्पित ...
--------------------------------------------------------------------------------------------------

तरुण मुलीची आई म्हणजे जिवाला घोरच की !
अगदी नॉर्मल परिस्थितीत सुद्धा . म्हणजे मग इतर परिस्थितीत तर विचारच करायला नको. मीही त्याला अपवाद नव्हतेच.
पोरीचं ब्रेकअप झालंय अशी शंका मला होती...
-/-/-/
निशा कॉलेजमध्ये होती. त्यात तिचं कॉलेज नावाजलेलं . अन सांस्कृतिक कार्यक्रमांच्या बाबतीत पुढारलेलं . कॉलेजचे दिवस म्हणजे सोनेरी दिवस ! ते ती पुरेपूर एन्जॉय करत होती. मित्र-मैत्रिणी , सिनेमे , मॉल्स , पाटर्या, वेगवेगळे डेज आणि बरंच काही.
ती दिसायला चारचौघींसारखीच होती. सावळी, स्लिम. पण तरतरीत नाक आणि गोबऱ्या गालांची . खूप हसणारी. आकर्षून घेणारी.
सागरशी तिची खास दोस्ती होती. तो एक हँडसम पोरगा होता. रहायचा देखील टापटीप . हिरोसारखा . हवेतच असायचा तो. त्याचं कारण म्हणजे त्याला अभिनयाचं वेड होतं. आणि त्याचा अभिनयही उजवा होता.
एका वृत्तपत्राने हौशी एकांकिका स्पर्धा आयोजित केल्या होत्या. फेब्रुवारी अखेरीस . त्यात त्याच्या ग्रुपने भाग घेतला होता. प्रमुख भूमिका सागर करणार , हे तर ठरलेलंच होतं. निशाला नायिकेच्या भूमिकेसाठी त्याने विचारलं ; पण ती नाही म्हणाली . तिला तो आत्मविश्वास नव्हता. तिने कधी असं काम केलेलं नव्हतं .
त्यामुळे ती भूमिका रश्मिकाला मिळाली. ती खूपच सुंदर होती. त्या सौंदर्याच्या जोरावर भाव खात तिला ती भूमिका मिळाली. नाटकाचा सगळा ग्रुप तालमीच्या वेळी तिचं सौंदर्य बघायचा . तिचा अभिनय सुमार आहे , हे त्यांच्या डोक्यातच यायचं नाही. त्यात ती खुद्द दिग्दर्शकालाच आवडायची. म्हणजे प्रश्नच मिटला होता. इतर कलाकारांना छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सूचना देणारा तो, तिच्याबाबतीत गप्प बसायचा.
रश्मिका सागरच्या अभिनयावर भाळली अन तो तिच्या सौन्दर्यावर .
त्यांची जवळीक वाढली. निशाच्या ते लवकरच लक्षात आलं . ती गप्प गप्प राहू लागली. एकांकिकेच्या तालमीच्या वेळेस , नंतर कट्ट्यावर बसून चहा पिताना आणि ग्रुपबरोबर असताना प्रत्येक वेळेस.
एके दिवशी तालीम संपल्यावर ग्रूप चहा घेत होता.चहा झाल्यावर सागर आणि रश्मिका पुन्हा निघाले . कॉफी घेण्यासाठी . एकाने विचारलं ' आता पुन्हा कॉफी ?' त्यावर सागर म्हणाला , ' अरे , जरा भूमिकेची चर्चा करायची आहे.'
भूमिकेची चर्चा ? …
निशाला गोड चहानंतरसुद्धा तोंड कडवट झाल्यासारखं वाटलं . ती चहाची टपरी एका वडाच्या झाडाखाली होती . त्याची पानगळ सुरु होती . पिकली पिवळी पानं . अन तीच पानगळ निशाच्या मनात सुद्धा ...
ते गेले. पण निशाच्या काळजात कळ उठवूनच . तिला तर रडूच आलं. तिला सागरला खडसावायचं होतं . जाब विचारायचा होता. आणि बरंच काही बोलायचं होतं.
पण कसं विचारणार ना ? त्यांच्यात तसं काही होतं ?...
मग निशाला खोलवर जाणवलं . तो तिच्या अवतीभवती असे. पण तो असं कधी काही बोलला नव्हता. तिचं त्याच्यावर प्रेम होतं. तसंच तिच्या जे मनात आहे, ते प्रत्यक्षात देखील आहे असं तिला वाटत होतं. पण तीही असं स्पष्ट कधी काही बोलली नव्हतीच की .
सारंच अव्यक्त .
-/-/-
ती गप्प गप्प रहायला लागली. तिला मधूनच रडू फुटायला लागलं. मध्येच तिची नजर शून्यात जाऊ लागली. अभ्यासात लक्ष लागेना की रात्रीची झोप नीट लागेना.जेवण कमी झालं . ती कपडेही असेतसेच घालू लागली. नाहीतर ती कपडे अगदी चोखंदळपणे निवडायची. चेहरा ओढल्यासारखा वाटू लागला. आवडती विनोदी मालिका बघताना तिला क्वचितच हसू येऊ लागलं .
ती संध्याकाळी घरीच थांबू लागली.
मी एकदा विचारलं ,' काय होतंय ? बरं नाही का ? '
त्यावर ती ओरडली,' मला काय झालंय ? - काही नाही .'
पोरं प्रेमबिम करतात तेव्हा एकवेळ पटकन लक्षात येत नाही. पण त्यांचं बिनसलं की मात्र पटकन लक्षात येतं.
माझा जीव उगा खालीवर . काय करणार ही पोरगी आता ? मनात भलतेसलते विचार येऊ लागले. ही पोरगी नैराश्यात गेलीये . पण ते नैराश्य प्रचंड वाढलं तर ? ती त्यातून सावरलीच नाही तर ? तिने टोकाचा निर्णय घेतला तर ?.... प्रेमात पडलेल्या व्यक्ती काय चुकीचं पाऊल उचलतील , आयुष्याचं काय गणित बिघडवून ठेवतील , हे काही सांगता येणार नाही . डोक्यात उगा पेपरमधून येणाऱ्या , नकोशा वाटणाऱ्या बातम्या डोक्यात घोळायला लागल्या . पोरगी तर एकुलती एक .
एक मन म्हणायचं, आपले विचार चुकीचे आहेत . असं काही होणार नाही. पण आईचं मन ? त्याला मात्र हजार शंका. नंतर तर तिच्यासारखी माझी अवस्था झाली . सतत तिचा विचार अन तिच्यावर लक्ष ठेवणं. बरं कोणाला सांगावं , विचारावं म्हणलं तर मन धजेना.
आमच्यावेळी हे असलं काही नव्हतं . .
मी ह्यांना काही बोलले नव्हते.तर एकदा त्यांनी मलाच विचारलं , ' काय होतंय तुला ? बरं नाहीये का? '
त्यावर मी निशासारखीच ओरडले ,' मला काय झालंय ? काही नाही.'
-/-/-/
रथसप्तमी होऊन गेली. दिवसाचा उकाडा वाढला.
न राहवून शेवटी एकदा मी तिला जवळ घेतलंच. तशी ती हमसून हमसून रडू लागली. मी तिला रडू दिलं. भरपूर . तिचं रडं थांबेपर्यंत .
थोडी शांत झाल्यावर म्हणाली ,' बाबांना नको सांगूस हं . शपथ .'
मग तिने मला काय झालंय ते सगळं सांगितलं ,
पुढे म्हणाली,' तू एवढं ऐकून घेतलंस, समजावून घेतलंस ना आई, ते पुरेसं आहे. खूप बरं वाटलं .'
' अगं, बरं वाटलं तर मग विसर त्याला.'
' नाही , मी त्याला नाही विसरू शकत.'
' विसरावं लागेल बाळा.'
‘नाही आई, तो फक्त तोच आहे. त्याची जागा दुसरा कोणीच घेऊ शकत नाही . त्याला त्याची जाणीव नाही तर नाही. मी आयुष्यभर अशीच राहीन- एकटी ! मला कोणी नको ...’
अन येडाबाई काहीबाही बोलतच राहिली.
किचनमध्ये कुकरची शिट्टी अर्धवट वाजली. खराब झाली होती. वाफ जाण्यासाठी तिला वर उचलून धरावं लागायचं. मी तसं करून गॅस बंद करून आले.
‘अगं, पण ब्रेकअप म्हणण्यासाठी आधी तुमचं जमलेलं तर हवं ना ? तुमचं जमलं होतं का ? अन जमलं असेल नसेल... आयुष्य पुढे जातच रहातं. कितीतरी कडू गोड अनुभव असतात. पण ...'
' आई , तू असली फिलॉसॉफी झाडायला लागलीस ना, की जाणवतं , तुझं ना वय झालंय. सगळ्या कुठल्या कुठल्या गोष्टी सांगत बसतेस . ज्या आता बदलल्या आहेत !... अगं , मुळात जमानाच बदललाय .’
मग ती निघून गेली.
क्षणभर माझ्या डोळ्यात पाणी आलं . पन्नाशी जवळ आली, मी साधीच रहाते , मी एक सर्वसामान्य गृहिणी आहे म्हणून मी लगेच जुनी झाले ?...
पण क्षणभरच. नंतर जाणवलं,फक्त तेवढंच नाहीये.मी काहीकाही जुनं सांगत राहते, हे खरंय . पोरीच्या लेखी वय पुढे सरकलंय हे स्वतःशी मान्य करावंच लागेल. आता जमाना बदललाय , वेगवान झालाय. आजचं उद्या आऊटडेटेड होतंय . ह्या पोरांनाच वेग पेलवत नाहीये- या बदलांचा.
पण शेवटी मी आई होते. ती लहानच की माझ्यापेक्षा. बोलतात पोरं वेड्यासारखं. पण आईला ते झेपलंच पाहिजे .
काहीतरी करायला हवं . पण काय ?
बोलल्यामुळे तिचं मन जरा हलकं झालं असावं. जरा खाल्लं - पिल्लं अन हुंदडली कुठे बाहेर.
-/-/-/
कालिंदीचा फोन आला. माझी वर्गमैत्रीण.
' अगं काय ? आज कशी आठवण आली माझी ? ' मी म्हणाले आणि आमच्या गप्पा रंगल्या.
तिला शर्मिष्ठाचा नंबर हवा होता. आमच्या वर्गातली गोरी , जाडी, स्कॉलर पोरगी. आता काळ उलटला तरी मनात तीच प्रतिमा राहते आपल्या. एवढी वर्षं लोटली तरी . गंमतच असते ! त्यात माझं न तिचं कधीच पटायचं नाही. त्यामुळे मी तिला आजवर कधीच फोन केला नव्हता. पार पोरंबाळं झाली तरी . त्यामुळे मोबाईलमध्येही तो नंबर नव्हता .
मी तिला नंतर फोन करते असं सांगून फोन ठेवला. नंबर शोधावा लागणार होता. फोनची डायरी होती. पण मी असल्या गोष्टी कधीच त्यात लिहीत नाही. माझ्या कुठल्यातरी साध्या डायरीत मी असेच मैत्रिणींचे नंबर कधीतरी लिहून ठेवलेले. ती डायरी सापडेना . सगळा पसारा उचकावा लागला. त्यामध्ये काही काही . माझ्या कप्प्यात मी काय काय जपून ठेवलेलं . निशासारखं नाही . जरा काही नवीन मिळालं की जुनं दिलं फेकून . माझी जुनी प्रगतीपुस्तकं, शाळेची दैनंदिनी , इतर पुस्तकं , कुसुमाग्रजांच्या एका कवितेच्या पुस्तकात ठेवलेलं जाळीचं पिंपळपान . मोरपीस . अहा ! छान वाटलं .
माझी एक खास निबंधाची वही होती. ती पण जपून ठेवलेली. जुनी.पानं . पिवळसर पडलेली. किंचित. आणि एकदम मला...
शर्मिष्ठाचा नंबर सापडला. तो कालिंदीला दिला. मग सगळं नीट आवरुनच ठेवलं. मनाचंही असंच असतं का ?
मध्येमध्ये मनाचेही कप्पे असेच नीट आवरून ठेवावे लागतात का ?...
-/-/-
चौदा फेब्रुवारी . व्हॅलेंटाईन डे . सोमवार होता.
हे कामाला गेलेले.
मी निशाला जवळ बोलावलं .
' निशू, मला तुला काही सांगायचं .'
बरेचसे नॉर्मल झालेले तिचे डोळे माझ्या दिशेने वळले . प्रश्नार्थक झाले.
' आपलं घर, आपल्या घरातलं वातावरण , तुला मिळणारी वागणूक कशी आहे ?'
तिच्या कपाळाला आठ्या पडल्या.
' आपलं एकमेकांशी नातं कसं आहे ?'
आता तिने ओठ अन नाकही गोळा केलं . वैताग दर्शवायला.
' माझं आणि बाबांचं कसं जमतं ?'
' आई , हे काय विचारतेस गं, उगा फालतू ! तू मला आणखी त्रास देऊ नकोस हं ! ‘
' अगं सांग तरी . ‘
' मेड फॉर इच अदर ! लय भारी ! बास ? ' ती अगदी नाईलाजाने उच्चारली. जे अगदी खरंच होतं ; पण ते तिला तोंडाने बोलायचं नव्हतं.
' अगं ऐक तरी राणी जरा . माझं अन बाबांचं बॉन्डिंग उत्तम आहे . आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे....!’
' मग आज काय तुला व्हॅलेंटाईन डे साजरा करायचाय का ? की त्यासाठी माझ्याकडून टिप्स हव्या आहेत ? '
कल्पना चांगली होती. मला त्या कल्पनेनेच हसू यायला लागलं. हुं ! म्हणे व्हॅलेंटाईन डे ! मी शाळा कॉलेजमध्ये असताना व्हॅलेंटाईन डे साजरा करणं मुळात सुरु व्हायचं होतं. पण मी चेहऱ्यावर ते काही न दाखवता म्हणाले, ' जर मी तुला माझं एक सिक्रेट सांगितलं तर ? '
तिचे डोळे विस्फारले .
' पण बाबांना नको सांगूस हे . शपथ ! '
त्यावर ती गळ्यातच पडली , ' अगं , सांग ना , नाहीना सांगत . सांग ना.'
' नको बाई, तू शहाणी लगेच पचकशील बाबांकडे .'
' ए , उगा भाव खाऊ नकोस हं . आता सांगतेस का गप ?'
'... माझं ही ब्रेकअप झालं होतं !...'
माझ्या त्या वाक्यावर तिने आधी आ वासला. मग हातांच्या ओंजळीने स्वतःचं तोंड अर्धं झाकून घेतलं .
स्वतःच्या ब्रेकअपविषयी कोणी जर सांगत असेल तर ते खळबळजनक असतंच . पण त्यात स्वतःची आईच जर सांगत असेल तर ?... एखाद्या मैत्रिणीसारखं .
पोरगी मोठी झाल्यावर आईला तिची मैत्रीण व्हावंच लागतं.
'आई काहीही फेकू नकोस हं,' तिचा विश्वासच बसत नव्हता.
मी एक कागद तिच्या पुढे केला , ‘हे बघ म्हणजे तुला पटेल की मी फेकत नाहीये ते !’
किंचित पिवळसर झालेला. वहीचा एक साधा , जुनाट कागद.
ती एक चिठ्ठी होती. पेन्सिलने लिहिलेलं एक प्रेमपत्र .
तिने अधीरतेने, थरथरत्या हातांनी ते पाहिलं .
ते पत्र असं होतं -
प्रिय,
हो प्रियच.
मी एक जादूची गोष्ट कालच वाचून संपवली. त्यामध्ये एका सुंदर, सुस्वभावी राजकन्येला एका मांत्रिकाने धरून,कोंडून ठेवलेलं असतं. एका उंच डोंगरावर असलेल्या त्याच्या किल्ल्यात.
मग एक राजपुत्र तिला सोडवण्यासाठी येतो, पांढऱ्याशुभ्र घोड्यावर बसून.
आता असले मांत्रिक कुठे ? अन त्याचा डोंगरावरचा भयाण किल्ला कुठे?
पण मला असं वाटतं, मी एका माळरानावर उभी आहे. त्यावर डोलणारं हिरवंगार गवत. त्यामध्ये किती फुलं. छोटी, रंगीबेरंगी .त्यावर मी एकटी. अगदी एकटी.!
मग टापांचा आवाज येतो. लांबवरून. मग एक ठिपका दिसू लागतो. हळूहळू तो ठिपका मोठा होत जातो.तो तू असतोस . माझा राजपुत्र. घोड्यावर स्वार . पांढरा घोडा आणि त्याच्या कपाळावर एक काळा बदाम.
हे खरंय का स्वप्न ? काहीच कळत नाही.
तू होशील का माझा राजपुत्र ?
तुझीच वेडी राजकन्या .
तिचं वाचून संपलं .
‘ अय्या ! काय गं हे आई ? ‘
‘काय गं , आई असं लिहू शकत नाही ? का आईने कधी तारुण्यात पाय ठेवला नव्हता ? ‘
‘मग सांग ना मला सगळं. कसं जमलं तुझं ? अन कसं झालं ब्रेकअप ?’
ती बेडवर लोळली . अन एक उशी घेऊन, त्याच्यावर हात ठेवून, मान उंच करून माझ्याकडे कुतूहलाने पाहू लागली .
मी सांगू लागले -
‘तुमचा जमाना वेगळा. नवा . आमचा जुना काळ .’
त्यावर तिने खट्याळपणे मला एक थापटी मारली .
‘आम्ही एका वाड्यात रहायचो .ते तुला माहिती आहेच. तोही आमच्या पलीकडच्या वाड्यात रहायचा . आमचं जुनं पुणं म्हणजे इथून तिथून गल्लीबोळ अन वाडेच वाडे . आम्ही सगळे शाळेत होतो तेव्हाची ही गोष्ट . तो क्रिकेट भारी खेळायचा . अगदी आमच्या काळातला रवी शास्त्रीच . गोरापान अन स्मार्ट . मला तो आवडायला लागला . संध्याकाळ झाली , तो शाळेतून आला की खेळ सुरु व्हायचा . मला क्रिकेट फार काही आवडत नाही . तेव्हाही नाही . पण तो आला की मी खेळ बघायला जायचीच . तसे आम्ही लहानपणापासून एकत्र मोठे झालो . त्यामुळे भेटणं - बोलणं व्हायचं . मग एके दिवशी मी धीर करून हे पत्र लिहिलं . मी ते माझ्या मैत्रिणीच्या हाती त्याला देणार होते . माझं स्वतःच तेवढं धाडस नव्हतं ना .
पण त्याच दिवशी संध्याकाळी त्या मेलीने मला सांगितलं की त्याला ती आवडते म्हणून .
हाय ! एक कली खिलनेसे पेहलेही मुर्झा गयी !’
निशाला वाटलं , आई हिंदीमध्ये शिरली म्हणजे फारच आठवण येत असणार .
‘मला तर रडूच फुटलं . वाईट वाटलं . ब्रेकअपच की गं !’
‘आई, याला ब्रेकअप म्हणत नाहीत .’
‘का बरं ? ‘
‘तुमचं कुठे काही होतं ? एकतर्फी प्रेम. तुला तो आवडायचा. बास .’
‘अस्सं ? मग तुझंही तसंच आहे की . त्यात वेगळं काय आहे ? प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं , तुमचं न आमचं सेम असतं !’
निशाने मान हलवली अन कपाळावर हात मारून घेतला . आई कवितेच्या ओळीबिळी बोलण्यात पेरायला लागली म्हणजे अवघड होतं . इतने सालो बादभी जखम महक रही थी शायद !
तिने विचार केला व म्हणाली , ‘पण आम्ही एकमेकांशी बोलायचो ,खूप गप्पा मारायचो .’
‘मग आम्हीही बोलायचोच की .’
‘ए चल , वेडी , तुम्ही अगदी हाताने शेंबूड पुसण्याच्या वयात होता ना तेव्हापासून बोलायचात , ओके ? ‘
‘अन तुम्ही ?’
‘आमची भेट झाली मुळात तीच कॉलेजमध्ये. तरुणपणी .’
‘पण तुम्ही असं कधी बोलला होतात का ? ‘
‘नाही गं. पण जवळजवळ तसंच होतं गं . सगळेजण तसंच म्हणायचे . अन हे त्या शहाण्यालाही माहिती होतं . ‘
‘ओह ! मग कदाचित त्याच्या मनात तसं काही नसेल ; पण पोरं असं म्हणतात तर त्याला त्याची छाती फुगल्यासारखी वाटत असेल . त्याचा अहं कुरवाळल्यासारखा वाटत असेल .
तुझ्या भावना , तुझं दुःख मला समजतंय निशू . शब्दांच्या जाळ्यात त्या भावना उगा कशाला अडकवत बसायच्या . जाऊ दे ते.’
‘ओके . मग पुढे काय झालं ते सांग. काय झालं ग खरंच ? ‘
‘अगं, मी खूप रडले . पण असं उघड नाही .वेळ मिळाला की झोपायचं. तोंडावर गोधडी घेऊन अन तिच्या आत हळूहळू रडायचं. आईवडलांना कळू नये म्हणून . काहीच कळू नये म्हणून . आम्हाला एवढी मोकळीक नव्हती . डिप्रेस - बिप्रेस झालोय असं दाखवण्याची तर सामाजिक परवानगीही नव्हती .
त्या दोघांचं जमलं. त्याला ती का आवडायची - तर ती मैद्याच्या कणकेसारखी गोरी होती . बास एवढंच . पुढे दोघांच्या घरच्यांना ते कळलं . मग काय जुना जमाना ना . दोघांना चांगला मार बसला .’
निशाला गंमतच वाटली , ' मग ? '
‘मग काय ? ब्रेकअप ! दोघांचं ब्रेकअप झालं ! ' मी खिदळले .
मला मनापासून खिदळावसं वाटत होतंच .
मग त्यांचं ब्रेकअप झालं . पुढे तो गेला यूएसला. ती आता मुंबईला असते .’
‘अच्छा ! अशी होती होय तुझी ब्रेकअपकहाणी . आणि ही चिठ्ठी ? ती का जपून ठेवली आहेस गं अजून ? '
मी हसले , ' अगं , त्या वयातल्या वेडेपणाची आठवण म्हणून . एक गंमत म्हणून . त्याची आठवण म्हणून नाही काही .
त्या वयातलं प्रेम असलं तरी ते अगदी खरं होतं. ‘
माझं दुःख , माझं म्हणणं तिच्या हृदयापर्यंत पोचलं असावं .
‘म्हणून सबुरी ! या लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात. काय वाईट आहे का माझं ? ज्याच्यासाठी झुरले तो मिळाला नाही . नाही तर नाही . तुझ्या बाबांसारखा कित्ती चांगला नवरा मिळालाय मला . अन तुझ्यासारखी थोडी गोड थोडी वेडी अशी एक लव्हेबल पोरगी !
एक संधी गेली तर दुसरी संधी तुमचं दार ठोठावणार असते !’
‘आये, बास हां ! नवऱ्याला संधी म्हणतेस काय ? कुठली कोटेशन्स कुठे चिकटवू नकोस ! ‘
त्यावेळी दार ठोठावलं गेलं . वंदना आली होती . तिची मैत्रीण . मग काय ? स्वारी आवरून बिवरून उड्या मारत बाहेर गेली सुद्धा .
हवा सुखद होती . वसंतातली संध्याकाळ मस्तच असते .
/-/-/-
मी सुटकेचा नि: श्वास सोडला. मग गालात हसले .
पोरांसाठी आयांना काय काय करावं लागतं ? - खोटं बोलावं लागतं . अभिनयही करावा लागतो .
म्हणून मगा तिच्याशी बोलताना तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून मला जास्तच हसू येत होतं .
पण भगवंताने सांगितलंय , चांगल्यासाठी खोटं बोललं तरी चालतंय. ही बुद्धी दिल्याबद्दल मी देवाचे आभारच मानले .
कप्पा आवरताना एक जुनी वही सापडल्यावर मला ही युक्ती सुचली होती. जुन्या कागदावर लिहिल्यामुळे , पेन्सिलने ठळक न लिहिल्यामुळे , तिला ते प्रेमपत्र माझ्या काळातलं आहे यावर विश्वास बसला होता .
जुन्या झाल्या तरी काही गोष्टी अशा अचानक उपयोगी पडतात .
ज्याच्याशी ब्रेकअपची मी स्वप्नातदेखील कल्पना करू शकत नाही , तो माझा व्हॅलेंटाईन आता ऑफीसमधून घरी यायची वेळ झाली होती . माझा नवरा . अन गंमत ... थोडीशी गंमत ... पोरगीही घरात नव्हती ! ...
=========================================================

कथा

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

14 Feb 2022 - 7:25 am | श्रीरंग_जोशी

ब्रेकिंग सच अ स्वीट ड्रीम इज सो बॅड.
लेखन भावलं हेवेसांनल.

श्रीगणेशा's picture

14 Feb 2022 - 11:48 am | श्रीगणेशा

खूप छान, आवडली कथा!
सहजसुंदर!!

चौथा कोनाडा's picture

15 Feb 2022 - 5:55 pm | चौथा कोनाडा

व्वा, खुप छान !
निशाची गोष्ट आवडली.
💓
तिच्या साठी हा वॅलेंटाईन डे "सावणारा डे" ठरला म्हणायचा !

मग सगळं नीट आवरुनच ठेवलं. मनाचंही असंच असतं का ?
मध्येमध्ये मनाचेही कप्पे असेच नीट आवरून ठेवावे लागतात का ?...

हे खासच !

अशी आई असेल तर मुलीना ब्रेकअप-बिकअपच्या मानसिक धक्क्याची काळजी आपोआप घेतली जाईल.

या वर एक सुंदर फिल्म होऊ शकेल !

सौंदाळा's picture

15 Feb 2022 - 6:13 pm | सौंदाळा

मस्तच
शेवटची कलाटणी तर एकदम भारी

स्मिताके's picture

15 Feb 2022 - 8:52 pm | स्मिताके

कथा आवडली. शेवट मस्त!

श्वेता व्यास's picture

16 Feb 2022 - 12:15 pm | श्वेता व्यास

सुंदर तरल कथा, आवडली.

टर्मीनेटर's picture

16 Feb 2022 - 1:27 pm | टर्मीनेटर

कथा आवडली 👍

वंदना आली होती . तिची मैत्रीण . मग काय ? स्वारी आवरून बिवरून उड्या मारत बाहेर गेली सुद्धा .

निशा वंदना बरोबर पब मध्ये जाऊन ह्या 'ब्रेकअप सॉंग' वर धमाल नाचली असणार ह्यात शंका नाही 😀

बिपीन सुरेश सांगळे's picture

17 Feb 2022 - 8:37 am | बिपीन सुरेश सांगळे

वाचकांचा अतिशय आभारी आहे