गंध साऱ्या पाकळ्यांना
जागवे जो जाणीवांना,
मोगऱ्याचे उमलणे,
सोसते का नकारांना ?
मोहण्याची हौस नाही
त्याविना जीणेच नाही
जगे कसा जीव कोरा
रंग ज्यात उरलेच नाही ?
विरहगीत हाय रे !
सुमन कसे सावरे
मधुप का स्तब्ध होई
पंख रोखून बावरे ?
हा उत्सव नित असे
दैवयोग मग हसे
गळून गेल्या आसवांना
प्रणय कोणाचा पुसे ?