The dreams can be as real as you want them to be
लक्षणे अशी दिसत होती की देशाला स्वातंत्र्य मिळणारच. दुसऱ्या महायुद्धांत दमछाक झालेले सरकार आता भारताला स्वातंत्र्य देण्याचा विचार करत होते अश्या खात्रीलायक बातम्या केसरीतून वाचायला मिळत होत्या. फक्त आपल्यालाच नाही तर सर्व कॉलोनींना स्वातंत्र्य मिळणार असे दिसत होते. मग काय गोरे इथून जाणार? गोरे सोजीर गेलेतर जाऊद्यात पण गोऱ्या कंपन्या गेल्या तर? असल्या काळज्यांनी झोप लवकर येत नव्हती. सगळे गेले तरी हरकत नाही पण एच जे फोस्टर अॅंड कंपनीची बॉम्बे ब्रॅंच चालू ठेव रे देवा. माझी नोकरी राहील. कृष्णा आणि गंगीचे शिक्षण करायचे आहे. गंगीच्या लग्नाचे सुद्धा बघायचे. किती काळज्या करू? झोप कशी येणार? मेंढ्या मोजल्या. रामरक्षा म्हटली. भीमरूपी म्हटली. हळू हळू झोप लागली.
मी मेलो होतो. मला जे दिसत होते ते एवढेच. का मेलो कसा मेलो ते काही माहीत नाही. बहुतेक झोपेत हृदयक्रिया बंद पडली असावी. मेल्यावर ह्या गोष्टींची उठाठेव करायला मी थोडाच पोस्ट मॉर्टेम करणारा डॉक्टर होतो. आपले काम मरायचे.
देहविरहित मी हवेत तरंगत होतो. खाली गादीवर निपचीत पडलेले माझे कलेवर मला स्पष्ट दिसत होते. शेजारीच माझी प्रिय पत्नी शांतपणे झोपली होती. उद्या सकाळी जागी झाल्यावर समजेल म्हणा सर्व. त्यानंतरचे बघायला मी नसणार हे एक चांगले होते. माझ्या पत्नीला बऱ्याच काही गोष्टी सांगायच्या होत्या. ते राहून गेले. आता महत्वाची कागदपत्रे तिलाच शोधावी लागणार.
माझ्याबरोबर दोन मार्गदर्शक होते. मला घेऊन जायला आले होते. त्यातला जो सिनिअर वाटत होता त्याने माझ्या ( पाठीवर? ) हात ठेवून मला पुढे जायला उद्युक्त केले. “चला राव पुढे. इथे तुमचे काही काम नाही. आम्हाला पण दुसऱ्या ड्यूट्या आहेत. चला फटाफट” त्याने खिशातून यंत्र काढले, त्यांत बघून त्याने एकदा चेक केले, “हे पहा अजून तीन जणांना उचलायचे आहे सकाळी सहा वाजेपर्यंत. तुम्हाला एकदा इनवर्डच्या हवाली केले म्हणजे आम्ही सुटलो.”
आम्ही आता एका भोगद्यातून जात होतो. सगळीकडे अंधार होता. भोगद्याच्या शेवटी प्रकाशाचा अंधुक कवडसा दिसत होता. प्रकाशाचा कवडसा आता जरा बरा मोठा दिसत होता. मी माझ्या मार्गदर्शकाला विचारले, “अजून किती वेळ चालायाचं आहे?” माझी स्वतःची गाडी असल्यामुळे चालायची सवय गेली होती. भाजी मार्केट जरी जवळ होते तरी तिथपर्यंत जायला मी गाडी वापरत होतो. गाडी म्हणजे सायकल. चालत कोण जाणार हो!
शेवटी एकदाचे मुक्कामाचे ठिकाण आले असावे. कारण त्यांनी मला बाहेर थांबायला सांगितले. सिनिअर आत गेला. मी माझ्याबरोबरच्या ज्युनिअर मार्गदर्शकाला विचारले, “ हे कुठले ऑफिस आहे?” तो बोलायला फारसा उत्सुक दिसला नाही. “बळीशी मैत्री करायची नाही, अश्या आम्हाला सक्त सुचना आहेत. नाहीतरी तुला सर्व उलगडा होणार आहेच. तो पर्यत दम धर.”
सिनिअर परत आला, “आपण सुदैवी आहोत. दहा पंधरा निमिषात आपला नंबर लागेल अशी चिन्हे आहेत.”
कोणीतरी नावाचा पुकारा केला, “अधटराव भगवंतराव सुरसुंडीकर हाजीर है?”
सिनिअर म्हणाला, “चला, अधटराव भगवंतराव सुरसुंडीकर, चला आपला नंबर आला.”
मी आश्चर्याने तक्रारीच्या सुरांत त्याला सांगितले, “अहो मिस्टर, मी अधटराव भगवंतराव सुरसुंडीकर नाही. माझे नाव आहे -------”
मला पुढे बोलू न देताच तो म्हणाला, “तुला ते राज कपूरचे “सजन रे झूठ मत बोलो, खुदाके पास जाना है,” गाणे माहीत आहे? आता तरी खोटं बोलू नकोस. खर बोललास तर काहीतरी बोनस पॉईंट तुझ्या खात्यांत जमा होतील. नरकातून लवकर सुटका होईल.”
मी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, “मिस्टर यमदूत, हे जे गाणे तुम्ही सांगता आहात ते भविष्य काळातले आहे. तो पिक्चर यायला अजून एकवीस वर्षे अवधी आहे. तुम्हाला माहीत असेल ते गाणे. पण मला कसे माहीत असणार?”
जास्त वादावादी करण्यात अर्थ नव्हता. त्यांनी जिकडे नेले तिकडे गेलो. एका ऑफिसर समोर मला उभे करण्यांत आले. तिथे दिव्य दृष्टीने माझे चित्र टिपण्यात आले. त्याचा प्रिंट घेऊन ऑफिसरने त्यांच्या रेकोर्डशी जुळवण्याचा प्रयत्न केला. दोनदा तीनदा व्यवस्थित निरखून पाहिले. तो पुरा वैतागलेला दिसत होता. त्याने सिनिअरला जवळ बोलावले. दोनी फोटो दाखवले. मग त्याला दुसऱ्याच कुठल्यातरी भाषेत --- बहुतेक देववाणी संस्कृतमध्ये--- त्याला आडवा घेतला.
सिनिअरचा चेहरा पडला होता. त्याने चिमुकल्या चेहऱ्याने ऑफिसरला विचारले, “ मग आता?”
“आता याला ढगावर घेऊन जा आणि द्या ढकलून.” ऑफिसरने निर्ढावलेल्या मख्खपणे सल्ला दिला.
“पण तो खाली पडून मरेल त्याचे काय?”
ओफिसरने रेकोर्ड फाईल चाळून बघितली, “अरे काही नाही. ह्या +++ची अजून सत्तावीस वर्षे आहेत. द्या बिनधास्त ढकलून! इन्क़्वायरी बिनक़्वयरी काही होणार नाही. तसेच गेल्या पावली त्या ओरिजिनल माणसाला घेऊन या.”
मग दोघांनी मला बाहेर ढगात नेले आणि दिले ढकलून. मी वेगाने खाली पडत होतो. कुठे तरी धरायला मिळावे म्हणून मी जिवाच्या आकांताने हात हलवत होतो. निदान पाय टेकायला जागा मिळावी म्हणून पाय हलवत होतो. मी हताश झालो होतो. कुणीतरी मला धरून हलवत होते. जागा होऊन बघतो तर काय बायको हलवून हलवून जागे करत होती. “ अहो, असं काय हात पाय झाडता आहात? किती घाबरवलत मला.”
जाग आल्यावर मला इतके बरं वाटले. “बाप रे, किती भयानक स्वप्न पडले होते.” पायरी चुकून आपण खाली पडतो आहोत असे स्वप्न मला नेहमी पडते त्याची ही भयंकर आवृत्ति.
बायकोला विचारले, “किती वाजले?” शेजारच्या स्टुलावर अलार्म क्लॉक होते. बायकोने घड्याळाचे तोंड फिरवून माझ्याकडे केले. “पहा तुम्हीच.” बघितले तर कसे बसे सहा वाजले होते. म्हणजे अजून एक तास वेळ होता. पण झोप येणे अवघड होते. मग स्वतःच चहा करायचा विचार केला. दूध आले असेल काय? नसेल तर सेंटरवर जाऊन घेऊन येऊ. तेव्हढेच सकाळचे फिरणे होईल. उठलो चूळ भरून दात घासले. दुधाच्या बाटल्या घेतल्या. सुमा आणि जगू गाढ झोपले होते. दूध घेऊन परत आलो तरी सगळे झोपलेलेच. स्वतःसाठी आणि बायकोसाठी चहा बनवला.
स्वप्न केव्हाच विसरून गेलो होतो. जेवणाचा डबा घेतला, सौ ने धुतलेले धोतर नेसले. कोट टोपी चढवली. टोपी हातांत देताना बायको म्हणाली, “किती वास मारते आहे. नवीन घ्यायला झाली” ते मला समजत नाही का? पण महिन्याच्या पगारांत भागवता भागवता टोपी मागे पडत होती. जाऊ दे. हिला काय समजावणार. सायकल हाणत हाणत सेन्ट्रल बिल्डींगला पोहोचलो.
रात्री भिजवलेल्या, मोड आलेल्या मटकीची उसळ होती. चवदार झाली होती. जेवता जेवता काहीतरी दाताखाली आले. कटकन आवाज झाला. सौला पण ऐकू गेला असावा, “अहो, खडा आला का दाताखाली? मी बघून निवडले होती मटकी.”
मी खडा बाहेर काढण्यासाठी तोंड उघडले. तोंडातला घास हातावर घेतला. बघतो तर काय सारेचे सारे बत्तीस दात हातांत आले! मी घाबरून ओरडलो, “अग हे बघ काय झाले.”
जागा झालो तेव्हा बायको घाबरून माझ्याकडे बघत होती.“मला कशाला हाक मारत होता? किती घाम आला आहे? वाईट स्वप्न पडले?”
मी तिच्याकडे लक्ष न देता प्रथम दात चेक केले. सगळे दात शाबूत होते. किती रिलीफ वाटला. बापरे किती भयानक स्वप्न होते. मिसेसला समजावून सांगणे कठीण होते. काहीतरी उडवा उडवीची उत्तरे दिली झाली. विषय बदलण्यासाठी विचारले किती वाजले? सरळ उत्तर देईल तर ती बायको कसली?
“ उगीच वेळ काढू पणा करत लोळत पडू नका. मला पण दुसरी कामे आहेत. सौमित्र आणि अर्णवच्या आज टेस्ट्स आहेत. त्यांना लवकर उठवून थोडी उजळणी करून घ्यायची आहे. लवकर आटपून घ्या. आणि मला ब्रेकफास्ट करायला मदत करा.”
तिचेही बरोबर होते. बिचारी किती कष्ट करते. मुलांचे आवरायचे. सकाळची पोळी भाजी करायची. सगळ्यांचे डबे भरायचे. मुल पण अशी द्वाड. अंगावर ओरडल्याशिवाय अंघोळीला जाणार नाहीत. अंघोळ झाली तर पंचाने अंग पुसायाला पण आई पाहिजे. हे सगळे उरकून स्वतःची नोकरी सांभाळायची. त्यातल्या त्यांत एक बरे होते की ती ज्या शाळेत नोकरी करत होती ती घराच्या अगदी जवळ होती. बस्स, ते काही नाही आज पासून तिला कामांत मदत करायची आपण.
“निर्मला, आजपासून सकाळचा चहा मी करणार. तू मुलांना उठव. चहा करता करता मी ब्रेड भाजून ठेवतो.”
“अहो, तुम्ही स्वयंपाकघरात लुडबुड करू नका. उगाच ब्रेड करपवून टाकाल नाहीतर दूध उतू घालवाल. कुणी बघितलं तर माझी अब्रू घालवाल. म्हणतील “एवढा मोठा बँकेतला मॅनेजर बिचारा घरातली सगळी काम करतो आणि बायको? ती लोळत लोळत पडून ह्याला राबवून घेते.” माझ्यावर उपकार करा नि तुम्ही तुमचं आटोपून घ्या.” सौ ने माझ्या हातातलं चहाचे भांडं काढून घेतले. म्हणतात ना ज्याचे करावे बरे तो म्हणतो माझेच खरे.
सौनेच मग सगळे काम उरकले आणि चहाचा कप आणि लोणी लावलेले दोन ब्रेड पुढे ठेवले. ब्रेडची आणि चहाची टेस्ट अप्रतिम होती. खरच ही जे काय करते त्याला तोड नाही. बरच झालं मी ब्रेड आणि चहा करायच्या भानगडीत पडलो नाही.
मी ऑफिसला जायला निघालो. सौने रूमालाची आठवण करून दिली. ऑफिसला जाताना मी हमखास रुमाल घ्यायला विसरतो. स्कूटर स्टॅंडवर चढवून पुन्हा घरात गेलो. रुमाल घेतला आणि शेवटचा प्रयत्न करावा म्हणून पुन्हा तिला विचारले, “ जाता जाता मी मुलांना शाळेत सोडू का ?”
मुलांच्या चेहेऱ्यावरून स्पष्ट दिसले की त्यांना माझ्याबरोबर जाण्यांत काही रस, उत्साह नव्हता. बायकोला तर नव्हताच नव्हता. सहज मनांत आले की अरे, बॅंकेत मला घराच्या पेक्षा कितीतरी जास्त रिस्पेक्ट होता. मी फाईल मागितली की सगळा स्टाफ धावपळ करून मला पाहिजे ती फाईल आणून देतात. जाउदेत झालं.
माझी ब्रॅंच कॅंप मध्ये होती. ऑफिसमध्ये जाताना मधेच एका ठिकाणी गर्दीने रस्ता अडवला होता. पुढे जायला मार्ग नव्हता. मी स्कूटर रस्त्याच्या कडेला जराशी दूरवर उभी करून काय प्रकार आहे बघण्यासाठी गर्दीत पुढे घुसलो. बघतो तर काय दोन गुंड नंग्या तलवारी घेऊन कुणाला तरी अचकट विचकट शिव्या देत आरडा करत होते. निरखून बघितले तर त्यांचे चेहरे ओळखीचे वाटले. अरेच्चा हा तर आमचा जनरल मॅनेजर रंगा राव होता आणि तो जन्या म्हणजे माझ्या हाताखालचा जनार्दन म्हात्रे! त्यांची नजर माझ्यावर पडली. तलवार माझ्याकडे रोखून रंगा राव ओरडला, “जन्या ,हा बघ, इकडे आहे. हाच तो आपल्या ऑफिसमध्ये घुसून आई बहिणींची छेड काढणारा जेंटलमन गुंड! धर त्याला. आज त्याला पोहोचवतो त्याच्या आजोबांकडे. लई माज चढला आहे न. आज तुझी चरबी कापून काढतो.” ते माझ्याकडे धावले.
माझ्या आजुबाजुचे बघे पळायला लागले. “ पळा साहेब, ते दोघं खच्चून पिऊन तर्र झाले आहेत. मर्डर करायला मागे पुढे बघणार नाहीत. पळा.” जीवाच्या आकांताने मी पळायला सुरुवात केली पण माझे पाय जमिनीला जणू जखडले होते. एक पाउल उचलत नव्हते. पायाला मणामणाची वजने लटकवलेली. दोनी पायावरून वारे गेल्यासारखे वाटत होते. तोवर जन्याने येऊन माझी कॉलर पकडली आई बहिणीवरून एक करकचून शिवी हासडली आणि तलवार उचलून मानेवर घाव घातला. मी किंकाळी फोडली पण आवाज बाहेर पडत नव्हता. रंगा राव मला गदागदा हलवत होता. “मला मारू नका हो. मी तो .......” मी गयावया करत म्हणालो.
“अरे अवि जागा हो. कोणी तुला मारत नाहीये. उठ लवकर.” माझी बायको मला उठवायचा प्रयत्न करत होती. “ आधी किती वाजले बघ. तुला सकाळची फ्लाईट पकडायची आहे ना? किती वेळ मोबाईलचा अलार्म वाजला. पण तू गाढ झोपलेला. मी मात्र डिस्टर्ब झाले.”
मी माझा आयफोन उघडला. ओह माय गॉड! पहाटेचे साडेचार वाजले होते.
“अवि, तू असे कर. मी चहा करते. तू झटकन तयार हो. मी तुला एअरपोर्टवर ड्रॉप करेन. दिल्लीला पोहोचल्यावर एअरपोर्ट प्लाझा मध्ये चेकइन कर. शॉवर घेऊन फ्रेश हो. मग मिटींगला जा. कसं काय?” श्रुतीने मला धीर दिला. अशी बायको होती म्हणून मी एवढा कामाचा पसारा सांभळू शकतो आहे. श्रुतीने मला एअरपोर्टवर ड्रॉप केले.
“फ्लाईट लॅंड झाली की मला टिंकल दे. रात्री रिटर्न फ्लाईटचा नंबर कळव.”
“श्रुती तू टेन्शन घेऊ नकोस.माझी काळजी करू नकोस, मी काही कुकुल बाळ नाही.”
“ ते आजच पहाटे दिसलंच की. बर मी जाते नाहीतर मला ऑफिसात जायला उशीर होईल. बाय अॅंड टेक केअर.”
“ यू टू.”
मी हसून तिला निरोप दिला. फ्लाईट वेळेवर निघाली. वेळेवर पोहोचली.
माझ्या सारख्या बिझी एक्झिक्युटिव्हला फार थोडा स्वतःसाठी मिळतो. तो म्हणजे दाढी करताना आणि फ्लाईट मध्ये. चांगली दोन तासाची फ्लाईट होती. विचार करू लागलो स्वतःच्या आयुष्याचा. काय नव्हते. पैसा होता, कुणालाही हेवा वाटावा अशी फॅमिली होती, दोन कार होत्या, मुंबईला फ्लॅट होता, पुण्याला आटोपशीर बंगला होता. पण असे सगळे होते तरी नेहमी कुठेतरी मनांत भीती वाटायची, काहीतरी अकल्पित अमानवीय घडेल. आयुष्यांत प्रचंड उलथापालथ होईल आणि मी शंकराच्या देवळाच्या बाजूला लाईनमध्ये बसून भीक मागत असेन. आपोआप गळ्याकडे हात गेला, मौनी बाबांनी मंत्रून दिलेला रुद्राक्ष जागेवर होता. भीती कमी झाली. डोके थोडे नॉर्मल झाले. भीती झटकून टाकली, आजच्या मिटिंगचा विचार सुरु केला. डोक्याला व्यवधान असले की बरे असते. मन त्यांत गुंतून जाते. असे हे विचार मंथन चालू असताना फ्लाईट लॅंड झाली. बाहेर आलो आणि सरळ एअरपोर्ट प्लाझा मध्ये चेकइन केले. एक मस्तपैकी पॉवर नॅप घेतली. उठलो आणि ब्रेकफास्ट ऑर्डर केला. मिळेल एवढ्या वेळांत शॉवर घेऊन तयार झालो. हॉटेलने लक्झुरी कारची व्यवस्था केली होतीच. मी स्वतःच गाडीचा ताबा घेऊन मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सच्या विशाल परिसरात गाडी पार्क करून आंत प्रवेश केला. मिटींगला बसण्याआधी क्लोकरूमला भेट द्यावी ह्या विचाराने तिकडे मोर्चा वळवला. आत जाऊ आरश्यांत डोकावले आणि
आय गॉट ए शॉक ऑफ माय लाईफ!!!
मी नखशीकांत नागडा उघडा होतो. म्हणजे तितका नाही जितका तुम्हाला वाटतेय. पॅंटची झिप होती पट्टा होता, पण पॅंट नव्हती! इलॅस्टिक होते पण अंडर वेअर नव्हते. शर्टाची बटणे होती पण शर्ट नव्हता! टाय पिन होती पण टाय नव्हता. पाकीट होते पण खिसा नव्हता. लाज होती पण अब्रू नव्हती! शब्द होते पण अर्थ नव्हता!
मी जिवाच्या आकांताने पळायला सुरुवात केली. दिल्लीच्या रस्त्यातून लोकांना धक्के मारत, लोकांचे धक्के खात मी पळत होतो. पळत सुटलो. पळत राहिलो. ऊर फुटेस्तोवर धावलो. कधी एकदा हॉटेलमध्ये पोहोचतो आणि कपडे अंगावर घालतो असं झालं होतं.
जेव्हा शुद्धीवर आलो तेव्हा डॉक्टरच्या टेबलावर पडलो होतो.
“ मिस्टर ....एर काय नाव आपले? ”
` “ प्रभुदेसाई, माझं नाव प्रभुदेसाई.”
“ वेल प्रभुदेसाई, अभिनंदन!! सांगायला आनंद वाटतो की आपण प्रेग्नंट आहात!”
मी ताडकन उठून बसलो. बायको माझ्याकडे आ वासून विचित्र नजरने बघत होती. मी आजूबाजूला बघितले. मी माझ्या बिऱ्हाडी होतो. माझ्या अंथरुणावर. कृष्णा आणि गंगी पल्याड शांतपणे गाढ झोपले होते.
“ बयो मला जरा माठातले गार पाणी दे गो. तल्खली होते आहे नुसती जीवाची.” बयो पाणी आणायला गेली तेवढ्यांत सगळे तपासून घेतले. पोट जरा चेपून बघितले. तसले काही नव्हते याची खात्री करून घेतली. किती बरं वाटले तुम्हाला सांगू. वर्तमान काळांत परत येताना किती छान वाटत होते.
संध्याकाळी मठांत गेलो. स्वामीजींच्या पायाशी बसलो. स्वामींना सर्व काही समजते. भूत भविष्य वर्तमान सगळीकडे त्यांचा संचार असतो.
“ वत्सा का उदास दुःखी आहेस?” स्वामींनी प्रेमाने विचारले.
“ स्वामी आपण त्रिकालदर्शी आहात. मी काही सांगणे म्हणजे काजव्याने सूर्याला कुठल्या दिशेला उगवायचे आणि कुठल्या दिशेला मावळायचे ह्याचे मार्गदर्शन करण्यासारखे आहे. मजवर कृपा करा. मला चिंतामुक्त करा.”
स्वामीजींनी समाधी लावली. दहा एक मिनिटांनी त्यांची समाधी उतरली.
“ बालका, मी तुझ्या स्वप्नांत प्रवेश करून जसे घडले तसे सर्व पाहिले. अजाण बालका, तू घाबरून घाई करून स्वप्नाच्या बाहेर उडी मारलीस ती चूक झाली.” स्वामींनी मला सौम्य शब्दांत फटकारले.
“ गुरुजी पण ते डॉक्टर ......”
“ तेच ते. मी डॉक्टरांशी चर्चा केली. प्रथम एक समजून घे. तुला वाटले तसा तू नागडा बिगडा काही नव्हतास. तुझ्या अंतर्मनातल्या असुरक्षिततेच्या कल्पनांनी तुझा ताबा घेऊन तुला नागडे केले. म्हणूनच डॉक्टर म्हणाले, “ यू आर प्रेग्नंट विथ आयडीयाज. क्रेझी आयडीयाज.” समजला तुला प्रेग्नंटचा अर्थ?” स्वामीजी इंग्लिशमध्ये एम ए आहेत.
“ गुरुजी, मला एक सांगा, मी ज्या स्वप्नांत आत्ता आहे, ते अजून किती दिवस चालेल?”
“वत्सा, आपल्या हातांत काय आहे? आपले काम आहे जगणे. प्रश्न न विचारता.”
बाहेर पडलो. बाहेर मोर्चा आणि घोषणा चालू होत्या. “लेंगे स्वराज्य लेंगे ...”
लक्षणे अशी दिसत होती की देशाला स्वातंत्र्य मिळणारच. दुसऱ्या महायुद्धांत दमछाक झालेले सरकार आता भारताला स्वातंत्र्य देण्याचा विचार करत होते अश्या खात्रीलायक बातम्या केसरीतून वाचायला मिळत होत्या. फक्त आपल्यालाच नाही तर सर्व कॉलोनींना स्वातंत्र्य मिळणार असे दिसत होते. मग काय गोरे इथून जाणार? गोरे सोजीर गेलेतर जाऊद्यात पण गोऱ्या कंपन्या गेल्या तर? असल्या काळज्यांनी झोप लवकर येत नव्हती. सगळे गेले तरी हरकत नाही पण एच जे फोस्टर अॅंड कंपनीनची बॉम्बे ब्रॅंच चालू ठेव रे देवा. माझी नोकरी राहील. कृष्णा आणि गंगीचे शिक्षण करायचे आहे. गंगीच्या लग्नाचे सुद्धा बघायचे. किती काळज्या करू? झोप कशी येणार? मेंढ्या मोजल्या. रामरक्षा म्हटली. भीमरूपी म्हटली.
“ झोप येत नाही का?” बयोने हळुवारपणे विचारले, “ बाम लावून कपाळ चेपू का?”
काय सांगू हिला? सांगू की आयुष्य म्हणजे स्वप्नांची अखंड मालिका आहे. तिला समजेल? का तिला हे आधीच माहीत आहे आणि मला आत्ता समजले? केव्हा मला ह्या स्वप्नांच्या दुनियेतून मुक्ती मिळणार आहे !!!
देवा महाराजा, कृपा करा ह्या दीनावर. आता जे स्वप्न चालले आहे ते असेच चालू दे. पुन्हा नको इथून जागे होऊन दुसऱ्या स्वप्नांत प्रवेश. एवढीच प्रार्थना! जगण्याचे ओझे वाहून थकलो आहे रे बाबा.
सकाळी उठलो. घड्याळात बघितले, दहा वाजले होते. सकाळचे! घाई काय आहे? एकटा जीव सदाशिव. लवकर उठून कुठे तीर मारायला जायचं आहे? जग आपल्यासाठी थांबले नाहीये आणि आपण जगासाठी थांबलो नाही आहोत. जो पर्यंत निभावते आहे तो पर्यंत ढकलायचे. जगण्याची सक्ती नाही आणि मरण्याची आसक्ति नाही. सरते शेवटी “It’s my life.”
प्रतिक्रिया
24 Apr 2024 - 6:28 pm | diggi12
अप्रतिम
24 Apr 2024 - 6:58 pm | अहिरावण
मस्त !!
24 Apr 2024 - 9:01 pm | कर्नलतपस्वी
आपली कथा वाचली आणी अगदी अशीच परिस्थिती झाली. आणी म्हणालो ....
“ बयो मला जरा माठातले गार पाणी दे गो.
आता रात्री आयोडेक्स लावून बायको कडून गुडघे चेपून घेईन म्हणतो.
24 Apr 2024 - 9:29 pm | चौथा कोनाडा
भारी ! १०१+
चांगलचं गुंतवून ठेवलंत की आम्हाला तुमच्या स्वप्नांत !
आता मी स्वप्नं पाहू की नाही असा प्रश्न पडलाय !
25 Apr 2024 - 1:15 pm | नावातकायआहे
भारीच.... कमाल जमली आहे कथा!
25 Apr 2024 - 1:18 pm | नावातकायआहे
2 Nov 2021 - 9:09 pm?
मी स्वप्नात तर नाही ना वाचली हि कथा ? ? ? ? ?
28 Apr 2024 - 8:33 am | भागो
सगळ्यांचे आभार.
मला नेहमी पडणाऱ्या तीन चार स्वप्नांवरून बेतलेली कथा.