नुकतेच अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने Brincidofovir या औषधाला देवीरोगावरचा (smallpox) उपचार म्हणून मान्यता दिली. हे वाचल्यानंतर सर्वसामान्य माणूस नक्कीच बुचकळ्यात पडेल ! तुम्हीसुद्धा पडले असाल, नाही का ?
देवीच्या आजाराचे तर फार पूर्वीच उच्चाटन झालेले आहे. मग जो आजार आत्ता मानवजातीत अस्तित्वातच नाही, त्याच्यासाठी औषधाला मान्यता देण्याची गरज काय, हा प्रश्न अगदी स्वाभाविक आहे.
याचे स्पष्टीकरण रोचक असून ते देण्यासाठीच हा लेख लिहीत आहे. पण त्यापूर्वी आपण या एकेकाळच्या जागतिक महासाथीच्या रोगाचा इतिहास थोडक्यात पाहू.
हा आजार Variola या विषाणूमुळे होतो. तो अतिप्राचीन आहे. इजिप्तच्या ममीत देखील त्याचे काही पुरावे आढळले आहेत असे संशोधक म्हणतात. साधारणपणे इसवी सनाच्या चौथ्यापासून ते पंधराव्या शतकापर्यंत हा आजार संपूर्ण जगभर फोफावलेला होता. त्यात लोक गंभीर आजारी पडायचे आणि कित्येक लोक मृत्युमुखी पडत होते. त्यानंतर त्याच्या विरोधातील उपचार आणि व्यापक प्रमाणावरचे लसीकरण केल्यानंतर हळूहळू हा आजार आटोक्यात येऊ लागला. अमेरिकेत 1947 मध्ये शेवटचे १२ रुग्ण सापडले. मात्र तेव्हा विकसनशील देशांमध्ये हा आजार अस्तित्वात होताच. विकसित देशात या विरुद्धचे लसीकरण 1972 च्या दरम्यान थांबवण्यात आले. त्यानंतर हा आजार मागासलेल्या देशांतमध्येच राहिलेला होता. त्याचा बीमोड करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने खूप मोठी मोहीम हाती घेतली. एकीकडे व्यापक लसीकरण चालू होतेच.
हा आजार फक्त माणसाला होतो आणि या विषाणूचा प्राणिजन्य साठा नाही, ही बाब आपल्या पथ्यावर पडणार होती. त्यामुळे या आजाराचे पूर्ण उच्चाटन होऊ शकेल याची खात्री होती. 1975 च्या दरम्यान WHOने जागतिक स्तरावर याचे रुग्ण शोधण्याची मोहीम हाती घेतली. अनेक लोक हा आजार होऊनही तो लपवत असायचे. त्यांना शोधून काढणे फार महत्त्वाचे होते. मग यावर एक युक्ती काढली गेली. जो माणूस देवीचा रोगी शोधून काढेल त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर बक्षीस ठेवण्यात आले. हा मोहिमेतला आकर्षक भाग होता. भारतातही त्यादरम्यान “देवीचा रोगी कळवा आणि हजार रुपये मिळवा”, ही घोषणा मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक ठिकाणी ठळकपणे लावलेली असे.
अशा तऱ्हेने जागतिक निर्मूलन मोहिमेला यश येत होते. 1977 मध्ये डब्ल्यूएचओने जाहीर केले, की जगातील शेवटचा देवीचा रुग्ण हा सोमालियामध्ये आहे; बाकी इतरत्र या आजाराचे उच्चाटन झालेले आहे. हे जाहीर झाल्यावर एका अमेरिकी विज्ञान वार्ताहराने त्या रुग्णाला भेटायचे ठरवले. हा वार्ताहर देवीरोगावर एक पुस्तक लिहित होता आणि त्याच्या संशोधनाचा भाग म्हणून त्याला ही गोष्ट आवश्यक वाटली. मामला अवघड होता. सोमालियाने तेव्हा सर्व जागतिक पत्रकारांना त्यांच्या देशात येण्यास बंदी घातली होती. आता हे वार्ताहर पेचात पडले. म्हणजे, तिथे काही करून जायचेच तर स्वतः पत्रकार असल्याचे लपवणे भाग होते. पण हे त्या व्यवसायातील नियमाविरुद्ध असते. त्यातून खोटेपणाने तिथे प्रवेश केला आणि पुढे जर उघडकीस आले, तर मग थेट तुरुंगवासच घडला असता. पण हे वार्ताहर मोठे जिद्दीचे. त्यांनी WHOशी संपर्क साधला आणि संघटनेने त्यांना अधिकृत ‘निरीक्षक’ असा दर्जा दिला. त्या प्रमाणपत्रावर आता ते सोमालियाच्या व्हिसासाठी प्रयत्न करू लागले. त्यासाठी ते दिल्लीला आले. व्हिसा मिळवणे अजिबात सोपे नव्हते.
दरम्यान दिल्लीतील हॉटेलमध्ये त्यांना एक शिकाऊ पत्रकार तरुणी भेटली. ती आकर्षक होती. त्यांनी तिला त्यांची अडचण समजावून सांगितली. त्यावर ती विचार करते म्हणाली. संध्याकाळी हॉटेलच्या बारमध्ये त्या तरुणीने कोण कोण आलंय याचा अंदाज घेतला. तर तिथे तिला सोमालियाच्या राजदूताचा पुतण्या भेटला. तिने एकूणच आपल्या सौंदर्याची त्याच्यावर भुरळ टाकली आणि त्याला पटवला ! या वार्ताहराबद्दल काहीतरी गोलमाल सांगितले. अखेरीस चर्चा वगैरे होऊन या गृहस्थांना व्हिसा मिळाला. मग ते प्रवासास निघाले. त्या दरम्यान सोमालिया व इथिओपिया यांचे युद्ध चालू होते. एकंदरीत वातावरण भयभीत करणारे होते. मजल दरमजल करीत हे वार्ताहर अखेर तिथे पोचले. मग देवीचा रुग्ण जिथे होता त्या गावात गेले.
(यापुढील घटनाक्रम त्यांच्या लेखनातून समजला).
तो रुग्ण एका रुग्णालयात स्वयंपाकी म्हणून काम करीत होता. त्याचा देवीचा रोग झालेल्या अन्य एका कुटुंबाशी जेमतेम १५ मिनिटे संपर्क आला होता. त्यानंतर त्याला तीव्र ताप, सांधेदुखी आणि उलट्या हा त्रास सुरू झाला. सुरुवातीस डॉक्टरांनी त्याचे निदान कांजिण्या असे केले. परंतु लवकरच त्याला अंगावर पुरळ उठले आणि आता तो देवीचा रोगी असल्याचे स्पष्ट झाले. मात्र आता त्याने घाबरून आजार लपवायचे ठरवले होते. परंतु सर्वेक्षण करणाऱ्या माणसाने त्याला बरोबर पकडले आणि मग थेट त्याची रवानगी रुग्णालयात झाली.
ज्या रुग्णालयात त्याला आणायचे ठरवले होते तिथले सर्व रुग्ण आधी अन्यत्र हलविण्यात आले. त्या सर्वांचे देवीचे लसीकरण झाल्याची खात्री करण्यात आली. त्या रुग्णालयाकडे येणारे सर्व रस्ते नंतर अडवून ठेवण्यात आले. त्या परिसरातील ५५,००० जणांचे लसीकरण करण्यात आले.
लवकरच तो रुग्ण बरा झाला. नैसर्गिक संसर्गातून देवीचा आजार झालेला हा शेवटचा रुग्ण गणला गेला. पण,
पुढे अजून काही विपरीत घडायचे होते......
लंडनच्या एका रुग्णालयात एक स्त्री आजारी पडली. त्या रुग्णालयाच्या प्रयोगशाळेमध्ये देवीच्या विषाणूवर संशोधन चालू होते. तिथून तो कुठल्यातरी मार्गाने बाहेर निसटला आणि त्यातून ही तरुणी आजारी पडली. पुढे 1978 मध्ये बर्मिंगहॅम रुग्णालयातील प्रयोगशाळेतील एक कर्मचारीही देवीने आजारी पडला आणि त्याचा आजार बळावल्याने त्याचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना होती. त्याचा धसका घेऊन त्या रुग्णालयाच्या संचालकांनी आत्महत्या केली. हे सगळे प्रकरण पाहता इंग्लंडने त्यांच्याकडील विषाणूचे सर्व नमुने नष्ट केले.
अखेर 1980 मध्ये डब्ल्यूएचओने या आजाराचे पूर्ण उच्चाटन झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर प्रत्यक्ष कुठल्याही माणसामध्ये हा आजार दिसलेला नाही. आता हा आजार घडविणाऱ्या विषाणूचे नमुने अभ्यास-संदर्भ म्हणून अतिशीतगृहात कडेकोट बंदोबस्तात ठेवावयाचे ठरले. अधिकृतपणे डब्ल्यूएचओची अशी दोनच केंद्रे आहेत. त्यातील एक अमेरिकेतील अटलांटामध्ये तर दुसरे रशियामध्ये आहे. आता पुन्हा एक प्रश्न उपस्थित होतो. तो म्हणजे,
कशासाठी ठेवायचे हे घातक नमुने ?
वैज्ञानिकांना सतत एक भीती वाटत असते. जर का या विषाणूंचे अनधिकृत नमुने कुठून तरी दहशतवाद्यांना मिळाले, तर ते त्याचा जैविक अस्त्र म्हणून वापर करतील. एकदा का असा विषाणू जगात सोडला की मग काय हाहाकार होतो ते आपण सध्या जाणतो. हा धोका कायम असल्याने वैज्ञानिकांनाही या रोगावरील आधुनिक उपचार आणि लसनिर्मितीच्या संशोधनासाठी मूळ विषाणूचे नमुने ठेवणे आवश्यक वाटते. असे अनधिकृत नमुने जगात कुठे ठेवलेले आहेत का, याचा शोध अमेरिकेची सीआयए संघटना सतत घेत असते. त्यांच्या 2002 मधील अंदाजानुसार ४ देशांमध्ये असे नमुने लपवलेले आहेत !
थोडक्यात, हा विषाणू सध्या गाढ निद्रितावस्थेत शीतगृहात आहे. मात्र अनधिकृत मार्गाने जर त्याचा जैविक अस्त्र म्हणून वापर केला गेला तर अनर्थ माजेल. याच भीतीपोटी त्याच्याशी लढण्यासाठी एखादे चांगले औषध आपल्या भात्यात असणे कायम आवश्यक आहे. या हेतूनेच वर उल्लेखिलेले औषध मान्यताप्राप्त करून तयार ठेवलेले आहे. हे जुनेच औषध असून अन्य काही विषाणूंच्या उपचारांसाठी ते वापरले जाते. देवी विषाणूच्या समजातीय विषाणूंवर काही प्रयोग करून त्याची चाचणी घेण्यात आली. यापूर्वी २०१८मध्ये देवीसाठीच्या अन्य एका औषधालाही अशीच मान्यता दिलेली आहे.
विषाणूंचा जैविक अस्त्र म्हणून वापर कधीही न होवो अशीच आपल्या सर्वांची इच्छा आहे. वैज्ञानिकांनी या बाबतीत गाफिल न राहायचे ठरवले असल्यामुळे त्यांनी अशा औषधांची निर्मिती करून ठेवलेली आहे.
...............................................................
प्रतिक्रिया
14 Jun 2021 - 12:53 pm | उगा काहितरीच
रोचक.
14 Jun 2021 - 12:54 pm | Rajesh188
हा शब्द च चुकीचा आहे.त्या पेक्षा सुप्त अवस्थेत गेलेले आजार हा शब्द योग्य आहे.
काही आजार आता होत नाहीत ह्याचा अर्थ ते नष्ट झालेत असे समजणे अशास्त्रीय आहे.
14 Jun 2021 - 1:23 pm | कुमार१
या आजराबाबत
eradicate हा जागतिक अधिकृत वैद्यकीय शब्द आहे.
=
to destroy or get rid of something completely.
एखाद्या गोष्टीचा पुरता नाश करणे, पुरता विध्वंस करणे, निपटून काढणे, उच्चाटन करणे.
14 Jun 2021 - 1:13 pm | सोत्रि
जरा उलटा विचार केला तर -
पारंपारिक युद्धाची किंवा महायुद्धाची शक्यता आता जवळजवळ नाहीच. अण्वस्त्रांच्या वापराच्या भितीमुळे. त्यामुळे प्रॅाक्सीवॅार्स किंवा जैविकयुद्ध हा पर्याय उरतो. करोनामुळे देश एका विषाणूमुळे संपूर्ण देश कसा पॅरॅलाईज होऊन बंद पडू शकतो हे ढळढळीत दिसतं आहे.
त्यामुळे, ह्या ज्या लशींबद्दल बातम्या येताहेत हा विकसीत देश त्या जैविक युद्धाच्या तयारीसाठी तर जुन्या रोगांचा लशी तयार करून ठेवत नसतील?
- (जैविक युद्धाच्या भितीने पछाडलेला) सोकाजी
14 Jun 2021 - 2:05 pm | कुमार१
मुद्दा रोचक व अभ्यासनीय आहे !
14 Jun 2021 - 1:30 pm | Rajesh188
जे जुने विषाणू,जिवाणू आहेत त्याची माणसाला माहिती आहे त्यांचा बंदोबस्त कसा करायचा हे पण माहीत आहे.
ते जैविक हत्यार म्हणून वापरले तरी effectively नसेल.
त्या जीवाणू,विषाणू मध्ये कृत्रिम पणे बदल करून नवीनच विषाणू,जिवाणू निर्माण करून त्याचा वापर जैविक हत्यार म्हणून केला जाईल.
तोफा,बंदुका, missile, रोबोट,drone, पाणबुड्या,आण्विक हत्यार ह्यांना शह द्यायचा असल तर नैसर्गिक जिवाणू ,विषाणू,किंवा संगणक,इंटरनेट ह्यांची पूर्ण वाट लावणारे नवं नवीन व्हायरस निर्माण करावेच लागतील.
त्यांच्या पासून जगातील कोणतीच शक्ती कोणत्या ही प्रबळ व्यक्ती ल वाचवू शकणार नाही.
आणि भविष्यात हेच जग जिंकण्यासाठी वापरले जाईल.
गल्ली तील गुंड.तोफा,बंदुका,अण्वस्त्र वापरतील.
14 Jun 2021 - 1:30 pm | सतीशम२७
निद्रिस्त विषाणू....
निद्रिस्त च राहो ही आशा ....
14 Jun 2021 - 1:49 pm | Rajesh188
पण माणसाची वर्चस्व गाजवण्याची वृत्ती तसे होवू देणार नाही.
ह्या जगाची उत्पती सूक्ष्म तून झाली आणि वर्चस्व गाजवयचे असेल तर.
सूक्ष्म जिवाणू,विषाणू, लेझर ,हवेतील विविध घटक.जे सूक्ष्म स्वरूपात आहेत त्यांच्या वर नियंत्रण मिळवून च वर्चस्व गाजवत येईल.
14 Jun 2021 - 2:01 pm | गॉडजिला
ते ही सोपे नाहि...
14 Jun 2021 - 2:53 pm | ज्ञानोबाचे पैजार
त्या पेक्षा इतक्या वर्षात ते चार देशातले नमुने शोधुन काढुन नष्ट करायला हवे होते. त्याने जगावरचा धोका कमी / नष्ट व्हायला मदत झाली असती.
पैजारबुवा,
14 Jun 2021 - 4:24 pm | आग्या१९९०
ह्यापेक्षा देवीचे लसीकरण करणे अधिक सुरक्षित राहील.
14 Jun 2021 - 4:38 pm | कुमार१
देवीविरोधी लस उपलब्ध असून ती 2002 पासून अमेरिकी लष्करातील काही निवडक लोकांना दिली जाते (बहुदा जे लष्करी लोक दहशतवाद विरोधी मोहिमांमध्ये काम करीत असतात त्यांना).