गेल्या सहस्त्रावधी वर्षांत हिंदुस्थानमध्ये लागलेल्या होळ्या!!

Sumant Juvekar's picture
Sumant Juvekar in जे न देखे रवी...
27 May 2021 - 8:55 pm

परवाच्या होळीला मला आठवल्या त्या राजपूत स्त्रियांनी केलेल्या जोहारच्या होळ्या पृथ्वीराज, संभाजी महाराज, राजा दाहीर यांनी केलेल्या सर्वस्वाच्या होळ्या, नंतर इंग्रजांबरोबर स्वातंत्र्ययुद्धात अनेक वीरांनी केलेल्या आपल्या संसाराच्या होळ्या.

जन आला दिन होळीचा, उधळीत विविध हे रंग
आसेतु-हिमाचल राष्ट्र, होलिका स्वागता दंग !

उत्साह खरोखर मोठा, पक्वान्ने घर घर बनती
पण मज या हर्षोल्हासी, वेगळ्या होलिका स्मरती!

भूपाल सिंध प्रांताचा, आठवतो मज दाहीर
ज्याने पहिला या देशी, झेलला यावनी वार!

कोणी न सहाय्या आला, आर्यावर्तातुनि वीर
धन, दासी, पत्नी, कन्या, वृक लुटून गेले पार!
(वृक=लांडगा)

सिंधची जाहली होळी, परि आर्य गाढ निद्रेत
ती होळी माझ्या ह्रदया, बैसली आज जाळीत!

शतके नंतर कित्येक, सिंधभू भरडली गेली
किति आर्य स्त्रियांच्या तेथे, शीलाची होळी झाली!१

ऐशीच पृथ्विराजाची, शेवटल्या हिंदुभुपाची
जन, सद्गुण अतिरेकाने, लागली वाट हो साची!

रिपु शेष न ठेवायाचा, त्या पुन्हा न देणे संधी
हे तत्व विसरला भूप, सोडला रिपू जो बंदी!

त्या मोहम्मद घोरीने, नृप जेव्हा बंदी केला
अत्यंत पाशवी रित्या, वध त्याचा की हो केला!

या गुणातिरेकाची हो, शिक्षा पुरती भोगियली
अणि राष्ट्रहिताची पुन्हा, पेटली धडाधड होली!२

ये खिलजी लिंगपिसाट, गड चितोड जिंकायाला
अमुचेच लोक मदतीला, भ्रष्टण्या राजपुत शीला!

रजपूत शर्थिने लढले, त्या राक्षस यमदूतांशी
केसरिया केला अंती, जवळी केले मरणाशी!

(केसरिया= जेव्हा आपला पराभव होतो आहे असे कळायचे तेव्हा रजपूत लोक डोक्याला केशरी रंगाचे वस्त्र गुंडाळून मरेपर्यंत लढण्याच्या उद्देशाने गडा बाहेर पडायचे आणि शेवटच्या श्वासापर्यंत लढायचे. या धाडसी प्रकाराला राजस्थानमध्ये केसरिया असे म्हटले जाते)

विकराल शत्रुच्या हाती, पावित्र्य न भंगायाला
जोहार करोनी साऱ्या, अग्नीत निमाल्या सबला!

ती शौर्याची, त्यागाची, त्या चितोडगडची होळी
जणू प्रज्ज्वलंत स्थंडील, जे प्रतिदिन हृदया जाळी!३

अमुच्या वाघाचा छावा, कोंडला शिवाचा पुत्र
धर्मांतर करण्यासाठी, पाशवी छळाचे सत्र!

साहुनी अनन्वित क्लेश, स्थिरचित्त, न ढळला धीर
त्यागिला न अपुला धर्म, जरि तुटून पडले शीर!

देव देश अन् धर्म, यांसाठी सर्वस्वाची
शंभूराजांनी अमुच्या, केली होळी देहाची!

तिनशे वर्षांनंतरही , ती होळी मज आठवते
धमन्या या तटतटतात, अन् रक्त गरम हे होते!४

शिव स्थापित अमुचे राज्य, ब्रिटिशांच्या हाती गेले
ते सोडवण्याला पुन्हा , किति पुनश्च वीर निमाले!

किती अंदमानला गेले , किति फासावरती चढले
किति गोळ्या खाऊन मेले, किति कसे मारले गेले!

पेटल्या किती त्या होळ्या, स्वातंत्र्याच्या वेदीवर
कुणि सर्वस्वाच्या होळ्या, करुनी चढले सरणावर!५

प्रतिवर्षि होलिका तुम्ही, श्रद्धेने पूजित जाव्या
पण वरतील साऱ्या होळ्या, स्मरणात सदोदित ऱ्हाव्या!!

दादासाहेब दापोलीकर
९९६७८४०००५

कविता