मित्रहो, काही काळापासून मिपावर येत असलेल्या 'चालू घडामोडी', 'सध्या मी काय पाहतोय' वगैरे धाग्यांवर अनेक मिपाकर उत्साहाने सहभाग घेत आहेत. या धाग्यांमधून 'बाहेर'च्या जगातील लोक काय करत आहेत याची माहिती मिळत असली तरी खुद्द मिपाकर काय करत आहेत, हे कळत नाही. कसलातरी छंद जोपासणार्या, काहीतरी वेगळेच करण्याची आवड असलेल्या, आपण स्वतः काहीतरी झपाटून केले पाहिजे असे वाटत असलेल्या हरहुन्नरी, हौशी, छंदिष्ट मिपाकरांसाठी हा धागा आहे. आपण अगदी छोटेसे का होईना, पण हौशीने स्वतः काही करत असाल, नवीन काही शिकत असाल, कश्यात तरी सहभागी होत असाल तर ते इथे अवश्य लिहावे अशी सर्वांना विनंती आहे. तर आता सुरूवात स्वतःपासून करतो.
मी रंगवत असलेली चित्रे घरात सर्वत्र लावत असलो, तरी त्यांना चौकटी करवून घेणे कधी जमले नाही. मला एक चित्र करायला जेवढा खर्च येतो, त्याच्या अनेक पटींनी एकेका चवकटीवर करावा लागेल, हे त्याचे मुख्य कारण. जुन्या बाजारात कधी कधी चांगल्या चवकटी असलेले जुने आरसे वा चित्रे मिळतात, पण आपले चित्र अगदी नेमक्या त्याच आकाराचे असेल, तरच त्या वापरता येतात.
मध्यंतरी तूनळीवर अचानकच ' हौ टु मेक वुडन फ्रेम' असे काही बघायला मिळाले. असे बरेच विडियो बघितल्यावर आपण हे करून बघायला हवे असे वाटू लागले. मग बाजारातून काही लाकडे, सेट स्क्वेयर, चिमटे, कॉर्नर स्ट्रॅप, मायटर बॉक्स, करवत वगैरे आणून प्रयत्नाला लागलो.
लाकूड कापताना ते अजिबात हलू नये म्हणून क्लँप वगैरे लावणे, करवत चालवताना हात स्थिर ठेवणे, मोजमाप अगदी अचूक करणे, हे अगदी आवश्यक असल्याचे थोड्या चुका झाल्यावर लक्षात आले. तसेच अनेक बारीकसारीक गोष्टी या विचार, प्रयत्न आणि जुगाडबाजी यातूनच साध्य होतात आणि असे करताना मोठेच समाधान लाभते, याची वारंवार अनुभूति येत गेली.
योग्य त्या मापाचे तुकडे मायटर बॉक्सच्या सहाय्याने कापल्यावर ते बरोबर काटकोनात जुळवून आधी चिकटवताना कॉर्नर स्ट्रॅपचा चांगला उपयोग होतो.
.
सुरूवातीला अगदी साधी फ्रेम बनवून बघितली. नंतर जरा रुंद आणि कारागिरी केलेल्या लाकडाची. त्याबरोबरच फ्रेमला वेगवेगळ्या प्रकारे रंगवणे आणि रंगातला भगभगीतपणा घालवण्यासाठी घासणे, खरवडणे, रंगावर रंग चढवणे वगैरे उद्योग करून बघितले.
.
याप्रकारे केलेल्या प्रयत्नातून थोड्या चित्रांना आता चवकटी लाभल्या आहेत आणि काही नवीनच रोचक काम करण्यातून मिळणारा आनंद आणि समाधान यांचा लाभ होत आहे. आता आणखी कठीण, उत्तम दर्जाच्या चवकटी करण्याचा बेत आहे.
अन्य मिपाकर पण आपापल्या उद्योगांबद्दल लिहून या धाग्यात भर घालत राहतील अशी आशा आहे.
प्रतिक्रिया
15 Apr 2021 - 4:17 am | टवाळ कार्टा
चित्रे भारी आहेत, मुख्य म्हणजे "समजतात" ;)
(ते खालच्या बाजूला उजव्या कोपर्यातले सोडून)
15 Apr 2021 - 7:54 am | चित्रगुप्त
@टवाळ कार्टा: कोपर्यातले चित्र कालांतराने 'समजण्यासारखे' होईल. या फोटोतील बरीचशी चित्रे अद्याप अर्धवट स्थितीत आहेत. समोर लावलेली असली की कशात काय काम करायला हवे ते सुचत जाते. कधीकधी चित्र अमूलाग्र बदलते सुद्धा. ते उजव्या कोपर्यातले दोन - तीन वर्षापूर्वी सुरु केले होते, तेंव्हा टेबलावर कॅनव्हास नुस्ते पसरवून ते रंगवले होते. यंदा पुन्हा अमेरिकेत आल्यावर हे फ्रेमिंगचे नवीनच सुरू झाले, मग त्या चित्रासाठी योग्य आकाराचा लाकडी स्ट्रेचर देखील बनवता आला, आणि त्यावर ते चढवले. आता जसे सुचेल त्याप्रमाणे पुढे काम करायचे आहे. अजून काही सुचलेले नाही. (या प्रकारे मी कसे काम करतो ते दोन भागातील 'एका तैलचित्राची जन्मकथा' या २०१२ सालच्या लेखात सविस्तर दाखवले होते, त्यावर बरीच चर्चादेखील झाली होती. वाचलेला नसेल तर तो अवश्य वाचावा.
चित्रे आवडल्याचे वाचून आनंद वाटला. अनेक आभार.
15 Apr 2021 - 8:08 am | उपयोजक
:))
तसल्या 'अनाकलनीय' चित्रांनाच लिलावात कोट्यावधी रुपये मिळतात म्हणे! ;)
15 Apr 2021 - 8:34 am | चित्रगुप्त
@ उपयोजकः अनाकलनीय चित्रे आणि त्यांच्या कोट्यावधीच्या किंमती हा सुद्धा एक अनाकलनीय प्रकार आहे. कलेपेक्षा तो अर्थशास्त्राचा विषय असून त्यात कंपूबाजी, सांस्कृतिक भ्रष्टाचार, पैसा काळ्याचा पांढरा करणे , बँकांना गंडवणे वगैरे अनेक भानगडींचा गुंता असतो. वासुदेव गायतोंडे यांचे एक अमूर्त चित्र काही वर्षांपूर्वी एका लिलावात चोवीस कोटींमधे विकले गेले होते, त्यावर मी 'गाय' चे चोवीस कोटींचे चित्र, आणि साबरमतीच्या संताचे टमरेल' हा एक मजेशीर लेख लिहीला होता.
प्रतिसादाबद्दल आभार.
22 Apr 2021 - 10:39 am | चौकस२१२
चित्रगुप्त साहेब तुमचे गाय २४ कोटी लेख वाचून गम्मत वाटली आणि माझ्य मनात आलेले प्रश्न अगदी मस्त उपहासात्मक पद्धतीने दुसरे कोणी तरी पण लिहिते हे वाचून बरे वाटले जर तुमच्या सारख्या कलाकाराला सुद्धा २४ कोटी बद्दल उपहासात्मक गम्मत वाटत असेल तर माझ्यसारखाय रुक्ष तांत्रिक माणसाला काय वाटत असेल... ?
हे मान्य कि अप्रतिम कलाकृतीला चांगली किंमत दयावी लागते .... कधी ती योग्य वाटत्ते कधी अगदीच " हवेतील " वाटते , त्यामुळे कलाकृतीला चांगले पैसे मिळण्याबद्दल दुमत नाहीच ... जिथे नुसते नाव होऊन हवा होते तिथे मात्र हसू येते
अर्थात उद्य्या मोना लिसा जर विकत कोणी घेणार असले तर सौदी कीव ब्रुनेई चा राजा, किंवा बिल गेट यांच्यातील ती अहंकाराची स्पर्धा राहील
मोना लिसा ला ट्रेडिग साठी विकत घेणे म्हणजे अगदी ILLIQUID मार्केट मध्ये खेळयनसारखे आहे असे वाटते ...
थोड्या तांत्रिक आणि व्यव्हारी भाषेत सांगायचे तर उत्तम दर्जाचा रंगयाचा चष्म घ्यायचा तर रेबॅन ला चांगले पैसे मोजन्य्यात काही वाटत नाही कारण वर्षनुवर्षे त्यांनी त्यात काम केलं आहे
पण तेच उद्या " सेलिब्रिटी चषमा ब्रँड म्हणजे रितिक रोशन गॉगल " निघाला तर ती नुसती हवा ...
असो मला मुद्दा नीट मांडता आलं कि नाही कळत नाहीये ...
15 Apr 2021 - 4:59 am | साहना
कार्पेट म्हणजे आपण विदेशांत आहात
15 Apr 2021 - 8:08 am | चित्रगुप्त
@साहना: तुमचा प्रतिसाद म्हणजे पूर्वीच्या पुस्तकांमधून हमखास आढळणारा वाक्प्रचार - "हे चाणाक्ष वाचकांनी केंव्हाच ताडले असेल" याचे उदाहरण. खूप काळानंतर हे वाक्य या प्रतिसादाच्या मिषाने आठवल्याने खूप छान वाटले.
तुम्ही बरोबर ओळखले. आम्ही जुलाई २०२० पासून Charlotte NC मधे आहोत. इकडे आल्या आल्या कोविडची लागण होऊन बेजार झालो होतो, त्या अनुभवावर 'कोविड : एक इष्टापत्ती ?? (गेल्या दोन महिन्यातील स्वानुभव)' हा लेख लिहिला होता, कदाचित वाचनात आला असेल. अमेरिकेत उत्तम दर्जाचे लाकूड आणि अवजारे मिळत असल्याने असे काही उद्योग हाती घेणे इथे सोपे जाते. भारतात कदाचित हे जमले नसते. नाहीतर गेल्या पन्नासेक वर्षात मी ते केलेच असते.
तुमचे जे लिखाण माझ्या वाचनात आलेले आहे, त्यावरून तुम्ही अतिशय साक्षेपी, उद्यमी आणि वेगळा विचार करणारांपैकी असून वेगवेगळे छंद जोपासत असाल असे वाटते. तरी या धाग्यावर त्याविषयी जरूर लिहावे ही विनंती.
15 Apr 2021 - 8:45 am | खेडूत
मागच्या धाग्याच्या विषयावरून मी भारतात आलाय का.. असा प्रश्न विचारला.. :))
असो, हा धागा आवडला. जमेल तसे उपद्व्याप करत असतो.
जर्मनीतील मार्केट मधून एक कार्व्हींग टूल सेट आणला होता पण तशी मऊ लाकडे इथे मिळाली नाहीत.. किंवा मी शोधली नाहीत म्हणू. तुमच्या फ्रेमला किंचित बदल म्हणून असे कुरतडून डिझाईन करता येईल. शिवाय तापलेल्या धातूने (अर्धवट जाळून) नक्षी करता येईल!
15 Apr 2021 - 11:58 am | साहना
अमेरिके मधील DIY संस्कृती जबरदस्त आहे. माझे प्राध्यापक सौमेन ह्यांचा हा खूप जुना ब्लॉग पोस्ट नेहमी आठवत आले आहे : https://www.cse.iitb.ac.in/~soumen/APKGKAH/flaky-products/maintain.html
लाकूडकाम अजून तरी मी केले नाही आणि तशी आवड नाही पण एपॉक्सी वापरण्याची इच्छा आहे.
तुम्हाला आवड असेल तर जवळच्या कम्युनिटी कॉलेज मध्ये अनेक आणि माफक दारांत खूप मजेदार कोर्सेस असतात. मी पॉटरी चा एक कोर्स केला होता आणि डझन पेक्षा जास्त जबरदस्त पॉट्स, सुशी प्लेट्स बनवले होते. २५ तासांच्या कोर्स साठी मी २०० डॉलर दिले.
त्यांनतर मी शिकार हा कोर्स करून हंटिंग लायसेन्स मिळवले आणि शिकार करू लागले. धनुष्य बाण वापरून सुद्धा शिकार केली आहे. पण हे सर्व काही खूपच शारीरिक ताणाचे काम असल्याने मागील एक वर्षांत शिकार केली नाही पण रेंज मध्ये भरपूर प्रॅक्टिस करत आले आहे.
पण कोविड मध्ये मी जर काही शिकले असेल ते म्हणजे खूप उच्च दर्जाचा ब्रेड बनवणे.
15 Apr 2021 - 1:13 pm | कंजूस
शिकारीचे तिकडे काय नियम आहेत काय शिकायला मिळाले यावर कधीतरी लिहावे.
दिवाळी अंकासाठीही देऊ शकता.
16 Apr 2021 - 10:31 am | साहना
नक्की
21 Apr 2021 - 11:52 pm | चित्रगुप्त
तुम्ही शिकलात तसा उच्च दर्जाचा ब्रेड कसा बनवतात हे यूट्यूबवर वगैरे आहे का ? असल्यास कृपया दुवा द्यावा. मिपावर पाककृतीत देता आले तर उत्तमच.
22 Apr 2021 - 10:42 am | चौकस२१२
पण कोविड मध्ये मी जर काही शिकले असेल ते म्हणजे खूप उच्च दर्जाचा ब्रेड बनवणे.
वाह .. आधुनिक यांत वापरून कि नुसता अव्हन वापरून
फोटू द्या , काय काय करता
चिबा ता
व्हिएन्ना
सावर डो ?
कि भारतीय मसाले , जिरे वैगरे
मध्ये काळे ऑलिव्ह घालून केला होता .. मस्त झाला होता
15 Apr 2021 - 6:33 am | कंजूस
सर्व चित्रे आवडली आहेत.
________________
या कामाविषयी -
बरेच प्रश्न पडले आहेत १) कोपऱ्याचा कसा केला - चिकटवले का सांधा करून लाकडाचीच खिट्टी मारली? २)मागच्या आधारासाठी वाटरप्रुफ प्लाइ वापरले का? ३)चित्र घेऊन जायची वेळ आली तर packing चे झाकण बनवून ते मागच्या बाजूस लावले तर तेच पुढे लावून बंद करता येईल. ४) चित्रावर काच असते का?
एक वेगळा प्रश्न की चित्रांना काही standard size ठेवली तर ती साठवणे सोपे जाईल.
तुम्ही म्हणता तसे जुन्या बाजारातले आरसे वगैरे घेऊन फ्रेम केल्यास ती सीजन्ड असते तशा नव्या फ्रेम पट्ट्या आणल्यास तीन वर्षे सीजन करावी लागेल.
आमच्या घराजवळ एका गराजमध्ये लाकडाच्या पट्ट्यांच्या फ्रेम करायचा कारखाना होता तो मी पाहात असे.
____________________________
माझ्या छोट्याशा बाल्कनीत जी झाडे आहेत त्यावरच प्रयोग करतो. कुंड्यांवर प्रयोग करतो. कुंड्या टांगणे, वेलांना आधार, कमी जागेत अधिक कुंड्या बसवणे इत्यादी. ते घराबाहेर न पडताही चालू ठेवता येते.
_____________________
अगदी शाळेत असतांना पहिला उद्योग पुस्तकास हार्ड बाउंड करणे. पुठ्ठा आणि कापड लावून मुखपृष्ठाचे चित्र वर आणणे. पण त्या वेळेस गोंद असायचा तो फार घट्ट चिकटायचा नाही. एका वर्गमित्राच्या वडलांचा प्रेस होता त्याने सांगितले की 'शिरस' वापरावे लागते पण ते तुला जमणार नाही. तर ते त्यावेळचे सुपर ग्लू होते आणि खटपटींना D I Y म्हणतात हे आता कळले.
आता हार्ड कवर कलेक्शन मागे पडली किंवा महाग झाली आणि किंडल आले. तरी टेबल बुक्स अशीच असतात.
________________
फोटोंसह लेख झकास झाला आहे. स्फुर्तिदायक.
15 Apr 2021 - 7:16 pm | शशिकांत ओक
चित्र काढायच्या पेक्षा खर्च आणि सुतारकामाची उसाभर जास्त...
कोरोना ने तेही करायची वेळ आणली आहे.
16 Apr 2021 - 12:18 pm | उपयोजक
खर्चिक छंद ताबडतोब सोडावेत. कमावलेला बराचसा पैसा हा छंदावर खर्च होणार असेल तर मनाचा आनंद वगैरे गोष्टी बाजूला ठेवून बचत करणे श्रेयस्कर. छंदातून भरपूर आर्थिक कमाई होणार असेल तर छंदावर वेळ आणि थोडे पैसे अवश्य खर्च करावेत.
21 Apr 2021 - 10:56 pm | चित्रगुप्त
माझ्या जीवनात तरी मी छंदाला नेहमी प्राथमिकता देत आलो आहे. उत्तम दर्जाचे रंगसाहित्य ब्रश नाईफ कागद कॅनव्हास याचा साठा नेहमीच असतो. अर्थात बरेचसे काम स्वतः काही जुगाड भिडवून करण्यातून स्वस्तात बरेच काही करता येते. कधी कधी अतिशय स्वस्तातले ब्रश सुद्धा विशिष्ट प्रकारे वापरून चांगले काम करता येते आणि घरातल्याच फेकण्याच्या वस्तू सुद्धा कल्पकतेने वापरता येतात.
गेली दहा वर्षे तरी मला चित्रकलेतू काहीच कमाई झालेली नाही पण म्हणून मी काही ते सोडलेले नाही. कुठल्या ना कुठल्या स्वरूपात चित्रकला चालूच आहे.
नुक्तीच मी सुमारे १०० - १५० डॉलरला मिळणारे कॅनव्हास दहा - पंधर डॉलर मधे (तेही उत्तम दर्जाचे) घरी बनवण्याची क्लुप्ती शोधून काढली आहे. ते करून बघितल्यावर इथे लिहीणार आहे.
"करले जुगाड करले करले कोई जुगाड" यात आनंद - समाधान आणि पैसे वाचवणे हे सर्वच साध्य होते.
21 Apr 2021 - 10:42 pm | चित्रगुप्त
लेख आवडला आणि स्फूर्तीदायक वाटला हे वाचून खूप आनंद झाला.
१. चारी कोपरे वुड ग्लू लावून कॉर्नर स्ट्रॅप मधे आवळून रात्रभर ठेवले. सकाळी मागल्या बाजूने २-३ इंचाचे त्रिकोणी तुकडे (जाडे प्लास्टिक किंवा टणक जाडा कागद - हे दोन्ही दुधाचे रिकामे कॅन किंवा डबे कापून मिळवतो) स्टेपल गन वापरून ठोकले. तसा वुड ग्लू इतका मजबूत असतो की काढायला गेले तर लाकूड तुटते पण सांधा निघत नाही.
२. मागून फक्त त्रिकोणी तुकडे लावले आहेत. चित्र कॅनव्हासवर असल्याने आणखी कसली गरज नाही.
३. मोठे चित्र बाहेरगावी कोरियरने पाठवायचे असेल वा बरोबर न्यायचे असेल तर उघडून रोल करून नेतो मात्र बाहेरची फ्रेम नेता येत नाही. आत्तापर्यंत मी फ्रेम करतच नसे हा उद्योग आत्ताच सुरू केला आहे. पूर्वी प्रदर्शने करायचो तेंव्हा भारतात सर्व काम सुताराकडून करवून घेत असे.
४. कॅनव्हासच्या चित्राला पुढून काच लावयची गरज नाही.
५. मी एकाच आकाराची निदान दोन तरी चित्रे करतो म्हणजे एकमेकांवर ठेऊन पॅक करणे वा साठवणे सोपे जाते.
६. अमेरिकेत तरी उत्तम दर्जाचे अनेक प्रकारचे सीझन्ड लाकूड मिळत असल्याने काही करावे लागत नाही.
.... पुण्यात 'बोपोडी' भागात वर्मा टिंबर आणि २-३ दुकानात हल्ली उत्तम दर्जाचे परदेशी लाकूड ३०-४० रुपये किलो या भावाने मिळत असल्याचे समजले आहे. कुणी जाऊन बघितले तर अवश्य कळवावे.
22 Apr 2021 - 1:13 pm | कंजूस
चित्र टिकवायचे फ्रेम केलेले म्हणजे सांधा आणि मटिअरिअलचे काय केले ही शंका होती. वुडग्लू, सीजन लाकूड आणि दोन एकाच आकाराची चित्रे ही कल्पना आवडली.
15 Apr 2021 - 7:54 am | तुषार काळभोर
प्रेरणादायी धागा आहे.
मायटर बॉक्स म्हणजे तो करवत ठेवण्यासाठी वापरलेली लाल वस्तू का?
एकदम साधी पण प्रचंड उपयोगी कल्पक वस्तू आहे.
' बाईंच्या' चित्राची चौकट सुरुवातीला केल्यापैकी आहे का? तुलनेने साधी वाटली. तिसऱ्या चित्राची चौकट मात्र अतिशय साजेशी आहे.
या धाग्यातील प्रतिसादांतून प्रेरणा घेऊन काहीतरी नक्की करायची ईच्छा आहे.
15 Apr 2021 - 8:11 am | चित्रगुप्त
@ कंजूस आणि तुषार काळभोरः आणखी फोटोंसह सविस्तर प्रतिसाद उद्या देतो.
15 Apr 2021 - 8:12 am | श्रीरंग_जोशी
चित्रगुप्त साहेब - डिआयवाय (डू इट युअरसेल्फ) उपक्रम आवडला.
मी घरात एका ठिकाणी सामान ठेवण्यासाठी भिंतीला रॅक लावायचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी स्टड फाइंडर, हॅन्ड ड्रिल वगैरे खरेदी झाली. शेल्फच्या असेंब्ली मॅन्युअलमधल्या सूचनांनुसार योग्य ती बीट वापरून छिद्रे केली. परंतु शेल्फबरोबर मिळालेले स्क्रू व भोवतीचे प्लॅस्टिकचे फिलर (योग्य शब्द आठवत नाही) त्या छिद्रांपेक्षा जाडे आहेत. पुढे काय करायचे हे जालावर शोधणार आहे. रॅक खरेदी करुन दीड वर्षे झाली ;-).
15 Apr 2021 - 8:39 am | खेडूत
@रंगा, प्रॉब्लेम सोपा दिसतोय. Rawlplug, ज्याला मराठीत रावेल प्लग म्हणतात तो बहुधा वेगळ्या व्यासाचा आलाय. त्याचा बाह्य व्यास किती मिमी आहे तो पाहून एक साईझ लहान मागवा. ज्या छिद्रात बसवायचा त्याचाही व्यास किंचित लहान किंवा तितकाच चालेल. अमेझॉन वर असोर्तेड प्लग चे पाउच मिळतात, किंवा मोठ्या मार्केट मध्ये टूल विभागात असतात. ते योग्य मापाचे टाकून काम होऊन जाईल.
15 Apr 2021 - 8:52 am | चित्रगुप्त
@ श्रीरंग जोशी: तुम्ही लिहिलेल्या 'स्क्रू भोवतीचे प्लॅस्टिकचे फिलर ' ला देसी भाषेत 'गिट्टी' म्हणतात. विटांच्या वा काँक्रीटच्या भिंतीत स्क्रू किंवा खिळा टिकून रहावा, म्हणून भिंतीत आधी ड्रिलने भोक पाडून त्यात गिट्टी ठोकून बसवून मग त्यात स्क्रू पिळतात. एका अर्थी या गिट्टीचे काम स्क्रूभोवतालची भिंत लाकडासारखी वा रबरासारखी करणे हे असते. मात्र तुम्ही अमेरिकेतील लाकडी घरात हे काम करत असल्याने गिट्टीची गरज पडणार नाही, किंबहुना ती वापरायलाच नको. तुम्ही स्टडच्या बरोबर मध्यात स्क्रू पेक्षा कमी व्यासाच्या बिटने थोडेसेच भोक करून त्यात सरळ (सुमारे तीन इंच लांबीचा) स्टीलचा स्क्रू ड्रिलच्या सहाय्याने लावून टाकू शकता. हे स्टड सुद्धा ओक, मोहोगनी वगैरे टणक लाकडाचे नसून पाईनचेच मऊसर असतात.
तुम्ही अमेरिकेच्या घरात असे अनेक उद्योग नेहमीच करत असाल, त्याबद्दल वाचायला आणि चर्चा करायला खूप आवडेल.
16 Apr 2021 - 11:28 am | राजेंद्र मेहेंदळे
मी या कामासाठी रावळ प्लग मिळाले नहीत तर सरळ काड्यापेटीच्या काड्या वापरतो. तेही लाकुड मउ असते आणि भोक बुजवायला चालते (खिळा धरुन राहते). अर्थात इथे भिंत विटा किवा सिपोरेक्स ब्लॉकची असते यु एस मध्ये प्लाय सारखी पार्टीशन/तयार भिंती असतात त्यामुळे मेहनत कमी लागते. मात्र भाड्याच्या घरात राहात असाल तर सोडताना सर्व साफ करुन द्यावे लागेल.
15 Apr 2021 - 9:43 am | भुजंग पाटील
तुम्ही शिटरॉक वॉल मध्ये ड्रील करत असाल तरच त्या केसींगची ची गरज आहे.
स्टड फाइंडर आहे म्हटल्यावर फक्त जाड स्क्रु ने तुमचे काम सोपे व्ह्यायला हवे.
16 Apr 2021 - 10:41 am | मनो
+१
अमेरिकेत घराची भिंत वेगळी असते. जर लाकडी स्टडमध्ये ड्रिल केले असेल तर सरळ तिथेच फक्त स्क्रू लावा. ते प्लास्टिक चे ड्रायवॉल अँकर आहेत. जर तुम्ही स्टड न ड्रिल करता नुसत्या कागदी भिंतीत (शीट रॉक) लावणार असला तरच अँकर लागतात.
18 Apr 2021 - 5:09 pm | चौकस२१२
हेच मला म्हयायचे होते .. लाकडी भिंत म्हणजे नक्कीकाय ? लाकडाची चौकाट आणि त्यावर कागदी भिंतीत (जीप रॉक ) असेल तर स्टड फाइंडर ने आतील लाकडी पट्टी शोधावी लागेल मग रावळ प्लग वैगरे कशाला? सरळ त्या लाकडात यौग्य तो सेल्फ टॅपिंग वूड स्क्रू चालेल
पट्टी यौग्य ठिकाणी नसले तर मग टोगल स्क्रू
16 Apr 2021 - 11:09 am | साहना
प्लास्टिक च्या फिलर ना अँकर असे म्हणतात. तुम्ही जो रॅक दाखवला आहे तो स्टड वर लावण्याचा आहे तिथे हे अँकर्स वापरण्याची गरज नाही. स्टड कदाचित ८० किलो वजन घेऊ शकतील पण ड्रायवॉल बहुतेक वेळा फारतर ४० किलो वजन घेऊ शकते आणि ते सुद्धा काही वर्षांनी पडू शकते. तो रॅक स्टड नसला तर लावूच नका.
16 Apr 2021 - 9:17 pm | श्रीरंग_जोशी
मंडळी, मी मांडलेल्या समस्येवर तुम्हा सर्वांचे तपशीलवार उपाय पटले. यासाठी मनःपूर्वक धन्यवाद.
या विकांताला हे काम पूर्ण करतो.
स्टडमधेच छिद्रे केली आहेत. त्यामुळे स्क्रू थेट ड्रिलने लावतो. Rawl plug चा उपयोग टाळतो.
या रॅकचा फार अवजड सामान ठेवायचे नाहीये. नेहमी न लागणार्या. पण उगाच जागा व्यापणार्या वस्तू ठेवायच्या आहेत.
17 Apr 2021 - 1:05 am | भुजंग पाटील
@ श्रीरंग
आपली रॅक ची अॅमॅझॉन लिंक smile.amazon.com आहे असे दिसले, त्या बद्दल तुमचे कौतुक. :)
17 Apr 2021 - 8:45 am | श्रीरंग_जोशी
गेल्या सहा वर्षांपासून मी माझ्या अॅमेझॉन स्माइल प्रोफाइलमधे Save Indian Farmers या संस्थेची निवड करुन ठेवली आहे.
17 Apr 2021 - 9:25 am | चौकस२१२
श्रीरंग साहेब भिंत कशाची बनलेली आहे त्यावर सगळे अवलंबून आहे
- पूर्ण विटांची किंवा काँक्रेट ब्लॉक असले तर यौग्य असा खिळा+ केमसेट डायना बोल्ट आणि भोक पाडण्यासाठी मेसनरी ड्रिल लागेल
- भिंत पोकळ असेल आणि मॅगी लाकडाची पट्टी नसले तर टॉगल स्क्रू लागतील
https://www.youtube.com/watch?v=dMaWRaJ2GXQ
17 Apr 2021 - 9:38 am | श्रीरंग_जोशी
चौकस साहेब, माहितीसाठी धन्यवाद.
भिंत लाकडी आहे. स्टडच्यव पोझिशन शोधून छिद्रे केली आहेत. तुम्ही दिलेला व्हिडिओ बघतो.
15 Apr 2021 - 8:58 am | चित्रगुप्त
@ श्रीरंग जोशी: आताच तुमच्या रॅकचे फोटो बघितले. अगदी सोपे आहे, स्क्रूसाठी धातुचे वॉशर वापरून चांगले लांब कोणतेही मजबूत स्क्रू लावून मोकळे व्हा. चिंताकी कोई बात नै सरजी. मात्र स्क्रू ड्रिल मशीननेच लावा.
15 Apr 2021 - 9:17 am | कंजूस
म्हणजे स्क्रूला सुतळी गुंडाळून त्याला फेवीकोल ( सिंथेटिक ग्लू फॉर क्राफ्ट) लावून लावणे.
15 Apr 2021 - 9:46 am | सुबोध खरे
गिट्टी किंवा रावळ प्लग नसेल तेंव्हा मी फुकट गेलेल्या झाडूच्या मागच्या जाड काड्या किंवा काडेपेटीच्या काड्या गुल काढून टाकून वापरतो. भोक लहान मोठे पडले असले तरी चिंता नसते.
भारतात सर्व विटा सिमेंटच्या भिंती असतात तेथे या वर्षानुवर्षे उत्तम चालतात.
15 Apr 2021 - 10:26 am | मुक्त विहारि
सध्या तरी दिवाळी अंक वाचत आहे...
15 Apr 2021 - 12:29 pm | साहना
मला काही दिवस आधी एका मोठ्या दरवाज्याला पडदे लावायचे होते. ड्रिल वगैरे होतेच पण पडद्याचा बार अगदी आडवा कसा लावावा ह्याचा विचार करत होते. दरवाज्याची रुंदी साधारण ६ फूट होती आणि त्याशिवाय बाजूला दोन छोट्या खिडक्या त्यामुळे साधारण १० फुटांचा पडदा हवा होता आणि एका सरळ रेषेंत तीन ड्रिल होल करायचे होते. आता हि रेषा जमिनीला १००% कशी समांतर ठेवावी ह्याचा मी खूप विचार केला. youtube वर अनेक व्हिडीओ असले तरी एकटीने आणि ते सुद्धा १० फुटांवर कसे लेवल ठेवायचे समजत नव्हते. लेव्हलर टूल असले तरी १० फुटांच्या अंतरावर काही डिग्रीचा जरी फरक पडला तरी पडद्याचा बार दुरून वाकडा दिसला असता.
नंतर भारतांत गवंडी लोक एक यंत्र वापरतात ते आठवले. एक साधी दोरी आणि तिला खाली निमुळते वजन. ह्याला इंग्रजीत काय म्हणतात हे ठाऊक नसल्याने होम डेपो मध्ये ते मिळेल कि नाही ठाऊक नव्हते. बराच विचार केल्यानंतर ह्याला मराठीत ओळंबा म्हणतात हे आठवले आणि शब्दकोशावरून ह्याला मेसन्स प्लम्ब बॉब म्हणतात हे समजले मग हा होम डीपो मध्ये सापडला. मग एका बाजूला ड्रिल केले, जमिनीपासून त्याची उंची ह्या बॉब ने निर्धारित केली आणि मग तोच बॉब दुसऱ्या बाजूला वापरून त्याच उंचीवर दुसरा होल केला आणि पडद्याचा बार लावला.
मग एका अमेरिकन कन्स्ट्रक्शन वर्करला विचारले नि त्याने मला सेल्फ लेव्हलिंग लेसर मशीन असते ती दाखवली. अर्थांत इतकी महागडी मशीन मला कामाची नव्हती त्यामुळे घेतली नाही. किमान ५ तरी पडदे मी ह्या ओळंब्याचा साहाय्याने लावले.
15 Apr 2021 - 12:40 pm | मुक्त विहारि
मी हेच काम दारूच्या बाटलीच्या सहाय्याने केले आहे....
15 Apr 2021 - 2:33 pm | कंजूस
पाण्याने भरलेली रबरी नळी वापरतात ना?
15 Apr 2021 - 5:21 pm | मुक्त विहारि
पण पारदर्शक नळी नसेल तर, ओळंबा किंवा दोरी आणि जड वजन पण चालते..
प्रात्यक्षिक दाखवीन...
16 Apr 2021 - 12:46 pm | साहना
ओळंबा गवंडी लोक कशासाठी वापरतात मला ठाऊक नाही पण मी ओळंबा खालील प्रकारे वापरला.
जमीन हि सपाट असेल तर आधी भिंतीवर एक टिम्ब काढायचे आणि ओळंबा वापरून टिम्ब आणि खालील जमीन ह्यांतील अंतर मोजायचे. मग दूर जाऊन जमिनीपासून तितक्याच वर दुसरे टिम्ब काढायचे. आता तुम्ही दोन्ही टिम्ब मधून रेषा काढली तर ती खालील जमिनीला पॅरलल राहील.
उदाहरण म्हणजे समाज एका खोलींत तुम्हाला ५ ठिकाणी विजेची स्विच लावायची असतील तर हि सर्व एकाच उंचीवर असणे आवश्यक आहे. मला वाटते तिथे पाण्याची नळी विशेष उपयोगी नाही.
16 Apr 2021 - 11:33 pm | सुक्या
भिंत बांधताना ती जमीनिशी काटकोनात आहे की नाही ते चेक करण्यासाठी गवंडी ओळंबा वापरतात. तो नाही वापरला तर भिंत वेडी वाकडी उभी राहील.
बाकी ओळंबाचा हा नवीन उपाय भारी आहे.
मी या कामासाठी, छताचा किंवा जमीनिचा रेफरंस वापरतो. म्हणजे छत त्रिकोणी नसेल तर मेजरिंग टेप वर छतापासुनचे अंतर मोजुन घेतो तेच सगळीकडे वापरतो. छत त्रिकोणी असेल तर तेच अंतर जमीनिपासुन मोजतो.
बाकी आम्रविकेत डीआयवाय केले नाही तर भरपुर पैसे खर्च करावे लागतात. कारागिर कधी कधी मनाला येइल ते भाव लावतात.
15 Apr 2021 - 12:56 pm | चौकटराजा
डी आय वाय व मी या सदराखाली एप्रिल २०२१ ची मर्यादा घालायची मी म्हटले तर उडदाचे पापड , साबुदाण्याच्या पापड्या , रव्याच्या कुरडया सध्या करीत आहे !
मात्र ही मर्यादा ओलांडायची झाली तर एक स्वतंत्र धागाच काढावा लागेल इतक्या लटपटी मी केल्या आहेत.
माझे निरीक्षण असे आहे की .. मराठी माणूस डी आय वाय बाबतीत जगाच्या फार मागे आहे. खरे तर तो आंतरजालावर ज्ञान या बाबतीत मागेच आहे ! त्याचे मन मला आरक्षणात नोकरी कशी मिळेल यातच जास्त गुंतले आहे ! याउलट हिंदी भाषिक पुरुष व स्त्रिया या चौफेर डी आय वाय विषयावर उदारपणे यू ट्यूब मध्ये माहिती देत आहेत. अमेरिकन लोकांबद्दल तर बोलायलाच नको . तिथे लेबर महाग असल्यामुळे कदाचित ( एक ब्लॉगर ने एल ई डी दिवा बदलण्यासाठी रु १०००० अमेरिकेत घेतले कारण तासावरच्या मजुरीत हा मोबदला द्यावा लागला म्हणे असे सांगितले आहे ! ( यांचा हात पोहोचत नव्हता )) तिथे डी आय वाय ला पर्याय नाही !
मला अनेक इलेक्ट्रॉनिक रिपेर वाल्यानी सांगितले की माझ्या जवळचा वायरलेस मायक्रोफोन " वायर्ड " मध्ये रूपांतर होणार नाही .यू ट्यूब वर शोध घेतला व एका कृष्ण वर्णीय ब्लॉगर याचा मार्गदर्शना खाली मी ते काम स्वतः: घरी केले. आपल्या आजुबाजूच्या नातेवाईकावरून ,मित्रांवरून , आपल्या देशवासीयांवरून आपले जगाबाबत प्रतिकूल मत बनवू नये असा मी यातून धडा घेतला आहे !!
15 Apr 2021 - 1:20 pm | कंजूस
खरं आहे. आपण मागेच आहोत. कारण पैसे आहेत, वस्तू विकत मिळते तर भंगार खटपट का करायची हे विचार.
15 Apr 2021 - 4:57 pm | चौकस२१२
मराठी माणूस डी आय वाय बाबतीत जगाच्या फार मागे आहे.
हे बऱयापैकी खरे आहे ... पण वेळ पडली कि आणि थोडे स्वतःची हौस म्हणून काही गोष्टी केल्याआहेत घरात त्या
- भिंती आणि फर्निचर ला रंग देणे
- नळाचे वॉशर बदलणे
- मध्यम आकारची झाडे कापणे
- दाराची कुलुपे ( त्यांचे सिलिंडर ) बदलणे
- टाइल मधील भेगा बुजवणे
- कपाटे / भिंतीवर फळ्या ( शेल्फ ) लावणे
- फ्रिज आणि डिश वॉशर ला लागणारी छोटी पाण्याच्या नळांची जोडणी करणे
- आयकिया च्या फर्निचर ची जोडणी करणे
15 Apr 2021 - 6:49 pm | राघवेंद्र
आयकिया च्या फर्निचर ची जोडणी करणे याची खूप धडकी घेतली आहे मी :) आजकाल पहिल्यांदा वास्तूच्या manual मधील जोडणीची माहिती घेऊन , जमत असेल असे वाटत तरच मग वस्तू घेतो.
16 Apr 2021 - 11:36 pm | सुक्या
आतापर्यंतच्या अनुभवावरुन माझी एक फळी शिल्लक राहते ... कितीही काटेकोर जोडणी केली तरी :-)
15 Apr 2021 - 1:13 pm | king_of_net
चित्रगुप्त, मायटर बॉक्स, एफ क्लॅप आणि करवत कुठुन घेतली ते सांगाल का??
मी ह्या प्रकारची करवत (Tenon saw) शोधत होतो..
15 Apr 2021 - 6:06 pm | चित्रगुप्त
@king_of_net... सामान LOWES मधून घेतले आहे. मात्र हवे असलेले सामान नेमक्या कोणत्या स्टोर मधे उपलब्ध आहे हे आधी नेटवर बघून जाणे उपयुक्त ठरते. बाकी मला ठाऊक नसलेली अनेक अवजारे आणि अन्य उपयोगी वस्तू तिथे प्रत्यक्ष फिरण्यातून नव्यानेच समजलेली आहेत.
Miter Box बरोबरच ती करवत सुद्धा येते. Stopper असलेली घ्यावी.
16 Apr 2021 - 5:40 pm | king_of_net
Lowe's म्हणजे Out of India वाटतं????
तस असेल तर मग मार्गच खुंटला... :-)
16 Apr 2021 - 7:14 pm | चित्रगुप्त
बहुतेक भारतात अॅमेझॉनवर उपलब्ध आहे Miter Box आणि करवत.
17 Apr 2021 - 9:30 am | मनो
इथे मिळेल
https://www.amazon.in/Black-Decker-Steel-Mitre-Orange/dp/B07L8QBR3M/
15 Apr 2021 - 1:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वाह ! चवकटी आवडल्या. उघड्या पाठीचं चित्र आवडलं. म्हणजे बाकीचीही आवडली.
सध्या छंद म्हणून असे विशेष काही नाही. फुटकळ वाचन. मोबाइल Os खटपट बाकी काही नाही.
-दिलीप बिरुटे
15 Apr 2021 - 2:23 pm | प्रचेतस
राजकारणावरच्या चर्चा, चिमटे काढणे वगैरे राहिलं का?
15 Apr 2021 - 7:12 pm | शशिकांत ओक
'ते' चित्र पुढून काढले असते तर रंगत वाढली असती!
16 Apr 2021 - 10:37 am | गॉडजिला
कदचित पुढुन काढलेल्या चित्रात व्यक्तिचा खोटा विग समजुन येउ शकतो या भितीपोटी चित्र मागुन काढले गेले असावे ;)
16 Apr 2021 - 10:44 am | कंजूस
दाखवायचा आहे आणि पाठीच्या कण्यावरची रेघही.
18 Apr 2021 - 5:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
!
आपण पडलो रसिक. आपण सर्वच अंगांने आलेल्या चित्रांचा आस्वाद घेतो. चित्रगुप्तांनी अनेक चित्र अशी 'सर्वांगाने' इकडे मिपावर अनेकदा टाकली आहेत. ती सर्वच चित्र सुंदर वाटलेली आहेत. सौंदर्यांच्या पातळीवर अतिशय उंचीचं होत जातात अशी चित्र. गवळणी यमुना डोहात स्नान करीत आहेत आणि त्यांची वस्त्रे घेऊन कान्हा झाडावर बसून बासरी वाजवत आहेत. ’दे रे कान्हा, चोळी आणि लुगडी’ नको रे निरखू आमची अनावृत्त ओलेती काया. वगैरे.
-दिलीप बिरुटे
(रसिक)
15 Apr 2021 - 1:40 pm | Bhakti
खूप सुंदर चित्र आहेत.चवकटीसाठीची खटाटोप मस्तच आहे.
मी सिल्क थ्रेड ज्वेलरी बनवायचे शिकले आहे.यामध्ये मी अनेक साड्यांवर रंगसंगतीनुसार नेकलेस,बांगड्या आणि कानातले बनविले आहे.स्वत: तयार केलेले दागिने मिरवण्यात वेगळीच मज्जा आहे.याच्यापुढे अजून इरकल दागिने शिकणार आहे.
15 Apr 2021 - 1:55 pm | प्रचेतस
सध्या ऑफिसकामांमधेच व्यस्त आहे. मधून मधून मिपावर फुटकळ लेख लिहित असतो. :)
आपले कलाकौशल्य आवडले, फोटो मस्तच.
15 Apr 2021 - 2:17 pm | चौकटराजा
आग्यावेताळ, आगोबा ई ई सर्व डी आय वाय बंद आहेत ! कारण पेटणारे सरपण सादळले आहे संसारात रमल्याने हे ही लिहा की !!
15 Apr 2021 - 2:22 pm | प्रचेतस
=))
15 Apr 2021 - 2:30 pm | कंजूस
आळेफाटा दिला?
15 Apr 2021 - 3:18 pm | चौकस२१२
khare tar ghari biyar banwne he karnyache khup warsh dokyat aahe .. pan tyaadhi kahi lakudkam kutरa jinywar jau naye mahnun dar karne chalu aahe , shiwya bit, mirchya ani kothimbir lawali aahe ... kumpanabhowtichi sagali jamin ukrun kadhwi lagnar aahe karan rang dyayacha aahe ..ata he sagal zalywar gari banwlwle soneri pey पहिजेच !
15 Apr 2021 - 5:06 pm | चौकस२१२
खरे तर घरी बियर बनवणे बऱ्याच दिवसापासून डोक्यात आहे . ( हे येथे राजमान्य आहे आणि त्याला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी अगदी तोटी असलेल्या पिपापापासून ते बार्ली पर्यंत सहज मिळतात ) ) म्हणजे श्रमपरिहाराला बरी .. पण त्याआधी काही श्रम चालू आहेत ते म्हणजे - जिन्याच्या सुरवातीला एक लाकडी दार बनवले आहे ( कुत्रा वर फिरकू नये म्हणून) त्याला रंग देणे, बागेत बिट , मिरच्या आणि कोथिंबीर लावली आहे ती यशस्वी रित्या उगवणे आणि कुंपणाला खेटून जमा झालेली माती दूर लोटणे जेणेकरून लाकडी कुंपण व्यस्थित रंगवता येईल ... हे झाली कि मग फेसाळते थंडगार सोनेरी पेय हवेच
15 Apr 2021 - 5:15 pm | मुक्त विहारि
बियर बनवून झाली की रेसिपी देऊ शकाल का?
15 Apr 2021 - 5:37 pm | Bhakti
दापोली विद्यापीठातील Food Technology विभागाला भेट द्या.२ वर्षांपूर्वी काजूपासून फेणी तयार करायचा उपक्रम ते सुरू करणार होते.तुम्हीही करू शकता.
15 Apr 2021 - 7:12 pm | चौकटराजा
कोणत्याही करोबोहायड्रेट च्या रसात यीस्ट घातले की काही काळाने दारू तयार होते. द्राक्षाच्या रसात यीस्ट घालून पहा ! यीस्ट बेकरीवाल्याकडे मिळेल !
17 Apr 2021 - 9:10 am | चौकस२१२
रेसिपी अशी वेगळी नसणार कारण तयार किट मिळते येथे त्याप्रमाणे करणार . तुम्ही आधी तुमच्या देशात असे करायला परवानगी आहे का बघा नाही तर वास सुटला तर वांदे होतील
17 Apr 2021 - 9:48 am | Bhakti
भारतात किट आहेत,पण तो फरमेंटेशन करायचा जार सहज नाही मिळत बहूतेक.तिकडचा जार -फोटो वा माहिती असेल तर द्यावी (ज्ञानात भर).
15 Apr 2021 - 5:28 pm | गणेशा
छान आहेत सर्व चित्र आणि तुमचे चौकटचे काम सुद्धा..
15 Apr 2021 - 6:05 pm | बापूसाहेब
वेगवेगळी झाडे आणि कलम तयार करण्याचे प्रयत्न चालू केलेत गेल्या वर्षीपासून..
पेरू अंबा सीताफळ ड्रॅगन फ्रूट अंजीर अशी सगळी मिळून जवळपास 200 रोपे घरीच तयार केलेत.
कलम करण्यासाठी लागणार्या फांद्या मित्रमंडळी कडून मिळवल्या.
ड्रॅगन फ्रूट ची 2 रोपे 2 वर्षापूर्वी सोलापूर भागातून आणली होती. त्याच दोन झाडापासून हळूहळू 50 झाडे तयार केलीयेत.
आता पावसाळा आला की सर्व झाडे गावी शेतात deploy करणार आहे.
त्याचसोबत अजून काही फळझाडे जसे चिक्कू, फणस, 2-3 दुर्मिळ प्रकारचे आंबे, द्राक्ष, लीची इ विकत घेणार आहे.
15 Apr 2021 - 6:51 pm | राघवेंद्र
मस्त एकदम
16 Apr 2021 - 5:53 pm | मुक्त विहारि
व्यनि करतो
15 Apr 2021 - 7:25 pm | बबन ताम्बे
चित्राला फ्रेम करणे पुण्यात पण महागच आहे. पाव इंपेरियल साइझच्या चित्रालाच ३०० रुपये सांगतात. ती पण अगदी साधी फ्रेम.
आपण मस्त फ्रेमिंग केलेय चित्रगुप्तजी. चित्रांना फ्रेम मुळे आणखीनच उठाव येतो.
16 Apr 2021 - 2:57 pm | चौथा कोनाडा
पुण्यात एकवेळ प्रेम करणं सोपं आहे पण फ्रेम करणं नाही असं जाणकर लोकं सांगतात !
16 Apr 2021 - 7:29 pm | चौकटराजा
कॅम्पात क्लोवर सेंटर मध्ये एक दुकान आहे तेथील मोकळ्या फ्रेम ची किंमत ५००० रु च्य दरम्यान असते !
16 Apr 2021 - 8:26 pm | कंजूस
प्रेमाचं माहिती नाही.
16 Apr 2021 - 4:01 pm | स्मिता.
फ्रेम्स छानच दिसत आहेत. कोपरेसुद्धा सफाईदार जमलेत. काकांचा उत्साह तरूणांना लाजवेल असा आहे.
आणखी चित्रांच्या फोटोंची वाट बाघतेय.
16 Apr 2021 - 11:10 pm | भुजंग पाटील
पॅन्डेमीक मुळे अजून किमान ८ महिने तरी घरूनच काम करावे लागणार (आणि मुलांची व्हरर्चुअल शाळा) असल्याने हे ड्राय इरेझ बोर्ड्स तयार केले.
२ बोर्ड्स चा एकूण खर्च फक्त $३५.
सगळ्या गोष्टी होम डेपो किंवा लोवेज मध्ये मिळतात, आणि बोर्ड्स पाहिजे त्या साईझ मध्ये कापून पण देतात, त्यान्च्या कडे गर्दी नसेल तर.
17 Apr 2021 - 12:51 am | भुजंग पाटील
17 Apr 2021 - 12:52 am | भुजंग पाटील
17 Apr 2021 - 2:12 am | प्रसाद गोडबोले
माझे लॉकडाऊनचे उद्योग : चार दिवस जोडुन शनिवार रविवार आणि गुढीपाडवा अशी सुट्टी मिळाली म्हणुन वाळवणाचे काही प्रयोग करुन पाहिले :
साबुदाणा बटाट्याच्या पापड्या:
भरलेल्या तळणीच्या मिरच्या :

३. गव्हाच्या कुरडया :
आज्जीची फार आठवण आली . तिला प्रचंड कौतुक वाटलं असतं .
आपं काय शिकलो ? :
साबुदाणा पापड्या सोप्पा प्रकार आहे अगदीच कमी कष्टाचा. पण गव्हाच्या कुरडया मात्र वेळखाऊ आणि कष्टाचा प्रकार आहे . २ पातेली गहु भिजवुन सुध्दा खुप कमी प्रमाणात चिक निघाल्याने पुढे कुरडया करायचा घाट घातला नाही, तसाच खाऊन टाकला.
तळणीच्या मिरच्या करताना मात्र घेताना एक गडबड झाली. कारण आम्हाला "मिरच्या आण " म्हणलं की आम्ही मिरच्या आणतो. भावनगरी, ब्याडगी , कश्मीरी, लवंगी हे प्रकार आम्हाला केवळ ऐकुन माहीत . समोर ठेवले तर ओळखताही येणार नाहीत. ( तसेही मला एक शेपु सोडला तर इतर पालेभाज्याही ओळखता येत नाहीत म्हणा. शेपु ओळखता येतो कारण त्याच्या वासाने मळमळते अन उलटी येते म्हणुन =)) )
ते असो. मोठ्ट्।या दिसल्या त्या मिरच्या आणल्या , चांगल्याच झणझणीत झाल्या आहेत !!
हे सर्व करत असता असता मनात एकोनॉमिक्स वर चिंतन चालु होतेच : प्रिन्सिपल ऑफ मार्जिनल एफिशियन्सी (एखद्याला एखादे काम दुसर्या इतर कोणत्याही कामापेक्शा थोडेसे जरी जास्त चांगले जमत असेल तर त्याने फक्त तेच काम करावे आणि बाकीची कामे ऑटसोर करावी. हेच त्यच्यासाठी आणि ओव्हरॉल समजासठी बेस्ट असते ) किंव्वा अॅडम स्मिथ म्हणाला तसा इन्व्हिझिबल हॅन्ड ( म्हणजे कोणताही व्यवहार करताना , दोन्ही बाजुच्या पार्टी स्वत्:च्या स्वार्थाचा विचार करत असतात आणि स्वतःची युटीलिटी वाढवत असतात , सो नेट नेट दोघांचीही युटीलिटी वाढत असते आणि वेल्थ तयार होत असते . ) म्हणजे कसं की हे सगळे आपण करायच्या ऐवजी आपण आपले एकोनॉमिक्स , फायन्नास चे काम केले असते अन हे ऑट्सोर्स केले असते तर आपल्या वाचलेल्या वेळेची किंमत कैक पटीने जास्त आहे म्हणुन आपला फायदा झाला असता आणि बाहेर २-४ जणांना रोजगार मिळाला असता. सो नेट नेट आपण कामांचे जितके जास्त सॅग्रिगेशन करु शकु तितके स्वतःसाठी आणि ईकोनॉमीसाठी आणि समाजासाठी चांगले असेल ! असो. आमचे आपले सनातनी वर्णाश्रम व्यवस्था समर्थक स्वात्मरंजन. वगैरे वगैरे !
हे असले सगळे आयसोलेटेड पॉईंट्स जुळुन येताना पहायला खूप छन वाटतं !
एकुणच मजा आली .
१. फोटो न दिसल्यास दिलगीर आहे
२. फोटो अव्वच्यसव्वा आकाराचे दिसल्यसही दिलगीर आहे ( नक्की हाईट आणिविडथ काय ठेवावी बरें फोटो व्यवस्थित दिसण्याकरिता? )
17 Apr 2021 - 5:46 am | मुक्त विहारि
इतके सगळे करत आहात तर एक सोपा प्रकार करा
मुगवडे
बिन कष्टाचा आणि कधीही कामाला येणारा प्रकार आहे
कृती पण सोपी आहे
पहाटे 5 वाजता मुगडाळ भिजत घालायची, एक मध्यम आकाराचा बाऊल चालेल... एक किलो मुगडाळीचे, भरपूर मुगवडे होतात...रोज केलेत तर, 15-20 दिवस लागतील ...
7 वाजता वाटायची
एक ताट घेऊन, शेंगदाण्याच्या आकारा इतपत, गोळे बनवून टाकायचे.साधारण पणे, एक तास लागेल...
5-6 दिवस कडकडीत उन दाखवायचे...
दमट हवा असेल तर खूप दिवस टिकत नाहीत, दसर्याच्या आत संपवून टाका...
तळलेले मुगवडे, कुठल्याही फळभाजीची रंगत वाढवतात
पण, हे खरे खुलतात ते वांग्याच्या भाजी बरोबरच ....
वांग्याच्या भाजीची रेसिपी देतो ....
https://misalpav.com/node/25590
17 Apr 2021 - 6:32 am | कंजूस
तळणीच्या मिरच्या पाहिल्या आणि हसलो.
पापड्यात वाटलेली हिरवी मिरची आणि चिंचकोळ घातल्यास फार छान लागतात, प्रमाण मात्र ट्रायलने ठरवावे लागेल.
आणि फोटोंसाठी सरधोपट टेम्प्लेट
<br />फोटो क्रमांक _*_<br /> <img src="लिंक" width ="80%" /><br />
फोटो क्रमांक _*_ आणि लिंक टाकून ते सर्व कॉपी करून लेखनात हवे तिथे टाकणे.
17 Apr 2021 - 12:15 pm | सतिश गावडे
वाह मार्कसजी, तुमच्या अंगी ही कला सुद्धा आहे हे माहिती नव्हते.
17 Apr 2021 - 9:27 am | चौकस२१२
हि असली कामे करताना योग्य अशी अवजारे असणे अतिशय महत्वाचे आहे नसली तर पार वैतागवाडी होते
21 Apr 2021 - 9:39 pm | अभिजीत अवलिया
छान धागा हो चित्रगुप्त.
माझे म्हणाल तर, गेले अनेक महिने आमच्या फार्महाउसवर राहून WFH चालू आहे. नेहमीप्रमाणे आवरून एक दीड तासाचा प्रवास करून ऑफिसला जाणे ह्याची गरज नसल्याने सगळे सुशेगात करायला वेळ मिळतोय.
लहानपणी इच्छा असूनही खेळायला न मिळालेला एक खेळ म्हणजे बॅडमिंटन. सध्या रोज सकाळी ४५ मिनिटे बॅडमिंटन खेळतो. अधून मधून शेतातून चालत जाऊन कुठंतरी झाडाखाली जाऊन शांतपणे बसतो. घरापासून १ किमी वर कृष्णा माई वाहते. कधी कधी तिकडे चक्कर टाकतो. मोर, सुगरण हमखास दिसतातच. इतरही वेगवेगळ्या पक्षांचे निरीक्षण करणे चालूच आहे. शेतातील घर असल्याने दिवस रात्र कमालीची शांतता असतेच. तांबट, पोपट, घुबड, बुलबुल, आणि असंख्य प्रकारच्या चिमण्या घराबाजूच्या झाडांवर दिवसभर किलबिलाट करत असतात. अधून मधून घरात आत पण येतात. ५-६ वर्षांपूर्वी घराच्या बाहेरच्या सज्ज्यात एका चिमणीने घरटे बनवले होते ते अजूनही आहे. आतापर्यंत अनेक चिमण्यांची बाळंतपणे तिथे पार पडलेली आहेत.
घरासमोर एक चिंचेचे झाड आहे. तिची अवीट गोडीची चिंच खायला माकडांची फौजच्या फौज येते. त्यांच्या तावडीतून जी थोडीफार वाचते ती आम्हाला खायला मिळते. घरापासून थोड्या अंतरावर एक जांभळाचे झाड हेरून ठेवले आहे. त्याची जांभळे पिकण्याची वाट बघतोय. करवंदाच्या जाळ्यांचा शोध घ्यायचा बाकी आहे.
सूर्योदय आणि सूर्यास्त तर निव्वळ अप्रतिम. एखाद्या चांदण्या रात्री गच्चीवर 'बसण्याचा' आनंद आणि सुट्टीच्या दिवशी विहिरीत पोहण्याचा आनंद पण मिळतोय. आता भाजीसाठी एक वाफा करून त्यात भाजी लावणार आहे. तर एकंदरीत आयुष्यात कदाचित कधीही अनुभवायला मिळाले नसते अशा वातावरणाचा आनंद घेणे चालू आहे.
21 Apr 2021 - 10:05 pm | तुषार काळभोर
हेवा वाटावा असा हवाहवासा काळ व्यतीत करताय.
अभिनंदन!
21 Apr 2021 - 10:21 pm | चित्रगुप्त
असे जीवन असावे असे अनेकांना वाटत असते पण ते लाभत नाही. तुम्ही ते प्रत्यक्षात जगत आहात हे फारच थोर.
21 Apr 2021 - 10:33 pm | मुक्त विहारि
तुम्ही हे क्षण कधीच विसरू शकणार नाही ...
22 Apr 2021 - 4:28 am | चौकस२१२
फोटू टाका राव माणसांचे नसले तरी चालतील पण जागेचे टाका ? आणि मग कामाचा के काय करता ? फार्म हाऊस प मोठ्या शहराचं जवळ आहे का?
22 Apr 2021 - 8:01 am | अभिजीत अवलिया
फार्म हाऊस कराड व सातारा यांच्या मधोमध आहे. फार्म हाऊस पेक्षा घर म्हणणे जास्त योग्य. फार्म हाऊस म्हटले की मुळशी, पवना परिसरातील फार्महाऊस नजरेसमोर येतात. त्यांच्या तुलनेत आमची झोपडीच. बाकी फोटो विकांताला टाकतो.
22 Apr 2021 - 12:38 pm | सुबोध खरे
हायला,
हेवा वाटावा अशी स्थिती आहे.
पावसाळ्यात कट्टा करावा वाटतोय.
सगळं खर्च माझा.
काय म्हणताय?
22 Apr 2021 - 5:17 pm | अभिजीत अवलिया
चालतय. आणि कट्ट्याचा खर्च माझ्याकडेच असेल.
23 Apr 2021 - 5:26 pm | सिरुसेरि
छान वर्णन . फार्म हाऊस कराड व सातारा यांच्या मधोमध या वर्णनावरुन कोडोली , गोडोली , उंब्रज , भोर परिसर वाटतो आहे .
22 Apr 2021 - 11:11 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सुंदर, असेच राहा निवांत तिकडेच. आणि इंजॉय करा. च्यायला, मी बॅडमिंटन खेळायला जात होतो नियमित खेळायला येणारे संसर्गाच्या भितीने येणे बंद झाले. नाय तर दोन तीन सेट म्याचेस झाल्या की दिवसभर नीट राहतो माणूस. :)
-दिलीप बिरुटे
23 Apr 2021 - 4:30 pm | कंजूस
उगाचच म्हणतोय .कृष्णाकाठचे घर कल्पनेनेच दिसत आहे. कराड ,पलुस, किर्लोसकरवाडी, औदुंबर भाग माहिती आहे. मोर असतातच शेतांंत, ओढ्यांंत. रम्य असते . कितीही सूर्य तापो झाडाखाली काय छान झोप येते. मोकळी हवा . मग अचानक वावटळ उठते दुपारी तिनाला. कुठून तरी ढग येतो. पाऊस पाडून जातो.
23 Apr 2021 - 4:13 pm | धर्मराजमुटके
मला एक प्रश्न पडला आहे की सध्या मिपावर महिलांचा टक्का फार घसरला आहे. सुरुवातीची अनेक वर्षे अनेक मिपाकरणी उत्तम साहित्य निर्मिती करत होत्या, संवादांमधे हिरिरीने भाग घेत होत्या. आता २-३ नावे सोडली तर एकही जुन्या मिपाकरणी दिसत नाहित. की त्या 'अनाहिता' वरच आपला वेळ व्यतित करतात ?
23 Apr 2021 - 4:23 pm | मुक्त विहारि
आज जरा इकडची पुस्तके तिकडे आणि तिकडची पुस्तके इकडे केली ...
24 Apr 2021 - 1:35 pm | अभिजीत अवलिया
हे पहा काही फोटो.
घरातून दिसणारा एक डोंगर
सूर्योदय
चौकोनी विहीर (३५ फूट खोल आहे)
सुगरणीचे घरटे
अशीच एक सकाळ
24 Apr 2021 - 4:58 pm | सौंदाळा
अतिशय सुंदर
तुमचा हेवा वाटतोय. यावर एक तरी लेख झालाच पाहिजे
24 Apr 2021 - 5:28 pm | मुक्त विहारि
पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असेल तर, पिके वर्षभर घेता येतात ...
24 Apr 2021 - 6:11 pm | चौथा कोनाडा
व्वा, अभिजीत अवलिया, सुंदर फोटोज !
३५ फूटी खोल चौकोनी विहीर खुप आवडली. विहिरीला कुंपण भिंत नाही काय ?
आत पडलो तर काय अशी भीती मला आताच वाटायला लागली आहे !
24 Apr 2021 - 7:35 pm | अभिजीत अवलिया
विहीरीला कुंपण वा भिंत नाही.
पोहता न येणारी व्यक्ती आत पडली तर 'हे राम' म्हणायचे.
@सौंदाळा साहेब,
प्रयत्न करेन लेख लिहीण्याचा. पण या धाग्यावरील माझ्या पहिल्या प्रतिक्रियेतच मी जवळपास सर्व महत्त्वाचे वर्णन केल्याने फारसे काही अतिरिक्त लिहीण्यासारखे उरलेले नाही.
24 Apr 2021 - 9:20 pm | मुक्त विहारि
फुकट कुंपण बनवायचे असेल तर, निवडुंग उत्तम, कोकणात निवडुंग 4-5 फूट उंच होतो
पैसा हवा असेल तर, बांबूची रोपे लावा
शिवाय बांबू रोपांना 100% सबसिडी आहे, तीन टप्प्यात आणि तीन वर्षांत मिळते, त्यामुळे हे सर्वोत्तम ...
पांच वर्षांत शेता पुरता बांबू पण मिळेल आणि कुंपण पण तयार होईल...
24 Apr 2021 - 4:39 pm | चित्रगुप्त
अश्या ठिकाणी निवांतपणे रहाणे हे हल्लीच्या शहरी व्यक्तीसाठी स्वर्गसुखच. फोटो एकदम मस्त आहेत. Claude Monet ची चित्रेच जणू. अभिनंदन.