वांग्याची खंग्री भाजी

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in पाककृती
7 Sep 2013 - 4:13 pm

काल एके ठिकाणी जेवायला गेलो होतो.नातेवाईक बायकोच्या माहेरचे होते.त्यांनी जेवायला वांग्याची भाजी केली होती.आता ही भाजी बनवायची म्हणजे काही खायची गोष्ट नाही महाराजा.ही जमली तर बेस्ट नाहीतर गडबड घोटाळा ठरलेलाच.आणि त्यांनी तर त्या भाजीची पार वाट लावून टाकली होती.ना धड त्यात तिखटपणा ना धड मसाल्यांचा खमंगपणा..

जेवण झाले आणि बायकोने विचारले कशी झाली होती भाजी?तसा मी जास्त बोलत नाही आणि बायकोपुढे काही बोलणे आणि ते पण तिच्या माहेरच्या माणसांच्या बाबतीत.

एकदा ही चूक केली होती.त्यावेळी म्हणजे २०/२२ वर्षांपुर्वी माझ्या मेहूणीने छान श्रीखंड वाढले होते.त्यावेळी त्या श्रीखंडाचे कौतूक केले होते.आता कौतूक करतांना थोडा घोटाळा झाला म्हणा.मी म्हणालो, "व्वा !!! काय छान झाले आहे.हिला अद्याप जमत नाही."आता मला काय माहित की ते श्रीखंड त्यांनी विकत आणले आहे ते.बाकी जे लोक श्रीखंड विकत आणतात ते काय वाट्टेल ते विकत आणू शकतात.श्रीखंड ही घरी करायचीच गोष्ट आहे.ह्या वाक्या नंतर घरी काय घडले ते चार-चौघात सांगायची गोष्ट नाही.

त्यामुळे आता परत अशा चूका करण्याची इच्छा पण न्हवती.त्यामुळे मी मौन पाळले.आता लग्नाला नाही म्हटले तरी २०-२२ वर्षे झालेली, त्यामुळे ही "त वरून ताक भातच" काय पण मौन व्रतातून पण योग्य (म्हणजे तिला जे योग्य वाटतील ते) अर्थ काढते.तिच्या माहेरच्या जेवणाचे कौतूक न केल्याने अबोला आणि रुसवे फुगवे सुरु झाले.आज काल मला पण हिचे रुसवे-फुगवे कसे काढावे ह्याचा अंदाज येवू लागला आहे.मग काय लगेच स्वतः वांग्याची भाजी करायला घेतली.

भाजी केली आणि हिने योग्य त्या रीतीने पावती पण दिली.शेवटी काय हो... घरवाली खूष असेल तर बाहेरवालीची काय गरज...

क्रुपया खालील गोष्टींची नोंद घ्या.

१.ही भाजी अतिशय चमचमीत असल्याने ज्यांना हार्ट ट्रबल, मूळ्व्याध आणि तिखट पदार्थ झेपत नसतील त्यांनी ह्याच्या नादी न लागलेलेच उत्तम.

२. मसाला पाटा वरवंट्यावरच किंवा दगडी खलबत्त्यावरच वाटायचा आहे.पाटा वरंवट्याला किंवा दगडी खलबत्त्याला फाटा दिलात तर चव मार खाते.

३. ही भाजी बनवणे हे खूप वेळ खावु आणि मेहनतीचे काम आहे.त्यामुळे वेळ नसेल तर ह्या भाजीच्या नादी लागू नका.

४. सगळे साहित्य मस्ट आहे.

५. ही भाजी पुरुषांनी केली तर जास्त उत्तम होते.

६. मला फोटोग्राफी अजिबात येत नाही त्यामुळे जे काही समोर दिसत आहे त्याला फोटो म्हणा.

आता साहित्य :

१. पाटा वरवंटा किंवा दगडी खलबत्ता
२. कढया (दोन) त्यापैकी एक लोखंडी आणि दुसरी नॉन स्टिक असेल तरी चालेल.दुसरी पण लोखंडी असेल तर फार उत्तम.
३. गॅस आणि शेगडी किंवा पदार्थ शिजवू शकणार्‍या तुमच्या कडे असलेली साधने.सोलर कूकर वापरलात तरी चालेल.
४. वांगी (किती पण घ्या.मसाला महत्वाचा आहे)
५. लसूण पाकळ्या (प्रत्येक वांग्या मागे १) बारीक चिरून घ्या.
६. आले (दर ५ वांग्यांमागे १ इंच) बारीक चिरून घ्या.
७. लवंगी मिरच्या ( २ मोठ्या चिरणे)
८. सुक्या लाल मिरच्या (प्रत्येक वांग्याला अर्धी)
९. लवंग प्रत्येक वांग्यामागे १
१०.मिरे प्रत्येक वांग्यामागे १
११. दालचिनी पूड (दर ५ वांग्यांमागे १ छोटा चमचा)
१२. मोठ्या आकाराचा कांदा (दर ५ वांग्यांमागे १)
१३. मध्यम आकाराचे टोमॅटो (दर ५ वांग्यांमागे २)
१४. तेल, मीठ आणि तिखट आपापल्या आवडी नुसार.
१५. गूळाचा छोटा खडा (हा पण आवश्यकच आहे.मसाला मिळून येतो.)

आणि सगळ्यात महत्वाचा पदार्थ म्हणजे

१६. मूगवडे

आता क्रुती :

१. वांगी चिरून मीठाच्या पाण्यात टाका.

२. कांदा आणि टोमॅटो उभा चिरून घ्या.फोडी करू नका.मिरे, लवंगा,मिरच्या (दोन्ही),आले,लसूण्,दालचिनी पूड आणि एका वाटीत तिखट-मसाला (हा मी ऐन वेळी तयार करतो.एका वाटीत एक चमचा गोडा मसाला,एक चमचा तिखट आणि पाव-पाव चमचे लोणच्याचा मसाला,छोले मसाला,मालवणी मसाला जे कुठले घरात असतील ते) घ्या.

३. आता गॅस पेटवून लोखंडी कढई तापत ठेवा आणि कढई तापल्या वर खालील पदार्थ क्रमा क्रमाने आणि १०/१२ सेकंद परतत-परतत टाका.मी १०/१२ सेकंद ही अंदाजे वेळ दिली आहे.कारण कढईचे तापमान आणि पदार्थाच्या आकारानुरुप परतायचा वेळ कमी-जास्त होतोच.हे सगळे पदार्थ तेल न टाकता परतून घ्यायचे आहेत.तेल टाकलेत तर चव गेलीच समजा.....

प्रथम आले, मग लसूण , मग लवंग, सुक्या लाल मिरच्या आणि मिरे...त्यानंतर चिरलेल्या कांद्या आणि टोमॅटो पैकी अर्धा कांदा-टोमॅटो टाका. आता मस्त परतून घ्या.(मीठ अजिबात टाकु नका.पाणी सुटते आणि चव बोंबलते.एकदा चूकून ह्या स्टेपला मीठ टाकले आणि मग चव आणायला तेलात परतलेला दाण्याचा कुट टाकायला लागला.)

आता छान वास सुटला असेल. हीच वेळ आहे दालचिनी पावडर टाकायची.ही जेव्हढी वस्त्रगाळ असेल तेव्हढी उत्तम. आता ५/६ सेकंद परता.जास्त परतलेत तर दालचिनी जळते आणि दालचिनी जळली की बोंबला तिच्यायला.

४. आता हे सगळे लगेच वाटायला घ्या.मसाला बनवणे ही अतिशय महत्वाची स्टेप आहे.मसाला एकदम बारीक वाटला गेला पाहिजे.इथे मिक्सर वापरलात तर "बहूत पछताओगे ठाकूर"...हा वाटलेला मसाला एका वाडग्यात काढून घ्या.

५. आता दुसर्‍या कढईत तेल तापत ठेवा आणि थोडे गरम पाणी करायला ठेवा.गॅस थोडा मोठाच ठेवा आणि तेल गरम झाले की,

मुग वडे तळून घ्या.मुलांना आणि बायकोला दूर ठेवा.भाजीत टाकायला काही शिल्लक रहात नाहीत.

मग

वांगी तळून घ्या. (खमंग वास दरवळू लागल्याने,मी तळलेल्या वांग्याचे आणि मुगवड्याचे फोटो काढायला विसरलो.म्हणून फक्त वांगी आणि मुगवडे तळतांनाचेच फोटो टाकले आहेत.)

६. गॅस मध्यम आंचेवर ठेवा आणि उरलेल्या तेलात चिरलेल्या मिरच्या टाका.त्या चिडल्या की मग कांदा टाका तो प्रेम करायला लागला (म्हणजे बराचसा गुलाबी आणि थोडा चॉकलेटी झाला) की टोंमॅटो टाका.टोमॅटो हसायला लागला (टोमॅटो हसला की बाजूला तेल सुटायला लागते) की मग गॅस मंद आंचेवर ठेवून मसाला टाका.आणि गुळाचा खडा टाका.

आता हा मसाला परतायला घ्या.असा छान वास सुटतो की बस्स्स्स्स्स्स्स्स.....

७. असा खमंग वास सुटायला लागला की गरम पाणी टाका (गरम पाणी एव्हढ्याच साठी टाकायचे की जेणे करून वेळ वाचावा.)

८. एक उकळी आली की, मग तळलेले मुगवडे आणि तळलेली वांगी टाका. एक उकळी आणा

आणि मग

आणि मग

आणि मग

राव आता वाट कसली बघताय?

घरात भात, पोळी किंवा भाकरी जे काही असेल त्या बरोबर घ्या हाणायला.

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

7 Sep 2013 - 5:02 pm | प्रचेतस

वा..वा. मुवि, जबरदस्त एकदम.

अत्रुप्त आत्मा's picture

7 Sep 2013 - 5:17 pm | अत्रुप्त आत्मा

शेवटचा फोटू..भाजी प्लेट्मधे काढल्यानंतरचा , म्हनजे..जवळून हवा होता..!

पण खरच खंग्री..शी अ‍ॅग्री! :)

मुक्त विहारि's picture

7 Sep 2013 - 5:32 pm | मुक्त विहारि

भाजीचा वास असा मस्त सुटला होता की सगळे त्या पातेल्यावरच तूटून पडले...

त्रिवेणी's picture

8 Sep 2013 - 3:06 pm | त्रिवेणी

मला एकही फोटू का दिसत नाही?

पैसा's picture

7 Sep 2013 - 5:31 pm | पैसा

पाकृ आणि लिखाण दोन्ही खंग्री!

चाणक्य's picture

9 Sep 2013 - 4:28 pm | चाणक्य

फुल सहमत

आश's picture

11 Sep 2013 - 9:59 am | आश

+१

पलाश's picture

7 Sep 2013 - 6:24 pm | पलाश

+ १. सुरेख.

ही पाकृ खाऊन समस्त घर आडवारून घोरायला लागले आहे असा शेवटचा फोटो पाहिजे होता. पाकृ नक्कीच करून बघणेत येईल...

पिंपातला उंदीर's picture

7 Sep 2013 - 7:31 pm | पिंपातला उंदीर

जबराट. लिटर भर पाणी जमल तोंडात. आमच्या परभणी भागात अशीच होते ही भाजी

सानिकास्वप्निल's picture

7 Sep 2013 - 8:24 pm | सानिकास्वप्निल

खंग्री पाकृ ...आवडली :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Sep 2013 - 8:42 pm | डॉ सुहास म्हात्रे

खंग्री पाकृ आणि ती सांगायची पद्धत !

श्रीरंग_जोशी's picture

8 Sep 2013 - 8:02 am | श्रीरंग_जोशी

खरपूस वर्णन व रोचक पाकृ.

मी वांग्यांची भाजी खात नसलो (भरीत मात्र प्राणप्रिय आहे) तरीही या भाजीचा रस्सा खायला आवडेल :-).

दिपक.कुवेत's picture

8 Sep 2013 - 12:57 pm | दिपक.कुवेत

वांगी आणि त्या करण्यामागचं पुराण दोन्हि जबरदस्त!

"गॅस मध्यम आंचेवर ठेवा आणि उरलेल्या तेलात चिरलेल्या मिरच्या टाका.त्या चिडल्या की मग कांदा टाका तो प्रेम करायला लागला (म्हणजे बराचसा गुलाबी आणि थोडा चॉकलेटी झाला) की टोंमॅटो टाका.टोमॅटो हसायला लागला (टोमॅटो हसला की बाजूला तेल सुटायला लागते)".......हा तर कळस!

भ ट क्या खे ड वा ला's picture

8 Sep 2013 - 1:31 pm | भ ट क्या खे ड वा ला

एकदम खंग्री वर्णन ,भाजी पण झकास असणार पण त्याबद्दल करून बघितल्यावर लिहू.

मुक्त विहारि's picture

9 Sep 2013 - 10:24 am | मुक्त विहारि

प्रतिसाद देणार्‍यांचे

आणि

विशेषतः भटक्या खेडवाला ह्यांचे (कारण त्यांच्या मदतीशिवाय फोटो टाकणे शक्य झाले नसते.)

भ ट क्या खे ड वा ला's picture

9 Sep 2013 - 10:31 am | भ ट क्या खे ड वा ला

चित्रे लेखनाच्या चौकटीतच व स्पष्ट दिसावित म्हणून खालीलप्रमाणे प्रयत्न करून पहा:

१. Image URL: येथे चित्राची लिंक पेस्ट करा.

२. Alternative text: येथे फक्त एक स्पेस (स्पेसबार वापरून) टाका.

३. Width x Height:

अ) प्रथम चित्रांच्या लांबी-रुंदीचे आकडे न टाकता OK वर क्लिक करून पूर्वपरिक्षण करून पहा. जर चित्रे लेखनाच्या चौकटीत असतील तर अजून काहीही करायची गरज नाही... प्रकाशित करा. अश्या चित्रांचा आकार (लांबीचा अथवा रूंदीचा मोठा आकडा टाकून) वाढविल्यास त्यांची स्पष्टता कमी होते.

ब) चित्रे लेखनाच्या चौकटीबाहेर जात असल्यास (वरचा पर्याय योग्य असल्यास हा पर्याय बाद समजा) :
......प) मिपाच्या माहितीचा उजवा कॉलम असेपर्यंत (Powered by gamabhana पर्यंत) : रुंदी ६८० ठेवा
......फ) Powered by gamabhana च्या खाली : रुंदी जास्तीत जास्त ८६० ठेवा
उंचीची जागा नेहमीच रिकामी ठेवा, मिपा आपोआप योग्य मापाची उंची वापरून चित्र प्रमाणबद्ध ठेवते.

साहित्य प्रमाण देण्याची पद्धत एकदम आवडली.
भाजी खंग्री झाली असणार यात शंका नाहीच.
खंग्री भाजीला खुसखुशीत लिखाणाची जोड.
जियो मुवि.

मुक्त विहारि's picture

9 Sep 2013 - 2:35 pm | मुक्त विहारि

साहेब (मित्रा)

तुझा प्रतिसाद मिळाला आणि भरून पावलो....

मी इथे जे काही लिहितो त्यात तुझा मोठा सहभाग आहे..

सुहास..'s picture

9 Sep 2013 - 4:32 pm | सुहास..

मस्त ...

मित्रा मराठवाड्याचा का तु ?

मुक्त विहारि's picture

10 Sep 2013 - 7:42 am | मुक्त विहारि

तर

मी सगळ्या जगाचा...

जवळ जवळ सगळा महाराष्ट्र आणि दक्षिण भारत फिरून झाला.

त्यामुळे ही पा.क्रु. मराठवाडा आणि विदर्भ ह्यांचे काँबिनेशन आहे.

असेच थोडे वेगळे काँबिनेशन करून चणे-वांगे ही पण एक मस्त पा.क्रु. होते.

अत्रन्गि पाउस's picture

9 Sep 2013 - 10:52 pm | अत्रन्गि पाउस

संपादक मंडळ....कृपया ह्या लिंका सकाळी ९-५ वेळात दिसतील असे बघा...
आमचे कलत्र गोंधळून गेलेय...आत्ताच जेवला आणि पुन्हा भूक लागली असे का म्हणतोय आपलं नवरा ..???

टक्कू's picture

9 Sep 2013 - 11:25 pm | टक्कू

सॉलिडच आहे!

मला एकपण फोटो का दिसत नाहिये?

कवितानागेश's picture

10 Sep 2013 - 10:28 am | कवितानागेश

हाय हाय तिख्खट होईल भाजी. पण मस्त लागेल. :)

सस्नेह's picture

11 Sep 2013 - 2:27 pm | सस्नेह

पाकृ तर खंग्रीच आहे...!
पण मला लेखन लै झणझणीत लागले बॉ !

बायको अशी खमंग असल्यावर भाजी सुरेख होणारच की मुवी. होय कीनी?

मस्ताड फटकेबाजी. आमेचे मुवी काय सदान कदा ल्हित नाहीत पण जेंव्हा लिहीतात तेंव्हा अक्षी फुलबाजा!

निवेदिता-ताई's picture

13 Sep 2013 - 8:52 am | निवेदिता-ताई

मस्त

प्यारे१'s picture

14 Sep 2013 - 2:31 am | प्यारे१

मस्त ओ मालक!

त्रिवेणी's picture

26 Oct 2013 - 4:33 pm | त्रिवेणी

फोटुंच तेवढं बाघ , कधी पासून दिसत नाही नुसत्या रेश्या रेषा दिसतात.

उद्दाम's picture

26 Oct 2013 - 4:55 pm | उद्दाम

कट्ट्याला आलो तर ही भाजी खायला देणार काय?

तसेही मला नाही वाटत की तुम्ही असा न बोलावता येण्याचा लोचट पणा कराल.

गजानन५९'s picture

26 Oct 2013 - 4:56 pm | गजानन५९

लयी आवडत राव वांग पण सध्याला पथ्य असल्यामुळे बर्याच आवडत्या पदार्थांना सुट्टी देण्यात आली आहे.

अवांतर :- हि पाकृ इथे टाकल्याबद्दल देव ( म्हणजे भगवान आणि म्हणजेच ईश्वर ) तुम्हाला कधीच माफ करणार नाही. :)

अनिरुद्ध प's picture

26 Oct 2013 - 5:03 pm | अनिरुद्ध प

तुमच्या कडे रगड्याला पाटा-वरवंटा असे म्हणतात का?फतु वरुन वाटले,असो पाक्रु तसेच लिखाण सुद्धा आवडले.

अमेय६३७७'s picture

27 Oct 2013 - 5:20 pm | अमेय६३७७

मस्तच. करुन बघणार नक्की. लेखनाचा पूर्वरंग पण भारी जमलाय.

त्रिवेणी's picture

3 Jun 2014 - 9:22 am | त्रिवेणी

मी काल केली ही भाजी. पण तुमच्या भाजीचे फोटो अजुन दिसत नसल्याने तुम्ही केलेल्या भाजी सारखी झाली की नाही ते पडताळुन नाही पाहता आले.

प्रभाकर पेठकर's picture

3 Jun 2014 - 1:47 pm | प्रभाकर पेठकर

तुम्ही तुमच्या भाजीची छायाचित्रं टाका इथे. आम्हाला दोन्ही दिसतील मग आम्ही कळवू तुम्हाला (इथेच) कशी झाली होती ते.