अदा बेगम - भाग २
------------------
शिवाजीमहाराज वेशीवर येऊन ठेपले होते. सुरतच्या पूर्वेला असलेल्या बुऱ्हाणपूर दरवाजाजवळ फौजेची छावणी पडली.
पण सुभेदार इनायतखान गाफील राहिला . कारण त्याला कळलं होतं की मोगलांचा मराठा सरदार तर पुढे चाललाय अहमदाबादला. मोगली सरदाराला मदत करायला. तिथे झालेलं एक बंड मोडण्यासाठी. ही आवई तर खुद्द राजांनीच थोडीशी आधी उठवलेली.
सुभेदार इनायतखानाला निरोप गेला. सामोपचाराने खंड ठरवता येईल. गिल्ला करण्याची , जाळपोळ करण्याची, नासधूस करण्याची काही गरज नाही.
पण इनायतखानाकडून उत्तर आलं नाही , ना कुठल्याही फिरंग्यांकडून .
तांबडं फुटलं. पक्ष्यांची किलबिल सुरु झाली. धुक्याची चादर विरू लागली. थंडी बरीशी वाटू लागली. शेकोट्यांमधून नुसताच धूर निघू लागला. मराठ्यांच्या तळाला पूर्ण जाग आली. घोडी फुरफुरू लागली .
आणि राजांनी सुरतेच्या दिशेने इशारा केला , “ नेताजी, बायका-मुलं .गोरगरीब, देवळं , मशिदी , चर्च, कशालाही तोशीस लागता कामा नये . पण ही मोगली मिजास उतरवा . व्यापाऱ्यांना त्रास होता कामा नये. पण ऐकलं नाही तर चाबकाने फोडून काढा. शस्त्र चालवू नये. ”
नेताजीने वेगवेगळी पथकं तयार केली होती. त्या त्या पथकाचा प्रमुख होता. अशाच एका पथकाचा प्रमुख होता हिरोजी. बरोबर त्याचा साथीदार माणकोजी.
हिरोजी तरणाबांड होता.उंचीने बेताचा;पण अंगी अफाट बळ असलेला. अंगात घातलेल्या बदामी रंगाच्या अंगरख्यामधून त्याची तब्येत दिसत नसली तरी तो बळकट देहाचा होता. चोरटी तब्येत होती त्याची . जाड मिशा राखलेला, सावळासा हिरोजी चलाख आणि तरतरीत होता. तलवार तर अशी चालवायचा की लखलखती बिजलीच जणू.
माणकोजी आडवा तिडवा होता. बलदंड बाहूंचा. तोही शूर होता. दोघांची खास दोस्ती. दोघे कायम बरोबरच असायचे. दोघे जीवाला जीव द्यायचे.
शाहिस्तेखानाला पुण्याच्या आसपास दणका देताना ठिकठिकाणी जे छोटे छोटे हल्ले व्हायचे, त्यामध्ये ही पोरं आघाडीवर होती. त्यांनी ते हल्ले यशस्वीरीत्या पार पाडले होते. त्यामध्ये त्यांनी हुशारी आणि बहादूरी दाखवली होती .
म्हणूनच तर त्यांची सुरतस्वारीसाठी खास निवड झाली होती. स्वतः राजांनी त्यांची निवड केलेली होती. त्यामुळे दोघांची छाती अंमळ फुगली होती. दोघांचे बाहू फुरफुरत होते.आणि आता त्यांची घोडी फुरफुरत होती.
घोडी खिंकाळली आणि त्यांनी तळ सोडला.
मराठी फौज सुरतेच्या गल्लीबोळात फिरू लागली. त्या संपन्न ,मोठ्या शहराची त्यांना नवलाई वाटली. आपल्या मुलखात असं त्यांनी कधी पाहिलं नव्हतं . स्वतःच्या राकट , दगड-धोंडयांच्या देशात त्यांनी अशा कुबेराच्या गल्ल्या कधी पहिल्या नव्हत्या .
धनिक- वणिक मंडळी वाड्यांचे दरवाजे लावून, संपत्ती लपवायच्या मागे लागली. नजरबाज होतेच- पैशाची मोहोळं दाखवायला.
रस्त्यावर फारसं कोणी नव्हतं. गोर - गरीब बिचारे आपापली बोचकी घेऊन जिवाच्या भीतीने सैरावैरा पळत होते. पण खरंतर त्यांना काहीच भीती नव्हती.
हिरोजी- माणकोजीची तुकडी वाड्यांच्या गल्ल्यांतून फिरत होती. दरवाजे मोडून, भिंतींना शिड्या लावून वाड्यात प्रवेश होत होता. बायका - मुलं घाबरून किंचाळत, ओरडत होती. प्राणभयाने रडत होती . पण त्यांच्या प्राणांना काहीच भीती नव्हती. राजांचा तसा आदेशच होता - प्राणहानी शक्यतो होता कामा नये.
जे व्यापारी धनलोभाने खामोश होते त्यांच्या पाठी मात्र चाबकाखाली फुटत होत्या.
एक पथक द्रव्य गोळा करायचं तर दुसरं पथक ती लूट तळावर घेऊन जायचं.
नजरबाजाने हिरोजीला अदाबेगम कोठेवालीचा वाडा दाखवला .
क्षणभर हिरोजी थबकला. त्याला कळेना की बाईमाणसाच्या वाड्यात घुसायचं का नाही ? तो माणकोजीचं तोंड पाहू लागला .
पण आतलं धन खुणावत होतं. नजरबाजाने त्याची मनःस्थिती ओळखली ,” हिरोजी , इचार कसला करता ? घुसा आत . हाबी पापाचाच पैका हाय . कुटं घाम गाळून कमावल्याला थोडाच ! मोठी चालाक औरत हाय ही ! “
हिरोजी - माणकोजी आत घुसले.
सकाळची वेळ होती. तशी अदाची ती झोपायचीच वेळ . ती झोपलेलीच होती.
सलिमची अजूनही नशा उतरली नव्हतीच. तो आडवातिडवा पसरलेलाच होता. वाड्यातील गडीमाणसांचा गलका उठला.
त्या आवाजाने अदाची झोप मोडली. ती खिडकीपाशी आली. तिने पाहिलं तर तिला काही हत्यारबंद लोक वाड्याच्या चौकात दिसले . त्यांना क्षणात तिच्या पहारेकऱ्यांनी घेरलं . सरसरत तलवारी बाहेर निघाल्या . एकमेकींना भिडल्या . खणखणल्या.
तिला त्या घुसखोरांचा भयंकर राग आला. पण तिला पोषाखावरून लक्षात आलं की हे लोक सुरतमधले नाहीत .
ती कडाडली,“तुम्हारी ये जुर्रत ? ”
तिचा आवाज ऐकून हिरोजीने वर पाहिलं तर - त्याच्या नजरे समोर जणू बिजलीच चमकली. तिच्या अप्सरेसमान सौन्दर्याने त्याची नजरबंदीच झाली. तरीही त्यावेळी ती साध्या सुती कपड्यात होती. शृंगारविहीन. गळ्यात फक्त तो हिऱ्याचा कंठाच काय तो रुळत होता.
माणकोजीचं तेच झालं. पण क्षणभरच . दोघेही सावरले.
“ अदाबाई - या खाली,” हिरोजी म्हणाला .
“पहले बाहर निकलो . बाजारी लफंगो ! “ती कडाडली.
लफंगा म्हणल्यावर हिरोजीचं डोस्कंच फिरलं … जी स्वतः एक बाजारी औरत हाय ती आपल्याला बाजारी म्हणते ? ….
तो पुढे होणार तोच एकाने तलवारीचा वार केला . त्याला हिरोजीच्या तलवारीचं पाणी माहिती नव्हतं. हिरोजीने क्षणात तो वार ढालीवर घेतला आणि पलटवार केला. पहारेकरी कोसळला .
त्याची चपळ गती पाहून अदा थक्क झाली.
बाकीचे पहारेकरी ते पाहून बिचकले .
तोच माणकोजीची तलवारही तळपली . त्याच्यावर चालून आलेला आणखी एक पहारेकरी गारद झाला . घनघोर युद्धात लढलेला गडी तो. त्याने पहाऱ्यावर तलवारी गंजवल्या नव्हत्या . ते बाजार बुणगे पहारेकरी तलवारी टाकून शरणागत थांबले.
हिरोजी ताडताड पलीकडच्या जिन्यावरून वरच्या दालनात पोचला. त्याच्या मागे माणकोजी.
“ बाई , जे आहे ते समोर आणून टाक बऱ्या बोलानं ”, हिरोजी रागात ओरडला
“ लुटेरे कहिंके !... हमारा मरातब नहीं जानता ? एक इशारा कर दूं तो जान चली जायेगी ! तुम्हारी औकात क्या है ? “
“बाई , त्यो आवाज खाली करा . बाईमाणूस म्हणून गय करतोया , बाप्या असता तर जीभ कलम केली असती ! “
“चोरी तो चोरी उपर सिनाजोरी !” असं म्हणत ती गर्र्कन पलीकडे वळली. एका मेजावरून तिने एक छोटीशी, नाजूक पण सोन्याची नक्षीदार मूठ असलेली कट्यार उचलली .
तिच्या हातात ती कट्यार पाहून ,हिरोजी गडबडला. बाई माणसावर तलवार चालवायची कशी?
तोच नजरबाज पुढे सरसावला. त्याला यावनी बोली येत होती.
“अदाबाई , हम शिवाजीराजा के लोग है! कोई मामुली चोर नहीं . आपकी जो भी दौलत है , हाजीर करो. “
आता मात्र अदाचं धाबं दणाणलं – ‘ राजांचं ’ नाव ऐकूनच.
पण दौलत लुटली जाणार या भीतीने ती म्हणाली, “ गर राजा है, तो ऐसे लुटता क्यूँ है ? “
हिरोजी हसला , म्हणाला ,” मोगल सल्तनत काय सरळ पैका मिळवतीया काय ? अन ते मोगल सल्तनतीचं सोड. तू कसा पैका कमावते ? हरामाचाच ना ?”
त्यावर ती क्रोधीत पावली, “ लौन्डे, ये हराम का नहीं मेरी..., मेरी मेहनत का पैसा है !”
तिच्या बोलण्यातली दुःखाची सल हिरोजीला जाणवली.
तो म्हणाला, “ अदाबाई, बोलायला येळ न्हाई. गपगुमान चीजवस्तू टाका,” त्याच्या सुरात धार होती.
बरोबरची माणसं चुळबुळत होती. उतावीळ होती.हिरोजीने खिडकीतुन खाली इशारा केला. माणसं पांगली.
पलीकडे हालचाल झाली.गादीवर लोळणाऱ्या सलिमजीला जाग येत होती.
हिरोजी म्हणाला ,” बाई, ती कट्यार खाली टाका आणि तो कंठा काढा.”
अदाने तसं केलं मात्र, झोकांड्या देणारा सलीमजी उठला.
“लौन्डी,मैने दिया हुआ हार है , दुसरोंको कैसे देती है ?” तो ओरडून म्हणाला.
त्याची उतरली नसल्याने त्याला परिस्थितीचं भान नव्हतं .अदाने असहाय्यतेने आणि विषण्णतेने त्याच्याकडे पाहिलं.
तिने तो कंठा हिरोजीपुढे केला आणि - सलीमची झापड तिच्या गालावर पडली. अचानक बसलेल्या माराने ती कळवळली.
“हरामखोर ! औरतवर हात टाकतो ...? “ हिरोजी चवताळला.
चिडलेल्या हिरोजीने क्षणात पुढे येऊन वार टाकला. सलीमजीचा उजवा हात मनगटापासून कलम झाला. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या.तो वेदनेने कळवळला. अदा भीतीने थिजली.
घाबरलेल्या अदाला मग नजरबाजाने सांगितले , “ बाई, हम सुरत लुटने आये है ! लेकिन, किसी औरत पर हाथ नही पडेगा ना किसीकी इज्जतपर ! और कोई दुसरा अगर हाथ डाले तो फिर उसकीभी खैर नही ! “
या वाक्यावर अदा हैराण होऊन पाहू लागली.
“आमच्या राजानं आम्हाला आया - बहिणींची इज्जत करायला शिकवलंय. कळलं ? “ हिरोजी म्हणाला .
‘लुटेरे आहेत. पण इज्जत लुटणार नाहीत ?... यांना लुटेरे तरी कसे म्हणायचं ?’ अदाच्या मनात विचार आला. हे तर ती पहिल्यांदाच अनुभवत होती.
तशा परिस्थितीतही, क्षणभर तिला राजांचं आणि त्याच्या अशा माणसांचं कौतुक वाटलं . आदर वाटला .
हिरोजी - माणकोजी ताड ताड निघाले. माणसांनी जे मिळेल ते गोळा केलं होतं. वाड्यातली गडीमाणसं भयाने एका कोपऱ्यात उभी होती . पण राजांच्या माणसांनी त्यांना हात लावला नाही . स्वारांना सूचना देत हिरोजी वाड्याबाहेर पडला.
**********
सुभेदार इनायतखान कोटात लपला होता. सुरक्षित . बंदोबस्तात . प्रजेला वाऱ्यावर सोडून. त्याने तोफा सज्ज करून मराठयांवर डागण्याची सुरवात केली. मराठे तसे बहाद्दर. ते तोफांच्या माराच्या टप्प्यात येतच नव्हते.
तोफांचे गोळे नेम धरून , इमानदारीने सुरतवर पडत होते. इनायतखान स्वतःच स्वतःच्या शहराची राखरांगोळी करत होता. मराठ्यांना जाळपोळ करायची वेगळी गरज नव्हती.
आणि एक गोळा अदाच्या वाड्यावर मागच्या बाजूला पडला. धडाडधूम आवाज करत वाड्याचा भाग पडला. आगीचा आणि धुराचा लोळ उसळला . त्या धक्क्याने पुढच्या भागात असलेल्या अदावर एक लाकडी नक्षीदार खांब पडला. तिच्या डोक्याला खोक पडली व ती खाली पडली. भळाभळा रक्त वाहू लागलं व ती बेहोष झाली.
बाबुलजी मागून वर आला. त्याचाही चेहरा धुराने काळवंडला होता. त्याने दुसऱ्या एका नोकराच्या मदतीने तिला हलवलं. ते वाड्याच्या बाहेर पडले . वाड्यात थांबणं धोक्याचं होत . लाकडाचा भरपूर वापर असलेला तो वाडा धडधडून पेटला होता . आगीच्या ज्वाला अदाची किस्मत गिळत होत्या !
ते वाड्याच्या बाहेर पडले. हलकल्लोळ तर सगळीकडे माजला होता. जायचं- तर कुठं ? मदत करायला कोण होतं ?
एका शंकराच्या देवळाजवळ एक प्रेमळ अन तेजस्वी, म्हातारा साधू उभा होता. त्याने यांची अवस्था पहिली. विचारपूस केली . त्याने यांना आत बोलावलं. बाबुलजी गांगरला.
“ महाराज, कैसे ? हमारी मलिका तो यवन है . “बाबुलजी म्हणाला .
” कोई बात नहीं बेटा . अंदर आ जावो ,” तो प्रेमळ साधू म्हणाला
ते तिघे आत गेले. देऊळ मोठं होतं. त्याच्या आतमध्ये पटांगण होतं .बाजूला बांधीव, मोठमोठ्या देवळ्या होत्या . आतमध्ये गोसाव्यांच्या एका जथ्याचा मुक्काम होता.
एका गोसाव्याने तिच्यावर उपचार करायला सुरुवात केली. झाडपाल्याचं औषध लावून, मलम पट्टी केली .
बाबुलजीने मागे वळून पाहिलं. अदाच्या वाड्याची लालकेशरी आग अस्मानाला भिडली होती . त्याला खाक व्हायला वेळ लागणार नव्हता.
आकाशाची निळाई धुरात हरवली होती .
पूर्ण शहरात नुसता गोंधळ माजला होता . कोणाचा पायपोस कोणाच्या कोणाच्या पायात नव्हता.
मराठ्यांचं काम पार पडलं होतं. लुटीचा माल बंदोबस्तात रवाना करून मराठी फौज आपल्या मुलखाला निघाली. खाशा स्वारीबरोबर नेताजी होते. आणि त्यांच्यामागे हिरोजी - माणकोजी.
*******
अदा होशमध्ये आली .
तिने डोळे उघडले आणि तिला समोर बाबुलजी दिसला . मग तिने आजूबाजूला पाहिलं आणि तिला आश्चर्याचा धक्काच बसला आजूबाजूला तर साधू होते.
“बाबुलजी ? ... “
आधी बाबुलजी पुढे झाला.”बेटा , कैसी हो ? इन्होने हमें आसरा दिया है…”
मग एक गोसावी , जे त्या जत्थ्याचे प्रमुख होते , ते पुढे झाले .
“बेटा ? “गुरु म्हणाले .
“आप .. हम.... ?”
तो हसला .
“ लेकिन हम तो ... नाचने वाले ... हमारा मजहब ... ? “
“ जो दुखी है उसकी मदद करना सबसे बडा मजहब है ! ”
ती आश्चर्याने पाहत राहिली तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले .
“रोती क्यूँ हो बेटा ? चुपचाप पडे रहो और आराम करो.”
ते गेले . त्यांचं नाव आचार्य बलभद्रजी होतं .
गोसावी गेलेला पाहून बाबुलजी पुढे झाला . त्याला रहावतच नव्हतं.
“अदाबेटा-हमारी कोठी तो जलके राख हो गयी.”
तिच्या काळजात जीवघेणी कळ उमटली. डोळ्यात पाणी तरारलं.
“ फिर तो हमारा क्या रह गया ? ना कोठी ना दौलत ! ऊन काफिरों ने…”
“ अदा, सुरत तो बेहाल है. कोई चीज ठिकाने पर नहीं. कोई साथ मिलने की गुंजाइश नहीं. सबके सब लुटे गये है…. और वैसेभी सुरतपर तोपें चलायी किसने ? इनायतखानने - खुद हमारे सुभेदारने ! …”
तिने डोळे मिटून घेतले अन तिला हिरोजीची आठवण आली. तिला त्याचा खूप राग आला. त्या माणसाने तिची जन्नत असलेली जिंदगी जहन्नुम केली होती !
असा बराच वेळ गेला .
पलीकडे भजन सुरु झालं होतं -
जो पाया था मैने
वो मेरा नही था
ना खोया कभी तुझे
तू तो मेराही था
अदा ते भजन ऐकत होती. त्याचे शब्द तिच्या मनात गोल फिरू लागले.
कायम ऐय्याशीमध्ये जिंदगी गुजारलेली अदा, विरक्तीचं जिणं पाहत होती . तिने ख्वाबमध्येही असं काही आयुष्य पाहायला मिळेल याची कल्पना केली नव्हती .
**********
सुरत हळूहळू पूर्वपदावर येत होतं. व्यवहार सुरु होऊ लागले होते. लोक झालेल्या नुकसानीचा अंदाज घेत होते.अदाच्या वाड्याची राखरांगोळी झाली होती .
अदाला आज जरा बरं वाटत होतं ; पण ती डोळे मिटून पडून राहिली होती.
आदल्या दिवशी बाबुलजी एक-दोन ठिकाणी जाऊन आला होता . अदाच्या काही खास गिऱ्हाईकांकडे . आणि सलिमजीकडे सुद्धा ! पण तो बेटा आता त्याच्या बापाच्या आश्रयाला गेला होता . “ माझ्या पोराला नादान बनवला , लुटला “, असं म्हणून त्याच्या बापाने बाबुलजीला तर हाकलूनच लावलं . तेव्हा एका खांबामागे लपून हाततुटका सलिमजी खालमानेने बाबुलजी कडे पाहत होता .
इतर गिऱ्हाईकांनीसुद्धा त्याला हाकलून दिलं होतं - “ आमचाच ठावठिकाणा नाही अन तू काय करतोस इकडे ? चल निघ बाजारभडव्या !...”
बिचाऱ्या बुढ्या बाबुलजीच्या वाट्याला फक्त अपमान आणि शिव्याच आल्या.
माणसांच्या वागण्याचं मनाशी नवल करत तो परत फिरला .माणसं इतकं टोकाचं विरोधी वागू शकतात हे पाहून, बिचारा तोंड पाडून परत आला.
अदाला काय सांगावं अन कसं सांगावं हेच त्याला कळेना बिचारा गप्प बसून राहिला .
" बाबुलजी , " तिने थरथरत्या आवाजात हाक मारली .
त्याचा बांध फुटला . तो रडू लागला . " बेटा , हम तो लूट गये . कोई हमारा नही. कोई खडातक नहीं करता हमें . हम बाजारू है सिर्फ बाजारू ! हमारे कोई रिश्ते नहीं होते..."
अदाला तिचं भवितव्य कळून चुकलं . ती शांत पडून राहिली ;पण आसवं तिचं न ऐकता झरत राहिली.
अदा तिच्या जागेवर पडून होती . तिने डोळे उघडले आणि पुन्हा मिटले .
तिच्या मनात ते भजन गुंजत होतं -
‘ जो पाया था मैने ‘. . .
आणि तिच्या मनात, बित्या जिंदगीचे पल फेर धरत पदन्यास करू लागले .
तिच्या पायी कंगाल झालेल्या लोकांचे चेहेरे, तिच्या डोळ्यासमोर येऊ लागले . विरमजी पारेखचा दीनवाणा चेहरा उभा राहिला .
पलीकडे दुसरं भजन सुरु झालं होतं-
उलटी नजरसे देख ले दुनिया
फिरभी भगवान नजर तो आयेगा
तिच्या मनात तेही भजन गुंजु लागलं …
माणसाच्या स्वार्थी वागण्याचं , अप्पलपोटेपणाचं आश्चर्य करत , ती उलट विचार करू लागली होती . . . स्वतःच्या मनाच्या वागण्याचं नवल स्वतःच्या मनाशी करत.
तिच्या नजरेसमोर हिरोजी होता. तरणाबांड . सावळासा पण तडफदार. तिला त्याच्या वागण्याचं नवल वाटत होतं. तिच्या रूपाची जादू हिरोजीची नजरबंदी करू शकली नव्हती. तिच्या एका कटाक्षासरशी समोरचा घायाळ होत असे. पण इथे तर ती स्वतःच घायाळ झाली होती . . . का असं की हरिणीला शिकाऱ्याशीच मोहोब्बत व्हावी?
तिच्या डोळ्यांसमोर, डोळे मिटले तरी , तोच होता.
तिने आजवर अनेक पुरुष पहिले होते. स्त्रीदेहासाठी हपापलेले. लंपट, लोभी, दौलत उधळणारे. पै न पैचा विचार करणारे, कंजूस, मयकश अनेक . पण त्यांना मोहजालात पाडून लुटणं हा तिचा धंदा होता. कोणी एक माईचा लाल असा नव्हता की ज्याने तिचं दिल जीतलं होतं ! एकभी नहीं…
त्या सगळ्यांपेक्षा ‘तो’ किती वेगळा होता !...
अदा आज घायाळ हरणी झाली होती. तिला आठवत होतं त्याचं रूप , त्याचं शौर्य, त्याची दिलदारी, त्याचं बाई माणसाला इज्जत देणं, त्याची त्याच्या राजाशी असलेली वफादारी ...
माणूस सच्चा होता !
पण तिचे विचार पुन्हा उलट सुलट सुरु झाले ... पण -पण त्यानेच तर आपल्या ऐशोआरामी जिंदगीची वाट लावली ना ?...
तिने डोळे उघडलेले पाहून बाबूलजी पळत आला.
“ अदा बेटा !”
“ जी बाबूलचाचा ! “
“ कैसी हो ? “
“ ठीक हूं ! “
“अब क्या करेंगे ? “
“ पता नहीं .”
“क्या हम दिल्ली जायेंगे ? “
“ नहीं “
“ तो कहाँ जायेंगे ? “
“ अब हमारा रहा ही क्या ? सब जगह एक जैसी ! इन साधुवोंके साथ जायेंगे , जहाँ दिल हुवा रूक जायेंगे .”
“ ठीक है बेटा. “ बाबूलजी म्हणाला.
अर्थात त्याला तिची काळजी वाटली आणि तिचा विचार त्याच्या बुढढ्या मनाला पटला नाही तो नाहीच .बाबूलजीला कोणी नव्हतं. आणि अदा त्याला मुलीसारखी होती.
पुढे काय ? ते अदाला माहित नव्हतं. तिला आता राहूनराहून हिरोजीची याद येत होती.
दुष्मनाशी इष्क ? तिला स्वतःचा राग येत होता ,आश्चर्य वाटत होतं. आणि त्याची ओढ त्याच्याकडे खेचत होती.
पण हिरोजी ?...तो आपल्याला कबूल करेल ? तो हिंदू आणि आपण यवन ? त्यातून एका कोठेवालीची मोहोब्बत तो मानेल ? . . .
तिच्याकडे या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नव्हतं.
तिने ऐकलं होतं की तो गोसावी लोकांचा जत्था दख्खनला जाणार होता. रामेश्वरमला . तीर्थयात्रा करत. बाबुलजीला त्यांच्यामध्ये सामावणं अवघड नव्हतं. पण अदा ?...
गुरु तिकडे आले आणि त्यांनी अदाकडे पाहुन स्मित केलं. बाबुलजीने नमस्कार केला. आणि अदाने त्यावर नकळत गुरूंना नमन म्हणून ‘ आदाब अर्ज ‘ केला. मग तिच्या ते लक्षात आल्यावर ती ओशाळली . तिने ओठ चावला. गुरूंना ते लक्षात आलं. त्यांच्या प्रेमळ पण तेजस्वी चेहऱ्यावर स्मित पसरलं.
मग तिने दोन्ही हात जोडून नमस्कार केला.
“ कैसी हो बेटा ? “
“ ठीक हूँ ! आपका बहोत बहोत शुक्रिया .”
“ उसमे शुक्रिया कि क्या बात ?”
“ आपने तो हमारी जान बचायी ! “
“ ये तो मानवता का काम है .”
पण पुढे ती काहीच बोलली नाही . ती चाचरली .
“ घबराओ नाही बेटा. बताओ जो दिल में है. हम तो भगवन के दास है. किसी बातका परहेज नहीं.”
“ आपने जान बचायी , लेकिन हम तो यवन है. “
“ तो ?... कोई गर संकटमें है तो उसका कौनसा धर्म ? ये लडाई - झगडा तो पैंसों के लिये होता है, हम तो सब भगवान के बच्चे है. सिर्फ भगवान के नाम अलग .”
तिला बरं वाटलं . तिची नजर खाली झुकली. तिची दौलत, तिची कोठी गेली, तेव्हा पासून तिचे सगळे ग्रह बदलले होते. पुढची किस्मत माहित नव्हती. पण माणसांची वेगवेगळी रूपं तिला पाहायला मिळत होती. जी आजपर्यंत तिने कधीच पहिली नव्हती.आजपर्यंत तिने ऐय्याशीत लडबडलेली खुदगर्ज माणसंच काय ती पाहिली होती.
“ आप बुरा ना माने तो .....”
“हां बताओ बेटा.”
“क्या हम आपके साथ चल सकते है ?”
“ वो कैसे ? “
“ क्यूँ ? हम यवन है इसलिये ? “
“नहीं ! वो बात नहीं. आप हमारे साथ रहना आपको मुश्किल होगा. कभी खाना मिलेगा नहीं तो कभी पानी. पाव में छाले पडेंगे. दिनकी धूप और रातकी ठण्ड .सब कैसे सह पाओगी ?”
“ और कुछ ? “
“ बेटा तुम खूबसूरत हो. आप हमारे साथ रहेगी तो रास्ते में कोई सोचेगा कि हम तुमे पकडके ले जा रहे हैं. हम अध्यात्म का मार्ग छोड कुछ गलत काम कर रहे हैं. हमपे आफत आ जायेगी ! ”
“ तो आप साधू होकरभी डरते हो? “ती खट्याळपणे म्हणाली.
“ बिलकुल नहीं. लेकिन अध्यात्म के रास्ते से हम भटक जायेंगे. “
“ हमारी खुबसूरतीसे डर लागत है ? “
गुरु हसले ,म्हणाले , “ भगवान एकही है ,जो सबसे सुंदर है. हमारा सौंदर्य तो काल के साथ चला जायेगा. “ मग ते विचार करून म्हणाले, “ ठीक है बेटा चलो हमारे साथ. “
अदाचा चेहरा उजळला तोच ते पुढे म्हणाले, “ लेकिन हमारे साथ रहना है तो आपको पेहराव बदलना पडेगा. हमारे साथ इस पेहरावमे रहोगी तो मुसीबत आ सकती है. हमारे जैसी ये कफनी पहननी पडेगी. पहन सकती हो ? “ आता आचार्य खट्याळपणे म्हणाले.
अदाला खुद्कन हसू आलं. ती म्हणाली, “ जी हाँ ! मैं पहन सकती हूँ ! “
“ चलो ठीक है. लेकिन आखिर तुम चाहती क्या हो ? “
“आप लोग दख्खन जा रहे हो, मैं भी वहाँ चलना चाहती हूँ.”
“ क्यूँ? “
मग अदाने सारी कहाणी सांगितली. तिचं मन हिरोजीवर कसं जडलंय ,तेही सांगितलं.
“तुम उसे अच्छी तरहसे जानती तक नही और उसे अपना समझती हो ? ये गलती कैसे कर रही हो ?”
“औरतका दिल उसका सच्चा प्यार जानता है ! ” अदा म्हणाली.
“ लेकिन उससे मुलाकात होगी , यह कैसे कह सकती हो ? और वो तुझे अपनाएगा ? “
“ तो जान दूंगी उसके कदमोंमें “,ती निश्चयाने म्हणाली
“ नहीं. ये उचित नहीं .”
“ तो फकीर बन जाऊंगी “, ती तडकून म्हणाली
गुरूंना तिच्या बोलण्यातला सच्चेपणा जाणवला.
जथ्यातल्या गोसाव्यांनी त्यांच्या येण्याला विरोध दर्शवला . एक मुजरेवाली, त्यातून यवन !... त्या दोघांचं येणं गोसाव्यांना काही रुचलं नाही; पण शेवटी त्यांनी आचार्यांचा निर्णय मानला .
आचार्य म्हणाले , " सारीच देवाची लेकरं. ज्याचं दिल साफ आहे त्याला विरोध कशासाठी ?"
प्रतिक्रिया
30 Mar 2021 - 9:30 am | टर्मीनेटर
मस्त रंगत चाललंय कथानक 👍
30 Mar 2021 - 10:51 am | ज्ञानोबाचे पैजार
आणि तुमच्या नेहमीच्या पठडीपेक्षा एकदम वेगळी
पुभालटा
पैजारबुवा,
30 Mar 2021 - 7:09 pm | रंगीला रतन
वाचतोय.
30 Mar 2021 - 7:58 pm | सौंदाळा
क्रमशः आहे ना?
हा भाग पण उत्तम. पुढ्च्या भागात काय असेल याची उत्सुकता आहे.
30 Mar 2021 - 11:29 pm | बिपीन सुरेश सांगळे
टर्मिनेटर
पैजारबुवा
रतन
सौंदाळा
आणि इतर वाचक मंडळी
खूप आभारी आहे आपला
31 Mar 2021 - 5:31 pm | चौथा कोनाडा
एक नंबर +१
अतिशय रोचक !
5 Apr 2021 - 12:03 am | बिपीन सुरेश सांगळे
| चौथा कोनाडा
एक नंबर +१
अतिशय रोचक !
आभार अन आभार