किल्ले हडसर - एक प्रेक्षणीय व थरारक भटकंती

Primary tabs

वझेबुवा's picture
वझेबुवा in भटकंती
13 Mar 2021 - 11:27 pm

राम राम..

हल्ली शनिवार-रविवारी गडांवर होणारी गर्दी पाहता आता जमल्यास वीकडेज मध्ये ट्रेक करत जाऊ असं मी आणि एका मित्राने सहज ठरवलं आणि 17 फेब्रुवारी च्या बुधवारी गोरखगड तर 3 मार्च च्या बुधवारी हडसर पाहून आलो. हडसर साठी आम्ही तिघे जण होतो.

जुन्नर जवळील हडसर उर्फ पर्वतगड हा वन डे भटकंती साठी प्रेक्षणीय आणि थरारक आहे.

प्रेक्षणीय यासाठी की गडाचा मुख्य दरवाजा आणि त्यापुढील नागमोडी वळत जाणाऱ्या पायऱ्या या कातळात कोरून काढल्या आहेत. पायऱ्यांसाठी रचलेले दगड कुठेही दिसत नाहीत केवळ कोरीव काम. आणि किल्ल्यावरचे मुख्य प्रेक्षणीय ठिकाण म्हणजे किल्ल्यावरील धान्य कोठारे. आपण वरून चालताना जराही कल्पना येत नाही कि आपल्या खाली खडकाच्या पोटात विस्तृत धान्य कोठारं कोरली आहेत.
कोरून काढलेल्या वळणा वळणाच्या वाटेने आपण धान्य कोठारांशी पोहोचतो आणि त्या नंतर डावीकडे, उजवीकडे आणि समोर अशी तीन दिशांना कोठारं आहेत. त्यातही उजवीकडील आणि समोरील बाजूस 3-3 कोठारं आहेत. l आजही तिथे कुबट वास किंवा घाण येत नाही.

आता राहिला किल्ल्याचा थरारक पैलू..
किल्ल्यावर जायला वर उल्लेखलेल्या पायऱ्यांचा राजमार्ग आणि खिळ्यांची वाट असे दोन मार्ग आहेत.
हडसर गावातून किल्ल्यावर जाणारी एक खिळ्यांची अथवा खुंटीची वाट आहे. वाटेच्या सुरवातीलाच फलक लावला आहे 'ही वाट जीवघेणी असून प्रशिक्षित मार्गदर्शन आणि साधनाशिवाय जाऊ नये'.
80 ते 90 अंशांची कातळभिंत चढण्यासाठी मध्ये मध्ये सळयांचे तुकडे ठोकले आहेत. आणि कुठे खोबणी आहेत. या खुंट्याना पकडत खोबणीत पाय रोवत वर चढायचे. थरारक अनुभव होता. चढताना मधेच खाली पहिले तेव्हा आपण कुठून कसे चढत आहोत याची जास्तच जाणीव झाली. शेवटी काय.. रिस्क है तो ईस्क है...

आम्ही खिळ्यांच्या वाटेने चढून राजमार्गाने उतरलो त्यामुळे पुन्हा गाडीच्या ठिकाणी यायला पूर्ण किल्ल्याला प्रदक्षिणा घालावी लागली. 2-3 च्या भर उन्हात चालून चालून हवा टाईट झाली.

- किल्ल्यावर महादेवाचं सुंदर मंदिर आहे. त्यामध्ये गरुड, हनुमंत आणि गणपती यांच्या सुंदर मूर्ती आहेत.
- किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही.
- किल्ल्याची उंची फार नाही पण विस्तार मोठा आहे.
- किल्ल्यावरून माणिकडोह धरणाचा जलाशय मस्त दिसतो.

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

14 Mar 2021 - 6:46 am | प्रचेतस

मस्त, पण त्रोटक लिहिलंय.

खूप पूर्वी केलेल्या हडसर ट्रेकची आठवण आली.
http://misalpav.com/node/11064

वझेबुवा's picture

14 Mar 2021 - 8:52 am | वझेबुवा

मान्य की जरासं त्रोटक झालय.
खरंतर खूप वर्षांनी लिहीतोय, म्हटल सुरुवात तर करु.

आपला लेख वाचून नक्कीच अभिप्राय नोंदवेन.

कंजूस's picture

14 Mar 2021 - 7:16 am | कंजूस

निमगिरी कुठे जवळपासच आहे ना?
प्रचेतसचा लेखही वाचला.

हो. निमगिरी त्याच डोंगररांगेत असून हडसरच्या रसत्यातच निमगिरीचा फाटा येतो.
मला मिळालेल्या माहितीनुसार निमगिरी व हनुमंतगड हे दोन किल्ले एकाच दिवसात करता येतात.

मुक्त विहारि's picture

14 Mar 2021 - 8:33 am | मुक्त विहारि

फोटो हवे होते

खरंतर फोटोज व व्हिडीओज आहेत, पण ते मोबाईल वरुन कसे अपलोड करायचे ते समजले नाही.
खूप वर्षांनी पुन्हा मिपा वर आलोय.

मुक्त विहारि's picture

14 Mar 2021 - 9:19 am | मुक्त विहारि

सहमत आहे

कंजूस's picture

28 Mar 2021 - 2:34 pm | कंजूस

ब्लॉगवरून इथे आणणे अगदी सोपे. ( कुणीही आणू शकतो.)

गोरगावलेकर's picture

14 Mar 2021 - 4:28 pm | गोरगावलेकर

थोडक्यात छान माहिती. भटकंतीच्या लेखात फोटो असले तर तर आणखी चांगले वाटते.
या निमित्ताने वल्ली यांचा ट्रेकही वाचनात आला.

चौथा कोनाडा's picture

27 Mar 2021 - 1:27 pm | चौथा कोनाडा

व्वा, छान भटकंती !
आटोपशीर झकास वर्णन !

(प्रतिसादामध्ये प्रचि टाकता येतील)

कंजूस's picture

28 Mar 2021 - 2:45 pm | कंजूस

वर चढून गेलं की दोन किमीवर घाटघर गाव आहे. तिथे जुन्नरला जाणारी बस येते. त्या बसने 'पूर'चे देऊळ, आणि चावंड किल्ला केला. पुढे जुन्नर डेपोजवळ शिवनेरी.
पण हडसर आणि निमगिरी हे माणिकडोहाच्या ( तलावाच्या) पलिकडच्या तिरावर आहे. तिकडे जुन्नरवरून दुसरी बस जाते.

कल्याण जुन्नर जाताना सितामढी का कोणता फाटा लागतो तिकडूनही जुन्नरला जाता येते ( खासगी वाहने तिकडून जातात, एक घाट चढून उतरावा लागतो) त्या वाटेवरून निमगिरी जवळ आहे म्हणतात पण एसटी बस तिकडून जात नाही. ती बनकर फाटा - लेण्याद्रि फाटा - जुन्नर अशीच जाते.

सत्याचे प्रयोग's picture

7 Apr 2021 - 3:43 pm | सत्याचे प्रयोग

फोटु नाहित ओ