ऊन्हाचा तुकडा

प्रसाद साळवी's picture
प्रसाद साळवी in जे न देखे रवी...
11 Mar 2021 - 3:25 pm

चकचकता कशाच्याही खाली न दडणारा
उन्हाचा तुकडा
बिन-तक्रार हातात येईल
असं वाटलं होतं
पण ते काही खरं नव्हतं

या उन्हाच्या तुकड्यावर फक्त माझा
असेल हक्क.
प्रत्येकाचेच असतील स्वतंत्र
उन्हाचे तुकडे
असं वाटलं होतं
पण कोणाच्या हातात, खिशात, बोलण्यात, लिहिण्यात
नव्हताच उन्हाच्या तुकड्याचा चमकदार मागमूसही

आणि मला मात्र स्वप्नं पडत
सभोवार उन्हाचे चमकते तुकडे
मी सांगेन त्या तालावर करतायत वेळेची घुसळण
जादूगार झालोय मी उन्हाच्या तुकड्यांचा
अशी

पण मीही विसरलो उन्हाच्या तुकड्याला
यथावकाश
स्क्रीनवरच्या रंगीत अद्भुतात
रांगेच्या क्रमांकांच्या चढाओढीत
कमावलेल्या वजनाच्या आड
संवादाच्या-वादाच्या कैफात
किचकटाच्या छाया-प्रकाशात

आणि मी विसरलो म्हणून
मला वाटलं
उन्हाचा तुकडा रुसला
अरेरे
घोर कल्पनाविलासा
निरर्थकाच्या गाभ्यातल्या केवीलकणा
उन्हाचा तुकडा तसाच आहे
माझ्या असण्या-नसण्या पलीकडे

कविता

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

13 Mar 2021 - 9:52 am | प्रचेतस

सुरेख