गोलकीपर
---------------------------------------------------------------------------------------------
“ यश , तुझ्या सरांचा फोन आहे,” बाबा म्हणाले.
आणि यश दचकलाच. हो ना. सरांचा फोन म्हणजे आश्चर्य, भीति, गंमत सारंच. तेही रात्रीच्या वेळी .
पाय चोळत यश बेडवर बसला होता . टीव्हीवर फुटबॉलची एक मॅच पहात. तो उठून बाबांकडे गेला.
“ अहो सर - पण सर, “ बाबा व्याकुळतेने बोलत होते. यशला काही कळत नव्हतं.
“ एक मिनीट, “ बाबा सरांना म्हणाले आणि त्यांनी यशला विचारलं, “ सर विचारताहेत, फायनल खेळू शकशील का ? “
दुसऱ्या सेकंदाला यश ‘ हो ‘ म्हणाला.
किडकिडीत यश त्यांच्या शाळेच्या फूटबॉल टीमचा गोलकीपर होता. एकदम भारी. तो असला की पोरं निर्धास्त.
अन् - आंतरशालेय स्पर्धा चालू होत्या. पण सेमी फायनलच्या आधीच, यश प्रॅक्टिस करताना पडला होता. त्याचा पाय दुखावला होता. डॉक्टरांनी आठवडाभर खेळायची मनाई केली होती.
यशच्या ऐवजी आर्यन गोलकीपर झाला होता. खरंतर आर्यन फॉरवर्ड होता. प्रतिस्पर्ध्याच्या गोलपोस्टजवळ खेळणारा खेळाडू . पण काय करणार ? तरी यशची शाळा सेमी फायनल जिंकली. फायनल दोन दिवसांनी होती .... आणि - आर्यनला डेंग्यू झाला.
आता यशच्या शाळेकडे चांगला गोलकीपरच नव्हता. कोणालातरी असंच उभं करावं लागणार होतं. म्हणून यशच्या सरांनी नाईलाजाने बाबांना फोन केला होता.
सर म्हणाले, “ तोच आमचा खरा गोलकीपर आहे. त्याचा पाय तर आता बरा आहे ना.”
बाबा किचनकडे पळाले. आईचा सल्ला घ्यायला. आईला यशची स्थिती माहिती होती. तो खेळू शकला असता. त्यामुळे आईने ‘ हो ‘ म्हणल्यावर बाबांना गप्प बसावंच लागलं होतं. फूटबॉलमध्ये ‘ रेड कार्ड ‘ मिळून शिक्षा झालेल्या खेळाडूसारखं.
आता प्रश्न एकच होता ! .... पूर्ण आठवडा यश मैदानावर गेला नव्हता. खेळला नव्हता. प्रॅक्टिस शून्य ! अशा वेळी - तो फायनलला कसा उतरू शकणार होता ?
दुसऱ्या दिवशी सकाळी यश फूटबॉलच्या मैदानावर पोचला. थंडीचे असले तरी प्रसन्न दिवस होते. मैदानावर वारं होतं. त्यामुळे जास्त गार वाटत होतं . गवताचा वास येत होता. तो वास यशला आवडायचा. तो वास आल्यावर त्याच्या अंगात खेळण्याची पुरी सुरसुरी यायची.
यशच्या अंगातली जर्सी गडद निळ्या रंगाची होती. त्याला खूप आवडायचा तो रंग. समोर पोपटी जर्सीतला चैतन्य उभा होता. तो विवेकानंद शाळेचा ‘फॉरवर्ड ‘ होता. स्ट्राईक करणारा खेळाडू. चैतन्य जणू हुकमाचा एक्का होता. तो जणू चैतन्याने सळसळत होता. तो त्याच्या मोठ्या मोठ्या डोळ्यांनी यशकडे बघत होता.त्याची नजर कायम रोखल्यासारखी वाटे - भेदक !
आताही तो असाच बघत होता - कधी एकदा तुला चकवतो आणि गोल करतो, असं. अन् - त्याला कळलं होतं की .... यश फिट नाहीये.
यशचं टिळक हायस्कूल आणि विवेकानंद शाळा यांची नेहमीच ‘ टफ फाईट ‘ असायची. यशची पाठ पाटील सरांनी थोपटली. त्यांच्या डोळ्यात काळजी होती आणि विश्वासही.
मैदान मुलांनी नुसतं फुलून गेलं होतं . रंगीबेरंगी कपड्यांची जत्राच जणू. आरडाओरडा ,शिट्ट्या अन आरोळ्या !
खेळाला सुरवात झाली. थोडासा पाय दुखतोय, हेसुद्धा यश विसरून गेला. मुलांचा एकच गलका चालला होता. प्रत्येकजण आपापल्या शाळेला चिअरअप् करत होता. चैतन्य संधीची वाटच पहात होता. आणि त्याला ती मिळाली - पेनल्टी किक्. त्याने गोल करण्यासाठी सुरेख किक मारली ; पण हाय ! तो बॉल यशच्या हातात होता. नो गोल !
फर्स्ट हाफ झाला. पंचेचाळीस मिनीटं. पण - एकही गोल झालेला नव्हता. भोपळा फुटत नव्हता. कारण ? - दोन्ही गोलकीपर. दुसरं काय ?
ब्रेक संपला. अटीतटीची चुरस सुरु झाली. पुढची पंचेचाळीस मिनीटं आणि गोल ? - शून्य ! मुलंच नुसती गोल - गोल पळत होती. आर्यन तर खेळायला नव्हताच. पण सिद्धांत आणि हर्षवर्धनचा स्ट्राईक कमी पडत होता. तिकडे विवेकानंद शाळेच्या चैतन्य आणि बिलालचंही तेच.
समोरच्या टीमचा फॉर्म चांगला होता. पण यश सगळे गोल अडवत होता .- आश्चर्यकारकरित्या . मॅच बरोबरीत सुटली होती.
टाय !
मग जास्तीचा वेळ देण्यात आला. सिद्धांत आता खूप टेन्शनमध्ये खेळत होता. त्याने बिलालला ढकललं. रेफरींनी सिद्धांतला यलो कार्ड दाखवलं. अख्खं टिळक हायस्कूल टेन्शनमध्ये. जास्तीच्या वेळात फक्त एवढंच घडलं होतं - आता ?
पेनल्टी शूट - आऊट !
प्रत्येक टीमला पाच पेनल्टी किक मारण्याची संधी. दोन्ही टीमला आलटून पालटून. पण थेट संधी. आता खेळ फक्त नेटमध्ये येणारा बॉल आणि गोलकीपर यांचाच. चुरस फक्त त्यांचीच !...
विवेकानंदचा गोलकीपर तनिष पण तोडीस तोड होता. पहिली संधी टिळक हायस्कूलची होती. दोन्ही टीमच्या पहिल्या तीनही पेनल्टी वाया गेल्या. मात्र चौथ्या पेनल्टीला सिद्धांतने गोल केला. पहिला गोल ! टिळक हायस्कूलच्या पोरांनी एकाच गलका केला .
मग आला बिलाल. त्याने जोरदार , सरळ बॉल मारला. खूप वेगाने. तो बॉल यशने अडवला- पण नेमका दुखऱ्या पायाने. गोल वाचला पण पाय दुखावला .
टिळक हायस्कूलच्या हर्षवर्धनची पाचवी किक वाया गेली .
आता विवेकानंद शाळेची पाळी होती. पूर्ण भिस्त यशवरच होती. - आणि त्याचा पाय ? - आणि त्याची प्रॅक्टिस ? इतका वेळचा त्याचा आत्मविश्वास, त्याचा खेळ जणू गायब झाला. पण क्षणभरच. मग तो सावरला. तो काहीतरी आठवत होता. - काय असावं ते ?...
आता शेवट- चैतन्य !... आणि त्याचा गोल झाला तर बरोबरी आणि नाही झाला तर ? - जिंकण्याची संधी.
चैतन्य हुशार खेळाडू होता. त्याने टिपलं होतं, यशचा पाय दुखावलाय. त्याने बॉल हवेत उंच उडून जाळ्यात पडेल अशी किक मारली. यशला तशी उडी मारून गोल अडवणं अवघड जाईलशी !
सगळ्यांचे श्वास रोखले गेले. झालं- संपलं सारं ! पण - पण यशने तो अवघड गोल वाचवला. त्याच्या दुखऱ्या पायांनी ‘ लय मोठी ‘ उडी मारली होती. हवेतच बॉल हातात धरून तो जमिनीवर पडला. लोळता झाला.
यशच्या सगळ्या मित्रांनी एकाच जल्लोष केला. मैदान दणाणून टाकलं . सरांच्या डोळ्यांत तर पाणीच आलं. ते पाठ थोपटायचीही विसरले. पण ते काम त्याच वेळी सुटलेल्या वाऱ्याने केलं . त्या वाऱ्याने मैदानावरची अशोकाची झाड सळसळली. जणू तीही टाळ्या वाजवत होती.
यश तर हिरोच झाला होता . मुलांनी त्याला उचललं .
रात्री - आजी यशच्या पायाला तेल चोळून देत होती. त्यावेळी बाबांनी विचारलं - “ अरे राजा ,तू हे जमवलंस कसं ? आठवडाभर प्रॅक्टिस न करता ? “
मग यश बोलता झाला - “ मला प्रॅक्टिस नव्हती. म्हणून टेन्शन आलं होतं . मग मी काल लवकर झोपलो. आठवतंय ? डोक्यावर पांघरूण घेतलं. त्या ब्लँकेटच्या आत जणू माझं फुटबॉलचं मैदान होतं . मग मी मनाने हजार वेळा- हो हजार वेळा, बॉल अडवायचा सराव केला. एकही गोल माझ्या नजरेतून, पकडीतून सुटत नव्हता. डावा-उजवा, आडवा- तिडवा, वरून- खालून. तीच माझी प्रॅक्टिस होती. माझ्या डोळ्यांसमोर मी स्वतःच खेळत होतो. माझ्या मनातच जणू फायनल सुरु होती...”
“ पण बाबा रे, परीक्षेची प्रॅक्टिस अशी ब्लँकेटच्या आत करू नकोस हं ! “ यशची मोठी बहीण शर्वरी गंमतीने म्हणाली. त्यावर सगळे खो-खो हसले.
त्यावर यश फुरंगटून , डोक्यावर ब्लॅंकेट घेऊन , झोपण्याचं नाटक करत पडून राहिला .
---------------------------------------------------------------------------------------------
प्रतिक्रिया
5 Mar 2021 - 10:54 am | कानडाऊ योगेशु
सांगळे साहेब गोष्ट आवडली. लिहिते राहा.
6 Mar 2021 - 12:51 pm | सिरुसेरि
छान लेखन . +१
8 Mar 2021 - 11:10 am | बिपीन सुरेश सांगळे
योगेश
सिरुसेरी
खूप आभार
8 Mar 2021 - 11:11 am | बिपीन सुरेश सांगळे
योगेश
कृपया साहेब वगैरे म्हणू नका .
संकोच वाटतो .
आभार
6 Jul 2021 - 12:58 pm | चौथा कोनाडा
व्वा, कमाल आहे यशची !
जबरदस्त पॅशनने गोलकिपींग केले आणि यश मिळवले !
शेवटचा पॅरा तर खासच !
बिपीन सुरेश सांगळेजी, कथा आवडली ! लिहित रहा अशा सुंदर कथा !
6 Jul 2021 - 8:58 pm | टर्मीनेटर
तुमच्या निरागस बालकथा आनंददायक असतात...
धन्यवाद 🙏