अशी ही भाऊबीज

सरिता बांदेकर's picture
सरिता बांदेकर in जनातलं, मनातलं
8 Feb 2021 - 11:05 pm

अशी ही भाऊबीज
सौ सरिता सुभाष बांदेकर

सुभानराव घरात शिरले तेच हेमंतला हाक मारत.सीताबाईंनी बाहेर येत विचारलं,” अहो काय झालं? हेमंत गेलाय मॅच खेळायला, येईल थोड्या वेळात.”
“अहो थोड्या वेळात नको,सुजाताला पाठवा आणि हेमंतला म्हणावं लगेच घरी ये. मॅच राहू देत.आणि तुम्ही देवाजवळ दिवा लावा आणि देवापुढे साखर ठेवा.”
सुभानराव बाहेर गेले आणि सुजाताला हाक मारून म्हणाले,
“सुजे, पळत पळत जा आणि तुझ्या दादाला सांग ताबडतोब बोलावलंय बाबांनी.”
सुजाता तशीच धावत निघाली. ती जेव्हा मैदानात पोचली तेव्हा मॅच चालू होती. ती दादा दादा अशी हाक मारत मारत येतेय म्हटल्यावर हेमंत लगेच तिच्याजवळ आला.
“ काय गं सुजे, कशाला एव्हढी धावत आलीयस??”
“अरे दादा तुला बाबांनी ताबडतोब बोलावलंय. चल तू लगेच.”
“अगं पण काय झालंय काय एव्हढं?? मी मॅच संपवून येतो लगेच. फक्त चार ओव्हर राहिल्यात.”
सुजाता त्याचा हात ओढत म्हणाली ,” ते काही नाही. तू चल लगेच. बाबांनी सांगितलंय लगेच यायला.”
हेमंत कॅप्टनला सांगून लगेच निघाला. त्याने सुजाताला कॅरियरवर बसवले आणि जोरात सायकल पळवली.
ते दोघं घरी पोचले तेव्हा सुभानराव आत बाहेर करत होते. हेमंतला बघितल्यावर त्यांनी त्याला जवळ घेतले आणि म्हणाले,”घराण्याचं नांव काढलंस पोरा. तुझी सैन्यात भरती नक्की झालीय.हे बघ आजच हे पत्र आलंय. सरकारी लिफाफा बघून मी समजलोच होतो पण मग पवार मास्तरांकडे जाऊन पत्र वाचून घेतलं.हेमंतच्या आई, चला तयारीला लागा. हेमंतची सगळी तयारी करायची आहे.”
हेमंतनी सुभानरावांच्या हातातून तो लिफाफा घेतला आणि पत्र वाचलं.आणि लिफाफा देवाजवळ ठेवून नमस्कार केला.
सुभानराव खूष होते त्यांना काय करू आणि काय नको असं झालं होतं.त्यांचं स्वप्न पूर्ण झालं होतं. ते स्वत: सैन्यात हमाल म्हणून काम करत होते तेव्हापासून त्यांनी एकच स्वप्न बघितलं होतं,हेमंतला सैन्यात पाठवायचं.
सीताबाई आणि सुजाता मात्र गप्प गप्प होत्या दिवाळी आठवड्यावर आली होती. हेमंतला मात्र लगेच रुजू व्हायला लागणार होतं.
सुजाता रडत रडत सुभानरावांना म्हणाली,” म्हणजे बाबा दादा भाऊबीजेला इथे नसणार??”
“अगं,होय तो इथे नसला म्हणून काय झालं ?? आपण भाऊबीज करायचीच,तू चंद्राला ओवाळायचं, तोच तुझ्या भावना हेमंतला पोचवेल.”
सुभानरावांचं बोलणं हेमंतनी ऐकलं आणि म्हणाला ,” अगं नकटे, मी जरी तिकडे लांब असलो तरी तुम्ही सर्वांनी दिवाळी आणि बाकी सर्व सण तेव्हढ्याच आनंदात साजरे करायचे.”
“अरे पण दादा तू नसताना आम्ही दिवाळी कशी साजरी करणार??मी भाऊबीजेला कोणाला ओवाळणार??”
“ नकटे,तुला बाबांनी सांगितलं ना कि चंद्राला ओवाळायचं. ज्यांना भाऊ नसतो ते चंद्राला ओवाळतात. आणि मी त्याच चंद्रप्रकाशात थांबेन म्हणजे मला पोचेल ते. मी तुला तुझी ओवाळणी कोरियरनी पाठवीन.रक्षा बंधन आणि भाऊबीजे दिवशी तुला ते पार्सल मिळेल.त्यात मी कधीच खंड पडू देणार नाही.तुझी ओवाळणी तुला मिळणारच.”
हेमंत आई आणि सुजाताला समजावत होता. त्याचे सगळे मित्र आणि सर्व गावकरी जमले होते.
कुणी त्याचं अभिनंदन करत होता, कुणाला आता तो मुलांना मार्गदर्शन कसं करणार याची काळजी होती.
हेमंतला दुसर्या दिवशीच निघायचं होतं.सुभानरावांनी थोडं सामान एका बॅगमध्ये भरलं. एस्.टी. रात्रीच मुक्कामी येत होती, तीच सकाळी ६ वा. निघून पुण्याला जायची.
त्यामुळे गावातल्या उत्साही मुलांनी एस्.टी.सजवली होती. हेमंत गावातला पहिलाच मुलगा होता जो सैन्यात ॲाफीसर म्हणून भरती व्हायला निघाला होता.
रात्रभर गावातले लोक सुभानरावांच्या घरीच थांबले होते.सगळ्या गावात खूपच उत्साह होता. सकाळी जेव्हा हेमंतला घेऊन बस निघाली तेव्हा त्या बस बरोबर गावातली मुलं थोडं फार अंतर गेली.
दिवाळी आली. हेमंतच्या सांगण्याप्रमाणे सीताबाईंनी थोडाफार फराळ घरात केला होता. भाऊबीजेदिवशी सुजाता उदास होती पण सण होता म्हणून उसना ऊत्साह दाखवत होती. दुपारी हेमंतचा मित्र राहूल आला आणि त्याने एक बॅाक्स सुजाताला दिला.
राहूल म्हणाला” हेमंतने जाताना माझ्याकडे पैसे दिले होते. तुला भाऊबीज म्हणून हा मोबाईल विकत घ्यायला सांगितले होते.या वर्षी त्याचा कोरियर मॅन मी आहे. पुढच्या वर्षीपासून कोरियरने येईल तुझी भाऊबीज.”
रात्री चंद्रोदय झाल्यावर सुजाताने चंद्राला ओवाळले आणि राहुलने तो फोटो हेमंतला पाठवला.त्यावेळेस आजच्या सारखे मोबाईलमध्ये फोटो पाठवायची सोय नव्हती.
पुढची काही वर्ष असा चंद्राला ओवाळण्याचा फोटो राहूल काढायचा आणि हेमंतला पाठवायचा.हेमंतला दिवाळीत कधीच रजा मिळाली नाही. दोघे बहिण भाऊ आशेवर होते एकदा तरी हेमंतला दिवाळीला रजा मिळेल आणि आपण दणक्यात भाऊबीज साजरी करू.
हळू हळू दिवस जात होते. हेमंतचा फोन आठवड्यात येत होता.हेमंत रजेवर आला की घरच्याच्या वाट्याला कमीच यायचा.प्रत्येकाला त्याच्याबरोबर वेळ घालवायचा असायचा.
सुजाताला वाईट वाटायचं पण अभिमानसुद्धा वाटायचा.हेमंतला अजून तरी मोठी जबाबदारीची मोहिम मिळाली नव्हती.तरी पण हेमंतला दिवाळीच्या वेळेस कधी सुट्टी मिळत नव्हती.पण हेमंतचं भाऊबीजेचं आणि रक्षाबंधनचं पार्सल बरोबर त्याच दिवशी पोचायचं. हा योगायोग होता की हेमंत त्यासाठी जास्त पैसे मोजायचा हे कुणालाच माहित नव्हतं. कुणी याचा जास्त विचार केला नाही. पण तो दिवस मात्र कधीच चुकला नाही.

यावर्षी सुजाताचं लग्न ठरलं होतं. हेमंतला सुट्टी मिळाल्याशिवाय लग्नाला उभी रहाणार नाही म्हणून सुजाताने हट्टच धरला होता.हेमंत तिला सांगत होता कि तुम्ही लग्न उरकून घ्या मी सुट्टी मिळाली की लगेच येतो.

सुजाताच्या सासरची मंडळी समंजस होती ती हेमंतला सुट्टी मिळे पर्यंत थांबायला तयार होती.डिसेंबरमध्ये हेमंतला सुट्टी मिळेल असे वाटत होते.
हेमंत आला की सुजाताचे लग्न दणक्यात करायचं होतंच, हेमंतसाठी एक सरप्राईज पण होतं त्याच्या मैत्रीणी बरोबर त्याचा साखरपूडा पण करायचा होता.
दिवाळीच्या खरेदी बरोबर लग्नाची खरेदी पण जोरात सुरू होती.
आणि दिवाळी आली .......................

दिवाळी दिवशी घरातला फोन वाजला सुजाताने फोन घेतला आणि मटकन खालीच बसली.सीताबाई तिला हलवून विचारत होत्या,”अगं काय झालंय??”
पण सुजाता फक्त दादा एव्हढंच बोलत होती.तिच्या हातातून फोन पडून बंद पडला होता.तेव्हढ्यात परत सुभानरावांचा फोन वाजला.
“ मै मेजर रणजितसिंह बोल रहा हॅू.आप सूभानराव बोल रहे हो क्या??”
“ व्हय व्हय मी सुभानराव बोलतोय.”
आता समोरच्या व्यक्तीच्या लक्षात आलं की या सुभानरावांना हिंदी बोलता येत नाहीय.त्यांनी युनिटमधल्या आपल्या सहकार्याला फोन दिला.
“ मी कॅप्टन चिन्मय बोलतोय बाबा.”
सुभानराव विचारत होते की “ हा बोला काय झालं मी सुभानराव बोलतोय.”
“ बाबा तुमचा मुलगा हेमंत हा गंभीर जखमी झाला आहे. डॅा.त्याला वाचवण्या साठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. त्याला जरा शुद्ध आली की मी तुम्हाला व्हिडिओ कॅाल करतो. तुमचा फोन एंगेज ठेवू नका.”
सुभानरावांनी बरं म्हटलं आणि फोन ठेवला.त्यांनी सुजाताला सांगितलं की “तुला काय झालं रडायला?काही झालं नाहीय तुझ्या दादाला.तू एका सैनिकाची मुलगी आणि बहिण आहेस. असं डोळ्यात पाणी काढायचे नाही.”
सुजाताला रडू आवरतच नव्हतं.ती आपली दादा दादाच करत होती.सुभानरावांनी सुजाताला सांगितलं” आता आवरा पटापट. रांगोळी काढायची आहे. दिवे लावा.आता थोड्यावेळात मेजरसाहेबांचा व्हिडिओ कॅाल येईल. हेमंतला काय दिवाळी दिवशी असा रडका चेहरा दाखवणार आहेस??चला चला सगळ्यांनी पटापट आवरा.”
सगळ्यांनी आवरायला घेतलं. दारासमोर मोठ्ठी रांगोळी काढली.दिव्यांच्या माळांनी घर उजळलं. सगळ्यांचे अभ्यंग स्नान उरकले आणि फराळ करायला बसणार तेव्हढ्यात फोन वाजला.सुभानरावांनी फोन बघितला तर व्हिडिओ कॅाल नव्हता, नॅार्मल फोन होता.
“ मी सुभानराव बोलतोय, बोला हेमंत शुद्धीवर आला ना मग व्हिडिओ केला नाहीत ते”
“अहो मी कॅप्टन चिन्मय बोलतोय बाबा,आपला हेमंत शहीद झाला.”
सुभानरावांनी बरं म्हणत फोन ठेवला.
कॅप्टन चिन्मयला वाटले की फोन कट झाला म्हणून त्यांनी परत फोन लावला.सुभानराव म्हणाले “हो तुम्ही काय सांगितलं ते कळलंय मला.त्याला घरी कधी पाठवताय ते सांगा.”
कॅप्टन चिन्मयला समजत नव्हते की यांना नक्की कळलंय की नाही? तरी त्यांनी सांगितलं कि “हो मी स्वत:च येणार आहे त्याला घेऊन तुम्ही काही काळजी करू नका.”
इकडे सुजाताने जेव्हा ऐकलं त्याला कधी पाठवताय,तेव्हा तीची शुद्धच हरपली.सीताबाईंना काहीच कळत नव्हतं त्यांनी सुजाताच्या तोंडावर पाणी शिंपडून तिला सावध केलं.ती सावध झाल्यावर सीताबाईंना म्हणाली,” आई, दादा ..”
तिला मध्येच अडवत सुभानराव म्हणाले,” चला उठा कामाला लागा. हेमंत येतोय घरी.आपल्याला हेमंतच्या स्वागताची तयारी करायची आहे.”
आता पर्यंत टीव्हीवर बातमी दाखवली होती की मोरे वाडीचे हेमंत पाटील अतिरेकी हल्ल्यात शहीद.त्यांनी त्यांचे सहकारी कॅप्टन चिन्मय आणि मेजर रणजितसिंह आणि १० जवानांचे प्राण वाचवले.
हळूहळू पाटिलांच्या अंगणात लोक जमायला लागले.त्यातल्या तरूण मुलांना बोलवून सुभानरावांनी सांगितले की सगळ्यांना सांगा,” कुणीही डोळ्यातून टीपं गाळायची नाहीत. सगळीकडे पताका लावा. रांगोळ्या काढा.हेमंतच्या स्वागताची तयारी करा.”
सगळ्यांना वाटत होतं की सुभानरावांना मुलाच्या जाण्याचा धक्का बसलाय.शेवटी सगळ्यांनी शंकररावांना सांगितलं की तुम्ही तरी त्यांना समजावा.
शंकरराव सुभानरावांच्या घरी आले.त्यांनी सुभानरावांना विचारले ,” काय रे सुभान्या तुला काय झालंय ते कळलंय नव्हं??”
त्यांना सुभानरावांनी सांगितले की “ होय मला चांगलंच कळलंय. मला माझ्या मुलाचा अभिमान वाटतोय. जे मी करू शकलो नाही ते त्याने करून दाखवलंय. आता तो घरी येतोय तर मला त्याचं हिरोसारखं स्वागत करू द्या”
यावर यावर सगळ्या गावकर्यांचं एकमत झालं की यांना रडवले पाहिजे. पण सुभानरावांना कसं रडवायचं कुणाला कळत नव्हतं.सुभानराव जातीने सगळी देखरेख करत होते.मोठ्या मोठ्या रांगोळ्या, पताका सर्व मनासारखं होत होतं. मग फोन आला की ऊद्या सकाळी १० वाजता ते लोक गावात पोचतील.
सगळ्या आया/बाया हळहळत होत्या कारण दुसर्या दिवशी भाऊबीज होती.त्या दिवशी पंचक्रोशीत कुठेही चूल पेटली नाही पण दिव्यांचा झगमगाट मात्र सगळीकडे होता.लोकं गटा गटाने उभे होते पण कुणीच कुणाशीही बोलत नव्हतं.
सकाळ झाली सुभानरावांनी आंघोळ केली आणि सगळ्यांना करायला लावली.सगळ्यांना नवीन कपडे घालायला लावले. सुजाताला सांगितले की आरतीचं ताट तयार ठेव.गाड्या जेव्हा गावात शिरल्या तेव्हा कॅप्टन चिन्मय आणि हेमंतचा युनिटमधले लोक गावातली रोषणाई, रांगोळी बघून अवाक् झाले.
सुभानराव पुढे झाले आणि त्यांनी सगळ्यांना सॅल्यूट केला आणि सीताबाई आणि सुजाताला हाक मारली.”सुजे तूझी आणि तुझ्या आईची नेहमी तक्रार असायची ना की हेम्या कधीच दिवाळीला येत नाही. आलाय बघ तो भाऊबीजेचा मुहूर्त धरून.ओवाळ त्याला आता. “
कॅप्टननी सुभानरावांचा हात हातात घेतला आणि मान खाली घालून म्हणाले,” आय ॲम सॅारी सुभावराव. तुमच्या हेमंतनी आम्हा सगळ्यांना वाचवलं पण आम्ही त्याची मदत नाही करू शकलो. मला खरंच माफ करा.”
सुभानराव म्हणाले ,” अहो कॅप्टन माझा मुलगा कुठच्या आजारानी किंवा अपघातात नाही गेलाय, त्याला वीरमरण आलंय. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. आमच्या गावच्या इतिहासांत त्याचं नांव सुवर्णाक्षरात लिहीलं जाईल.आणि तुम्ही पण त्याला आनंदाने जाऊ द्या दु:खी होऊ नका.त्याला त्रास होईल. मला जर आणखीन मुलं असती तर त्यांना पण सैन्यात पाठवलं असतं. मला पंचक्रोशीतल्या लोकांना हेच सांगायचं आहे की असं किडा मुंग्यासारखं मरण्यापेक्षा देशासाठी वीरमरण आलं तर दु:ख करत बसू नका.त्याचं शौर्य वाया घालवू नका. चला माझ्या लेकीला भाऊबीज करून घेऊ देत मग आपण पुढचे सगळं उरकू.”
सुजाताने पुढे येऊन भावाला ओवाळलं. दुर्दैवाने तिला मुख दर्शन घेता येत नव्हतं. तिने डोळ्यात पाणी न आणता भाऊबीज पूर्ण केली.सुजाताला भाऊबीज घालायला कॅप्टन चिन्मय खिशात हात घालून पाकीट काढत असतानाच गर्दीतून वाट काढत एक तरूण पुढे आला. तो कुरियर कंपनीचा माणूस होता........
त्याने गर्दीतल्या एकाला विचारलं “सुजाता पाटील कोण??”
लोक त्याच्यावर ओरडणार तेव्हढ्यात तो तरूण म्हणाला,”अहो त्या सुजाता पाटील यांचं पार्सल आहे,म्हणून विचारत होतो.”
गर्दीतल्या एकानी त्याला म्हटलं चला मी नेतो तुम्हाला आणि गर्दीतून वाट काढत ती दोघं सुभानरावांजवळ आली.
त्या तरुणाने सांगितलं की “ काका , सुजाता पाटील कोण आहेत त्यांचे पार्सल आले आहे.”
सुभानरावांनी त्याला सांगितलं “ द्या माझ्याकडे मी सुजाता पाटीलचा बाबा आहे.”
ते पार्सल घेऊन सुभानराव जेव्हा सुजातापाशी पोचले तेव्हा ती नुसती त्या पेटीकडे बघत उभी होती. तिच्या हातात पार्सल देत सुभानराव तिला म्हणाले,” पोरी यावर्षी तुझ्याकडून ओवाळून घ्यायला तुझा दादा आला आणि तुझी भाऊबीज पण पोचली गं. पण पुढच्या वर्षी तुला कोण पाठवणार भाऊबीज??””
आणि त्यांना शोक अनावर होऊन ते बेशुद्ध पडले..............

सौ सरिता सुभाष बांदेकर

कथा

प्रतिक्रिया

NAKSHATRA's picture

9 Feb 2021 - 7:04 pm | NAKSHATRA

प्रत्येक प्रसंग डोळ्यापुढे उभा राहतो

सरिता बांदेकर's picture

9 Feb 2021 - 11:44 pm | सरिता बांदेकर

धन्यवाद

मुक्त विहारि's picture

9 Feb 2021 - 7:31 pm | मुक्त विहारि

आवडले

सरिता बांदेकर's picture

9 Feb 2021 - 11:45 pm | सरिता बांदेकर

धन्यवाद

कर्नलतपस्वी's picture

10 Feb 2021 - 12:03 pm | कर्नलतपस्वी
कर्नलतपस्वी's picture

10 Feb 2021 - 1:06 pm | कर्नलतपस्वी
कर्नलतपस्वी's picture

10 Feb 2021 - 1:06 pm | कर्नलतपस्वी
कर्नलतपस्वी's picture

10 Feb 2021 - 1:18 pm | कर्नलतपस्वी
सरिता बांदेकर's picture

10 Feb 2021 - 5:25 pm | सरिता बांदेकर

धन्यवाद कर्नलतपस्वी