मानवाश्रम

बिपीन सुरेश सांगळे's picture
बिपीन सुरेश सांगळे in जनातलं, मनातलं
4 Feb 2021 - 9:25 pm

मानवाश्रम

1.
टीव्हीवर ब्रेकिंग न्युज होती - रमोला गेल्याची !
ती बॉलिवूडची खूप टॉपची हिरॉईन होती . तिनं आत्महत्या केली की तिला मारण्यात आलं , याच्यावर उलटसुलट चर्चा सुरु होती . संशयाची सुई तिचा एक्स बॉयफ्रेंड मोहितकुमारकडे वळली होती . कारण काही दिवसांपूर्वी त्याने तिच्याशी ब्रेकअप केलं होतं.
मीडिया ट्रायल सुरु झाल्या होत्या. त्याच्यावर राजकारण सुरु झालं होतं. केस बरेच दिवस चालणार होती .
2.
केसचा तपास इन्स्पेक्टर पाटीलकडे सोपवण्यात आला होता . पाटील एक भ्रष्ट अधिकारी होता . पण त्याला त्याच्या मुलाने आयुष्यात शिकून मोठं व्हावं असं वाटत असे . त्याचा कॉलेजमध्ये जाणारा पोरगा मात्र घरी येणाऱ्या अशा पैशाने बिघडला होता . त्याची शिक्षणाची गाडी काही पुढे सरकत नव्हती .
3.
मानव आश्रम .
मानवबाबांचा आश्रम शहराबाहेर होता . निसर्गरम्य . शांत. मोठा परिसर असलेला . टेकड्यांनी वेढलेला . बागा राखलेला आणि एका तळ्याने सुशोभित झालेला .
मानव बाबा म्हणजे एक प्रसन्न , तेज:पुंज व्यक्तिमत्व होतं .
त्यांचं तत्वज्ञान होतं - कुठलाही देव माना , धर्म माना , किंवा मानू नका . फक्त माणसाशी प्रेमाने वागा . त्यांचा धर्म होता - मानव धर्म . त्याचे कुठलेही नियम नव्हते , कर्मकांडे नव्हती , वेष नव्हता . पण एक होतं- तिथे हिंसेला स्थान नव्हतं .
अमर्याद निळ्या आकाशाची खूण म्हणून अनुयायांनी दंडावर एक आकाशी रंगाची फीत बांधावी एवढंच काय ते. प्रत्येकाच्या हृदयातील अमर्याद प्रेमाचं ते एक प्रतीक होतं .

4.
मानवबाबांचे दोन मुख्य सहकारी होते . एक म्हणजे अमृतानंद आणि दुसरी स्नेहमयी .
आणि विशेष म्हणजे एक तृतीयपंथी - सोमा .
5.
एके दिवशी बाबांचा भाऊ प्रताप आश्रमात आला . त्याच्याबरोबर त्याची सहाय्यिका पायल होती . बाबांना भावाला भेटून खूप आनंद झाला . खूप दिवसांनी त्यांची भेट होत होती . प्रताप एक बिझनेसमन होता . त्याचा व्यवसाय परदेशात होता . आणि आता तो, ते सोडून अध्यात्म स्वीकारणार होता .
6 .
प्रतापचा आता बाबा प्रताप झाला होता .
त्यानंतर थोड्याच दिवसांनी बाबा प्रतापने एक घोषणा केली .
ती घोषणा अशी - मानवबाबा जगभ्रमणासाठी गेले आहेत . आश्रमाची जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोपवली आहे . आश्रम पूर्वीप्रमाणेच सुरु राहील . योग्य वेळी ते परत येतील.
आता आश्रमात नवीन गार्डस आले होते . जे आधी कधी नव्हते . आश्रम बदलला होता.
7.
अमृत , स्नेहा आणि व सोमा यांना खूप आश्चर्य वाटलं . बाबा त्यांना न सांगता जाणं शक्य नव्हतं . बाबांचं त्या तिघांवर खूप प्रेम होतं . काहीतरी गडबड होती .
8.
अमृत आणि स्नेहा यांचं एकमेकांवर अव्यक्त प्रेम होतं .
अमृतने बाबांच्या जाण्यावर बाबा प्रतापकडे शंका व्यक्त केली . तेव्हा बाबा प्रताप त्याला खूप ओरडला . त्यावेळी स्नेहाच्या वागण्यावरून प्रतापला ते प्रेम जाणवलं .
अमृतचं तिथे असणं त्याला पुढे त्रासदायक ठरू शकलं असतं . त्याने तीच संधी साधली अन अमृतला हाकलून दिलं - त्याच्या वागण्यामुळे आश्रमाचं नाव खराब होईल असं सांगून .
त्यावेळी सोमा म्हणाला , ‘ याला विऱोध केला पाहिजे .’ त्यावर अमृत म्हणाला , ‘ समोरचा वाईट वागला तरी चालेल, पण आपण प्रेमानेच वागायचं . मी बाबांचा खरा अनुयायी आहे . विरोधही नको अन हिंसाही नको . जे होणार असेल ते होईल . माझ्याकडे गमावण्यासारखं आधीही काही नव्हतं आणि आताही काही नाही . ‘
त्यावेळी सोमा त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहतच राहिला.
9.
प्रतापने स्नेहाला तळघरात कोंडून ठेवलं .
10.
बाबा प्रताप हा चांगला नव्हता . तो ड्रग्ज घ्यायचा . त्यानंतर तो पायलबरोबर सहवास करायचा .
दिवसभर बाबा बनून वावरत असलेल्या त्याचं , रात्रीचं हे रूप वेगळं होतं .
11.
अमृत नव्हता . अन स्नेहा तळघरात . सोमाला काय करावं ते कळत नव्हतं . तो तिच्याशी बोलण्यासाठी एकदा लपूनछपून तिला भेटायला आला . त्याचवेळी तिथे प्रतापही आला . सोमा लपला .
प्रतापने तिच्यावर अत्याचार केला . सोमाने डोळे मिटून घेतले .
त्यानंतर प्रताप तिच्याशी जे बोलला ते ऐकून सोमा नखशिखांत हादरला .
काय असावं ते सत्य ?

12.
बाबा प्रताप हा बिझनेसमन नव्हता . तो एक ड्रग माफिया होता . त्याने स्वतःच्या भावाला ठार मारलं होतं - मानवबाबांना . कारण त्याला तो आश्रम ताब्यात घ्यायचा होता. त्यासारखी दुसरी सुरक्षित जागा त्याला दुसरी मिळणार नव्हती - ड्रग्स लपवायला , तिथून ते सप्लाय करायला .

13.
बाबा प्रतापचा मलेशियाला मोठा अड्डा होता. तिथला धंदा कल्पेश बघायचा . पायलचा नवरा . पण तिथे राजकारण झालं आणि कल्पेशला पकडण्यात आलं. तुरुंगात टाकण्यात आलं . त्याच्यामुळे समस्या यायला नको म्हणून पायलला भारतात आणण्यात आलं होतं.
नवरा तुरुंगातून सुटावा म्हणून पायल प्रतापचं सगळं ऐकत होती .
14.
एके दिवशी मलेशियामधून रफिक आला . तोही प्रतापचा माणूस असला तरी कल्पेशचा जिगर दोस्त होता . त्याने पायलला सांगितलं की कल्पेशमुळे नुकसान व्हायला नको म्हणून त्याला तुरुंगातच कैद्यांच्या भांडणात मारण्यात आलं - प्रतापच्या सांगण्यावरून .
पायलचं कल्पेशवर खूप प्रेम होतं . त्याच्यासाठी ती प्रतापचं सगळं काही सहन करत होती . पण तोच आता या जगात नव्हता . एकाच वेळी तिच्या मनात नैराश्य होतं , फसवलं गेल्याची चीड होती आणि सुडाची आग होती .
15.
रमोला तिच्या चुकीमुळे , ड्रगच्या ओव्हरडोसमुळे मरण पावली होती . मग पोलिसांनी ड्रग्जचे धागेदोरे तपासायला सुरुवात केली . इन्स्पेक्टर पाटील प्रतापपर्यंत पोचणार होता . पण त्याच्या अगोदर त्याला पैसे देऊन गप्प करण्यात आलं . प्रतापला पडद्यामागून मदत करणारे बरेच होते .
16.
आश्रमाचा अर्धा भाग लोकांसाठी चालू होता . उरलेला अर्धा भाग जणू तुरुंग झाला होता .
पायलला आता बदला घ्यायचा होता . तिने एके दिवशी सोमाला बाहेर काढलं . तो दुर्दैवाने तृतीयपंथी असला तरी वागायला नेक होता . हुशार होता. मानवबाबांमुळे तो आयुष्यात ताठ मानेने उभा राहू शकला होता .

16.
अमृत कुठे असू शकेल ते स्नेहाने सांगितलं होतं . तो कोकणातल्या एका जंगलात, एका देवळात राहत होता .
सोमा त्याच्यापर्यंत पोचला . त्याने त्याला सगळी हकीकत सांगितली .
17.
बाबाचे हात वरपर्यंत पोचलेले होते. त्याला मारावं लागणार होतं . हिंसेचा आधार घ्यावा लागणार होता . अमृत त्याच्याविरुद्ध होता . हिंसा मानवबाबांच्या तत्वात बसत नव्हती .
त्यावेळी त्याला मानवबाबांचा भास झाला . मग ते लुप्त झाले आणि तिथे रणांगणावर अर्जुनाला लढण्याचा उपदेश करणारा कृष्ण त्याला दिसला - लढाई अटळ होती .
18.
अमृत सोमाला म्हणाला - आता लढायची वेळ आलीये !
त्यावर त्याने विचारलं - आपण हे कसं साध्य करणार ?
अमृत हा एक मोठा गुंड होता . एका नामचीन टोळीचा सदस्य . अनेक खून केलेला , दरोडे घातलेला . एकदा एका गुन्ह्यामध्ये त्याला देशाबाहेर पळून जावं लागलं . तेव्हा त्याची आई आजारात गेली . त्याला आई सोडता कोणी नव्हतं . तो शेवटच्या क्षणी आईजवळ नव्हता , हे दुःख त्याच्या मनाला लागूनच राहिलं . आई गेल्यामुळे तो खचला . त्याने गुन्हेगारी सोडली . तो भणंग झाला . त्याच अवस्थेत तो बाबांकडे पोचला होता . त्यांच्यामुळे तो बदलला आणि त्याचा स्वामी अमृतानंद झाला होता .
तो एक सच्चा मानवधर्मी होता .
19.
इन्पेक्टर पाटीलने एका ड्रग्जच्या अड्ड्यावर छापा मारला , तेव्हा तिथे त्याला स्वतःचाच पोरगा ड्रग्ज घेताना सापडला . पाटील हादरला . ते संकट त्याच्या घरापर्यंत पोचलं होतं . त्याचे डोळेच उघडले . त्याला वाटलं - अशी किती तरुण पोरं बरबाद होत असतील ? ...
20.
अमृत आश्रमात घुसला . तिथे त्याची हाणामारी झाली . गोळाबारी झाली .
वरून चक्र फिरली आणि त्याचवेळी तिथे इन्स्पेक्टर पाटीलही सशस्त्र पोलीसदलासहित घुसला .
त्यामध्ये प्रताप आणि पायल मारले गेले.
सोमाही मारला गेला . पण त्याआधी त्याने स्नेहाला वाचवलं होतं .
रफिकला पकडण्यात आलं . त्याला सगळंच माहिती होतं . आता तो त्यांच्या रॅकेटबद्दल , नेटवर्कबद्दल सगळंच सांगणार होता .
21.
आश्रम पुन्हा नव्याने सुरु करण्यात आला .
अमृत आणि स्नेहा विवाहबद्ध झाले .
ते पुन्हा आश्रमाच्या दरबारात उभे होते - मानवधर्म जागवण्यासाठी .
अनुयायी घोषणा देत होते -
मानवधर्माचा विजय असो !
-----------------------------------------------------------------------------------------------

हे ठिकाण

प्रतिक्रिया

छान गूढ/भयकथा, अचानक , अनपक्षित शेवट.थोडी सुखान्त , थोडी दुःखान्त!!

सौंदाळा's picture

11 Feb 2021 - 12:40 pm | सौंदाळा

वा, मोठ्या कादंबरीचे पोटॅन्शियल आहे कथेत.
उत्तम चित्रपट्सुध्दा बनु शकतो. (थोडी सेक्रेड गेम्स, थोडी आश्रम वेब सिरिजची आठवण झाली.)

बिपीन सुरेश सांगळे's picture

13 Feb 2021 - 10:53 am | बिपीन सुरेश सांगळे

नूतन आणि सौंदाळा
खूप आभार