.

आज काय घडले... मार्गशीर्ष व. १३ धनुवीर कर्ण याचा वध !

Primary tabs

Ashutosh badave's picture
Ashutosh badave in जनातलं, मनातलं
11 Jan 2021 - 7:28 am

कर्ण वध
आज काय घडले...
मार्गशीर्ष व. १३
धनुवीर कर्ण याचा वध !
शकपूर्व २००९, मार्गशीर्ष व. १३ रोजी पृथ्वीवरील अलौकिक धनुर्वीर कर्ण याचा वध झाला.
कर्ण आणि अर्जुन यांचे युद्ध अत्यंत निकराचे झाले. अर्जुनाने अस्त्र सोडावे व कर्णाने दुसरे उलट अस्त्र सोडून ते निष्फळ करावे, असे होऊ लागले. प्रत्यक्ष श्रीकृष्णाचे कवच कर्णाने जेव्हां फोडून टाकले, तेव्हां अर्जुनाने एका अमोघ बाणाने कर्णास मूर्छित केले. थोड्या वेळांत सावध झाल्यावर खांडव वनांत अर्जुनाच्या तडाख्यांतून वाचलेल्या अश्वसेन नागबाणाचा उपयोग करावा असे कर्णाने ठरविलें ; व फार दिवस जपून ठेवलेला हा बाण त्याने हाती घेतला, आणि ' हतोऽसि वै फाल्गुन !' (अर्जुना, हा ठार झालास पहा) म्हणून तो सोडला. परंतु अर्जुनाचे सारथी भगवान् श्रीकृष्ण होते! त्यांनी रथ एक वीत खाली करून घोड्यांनाहि गुढघे टेंकावयास लावले. त्यामुळे अर्जुनाचे शिर न उडता त्याचा दैदीप्यमान किरीट मात्र नष्ट झाला. पुढे निकराच्या युद्धांतच कर्णाच्या रथाचे डावें चाक भूमीमध्ये रुतून बसले. ते वर काढण्यासाठी कर्ण खाली उतरला. आणि अर्जुनाला म्हणाला, “मी येथें निःशस्त्र स्थितीत उभा आहे. तू बाण टाकू नकोस. तुला क्षात्रधर्म माहीत आहे. त्यावर श्रीकृष्णांनी आवेशाने उत्तर केले, “ भीमाला विष घालून त्याचे अंगास तुम्ही साप डसविले, पाडव वारणावत नगरांत असतां तुम्ही घराला आग लावलीत, द्यूतात विशेष प्रवीण नसलेल्या धर्माला कपट करून जिंकलेत, द्रौपदी एक वस्त्र नेसलेली व रजस्वला असतां तिला भर सभेत आणून तिची विटंबना केलीत, तेव्हा गेला होता कोठें राधासुता तुझा धर्म?" श्रीकृष्णाचे भाषण ऐकून लज्जा, दुःख व संताप यांनी भरून गेलेला कर्ण पुनः रथावर चढला; आणि एक अमोघ बाण सोडून त्याने अर्जुनास मर्छित केले; कर्ण रथचक्राशी धडपड करीत असतांच अर्जुनाने सावध होऊन एक सणसणीत बाण काढला, आणि आपले सारे सामर्थ्य एकवटून कर्णावर सोडला. सू सू करीत निघालेल्या त्या बाणानें क्षणार्धात कर्णाचे मस्तक उडविलें ।"
३ नोव्हेंबर इ. स. पू. १९३१

इतिहास