प्रवास (भाग 2)

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
9 Jan 2021 - 4:45 pm

प्रवास भाग 1

https://www.misalpav.com/node/48038

प्रवास

भाग 2

अनघा : हॅलो आनंद?

..... : त्याचं शूट चालू आहे. तुम्ही कोण?

मुलीचा आवाज ऐकून अनघा गोंधळली.

अनघा : तुम्ही कोण बोलताय?

..... : मी कोण याच्याशी तुमचा काही संबंध नाही. मी आनंदचा मोबाईल attend केला आहे याचा अर्थ मी कोणीतरी नक्की आहे त्याची. तुम्ही फोन केला आहात तुमचं नाव सांगा अगोदर.

अनघाला त्या मुलीच्या बोलण्याचा राग आला. पण त्याक्षणी तरी ती काही करू शकणार नव्हती. त्यामुळे तिने फोन कट केला. पण अनघाचं मन तिला स्वस्थ बसू देईना. फोन नक्की कोणी उचलला होता हे तिला समजून घ्यायचं होतं. ती घरातल्या घरात अस्वस्थपणे फेऱ्या मारत होती. थोड्यावेळाने तिचा फोन वाजला. फोन आनंदचा होता. तिने काहीशा रागानेच फोन उचलला.

अनघा : हॅलो...

आनंद : तू फोन केला होतास का? अनघा, तुला किती वेळा सांगितलं आहे की असा मी शुटिंगवर असताना फोन करत जाऊ नकोस म्हणून.

अनघा : आनंद... राग मला आला पाहिजे. तुझा फोन एका मुलीने उचलला होता आणि ती माझ्याशी आगाऊपणा करून बोलत होती. तू माझं नाव sweetipie म्हणून save केलं आहेस ना? ती म्हणत होती की ती तुझी कोणीतरी आहे. हा काय प्रकार आहे?

अनघा चिडली होती आणि तिचा आवाज देखील चढला होता. तिचं बोलणं ऐकून आनंदचा आवाज खाली आला.

आनंद : ती? आहे एक आगाऊ मुलगी. आमच्या सिरीयल मधली. तू तिच्या बोलण्याकडे लक्ष नको देऊस. बरं, फोन का केला होतास?

आनंदच्या उत्तराने अनघाचं समाधान झालं नव्हतं. पण 'भेटल्यावर बोलता येईल;' असा विचार करून तिने तो विषय तिथेच सोडला.

अनघा : अरे नविनचा फोन होता. थर्टी फास्टला भेटूया का विचारत होता.

आनंद : कोणाला तुला?

आता मात्र अनघा वैतागली.

अनघा : अन्या हे अति होतं आहे हं. त्याला मी आवडते यात माझी काही चूक नाही. मी त्याला कोणतीही हिंट देत नाही किंवा माझा फोन देखील त्याच्या हातात नसतो.

आनंद तिच्या बोलण्याने एकदम वरमला.

आनंद : बरं बरं बाईसाहेब. माफ करा. मी सहज गम्मत केली. काय म्हणत होता नवीन.

अनघा : तो विचारत होता की थर्टी फास्टला भेटूया का सगळे.

आनंद : अग पण सध्या कर्फ्यु चालू झाला आहे न रात्री अकरा नंतर? कुठेही बाहेर जाणं शक्य नाही... आणि माझं शूटिंग पण चालू आहे.

अनघा : अन्या, फार नाटकं करू नकोस. शुक्रवारी आहे थर्टी फास्ट. शनिवार रविवार तुझं शूट नसतं न? निदान आपण दोघे तुझ्या वाड्यावर जायचो तेव्हा तू हेच सांगून न्यायचास मला.

आनंद तिचं बोलणं ऐकून चपापला.

आनंद : अनघा घरीच असशील न? जरा हळू बोल की. कोणी ऐकलं तर काय उत्तर देशील?

अनघा : आता यापुढे कोणीही काहीही विचारलं तर मी तुझा फोन लावून द्यायचं ठरवलं आहे.

अनघाचं बोलणं ऐकून आनंद अस्वस्थ झाला.

आनंद : बरं ते जाऊ दे. मला लक्षात नव्हतं थर्टी फास्ट शुक्रवारी आहे. काय आहे तुझा प्लॅन?

आनंदच्या प्रश्नाने अनघा खुलली.

अनघा : मी म्हणत होते आपण सगळे तुझ्या लोणावळ्याच्या वाड्यावर जाऊ या. बऱ्याच दिवसात सगळे भेटलेलो नाही आहोत. मस्त तीन दिवस मजा करूया. तू, मी, नवीन, मंदार आणि मनाली. जुने कॉलेजचे दिवस आठवू; गप्पा; कॅरम; पत्ते... सगळं enjoy करूया. आणि....

अनघाने मोठा पॉज घेतला. तिच्या गप्प बसण्याने आनंद वैतागला आणि तिच्यावर ओरडत म्हणाला...

आनंद : अनघा... आणि काय? बोल बघू एकदाचं काय ते. मी तुझ्यासारखा रिकामटेकडा नाही. शूट चालू आहे माझं. बोल लवकर.

आनंदच्या त्या अचानक बोलण्याने अनघाच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. पण तिने ते आनंदला कळू दिलं नाही.

अनघा : आणि काही नाही. बस् इतकंच! जमणार आहे का तुला? तर मी मंदार आणि मनालीशी बोलून घेते.

क्षणभर विचार करून आनंद म्हणाला...

आनंद : चालेल. खरंतर मला देखील नविनचा missed call होता. आता तूच बोल सगळ्यांशी आणि मला मेसेज करून ठेव किती वाजता निघायचं आहे ते.

आनंद हो म्हणलेला ऐकून अनघा एकदम खुश झाली आणि डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाली...

अनघा : ok. मी कळवते सगळ्यांना. त्यांना एका स्पॉट वरून pick up करू आपण.

आनंद : म्हणजे मी तुला घ्यायला यायचं?

अनघा त्याच्या त्या प्रश्नाने एकदम घायाळ झाली.

अनघा : म्हणजे?

तिच्या त्या एका शब्दातला अर्थ आनंदच्या लक्षात आला आणि घाईघाईने फोन ठेवताना तो म्हणाला...

आनंद : ok ok. तुला सकाळी साधारण आठ वाजता pick करतो. मग त्यांना सायनला घेऊन पुढे जाऊ. चल ठेवतो फोन. माझा शॉट आहे आता. byeee my sweetipie

आनंदच्या बोलण्याने अनघाचं समाधान झालं नव्हतं. पण तरीही 'भेटल्यावर बोलू'; असा विचार करून तिने विषय मनावेगळा केला. आनंदचा फोन ठेवल्यावर अनघाने नवीन, मंदार आणि मनालीला फोन करून थर्टी फास्ट वीक एन्डचा प्लॅन सांगितला आणि साडे आठ पर्यंत सायनला पोहोचायला सांगितलं. तिघेही प्लॅन ऐकून excite झाले आणि लगेच तयार झाले. पण आनंदच्या बोलण्याने दुखवलेली अनघा मात्र आता फार उत्साहात नव्हती. तिच्या एक लक्षात आलं होतं की अलीकडे आनंद तिला टाळत होता.

***

आनंद, अनघा, नवीन, मंदार आणि मनाली कॉलेज मधला ग्रुप. एकदम खास मैत्री होती त्यांची. म्हणजे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर सगळ्यांनी एकत्रच MBA पण केलं. सगळेच तसे करियर ओरिएंटेड असल्याने MBA संपता संपता नोकरीला लागले. आनंद अभिनय क्षेत्रात गेला. नविनला एका इंटरनॅशनल कंपनीमध्ये चांगल्या पोस्टवर जॉब लागला. मंदारने त्याच्या वडिलांना जॉईन केलं. मनालीने देखील एका event management कंपनीमध्ये जॉब मिळवला.

खरंतर अनघा या सगळ्यांमध्ये हुशार. पण तिला नोकरी करायची इच्छाच नव्हती. घर-संसार-मुलं हीच तिची आवड होती. तिचे बाबा तिला अनेकदा सांगत काहीतरी नोकरी किंवा स्वतःचा असा छोटासा व्यवसाय सुरू कर म्हणून. पण अनघा ते फार मनावर घेत नव्हती. मात्र आई-बाबांनी लग्नाची घाई करू नये म्हणून तिने MBA नंतर एम. कॉम. साठी ऍडमिशन घेतली होती. पण आता ते देखील संपत आलं होतं.

'आता तरी आनंदने लग्नाचा विचार करणं आवश्यक आहे. आता आई-बाबा ऐकणार नाहीत. आणि खरंतर मला देखील फार दिवस थांबता येणार नाही......' अनघाच्या मनात आलं. 'आनंद मला pick करेल तेव्हाच त्याच्याशी बोलून घेतलेलं बरं.' तिने ठरवलं.

ठरल्याप्रमाणे आनंदने अनघाला तिच्या घराखालून घेतलं आणि दोघे सायनच्या दिशेने निघाले. आनंदने गाणी खूप मोठ्याने लावली होती. खरंतर अनघाला काहीतरी बोलायचं होतं. पण गाण्यांचा आवाज कमी केला तर तो चिडेल आणि संपूर्ण पिकनिकचा मूड खराब होईल असा विचार करून ती काही बोलली नाही. ठरल्याप्रमाणे नवीन, मंदार आणि मनाली सायनला उभे होते. त्यांना घेतलं आणि आनंदने गाडी भरधाव सोडली त्याच्या वाड्याच्या दिशेने. बऱ्याच दिवसांनी भेटल्यामुळे सगळेच खुश होते. सगळ्यांच्या गाडीतच गप्पा सुरू झाल्या.

नवीन : यार, कितीतरी दिवसांनी असं बाहेर पडतो आहे न आपण?

मनाली : दिवस काय नवीन? महिने. या करोनामुळे मार्च नंतर काहीही केलं नाही. अगोदर तर घरातच कोंडून घेलल्यासारखं होतं. आता बाहेर पडतो आहोत पण तेसुद्धा work from home मधून वेळ मिळाला तर.

मंदार : हो ना यार!

मनाली : तू काय हो ना यार म्हणतो आहेस मँडी? तुझा स्वतःचाच business आहे.

मंदार : मनली तुला नाही कळणार व्यवसायिकांची दुःख! अरे यार business काही नाही पण कामगारांना पागर देतो आहोत. काम मिळवायला मी फिरतो आहे आणि बाबा फोनवरून प्रयत्न करत असतात. जाऊ दे. मी हो ना यार म्हणालो ते आपण सगळेच कामात अडकलो आहोत या विचाराने.

मंदारच शेवटचं वाक्य ऐकून सगळ्यांनीच माना डोलावल्या. मात्र मनाली अनघाकडे बघत म्हणाली...

मनाली : हीच बरं आहे. हिने ठरवलंच आहे न नोकरी नाही करायची. त्यामुळे करोना असो नसो ही घरीच असणार आहे.

असं म्हणून मनाली काहीसं कुत्सित हसली. अनघाने ते ऐकून न एकल्यासारखं केलं. खरंतर तिला वाटलं होतं आनंद मनालीला झापेल. पण तो काहीच बोलला नाही. उलट नवीन म्हणाला...

नवीन : मनाली, आयुष्यात काय करायचं हा ज्याचा त्याचा वयक्तिक choice असतो. अनघाला नोकरी करायची नसेल तर नको करू दे ना. त्यात तिला tont मारण्यासारखं काय आहे?

नवीन असं म्हणता क्षणी मंदार आणि मनाली एकमेकांकडे बघून फसकन हसले आणि त्यांनी एकमेकांना टाळी दिली. आनंद हे सगळं रेअरव्यू आरशातून बघत होता. पण तो काहीच म्हणाला नाही. मात्र आनंदच्या बाजूला बसलेल्या अनघाला मंदार आणि मनालीचं हसणं मुळीच रुचलं नाही. मागे वळून बघत ती म्हणाली...

अनघा : त्यात हसण्यासारखं काय आहे ग मनाली? नवीन म्हणाला ते खरंच तर आहे. नाही करायची मला नोकरी. मला संसार-मुलं हे आवडतं. आणि... मला काय आवडतं ते मला माहीत तरी आहे. तुझ्यासारखं नाही न! MBA करून आता ऍड एजन्सीमध्ये कारकुनी करते आहेस. का? कारण MBA च्या qualifications वर जो job मिळेल त्याची प्रेशर्स घेता येतील की नाही याची खात्री नाही.

अनघाचं बोलणं ऐकून मनाली एकदम उसळली. आता या चर्चेला वादाचं स्वरूप येणार हे लक्षात येऊन आनंदने एकदम गाडी रस्त्याच्या कडेला घेतली. गाडीतले सगळेच एकदम हबकले आणि ओरडले...

अरे अरे काय करतो आहेस अन्या? वर्षाच्या शेवटच्या दिवशी मारणार का आम्हाला?

सगळ्यांच्या ओरडण्यावर जोरजोरात हसत आनंद म्हणाला;"अरे या तुमच्या वादाच्या नादात breakfast miss होईल ना. चला समोर मॅक आहे. खाऊन घेऊ आणि पुढे जाऊ."

सगळ्यांनी गाडीबाहेर नजर टाकली आणि समोर मॅकडोनाल्ड बघून गपचूप गाडीखाली उतरले. मनाली आणि अनघा washroom च्या दिशेने गेल्या. नवीन सगळ्यांसाठी बर्गर आणायला गेला हे पाहून मंदारने आनंदला छेडलं.

मंदार : ठरलं का रे तुमचं काही?

आनंदने एकदा मंदारकडे बघितलं आणि काहीही उत्तर न देता तो मॅक्डोनल्डच्या दिशेने चालायला लागला. मंदारने लांब जाणाऱ्या आनंदकडे बघितलं आणि तो गंभीर झाला.

एक सिगरेट ओढून थोड्यावेळाने मंदार देखील मॅकमध्ये गेला. समोरच अनघा, मनाली आणि नवीन बसून खात होते. आनंद तिथे दिसत नव्हता. त्याला बघताच नवीन म्हणाला,"अरे कुठे राहिला होतास तू यार? चल खाऊन घे हा बर्गर. आनंद गाडी इथेच आणतो आहे. निघुया आता. खूप टाईमपास झाला."

मंदार : गाडी आणतो आहे आनंद म्हणजे?

अनघा : अरे त्याचं खाऊन झालं तर तो म्हणाला मी गाडी इथे आणतो तोवर तुम्ही बाहेर या.

मंदार : अग, पण मी आत्ता गाडीजवळूनच आलो. मला आनंद तिथे दिसलाच नाही.

मंदार असं म्हणताच अनघा तटकन उभी राहिली आणि बाहेरच्या दिशेने धावली. धावताना तिचा पाय एका खुर्चीला अडकला आणि ती एकदम पडली. तिला पडलेलं बघून नवीन धावला आणि त्याच्या मागे मनाली आणि मंदार देखील. नविनने अनघाला उठून बसायला मदत केली. तेवढ्यात आनंदची गाडी मॅकच्या दारासमोर येऊन उभी राहिली. आनंदने हॉर्न वाजवत मॅकच्या दिशेने बघितले तर नवीन अनघाला कुरवाळत होता आणि मंदार-मनाली एकमेकांकडे बघत हसत होते. ते पाहून आनंदचा पारा एकदम चढला. तो गाडीतून उतरून त्यांच्या दिशेने वेगाने आला.

आनंद : काय चालू आहे तुमचं?

त्याच्या प्रश्नातला चिडका विचित्र अर्थ समजून अनघाचे डोळे भरून आले. तिच्यापासून दूर होत नवीन म्हणाला; "अन्या या मँडीने जोक केला. पण अनघाने ते seriously घेतलं आणि ती बाहेरच्या दिशेने धावली. पण खुर्चीत पाय अडकून पडली. तर तिला मदत करायची सोडून हा गाढव हसतो आहे."

मंदार : ए फालतूपणा नको करुस हा. मी खरंच गाडीकडून चालत आलो आणि तुम्ही म्हणालात आनंद गाडीकडे गेला. तर मी म्हंटलं मला तो दिसला नाही. तर यात इतकं पॅनिक होण्यासारखं काय होतं? ही का धावली?

आनंद : अनघा, मी वॉशरूमला जाऊन मग गाडीकडे गेलो. म्हणून मँडीला दिसलो नसेन. उगाच धावाधाव करून सगळ्यांचं लक्ष नको वेधुस. समजलं?

आनंदच्या बोलण्याने अनघा फारच दुखावली. तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहायला लागलं. तिची ती अवस्था बघून नवीन म्हणाला;"अरे आनंद ती तुझ्या काळजीने बाहेर धावली आणि तू तिलाच दूषणं देतो आहेस? कमाल आहे ह तुझी."

नवीनचं बोलणं ऐकून आनंद भडकला. मंदारच्या ते लक्षात आलं आणि अजून वाद वाढायला नकोत म्हणून तो एकदम मोठ्याने म्हणाला;"यारो चलो निकलते हें! सगळे गाडीत बसा बघू. तुमचं खाऊन झालं आहे. मी माझा बर्गर घेऊन येतो आणि निघुया आपण."

उगाच ताणाताणी वाढायला नको म्हणून सगळ्यांनीच आवरतं घेतलं आणि उठून गाडीकडे जायला लागले. अनघा थोडी लंगडत होती. नविनच्या ते लक्षात आलं पण आनंद परत भडकेल म्हणून तो गप बसला. मनालीच्या देखील ते लक्षात आलं. ती अनघा जवळ गेली आणि म्हणाली;"फार जोरात लागलं का ग?"

अनघा : शरीरापेक्षा मनाला लागलं ग.

अनघाच्या डोळ्यात अजूनही पाणी होतं. तिचा हात हातात घेत मनाली म्हणाली;"सॉरी ग अनु. तू इतकी जोरात पडली असशील असं नाही वाटलं. एकदम हसायला आलं म्हणून हसले. तुला hurt करायला नाही ग."

मनालीचा हात प्रेमाने दाबत अनघा म्हणाली;"its ok ग मनाली. मला आनंदच्या reaction मुळे वाईट वाटलं. तुझ्या हसण्याने नाही."

पुढे जाणाऱ्या आनंदकडे बघत मनाली म्हणाली;"विचारलं का त्याने?"

मान खाली घालत अनघा म्हणाली;"नाही.... अजून नाही."

तिचा हात थोपटत मनाली म्हणाली;"don't worry dear. कदाचित नवीन वर्षाची सुरवात होईल तेव्हाच विचारेल. काहीतरी सरप्राईज ठेवलं असेल त्याने तुझ्यासाठी."

मनालीच्या बोलण्यावर अनघा काहीच बोलली नाही. तिच्याकडे बघून हसत अनघाने डोळे पुसले आणि दोघी गाडीत जाऊन बसल्या.

गाडी आनंदच्या वाड्यावर पोहोचेपर्यंत गाडीत कोणीही काहीच बोललं नाही. अनघा आणि मनाली डोळे मिटून बसल्या होत्या. नवीन आनंदच्या शेजारच्या सीटवर बसून रस्ता बघत होता. मंदारने बर्गर संपवला आणि कानात आयपॉड घालून त्याने त्याची गाणी ऐकण्याचा कार्यक्रम सुरू केला होता.

वाडा आला आणि सगळेच काहीसे सैलावले. नविनने गेट उघडलं आणि आनंदने गाडी आत घेतली.

मनाली : कधी आलो होतो बरं आपण last? मला वाटतं 2019. हो न ग अनघा?

अनघाने फक्त मान डोलावली आणि सगळे खाली उतरले. आपापल्या सॅक्स घेऊन सगळे वाड्याच्या मुख्य दरवाजाकडे निघाले. पण त्यांना थांबवत आनंद म्हणाला,"यार, आत आपण मधल्या दरवाजाने जाऊया."

सगळेच आश्चर्याने आनंदकडे बघायला लागले.

मनाली आणि मंदारने एकत्र म्हंटलं;"मधला दरवाजा?" एकत्र बोललं गेल्याने दोघेही एकमेकांकडे बघून हसले आणि मंदार म्हणाला;"अन्या, साल्या असं काही आहे या वाड्याला? आपण इतकी वर्ष येतो आहोत पण कधी बोलला नाहीस... आणि आम्ही पण बघितलेला नाही."

आनंद त्यावर काहीतरी बोलणार होता पण तेवढ्यात अनघा म्हणाली...

अनघा : अन्या हे काय अचानक? तुला तो मधला दरवाजा उघडलेला कधीच आवडला नाही न? आणि आता म्हणतोस तिथूनच वाड्यात जाऊया?

अनघाचं बोलणं ऐकून मंदारने मनालीकडे बघत डोळा मारला. ती देखील हलकेच हसली. नविनच्या ते लक्षात आलं पण तो काहीच बोलला नाही.

अनघाकडे शांतपणे बघत आनंद म्हणाला,"अग अनु, उगाच काहीतरी superstitions होती माझ्या मनात. पण आता माझं मत झालंय की जे असतं ते आपल्या मनात असतं. चला यार. तोच दरवाजा वापरणार आहोत आपण." असं म्हणून शीळ वाजवत आनंदने वाड्याला अर्धी फेरी मारली आणि वाड्याच्या मधल्या दरवाजाजवळ येऊन तो उभा राहिला. सगळेच त्याच्या मागून तिथे आले होते. आनंदने वळून सगळ्यांकडे बघत डोळा मारला आणि समोरच्या दरवाजाची कडी काढत तो ढकलला. आता मात्र सगळ्यांचेच डोळे मोठे झाले.

नवीन : अन्या... साल्या कुलूप नाही?

आनंद : अहं.... गरजच नाही. कोणालाही हा दरवाजा लक्षातच येत नाही. तुम्हाला तरी माहीत होता का? काय अनघा?

आनंदकडे संदिग्ध नजरेने बघत अनघाने नाही म्हणून मान हलवली आणि म्हणाली,"तू एकदोन वेळा उल्लेख केला होतास. पण म्हणालास की तुला तो दरवाजा आवडत नाही. त्या बाजूला जायला पण आवडत नाही. म्हणून तर हा दरवाजा उघडतो तिथल्या दोन खोल्यासुद्धा तू बंद ठेवल्या आहेस न?"

आनंद तिच्याकडे बघत म्हणाला;"सांगितलं न तुला. आता no more superstitions. त्या खोल्या उघडल्या मी." अस म्हणून हसत हसत आनंदने वाड्यात प्रवेश केला. अचानक आनंदचा मूड बदलला होता. इतक्यावेळ काहीसा घुम्यासारखा गाडी चालवणारा आनंद वाड्यात शिरला आणि हसत मोठ्याने ओरडला;"मी आssलोss!" त्याचा आवाज संपूर्ण वाड्यात घुमला... आणि सगळेच हसले. मनाली आनंदच्या पाठीवर हलकेच गुद्दा मारत म्हणाली;"कोणाला सांगतो आहेस हे? अख्या वाड्यात कोणीही नाही."

आनंदने तिच्याकडे बघितलं आणि डोळा मारत म्हणाला;"U never know!"

तो असं म्हणल्याक्षणी मनालीचा चेहेरा बघण्यासारखा झाला आणि ती मागे सरकत म्हणाली;"अन्या, फालतू बडबड करू नकोस हं. तुला माहीत आहे मला फोबिया आहे नवीन जागेचा. आठवतं न आपण पहिल्यांदा आलो होतो तेव्हा मी बाथरूममध्ये पण अनघाला घेऊन जायचे. गेल्या तीन-चार वर्षात येत होतो परत-परत म्हणून आता भीती गेली आहे माझ्या मनातली. तू असं काही बोललास तर अवघड होईल माझ्यासाठी."

तिचा उतरलेला चेहेरा आणि रडवेला आवाज ऐकून आनंदने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि हलकेच हसत म्हणाला;"मिनू डार्लिंग, घाबरू नकोस ग. मी गंम्मत केली." आनंदने मनालीला डार्लिंग म्हंटलेलं अनघाला आवडलं नव्हतं. पण ती काहीच न बोलता पुढे गेली आणि डावीकडे वळली. मनाली चटकन पुढे होत अनघाबरोबर गेली. आनंदने नवीन आणि मंदारकडे बघत खांदे उडवले आणि तो समोरच्या खोलीकडे सरळ चालत गेला.

आनंद : दोस्तहो... ही आपली खोली आहे.

मंदार: म्हणजे? इतका मोठा वाडा असून आपण खोली शेअर करायची? अन्या....

आनंद : गप रे मँडी. मला म्हणायचं होतं ही माझी खोली आहे. तुम्ही ही बाजूची घ्या आणि....

अनघा तेवढ्यात तिथे आली होती. ती आनंदकडे बघत शांतपणे म्हणाली;"आम्ही दोघी समोरची खोली घेतो."

आनंदने वळून अनघाकडे बघितलं.

आनंद : समोरची?

अनघा : हो! का?

आनंद काहीतरी बोलणार होता; पण मग काहीच न बोलता तो त्याच्या खोलीच्या दिशेने निघून गेला.

मंदार त्याच्या खोलीच्या दिशेने जात म्हणाला;"चल रे नवीन." आणि मग जरा मोठ्याने म्हणाला;"दोस्तांनो सगळेच आराम करूया थोडा वेळ. जेवायच्या वेळेस भेटू."

त्याने असं म्हणताच खोलीकडे जाणारी मनाली मागे वळली आणि म्हणाली;"अरे जेवायच्या वेळेला भेटून जेवायचं काय? इथे काय सोय आहे?"

खोलीच्या आत जात मंदार म्हणाला;"बघू ग! काहीच नाही तर बाहेर तर जाता येतं ना?"

मान उडवत मनाली स्वतःच्या खोलीत शिरली आणि अनघाकडे बघत म्हणाली;"आत्ता ठीक आहे हं; पण रात्री मी नाही बाहेर येणार. इथेच सोय करूया ग."

बाथरूमच्या दिशेने जात अनघा म्हणाली;"मनाली काळजी करू नकोस. वाड्याच्या मागे भिकू राहातो. त्याची बायको मस्त नॉनव्हेज करते. आपण दोघी नंतर तिथे जाऊन तिला पैसे देऊन येऊ. तुझं म्हणणं बरोबर आहे; आत्ता बाहेर ठीक पण रात्री बाहेर जाणं एकूणच अवघड."

अनघाने असं म्हणताच पटकन पुढे होत मनालीने अनघाचा हात धरला आणि घाबरलेल्या आवाजात म्हणाली;"म्हणजे काय ग?"

त्यावर हसून तिचा हात थोपटत अनघा म्हणाली;"उगाच घाबरू नकोस. आज थर्टी फास्ट night आहे न. म्हणून म्हंटलं. कळलं मनु डार्लिंग!" आणि हात सोडवून घेत बाथरूममध्ये गेली. ती आत गेलेली पाहून मनालीने मोबाईल हातात घेतला आणि कोणालातरी मेसेज करायला लागली.

***

साधारण दोन वाजयचा सुमार होता. अनघा आणि मनाली त्यांच्या खोलीमधून बाहेर आल्या. मस्त झोप काढल्यामुळे दोघीही एकदम फ्रेश होत्या. मुलांच्या खोल्यांच्या दिशेने जात दोघींनी हाका मारायला सुरवात केली....

"अरे उठा रे. किती झोपणार आहात? चला जेऊन येऊ या. जाम भूक लागली आहे."

त्यांच्या हाका ऐकून नवीन डोळे चोळत खोलीबाहेर आला आणि म्हणाला;"अरे यार. काय घाई असते ग तुम्हाला? मस्त झोपलो होतो ना."

त्यावर थट्टेच्या सुरात अनघा म्हणाली;"नवीन सध्या work from home असल्याने दुपारची झोप होतच असेल न?"

त्यावर नवीन देखील हसत हसत म्हणाला;"हो न. दुपारची झोप तुझ्यापेक्षा चांगली कोणाला कळणार?"

अनघा हसत म्हणाली;"आगाऊपणा नको करुस ह नवीन." मग खोलीच्या दारातून आत डोकावत तिने मंदारला हाक मारली. "मँडी उठ रे आळशा. भूक लागली आहे आम्हाला दोघींना." मंदार आतूनच ओरडला;"तुम्ही जाऊन या रे. माझ्यासाठी पार्सल आणा. या मस्त गार गार हवेत मला उठवसंच वाटत नाही."

त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत अनघा नविनला म्हणाली;"त्याला उठव रे. मी आणि मनाली मागे जाऊन रात्रीच्या जेवणाची सोय करून येतो. तोपर्यंत तयार व्हा तुम्ही."

असं म्हणून ती मनालीला घेऊन मागच्या दाराच्या दिशेने चालायला लागली. तिला हाक मारत नवीन म्हणाला; "अनघा.... तू अन्याला नाही का उठवणार?"

मागे न वळता अनघा म्हणाली;"त्याला झोपेतून मध्येच उठवलेलं आवडत नाही. उगाच परत माझ्यावर ओरडेल. मला माझी संध्याकाळ खराब नाही करायची. तूच उठव त्याला."

अनघाचं बोलणं नविनला आवडलं नाही. पण तो त्यावर काहीच बोलला नाही. अनघा आणि मनाली मागचं दार उघडून मागच्या आडाच्या दिशेने चालायला लागल्या. थोडं पुढे गेल्यावर मनालीने अनघाचा हात धरला आणि तिला थांबवत विचारलं;"अनघा खरं सांग... तुझ्यात आणि अन्यामध्ये काही फारच सिरीयस आहे का? हे बघ, उगाच आढेवेढे घेऊ नकोस. जे खरं आहे ते सांग मला."

अनघा समोर बघत काही क्षण थांबली आणि मग मनालीकडे वळत म्हणाली;"मनाली, आनंद आणि मी लग्न करायचा विचार करतो आहोत. म्हणजे मी तर नक्की. दोन महिन्यांपूर्वी.... म्हणजे दिवाळीमध्ये आम्ही दोघेचं इथे आलो होतो. तुमचं सगळ्यांचं नाव सांगितलं होतं माझ्या घरी. करोनामुळे work from home आहे. त्यामुळे बाबांना पटलं की सगळेच येतो आहोत. आनंद खूपच प्रेमात होता माझ्या. ते तीन दिवस माझ्या आयुष्यातले सर्वात सुंदर दिवस होते. मी स्वप्नात वावरत होते. आम्ही निघणार होतो त्याच्या आदल्या संध्याकाळी आनंदने मला प्रपोज केलं. इथे या मागच्या दाराशेजारच्या त्या झोपाळ्यावर. माझ्या नकळत त्याने तो सुंदर सजवला होता... माझ्यासाठी एक ड्रेस घेऊन आला होता... त्याने मला अंगठी पण दिली ग मनाली. ही बघ!" असं म्हणत अनघाने तिचा हात पुढे केला. अनघाच्या बोटात एक सुंदर हिऱ्याची अंगठी होती. मनाली काहीच बोलली नाही. एकदा अंगठीकडे बघून अनघा परत चालायला लागली.

मनालीचा चेहेरा फारच गंभीर झाला होता. चालता-चालता थांबत तिने अनघाचा हात ओढला आणि म्हणाली; "अनघा, एक गोष्ट सांगू?"

तिच्याकडे वळत अनघाने प्रश्नार्थक नजरेनेच बोल म्हंटलं.

मनाली : अनघा, तू म्हणते आहेस की आनंद तुझ्या खूपच प्रेमात होता... होता! म्हणजे आता नाही का? कारण आज सकाळपासून तो जे आणि जसं वागतो आहे त्यावरून तर त्याचं तुझ्यावर प्रेमच काय... पण तू त्याच्यासाठी थोडीशी देखील वेगळी नाहीस असं दाखवून द्यायचा प्रयत्न तो करतो आहे; असं मला वाटतं."

अनघाने एकटक मनालीकडे बघितलं आणि काहीही न बोलता ती परत चालायला लागली. मनाली देखील तिच्या मागे जात होती. आडाला वळसा घालून दोघी थोड्या पुढे आल्या आणि अनघाने हाक मारली;"भिकू दादा... ओ भिकू दादा..." मागच्या झाडीमधून आवाज आला;"ताई? कधी आलात? मला वाटलंच होतं आज याल." त्याला जास्त बोलायला न देता अनघा म्हणाली;"आम्ही पाचजण आलो आहोत भिकू दादा. रात्रीच्या जेवणाचं करू शकाल ना?"

अनघा इतकं बोलेपर्यंत भिकू समोर येऊन उभा राहिला होता. दणकट शरीरयष्टीचा काळाकभिन्न भिकू बघून मनाली दोन पावलं मागे सरकली. तिच्याकडे एकदा बघून भिकू अनघाकडे बघून हसला. त्याच्याकडे हसून बघत अनघा म्हणाली;"मी आणि मालक आलो आहोत. आमच्या बरोबर आमची ही एक मैत्रीण आणि अजून दोन मित्र आले आहेत. रात्रीसाठी मस्त चिकन, पोळ्या, डाळ-भात कराल ना?" "हो ताई. हे काय विचारणं झालं? काही बिअर वगैरे आणून ठेऊ का फ्रीजमध्ये?" त्यावर अनघा हसून म्हणाली;"नको. आम्ही आत्ता बाहेर जातो आहोत तेव्हा आणून ठेऊ. प्रत्येकाचा चॉईस वेगळा असेल न. तुम्ही फक्त जेवण करा." असं म्हणून तिने भिकुला हजार रुपये दिले आणि मागे वळून परत निघाली.

भिकूने अनघाला हाक मारली. "ताई.... वरती नका जाऊ कोणी."

त्यावर गर्रकन मागे वळत अनघा म्हणाली;"वरती नाही जायचं? का भिकू? अरे आनंदला तर वरचा मोकळा दिवाणखानाच खूप आवडतो. एरवी कधी मधल्या दाराकडे जाऊ दिलं नाही.... पण तुला माहीत आहे; आज आम्ही त्या दारातून आत आलो. आनंद कधीच खालच्या खोलीत राहायला तयार होत नाही. सरळ वर जातो. पण आज त्याने वरच्या जिन्याकडे बघितलं देखील नाही... आणि आता तू.... काय चाललं आहे मला कळेल का?"

त्यावर एकदा मनालीकडे बघत भिकूने खांदे उडवले आणि म्हणाला;"मी नऊ पर्यंत जेवण घेऊन येतो ताई. मला जे योग्य वाटलं ते सांगितलं. बाकी तुम्ही मालकांना विचारा." असं म्हणून तो मागे वळला आणि निघून गेला.

झालेल्या सगळ्या प्रकाराने मनाली एकदम अवघडून गेली. पण ती काहीच बोलली नाही. अनघा आणि मनाली वाड्यात परत आल्या तर आनंद, नवीन आणि मंदार तयारच होते. सगळे बाहेर पडले जेवायला.

***

संध्याकाळ चांगलीच दाटून आली होती. अनघाने वाड्यात फिरून सगलीकडचे दिवे लावले होते. मधल्या मोठ्या खोलीत बसून सगळे गप्पा मारत होते. जुन्या कॉलेजच्या गप्पा चालू होत्या. कोण कोणाला कोणावरून चिडवायचं किंवा कोणते प्रोफेसर कसे होते... असलेच सगळे विषय होते. थोड्या वेळाने अनघा आतून पत्ते घेऊन आली आणि म्हणाली;"चला, झब्बूचा एक डाव टाकूया." आणि सगळेच तयार झाले. त्यानंतर पत्ते खेळण्यात पाचहीजण इतके रमले की किती वाजले आहेत याचं त्यांना भानच राहिलं नाही. अचानक मागच्या दाराकडून भिकुची हाक ऐकू आली... "ताई, जेवण घेऊन आलो आहे. दार उघडता न?"

त्याचा आवाज ऐकून अनघा पटकन उठली आणि मागच्या दाराकडे गेली. तिचं वाड्यात सहज वावरणं नवीन आणि मंदारच्या डोळ्यातून सुटलं नव्हतं. पण कोणीच त्यावर काहीही बोलत नव्हतं.

भिकूने दोन पिशव्यांमधून डबे आणले होते. ते घेऊन तो स्वयंपाकघरात गेला. अनघा देखील त्याच्याबरोबर गेली. मनालीने हातातले पत्ते खाली टाकले आणि म्हणाली;"मी पण जाऊन मदत हवी आहे का बघते." आणि पटकन आत गेली.

मनाली स्वयंपाकघरात शिरली तर भिकू अगदी हळू आवाजात अनघाला काहीतरी सांगत होता. मनालीला बघून तो थांबला. अनघाने देखील मनालीकडे बघितलं आणि म्हणाली;"बरं झालं ग तू आलीस. चल, आपण आणलेल्या बिअर्स बाहेर घेऊन जाऊ. पत्ते खेळताना नऊ वाजून गेलेले कळलंच नाही न." मग भिकुकडे वळून ती म्हणाली;"साधारण अकरा पर्यंत ये रे जेवण गरम करायला. तुला बाहेर आणून ठेवायची गरज नाही. फक्त स्वयंपाकघरात लागेल ती मदत कर आणि जा लगेच. भांडी घासायला उद्याच ये."

एकदा मनालीकडे बघत भिकूने बरं म्हणून मान डोलावली आणि तो निघून गेला. अनघा आणि मनाली बिअर्स घेऊन बाहेर आल्या आणि परत एकदा गप्पा-पत्ते-बिअर असा मस्त कार्यक्रम सुरू झाला सगळ्यांचा. साधारण अकरा वाजता अनघा आपणहून उठली. तिने मागचं दार उघडलं आणि परत येऊन सगळ्यांना जॉईन झाली. थोड्या वेळाने स्वयंपाकघरातुन भिकुची हाक आली... ताई.... आणि अनघाने सगळ्यांकडे बघत म्हंटलं;"चला रे जेऊन घेऊया आणि मग बाहेर अंगणात जाऊन बसूया थोडावेळ. इथे बारा वाजता रोषणाई करतात असं भिकू म्हणत होता. ती बघत नवीन वर्षाच स्वागत करूया."

सगळेच बिअरमुळे थोडेसे सैलावले होते. सगळ्यांना भूक देखील लागली होती. त्यामुळे पटकन जेवायला आले. जेवणं आटोपून सगळे बाहेर गेले. अनघा सगळ्यात शेवटी बाहेर जायला निघाली. तिने स्वयंपाकघराकडे बघत म्हंटलं;"भिकू, सगळं आवरून घेतलंस तरी चालेल. आम्ही सगळे बाहेर आहोत. आत्ता आत कोणीच येणार नाही."

मनाली अनघा बरोबरच होती. तिने एकदा स्वयंपाकघराकडे बघितलं आणि अनघाचा हात धरत ती अंगणात आली.

क्रमशः

कथा

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

11 Jan 2021 - 7:44 am | तुषार काळभोर

मोठे भाग आहेत ही जमेची बाजू.

ज्योति अळवणी's picture

12 Jan 2021 - 12:22 pm | ज्योति अळवणी

मला पूर्ण कथा टाकायला आवडत. पण पूर्वी अनेक सूचना आल्या म्हणून 2-3 भागात टाकते कथा

ज्योति अळवणी's picture

12 Jan 2021 - 12:22 pm | ज्योति अळवणी

मला पूर्ण कथा टाकायला आवडत. पण पूर्वी अनेक सूचना आल्या म्हणून 2-3 भागात टाकते कथा

सतिश म्हेत्रे's picture

15 Jan 2021 - 10:45 pm | सतिश म्हेत्रे

पुढला भाग लवकर येवुद्या की मग ताई.

टर्मीनेटर's picture

12 Jan 2021 - 12:50 pm | टर्मीनेटर

आता मजा येत आहे वाचायला! पहिला भाग वाचला तेव्हा काहीच टोटल लागली नव्हती, नंतर समजले कि तो अर्धाच प्रकाशित झाला होता 😀

ज्योति अळवणी's picture

18 Jan 2021 - 5:57 am | ज्योति अळवणी

कथेच्या शेवटाकडून सुरवात करून... परत शेवटाकडे वाटचाल असा प्रयत्न करते आहे. आपल्या सर्वांचे अभिप्राय आणि प्रतिसाद अभिप्रेत आहेत