मार्गशीर्ष व. ३ पुण्यश्लोक शाहूचे निधन।

Ashutosh badave's picture
Ashutosh badave in जनातलं, मनातलं
3 Jan 2021 - 11:43 am

आज काय घडले ...

मार्गशीर्ष व. ३
पुण्यश्लोक शाहूचे निधन।
शके १६७१ च्या मार्गशीर्ष व. ३ या दिवशी छत्रपति शाहूमहाराज यांचे निधन झाले.
संभाजी व येसूबाई यांचे हे पुत्र. संभाजी राजांच्या, अमानुष हत्येनंतर फितुरीमुळे रायगड किल्ला, औरंगजेबाच्या हाती जाऊन राजमाता येसूबाई व शाहू यांना कैदेत जावे लागले. एकूण सतरा वर्षे ते बादशहाच्या अटकेत होते. त्यानंतर भोंगलांचा मांडलिक म्हणून शाहू राजे सुटूं शकत होते; पण ज्या स्वातंत्र्याकरितां मराठे तीस वर्षे लढत होते तें गमावून मराठे शाहूचे स्वागत करण्यास तयार नव्हते. सन १७०७ मध्ये अजमशहाने मराठ्यांत दुफळी करण्यासाठी शाहू राजांची कैदेतून मुक्तता केली. १७०८ मध्ये शाहूने सातारा येथे आपणांस राज्याभिषेक करून घेतला; आणि त्या वेळेपासून ताराबाईंचा पक्ष स्वतंत्र म्हणून नांदू लागला. तेव्हां आरंभापासून मदत करणाऱ्या बाळाजी विश्वनाथाला पेशवाई देणे शाहूला प्राप्त झाले. बाळाजी विश्वनाथ, बाजीराव, बाळाजी बाजीराव यांना हाताशी धरून त्यांनी राज्यविस्तार खूप केला. मरतेसमयी त्यांना पुत्र नव्हता. शाहू राजांविषयी सर्वांना मोठा आदर वाटत असल्यामुळे त्यांच्या मृत्यूने सर्वांनाच दुःख झाले. “ मनुष्यमात्र लहानथोर, दासदासी पदरचे, त्यांचा बाप प्रतिपालनकर्ता, ते दुःख स्मरून क्लेश जाले, ते लिहावयास असमर्थता आली, कारण असा प्रभु दयावंत दुसरा जाला नाही. धन्याचे राज्यांत अपराधी झाला तरी, 'हत्यारें करून घ्या' परंतु ' मारा' असा शब्द ज्याचे मुखी आला नाही, अजानबाहु, अजातशत्रु, पुत्रमित्र अशा एकरूप व्यवस्थेनें वागावयाचे, कोणास गैरभाषण केले नाही. असा पुण्यश्लोक राजा निधन पावला. -एकच हाहाःकार झाला." शाहू महाराजांनंतर त्यांची पत्नी सकवारबाई सती गेली. शाहूंच्या कारकीर्दीसंबंधाने एके ठिकाणी म्हटले आहे - "जशी काशी तसे सातारा-पुणे विद्यापीठच जालें, आशा कोणी उलंघन न करावी. ऐसें सार्वसौम राज्य केले. नीतिन्यायेंकरून प्रजेचे पालनपोषण केले. रयतेस उपद्रव काडी मात्र नाही. पर्जन्यवृष्टि यथाकाल होऊन पृथ्वीने धान्य-पीक बहुत द्यावें ऐसे सुभिक्ष जाले.-"
-१५ डिसेंबर १७४९

इतिहास

प्रतिक्रिया

शशिकांत ओक's picture

6 Jan 2021 - 12:23 am | शशिकांत ओक

जीवनातील घटनांचा आढावा घेतला आहे तो स्तुत्य आहे.
शाहूमहाराज यांच्या संदर्भात जी काही चित्रे पाहण्यात आली त्यात ते बर्‍याचदा अर्धे अंग उघडे, उकिडवे बसलेले असे पाहण्यात आले. ज्यांनी चित्र काढले त्यांनी तसे सुचवले असेल का?
जसा आजकालचा फोटोग्राफर बसायच्या पोझला, चेहर्‍यावरील भाव, कपड्याच्या सुरकुत्या वगैरे ठीक ठाक करतो. तसे काहीसे?
विचारांची मते समजून घ्यायला आवडेल.

शाहू महाराज विरक्त राहायचे त्यामुळे फारशी आभूषणे वगैरे वापरायचे नाहीत.

Ashutosh badave's picture

8 Jan 2021 - 10:31 am | Ashutosh badave

थोरले शाहू महाराज

चौथा कोनाडा's picture

13 Jan 2021 - 5:45 pm | चौथा कोनाडा


"जशी काशी तसे सातारा-पुणे विद्यापीठच जालें, आशा कोणी उलंघन न करावी. ऐसें सार्वसौम राज्य केले. नीतिन्यायेंकरून प्रजेचे पालनपोषण केले. रयतेस उपद्रव काडी मात्र नाही. पर्जन्यवृष्टि यथाकाल होऊन पृथ्वीने धान्य-पीक बहुत द्यावें ऐसे सुभिक्ष जाले.-"


+१