शाळा
सौ सरिता सुभाष बांदेकर
“ एक साथ नमस्ते”
ज्या मुलांचे आणि मुलींचे लक्ष होते त्यांनी मास्तरना नमस्ते केले.बाकीची मुलं , मुली आपल्यातच दंग होती.आज लता नवीन कानातले घालून आली होती. निम्म्या मुलींचे लक्ष तिच्या कानातल्याकडे होते.मुलांचे लक्ष खोड्या करण्यात होते.
मास्तरांनी हजेरी घेतली. आज शंभर टक्के मुलं हजर होती. आज शाळेत शिरा मिळणार आहे रोजच्या सारखी खिचडी नाही. शिरा किंवा कुरकुरे मिळायच्या वारी हमखास शंभर टक्के हजेरी असायची.
मास्तरांनी बघितले सचिनने फळा पूसून आजचा दिनांक लिहीला होता.आता रोजच्या प्रमाणे वर्तमानपत्राची मुख्य बातमी विचारायची वेळ झाली होती.
मास्तरांनी गणूला विचारले “गणू आजची महत्वाची बातमी सांग बघू.”
गणू त्याची पॅंट सावरत उभा राहिला “ मास्तरानू , आज ना शाळेत शिरा मिळणार म्हणून ईलंय मी”
“ अरे गणू ती बातमी नको सांगूस. वर्तमानपत्रातली बातमी सांग बघू.”
“ मास्तरानू आज माझ्या बापसानी वर्तमानपत्र आणलंच नाही. पण महत्वाची बातमी माका माहित हा”
“ बरं चालेल सांग. कुठची बातमी आहे आज महत्वाची”
“ मास्तरानू, ती सरपंचाची शेजारची कुस्मी असा ना ती त्या शाम्या बरोबर पळून गेली”
मास्तरानी गणूला सांगितलं की बाकावर उभा रहा.मग सविताला विचारलं.
“ सविता तू सांग बघू, कोणती बातमी होती आज वर्तमानपत्रात.”
“ मास्तर, आजची महत्वाची बातमी आहे चार दहशतवादी पकडले गेले.”
“ शाब्बास सविता.”
मध्येच सूमी उभी राहीली आणि म्हणाली” मास्तरानू, ती त्या कासारवाडीत मारामारी झाली होती ती बातमी चालेल काय??”
“ सूमे, मला वर्तमानपत्रातली बातमी पाहिजे.अशी गावात चर्चा असलेली नको.बरं आज राणेबाईंची सुट्टी आहे.”
“म्हणजे मास्तरानू आज तुम्हाला मूड नसेल ना शिकवायचा, मग आज लवकर सुट्टी करायची??”
“ गप्प बसा सगळ्यांनी. आज आपण अशाच गप्पा मारूया. मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो. तुम्ही त्याची ऊत्तरं द्या.
रामू तू सांग रामाची सीता कोण?”
रामू एकदम खूष झाला, त्याला ऊत्तर येत होतं त्याने लगेच सांगितले ,”मास्तरानू सोप्पं आहे याचं ऊत्तर सीता ही रामाची बायको आहे”
मास्तर पण चकीत झाले म्हणाले ,” अरे व्वा हुशार आहेस की”
सगळी मुलं हसायला लागली. मास्तरानी मुलांना गप्प रहायला सांगितले तरी मुलं हसतच होती.मग मास्तरांनी मुलांना हसण्याचे कारण विचारले.
मुलांनी जोशात सांगितले ,” मास्तरानू,गवळी रामाची बायको सीता आहे मग त्यात काय एव्हढं सगळ्यांना माहित आहे रामाची बायको सीता आहे ते.”
आता मात्र मास्तरांना काय बोलावे कळेना, मग ते म्हणाले “ ठीक आहे आता दुसरा प्रश्न ,पांडव किती होते??”
आता सगळी मुलं गप्प झाली मग गण्याने हात वर केला
“ मास्तरानू मला माहीत आहे याचं ऊत्तर, सोप्पं आहे.
पांडव होते खाटेच्या खूरा एव्हढे”
मास्तरांना आता चक्कर यायला लागली कारण गण्या सांगत होता पांडव खाटेच्या खूरा एव्हढे आणि बोटं दाखवत होता तीन.
मास्तरांनी त्याला विचारले ,”गण्या गाढवा तू सांगतेयस पांडव खाटेच्या खूरा एव्हढे. पांडव पाच, खाटेचे खूर चार आणि तू बोटं दाखवतोयस तीन हा कुठचा हिशोब??”
“ अहो मास्तरानू मी जेव्हा म्हणलंय की पांडव खाटेच्या खूराएव्हढे तेव्हा बोटा तीन दाखवली पण मी डोळा मारला चौथ्याचा तो तुम्ही नाय बघितला.मग सांगा माझं ऊत्तर बरोबर आहे की नाही हे बघा खाटेच्या खूराचे तीन बोटं आणि हा डोळा मारला तो चौथा. तुम्हाला मी काय पण केला तरी चूकच दिसतां.”
आता मास्तरांचा संयम संपला होता ते म्हणाले” चला आता आपण शिरा झालाय का बघूया.”
‘ शिरा झालाय का बघूया ‘ हे चार जादूई शब्द ऐकल्यावर सर्व मुलांमध्ये ऊत्साह सळसळला.
“ हो हो झालाय शिरा मगापासून घमघमाट सूटलाय “
एक साथ नमस्ते सारखा एकत्र आवाज आला.
गण्याला शिरा खाऊन खेकडे पकडायला जायचं होतं.गंगीला वहाळावर जाऊन चादरी धूवायच्या होत्या.शाहरूखचा मात्र वेगळाच प्लॅन होता.
शाहरूख मास्तरांना म्हणाला ,” मास्तरानू लवकर लवकर शिरा द्या मला राणे बाईंकडे कोंबडी घेऊन जायचं आहे आणि कोंबडी कापून द्यायची आहे.आज त्यांच्याकडे पाहूणे येणार आहेत.”
मास्तर म्हणाले ,” अरे मग शाळेत कशाला आलास तिकडेच जायचं ना कोंबडी कापायला.”
“ अहो मास्तरानू , अम्मी म्हणाली कोंबडी आधी अंडं देऊ दे मग घेऊन जा राणे बाईंकडे , तोपर्यंत शिरा खायला शाळेत जा.म्हणून शाळेत आलोय आता लवकर लवकर शिरा खाऊन जायला पाहिजे नाही तर राणे बाईंना उशीर होईल.”
“ बरं बरं कळलं.गण्या तुला कशाला लवकर जायचंय?”
“मास्तरानू, आज निस्त्याक काय पण नाय म्हणून बापसानी खेकडे पकडूक सांगितलंय”
“ अरे गण्या पण आता थंडीत कसे मिळतील खेकडे??”
“ अहो मास्तरानू, ते दगड घेऊन त्याचा आवाज करूचा. ता खेकड्यांका वाटतां पाणी ईला मग ते बीळातून बाहेर निघतंत.
मग पकडूचे खेकडे मोप खेकडे मिळतंत. तुमका हवे काय??”
“ नको मला नको तुझे खेकडे. आज संकष्टी आहे माझी”
“ बरा बरा मग तुमच्यासाठी नंतरच्याला आणिन”
तेव्हढ्यात करिश्मा लाजत लाजत पुढे आली तिच्या हातात अबोलीच्या फूलांचा गजरा होता. “ मास्तरानू . ह्यो गजरा मी राणे बाईंसाठी आणला होता पण त्या नाहीत , तुमका देऊ काय?”
सगळी मुलं फसकन् हसली. मास्तर गोरे मोरे झाले.
“ तूच माळ तो गजरा”
शबनम आणि राहूल मात्र नाराज झाले होते आज काहीच नवीन शिकायला नाही मिळालं.मग मास्तरांनी त्या दोघांना सांगितलं “मी तुम्हाला पुस्तकं देतो ती तुम्ही इथेच बसून वाचा.काही समजलं नाही तर मी तुम्हाला समजावेन.आपण गणिताची प्रॅक्टीस करूया. ज्यांना फक्त शिरा खायचा आहे त्यांनी शिरा खा आणि ताबडतोब घरी जावं”
सगळी शिरा प्रेमी मुलं घरी गेल्यावर शाळेत दहा बारा मुलं राहिली.या मुलांना शिक्षणाची गोडी होती.
मास्तर पण आता खूष होते प्रत्येक मुलाला आत्मियतेने शिकवत होते. शबनमला चौथीची स्कॅालरशिप मिळाली होती.राहूल दहावीत बोर्डात येण्याची शक्यता होती. त्यांच्यासाठी काहीही मेहनत करायची मास्तरांची तयारी होती.
शाळेची कबड्डीची टीमसुद्धा स्ट्राँग होती. दरवर्षी शाळेला खेळाची ट्रॅाफीसुद्धा मिळत होती.अशा मोजक्या हुशार आणि खेळाडू मुलां/ मुलींमुळे शाळा संपूर्ण तालुक्यांत प्रसिद्ध होती.
मास्तरांना संपूर्ण तालूक्यात मोठा मान होता.त्यामुळे मास्तर पण अशा वात्रट मुलां/ मुलींकडे जास्त लक्ष देत नव्हते.मुलांना लवकरात लवकर खायला घालून रवाना केल्यावर खरी शाळा सूरू व्हायची..............
सौ सरिता सुभाष बांदेकर
प्रतिक्रिया
26 Dec 2020 - 11:03 pm | टवाळ कार्टा
मस्तय
27 Dec 2020 - 5:41 pm | सरिता बांदेकर
धन्यवाद
27 Dec 2020 - 11:03 am | भीमराव
पण खरा मास्तर असा नसतो, तो वात्रट पोरांवर पण मेहनत घेतो, त्याला मार्गाला लावतो. हुषार पोरांना अजुन हुषार करणं सोपं आहे, वात्रट कार्यकर्ते हेच मास्तराचं खरं वर्क मटेरियल असतं. मास्तर मग हुषारांना फक्त मार्गदर्शन करतो, मध्यम पोरांना अभ्यासाची सवय लावतो. राहिलेल्या जनतेच्या पार घरी जाऊन हा असा का वागतो ते समजून घेतो. वेळ पडली तर स्वतः पोरांचा आई-बाप होतो, आणि मारुन कधी गोंजारत कधी कडुगोड बोलत जनावरांना लायनीत चालायला शिकवतो.
-- वाघमारे गुरूजींचा वात्रट आणि भांडखोर विद्यार्थी
27 Dec 2020 - 5:43 pm | सरिता बांदेकर
धन्यवाद,
कुणाला दुखवायचा हेतू नाहीय माफ करा.
पण हे काल्पनिक आहे. कधीतरी तुमच्या मास्तरांबद्दल पण लिहूया.
28 Dec 2020 - 12:51 pm | सिरुसेरि
कोकणी खवटपणाचे नमुनेदार वर्णन .
28 Dec 2020 - 10:42 pm | सरिता बांदेकर
धन्यवाद.
29 Dec 2020 - 6:45 pm | ज्योति अळवणी
वा
कोकणी पोरं बाकी स्मार्ट हं
29 Dec 2020 - 6:45 pm | ज्योति अळवणी
वा
कोकणी पोरं बाकी स्मार्ट हं
30 Dec 2020 - 2:14 pm | सरिता बांदेकर
धन्यवाद
4 Jan 2021 - 10:22 pm | स्मिताके
इरसाल पोरांची खुसखुशीत कथा.
5 Jan 2021 - 11:05 pm | सरिता बांदेकर
धन्यवाद
7 Jan 2021 - 1:33 pm | चौथा कोनाडा
छाण, आवडली ! वेगळ्याच वातावरणात घेउन गेली !
7 Jan 2021 - 9:08 pm | सरिता बांदेकर
धन्यवाद
12 Jan 2021 - 11:39 pm | मुक्त विहारि
शाळा कधीच आवडली नाही...
पण, ह्या विषयावरचे लेख वाचायला आवडतात...
13 Jan 2021 - 5:59 pm | सरिता बांदेकर
धन्यवाद