आत्मारामाची दीपावली..!!
अंधारातून प्रकाशाकडे,
जाणारी ती वाट,
जीवनात आली,
मंगलमयी पहाट..
किती काळ आसूसून,
पाहतेय मी वाट,
अंतरीच्या गाभाऱ्यात "त्याला",
माझ्या शरणागतीचा पाट..
समर्पणाचा स्नेह,
सद् भावनांची उटी..
अभ्यंगसमयी अशी,
"त्याच्या" चरणी मिठी..
सोsहं ची सनई,
अन् श्वासांचा धूप,
भाव,भक्ती, प्रेमाचा,
नैवेद्यही खूप..
शेजारी उभा गातसे,
नामस्मरणाचा भाट..
"त्याच्या" दीपावलीचा
असा मोठा थाट..!!
आशा अपेक्षांचे फटाके,
अहंकाराचा जळो भुईनळा,
पंचप्राणांची पणती,
आत्मारामाचा दीपसोहळा..
आत्मारामाचे औक्षणी,
मन भारावून जाई,
"त्याच्याशी" अद्वैत जाणता,
नित्य दीपावली होई...
जयगंधा..
१६-११ २०२०
प्रतिक्रिया
25 Nov 2020 - 9:09 pm | गोंधळी
दिवाळीचे वर्णन आवडले.
26 Nov 2020 - 8:08 am | Jayagandha Bhat...
धन्यवाद.