“We can now assert, with the power of hindsight, that Indian linguists in the
fifth century B.C. knew and understood more than Western linguists in the
nineteenth century A.D. Can one not extend this conclusion and claim that
it is probable that Indian linguists are still ahead of their Western colleagues
and may continue to be so in the next century? Quite possible; all we can say
is that it is difficult to detect something that we have not already discovered
ourselves.” - फ्रिट्स स्टाल ( UC बर्केली चे प्राध्यापक)
दोन विद्यार्थी पाठशाळेंत व्याकरण शिकत होते. एक विद्यार्थी प्रचंड हुशार होता तर दुसरा ढ. ढ मुलाची सर्व लोक चेष्टा करायचे, अतिशय वैतागून हा विद्यार्थी काश्मीर मधील कुठल्या तरी जंगलांत गेला आणि त्याने शिवाची आराधना सुरु केली. भगवान शिवानी त्याला दर्शन दिले कि नाही ठाऊक नाही पण त्याला डमरूचा आवाज ऐकू आला. पण व्यापार ह्या विषयावर सर्व ऊर्जा केंद्रित केलेल्या ह्या मुलाला वेगळेच आवाज ऐकू आले.
१. अ इ उ ण् |
२. ऋ ऌ क् |
३. ए ओ ङ् |
४. ऐ औ च् |
५. ह य व र ट् |
६. ल ण् |
७. ञ म ङ ण न म् |
८. झ भ ञ् |
९. घ ढ ध ष् |
१०. ज ब ग ड द श् |
११. ख फ छ ठ थ च ट त व् |
१२. क प य् |
१३. श ष स र् |
१४. ह ल् |
आणि ह्या मुलाने पुढे हेच आवाज घेऊन ४००० सूत्रे लिहिली ज्याला आपण आज अष्ठाध्यायी म्हणून ओळखतो. भारताच्या संपूर्ण इतिहासातून जर मला मानवी बुद्धीची सर्वांत मोठी कृती निवडायची असेल तर पाणिनी ह्यांची अष्टाध्यायी म्हणून मी सहज निवडेन. पाणिनी ह्यांच्या सोबत्त जो दुसरा विद्यार्थी होता त्याने ह्यावर नंतर टीका लिहिली आणि पतंजलीच्या महाभाष्याने शेवटी दोन्ही महान व्याकरण पंडितांच्या ह्या कृतींना एकत्र आणले.
लक्षांत ह्या हे आवाज साक्षांत परमेश्वराने निर्माण केले. हि भावना संस्कृत च्या व्याकरणात आहे. हे आवाज म्हणजे संस्कृत भाषेची ABCD आहे आणि संपूर्ण अष्टाध्यायी ह्या १४ महेश्वरसुत्रांवर आधारित आहे. मला ह्या १४ ओळी समजायला खूप वेळ लागला. तुम्हाला संस्कृत शिकायचे असो व नसो पण ह्या १४ ओली निव्वळ बौद्धिक खुराक म्हणून आपण समजून घेऊया.
मी देवभाषेची विदुषी नाही, त्यामुळे चूक झाल्यास अज्ञानी म्हणून क्षमा असावी.
ह्या १४ ओळी प्रत्यक्षांत एक विशिष्ट प्रकारची कूट भाषा आहे. एकदा हि १४ सूत्रे तुम्हाला मुखोद्गत झाली तरच तुम्ही पुढील सूत्रे समजू शकता. ह्या १४ सूत्रांतील प्रत्येक ओळ खालील फॉरमॅट मध्ये आहे.
[ काही आवाज ] [ एक नकली अक्षर]
प्रत्यक्ष जीवनात आम्ही अनेकदा संपुन शब्द वाचण्याच्या ऐवजी फक्त आद्याक्षरे वाचतो. उदा मिसळपाव ऐवजी मिपा. जाणकारांना मिपा म्हटले कि मिसळपाव हे समजते. त्यामुळे लिहिणे सोपे होते. ज्या काली पाठांतर करून ज्ञान पसरवले जायचे त्या काळांत आद्याक्षर कोड खूपच सुकर होत होता. पण पाणिनी ह्यांना आद्याक्षरे नको होती तर सर्व आवाजांतील एखादा सबसेट (subset) सहज पाणे रिफर करण्यासाठी एक कोड हवा होता. ह्या १४ सूत्रांतून हा कोड त्यांनी निर्माण केला.
पाणिनी ह्यांच्या कोड ला प्रत्याहार असे म्हणतात.
प्रत्याहार = > कुठलाही आवाज घ्या आणि त्यानंतर येणारे कुठलेही नकली अक्षर घ्या. हा झाला आपला कोड.
उदा => अच्
इथे अ हे पहिल्या सूत्रांतील अक्षर असून च् हे चौथ्या सूत्रांतील नकली अक्षर आहे.
अच् = > अ इ उ ऋ ऌ ए ओ ऐ औ
ह्या सर्व अक्षरांना पाणिनी स्वर असे संबोधित केले आहे.
आता पाणिनी एक सूत्र लिहितात
* इको यण् अचि
आता हे सूत्र वाचायला विचित्र वाटले तरी त्यांत खूप अर्थ आहे. आणि तीन शब्दांच्या ह्या सूत्राला आपले असे एक नाव आहे => "यण संधी" (म्हणजे "रवी शशी गोरे ह्या माणसाने रवी गोरे हे नाव शॉटफॉर्म म्हणून लिहिण्या सारखे आहे")
इको म्हणजे इक् , माहेश्वर सूत्रांतून आम्हाला हा कोड नक्की कोणत्या अक्षरांसाठी आहे हे समजते => इ उ ऋ ऌ
यण् म्हणजे => य् व् र् ल्
अचि म्हणजे अच् म्हणजे => सर्व स्वर.
"इको यण् अचि" ह्या नियमाचा अर्थ काय हे फक्त हे तीन शब्द वाचून आम्हाला समजत नाही पण पाणिनी ह्यांचा कोड ज्यांनी अभ्यासाला आहे ते तात्काळ ह्याचा अर्थ खालील प्रकारे लावतील
"अचि" नंतर "इको" आले तर त्याला "यण्" ने रिप्लेस करावे. (यूनिक्स मधील sed ज्यांना समजते त्यांच्या साठी approximately /(इको)अचि/यण्/ )
प्रति + एकः ह्या शब्दाची संधी करताना हा नियम लागू होतो.
प्र त इ + ए क = ?
इथे दुसरा शब्द "ए" ने सुरु होतो तर पहिल्या शब्दाच्या शेवटी "इ" आहे. त्यामुळे इथे "इ" ला "य" ने रिप्लेस करावे असे हे सूत्र सांगते.
प्रति + एकः => प्रत्येक:
अर्थांत सर्व सूत्रे वाटतील तितकी सोपी नाहीत.
तुम्ही कदाचित याहू फॉर्वर्डस विद्यापीठातून (आणि आता व्हाट्सअँप विद्यापीठांतून) एक गोष्ट वाचली असेल कि "कम्प्युटरला संस्कृत भाषा सर्वांत जास्त चांगली समजते आणि म्हणून नासाने वगैरे वगैरे ....". हे सर्व सत्याचा विपर्यास करणारी गोष्ट असली तरी कॉम्पुटेशनल लिंग्विस्टिक शिकणाऱ्या कुठल्याही अभ्यासकाला पाणिनी ह्यांची सूत्रे वाचून प्रचंड आनंद होईल.
पाणिनी ह्यांची ४०००+ सूत्रे आहेत. माहेश्वरी सूत्र हे एखाद्या meta-language (एक भाषा समजण्यासाठी निर्माण केलेली दुसरी छोटी भाषा) प्रमाणे आहे आणि संपूर्ण ४००० सूत्रांत संपूर्ण संस्कृत भाषा समजली जाऊ शकते मग ते पुस्तक ४०० BCE मधील असो वा २०२० मधील. त्याशिवाय ४००० सूत्रे वापरून नवीन शब्द, वाक्ये निर्माण केली जाऊ शकतात आणि भविष्यातील कुठलाही माणूस त्यांचा अर्थ लावू शकतो.
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पाणिनी ह्यांनी जे ग्रामर लिहिले त्याला ऑटोमेटा थेअरी मध्ये "कंटेक्स्ट फ्री ग्रामर" असे म्हटले जाते. काही सूत्रे ह्याला अपवाद आहेत पण बहुतेक सूत्रे ह्या प्रकारांत मोडतात. थोड्क्यात सांगायचे झाले पाणिनी सूत्रांतील सर्व सूत्रे आपण स्वतंत्र पणे अभ्यासू शकता आणि त्यांचा वापर करू शकता, आधी कुठला नियम लावला होता ह्यावर शेवटचा निकाल अवलंबून नाही पण लागू असणारे सर्व नियम लावले पाहिजेत. (प्रत्यक्षांत हे जास्त क्लिष्ट आहे पण ते सर्व समजून घेण्याचे स्थान मिपा नव्हे).
आता "गच्छति+इति" हि संधी पाहू.
वरील सूत्र लागू केले तर आम्हाला मिळते "गच्छत्येती" पण हे चुकीचे आहे कारण. पाणिनीची इतर सूत्रे सुद्धा इथे लागू होतात. "अकः सवर्णे दीर्घः" हे सूत्र लागू होऊन इथे
गच्छति+इति = गच्छतीती असा शब्द बनतो.
हे सर्व मी थोडक्यांत लिहिले आहे कारण माझा स्वतःचा अभ्यास कमीच आहे आणि विनाकारण क्लिष्ट लेखन केल्याने वाचणार्यांना सुद्धा त्यांत मजा येत नाही.
महेश्वर सूत्रें शिकताना बहुतेक शिक्षक अतिशय खोलांत जाऊन सांगतात त्यामुळे मला आधी "ह य व र ट्" हे प्रकरण काय आहे हे समजले नाही. ओष्ठ दंत तालव्य स्वरूपांत लिहिण्याऐवजी हे काय लिहिले आहे ? असाच विचार मनात आला. त्यांत शिवाचा डमरू वगैरे ऐकून कायच्याकाय तर नाही असे सुद्धा वाटले पण जेंव्हा कॉम्पुटेशनल लिंग्विस्टिक दृष्टिकोनातून इतर व्यक्तींनी समजावले तेंव्हा मला हे लवकर लक्षांत आले.
व्याकरण हा विषय पाणिनी ह्यांच्या आधीपासून अस्तित्वांत होता आणि पाणिनी ह्यांच्या आधी सुद्धा अनेकांनी संस्कृत व्याकरणावर पुस्तके लिहिली होती पण आधीपासूनच प्रसिद्ध असलेल्या भाषेला इतक्या अत्यंत स्पष्ट पद्धतीने सूत्रांत बांधण्याचे महाकठीण काम पाणिनी ह्यांनी केले. ४००० सूत्रांत एका भाषेला अश्या प्रकारे सूत्रबद्ध करणे एका मानवी मेंदू साठी खरोखरच कठीण आहे. संपूर्ण पाने एक नवीन भाषा निर्माण करणे हेच एक मोठे कठीण काम आहे. गेम ऑफ थ्रोन्स साठी Dothraki भाषा निर्माण केली गेली त्यावर अनेक विद्वानांनी कम्प्युटरच्या मदतीने काम केले. टोलकेन ह्यांनी आपल्या सिल्मारीलोन ह्या लॉर्ड ऑफ थे रींग्स संबंधित पुस्तकासाठी अनेक भाषा ५०-६० वर्षे आधी निर्माण केल्या. पण पाणिनी ह्यांनी असे करून दाखवले जे कदाचित अजून कुणीही केले नाही.
अर्थांत इतर भाषा आज इतक्या बदलल्या आहेत आणि त्यांचे इतके उप प्रकार निर्माण झाले आहेत कि कुठलीच भाषा संस्कृत प्रमाणे शुद्ध राहिली नाही.
लॅटिन भाषा सुद्धा जुनी भाषा आहे ह्याच्या व्याकरणाविषयी सुद्धा भविष्यांत लिहीन.
टीप : ढ मुलाचे नाव पाणिनी होते तर हुशार मुलाचे नाव होते कात्यायन. कात्यायन मुनींनी सुलभसूत्र नावाचे पुस्तक सुद्धा लिहिले जयंत त्यांनी गणित आणि भूमिती विषयावर विपुल लेखन केले आहे.
टीप : वैदिक काळांतील भारत आणि आजचा भारत ह्यातील फरक खरोखर कीव करावासा आहे. आज साधी शाळा चालवणे सुद्धा आम्हा लोकांना कठीण जात आहे !
बौद्धिक कसरत:
माहेश्वर सूत्र तुम्हाला समजले असेल तर एकूण किती "प्रत्याहार" आहेत हे आपण सांगू शकता का ? गणिती दृष्टिकोनातून खूप आहेत पण पाणिनी ह्यांच्या अष्टाध्यायी मध्ये सुमारे ४४ प्रत्याहार वापरले गेले आहे.
प्रतिक्रिया
21 Oct 2020 - 1:14 pm | उपयोजक
चांगली माहिती मिळाली! पाणिनींना आदरपूर्वक वंदन!! _/\_
21 Oct 2020 - 6:00 pm | विश्वनिर्माता
फारसे कळले नाही पण अद्भुत आहे जरूर. थोडे कष्ट घ्यायला हवेत लेख समजण्यासाठी असे वाटले.