पाऊस

VRINDA MOGHE's picture
VRINDA MOGHE in जनातलं, मनातलं
11 Oct 2020 - 11:36 am

                      पाऊस              
हवेतला उकाडा भयंकर वाढला होता. धरती उन्हाच्या सततच्या मा-याने प्रमाणा बाहेर तापली होती. सारी सृष्टी पहिल्या पावसाची चातकासारखी वाट पहात होती.
अखेर त्याची येण्याची चाहुल लागली.
 दुपारपासूनच मळभ दाटून अंधारून आल होतं.  हळुहळु गार वारा सुटला.. पाचोळा, केर सैरावैरा पळू लागले. झाडं आधी हळुच मग वा-याच्या रेट्याने जोरजोराने डुलू लागली. फांद्या हात फैलावून येणा-या पावसाचे स्वागत करायला सिध्द झाल्या. काळ्या ढगांचा पुंजका पसरट आकारात पसरत राखाडी धुरकट झाला. हळुहळू पावसाचे टपोरे थेंब टपटपू लागले. रस्त्यावर लोकांची पावसापासून लपण्याची  धांदल गडबड सुरू झाली.  अन् तो हवाहवासा खरपूस मातीचा घमघमाट वा-याबरोबर आसमंतात दरवळला. या सुवासाची कशाशीच तुलना नाही होऊ शकत.
काही रसिक पहिल्या पावसात मुद्दाम भिजतात. भिजायला हवंच खरंतर.
मला पावसात भिजण्यापेक्षा पाऊस बघायला जास्त आवडतो...त्याची विविध रूपं बघत राहावीशी वाटतात. अनुभवाविशी वाटतात.
कधी आवाज न करता नुसताच सरळ रेषेत पडणारा, कधी विजेच्या कडकडाटात आणि ढगांच्या गडगडाटाच्या संगतीने उन्मत्त होऊन कोसळणारा, कधी नुसतीच झिमझीम तर कधी नुसती पिरपीर.. कधी उन्हाशी संगनमत करत उन-पावसाचा खेळ दाखवणारा...पावसाचं प्रत्येक रुप नवं आणि हवंहवंस असच असतं.
पाऊस ज्या ठिकाणाहून बघू तसा वेगवेगळा दिसतो. शहरातला डांबरी सडकेवरचा, गावातला मातीशी लगट करून तीला चिंब करणारा, नदिकाठचा, समुद्रकिनारचा, रिसाॅर्टचा , पिकनीक स्पाॅटवरचा,
दरिखो-यातला...सगळी सगळीकडे वेगवेगळी रूपं.
कधी प्रेमात धरतीची आर्जवं करणा-या प्रियकरा सारखा...तर कधी धसमुसळा प्रेमवीर...कधी हळुवार प्रेमाची शिंपण करून धरतीला सुखावणारा तीचा प्रियतम..तर कधी प्रेमाच्या अखंड धारेत तीला गुदमरवून टाकणारा तीचा सखा...त्याच्या वेड्या शहाण्या सगळ्या प्रकारच्या प्रेमलीलांनी धरती सुखावून जाते. त्याच्या प्रेमरंगात न्हाऊन नवं  गोजिरं रूपडं धारण करते..तीच्या कांतीला नवी तुकतुकी येते. हिरवाकंच शालू नेसून ती सुखभाराने जडावून जाते. अंगांगी फुलून फळून तृप्त होते.
हा सगळा निसर्ग सोहळा दरवेळी बघताना, अनुभवताना  भान हरपायला होतं.
पावसानंतरचं सृष्टीचं हे रूपडं म्हणजे एखाद्या
नव विवाहितेच्या लाज-या अवखळ सौंदर्याशीच तुलना होऊ शकेल असं असतं.
धरतीवरचं झाड न् झाड पावसात न्हाऊन कसं तुकतुकीत तजेलदार दिसायला लागतं. कोवळी पानं स्वच्छ ताजी टवटवीत होतात. प्रत्येक पानातून उमटणारी थेंबांची नाचरी नक्षी जमिनीवरच्या साचलेल्या पाण्यात वलयांची सुंदर रांगोळी उमटवत राहते प्रत्येक थेंबागणिक.
पाऊस थांबल्यावरही झाडातून टपटपणारं पाणी, सुंदर तरूणीच्या सुस्नात लांबसडक केशकलापातून ठिबकणा-या थेंबासारखं भासतं , जणू मोत्यांच्या माळेतून मोती घरंगळतायत.
वेलींवरची नाजूक फुले पावसाच्या थेंबांचा मार सहन होत नसतानाही पानाआडून हळुच डोकावून पावसाचे तुषार अंगावर घेत आनंदून जातात.
नाजुक मोहक कळ्या हळुवारपणे थरथरत थंड
वा-यासवे डुलायला लागतात.
झाडं अगदी आनंदाने आपला पर्णसंभार सावरत पायाखालच्या पाण्यात आपलं तजेलदार प्रतिबींब पाहून खुषीत झुलतात ...वा-याबरोबर शिळही घालतात.
नदी नाले ओढे आनंदाने भरभरून समुद्राच्या भेटीच्या ओढीने खळाळत वाहत जातात. त्यांच्या खळखळाटाचं संगीत ऐकुन पशुपक्ष्यांना ही किलबिलाट करावासा वाटतो. ते ही खुषीने इकडून तिकडे उडत गाणी गाऊ लागतात. मोर खुषीत येऊन आपला सुंदर पिसारा फुलवून नृत्याचा ठेका धरतात.

सृष्टीतील प्रत्येक जीव या निसर्गाच्या पाऊस लेण्यांनी सजून-धजून नव चैतन्याने बहरून जातो. खुप आनंदीत होतो. धरतीतून छोटे कोंब तरारून वरती येण्याची घाई करतात, छोटं मुल कसं आईच्या पदराआडून हळुच डोकावून तृप्तीने हसत असतं तसे हे पोपटी कोवळे कोंब मातीच्या कुशीतून डोकावून बघायला उत्सुक असतात. हळुवार वा-याच्या लकेरीवर डुलत मोठे होत जातात हळुहळु.

पाऊस म्हणजे सृष्टीचा नयनरम्य आनंदसोहळाच जणू ! सगळ्यांनी अनुभवावा असा!!

--वृंदा मोघे.
15/6/17.

मुक्तकkathaa